जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १३

Submitted by मार्गी on 11 August, 2015 - 06:50

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! (अवांतर- हे काम उदात्त/ ग्रेट इत्यादी नसून उत्स्फूर्त केलेलं सामान्य कामच आहे. आपण प्रत्येक जण असं काम कुठे ना कुठे करतंच असतो. ज्यांच्याकडे तशी पॅशन असते, तसे लोक ते काम जास्त काळ करतात. तेव्हा उदात्त/ ग्रेट असं काही मानू नये. धन्यवाद!)

जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- २
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ३
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ४
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ५
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ६
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ७
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ८
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ९
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १०
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- ११
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १२

आपत्तीची 'आपबिती'

१६ ऑक्टोबरच्या सकाळी लवकर दादाजी आणि अन्य कार्यकर्ते जम्मूला जायला निघाले. बनिहालमार्गे जाणारा रस्ता १८ तारखेपर्यंत बंद आहे. त्यामुळे त्यांना मुघल रोडनेच जावं लागले. मलासुद्धा १९ च्या सकाळी निघायचं आहे. बहुतेक मलाही तसंच जावं लागेल. एक विचार श्रीनगरवरून बनिहालपर्यंत ट्रेन आणि तिथून पुढे जीपने जाण्याचाही आहे. बघूया. आता फक्त तीन दिवस शिल्लक आहेत. मनातले भाव किती विचित्र असतात. उरलेल्या दिवसांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या ऐवजी मनाची धाव १९ ऑक्टोबरच्या पुढे जात आहे. खरोखर, वर्तमानात थांबणं मनाचा स्वभावच नाही. असो!

आज पहलं मुख्य काम सकाळचं आश्रमातलं शिबिर आहे. त्यानंतर पुढचं काम ठरेल. शिबिर नेहमीप्रमाणेच झालं. आणि रोजच्याप्रमाणे आजसुद्धा पहले 'रुग्ण' आश्रम परिसरात असलेले कर्मचारीच आहेत! आज जवळजवळ ६७ रुग्ण आले. काल आश्रमामध्ये एक ज्येष्ठ स्वामीजीसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे डॉक्टर सरांना शिबिर संपल्यानंतर त्यांचं बीपीही बघावं लागलं आणि त्यांच्यासोबत दोन- तीन लोकसुद्धा आले. कार्यालयातून गाडी यायला उशीर असल्यामुळे आम्ही पायी पायीच परतलो. आता रस्ता ओळखीचा झाला आहे. लाल चौकातून जाऊन झेलमवर एक पूल ओलांडून जायचं आहे. डॉक्टर सरांना तर शॉर्टकटसुद्धा माहिती आहे. छोट्या छोट्या गल्ल्यांमधून गेलो आणि पोहचलो. आज गाडी पवनजींसोबत लाईटसच्या वितरणासाठीसुद्धा जात आहे. बहुतेक आज त्यांचं वितरण संपेल.

थोड्याच वेळात कळालं की, आज संध्याकाळचं गावातलं शिबिर होणार नाही. कारण गाडी उपलब्ध नाहीय. काही गाड्या जम्मूलाही गेल्या आहेत. दुपारी कार्यालयात येणा-या कार्यकर्त्यांसोबत गप्पा झाल्या. डॉक्टर सरांच्या सूचनेप्रमाणे औषधांच्या बॉक्सना व्यवस्थित करण्याचं काम केलं. औषधं थोडी विखुरली आहेत; त्यामुळे त्यांना ग्रूपप्रमाणे लावायचं आहे. पुढच्या शिबिरांसाठी सेटही बनवले. डॉ. देसाई सर आणखी चार दिवस थांबतील. पण त्यानंतर काम करण्यासाठी कोणी डॉक्टर येत असल्याची माहिती अजून तरी मिळाली नाही आहे. अर्थात् पुढचे डॉक्टर येण्यासाठी प्रयत्न भरपूर चालू आहेत. महिला डॉक्टरांचीही फार जास्त गरज आहे.

