निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...

Submitted by मार्गी on 19 August, 2015 - 20:53

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...


अस्कोट- जौलजिबी रस्त्यावरून दिसणारी गोरी गंगा


नदीचा कहर आणि रस्त्याची दुर्दशा

कोसळणा-या सामाजिक व्यवस्था आणि खंडीत होत चालेलला समाज... आज सर्वत्र अशांती आणि अस्वस्थता मी म्हणते आहे. परिस्थिती बिघडत जाते आहे. आर्थिक, प्रशासनिक आणि राजकीय अव्यवस्थाच नाही, तर सामाजिक नातीही कमी होत जात आहेत. वस्तुस्थिती ही आहे की, माणूस स्वत:पासून लांब जातोय. ह्या सर्व अस्वस्थ करणा-या परिस्थितीमध्ये उत्तराखंड कार्याच्या चौथ्या दिवसाची चर्चा करूया..

३१ जुलैला धारचुलाला जायचं आहे. दोन दिवस हुड़की, घरूड़ी आणि मनकोट अशा गावांमध्ये मोठी पायपीट झाली. सरांच्या योजनेप्रमाणे प्रत्येक दोन दिवसांनंतर एक किंचित कमी थकवणारा दिवस असावा, असं नियोजन आहे. त्यामुळे आज थोडं उशीरा निघायचं आहे आणि एका अर्थाने आज शारीरिक मेहनत कमी आहे. धान्य व रेशनबद्दल सतत बोलणी सुरू आहेत. त्यांचे भाव वाढलेले आहेत. इथे बँकेत खातं उघडायचं आहे. ही 'मैत्री' ची मदत करायला आलेली चौथी‌ टीम आहे. पुढच्या काही महिन्यांचं नियोजनसुद्धा आहे. त्यामुळे पैशांची आवश्यकता लागणार. म्हणून जर एटीएम काम करत नसतील, तर बँकेत खातं उघडून तिथून पैसे इथे ट्रान्स्फर केले जाऊ शकतात. पण हा पर्यायसुद्धा प्रभावी ठरत नाहीय. अस्कोटमध्ये बँकेत खातं उघडताना अडचणी‌ आल्या. त्यांचा सर्वरही डाउन आहे. त्यामुळे खातं सक्रिय व्हायला वेळ लागेल.

अस्कोटवरून जौलजिबीला गेलो. डॉक्टरांची टीम काल घरूड़ीमध्ये थांबली होती. त्यांनी तिथे शिबिर घेतलं. आज ते मनकोटला जातील. त्यांना तिथलं शिबिर करून अनेक तास पायपीट करून परत यायचं आहे. त्यांना आजही आराम मिळणार नाही. जौलजिबीमध्ये गोरी गंगा व काली गंगा ह्यांचा संगम आहे. अर्थातच इथेही मोठं नुकसान झालेलं आहे. जौलजिबी थोडसं मोठं गाव आहे. पूर्वी हे गाव मानस सरोवर यात्रेचा पहिला पडाव होतं. आता धारचुला मुख्य पडाव आहे. जौलजिबीवरून पुढे गेल्यावर निर्वासितांचे टेंटस दिसले. इथेही अर्पणच्या दिदींच्या ओळखीचे लोक आहेत. त्यांच्याशी बोललो. त्यांच्या आवश्यकता जाणून घेतल्या. रस्त्याची स्थिती बिकट आहे. दिल्ली- धारचुला बस दिसली. धारचुलापर्यंत रस्ता सुरू आहे, पण तरीही ती बस धारचुलाच्या थोडं आधी असलेल्या बलुआकोटपर्यंतच जाते आहे. कारण अजून रस्ते सामान्य झालेले नाहीत.

