येऊरच्या जंगलात...

Submitted by ललिता-प्रीति on 3 August, 2015 - 01:27

अनुभवच्या जून-२०१५ अंकात प्रकाशित झालेला लेख.

----------

Copy of anubhav-may-yeoor-paayavaat-1.jpg

कुठल्याही हौशी, भटक्या ठाणेकरासमोर ‘येऊर’ हा शब्द उच्चारून बघा, त्याचे डोळे चमकतील. कारण तो किमान एकदा तरी येऊरच्या जंगलात फिरून आलेला असतो आणि त्या एका फेरीतच त्या जंगलाच्या प्रेमात पडलेला असतो.
येऊरचं हे जंगल म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाण्याकडील भाग. नकाशा पाहिलात, तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान उत्तर-दक्षिण पसरलेलं आहे. उत्तरेकडे वर्सोव्याची खाडी ते दक्षिणेकडे विहार तलाव असा त्याचा विस्तार आहे. त्याच्या पूर्वेकडे ठाणे शहर आणि मुलुंड-भांडुप ही मुंबईची मध्य उपनगरं येतात; तर पश्चि मेकडे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ही मुंबईची पश्चिेम उपनगरं येतात. म्हणजे मध्यात घनदाट जंगल आणि चहुबाजूंनी पसरलेली शहरं असं साधारण स्वरूप. या राष्ट्रीय उद्यानाला ‘मुंबईची फुफ्फुसं’ असं म्हटलं जातं ते याचमुळे.
हे राष्ट्रीय उद्यान पर्यटकांमध्ये ‘बोरिवली नॅशनल पार्क’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. बोरिवली का, तर राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठीचं मोठं प्रवेशद्वार, तिकीटखिडक्या बोरिवलीत आहेत. ‘लायन सफारी’, लहान मुलांची लाडकी ‘टॉय ट्रेन’, सुप्रसिद्ध कान्हेरी गुंफा हे सारं बघायचं तर बोरिवलीतून प्रवेश करूनच बघावं लागतं. जंगलाच्या अंतर्भागातल्या ‘शिळोंढा नेचर ट्रेल’साठीही तिथूनच प्रवेश आहे.
थोडक्यात काय, तर निव्वळ पर्यटनाच्या दृष्टीने या राष्ट्रीय उद्यानाचं अस्तित्व बोरिवलीपुरतं मर्यादित आहे. मात्र, भौगोलिकदृष्ट्या बोलायचं, तर त्याचा अर्धाअधिक भाग येऊरच्या जंगलाने व्यापलेला आहे.
ठाण्यालगतची ही येऊरची टेकडी भटक्यांसाठी जसं नंदनवन आहे तसंच ते ठाणेकरांसाठी लाडकं ‘हिलस्टेशन’ आहे. सकाळ-संध्याकाळ इथे फिरायला, व्यायामाला येणार्यां ची वर्दळ दिसते. आठवड्याच्या आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी वाहनांचीही भरपूर ये-जा असते. हे जंगल म्हणजे विविध प्रजातींच्या वनस्पती, फुलं, कीटक, पक्षी, सरपटणारे प्राणी यांची खाण आहे. त्यामुळे इथेही खास नेचर ट्रेल्स, फोटोग्राफी ट्रेल्स, पक्षिनिरीक्षण सहली नियमित आयोजित केल्या जातात. ठाणे शहरातले पोखरण रस्ता क्र. १ आणि २ जिथे एकमेकांना मिळतात, तिथून टेकडीवर जायला पक्का, डांबरी रस्ता आहे. तो रस्ता वर साधारण चार-पाच कि.