वेडा!

Submitted by मुग्धमानसी on 19 August, 2015 - 06:30

तो वेडा होता. सगळे तसंच म्हणायचे.
वेडाच असणार. कारण त्याचे कपडे मळलेले असायचे. फाटलेले सुद्धा.
त्याची दाढी राठ वाढलेली आणि केस सुद्धा लांब आणि राठ. आंघोळ नसणारच करत कधी.
शहाणी माणसं असं थोडीच राहतात? छान छान कपडे घालून, पावडर लावून शाळेत जातात, ऑफिसला जातात...
तो मात्र कुठेच जायचा नाही. तिथंच असायचा. एका कडेला. दोन रस्ते मिळतात तिथंच. फाट्यावर.
त्यानं कुठून कुठून जमा केलेल्या फाटक्या तुटक्या उशा, चादरी, तक्के... त्याची त्यानं त्याच्यापुरती एक छान बैठक तयार केली होती.
तिच्यावर तो दिवसभर बसून असायचा. राजासारखा! मला तर ते त्याचं सिंहासन वाटायचं!
त्याच्यासमोरून हजारो माणसं यायची जायची. कुणी गाडीतून, कुणी पायी.. कुणी घासत रडत, कुणी थकुन चूर, कुणी हसत खिदळत!
कुणीच त्याची दखल घ्यायचं नाही. कधीच.
कुणी दखल घ्यावं असं तोही काही कधीच करायचा नाही. नुसताच कुठल्याश्या काडीनं घाणेरडे दात कोरत येत्या-जात्याकडे बघत रहायचा. एकाच नजरेने. मधूनच थुंकायचा.
कुणीच त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही. त्याला कधी कुणी हटकायचं नाही.
मला कधी कधी असंही वाटायचं की तो खरंतर नाहीच्चे तिथे! फक्त मलाच दिसतो तो... किंवा तिथं तो आहे असा मला उगाच भास होतो.
मग मी शहारून जायचे.
उंच खिडकीतून खाली उतरून कधी मी त्याच्या जवळ जायचे. त्याला बोट लावून बघावं एकदा असं वाटायचं.
पण मग नुस्तीच त्याच्या समोर जाउन बसायचे. तो आठ्याभरल्या कपाळानं मला खाली-वर बघायचा. मग हसायचा.
मी त्याला द्यायचे माझ्याकडचं एखादं चॉकलेट किंवा गोळी.
तो मला त्याच्या एखाद्या फाटक्या उशीतला एखादा कापसाचा पुंजका द्यायचा. किंवा एखादा दोरा, किंवा चिंधी.
मी त्याच्याकडे न बोलताच सोपवायचे माझी काही प्रश्नांकीत कुतुहलं.
आणि तो मला द्यायचा त्याची बेपर्वा नजर. त्यातलं विरक्त जहर. आणि एक हसू.

मला खरंतर हवं होतं त्याचं बेदखल राजेपण! त्याचं त्याच्यापुरतं त्यानं उभारलेलं सार्वभौम साम्राज्य...!
कुठल्याही शिक्क्याची, नावाची, प्राज्ञेची, नोंदीची, दखलीची कणभरही गरज नाकारणारं त्याचं उद्धट अफाट तरिही क्षुल्लक अस्तित्व!
त्याची उर्मट नजर! फाट्यावर बसून सगळ्या जगाला फाट्यावर मारण्याची त्याची सुंदर अदा!
मी फिदा होते त्याच्या वेडावर.. हे आत्ता लक्षात आलं. मी शहाण्यांच्या गर्दीत सामिल झाले तेंव्हा.

नंतर तो नाहीसा झाला अचानक. त्याचं सिंहासन तिथंच टाकून. अगदी त्याची दात कोरायची काडी सुद्धा नेली नाही त्यानं सोबत.
मी दिलेली गोळ्या-चॉकलेटं त्याच्या उशाखाली सापडली. मुंग्या लागून लगदा झालेली.
मी दिलेल्या ऐवजाचं त्यानं असं केलं. अव्हेरही केला नाही आणि स्वीकारही केला नाही.

नंतर कधीतरी मोठी वगैरे झाले तेंव्हा त्यानं दिलेल्या सगळ्या ऐवजाचा मी मात्र नकळत फारच उपयोग केला.
घरटं बांधलं. माझं घरटं!
त्याच्या पायात विरक्ती पेरली आठवणीनं. हसू जोपासलं चार भिंतींतून आणि बेपर्वा नजरही टांगली दाराशी, खिडकिशी! आतून बाहेर... बाहेरून आत... ती हिंदोळत राहते आता.

मी घेतली होती त्याच्या असण्याची दखल तेंव्हा! त्याच्या नजरेला सामोरं गेले होते! कारण तेंव्हा लहान होते.
आता भेटला तर आताही जाईन त्याला सामोरं! पण पुन्हा लहान व्हावं लागेल. खुपच लहान व्हावं लागेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जब्बरदस्त लिहीलेय! वाचुन बराच वेळ रेंगाळत राहिला लेख!
कुणीच त्याच्याविषयी काहीच बोलायचं नाही. त्याला कधी कुणी हटकायचं नाही. मला कधी असंही वाटायचं की तो खरंतर नाहीच्चे तिथे! फक्त मलाच दिसतो तो... किंवा तिथं तो आहे असा मला उगाच भास होतो. मग मी शहारून जायचे. >>> >>>> वास्तवाने खाडकन चपराक दिल्यासारखं वाटलं!

माबो वर न वाचलेले जुने लेख नवीन अस टायटल घेऊन येत नाहीत का?, हा लेख मी वाचला नव्हता तरी नवीन असा दिसला नाही. काल प्रतिसादामुळे वर आल्यावर दिसला , नाही तर इतका सुंदर लेख वाचायचा राहिलाच असता! Uhoh

जयवंत दळवी अस उपेक्षितां विषयी प्रचंड आत्म्स्पर्शी लिखाण करत. त्या नंतर बरेच वर्षानंतर अस उपेक्षित जगण जगणार्‍या जिवा विषयी वाचायला मिळाल. मस्त आहे. गद्य असल तरी लिखाणात एक प्रकारची सुप्त लय सापडते. मुक्त छन्दात सुरू केलेल्या कवितेची हळूच कुठे तरी कथा बनल्याचा आभास...छान. !

फार भारी उतरलय हे पोर्ट्रेट तुमच्या लेखनातुन … सर्वसामान्यांच्या दृष्टीस न दिसणारया शेड्ससुद्धा तुमच्या नजरेतून सुटत नाहींत ...

Pages