सेल फुलका / सेयल फुलका (सिंधी पाकृ)

Submitted by निंबुडा on 14 August, 2015 - 01:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) शिळ्या किंवा ताज्या पोळीचे तुकडे
२) कांदा (उभा चिरून)
३) टोमॅटो (उभा चिरून)
४) धनिया पावडर
५)पाव भाजी मसाला
६) फोडणीसाठी तेल्, जिरे, कडीपत्ता, लाल तिखट, हळद
६) मीठ आणि मिंबूरस चवीनुसार

क्रमवार पाककृती: 

माझ्या सिंधी शेजारणीकडून बर्याच सिंधी पाकृ शिकलेय. जमेल तसे एक एक देत जाइन. Happy

शिळ्या पोळीची प्रत्येक वेळी फो. ची पोळी केली की कंटाळा येतो. माझी शेजारीण सेल फुलका हा प्रकार ताज्या पोळीचा करते. त्यांच्या कडे रात्रीच्या जेवणासाठी हा प्रकार केला जातो. मी शिळ्या व ताज्या दोन्ही पोळ्यांचा करते.

आमटीच्या पातेल्यात / कढईत फोडणीसाठी दिलेले जिन्नस वापरून फोडणी करून घ्यायची.
त्यात धनिया पावडर आणि पावभाजी मसाला टाकून परतायचा.
आता ह्यात कांदा आणि टोमॅटो च्या उभ्या फोडी टाकून परतायचे.
मग पोळीचे तुकडे घालून थोडा वेळ परतायचे.
आता ह्यात भरपूर पाणी घालायचे. मीठ व लिंबूरस घालून उकळी काढायची.
पोळीचे तुकडे तरंगले पाहिजेत इतपत पाणि हवे.
उकळी येऊन पोळी शिजली की चव बघून मीठ, तिखट, पाभा मसाला इ. अजून हवे असल्यास टाकायचे.

पहिल्या वाफेवरचा हा सेल फुलका बोल मध्ये काढून गरम गरम गट्टम करून टाकायचा. Happy

वाढणी/प्रमाण: 
एक व्यक्ती साठी २ पोळ्या, १ लहान कांदा व १ लहान टोमॅटो. बाकी जिन्नस अंदाजानुसार
अधिक टिपा: 

फोटो आता नाहीये. पाकृ परत जेव्हा करीन तेव्हा फोटो देईन.
काहींना हा प्रकार आपल्याकडे डाळफळं करतो तसा वाटेल. पण डाळफळं करताना आपण कच्ची पोळी घालतो. इथे पोळी करून झाल्यानंतर तुकडे करून दिलेल्या मसाल्यामध्ये उकळायचे आहेत.
पोळीचे सूप म्हणता येईल असा प्रकार आहे. हा प्रकार चवीला खूप छान लागतो.
सकाळच्या पोळ्या उरल्या असतील तर संध्याकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट होणारा प्रकार आहे.
एखाद दोन वेळी मी तोंडली/ फरस्बी इत्यादी भाज्यांचे तुकडे ही घातले सोबतीला.

माहितीचा स्रोत: 
माझी सिंधी शेजारीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ब्रेड आणि चपाती दोन्हीच खाल्ल आहे.

आणि ते इतकं पातळ नाही बनवत. मसालेदार चपाती किंवा ब्रेड सुकं असतं .

अर्थात मला ब्रेड ठिक वाटला, चपाती नो नो. तसेही वरणफळं ज्याला आवडतात त्यालाच हे आवडेल. Happy

मला वरणफळं नाही आवडत म्हणून नसेल भावलं.

वरणफळं ज्याला आवडतात त्यालाच हे आवडेल>>

मला वरणफळं खूप आवडतात. त्यामुळे मला हा ही प्रकार आवडतो. Happy

मी ब्रेड आणि चपाती दोन्हीच खाल्ल आहे.>>>
करेक्ट. माझी शेजारीण ब्रेड/पावा चं ही बनवते. त्याला सेल पाव बोलतात ते लोक.

आणि ते इतकं पातळ नाही बनवत. मसालेदार चपाती किंवा ब्रेड सुकं असतं >>>
माझी शेजारीण पावाचं कोरडं बनवते ते डिट्टो आपल्या पावाच्या चिवड्यासारखं लागतं. पण ती पोळीचं जेव्हा बनवते तेव्हा असं सूप सारखं पातळंच बनवते. ते बोल मध्ये घेऊन चमच्या ने भुरकत खायला जाम मजा येते. Happy

मी नेट वर नंतर ही पाकृ शोधली तेव्हा मला ही सुक्याचीच मिळाली. पण मग त्यात आणि आपण करतो त्या फो. च्या पो. मध्ये काही फरक च राहणार नाही ना!

बादवे, सेल शब्दाचा सिंधी मध्ये काही अर्थ आहे का?
की तरंगते पोळीचे तुकडे ह्या अर्थे इंग्रजीमधला सेल शब्द असेल? Wink