सुरुवात

Submitted by स्फिंक्स on 15 August, 2015 - 18:01

श्री ही कथा अर्धवट राहिलीय. पण हे कथाबीज स्वस्थ बसू देत नाहीय. म्हणून ही आधी लिहलीय.
======================================================================
सुरुवात

“झाला का स्वयंपाक? सदानकदा आळस. एक काम करेल तर शप्पथ. सहा वाजले. आत्ता आठ वाजतील आणि बाईसाहेब purse अडकवून कामाला निघून जातील. घरी म्हातारे सासू-सासरे घरी बसून त्यांच्या येण्याची वाट बघतील” रेवतीबाईंचा सकाळचा तोंडाचा पट्टा सुरु झाला आणि कीर्तीचे हात.
“सकाळी सकाळी चहा घेत नाही. काही नाही. ५ वाजतापासून बसते त्या देवासमोर. आम्हीं सहाला उठतो तेव्हाच उठते देवसमोरून. आम्हीं उठण्याअगोदर चहा करून ठेवायचा, तर ते नाही. सदानकदा आळस. ” कीर्तीने शांतपणाने cooker लावून कणिक मळायला घेतली.
“ही चहा पीत नाही म्हणूनतरी सकाळचा चहा गरम मिळतो. नाहीतर दुपारचे जेवण थंड असते. सकाळी करून ठेवलेले जेवण थंडच होणार ना. दुपारचा चहा मला करावा लागतो. त्याबरोबर खायला पण करावा लागता. थकून जाते. होत नाही आजकाल. आणि रात्रीच्या जेवणासाठी ही येईपर्यंत वाट बघावी लागते. रात्रीसुद्धा आठ वाजता आली कि लगेच सुरुवात करत नाही जेवणाला. आधी हात पाय धुवून. दिवा लावते आणि बसते १५ मिनिट्स त्या देवासमोर. इथे पोटात कावळे ओरडत असतात. पण नेम सुटत नाही.” कीर्ती शांतपणाने भाजी चिरत होती.

“काय करतेस ग त्या देवासमोर? एक मुलगा नाही देवू शकला.मुलगीच झाली न शेवटी. आणि तिचेपण किती कौतुक? सदानकदा कपडे, खेळणे आणि त्या महागडया पाळणाघरात नेवून सोडते रोज” इतका वेळ शांत असलेल्या कीर्तीच्या चेहेर्यावर किंचित राग आणि दुःख आले. पण ते बाजूला सारून तिने भाजी फोडणीला घातली. “मी इतके उपास तापास केले पण नाही झाला मुलगा. मग का सांभाळायचा या कार्टीला? जा. त्या पाळणाघरातच सोड तीला. ”
मनातले दुःख न दाखवता कीर्तीने काव्याला तयार केले. आणि स्वयंपाक टेबलावर झाकून ती आणि काव्या घरातून बाहेर पडल्या.

