प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

Submitted by निंबुडा on 18 August, 2015 - 03:45

शिळ्या कढीला ऊत आणत आहे ! Proud

खरं म्हणजे हा लेख सिनेमा प्रदर्शित झाल्या झाल्या पाहून लगेच ल्हिहिला होता पण माबोवर पोस्टायला वेळच झाला नाही.

चित्रपटः प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रदशितः एप्रिल २०१३ मध्ये
प्रमुख कलाकारः मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सुनिल बर्वे, पल्लवी जोशी, सुहास जोशी

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

कविवर्य पाडगावकरांनी ह्या ओळी मराठी सिने जगतासाठीच लिहिल्या असाव्यात जणू! कारण वेगळे काही मांडण्याचा आभास निर्माण करून प्रेक्षकांची अपेक्षा उंचावूनही बहुतांशी मराठी प्रेमपट त्याच त्याच सरधोपट मार्गाने जातात. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शनात उतरल्यानंतरचा पहिला चित्रपट म्हणून ह्या सिनेमाची जी हवा निर्माण करण्यात आली होती त्या मानाने चित्रपट फुसका बारच आहे ही खेदाची गोष्ट आहे.

एक आटपट नगर असतं. तिथे एका भागात एका राजा राणीचा आपल्या दोन गोड राजकन्यांसमवेत सुखाचा संसार. सोबत राजाची विधवा आई असतो. अचानक ह्या गोंडस चित्राला ग्रहण लागतं. घरातली राणी ही राजाची नावडती बनते आणि बाहेरील एक राणी आवडती बनते. पण सरधोपट कथांनुसार राजाने नावडतीला घराबाहेर हाकलण्याऐवजी इथे घटना उलट घडते. राजाचे अनैतिक संबंध कळल्यानंतर राजाची आईच राजाला राजवाड्याबाहेर हाकलून लावते. राणी आपल्या २ राजकन्या आणि राजाची आई ह्यांची आर्थिक, नैतिक, अश्या सर्व प्रकारची जबाबदारी निभवत राज्याचा कारभार चालवत राहते.

त्याच नगरात दुसऱ्या एका भागात अजून एका राजा राणीच्या संसाराची दुसरीच गत असते. इथे राणी जरा अतिच महत्त्वाकांक्षी असते. आपल्या संकुचित राज्याबाहेर अजून एक विस्तारीत जग आहे, जे तिला खुणावत असतं. त्या ओढीपायी ती स्वतःच आपला उबदार राजवाडा, राजबिंडा राजा आणि एक राजकन्या व १ राजपुत्र ह्यांना सोडून त्या बाहेरच्या जगाचा आस्वाद घेण्यासाठी निघून जाते. बिच्चारा राजा मग आपली मुलं आणि आपला राजवाडा ह्यांची देखरेख, सांभाळ, जबाबदारी शिरावर घेतो.

पहिल्या कथेतली राणी आणि दुसऱ्या कथेतला राजा ह्यांची योगायोगाने भेट होऊन हळूहळू मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. एकमेकांवरच्या प्रेमाची चाहुल त्यांना लागते ना लागते तोच त्यांचे जुने जोडीदार पुन्हा त्यांच्या राजवाड्याचे द्वार ठोठावतात. आत प्रवेशाची अनुमती मिळावी अशी व्यक्त - अव्यक्त इच्छा मनात धरून! आता आपले हे नवे प्रेमी जीव काय निर्णय घेतात? त्या निर्णयाप्रत कसे व का येतात? तिथे येइपर्यंत कोणकोणत्या मानसिक व भावनिक आंदोलनांनाना ते पेलतात? कोणकोणत्या वादळांना तोंड देतात? ह्या सर्वांची अंशत: उत्तरे देऊन ही कहाणी सुफळ संपूर्ण होते.

पहिल्या कथेतले राजा-राणी उभे केले आहेत सुनील बर्वे आणि मृणाल कुलकर्णी (अनुक्रमे केदार व अनुश्री) ह्यांनी तर दुसरी राजा-राणीची जोडी साकारली आहे सचिन खेडेकर व पल्लवी जोशी (अनुक्रमे रोहित व प्रज्ञा) ह्या दोघांनी! जोडीला सुहास जोशी (सुनील बर्वे ची विधवा आई. ) आणि मोहन आगाशे व स्मिता तळवलकर (मृणाल कुलकर्णी चे आई-वडील) ह्या ज्येष्ठ कलाकारांची साथ आहे. बच्चे कंपनींपैकी सचिन खेडेकर च्या धाकट्या मुलीचे काम साकारलेली बालकलाकार ‘गुंतता हृदय हे’ मुळे चांगलीच परिचयाची आहे. बाकी बालकलाकार नवीन आहेत.

