मनस्वीची कथा

Submitted by सुमुक्ता on 17 August, 2015 - 05:50

कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. विधायक टिका नक्कीच आवडेल!! त्याचप्रमाणे कथेला समर्पक नाव सुचवावे ही विनंती.
========================================================================

मनस्वी आज खूप खुशीत होती. तब्बल पाच वर्षांनी तिला भारतात यायला मिळाले होते. शिक्षण, नोकरी ह्या सगळ्या रगाड्यामध्ये भारतभेट दरवर्षी हुलकावण्या देत होती. पण ह्यावेळेस मात्र अगदी महिनाभर सुट्टी काढून मनस्वी आणि सौमित्र दोघेही पुण्यात आले होते. मनस्वी आणि सौमित्रचे लग्न होऊन जवळजवळ दहा वर्षे झाली होती तेव्हापासून मनस्वी भारताबाहेरच होती. सुरुवातीला दरवर्षी भारतभेटीस येणारी मनस्वी गेल्या पाच वर्षात एकदाही येऊ शकली नव्हती. आज पाच वर्षांनी तिला तिच्या कॉलेजमधील ग्रुप भेटणार होता. दीपांकर, निरंजन, सचिन, अनुप, ऋता, देविका आणि मनस्वी गेल्या १७-१८ वर्षांपासूनचे खूप जवळचे मित्रमैत्रिणी. अभ्यास करणे , सिनेमे पहाणे, पिकनिक्सला जाणे, ओव्हरनाईट कॅम्पिंग करणे, सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्र केल्या होत्या. ऋता आणि मनस्वी परदेशी आपापल्या संसारात रमल्या होत्या. बाकीची गॅंग पुण्यातच स्थायिक झाली होती. आज ऋता नव्हती, पण बाकीचे सगळे लोकं आज भेटणार होते. आज खूप गप्पा मारायच्या होत्या, खूप आठवणी काढायच्या होत्या, भविष्याबद्दल चर्चा करायची होती, एकमेकांना परत खूप चिडवायचे होते…गेल्या १७-१८ वर्षांच्या मैत्रीला पुन्हा उजाळा द्यायचा होता. म्हणूनच सगळ्यांनी ठरवले की बायका, नवरे, मुले ह्यांना घरी ठेवून फक्त मित्र-मैत्रिणीच भेटू!!!
========

एरवी एक टी-शर्ट आणि जीन्स चढवून मनस्वी बाहेर पडली असती . पण आज अगदी पंजाबी ड्रेस, मंगळसूत्र, बांगड्या असा सगळा थाट करून बाहेर पडली. सासू-सासरे थोड्या जुन्या वळणाचे होते म्हणून, त्यांचे मन जपायला इथे महिनाभर ते सांगतील तसे मनस्वी वागायची. हुशार, स्मार्ट, कर्तुत्ववान आणि स्वतंत्र विचारांची असलेली मनस्वी तेवढीच हळवी, लाघवी, प्रेमळ आणि समजूतदार होती. वर्षानुवर्षे आपण दूरच असतो मग महिन्याभरासाठी कशाला वादविवाद करा असा विचार करून सासू-सासऱ्यांचे मन राखायचा ती आटोकाट प्रयत्न करायची. अगदी कितीही कितीही पटत नसले तरीही. दहा वर्षात चुकूनसुद्धा त्यांना उलट उत्तर केल्याचे तिलाच काय पण तिच्या सासू-सासऱ्यांनाही आठवत नव्हते. तिच्या ह्या स्वभावामुळे सौमित्र तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तिचे मन खूप जपायचा. सासू-सासरे सुद्धा स्वभावाने वाईट नव्हतेच पण जुन्या वळणाचे असल्याने तिच्या आणि त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीची तफावत होती. सौमित्र अनेक वर्षे भारताबाहेर राहिल्याने त्याला मनस्वीची मते तंतोतंत पटायची पण आई- वडिलांच्या संस्कारात वाढल्यामुळे त्यांच्या मनात काय असेल हेसुद्धा त्याला निश्चितपणे कळायचे. कधीकधी मनस्वी आणि आई-वडील ह्यांच्यामध्ये त्याची कात्री व्हायचीसुद्धा पण असे प्रसंग मनस्वी आपल्या समजूतदारपणाने अगदी व्यवस्थित निभावून न्यायची.
=========

आज खुशीमध्ये गाणे गुणगुणत ती आरशासमोर उभी राहून आवरत होती. तेवढ्यात सौमित्र खोलीत आला.

"मनु आज अश्विनी भेटणार आहे मला. तू येतेस? तुलाही आवडेल तिला भेटायला. "

"सौमित्र, अश्विनी आज भेटणार आहे तुला? आणि हे तू मला आत्ता सांगतो आहेस? अरे आज आमच्या कॉलेजच्या गॅंगचं गेट- टूगेदर आहे. मी बोलले होते तुला."