दुपारचे जेवण झाल्यावर रेवतीबाई आणि रघुनाथराव गप्पा मारत बसले होते.
“काय हो आपल्या लग्नाच्या वेळेस तुम्ही १८ वर्ष्याच्या. १८वा संपतासंपता राहुल झाला. आता तुम्ही फक्त पंचेचाळीस वर्ष्याचा आहात. आणि म्हातारपण कसले म्हणताय? ” रघुनाथराव मिश्कील स्वरात म्हणाले
“का? १८ वर्षाचे होते तरी सगळी काम केली घराची.”
“कसला काय? पहिले दोन महिने नवलाईत गेले. आणि पुढचे बाळंतपण करण्यात. लग्नाला २ वर्षें होईपर्यंत माझी आई सगळे करता होती.अगदी तुमच्या हातात ताट आणुन देण्यापर्यंत. मग कुठे स्वयंपाकघरात तुमची entry झाली. आणि पुढची २० वर्षे स्वयंपाक शिकण्यातच गेली. ” रघुनाथराव डोळे मिचकावत म्हणाले.
“हं... पुरे झाले मागचे उगाळणे. तुम्हांला माझे कौतुकच नाही. सदानकदा घालून पाडून बोलणे.” रेवतीबाई मुसमुसत म्हणाल्या.
“नाही हो. असे नाही. पण आपली सून ऑफिस, घर, मुल कित्ती छान सांभाळते. काल महेशराव म्हणत होते. कित्ती कर्तबगार आहे तुमची सून म्हणून. त्यांची सून तर घर आणि मुल त्यांच्यावर आणि त्यांच्या बायकोवर सोडून जाते, घराच्या कमाल हातही लावत नाही आणि नेहेमी भांडत असते. आपली कीर्ती तशी नाही.” रघुनाथराव म्हणाले
“हं... पुरे झाले कौतुक. इतके कौतुक करूनच शेफारलीय ती.आम्हीं काय मुले सांभाळली नाही.ही ऑफिसमध्ये काय करते? कॉम्पुटरसमोरच बसते ना? ते कुणीही करू शकते. त्याचा इतका पगार मिळतो म्हणूनच शेफारलीय. तिला खाली आणायचे काम मी करते.” रेवतीबाई फणकारल्या
“अहो, या सुनांना असा मुठीत ठेवला नाही न कि उधळतात. कुणाच एकत नाही. तुमच्या महेशरावच्या बायकोचे तेच चुकले. मारे माया करायला चालल्या होती. बघा काय झाला. मी कीर्तीला धाकात ठेवला न म्हणून हे करते. आणि आपल्या लेकाच्या मनात पण विष कळवत राहते रोज. म्हणजे त्यांचा संसार मोडका राहील. तिच्या जवळ नाही गेला तर आपल्याच जवळ राहील. एकुलता एक लेक आहे. त्याला असे दूर नाही जावू देणार. ” रेवतीबाई त्यांना न शोभणाऱ्या हळु आवाजात म्हणाल्या.
“मुलगी झाल्यावर जरा पुळका आला होता बायकोचा. पण पहा कसा दूर केला त्याला. बायकोपासून आणि मुलीपासून. मुलीला जवळही घेत नाही तो.” रेवतीबाइंच्या चेहेऱ्यावर कुत्सिक हसू आले.
” माझ्या हुशारीने झाला सगळं. आणि तुम्हाला त्याचे काही कौतुक नाही” रेवतीबाई परत मुसमुसत म्हणाल्या. “जाऊ दे. चहाची वेळ झाली. फक्कडसा चहा करा बघू. आणि काल ते महागाचे biscuit लापुवून ठेवले होते फडताळावर कीर्ती आणि काव्या पासून. ते पण घेवून या.”

कीर्ती आणि काव्या घरी आले. तिने स्वयंपाकाला सुरुवात केली आणि रेवतीबाईंनी तोंडाच्या पट्टयाला सुरु सुरुवात केली .रात्रीचे जेवण झाले.
“आज कीर्तीच्या खोलीत, राहुलच्या ओरडण्याचा आवाज येत नाहीये. नवरा-बायकोचा गुळपीठ होऊ नये. त्याला गप्पा मारण्याच्या कारणाने बोलवून घ्या आपल्या खोलीत. रात्रीपर्यंत गप्पा मारून इथेच झोपेल तो. तो झोपला कि तुम्ही hall मध्ये झोपायला जा.” रेवतीबाई रघुनाथरावांना म्हणाल्या.