एकंदरीत कथेच्या बाबतीत बोलायचे झाले तर नेहमीची घासून गुळगुळीत झालेली तीच ती कथा आहे! बाहेर प्रकरण असलेला व बायकोला सोडून दिलेला नवरा, त्या सोडून दिलेलीचे मग कुणा दुसऱ्या पुरुषात गुंतणे, त्याच्यात मानसिक व भावनिक आधार शोधणे, घरातील कुणीच अगदी मुलींनी सुद्धा तिला समजून न घेणे, तिची घुसमट, ती ज्या पुरुषात गुंतली आहे त्याची पूर्वायुष्याची कहाणी इत्यादी इत्यादी! प्रेम, लग्न, नाती, रीती-रिवाज, समाज, नात्यांमधली गुंतागुंत ह्या त्याच त्याच चाकोरीतून फिरणारा हा सिनेमा अपेक्षेपेक्षा वेगळं काहीही देऊ शकत नाही. कथेचा आहे तोच प्लॉट कायम ठेवून पात्रांच्या भुमिका, मानसिकता ह्यांबाबतीत बरेच काही आऊट ऑफ द बॉक्स दाखवता येणे शक्य असूनही हा सिनेमा ते दाखवू शकलेला नाही ही खंत आहे! मराठी मालिका व सिनेजगतातील अभिनयाच्या इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर मृणाल कुलकर्णीने ह्या सिनेमाद्वारा दिग्दर्शनात पहिले पाऊल ठेवले आहे. पात्रांसाठी योग्य कलाकरांच्या निवडीतच अभिनयाची पहिली बाजी सिनेमाने जिंकली आहे. मराठीतल्या इतक्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाबद्दल खोट काढण्यासारखे काही नाही. परंतु सचिन खेडेकरच्या घरातील कामाला असलेले नोकर नवरा-बायको, सचिनला लग्न करण्याची गळ घालणारे एक जोडपे (हे जोडपे सचिन खेडेकर चे नात्याने कोण लागते होते ह्याचा चित्रपटात काहीच उल्लेख नसल्याने उपरेच वाटले काहीसे! ), सुनिल बर्वेचे घराबाहेरील प्रेमापात्र अशा काही दुय्यम कलाकारांचा अभिनय बेतास बात म्हणावा लागेल. चित्रपटाच्या एकंदर फ्रेम मध्ये असे तुकडे काहीसे उपरे वाटतात. शिवाय मृणालच्या लहान बहिणीचे एक पात्र कथेत आहे. अभिनय उत्तम असला तरीही अनुश्रीला सहनुभूतीव सपोर्ट देणारे एक तरी पात्र कथेत हवे म्हणून ह्या पात्राची योजना केल्यासारखे वाटते. मग त्यासाठी तिचा स्वभाव अनुश्रीपेक्षा अगदी उलट म्हणजे डॅशिंग, तडजोड न करणारी, प्रसंगी जाब विचारणारी, तिरकस बोलणारी वा उलट उत्तरे देणारे इत्यादी नेहमीचाच गुळमुळीत फ़ॉर्म्युला.

मुख्य कथाबीज सांगितल्यावर आता कथेतील मुख्य पात्र काय व्यवसाय करीत असतात, इत्यादी तपशील देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. कारण ठरवेलेल्या कथेची मांडणी करण्यासाठी आता दाखवलेय त्यापेक्षा वेगळे काही व्यवसाय दाखवले असते तरी चित्रपटाचे मुख्य सूत्र तेच राहिले असते.

मृणालला कायम 'नवऱ्याचे बाहेर प्रकरण असलेली स्त्री' हे एकच पात्र साकारायला इतके का आवडते, असा प्रश्न पडावा इअतक्यांना तिने अशी भुमिका केली आहे. अवंतिका आणि 'गुंतता हृदय हे' ह्या मालिका, एक मिलिंद गुणाजी बरोबरचा सिनेमा (ह्यात मृणालचा डबल रोल होता. चित्रपटाचे नाव आठवत नाही. ), अजून एक मराठी सिनेमा होता जो 'स्टेप मॉम' ह्या इंग्रजी सिनेमाची मराठीतली भ्रष्ट नक्कल होता, आणि आता भरीस भर म्हणून हा सिनेमा. निदान ह्या सिनेमात तरी तिने गुळमुळीत स्त्री पात्र न रंगवता ताठर, कणखर स्त्री रंगवली असती, तर तिच्या पात्राला न्याय मिळाला असता असे वाटते.