मी.पर्यंत जातो आणि येऊरमधल्या पाटोणपाड्यापाशी संपतो. ठाणे रेल्वे स्टेशनवरून पाटोणपाड्यापर्यंत बससेवाही आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाटोणपाडा हे नाव साधारण ठाऊक असतं. त्यातल्या ‘पाडा’ या शब्दामुळे तो आदिवासी पाडा असणार हेदेखील त्यांनी ताडलेलं असतं. मात्र, निसर्गाशी जवळीक साधायला जाणारे भटके हा पाडा नक्की आहे कुठे हे जाणून घेण्याचा फारसा प्रयत्न करत नाहीत. शिवाय नेचर ट्रेलचा मार्ग आणि आदिवासी वस्ती कुठेच एकमेकांना आडवेही येत नाहीत. संरक्षित जंगलात फिरताना अगदी क्वचित एखाद-दुसरा आदिवासी माणूस दृष्टीस पडतो. त्यामुळे अवतीभोवतीच्या ‘फ्लोरा अँड फॉना’च्या कौतुकात सगळे दंग राहतात... मीदेखील त्यातलीच एक!
पण तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्यापुरतं हे चित्र अगदी अचानक बदललं. डिसेंबर-जानेवारीत ‘समता विचार प्रचारक संस्थे’च्या सहकार्याने ठाण्यात पार पडलेल्या रत्नाकर मतकरीप्रणीत स्लम थिएटर फेस्टिवलमध्ये येऊरमधल्या दोन शाळांच्या विद्यार्थ्यांनी दोन नाटिका सादर केल्या. दोन्ही नाटिकांमधून अगदी साधेपणाने येऊरच्या आदिवासींपुढल्या विविध समस्या मांडल्या गेल्या. कलाकार मुलांचं कौतुक करताना नाटिकांमध्ये मांडली गेलेली तथ्यं तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच काळजाला घरं पाडत होती. नाटिका सादर करणारी मुलं येऊरमधली होती. याचा अर्थ तिथे शाळा आहेत तर, एवढी नोंद माझ्या मनाने करून घेतली. पुढे फेस्टिवलची सांगता झाली, पण जाता जाता त्या उपक्रमाने येऊर म्हणजे निसर्ग, येऊर म्हणजे जंगलवैभव, येऊर म्हणजे चार घटका निवांत भटकंती, या माझ्या व्याख्यांमध्ये ‘येऊर म्हणजे तिथला दुर्लक्षित आदिवासी’ या व्याख्येचीही भर घातली.
दरम्यान, ठाण्यावर, येऊरवर प्रेम करणार्याै आणि त्या नाटिकांमुळे माझ्याप्रमाणेच आतून हललेल्या आणखी काहीजणांच्या मनात ‘त्या समस्यांवर काही करता येईल का?’ या प्रश्नाजने मूळ धरलं. त्या अनुषंगाने आणि ‘समता’च्या उत्साही मंडळींच्या सहकार्याने भेटीगाठी, बैठका सुरू झाल्या आणि येऊरच्या आदिवासी पाड्यांमध्ये फिरून थोडी पाहणी करावी, काही लोकांशी बोलून समस्यांची शहानिशा करावी, असा विचार पुढे आला. त्यातून एक पाहणीगट तयार झाला नि मीदेखील त्यात सामील झाले. त्यातून सुरू झाला आजवर अज्ञात असलेल्या येऊरचा प्रवास...