डॉक्टर सरांसोबत काम करताना त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. खरं तर ते ४ सप्टेंबरला श्रीनगरमध्येच होते. फिरायला आले होते. जेव्हा ते पहलगामला गेले, तेव्हा पाऊस तीव्र कोसळत होता. तिथून त्यांना परतणं अवघड झालं आणि कसेबसे ते अवंतीपुरापर्यंतच येऊ शकले जे श्रीनगरपासून सुमारे पंचवीस किलोमीटरवर आहे. मिलिटरीने रस्ता बंद केला होता. अन्य उपाय नसल्यामुळे त्यांना तिथेच थांबावं लागलं. त्यावेळेस त्यांना आलेले अनुभव विचार करायला लावणारे आहेत. ते आणि त्यांची पत्नी हॉटेल बघायला गेले. तोपर्यंत त्यांच्यासोबत असेच अडकलेले आणखी दोन कपल्ससुद्धा आले होते. खूप शोधल्यावर त्यांना एक हॉटेल ठीक वाटलं. पर्यटकांचा नाइलाज आणि अन्य पर्यायांचा अभाव असल्यामुळे त्या हॉटेलवाल्याने दिवसाचे पंधराशे इतकं भाडं प्रत्येक कुटुंबासाठी सांगितलं. लेडीजना हे हॉटेल इतकं ठीक वाटलं नाही, म्हणून ते सामान तिथे ठेवून दुसरं हॉटेल बघायला गेले. जवळच त्यांना एका ठिकाणी जम्मूच्या पाच शिक्षिका भेटल्या. त्या भाड्याने काही खोल्या घेऊन राहात होत्या. त्यांनी आधीच काही लोकांना निवारा दिला होता. ह्या लोकांनी आपली अडचण त्यांना सांगितली आणि शिक्षिकाही त्यांना आसरा द्यायला तयार झाल्या. अडचण इतकीच होती की, ह्या तीनही कपल्सना एकाच खोलीत राहावं लागणार होतं ज्यासाठी ते लगेचच तयार झाले. पण जेव्हा ते सामान आणायला परत गेले, तेव्हा त्या हॉटेलवाल्याने फक्त सामान ठेवण्याचे हजार रूपये घेतले. आपत्तीतसुद्धा काही लोक मानवता विसरून लूटपाट करतात, ह्याचंच हे उदाहरण होतं. असो.

मग ते तीन कपल्स थोडे दिवस त्या शिक्षिकांसोबत राहिले. शिक्षिका जम्मूच्या होत्या आणि खूप सहृदय होत्या. त्यांचे घरमालकसुद्धा चांगले होते व त्यांनी ह्या लोकांना मदत केली. त्यांच्याजवळ पुरेसं‌ रेशनही होतं; ज्यामुळे आपत्तीच्या वेळी सर्वांची सोय होऊ शकली. रस्ता बंद असल्यामुळे सर्व चिंतीत होते. जोपर्यंत मोबाईल्स सुरू होते; तोपर्यंत डॉक्टर सरांनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीद्वारे अडकले असल्याची माहिती मिलिटरीला पोहचवली. त्यानंतर एका दिवसाने मिलिटरी त्यांना घ्यायला आली आणि मग मिलिटरीच्या हेलिकॉप्टरने त्यांना चंडीगढला सोडलं व तिथून ते गोव्याला गेले. डॉक्टर सर सांगत आहेत की गेल्यावर त्यांना आनंद वाटला; पण थोडं अपराधीसुद्धा वाटलं. ते डॉक्टर असूनही आपत्तीतून पळून आले होते. म्हणून त्यांनी‌ इथे सेवेसाठी येण्याचा निर्णय घेतला! आणि आता एकटे असूनही ते शिबिर घेत आहेत.