जाताना जीपमध्ये सर आणि अन्य साथीदारांसोबत बोलणं सुरू आहे. मैत्रीची पहिली‌‌ टीम असेसमेंटसाठी जेव्हा आली होती, तेव्हा त्यांना सर्व रस्त्यावर पायी प्रवास करावा लागला. कारण तेव्हा हा रस्ता पूर्ण कोसळला होता. आता तुकड्या- तुकड्यात का होईना पण रस्ते सुरू झाले आहेत. तेव्हा त्यांना जौलजिबीच्या पुढे पूर्ण पायी पायीच जावं लागलं आणि पायवाटही अजिबात सोपी नव्हती. नदीच्या वरून आणि डोंगरामधून कसबसं पुढे सरकत जावं लागलं. अशी वाट ज्याबद्दल आपण शहरात बसून विचारही करू शकत नाही. अशा वाटेने पुढे जाऊन पहिल्या टीमने सर्वेक्षण करून कामाची सुरुवात केली. सरांनी सांगितलेल्या तेव्हाच्या आठवणी व ते अनुभव खूप थरारक आणि खोलवरचे होते. आता तर रस्ते बनत जात आहेत. अर्थात् अजूनही धारचुलाच्या पुढे दोबाटपासून रस्ता तुटलेलाच आहे आणि आम्हांलाही अशा रस्त्यांवर काही अंतर जायचं आहे. पण पहिल्या टीमचे अनुभव निश्चित अजून खडतर असणार.

बोलताना अजूनही एक गोष्ट लक्षात आली की, इथे बाहेरून आलेल्या व्हॉलंटीअर्सपेक्षा स्थानिक गावांमधले तरुण जास्त प्रभावी ठरू शकतात. कारण पहाडामध्ये असं चालत जाणं त्यांच्यासाठी नेहमीचं आहे. पण असे व्हॉलंटीअर्स जास्त मिळत नाही आहेत. अडचण फक्त रस्त्यांचीच नाहीय. निसर्गत: हिमालय पहाड समुद्राच्या तळातील मातीने बनलेला आहे व म्हणून तो नाजुक आहे. संतुलन नाहीसं झालं तर हा पहाड तुटू शकतो. त्यासोबत दगडसुद्धा तुटू‌ शकतात. हातानेसुद्धा ते तोडता येऊ शकतात, इतके ते नाजुक असतात. अशा स्थितीमध्ये बांधकाम काम पक्कं होण्यामध्ये अनेक अडचणी‌ आहेत...

बी.आर.ओ. आणि ग्रीफचं कार्य बघणं अद्भुत आहे. मोठ्या मोठ्या यंत्रांनी डोंगर कापून आणि सर्व मलबा हलवून ते रस्ता बनवतात. तो साफ करून वाहतुक सुरू करतात. जेव्हाही ते समोरून जातात, तेव्हा आपोआप साद दिली जाते, ‘जय हिंद साब जी’. ह्या रस्त्यावर मिलिटरीच्या केंद्रांचंही मोठं नुकसान झालं आहे. आय.टी.बी.पी.चं एक पूर्ण युनिट वाहून गेलं. आता फक्त काही खुणा आहेत ज्या दर्शवतात की, एके काळी इथे वेगळं जगसुद्धा होतं...

धारचुलाला जाणा-या ह्या मार्गावर नया बस्ती, गोठी अशा गावांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. त्यातून वाचलेले लोक नातेवाईकांकडे गेले आहेत किंवा धारचुलाच्या सरकारी आपत्तीग्रस्त शिबिरात राहात आहेत. आज हे शिबिरही आम्हांला बघायचं आहे. ह्या गावांपैकी नया बस्ती गावाची गोष्ट वेगळीच आहे. नावाप्रमाणेच हे गाव नवीन होतं. १९७२ च्या पूरामध्ये ते गाव पूर्ण वाहून गेलं होतं. त्यामुळे त्याला पुन: नव्याने वसवलं गेलं. दुर्दैवाने ते तरीही वाचलं नाही...