***

येऊरमध्ये एकूण सात पाडे आहेत- पाटीलपाडा, पाटोणपाडा, भेंडीपाडा, रोणाचा पाडा, जांभूळपाडा, वणीचा पाडा आणि नारळीपाडा. त्यातले पाटीलपाडा आणि पाटोणपाडा हे दोन पाडे त्यातल्या त्यात थोडे विकसित म्हणता येतील. म्हणजे काय? तर तिथे वीज आहे, पाणी आहे, बससेवा आहे, बर्या पैकी रस्ते आहेत. पैकी पाटीलपाडा इतर पाड्यांच्या मानाने जरा अलीकडे येतो. ठाण्यातून येऊरच्या टेकडीचा रस्ता चढायला सुरुवात केली, की दोनेक किमीनंतर वाटेत एखाद्या चिमुकल्या खेडेगावासारखी वस्ती लागते. किराणामालाची एक-दोन दुकानं, बाजूच्या गल्ल्यांमधे घरं, चहा-वडापावच्या गाड्या, एक टायर ‘पंचर’चं खोपटं... असा हा तो पाटीलपाडा. इथे महापालिकेची एक शाळा आहे. पाड्यात एक पोलिस चौकीही आहे. संपूर्ण येऊर परिसर या एका चौकीच्या देखरेखीखालीच असतो. अजून एका बाबतीत पाटीलपाडा इतर पाड्यांहून वेगळा आहे. इथे एक सार्वजनिक शौचालय आहे. इतर पाड्यांतल्या रहिवाशांना ही ‘लक्झरी’ नाही!
वाहनावरून येऊरला जाताना ठाणे मागे पडलं, की जंगलातला वळणावळणांचा, चढाचा, सामसूम रस्ता काटता काटता अचानक पाटीलपाड्याची वस्ती येते. हा पाडा मागे पडतो आणि गाडीरस्त्याला उजवीकडे एक फाटा फुटतो. या फाट्यावरून आत गेलं की लागतो नारळीपाडा. नारळीपाड्याच्या वाटेवर आधी शहरी लोकांच्या मौजमजेसाठी तयार करण्यात आलेली ‘जंगल अॅळडव्हेंचर’ आणि ‘एक्झॉटिका’ ही ठिकाणं दिसतात. पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बंगले, आत हिरवळ, खासगी बागा, कुंपणांच्या उंच भिंती वगैरे दिसतात. इथून जाताना आपण जंगलातून जात आहोत असं अजिबात वाटत नाही.
आम्ही गेलो तेव्हा नारळीपाड्यातून जाणार्याट एकमेव छोट्या पायवाटेवर नुकतेच पेव्हर ब्लॉक्स टाकलेले होते. विटकरी-पिवळ्या रंगसंगतीचे पेव्हर ब्लॉक्स आजूबाजूच्या वातावरणाच्या पार्श्व.भूमीवर भलतेच स्वच्छ, लख्ख दिसत होते. पाड्यात जेमतेम वीसेक घरं असतील. बहुतेक झापाचीच. प्रत्येक घरासमोर एक छोटंसं का होईना पण सारवलेलं अंगण होतं. एका ठिकाणी जरा मोकळ्या जागेत पाण्यासाठीची सिंटेक्स किंवा तत्सम मोठी टाकी बसवलेली दिसली. टाकीच्या नळापाशी तीन-चार चिल्लीपिल्ली पाण्यात खेळत होती. पाड्यातून एक चक्कर टाकून आम्ही बाहेर पडलो. बंगल्यांची ओळ मागे टाकून पुन्हा मुख्य गाडीरस्त्याला लागलो.