"अरे बापरे. अग मी पार विसरून गेलो. पण मी अश्विनीला आजची वेळ दिली आहे. पोस्टपोन करू का??"

"नको रे. माझ्यासाठी कुठे पोस्टपोन करतोस! तुझी खूप जुनी आणि जवळची मैत्रीण आहे. त्यातून तीसुद्धा तुला खूप वर्षांनी भेटते आहे. आता आयत्या वेळेस कशाला चेंज करतोस. तसेही माझी तिच्याशी काहीच ओळख नाही. मी तिथे काय बोलणार? त्यापेक्षा तू एकटाच जाउन ये"

"बघ हं मनु असे नवऱ्याला त्याच्या मैत्रिणीबरोबर एकटाच पाठवते आहेस. " मिश्किल हसत सौमित्र म्हणाला.

"तुझ्यावर नसला म्हणून काय झालं माझा स्वत:वर विश्वास आहे बरंका" मनस्वीनेसुद्धा तेवढ्याच खेळकरपणे उत्तर दिले. "जोक्स अपार्ट, पण आज खरच तू एकटाच जाऊन ये. पुढच्या आठवड्यात जमलं तर आपण दोघेही जावून तिला भेटून येऊ. आणि माझ्यातर्फे तिला सॉरी म्हणायला विसरू नकोस!!"

"बरं मग गाडी तुला ठेवून जातो. मी जवळच जाणार आहे. रिक्षाने जाईन. "

"ओक्के. चल मग आता निघते मी. कदाचित उशीर होईल. काळजी करत बसू नकोस."

"चल बाय. जपून गाडी चालव गं" सौमित्र एवढे म्हणेपर्यंत मनस्वी सासू-सासऱ्यांच्या खोलीत त्यांचा निरोप घ्यायला गेली.
========

घरातून बाहेर पडत गाडीत बसणार तोच फोन वाजला

'आता कोणाचा फोन???' म्हणत तिने फोन हातात घेतला तर देविकाचा फोन होता. 'पोहोचली की काय ही एवढ्या लवकर??? आता मला फायरिंग मिळणार असं दिसतय'

"हॅलो. बोल ग देविका. पोहोचलीस का एवढ्या लवकर. मी निघतेच आहे अजून."

"अगं थोडा प्रॉब्लेम झालायं. मला ऑफिसचा महत्वाचा कॉल आला आहे. बहुतेक दिवसभर त्यातच जाईल. "

"ओह!! काय गं देविका….कसलं ग तुझं ऑफिस. एवढ्या वर्षांनी आपण भेटतो आहे आणि नेमका आजच तुझा कॉल यायचा होता"

"बघ न गं!! रियली सॉरी. खरंच. तू एवढ्या वर्षांनी आलीस आणि मी साधी तुला भेटायला येऊ शकत नाही. खरंच खूप वाईट वाटतं आहे गं. पण पुढच्या आठवड्यामध्ये मी घरी येउन भेटते तुला नक्की. खरंच गं खूप खूप सॉरी."

"अगं हो हो. किती वेळा सॉरी म्हणशील? मी गम्मत केली. इट्स ओके. काम महत्वाचं आहे. ते तर करायलाच हवं. आपण पुढच्या आठवड्यात भेटू की. पण तेव्हा तरी नक्की ये. नाहीतर तुझा परत एखादा कॉल यायचा."

"अगं नाही. काय वाट्टेल ते झालं तरी पुढच्या आठवड्यात मी तुला घरी येउन भेटून जाईन. आज तुम्ही लोक एन्जॉय करा."

"ओक्के मग. टेक केयर. " म्हणता म्हणता मनस्वीने गाडी स्टार्ट केली.
=======

ठरलेल्या ठिकाणी सगळे जमले होते. दीपांकर, निरंजन, सचिन आणि अनुप.

"अरे देविकाचा फोन होता. ती येणार नाही. तिच्या ऑफसचा कसला तरी कॉल आहे आज दिवसभर. आपण आत जावून बसुयात". मनस्वीने जाहीर केले.

सर्वांना निवांत बसता यावे आणि भरपूर गप्पा मारता याव्यात म्हणून दीपांकरने एक शांत रेस्टॉरंट बुक करून ठेवले होते. पाचही जण आत जावून बसले.

"आज ऋताची आणि देविकाची कमी आहे" सचिनने आठवण काढली.