दुपारी धारचुलाला पोहचलो. धारचुला काली गंगेच्या किना-यावरचं पहाडी तालुक्याचं गाव! शहर त्याला पहाडाच्या संदर्भातच म्हणता येईल. हे जिल्ह्यातलं सर्वांत उत्तरेचं तालुक्याचं गाव. ह्या तालुक्याची सीमा संपल्यानंतर तिबेट सुरू होतो. हिमालयाच्या शहरांमधली वैशिष्ट्ये इथेही दिसत आहेत. चढ- उतारांचे रस्ते व अरुंद रस्ते. दाट वस्ती. मोठी जाड भिंतींची घरं. नकळत करगिल आणि जोशीमठची आठवण आली. करगिल व जोशीमठ ह्याच प्रकारची गावं आहेत... फक्त ढगांमुळे बर्फाच्छादित पर्वत दिसत नाही आहेत. धारचुलाच्या जवळ तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीचे बर्फाच्छादित शिखर आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये पिथौरागढ़ शहरच नाही तर चंपावत आणि दन्यासारख्या दूरवरच्या ठिकाणांवरूनही बर्फाच्छादित शिखर दिसतात. आत्ता सर्व बर्फाच्छादित शिखर ढगाच्या बुरख्यामध्ये आहेत. कदाचित हा विनाश त्यांना पाहवत नसेल...

इथून तिबेट सीमा फार लांब नाहीय. लोकांची चेहरेपट्टीसुद्धा थोडी बदलली आहे. भारताच्या नॉर्थ ईस्टच्या लोकांप्रमाणेच लोक दिसत आहेत. असं वाटतंय की हे गावही तिकडचंच तर नाही. धारचुलामध्ये मिलिटरीचे अनेक युनिटस आहेत. तिबेट सीमेच्या जवळ आणि पहाडामधलं तुलनेने सपाट स्थान असल्यामुळे मिलिटरी ह्या जागेचा पूर्ण उपयोग करते. धारचुलामध्येच अर्पण सदस्यांच्या ओळखीच्या एका दिदींच्या घरी गेलो. त्या तवा घाटच्या पुढे असलेल्या गरगुवा गावामध्ये सरपंच आहेत व धारचुलाला राहतात. त्यांचं‌ घर किंचित चढावर होतं. नदीच्या पलीकडे नेपाळचा दिसतोय.

इथे अनेक गोष्टी कळाल्या. तवाघाटमध्ये काली गंगा आणि धौली गंगा (धौली/ गोरी गंगा नाव त्या नदीलाही वापरलं जातं) नद्यांचा संगम आहे. धौली गंगा नदीवर पुढे एक धरण बांधलं आहे. एन.एच. पी. सी.चं (नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन) एक मोठं केंद्र तिथे आहे. तिथे धरण असल्यामुळे धौली गंगेचा प्रवाह थोडा मर्यादित राहिला व नुकसान होऊनही व्याप्ती कमी राहिली. जर ते धरण नसतं तर जौलजिबीपर्यंत सर्व प्रदेश उद्ध्वस्त झाला होता, असं ऐकण्यात आलं. आता काली गंगा नदीचा प्रवाहही खूप बदलतो आहे. लोकांच्या पुनर्वसनाचा मोठा विषय समोर उभा आहे. सरकारसाठीसुद्धा हे मोठं आव्हान आहे. पहाडामध्ये जागेची खूप टंचाई असते आणि आता अनेक जागा असुरक्षित झालेल्या आहेत आणि लोकसुद्धा अशा जागी राहू इच्छित नाहीत. पण ते आपलं गाव- घरसुद्धा सोडू इच्छित नाहीत. आपली जमीन- मालमत्ता कोणाला सोडावीशी वाटेल! एक पर्याय म्हणून टनकपूर किंवा चंडाल हे सपाट जागेतलं (तराई) क्षेत्र आहे, असं कळालं. तिथे वन पंचायतची जमीन आहे आणि सरकार पुनर्वसन करू शकतं. पण मोठी अडचण ही आहे की, अजून टिहरी धरणग्रस्तांनाच जमीन मिळालेली नाहीय... काही वर्षांपूर्वी मुन्सियारीजवळ पूर आला होता. तिथल्या पूरग्रस्तांना अजूनही जमीन मिळालेली नाही... आणि आज ब-याच प्रमाणात सरकार नावाची यंत्रणा जागतिक कंपन्या आणि अन्य जागतिक शक्तींचं एजंट तर बनलेलं आहे. जमिनीसाठीची प्रतिस्पर्धा प्रचंड आहे. त्यामुळे कशी जमीन मिळणार... इथल्या सरकारी अधिका-यांचे नेपाळमध्ये बार चालतात. तिथे जमिनीचा भाव कमी आहे. स्वस्त जमिनीवरचा आपला बिजनेस बघण्यात ते व्यस्त आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नांचं काहीच वाटत नाही. अर्थात् काही जण सक्रियसुद्धा आहेत. एक एसडीएम दिवसरात्र पीडित लोकांना भेटतात. अशा गोष्टी ऐकण्यात आल्या.

