चांगल्या गाडीवरचा रोजचा प्रवास - डबल सीट (Movie Review - Double Seat)

Submitted by रसप on 18 August, 2015 - 02:32

वीज, नोकरी, निवास, रोजगार, भाकरी
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण

- डॉ. कैलास गायकवाड

एक 'मध्यमवर्गीय घुसमट' ह्या दोन ओळींतून डॉ. गायकवाड खुबीने मांडतात. अख्खी हयात ह्या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी झिजत झिजत निघून जावी, ही एक शोकांतिकाच ! मुंबईसारख्या महानगरात टीचभर घरात राहणारी ७-८ जणांची कुटुंबं वर्षानुवर्षं ह्या प्राथमिक गरजांवर तीच ती वेळ मारून नेणारी उपाययोजना करत आहेत. समस्या बदलत नाहीत आणि उपाययोजनाही ! आणि हे एक प्रकारचे दुष्टचक्र थांबवण्यासाठी, परिस्थितीला भिडण्याची हिंमत, डोक्या-खांद्यावर असलेला जबाबदारीचा डोलारा करू देत नाही. ह्या विवंचनेत, घुसमटीत लोक जगत नसतात, फक्त जिवंत राहत असतात. दोन दोन पिढ्या तेच हाल काढून दिवस ढकलत असताना, विकासाच्या चक्राच्या गतीला जवळून पाहणारी नवी पिढी मात्र ही फरफट नाकारते आणि जबादारीच्या डोलाऱ्यासकट परिस्थितीशी झगडा करायची हिंमत करते. 'हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा' म्हणतात आणि एक दुष्टचक्र थांबतं. घाण्याला जुंपलेले बैल मुक्त होतात आणि एक मोठ्ठा मोकळा श्वास घेतात.
तर कधी ही हिंमत अंगाशीही येते आणि डोलारा कोसळून त्या ढिगाऱ्याखाली दबण्याचीही वेळ येते. रक्ताचं पाणी करून, पोटाला चिमटा काढून, अनन्वित कष्ट उपसून केलेली जमवाजमव हातातून निघून जाते आणि पटावर सोंगट्या पुन्हा एकदा पहिल्या घरांत येतात. परत एकदा -
त्याच त्याच अडचणी व तेच ते निराकरण
- सुरु होतं. दुष्टचक्र थांबत नाही. आता ते भरडायलाही लागतं.

Double-Seat.jpg

लखलखत्या मुंबापुरीच्या अस्मानी श्रीमंतीच्या पायाशी अश्या अनेक घुसमटी मूकपणे सगळा झगमगाट बघत असतात. त्यांपैकीच एक आहे लालबागमधल्या एका चालीत राहणारं 'नाईक' कुटुंब. थोरल्या मुलाचं - अमितचं (अंकुश चौधरी) - लग्न होऊन घरात 'मंजिरी' (मुक्ता बर्वे) येते आणि आयुष्याची ३१ वर्षं केवळ तडजोडी करत घालवलेल्या अमितला राहण्यासाठी एका मोठ्या घराची गरज प्रकर्षाने जाणवायला लागते. समजूतदार मंजिरी, घरी मसाले बनवून विकणारी आई (वंदना गुप्ते) आणि धाकटा हिप-हॉपर भाऊ अशी चौघांची टीम नव्या घराच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी झटायला लागते. अल्पसंतुष्ट वडिलांना हा 'उपद्व्याप' वाटत असतो, पण चौघांना ह्या एकाच ध्येयाने जणू झपाटलंच असतं.

एका मध्यमवर्गीय कुटुंबाची धडपड आपण ह्यापूर्वीही पाहिलेली आहे. अडचण, त्यातून बाहेर पडत असताना नवीन संकट अशी सगळी कहाणी आपल्याला तोंडपाठ असते. चित्रपटाचं नाव - 'डबल सीट' - सुद्धा आपल्याला पुढे होऊ घातलेल्या तथाकथित नाट्याची कल्पना देते. जो अंदाज आपण मनाशी बांधतो, त्यापेक्षा वेगळं काही होत नाही. एका पतपेढीत जेव्हा अमित सगळी मिळकत जमा करत असतो, तेव्हाच आपल्याला माहित असतं की ही 'पतपेढी' आहे म्हणजे ही बुडणार आहे, बुडतेच !