सचिन खेडेकर चे व्यक्तिमत्व भारदस्त तरीही प्रसन्न आहे. त्याचा चित्रपटभर वावर मोकळा , हसरा आणि सुखद आहे. मृणालचे मात्र वय चेहऱ्यावर दिसून येत आहे. अर्थात २ मुलींची आई ह्या पात्राला साजेसे वय असल्याने तिने तरुण व कोवळे दिसावे अशी अपेक्षा नाहीच! तरीही मेकअप काही काही वेळा थोडा सौम्य असला असता तर चालले असते असे वाटून गेले. पल्लवी जोशीचे खूप कालावधीनंतरचे मराठी पडद्यावरचे दर्शन सुखद आहे. पण यु एस ला गेलेल्या व्यक्ती कायम ऍक्सेंट मध्येच बोललेल्या दाखवल्या गेल्या पाहिजेत, ह्या बाळबोध गैरसमजाला थारा दिला गेला आहे. त्यामुळे पल्लवीचे अमेरिकन ऍक्सेंट मधले बोलणे प्रसंगी दाखवले नसते तरी चालण्यासारखे होते. सुनिल बर्वे चे पात्र अतिशय पचपचीत, बुळे का दाखवले आहे, हा ही एक प्रश्नच आहे, एकुणच मृणाल नाडलेली, पिचलेली दिसणे व प्रेक्षकांची सहानुभूती तिलाच मिळणे ह्याची अपेक्षा धरून सुनिल बर्वे चे पात्र रेखाटण्यात आले आहे. त्याऐवजी त्याला मृणालबरोबरचे नाते तोडताना कठोर भासलेला पण स्वतःच्या मनाशी व प्रेमभावनेशी प्रामाणिक राहिलेला आणि म्हणूनच मृणालच्या आयुष्यातून निघून गेलेला असा दाखविला असता तर त्याचे पात्र अधिक परिणामकारक झाले असते. निघून गेल्यानंतर एका प्रसंगामुळे मृणालच्या आयुष्यात परत आल्यानंतर व तिचे आता दुसऱ्या पुरुषावर प्रेम आहे हे कळल्यानंतर आपल्या प्रेमाची साक्श देऊन मुळमुळीतपणा करणाऱ्या नवऱ्यापेक्षा माझ्याप्रमाणेच तिला आपले प्रेम व्यक्त करण्याचा व त्याचा अनुभव घेण्याचा अधिकार आहे अशी ठाम भुमिका घेणारा नवरा त्याला बनवला असतातर थोडे आऊट ऑफ द बॉक्स वाटले असते. सुहास जोशींची तीच कथा. शाळेत कडक शिस्तीच्या हेडमास्टर म्हणून ख्याती असलेल्या ह्या मृणालच्या सासूबाई आपल्या मुलाचे बाहेर अनैतिक संबंध आहेत हे कळल्यानंतर त्याला घराबाहेर हाककून व सुनेला पूर्णपणे सपोर्ट करून आपले पुरोगामित्व तर सिद्ध करतात. पण स्वार्थी मुलगा परत आल्यानंतर आणि 'आई' करून गळ्यात पडल्यानंतर सुनेने त्याच्याशी परत जमवून घ्यावे अशी इच्छा बाळगतात. तसेच सुनेचे दुसऱ्या एका पुरुषाबरोबर जुळत आहे हे कळल्यानंतर तिच्याशी तुटकपणे वागतात. आधीचा सपोर्ट कुठे गायब झाल मग? त्यांच्याही पात्राला ‘योग्य त्याच व्यक्तीला व घटनेला सपोर्ट’ ह्या जातकुळीचे दाखवले असते तर छान वाटले असते. थोडक्यात मृणालची धाकटी बहिण सोडून बाकी सर्व पात्रांना (ह्यात मृणालचे आई-वडीलही आले) तिने नवऱ्याला झाले गेले विसरून माफ केले पाहिजे व परत मन मारून त्याच्याच बरोबर संसार निभवला पाहिजे, असेच वाटत असते. ह्या एकुणच विचारांमध्ये आणि कल्पनेमध्ये इतका तोचतोचपणा आहे की तुम्ही ह्यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळे दाखवू शकला असता, एक नवा पाठ, धडा प्रेक्षकाना शिकायला समोर ठेवू शकला असतात, असे राहून राहून वाटते.