एक गोष्ट आणखी अशी कळाली की, इथे पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्ह्यात न्याय पंचायती असतात. पिथौरागढ जिल्ह्यात एकूण ४४ न्याय पंचायती आहेत. आणि अधिकांश गावांमध्ये ग्रूप पंचायती आहेत. कारण गावं विखुरलेले असतात. अस्कोटला लागून असलेल्या अस्कोट वन परिक्षेत्राचंही बरंच नुकसान झालं आहे. इथे हरिणांचा एक मृग विहार होता. तोसुद्धा विस्थापित झाला आहे. सर्वत्र पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे. गाय, बैलच नाही तर खेचर आणि पहाडी जीवनशैलीतले अन्य जनावरंही मोठ्या प्रमाणात प्रभावित आहेत. त्यांचं पुनर्वसन कसं होणार? प्रभावित लोकच त्यांना आपल्या टेंटमध्ये घेऊन गेले आहेत.

धारचुलाच्या इंटर कॉलेजमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये आपत्तीग्रस्त कँप सुरू आहे. इथे सुमारे शंभर कुटुंबे आणि अडीचशे लोक आहेत. ते मुख्यत: न्यू सोबला, खेला, खेत, कंच्योती, पांगला अशा वरच्या गावांमधले आहेत. लँड स्लाईडमुळे त्यांची गावं असुरक्षित झाली. काही गावं वाहूनही गेली. इथे लोक सारखे येत आणि जात आहेत. जिथे कुठे सोय दिसली, तिथे लोकांनी आसरा घेतला. त्यामुळे आकडे बदलत असतात. सरकारकडून ह्या आपत्तीला ‘दैवी आपदा’ म्हणणं खटकलं.

इथे सुविधा पुरेशा नाहीत. काही खोल्यांमध्ये लोक राहतात. स्वत:चं जेवण स्वत: बनवतात. पण इथेही जात- पात आहेच. सगळे एकत्र आणि एकसारखं जेवण घेऊ शकत नाहीत. म्हणून तशी व्यवस्था करावी लागली... लोकांच्या जेवणाच्या सोयीबद्दल तक्रारी आहेत. मुलांसाठी दुध व हिरव्या भाज्या नाहीत. फक्त भोपळा आणि बटाटा दिला जातोय. लोकांना सिमला मिर्ची आणि वांगं हवंय. झोपण्यासाठी एक जाड फोम दिला आहे, पण तो फार गरम लागतो असं लोक म्हणाले. ह्या दिवसांमध्ये रात्री पाऊस आणि दिवसा उन्हाचा त्रास सुरू आहे.

