संवाद साधन!

Submitted by झुलेलाल on 9 August, 2015 - 11:30

मी बोरीवलीत राहातो. आमच्या चिकूवाडीत एक मराठी माणसाचे बियर शॉप आहे. काल रात्री त्याच्याकडे एकजण आला. 'केम छो काका' अशी आस्थेने मालकाची विचारपूस केली.
मालकाने दोन्ही तळवे उंचावून, पांडुरंग, पांडुरंग म्हटले.
मी मराठी असल्याने, त्याच्या प्रतिसादाचा अर्थ मला समजला.
'चित्ती असो द्यावे समाधान' असे त्याला म्हणायचे असावे...
त्या ग्राहकाला ते काही समजले नसावे!
'त्रण स्ट्रोंग आपो'... तो गोधळल्या आवाजात म्हणाला, आणि काऊंटरवरचा पोरगा गोंधळला.
'गुजराती समझती नही क्या?... सीख लो यार, गुजराती एरियामे रहते हो ना?'... त्या ग्राहकानं चढ्या आवाजात मुलाला सल्ला दिला आणि काळी पिशवी घेऊन पैसे देऊन तो निघून गेला.
मी बाजूलाच उभा होतो.
मालकाने निराश नजरेनं माझ्याकडे बघितलं. पुन्हा एकदा हात उंचावले आणि पुन्हा पांडुरंगनामाचा जप केला.
या वेळीही, त्याला काय म्हणायचंय ते मला समजलं!!
*** ***
पण एवढं विचित्र वगैरे वाटून घ्यायचं किंवा कसं होणार मराठीचं वगैरे चिंता करायचं कारण नाही.
दोन महिन्यांपूर्वी मी बडोद्याला गेलो होतो. एका दुकानात बायको आणि मी एकमेकांशी काहीतरी बोलत होतो. ते ऐकल्यावर दुुकानदारही आमच्याशी मराठीत बोलू लागला.
माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले असावे. कारण, काही न विचारताही दुकानदारच म्हणाला, 'साहेब, आमच्या गावात मराठी माणूस भरपूर आहे. त्यांच्याशी बोलायचं तर त्यांची भाषा यायला नको का?'
आश्चर्य चेहऱ्यावर ठळक करून मी त्याला विचारलं, 'का? त्यांना गुजराती येत नाही? '
'येतं ना! इथल्या मराठी माणसाला चांगलं गुजराती येतं. पण काय आहे, माणसाशी त्याच्या भाषेत संवाद साधला की जवळीक वाढते!'
... मग मी काहीच बोललो नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users