हसायचीस.. मनावर प्रहार करताना

Submitted by बेफ़िकीर on 19 August, 2015 - 11:05

हसायचीस.. मनावर प्रहार करताना
रडू नकोस अता हे विचार करताना

तुझा विचार सदोदीत आडवा येतो
विचार काय करू हा विचार करताना

नसेल पाळत जो, तो पडेल एकाकी
अवश्य घाल कलम हे करार करताना

तरी बर्‍याच पसरल्यास तू तुझ्या सीमा
मनामधून मला हद्दपार करताना

खुशाल ये मरणा, जन्म काढला सारा
बळी म्हणून मला मी तयार करताना

कितीक ज्येष्ठ बघितले..जुनाट स्मरणांनी..
उदास जीर्ण मनाला किनार करताना

किती करूणपणे प्राण सोडुनी गेले
अनेकदा दिसले जे शिकार करताना

बरेच मित्र मिळाले चिथावणारेही
नि 'बेफिकीर' असा अपप्रचार करताना

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफिकीर,

रचना सुंदर आहे. पहिली चार आणि शेवटची चार कडवी घेतली तरी दोन कविता होतील. पण त्या फार चपखलपणे एकमेकींत मिसळतात. अनवट प्रकार दिसतोय. त्याबद्दल धन्यवाद! Happy

हद्दपार विशेषकरून आवडला.

आ.न.,
-गा.पै.

माझी एक विनंती आहे बेफिकीर जी ना:

हि गझल वाचताना व समजून घेताना मी आणि माझ्या मित्रात दोन वेगळे दृष्टीकोन समोर आलेत.

तरी तुम्ही जर
"हसायचीस.. मनावर प्रहार करताना
रडू नकोस अता हे विचार करताना"

आणि

"नसेल पाळत जो, तो पडेल एकाकी
अवश्य घाल कलम हे करार करताना"

यांमागील मनस्थिती आणि अर्थ जर explain केला तर आम्हाला उलगडा होईल.

धन्यवाद.

हसायचीस..मनावर प्रहार करताना
रडू नकोस अता हे विचार करताना:

मी तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा ठेवत असताना माझ्या प्रामाणिक प्रेमभावनेची खिल्ली उडवायचीस. (बराच काळ लोटला आता! आता कुठे तुला जाणवते की तुला माझ्याइतके प्रेम करणारे दुसरे कोणी कधी मिळालेच नाही. आता तुला पश्चात्ताप होत आहे. पण आता तो काळ परत येणार नाही. जे झाले ते झाले. जे केलेस ते मी भोगले, आता तुला भोगावे लागत आहे. आपण तेव्हा ह्याच्याशी नीट वागलो असतो तर असे वाटून तुला आता रडू येतही असेल, पण) रडू नकोस अता हे विचार करताना!

नसेल पाळत जो, तो पडेल एकाकी
अवश्य घाल कलम हे करार करताना:

आपल्यात प्रेमाचा करार करायचा ठरत होते तेव्हाची गोष्ट! तू म्हणालीस की आपल्यातील एखाद्याने करार पाळला नाही तर आपोआपच दुसरा एकाकी पडेल, एकटा पडेल, दु:खी होईल. तेव्हा मी विचारले की ज्याने करार मोडला तो सुखी होईल हे कशावरून? त्यावरचे उत्तर तू दिले नसलेस तरी तुला माहीत होते की तू करार मोडणार होतीस आणि त्याचे तुला काहीच वाटणार नव्हते. तुला हेही माहीत होते की माझ्याशी केलेला खोटा करार मोडून तू आनंदात राहू शकशील पण मी मात्र दु:खात जळत राहीन. त्यामुळे तेव्हा करार करताना तुला कशाचीच भीती नव्हती. मात्र आता कुठे तुला उमगले आहे की फक्त ज्याचा विश्वासघात होतो तोच एकटा पडतो असे नाही तर ज्याने विश्वासघात केला तोही एकटाच पडतो. तूही एकटीच पडशील हे मला तेव्हाच माहीत होते म्हणून मी तुला आग्रह करत होतो की 'जो करार पाळणार नाही तो एकाकी पडेल' असे कलम करारात अवश्य घाल.

अर्थ विचारल्याबद्दल आभारी आहे. आशा आहे की अर्थ आवडला असेल व अर्थानुसार शेर झाल्यासारखे वाटेल.

स्नेहाभिलाषी!

-'बेफिकीर'!