अक्षरश: काहीही अनपेक्षित न घडणारं कथानक केवळ आणि केवळ चारही प्रमुख कलाकारांच्या लाजवाब कामामुळे बघावंसं वाटतं. अंकुश चौधरीने डॅशिंग भूमिका अनेक केल्यात. 'दुनियादारी'तला त्याचा दिग्या लोकांनी खूप डोक्यावर घेतला. पण खऱ्या अर्थाने जर तो कुठल्या भूमिकेत शोभला असेल तर ती 'अमित नाईक' ह्या सोशिक, समजूतदार मध्यमवर्गीय सरळमार्गी तरुणाची ठरावी. एकाही फ्रेममध्ये तो मिसफिट वाटत नाही की 'अमित नाईक' व्यतिरिक्त इतर कुणी वाटत नाही, तो स्वत:सुद्धा नाही.
'मंजिरी'च्या भूमिकेत मुक्ता बर्वे अशी दिसली आणि वावरली आहे की कुणाही अविवाहिताने ताबडतोब सांगावं, 'मला अशीच बायको हवी!' तिचं सौंदर्य ईश्वरी नाही. पण साधेपणातल्या सौंदर्याची ती परिसीमा असावी. ती अगदी सेंट पर्सेंट 'गर्ल नेक्स्ट डोअर' वाटते. सहजाभिनय हा काही तिच्यासाठी नवीन नाही. (अवांतर - मिलिंद जोशींसोबतचा तिचा 'रंग नवा' हा कवितांचा आगळावेगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर तर मला तिच्याविषयी प्रचंड आदर वाटायला लागला आहे. 'मुक्ता बर्वे' हे एक अभ्यासू, तल्लख, चतुरस्र व्यक्तिमत्व आहे ह्याबद्दल अजिबातच शंका नाही.)

Double-Seat-Marathi-Movie-First-look-teaser-trailer.jpg

विद्याधर जोशी व वंदना गुप्ते ह्यांना प्रत्येकी एक दृश्य असं मिळालं आहे, ज्यात त्यांना आपली 'सिग्नेचर' सोडायची संधी होती. अशी संधी असे कसलेले अभिनेते सोडतील, हे अशक्यच ! तो बाप आणि ती आई मन जिंकतात.

मराठी नाट्यसृष्टीचा मराठी चित्रपटसृष्टीवर जो संस्कार आहे, त्यामुळे सामान्यातले सामान्य मराठी चित्रपटही उत्तमातल्या उत्तम हिंदी चित्रपटांपेक्षा सरस ठरतात. ताकदीचे नवे-जुने अभिनेते ही रंगमंचाचीच देणगी. त्यामुळे इथे कलाकारांकडून उत्तम काम काढून घेताना दिग्दर्शकाची नक्कीच दमछाक होत नसावी. अश्या वेळी दिग्दर्शक इतर गोष्टींवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकत असेल का ? म्हणजे, मला असं म्हाणायचं आहे की जरी संकलन, छायाचित्रण, लेखन, पटकथालेखन, संगीत वगैरे सगळं सांभाळणारे जरी ते ते लोक असतील, तरी त्यांच्याकडूनही हवं ते करवून घेण्याची अंतिम जबाबदारी दिग्दर्शकाचीच ना ? मग ते बाप-मुलाच्या भांडणावेळी धाडकन झूम इन, झूम आउट होणारं कॅमेरावर्क का ? आरडाओरड्याने संपृक्त गाणी का ? अशक्य पांचट डायलॉग्स का ? कहाणीची तीच ती साचेबद्ध वळणं का ? त्यांची हाताळणीही अगदी नेहमीसारखीच का ?

असे सगळे 'का?' घेऊन आपण बाहेर येतो. खूप आनंददायी नसलेला, पण अगदीच कंटाळवाणाही नसलेला एखादा प्रवास संपावा आणि सगळ्या लहानश्या बऱ्या-वाईट स्मृती तिथेच त्या टप्प्यावर आपण अगदी सहजपणे सोडून द्याव्यात, तसाच हा 'डबल सीट' प्रवास संपतो. मनाची पाटी कोरीच राहते. कारण हा चांगल्या बाईकवरचा हा रोजचा प्रवास असतो. तेच खड्डे, तीच वळणं आणि त्याच जागेपासून त्याच जागेपर्यंत.