इथून पुढे पाटोणपाड्यापर्यंतच्या दोनेक किमीच्या रस्त्यात अध्येमध्ये तुरळक घरं, शेतं, कुंपण घातलेली आवारं दिसत राहतात. पाटोणपाड्याच्या बसस्टॉपपर्यंत हा रस्ता नाकासमोर जात राहतो. बसस्टॉपपाशी एक चहा-वडापाव विकणारी टपरी आहे. शेजारी एक लाकडी बाकडं टाकलेलं आहे. टी.एम.टी.ची बस आली की तेवढ्यापुरती या टपरीपाशी वर्दळ असते. बसस्टॉपवर उतरून आम्ही उजवा फाटा पकडला आणि जाऊन पोहोचलो पाटोणपाड्यात. येऊरचे उर्वरित पाच पाडे या पाटोणपाड्याच्या आधाराने आपापलं अस्तित्व राखून आहेत. पाटोणपाड्यातही वीज आहे, पाणी आहे, एक-दोन दुकानं आहेत.
माझ्याबरोबरच्या ‘समता’च्या स्वयंसेवकांपैकी एक होता पंकज गुरव. गेली काही वर्षं तो नियमितपणे येऊरला येतो आहे. इथल्या मुलांसाठी ‘स्कूल विदाऊट वॉल्स’ हा उपक्रम चालवतो आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांना अक्षरं आणि आकड्यांची ओळख करून देणं, त्यांना गणितातली सोपी आकडेमोड शिकवणं यावर सध्या त्याचा भर आहे. इथली बहुतांश मुलं त्याला ‘पंकजदादा’ म्हणून ओळखतात. चालता चालता त्याने पाटोणपाड्याच्या रस्त्यावरचे स्पीडब्रेकर्स नुकतेच बनले असल्याची माहिती दिली. आपल्याला रस्त्यांवर गतिरोधक असण्याची इतकी सवय असते, की येताना माझं त्यांच्याकडे लक्षही गेलेलं नव्हतं. पण गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वेगाने ये-जा करणारी ठाणेकरांची वाहनं आणि त्यामुळे विशेषतः रात्री होणारे अपघात ही येऊरवासीयांसाठी एक समस्या आहे. नाटिकेतही ती मांडली गेली होती. याचा अर्थ ते गतिरोधक म्हणजे नंतरच्या बैठका, चर्चा, निवेदनं यांचा परिणाम होता तर...! बरं वाटलं.
पाटोणपाड्यातून वणीच्या पाड्याला जायला पायवाट आहे. वाटेत एक सुकलेला ओढा दिसला. ‘नेचर ट्रेल’दरम्यानही जंगलाच्या अंतर्भागात हा ओढा आडवा येतोच. पावसाळ्यात फार सुंदर वाटतो पाहायला. जुलै-ऑगस्टदरम्यान ओढ्याला महामूर पाणी असतं. या पाड्यातून त्या पाड्यात जायचं तर पूल हवाच. काही वर्षांपूर्वीपर्यंत ओढ्यावर तो होता. पण मध्ये एके वर्षी तुफान पावसात तो ढासळला; पुन्हा काही बांधला गेला नाही. त्याचे अवशेष अजूनही तिथे आहेत. परिणामी, ओढ्याला पाणी वाढलं की वणीच्या पाड्याचा पाटोणपाड्याशी (म्हणजे थोडक्यात जगाशी) संपर्क तुटतो. आम्ही ओढा ओलांडून पुढे आलो, तर एका ठिकाणी एक हातपंप दिसला. कोरडा ठक्क. तो तिथे का बसवला गेला असेल हे कळायला काही मार्ग नव्हता. कारण आसपास वस्तीही फारशी दिसत नव्हती. कोणे एके काळी त्या हातपंपाला पाणी येत असे, अशी माहिती पंकजने पुरवली.

