खरंच, कार्टी काळजात घुसली!

Submitted by झुलेलाल on 7 August, 2015 - 11:35

खरंच, 'कार्टी काळजात घुसली! '

या कथानकातील सारी पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत, त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही, अथवा आढळलाच, तर तो निव्वळ योगायोग समजावा'....असे एक वाक्य कोणत्याही नाटक, चित्रपटाच्या सुरुवातीलाच आपल्यास पडद्यावर दिसते, किंवा कानावर पडते. ही केवळ कायदेशीर औपचारिकता असते, हे माहीत असूनही आपण पुढच्या कथानकात इतके गुंतत जातो, की त्या कथानकातील पात्रे, प्रसंग आपल्या आसपासचीच आहेत, असा भास होऊ लागतो. आपण त्रयस्थपणे, तिऱ्हाईताच्या भूमिकेतून ते कथानक अनुभवूच शकत नाही. आपणही त्या कथानकाचा एक भाग होऊन जातो.
तसेही, रस्त्यावरून चालत असताना, कडेला काहीतरी सुरू असते, त्याच्याशी आपला किंवा गर्दीचा संबंधही नसतो, पण तरीही आपण मान उंच करून, गर्दीतून वाट काढत, ते पाहायचा प्रयत्न करतोच. म्हणजे, अगदी तिऱ्हाईत ठिकाणीदेखील आपण तिऱ्हाईत नसतोच. आपल्या नकळत आपण सगळीकडे सामावलेले असतो.
अशा परिस्थितीत, केवळ कथानकाच्या सुरुवातीला कुणीतरी एखादे वाक्य सांगते म्हणून ते पटवून घ्यायचे आणि आता पुढे जे घडणार आहे ते सारे काल्पनिक आहे अशा समजुतीत त्रयस्थपणे त्याकडे पाहात राहायचे?
हे कसे शक्य होऊ शकेल?...
प्रशांत दामले आणि तेजश्री प्रधान यांच्या भूमिका असलेलं कार्टी काळजात घुसली हे नाटक पाहताना तर ते केवळ अशक्य. आपण प्रेक्षक म्हणून नाट्यगृहात बसलेलो असलो, तरी ते पडदा उघडेपर्यंत... तिसरी घंटा झाली, पडदा उघडला, की आपण प्रेक्षक आहोत हे विसरायला होतं. संगीतकार कालीदास कान्हेऱ्यांच्या मुंबईतल्या त्या घराच्या एका कोपऱ्यात, बसून आपण ते घर न्याहाळतोय असं वाटू लागतं. पुढे घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचे थेट साक्षीदार म्हणून आपण आपली भूमिका ठरवूनही टाकलेली असते.
हा कालीदास आपलं कुटुंब सोडून 'पळून' जातो, तेव्हा त्याची मुलगी तीन वर्षांची असते आणि मुलगा सहासात महिन्यांचा. अरसिक बायकोशी जुळवून घेता येत नाही म्हणून हा 'रसिक' कालिदास मुंबईत जाऊन परिस्थितीशी मोठा संघर्ष करून बस्तान बसवतो, नावही कमावतो. पण म्हणून, कालीदासच्या संघर्षाचं कौतुक वाटत नाही. त्याचं उदात्तीकरणही नाटकात नाही. उलट, अपयशी, पळपुटा, कमनशिबी ही विशेषणं त्याला पुसता येत नाहीत. उलट ती त्याच्याभोवती सतत घुटमळत असतात. कालीदास त्यात गुरफटलेला दिसतो. ते लपवण्याचे त्याचे प्रयत्न ठसठशीतपणे उमटवणारा प्रशांत दामलेंचा कसदार अनुभव पहिल्या अंकात पहायला मिळतो, तर माणसातला 'बाप' जिवंत होण्यासाठी त्याच्या मुलीने केलेली चटका लावणारी खटपट, बापपणा जिवंत होण्याची अनपेक्षित पण साहजिक प्रक्रिया आणि हरवलेल्या भावनांच्या गुंत्यातून बाहेर पडत स्वच्छपणे स्वत:मध्ये सापडलेला बाप स्वीकारत अठरा वर्षांचा काळ पुसून जुन्या जगण्यासाठी आसुसलेला, कुटुंबासाठी तहानलेला एक माणूस प्रशांत दामलेंनी जिवंत केलाय.
या नाटकाचं कथानक जुनं आहे. पण नव्या प्रयोगासाठी ते घासूनपुसून एवढं नवं केलंय, की जुनं कार्टी पाहिलं असलं तरी नवं नाटक ताजंच वाटतं. काही वेळा, काही कथानकं वास्तवाशी विसंगत वाटतात. असं कुठे असतं का, असं वाटून कथानकाविषयी कंटाळवाणेपणा येऊ लागतो.
कार्टी काळजात घुसली चं कथानक कदाचित वेगवेगळ्यांच्या आयुष्यातले तुकडे एका कुटुंबाभोवती एकत्र करून तयार केलेलं एक कोलाज आहे. तरीही, ते पाहताना त्यातला एकजिनसीपणा बेमालूमपणे पटतो... कदाचित, असं असतं का, हा विचार करायला वेळच मिळत नाही.
या नाटकात पात्रांचा पसारा नाही, पण अनेक पात्रांभोवती ते गुंफलेलं आहे. ही स्टेजवर न दिसणारी पात्रदेखील आसपास जिवंतपणानं वावरताहेत, अशा कसदारपणाने दामले आणि तेजश्रीनं अभिनयातून उभी केली आहेत.
खरं म्हणजे, रंगमंचावर होणारा प्रयोग म्णून याला नाटक म्हणायचं, आणि प्रशांत दामले, तेजश्री यांचा 'अभिनय' म्हणायचं. पण अभिनय या शब्दातच कृत्रिमता असते. इथे हे दोघं अभिनय करत नाहीत, तर सहजपणे भूमिका 'जगतात'!
...म्हणून, हॆंटस ऑफ टु दामले, आणि तेजश्री!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