हळूहळू जुन्या आठवणी, सध्याचे आयुष्य, भविष्याचा विचार अशा गप्पा रंगत गेल्या. मग काय? राजकारण, क्रिकेट, परदेशातील जीवन, वेगवेगळ्या ठिकाणच्या ट्रिपचे वृत्तांत, कॉलेजचे शिक्षक, कोणताही विषय सुटला नाही गप्पांमधून. मधेच हास्यविनोद आणि एकमेकांना चिडवणे चालूच होते. संध्याकाळ व्हायला आली तरी गप्पा संपेनात मग पुढच्या आठवड्यात परत एकदा भेटायचे ठरवून, एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या घरी निघाले.
====

मनस्वी घरी आली ती एकदम खुशीतच. नवरा आणि सासू-सासरे बाहेरच्या बागेत चहा पीत तिचीच वाट पहात होते.

"कसं झालं गेट-टूगेदर? भेटले का सगळे?" सासुबाईंनी विचारलं.

"हो जेवढे पुण्यात आहेत तेवढे सगळे भेटले. एक मैत्रीण फक्त आली नव्हती. ती पुढच्या आठवड्यात घरी येऊन भेटेल." सौमित्रकडे पाहून मनस्वीने विचारलं "तुला भेटली अश्विनी?"

"हो भेटली ना!! म्हणत होती पुढच्या वेळेस बायकोला घेऊन ये नक्की. "

"जाऊ आपण पुढच्या आठवड्यात तिला भेटायला. "

"मनस्वी आजच्या गेट-टूगेदरचे फोटो काढले की नाही?? सासऱ्यांनी विचारले

"हो" असे म्हणत मोबाइलमधले फोटो तिने सगळ्यांना दाखवायला सुरुवात केली. उत्साहाच्या भरात सासू-सासऱ्यांचा पडलेला चेहेरा तिच्या लक्षातच आला नाही.

"हे काय गं? बाकीच्या मैत्रिणी कुठे आहेत?" सासऱ्यांनी विचारले.

"अहो ऋता अमेरिकेत असते. देविकाला आज येता आले नाही." उत्साहामध्ये मनस्वी बोलून गेली.

बराच वेळ कोणी काही बोललेच नाही. बागेत एक विचित्र शांतता पसरली. बऱ्याच वेळानी मनस्वीला त्या शांततेचा अर्थ लागला. वाद टाळण्यासाठी हळूच उठून ती घरात जाउ लागली. तेवढ्यात सासूबाई मागून म्हणाल्या "असं चार मुलं आणि एक मुलगी!!!! बरं दिसत नाही!!"

"आई काहीतरीच तुझं. इतकी जुनी मैत्री आहे त्यांची. बरं काय दिसत नाही? आणि मनस्वी लहान आहे का आता? तिची जबाबदारी तिला समजत नाही का?" सौमित्रने मनस्वीची बाजू घेतली.

उसळून मनस्वी बरंच काही बोलणार होती पण तिने एकच प्रश्न केला.

"तुमचा मुलगा एकटाच एका मुलीला भेटायला गेला तेव्हा त्याला तुम्ही हे बोललात का?"

दहा वर्षात पहिल्यांदा उलटून केलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला अगदी अनपेक्षित असेच मिळाले.

"अगं एक मुलगा आणि एक मुलगी बघितले की लोकांना वाटतं असतील गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड!!!!" ह्यापुढचे वाक्य तिच्या सासूबाई बोलल्या नाहीत.

पण मनस्वीच्या मनात प्रश्न आल्यावाचून राहिले नाही "पुरुष आणि स्त्री ह्यांची निखळ मैत्री असूच शकत नाही का?? मुलाची मैत्रीण इतक्या सहजतेने स्वीकारणारी स्त्री, सुनेचे मित्र का स्वीकारू शकत नाही??? तुमच्या मते एका मुलाला आणि मुलीला जेव्हा लोक एकत्र बघतात तेव्हा त्यांना ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड वाटतात; मग चार मुले आणि एक मुलगी असा ग्रूप असलेले आम्ही कोण वाटतो आहोत तुम्हाला?"

मनस्वीला ह्या विचाराची एकदम शिसारी आली पण मनातला संताप, तिरस्कार आणि घृणा एका आवंढ्याबरोबर गिळून, भांडण नको ह्या एकमेव कारणासाठी आणि सौमित्रचं समर्थन मिळालं म्हणून ती पुन्हा एकदा शांतच राहिली.

समाप्त

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमशः वाटत असेल तर माफ करा. एक छोटा प्रसंग कथा रूपाने टाकण्याचा हा प्रयत्न आहे. त्रुटी राहिलेल्या असतीलच. त्या अवश्य सांगाव्यात!!

उफ्फ. क्रमशः नाहीये का मग?

मी ही लिहायला आले होते की शेवटी 'क्रमश:' लिहा म्हणून.

पुलेशु

कथा संपल्यासारखे वाटत नाहीय. पुढे फुलवा की अजून. स्कोप आहे. Happy

सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!! मला काय म्हणायचे आहे ते नीट मांडता आलेले नाही कदाचित. एक दोन दिवसामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करून पुन्हा पोस्ट करेन.