त्यांच्या अवंतीपुरामधील वास्तव्यात त्यांनी आणखी काही गोष्टी बघितल्या. जम्मूच्या शिक्षिकांचे अवंतीपुरामधले अनुभव कटु होते. एका अर्थाने कशाबशा त्या इथे राहात होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा ह्या लोकांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं, तेव्हा मिलिटरीचे लोक तिथे आले. त्यावेळी सर्व जण हेलिकॉप्टरमध्ये बसण्यासाठी रांगेत उभे होते. तेव्हा तिथे बसलेला मिलिटरीचा एक अधिकारी फार तणावात होता. अश्रू अनावर होऊन तो ह्यांना सांगत होता की, आमच्या कामामध्ये प्रचंड तणाव आहे. तो हेसुद्धा म्हणत होता की, कश्मिरींची कितीही मदत केली तरी ते आम्हांला शिव्या देतात. त्यानंतर त्याने कश्मिरींबद्दल अपशब्द वापरले. हे ऐकून जवळच बसलेला एक कश्मिरी तरुण त्याच्याजवळ आला आणि वादावादी करायला लागला; तो म्हणाला की, आम्हा कश्मिरींना बदनाम करू नका. त्यानेही मिलिटरीच्या विरोधात अपशब्द काढले. तो म्हणाला की मिलिटरी अनेक क्राईम करते आणि फक्त भारतातून आलेल्या पर्यटकांनाच मदत करते. वादावादी वाढत गेली. शेवटी आणखी काही लोक आणि अधिकारी मध्ये आले आणि कसंबसं‌ प्रकरण शांत झालं. ह्या प्रकारच्या प्रतिक्रिया आईसबर्गचा तुकडा असल्या तरी त्या अस्वस्थ करून जातात.

. . . अशा गोष्टी‌ ऐकत ऐकत औषधांना लावून ठेवण्याचं काम पूर्ण झालं. आज जेवण बनवणा-या टीममध्ये मी आहे आणि भाजी- पोळ्यासुद्धा बनवायच्या आहेत. कार्यकर्त्यांसोबत गप्पाही सुरू आहेत. अशाच प्रकारच्या काही प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांच्याही आहेत. एका कार्यकर्त्याने म्हंटलं की, जेव्हा आम्ही ह्याच कार्यालयात अडकून पडलो होतो, तेव्हा खिडकीतून आम्ही मिलिटरीच्या हेलिकॉप्टर्सना हात दाखवून अभिवादन करायचो. तसंच त्यांना खिडकीतून तिरंगासुद्धा दाखवायचो. त्याच वेळी तिथे असलेले बाजूला राहणारे अन्य लोक त्यांना हाताने दूर जाण्याचा इशारा करायचे आणि म्हणायचे की, आम्हांला मिलिटरीची अजिबात गरज नाही. पण जेव्हा नावेतून सैनिक मदत घेऊन यायचे, तेव्हा हेच लोक सर्वांत पुढे पळायचे आणि हात पसरायचे. ह्या लोकांना मिलिटरीची मदत तर हवी; जे मिळत असेल ते सर्व पाहिजे; पण नंतर ते मिलिटरीला शिव्याच देणार. . .

दादाजींनी सांगितलेली एक गोष्ट इथे आठवते आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी म्हंटलं होतं की, कुटुंबात एक जण बिघडलेला असतो. एक मानवी चूक किंवा कमतरता मानून अशा माणसाला माफ करायचं असतं. दादाजींनी जसं हे एक सूत्र दिलं होतं- 'आपण इथे कोणाला काही समजावून सांगायला नाही तर समजून घ्यायला आलो आहोत;' तसंच त्यांनी दुसरंही सूत्र दिलं होतं- 'काही गोष्टी बघितल्या तरी बघितल्या नाहीत असं समजायचं असतं.' ह्या टोकाच्या प्रतिक्रिया तशाच आहेत. अर्थात् ह्याचा अर्थ असा नाही की, अशा प्रतिक्रिया अस्तित्वातच नाहीत असं समजायचं. अशा प्रतिक्रिया आहेत आणि त्यांची असंख्य कारणंसुद्धा आहेत. कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. तसंच इथेही आहे. आणि सत्य हे नेहमीच हत्तीसारखं व्यापक असतं आणि आपले बघण्याचे दृष्टीकोन एक एक भाग बघणा-या आंधळ्यांप्रमाणे असतात. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी ह्या गोष्टी जशा आहेत तशा बघणे आणि समजून घेणं आवश्यक आहे.