युट्युबवर जुनं नाटक संपूर्ण उपलब्ध आहे आणि नवीन नाटकाची झलक आहे. ती झलक पाहताना तेजश्रीचा अभिनय खूपच कृत्रिम वाटला. संवादफेक यांत्रिक वाटली. पाठ करुन म्हणत असल्यासारखी ! प्रशांत दामलेंचाही अभिनय फार आवडला नाही. एकुणात थिएटरमध्ये जाऊन हे नाटक बघावं असं वाटलंच नाही.
स्वाती चिटणीस आणि मोहन जोशी सुंदर ! ( तुलनेसाठी नाही पण ह्या वरचा सीन संपूर्ण नाटकात साधारण १ तास ४ मिनिटांनी येतो. )

मध्यंतरी सचिन पिळगावकरांनी आपल्या मुलीला 'एकुलती एक' मधून लाँच केलं त्याची कथाही अगदी हीच होती ( एकुलती एक असल्याने मुलगा नसेल कदाचित पण बाकी कथा हीच. ) त्यामुळे तर अजूनच तोचतोपणा जाणवला झलक पाहताना !

दामले हे खरोखर फक्त " दाम ले " आहेत. कोणाला काही देणे त्यांच्या स्वभावात नाही. ठीक आहे . असतो एकेकच स्वभाव . पण मग फुकटचा मोठेपणा घ्याची चोर गिरी करू नये. या माणसाच्या सगळ्या नाटकावर बहिष्कार टाकायला पाहिजे खरे तर.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/konkan-yuva-pr...

‘ती’ मदत ‘कोकण युवा प्रतिष्ठान’चीच!
दामले - 'महाराष्ट्र टाइम्स'च्या गुरुवार, २० ऑगस्टच्या अंकात 'सामाजिक देण्यातून कमाईचे घेणे' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीतील माहिती निखालस खोटी असल्याचा खुलासा निर्माते प्रशांत दामले यांनी केला आहे.
सत्य - मेसेज आहे साक्षीला...
बुधवारी प्रशांत दामले यांनी व्हाटसअॅपवरून पाठवलेल्या उपरोक्त मेसेजमध्ये 'कार्टी..'ने समाजाचे देणे लक्षात घेऊन २५ हजारांची मदत केली, हे अधोरेखित करताना ही मदत 'कोकण युवा प्रतिष्ठानने' केल्याचा अजिबात उल्लेख न करता आपणच ही मदत केल्याचे चलाखीने भासवले आहे. दुसऱ्याने दिलेल्या 'सामाजिक देण्या'तून स्वतःच्या 'कमाईचे घेणे' आहे ते हेच. वृत्तातील १ लाख ७० हजार हा आकडा खोटा असल्याचे दामले म्हणत असले तरी नाट्यव्यवसायातील कोणताही व्यवहार लेखी होत नाही, हे सर्वज्ञात आहे.