Copy of anubhav-may-yeoor-vanicha-pada-1.jpg

वणीच्या पाड्यातल्या भक्ती लहू भवर यांच्या घरी आम्ही पोहोचलो, तेव्हा सकाळचे दहा-साडेदहा वाजलेले होते. पक्क्या बांधकामाचं कौलारू घर. सारवलेलं अंगण. अंगणातून चार-पाच पायर्या चढून घरात जात होत्या. आसपास अजून काही घरं दिसत होती. सर्व घरांचं स्वरूप साधारण असंच. भोवताली मोठी झाडं घरांवर सावली धरून उभी होती.
"वणीच्या पाड्यात सव्वीस घरं आहेत," भक्तीभाऊ आम्ही विचारलेल्या प्रश्नांतच्या उत्तरादाखल माहिती देत होते. “इथले दहा-पंधराजण खाली ठाण्यात टेम्पररी कामांसाठी जातात. बाकी सगळे इथेच शेतीबिती करतात... नाचणी, ज्वारी.” त्यांच्या घरातून रेडिओ किंवा टेपरेकॉर्डरचा आवाज येत होता. म्हणजे या पाड्यातही वीज होती तर. विचारलं तर म्हणाले, “नाही, सगळ्यांनी आकडे टाकलेत, त्या तिकडच्या कृष्णाच्या घराच्या इथून.” उजवा हात लांबवर दाखवत त्यांनी कृष्णाचं घर दाखवलं. हे कृष्णाचं घर म्हणजे येऊरमधल्या अधिकृत वीजजोडणीचा अखेरचा बिंदू.
“फॉरेस्टमुळे इथे रस्ता नाही, वीज नाही.” भाऊ बोलत होते. "...मागे इथे विजेचे खांब आणून टाकले होते, पण फॉरेस्टवाल्यांनी ते उचलायला लावले." त्यांच्या म्हणण्यानुसार पाटोणपाडा ते वणीचा पाडा दरम्यानचा मधला एक छोटासा पट्टा तेवढा वनखात्यात येतो. बाकी सगळा भाग ठाणे महापालिकेच्या अखत्यारीतला. तरीही वनखातं तिथे या प्रकारची विकासकामं करू देत नाही.
"...आणि पाणी?" आमच्यापैकी एकाने विचारलं.
त्यावर भाऊंची बायको पुढे सरसावली. तिच्या जिव्हाळ्याचा प्रश्नत चर्चेत आलेला होता. “ती काय, तीन वर्षांपूर्वी पाण्याची टाकी लावून घेतली.” आमच्या मागे एका ठिकाणी बोट दाखवत ती म्हणाली. आम्ही तिकडे वळून पाहिलं. वीस-तीस पावलांवर पाच हजार लिटरची मोठी काळी टाकी दिसत होती. नळ होता. टाकीच्या पायथ्याशी चिखल-रबडा होता. म्हणजे टाकीत पाणी येत होतं! पण अडचण अशी, की या टाक्यांची नियमित स्वच्छता केली जात नाही. टाक्या महापालिकेने बसवलेल्या असल्यामुळे स्वच्छतेचं कामही संबंधितांकडून होणं अपेक्षित आहे; पण त्याकडे कुणी लक्ष पुरवत नसल्याचं कळलं.
येऊरमध्ये पाऊस भरपूर पडतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत इथले लोक भाजीपाला काढतात. बहुतेकदा त्या-त्या घरच्या लोकांपुरताच तो होतो. मात्र, जास्तीचा झाला तर खालच्या शास्त्रीनगर, वर्तकनगर इथल्या बाजारात नेऊन विकला जातो. सकाळी लवकर गेलं, तर बारा वाजेपर्यंत सगळा माल संपतोसुद्धा. पण या आदिवासींना खालच्या बाजारातले प्रस्थापित भाजीवाले सुखासुखी विक्री करू देत नाहीत. त्यांना हुसकून लावतात, त्यांच्याकडचा माल हिसकावून घेतात... सांगता सांगता मावशींच्या आवाजाला धार आली होती.
हंगामी किंवा कंत्राटी कामांसाठी पाड्यातून ठाण्यात जाणारे लोक दुसर्यात एका मार्गाचा वापर करतात. तासाभराची पायपीट करून पाटोणपाड्याच्या विरुद्ध दिशेला वडवली गावात उतरतात. वडवली गाव म्हणजे उत्तरेकडे येऊरला समांतर पसरत चाललेल्या नव्या ठाण्यातला एक भाग. तिथे काम जास्त मिळतं. कधी हे माळीकाम असतं, कधी हमाली असते, कधी कुठल्या कामाला ‘हेल्पर’ हवा असतो. अक्षरशः पडेल ते, मिळेल ते काम ही माणसं पत्करतात.
"पाड्यातली मुलं शाळेत जातात का?" या प्रश्नाेवर भाऊंनी अभिमानाने "हो, जातात की!" असं उत्तर दिलं.