रघुनाथरावांनी राहुलला खोलीत बोलावले.
“राहुल बाळा, कसा गेले तुझा दिवस? थकला असेल ना बाळ माझा. ये. माझ्या मांडीवर झोप. तुम्ही जा हो तिकडे.” रेवतीबाई चेहेर्यावर ममत्व दाखवत म्हणाल्या.
राहुल रेवतीबाइंच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. रेवातीबाई त्याच्या केसांत हात फिरवत म्हणाल्या “कित्ती काम करतो माझा बाळ. थकला असेल. आम्हीं पण थकतो आता घरातले सगळे संभाळून. घराचे सगळे काम आमच्यावरच पडते. आताशा होत नाही बाबा. तुझ्या बायकोचाही काही उपयोग नाही. ती सदानकदा देवासमोर नाहीतर ऑफिसमध्ये. त्यातून वेळ मिळाला तर काव्याच्या मागे. तिला आमच्याकडे येवुही देत नाही. नातीलाही आमचे प्रेम नाही बाबा. काय करणार आम्ही म्हातारा-म्हातारी? ”
“खुप कंटाळा आला रे बाबा. मी काय म्हणते? आपणा जावू यात कुठेतरी फिरायला. परवा तुझा नितीनमामा सिंगापोरला गेला. आपणही जाऊ यात. युरोप-बिरोपला. आता तुझ्या बायकोला सुट्टी मिळणार नाही. तर आपण तिघेच जावून येऊ. कशी वाटली आयडिया?”
राहुल विचार करून सांगतो म्हणाला आणि रेवतीबाइंच्या खोलीत झोपला. रघुनाथरावांची हकालपट्टी hall मध्ये झाली.

पुढचा दिवशी असाच गेला. पण रात्री राहुलने सांगितले कि त्याला युरोपची trip परवडणार नाही आणि रेवतीबाइंची धुसफूस सुरु झाली.“घराचे हफ्ते फेडायचे आहेत. त्या बाइसहेबन्चा पूर्ण पगार तिथेच जातो म्हणे. घराचा सगळं खर्च माझे बाळ करते. आणि ती भवानी हफ्ते फेडते. आत्ता पैसे नाहीत युरोपची ट्रिप करायचे म्हणे. अस्सा अंगाचा तिळपापड झाला. आम्ही इतकी धडपड-दगदग रोज करून हाती काहीच नाही. साधे युरोपलाही जाता येत नाही. काय करते ही एव्हड्या पगाराचे? नक्की आई-बाबांना देत असेल नाही तर घालत असेल त्या गुरूच्या मठात. आता नितीन आणि वाहिनी १५ दिवसाने येवून आपल्याला चिडवणार. आपले photos दाखवून खिजवणार. आणि आपण नुसते बघत राहणार. ते काही नाही, आपण जायचे म्हणजे जायचे. युरोप नाही तर देशातच जाऊ आणि ५-स्टार हॉटेल मध्ये थांबु.“
निर्णय झाल्यावर त्यांचा राग काही अंशाने कमी झाला. त्या रघुनाथारावांकडे बघत म्हणाल्या, ”बघा. मी कित्ती त्याग करते. मीच म्हणून टुकीने संसार चालू आहे. नाही तर ती कीर्ती सगळे उधळून मोकळी झाली असती. आता जा आणि राहुलला खोलीत बोलावा त्यालाच सांगू यात आपल्या बदललेल्या निर्णयाबद्दल. ”