रेटिंग - * * १/२

http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-double-seat.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. शेवटी सगळी फॅमिली एकत्र राहील असे वाटलं होतं. फक्त जागेचाच प्रश्न होता तर जुनं घर विकुन अजुन एखादी रूम नव्या घरात मिळाली असती. मग आई, भाऊ आणि वडीलांनी नुसतेच मदत म्हणून पैसे दिले हे मला झेपलं नाही.

मला सुद्धा हे खुप खटकल होत ,
मला अस वाटल की मंजिरीचे अमितव्यतिरिक्त इतर कुणाशी भावबंध जुळत नाहीत , तिला इतरांविषयी जिव्हाळा निर्माण होत नाही
माझ मत कदाचित चुकीचही असू शकेल
पण मला मंजिरी हे पात्र विशेष आवडल नाही

जुनं घर विकायचं नव्हतं हे एक, वडील घर सोडून लांब यायला तयार नव्हते हे नंबर दोन आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बजेटमधे त्यांना लांब व छोटंसंच घर मिळणार होतं. प्रायव्हसीसाठीच आटापिटा केल्यावर सगळ्यांचा घोळ कशाला पुन्हा?
मला तर ते एकत्र राहिले नाहीत हेच आवडलं नाहीतर पुन्हा एकदा भारतीय कौटुंबिक संस्कृतीचा उदोउदो करून 'एका जोडप्याच्या स्वप्नातल्या आनंदा" वरून फोकस हलला असता.

मला चित्रपट आवडला. मुख्यतः मुक्ता, विद्याधर जोशी आणि वंदना गुप्ते चं काम आवडलं.

प्रोमो पाहून साधारण 'मुंबईचा जावई' चा रिमेक असेल असा अंदाज बांधला होता, तो साफ चुकला. गोष्ट वेगळी आहे.

इंटर्वल नंतर चित्रपट थोडा फास्ट वाटला.

शेवटी एक गोष्ट खटकली आणि ती म्हणजे, या जोडप्याला त्यांच्या घरच्यांनी एव्हडी मदत केली, पण नविन घरी फक्त हे दोघेच गेले राहायला. सगळं कुटुंब चाळीतून नविन फ्लॅट मध्ये शिफ्ट झालेलं दाखवलं असतं तर मनाला अजून पटलं असतं. असो, हेमावैम.

अरुण, शेवटी फक्त मुक्ता अमित आणि त्यांचा मुलगा दाखवला ह्याचा अर्थ असा होत नाहीच की इतर लोक घरी नाहीत. घराला फक्त एकच रुम थोडी आहे. तुम्ही लोक काहीही अनुमान काढता!!!!

मला ह्या सिनेमाला डबल सीट हे नाव का दिले कळले नाही.

अतिशय सुंदर चित्रपट आहे. प्रचंड आवडला. सुरूवातीचे 'मुंबईचे गाणे' व चाळीतील घरातील नॉर्मल पण विनोदी संवाद यातून लगेच पकड घेतो चित्रपट. त्या घरातील संवादांमधे वंदना गुप्ते चे सहज येणारे संवाद सुंदर आहेत. नंतरही चाळीचे व एकूण मुंबईचे चित्रण छान वाटले.

विद्याधर जोशीला व्हिलन च्या पेक्षा वेगळा रोल दिला हे फार चांगले केले. तो मधे खूप टाईपकास्ट झाला होता. माझ्या मते कामांमधे मुक्ता बर्वे, वंदना गुप्ते, अंकुश चौधरी व विद्याधर जोशी या क्रमाने. मात्र संवाद, पटकथा व सीन्स चे चपखल चित्रण ही सर्वात जमेची बाजू आहे चित्रपटाचे. संवाद लेखकाची आवर्जून दखल घ्यायला हवी. मराठीत इतके चपखल संवाद फार क्वचित ऐकायला मिळतात. काही काही सीन्स मधे उगाच सगळे उलगडून न दाखवता दृश्यातून विनोद किंवा इतर परिणाम आपल्यापर्यंत पोहोचवले आहेत.

वडील-मुलाचा वाद हा एकच सीन मला जरा विसंगत वाटला.

बाकी वरच्या पोस्ट्स मधे चेकमेट बद्दल सहमत. जबरी होता तो.

Pages