ही शाळा म्हणजेच येऊरमधली दुसरी शाळा. नेचर ट्रेलच्या मार्गाच्या दिशेला संरक्षित वनक्षेत्राच्या हद्दीच्या दहा पावलं अलीकडे ही शाळा आहे. शाळेचा परिसर अतिशय सुंदर आहे. मोठं लोखंडी फाटक, आत छोटं पण मोकळं मैदान आणि मग शाळेची बैठी, कौलारू इमारत. मैदानात एका कडेला चिंचेचं एक भलं थोरलं झाड, झाडाभोवती मोठा पार. मंद वारा, शांत वातावरण, पक्ष्यांची किलबिल... अशा शाळेत यायला कुणाला आवडणार नाही? पण पंकजकडून वेगळीच तथ्यं समजली. त्याने सांगितलं, की शाळेच्या हजेरीपटावर विद्यार्थिसंख्या भरपूर दिसते, पण प्रत्यक्षात त्यांची उपस्थिती अगदीच नगण्य असते. अंधश्रद्धा, पालकांनी कामावर जाणं आणि मुलींना घरकामाकरता किंवा आपल्या लहान भावंडांना सांभाळण्याकरता शाळा बुडवून घरी थांबावं लागणं, पालक आजारी असल्यामुळे त्यांच्या जागी मुलांना शाळा बुडवून कामावर जावं लागणं, लहान वयात मुलींची लग्नं करून दिल्यामुळे किंवा आजारपणांमुळे शाळेतून त्यांची होणारी गळती ही त्यामागची कारणं.
आरोग्यसेवेचा अभाव ही इथली एक मोठी समस्या आहे. संपूर्ण येऊरमध्ये मिळून एकंदर दोन हजार घरं असावीत, पण इथे त्यांच्यासाठी एकही दवाखाना अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. इथली एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिला उपचारांसाठी खाली ठाण्यातच न्यावं लागतं. त्यासाठी वाहनाची सोय म्हणावी तर फक्त बसचीच. ही सोयही अगदीच अलीकडची. पण मुळात या आदिवासींवर परंपरेचा इतका पगडा आहे, की औषधोपचारांआधी अंगारे-धुपारे करण्याला प्राधान्य दिलं जातं. त्यापश्चाधत डॉक्टर, दवाखाना शोधायचा तर कधी कधी खूप उशीर झालेला असतो. रुग्ण दगावण्याचीच अधिक शक्यता असते.
“आजारपणामुळे किंवा इतर कारणांमुळे शाळेला दांड्या मारणारी मुलं दर रविवारच्या बिनभिंतींच्या शाळेत मात्र आनंदाने उड्या मारत येतात.” पंकजची सहकारी शहनाझ सांगत होती. शाळेत न जाण्याच्या प्रवृत्तीवर उपाय म्हणून त्या दोघांनी एक छोटासा मार्ग शोधून काढला. त्यांनी मुलांना सांगितलं- “आठवडाभर शाळेत नीट हजेरी असेल तरच आम्ही रविवारी येणार, नाही तर आपली रविवारची गंमतशाळा बंद.” याचा थोडाफार उपयोग झाल्याचं त्यांचं निरीक्षण आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत या शाळेत सातवीपर्यंतचेच वर्ग भरायचे; आता दहावीपर्यंतचे भरतात. घरी-शेजारीपाजारी शिक्षणाचं अजिबातच वातावरण नाही, आस्था नाही. असं असतानाही इथल्या एखाद्याने नेटाने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंच, तरी त्याच्यासाठी पुढे सगळा अंधारच असतो. पंकजचा अजून एक सहकारी महेश बागल याने शाळेत झालेल्या एका बैठकीत याबद्दलचे मुद्दे मांडले होते - ‘दहावीनंतर पुढे शिकायचं, तर येऊरपासून कॉलेजेस खूप लांब आहेत. इथल्या विद्यार्थ्यांना वाहतुकीची पुरेशी सोयही उपलब्ध नाही. दुसरीकडे, दहावीनंतर पुढे न शिकता काही कामधाम करायचं म्हटलं, तर इथल्या मुलांना आपल्या परिसराबाहेरची कामं जमत नाहीत. आणि अशी कामं शिकून घ्यायची झाली, तर त्यासाठी काहीच सोयी-सुविधा नाहीत.’
परिस्थिती अशी असल्यामुळे ‘शिकून तरी काय करणार, त्यापेक्षा घरची कामं करा, शेती करा’ असं पालकांनी म्हटलं तर त्यांना तरी दोष का द्यावा?