‘मैत्री’ आणि ‘अर्पण’ संस्था इथे हिरव्या भाज्या, सोयाबीन, कपडे आणि दुध देण्याचा विचार करत आहेत. बाजारात जे येत असेल, त्यातूनच विकत घेऊन द्यावं लागेल. दुध कमीच येतं आहे. हिरव्या भाज्यांचीही स्थिती अशीच आहे. सरकारी अधिकारी आणि शिबिराच्या इन चार्जला भेटलो. ते तर सरकारी नोकर. वरून आदेश आल्याशिवाय ते काहीही करू शकत नाहीत. तरी त्यांना भेटून त्यांना संस्थेद्वारे दिल्या जाणा-या मदतीबद्दल सांगणं आवश्यक होतं. त्याच वेळी तिथले डी.एम. सुद्धा आले. त्यांनी शिबिर बघितलं. काही लोकांशी बोलले. आमच्याकडे ज्यांनी तक्रारी केल्या होत्या, त्यांना डि.एम. च्या समोर बोलायला सांगितलं. पण तितकी हिंमत ते करू शकले नाहीत. मग शिबिराच्या इन चार्जने सांगितलं की, जी मदत द्यायची असेल, ती‌ रात्रीच वाटा. कारण एकदा इथे वाटप सुरू आहे हे कळालं की, खूप गर्दी होईल आणि मोठी अडचण होईल. त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, आत्तासुद्धा काही लोक असे आलेले आहेत जे आपत्तीग्रस्त नाहीत; फक्त फुकट सोय घेण्यासाठी आले आहेत. अर्थात् ज्या प्रभावित लोकांचं घरच वाहून गेलं, त्यांच्याकडे कागदपत्र तरी कसे असणार? अशा ब-याच अडचणी इथे आहेत.

पीडितांच्या अडचणींना सीमा नाही. पशुंसाठी जो मोबदला मिळतो, त्यासाठीसुद्धा पशुचा फोटो लागतो. पण जर एखाद्या महिलेकडे तिचा स्वत:चाच फोटो नसेल तर ती म्हशीचा फोटो कसा देऊ शकेल? सरकारी नियम खूप असंवेदनशील वाटतात. अडचणी कितीही असोत, पहाडी लोक त्याला सामोरे जातील. विनाशामधून मार्ग शोधतील. कारण इतकी आपत्ती व इतका त्रास असूनही हे लोक अजिबात असहाय्य दिसत नाही आहेत. ते आत्मनिर्भर आहेत. त्यांच्या विचारांमध्ये कुठेच हताशा दिसत नाही. इतर कोणी मदत करो ना करो, ते स्वत:‌ स्वत:ची मदत करत आहेत...

...ती संध्याकाळ काली गंगेच्या घनघोर गर्जना ऐकता ऐकता संपली. नेपाळ समोरच आहे. कोणी जोराने आवाज दिला तर नेपाळपर्यंत आवाज पोहचेल. उद्या नेपाळला जायचं आहे! त्यासाठी फक्त एक छोटासा ब्रिज क्रॉस करावा लागेल. दोन मिनिटांचं काम आहे. नेपाळ विदेश नसून भारताचा भागच वाटतोय. पण ह्याच निकटतेचा फयदा विघातक लोकसुद्धा घेतात. सर्व प्रकारची‌ तस्करी इथे मोठ्या प्रमाणात होते. ह्युमन ट्रॅफिकिंग होतं. मादक पदार्थांची तस्करीही होते. हा सगळ्या अनधिकृत गोष्टी‌ करण्याचा महामार्ग आहे. जर एखादी कोंबडी अवैध प्रकारे नेपाळला न्यायची असेल तर तिचं तिकिट दहा रूपये आहे, हेही कळालं! धारचुला गाव पलीकडेसुद्धा आहे. समोर दिसणारं गाव नेपाळी जिल्हा मुख्यालय दारचुलाच तर आहे.