बालकलाकारांची काम बेतात बात. खरे म्हणजे ह्या पूर्ण भावनिक तिढ्यामध्ये बिच्चाऱ्या मुलांवर काही फोकसच नाही. थोडेफर फोडणीपुर्ते काही प्रसंग (उदा, मृणालच्या मुलींना बाबा घरी हवा असणे, तो घरी आल्यानंतर आपले घर संपूर्ण झाल्यासारखे वाटणे, सचिन च्या मुलांना आई बद्दल म्हणजे प्रज्ञा बद्दल काहीच ओढ नसणे, शाळेत आई-बाबा एकसाथ कधीच हजेरी लावत नाहीत अशी तक्रार असणे व त्यामुळे चिडचिड करणे) आहेत, पण ते तितकेसे परिणामकारक नाहीत. मृअणाल व सचिन च्या प्रेमनाट्यात ह्या बच्चे कंपनीची नेमकी भुमिका पूर्ण चित्रपटभर कुठेच नीट स्पष्ट होत नाही. काही प्रसंग तर काहीच्या काहीच व उगीचच आहेत. उदा सचिन खेडेकर ला त्याच्या मुलाच्या शाळेत प्रिंसिपल मॅडम बोलावून त्याच्या मुलाच्या लेखनामधल्या चुका सांगतात, ह्याची चित्रपटाच्या कथेच्या अनुषंगाने काहीच संगती लागत नाही. मृणालची सिनेमातली एंट्री होते त्यावेळी एका सुट बूटातल्या माणसाबरोबर एक प्रसंग आहे, तिच्यासाठी कसला तरी चेक रेडी आहे, असे काहीसे सांगतो. मोठ्या मुष्किलीने मिळवला वगैरे सांगोन तिला चहा वगैरे घेण्याचा आग्रह करतो, त्या ही प्रसंगाचा पुषे काहीच उलगडा नाही. आधी वाटले तिचा वकील असेल, नवर्याबरोबर घटस्फोट होऊन पोटगीसंदर्भातला काही चेक वगैरे असेल, तर मागाहून कळते की सुनिल बर्वे ४ वर्षे पासून फक्त दूर कुठेतरी राहत असतो. घटस्फोट झालेलाच नसतो. मृणाल सचिन बरोबरच्या आपल्या प्रेमसंबंधाबाबतीत आश्वस्त झाल्यानंतर वकीला कडे जाऊन सुनिल बर्वे सोबत घटस्फोट घेण्यासाठीच्या प्रोसीजर ची माहिती करून घेते, त्यावेळी ज्या ज्या काय्देशीर बाबींचा बागुलबुवा वकील तिला दाखवतो, त्या बाबतीत ती व सचिन तसेच घर्रातले काय निर्णय घेतात, काय ठरवतात, ह्या बाबींची चित्रपटाच्या शेवटी काहीच खुलासा नाही. शेवटच्या सीन वरून प्रेक्षकानी फक्त अंदाज करायचा की पडध्या मागे काय घडलंय, पण कोणकोणते सोपस्कार पूर्ण होऊन आणि कोणकोणते कढ रिचवून ते घडलंय ते दाखवून अधिक चांगला परेइणाम साधता आला असता. तर तिथे अक्षरशः शेवट गुंडाळूनच टाकलाय.

आपल्या मुलीला जावयाने नांदवावी म्हणून अनुश्रीचे वडील केदार ला त्याच्या धंद्यातली तूट भरून काढण्यासाठे तीस लाखांची आर्थ्क मदत गेल्यावर कोलमदून गेलेली अनुश्री मृणालने छान उभी केली आहे, पण नंतर सावरून भक्कम पणे उभी राहिलेली दाखवण्यापेक्षा "आता मला हे सहन होत नाही" वगैरे रडूपणा करत ती सासूच्या पायावर अगतिक होऊन कोसळते आणि त्यांनीच आता निर्णय घावा अशी याचना करते. आज्च्या युगातल्या स्वतःच्या पायावर उभे राहून घराचा पोर्र्ण आर्थिक डोलारा सांभाळणाऱ्या अनुश्री ह्या स्त्री पात्राला हे वागणे शोभत नाही. त्या मानाहे रोहित आणि प्रज्ञा मधले भावबंध कथेत खूप छान रीतीने विणले आहेत. आपल्या हट्टा साठी आपल्याला लग्नाच्या पाशामधून विनातक्रार मोकळं करणाऱ्या च्या हट्टासाठी आता आपण त्याग करायला हवे, तेच बरोबर आहे, हे पल्लवीने फार सहजपणे प्रकट केलं आहे. सुनिल; बर्वे च्या पात्राला मात्र उगीच स्वार्थी, आक्रस्ताळा, वार अ बघून दिशा बदलणारा अशी विचित्र डूब दिली आहे. मृणाल आणि सुनिल ह्या पात्रांना अजून सशक्त बनवता आले असते, तर चित्रपट वेगळ्याच उंचीला गेला असता.

अनुश्रीचे व रोहित चे प्रमप्रकरण कसे जुळते ह्यावर नाट्य उभारणीची मुख्य डोलारा आहे. शेवटी एकत्र येण्याच्या निर्णयाप्रत येताचे नाट्य उत्तरार्धात गुंडाळून टाकले आहे. त्यावर मुख्य कथाबीज फुलवले असते आणि वर लिहिल्याप्रमाणे पात्रे अधिक ठळक आणि ठसठशीत असती, तर बरे झाले असते.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users