पुन्हा एकदा रघुनाथरावांनी राहुलला खोलीत बोलावले.
रेवतीबाई प्रेमळ आवाजात म्हणाल्या “राहुल, ये बाळा. माझ्या मांडीवर झोप. थकला असशील ना. मला माहित आहे. बंकेत खुप कामे असतात. त्या किर्तीसारखे कॉम्पुटरसमोरच बसायचे नसते. मी काय म्हणते? तुझा ते युरोपच्या ट्रिपचा राहू दे. आपण इथेच देशातच कुठेतरी फिरायला जाऊ यात. ५-स्टार हॉटेलमध्ये राहू यात. मज्जा येईल. “
“आई, एक उपाय आहे. आमच्या बँकेची वरणगावला एक शाखा आहे. तिथे कसला तरी काम आहे. 1 महिना खुप काम आहे. पण पैसे दुप्पट मिळतील. जाऊ यात का? आपल्या युरोप ट्रिपचे पैसे निघतील. रहायची सोय बँकच बघेल.” राहुल म्हणाला
रेवतीबाइंचे डोळे चकाकले, “युरोपला जायला मिळणार. मग चालेल की. कसेबसे करू कुठल्यातरी भंगार गावात. कीर्ती आणि काव्यालाही घेवून जाऊ. काव्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरूर आहेत. उद्या बोलू तिच्याशी. झोप तु.”
राहुल झोपल्यावर hallमध्ये जाण्यापूर्वी रघुनाथरावांनी विचारले, ”अरे वा. आज कीर्ती आणि काव्याचे प्रेम आले वाटते. त्यांना वरणगावला येऊ देताय.”
रेवतीबाई हळू आवाजात बोलल्या “तसं नाही हो. कुठला ते मागास गाव. तिथे मोलकरीण नाही मिळाली तर काय करायचे? ही फुकटची मोलकरीण घेवून जाऊ. आणि अजून एक फायदा आहे. हिला आत्ताच 1 महिन्याची सुट्टी मिळाल्यावर पुन्हा युरोप ट्रीपसाठी सुट्टी नाही मिळणार. आणि काव्याचीही शाळा सुरु होणार. मग युरोपला आपण तिघेच जाऊ.”
“बघा. मी किती हुशार आहे ते. सगळे जमवून आणले. मी म्हणून तुम्हाला आणि राहुलला युरोप बघायला मिळणार.” रेवतीबाई तोऱ्यात म्हणाल्या.
“जा आता बाहेर. इथे जागा नाही.” रेवतीबाई फणकारल्या. रघुनाथराव hallमध्ये झोपायला गेले.

पुढचे काही दिवस तयारीतच गेले आणि रेवतीबाई व कुटुंब वरणगावला आले.
रेवतीबाई मनातल्या मनात म्हणाल्या “कित्ती सुंदर जागा आहे. अगदी माझ्या माहेरची आठवण आली. तिथे पण असेच सुंदर वातावरण होते. पण खेळायच्या-बागडायच्या वयातच लग्न झाले आणि एका वर्षाच्या आत बाळंतपण. त्यामुळे कसली हौस नाही कि मौज नाही. ह्यांचाही स्वभाव अस्सा बावळट आहे ना. जाऊ दे. मुलाला हाताशी धरून सगळ्या इच्छा पूर्ण करून घेवू. ”
त्यांची गाडी एका भव्य वाड्यासमोर थांबली. रघुनाथारावांकडे हातातली purse देत रेवतीबाई गाडीतून उतरल्या.
“सुरेख वाडा आहे.” रघुनाथाराव वाड्याकडे बघत म्हणाले “वाडा कसला राजवाडाच आहे.सारे कसे शांत शांत आहे. अगदी पाखरांचाही आवाज नाही आणि भर उन्हाळ्यात थंडी कसली वाजतेय नाही?”
“अहो, आपल्याला शहराची सवय. तिथे सारखा मेला घाम आणि चिकचिक. इथल्या वनराईने आणि शुद्ध हवेने उकाडा कमी केलाय एव्हढंच. फार काही गारवा नाही. ही कीर्ती का अडखळतेय सारखी? बावरून बघतेय वाड्याकडे. माहेरी कधी वाडा बघितला नसणार.” राहुल जवळ नाही हे बघून रेवतीबाई फणकारल्या.