एक गोष्ट तर नक्की की, जम्मू- कश्मीर काही‌ शतकांपासून एक प्रकारच्या आपत्तीतून जात आहे- मागासलेपणाची आपत्ती, शिक्षणाच्या अभावाची आपत्ती, चांगल्या वातावरणाच्या कमतरतेची आपत्ती इत्यादी आपदांची प्रदीर्घ मालिका सुरू आहे. त्यामुळे अशा संकटांनी त्रस्त असलेल्या लोकांमध्ये असा तणाव असणं‌ स्वाभाविक आहे. त्यावरचं एकमेव उत्तर म्हणजे ह्या मोठ्या आपत्तीइतक्याच तीव्रतेचं काम करणं हे आहे. कितीही कठोर दगड असला तरी हळु हळु पाण्यामुळे तो बदलतो. आणि हा तणाव फक्त कश्मीरमध्येच आहे असं नाही. देशाच्या प्रत्येक भागामध्ये हिंसाचार, भ्रष्टाचार, अत्याचार, माफिया राज, अपराध अशा प्रकारचा तणाव आहेच.

. . रात्रीचं जेवण सगळ्यांनी मिळून बनवलं. इतक्या लोकांचं जेवण बनवण्याची सवय नसल्यामुळे थोड्या गोष्टी राहून गेल्या; पण मजा आली. जेवण बनवण्याच्या कौशल्याला उजाळा मिळाला. आणि जेवण तिखट झाल्यामुळे थोडा वेळ थंडीपासून आरामही मिळाला. मी आणि डॉक्टर सर उद्या शंकराचार्य मंदीरामध्ये जाण्याचा विचार करत आहोत जे इथून आठ किलोमीटर एका टेकडीवर आहे. पहाटे उठून गेलो तर तीन- चार तासांमध्ये परत येऊ आणि आश्रमातलं शिबिर वेळेत सुरू होईल. पण त्यासाठी इतक्या प्रचंड थंडीत पहाटे पाच वाजता निघावं लागेल. . .

  पुढील भाग: जम्मू कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १४

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव २
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ३
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ४
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ५
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ६
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ७
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ८
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ९
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १०
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव ११
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १२
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीताय. आणी ग्रेट नाही असे का म्हणताय? तिथली परीस्थिती पहाता तिथे मन खम्बीर ठेऊन असे काम करणे हेच मोठे धाडस आहे. शान्ततेत कुणी पण प्रगती करेल. लिहीत रहा.

छान लिहीताय. आणी ग्रेट नाही असे का म्हणताय? तिथली परीस्थिती पहाता तिथे मन खम्बीर ठेऊन असे काम करणे हेच मोठे धाडस आहे. शान्ततेत कुणी पण प्रगती करेल. लिहीत रहा +१११११११११

हा भागसुद्धा छान आहे

कोणत्याही नाण्याच्या दोन बाजू असतात. तसंच इथेही आहे. आणि सत्य हे नेहमीच हत्तीसारखं व्यापक असतं आणि आपले बघण्याचे दृष्टीकोन एक एक भाग बघणा-या आंधळ्यांप्रमाणे असतात. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी ह्या गोष्टी जशा आहेत तशा बघणे आणि समजून घेणं आवश्यक आहे. >>>>> किती अवघड आहे हे सारं समजावून घेणं ...
या परिस्थितीत दादाजींची सूत्रे फार प्रॅक्टिकल वाटताहेत..

मिलिटरी असो वा स्थानिक मंडळी - सार्‍यांनाच फार ताण आल्याचे जाणवतंय ...

लेखमाला कमालीची सुंदर आहे ....