मुळात ठाणे जिल्हा हा पूर्वापार आदिवासीबहुल म्हणूनच ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातून पालघर हा एक नवा जिल्हा वेगळा काढण्यात आला. पालघर जिल्ह्यातले जव्हार-मोखाडा हे खास आदिवासींचे म्हणून ओळखले जाणारे तालुके अगदी अंतर्भागात येतात. त्यामुळे शहरातली विकासगंगा त्यांच्यापर्यंत सहजी पोहोचत नाही. त्यांच्या तुलनेत डहाणू, वसई या तालुक्यांच्या किमान वेशीवरून तरी गेली काही दशकं शहरी वारं जातं आहे. आता जो ठाणे जिल्हा उरला आहे त्यात बहुतांश शहरी तालुकेच उरले आहेत. येऊर परिसर तेवढा आदिवासीबहुल आहे. पण गंमत अशी, की तो ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे इथल्या रहिवाशांना ना ग्रामीण भागाचे फायदे मिळतात ना महापालिकेचे.
स्लम थिएटरच्या नाटिकांमधून कळलेली आणखी एक समस्या होती इथल्या जंगलातल्या बिबट्याची. आजमितीला येऊरच्या जंगलात किमान वीसेक बिबटे तरी आहेत. एखादा बिबट्या मनुष्यवस्तीत शिरतो आणि पाळीव गुरं, कुत्री किंवा क्वचित लहान मुलांनाही मारून घेऊन जातो, अशा प्रकारच्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रांत कधी तरी वाचनात येतात. त्याबद्दल भक्तीभाऊंना विचारलं तेव्हा त्यांच्याकडून काहीसं अनपेक्षित उत्तर आलं. ते म्हणाले, “पाड्यात आलेला बिबट्या मूळचा याच जंगलातील असेल तर तो काहीही करत नाही. मात्र, बाहेरून आणून इथल्या जंगलात सोडलेला बिबट्या हल्ला करू शकतो.” बिबट्यासारख्या विषयावरही ते अगदी शांतपणे बोलत होते. पण माझा प्रश्नं होता, की "समोर बिबट्या आला की तो इथलाच की उपरा हे कसं काय ओळखायचं? म्हणजे सावध तर राहायलाच हवं कायम.” त्यावर पंकजनेच उत्तर दिलं. त्याच्या मते स्थानिक आणि उपरे बिबटे आदिवासींच्या सराईत नजरांना अगदी अंधारातही ओळखता येतात!
येऊरवासीयांची अजून एक समस्या या बिबट्याच्या धोक्यासोबत जोडली गेली की गंभीर रूप धारण करते. ती समस्या आहे इथे सार्वजनिक शौचालयं नसण्याची. पहाटे किंवा रात्री-बेरात्री माणसं अंधारात उघड्यावरच शौचाला जातात. त्या वेळी बिबट्याचा सर्वाधिक धोका असतो. हा धोका गृहीत धरूनच माणसांना आपले दैनंदिन व्यवहार करावे लागतात.
भक्तीभाऊंशी पंधरा-वीस मिनिटं बोलून आम्ही तिथून निघालो. निघताना अंगणाच्या एका कोपर्‍यात एक डिश अँटेना अगदी टेचात उभी असलेली दिसली. येताना त्याकडे माझं लक्ष गेलेलं नव्हतं. आता मी आसपास पाहिलं, तर प्रत्येक घरावर एक-एक डिश अँटेना नजरेस पडली. हे पाडे ठाणे शहराला खेटून असल्यामुळे हा त्यांना झालेला शहरीपणाचा संसर्ग म्हणता येईल. इथे लोकांकरता शौचालयाची सोय नसेना का, घराघरांत टीव्ही मात्र आहेत! वनखातं इथे विजेचे खांब उभारू देत नाही, पण डिश टीव्हीला कुणाचा अटकाव नाही! पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागू दे, पण घरबसल्या करमणुकीचा इथे तुटवडा नाही!
असं काही पाहिलं, की माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आणि पूरक-नैमित्तिक गरजा कोणत्या; माणसाने यांच्या व्याख्या बदलल्या आहेत का, की एका रकान्यातली एखादी रिकामी जागा दुसर्‍या रकान्यातल्या गोष्टीने भरून काढली की काम होतं, असे प्रश्न पडतात. शहरी जीवनात तर अनेकदा हे होतंच; पण शहरालगतच्या आदिवासींच्या आयुष्यातही हे होताना दिसत होतं.