तुम्हाला काय म्हणायचंय ते पोचलं Happy

शेवटची एक दोन वाक्यं थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहिलीत तर लिखाण क्रमशः आहे असं वाटणार नाही. खरंतर शेवटच्या वाक्यानंतर स्पेस देऊन 'समाप्त' लिहिलंत तरीही कदाचित अपूर्ण वाटणार नाही. तशी जागा न सोडल्यामुळे अजून टाईप करायचं राह्यलंय असं वाटतंय बहुतेक सगळ्यांना.
मला हे कथेपेक्षा ललित / स्फुट जास्त वाटलं ( 'मनस्वीची कथा' अशा नावाचंही ललित असू शकतं. ). आशयाची हाताळणी कथेपेक्षा स्फुट लिखाणाच्या जास्त जवळ जाणारी वाटली.
सॉरी, खूप सूचना केल्या. वर सगळ्या प्रतिक्रिया एकाच प्रकारच्या आल्या आहेत पण मला लिखाण अपूर्ण आहे असे वाटले नाही म्हणून लिहिले.

अगोल आ अनुमोदन >> काय लिहायचंय ते नीट पोहोचतंय फक्त शेवटच्या वाक्यांत थोडा बदल केल्यास अपूर्ण वाटणार नाही! मलाही स्फुट वाटलं कथेपेक्षा

लेखनशैली आवडली

पुन्हा एकदा सर्व प्रतिसादांसाठी धन्यवाद. अगो, शेवट किंचित बदलून टाकला आहे. पुढच्या वेळी कथा लिहिताना सर्वांचे मार्गदर्शन कामी येईल Happy

१. कथा आवडली

२. माझी ही पहिलीच वेळ आहे, सांभाळून घ्या, मार्गदर्शन करा ईत्यादी सुरुवातीला लिहिले नसते तर बरे झाले असते, कारण मग कथा तशीच वाचली जाते आणि प्रतिसादही त्याच धर्तीवर द्यायचा मोह होतो.

३. कथा म्हणून विचार केल्यास शेवटी जे विचार सासूसासर्‍यांचे होते ते तसे असणे यात कसलेही नाट्य नव्हते, ते त्यांच्या पिढीत असणे स्वाभाविक असू शकते. त्यानंतर पुढे आणखी काहीतरी हवे होते, घटना, प्रसंग, नवराबायकोतील संवाद किंवा नायिकेच्या मनातील विचारांचे द्वंद वगैरे वगैरे. बर्र त्यात नवर्‍यानेही साथ दिली. म्हणून कदाचित लोकांना येह दिल मांगे मोअर झाले असावे.

४. पुढच्या कथेच्या प्रतीक्षेत Happy

आवडली आणि मला तरी क्रमशः नाही वाटली…'नेहेमीप्रमाणे' आताही ती शांत झाली हे स्पष्ट कळतंय. पुढे तिच्या मनाचं द्वंद्व हे ज्याने त्याने आपल्या आकलन नुसार समजून घ्यायचं असतं… ज्या कथेतून किंवा लिखाणातून पूर्ण समाधान मिळत नाही आणि ती कथा तुम्हाला स्वतःत अडकून ठेवत असेल. विचार करायला भाग पडत असेल तर ते उत्तम लेखन मानलं जातं. मोठमोठे लेखक हि ट्रिक वापरतात. इथे ते नकळत झालंय। म्हणजे पुढे जाम स्कोप आहे असं समजायला हरकत नाही Happy

आवडली.
बरीच विचारात पाडणारी, दोन्ही बाजू पटतात.पण अंदाजे बयान सा बां चा पटला नाही. (या नाराज्या थोड्या सटली प्ले करणं दोन्ही पक्षांना जमलं पाहिजे काही वर्षांच्या ओळखीनंतर.)

मुद्दा, विषय छान.
प्रसंग म्हणून अपुरा नाहीये. पण कथा म्हणून मला अपुरी वाटली.
म्हणजे कथा संपली हे कळलं नाही किंवा क्रमश: आहे असं वाटलं नाही पण कथेने अजून काहीतरी द्यायला हवेय असं वाटलं.
क्षमस्व.

सर्व प्रतिक्रियांसाठी पुन्हा धन्यवाद!!! ह्या सगळ्या प्रतिसादांनंतर लिहायचा हुरूप वाढला. नीधप क्षमस्वची खरंच गरज नाही. वाचकांच्या विधायक प्रतिक्रिया ऐकायला मला नक्कीच आवडतात!! तुमच्या सर्वांच्या टिप्स पुढील वेळी लिहिताना नक्की लक्षात ठेवीन.