... सर्वत्र काळोख पसरला आहे आणि त्या अंधाराला चिरत जाणारी काली गंगेची गर्जना! रात्री डोंगरात अनेक ठिकाणी दिवे जगमगत आहेत. आता डॉक्टरांची‌ टीम अनेक तास चालून परतली असेल. तेसुद्धा उद्या आम्हांला इथेच भेटतील.


विस्थापित शिविर आणि त्याला जीवंत ठेवणारी चैतन्यपूर्ण मुलं!


काली गंगा आणि धारचुलामधून दिसणारं नेपाळचं दारचुला!

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्षतीग्रस्त इलाक्यांतील अगणित समस्या वाचून बधीर व्हायला झालं.. खरंच कोणत्या उमेदीवर तेथील लोकं जगत असतील??

२०१५ मधे काय परिस्थिती आहे ? काही कल्पना देऊ शकाल काय??

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद वर्षू जी! Happy

झालेलं नुकसान हळु हळु भरून निघालं. तिथे लँड स्लाईडस; रस्ते तुटणं; संपर्क खंडित होणं नेहमीचंच आहे. ह्या समस्या खरं तर त्या लोकांना समस्या वाटत नाहीत. त्यांचा जीवनक्रम सुरूच असतो. त्यांच्या आपल्या शहरांसारख्या गरजाही नसतातच. खरी समस्या तिथे निसर्ग व मानव मूळ स्वरूपात शाश्वत प्रकारे टिकवून ठेवणं ही आहे. ह्या पूरानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती अस्थिर झाली, ही समस्या आहे. त्याबद्दल पुढच्या भागांमध्ये बोलेन. धन्यवाद!

इथे सुविधा पुरेशा नाहीत. काही खोल्यांमध्ये लोक राहतात. स्वत:चं जेवण स्वत: बनवतात. पण इथेही जात- पात आहेच. सगळे एकत्र आणि एकसारखं जेवण घेऊ शकत नाहीत. म्हणून तशी व्यवस्था करावी लागली... >>>>
भयानक आहे.......... निसर्गाने यांना विस्थापित करताना जात पाहिली नाही ना? अशावेळेस एकी ने राहुन जास्त बळ मिळते.

हा भाग पण माहितीपुर्ण पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!

अडचणी कितीही असोत, पहाडी लोक त्याला सामोरे जातील. विनाशामधून मार्ग शोधतील. कारण इतकी आपत्ती व इतका त्रास असूनही हे लोक अजिबात असहाय्य दिसत नाही आहेत. ते आत्मनिर्भर आहेत. त्यांच्या विचारांमध्ये कुठेच हताशा दिसत नाही. इतर कोणी मदत करो ना करो, ते स्वत:‌ स्वत:ची मदत करत आहेत... >>>>> केवळ ग्रेट ... त्या सर्वांना सलामच ...

मैत्रीचे कार्य केवळ अपूर्व .... _______/\_______

आणखी एक गोष्ट म्हणजे धारचुलात भारतीय सेल फोन चालत नाही. तर नेपाळी सेलफोन मात्र चालतो. धारचुला ते पार तिबेटच्या सीमेपर्यंट ( नाभीढांग ) हा सगळा भाग भारतीय आहे पण इथे राहणारे भारतीय नेपाळी फोन वापरतात. ही कमालीची गोष्ट आहे की आपल्याच भागात आपला सेलफोन चालत नाही !

ही काली गंगाच भारत-नेपाळ बॉर्डर आहे पार जिथे तिचा उगम होतो त्या कालापाणी पर्यंत.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

@ शशांक पुरंदरे सर- अच्छा सर, ग्रेट! जोशी सरांचं व्यक्तिमत्व प्रचंड प्रेरणादायी आहे. ५८ व्या वर्षीचा त्यांचा फिटनेस थक्क करतो. तोसुद्धा अपघातामधून रिकव्हर झाल्यानंतर!

@ केदार (जी)- धन्यवाद! आम्हांला धारचुलापर्यंत नेटवर्क होतं. नंतर नेपाळी सिम.