वाड्यात प्रवेश केल्याकेल्या त्याचे भव्यपण आणि श्रीमंती बघुन रेवतीबाई सुखावल्या.
“कुठली खोली घ्यावी बरे? सर्वात मोठी आणि सर्वात सुंदर शोधू यात. त्या कीर्तीच्या खोलीपासून सगळ्यात दूर.” सगळीकडे नजर फिरवत असताना एक काळी मांजर आडवी गेली आणि रेवतीबाई दचकल्या. “चिटपाखरू नाही म्हणे. ही मांजर आहे कि टवळी.”
रेवतीबाईनी माडीवरची एक मोठ्ठी खोली बघुन बस्तान बसवायला सुरवात केली. रघुनाथारावांकडे रागारागाने बघत म्हणाल्या, “काय बाई नाटकं एक एक या कीर्तीची! वाडा अशुभ वाटतो म्हणे. का? तर इथे देवघर नाही. देवभक्तच मोठी! येतायेता आपले देव आणि पोथ्या काही विसरली नाही. मग मीच म्हणाले, बसव त्यांचे बस्तान तुझ्याच खोलीत आणि कर देव-देव दिवस रात्र.”
“आमची खोली साफ करून दे म्हंटले तर म्हणते कशी, या मजल्यावर येणार नाही. हा मजला अशुभ वाटतो.आळशी कुठची! एक काम करेल तर शपथ. अहो, सगळं नीट साफ करा. प्रवासाने अंग शिणलाय. मी जरा अंग टाकते. साफसफाई झाली कि राहुलला दाखवेन कि तुझ्या म्हातार्या आईकडून किती काम करवून घेतला तुझ्या बायकोने. ” रेवतीबाईनी पलंगावर झोपूनच ऐकवले.”कीर्तीचा स्वयंपाक झाला कि उठवा.”

किती वेळ झोपल्या कोण जाणे. कशानेतरी जाग आली आणि त्या दचकून जाग्या झाल्या. संध्याकाळ झाली होती खोलीतला गारवा खूपच वाढला होता. सारखं कुणीतरी आपल्यावर जळजळीत नजर रोखून आहे असे वाटत होते. रेवतीबाई घाबरल्या आणि मग आपल्याच घाबरटपणावर चिडल्या.
रेवतीबाई चिडून सगळ्यांना शोधात खाली आल्या. कीर्ती स्वयंपाक करत होती आणि राहुल दिसत नव्हता. ही सुवर्णसंधी दवडू न देता रेवतीबाईनी आपला तोंडाचा पट्टा सुरु करायला तोंड उघडले. पण का कुणास ठावूक ते काळे मांजर समोर आले आणि रेवतीबाईच्या अंगाला घाम सुटला. त्या लगेच बाहेर आल्या.

रात्रीचे जेवण झाले आणि रेवतीबाई आपल्या खोलीत आल्या. आज खरच बरे वाटत नव्हते. आज राहुलला आपल्याच खोलीत झोपायला बोलवावे, असा विचार त्या करत होत्या. तेव्हढ्यात कुणीतरी खोलीबाहेर धावत गेले. रेवतीबाई वैतागल्या, “काव्याच असणार. सारखी धावत पळत असते. किती वेळा सांगितला पोरीच्या जातीने असा पळू नये. नातू असता तर खुप पळू दिले असते. पण नशिबात ही कार्टी होती न.”
कुणाच्यातरी रडण्याचा आवाज आला. “झाली का रडारड सुरु या काव्याची? “ आत शिरत असणाऱ्या रघुनाथारावाना त्या म्हणाल्या.
“रडारड? काव्या तर कधीच झोपली. प्रवासाने थकली होती.” रघुनाथाराव पलंगावर बसत म्हणाले.
“मग आत्ता धावत कोण गेले? आणि तो रडण्याचा आवाज?” रेवतीबाई जवळजवळ ओरडल्याच.

क्रमशः

-स्फिंक्स
======================================================================
पुढचा भाग: http://www.maayboli.com/node/55298

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या सगळ्यांच्या positive comments बद्दल खुप खुप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या कौतुकामुळेच हे सगळं लिखाण करू शकत आहे.
मनु७७१,मला श्री पूर्ण करायची आहेच. पण आधी सांगितल्याप्रमाणे ही कथा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे मी श्री लिहायला घेतले तरी हीच कथा सुचायची. (म्हणूनच कदाचित पहिलाच भाग इतका मोठा झाला  ) ) पण मी श्री आणि सुरुवात parallely लिहायचा प्रयत्न करेन.

kay he tumchi Shri hi katha ajun apurn aahe ani navin katha ti pan kramsh ??????????????????

स्फिंक्स..... parallely लिहायचा विचार असेल तर फार उत्तम.............. पु. ले. शु.