***

आमचा पुढचा थांबा होता चंद्रकांत रामा भोईर यांचं घर.

Copy of anubhav-may-yeoor-chandrakant-home-1.jpgCopy of anubhav-may-yeoor-chandrakant-home-2.jpg

नुकतीच रंगरंगोटी केलेलं पक्कं बांधकाम. बाहेर त्यांची बायको शेणाने एका कोपर्‍यातलं अंगण सारवत होती. अंगणात एक झाड होतं. झाडाभोवती पार बांधलेला. आम्हाला बघून चंद्रकांतभाऊंनी घाईघाईने घरातून चटई आणली. पण मी शेणाने सारवलेल्या पारावर टेकले. तास-दोन तास वेळ काढायला एकदम झकास जागा होती ती. इथल्या घरांच्या छोट्याशा पुंजक्यासाठी गेल्या वर्षी पाण्याची टाकी बसवली असल्याचं सांगितलं गेलं. टाकीची क्षमता ५००० लिटरची. “पण त्यात पाणीच नसतं” असं अंगण सारवता सारवता मावशी म्हणाल्या.
“मग काय करता?”
“तिकडे हातपंप आहे, तिकडनं आणतो. पण आता उन्हाळ्यात हातपंपाला पण पाणी येत नाय, मग फिरायचं शोधत इकडे-तिकडे...”
घरालगतच त्यांचा शेताचा तुकडा दिसत होता. कोरडी, भेगाळलेली जमीन. पाणी नाही त्यामुळे फारशी शेती करता येत नाही. पावसाच्या पाण्यावर काय काय करणार, असं त्यांचं म्हणणं.
त्यांच्याही घरात आकडे टाकून वीज घेतलेली. उगम तोच- त्या तिकडचं कृष्णाचं घर! चंद्रकांतभाऊंकडे एक-दोन गायीही आहेत. त्यांचं दूध घरच्यांपुरतं पुरेसं होतं, विक्रीला मात्र उरत नाही. इथली माणसंही गुरुवारच्या आठवडी बाजाराला खाली वडवलीला जातात. खासकरून सुकी मच्छी आणायची असेल तर.
चंद्रकांतभाऊ, भक्तीभाऊ आणि त्यांचे शेजारी-पाजारी सगळे पाटीलपाड्याला मतदानाला जातात असं कळलं. वणीचा पाडा ते पाटीलपाडा हे अंतर पडतं तीन-चार किमीचं. इतकं अंतर, मतदानाची निकड आणि पुढे त्यातून मिळणारे-न मिळणारे फायदे हे त्रैराशिक मला काही सुटेना. मतदानाबद्दल इतका उत्साह, इच्छाशक्ती ते कुठून आणत असतील असा प्रश्न पडला. एका बैठकीला इथले स्थानिक ‘माजी’ नगरसेवक आले होते. त्यांनी आजवर केलेल्या कामांची जंत्री वाचली होती; पण ती कामं किती अपुरी होती हे दिसतच होतं. त्यामुळे मतदानासाठी या लोकांना नक्की कोणती प्रेरणा मिळत असेल, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

Copy of anubhav-may-yeoor-chandrakant-home-3.jpg

चंद्रकांतभाऊंच्या घरालगत झापाची एक छोटी झोपडी दिसत होती. सरपण, लाकूडफाटा वगैरे साठवण्याची ती जागा होती. रात्रीच्या वेळी तिथेच गायी-गुरं बांधत असतील असं मला वाटलं; पण ‘गाय-वासरू घरात बांधतो’ असं भाऊंनी सांगितलं. कारण बिबट्याची भीती.

***

वणीच्या पाड्यातून पुढे आम्ही जिथे जाणार होतो तो भाग येऊरमध्ये ‘दळं’ म्हणून ओळखला जातो. दळं म्हणजे शेतीसाठीची जरा खोलगट, एकत्रित जागा. या भागाला काहीजण ‘दल्यान पाडा’ असंही म्हणतात. पण हा लौकिक येऊरबाहेरच अधिक आहे.

Copy of anubhav-may-yeoor-dinesh-gaaykar-home-1.jpg

दळ्याचा रस्ता जरा उताराचा होता. काही अंतरावर एक शाकारलेली झोपडी दिसत होती. पुढे छान सारवलेलं अंगण आणि चक्क जास्वंदीचं कुंपण! ही अशी लालजर्द जास्वंद फुललेली! पायवाटेवरून खाली येऊन आम्ही अंगणात उतरलो. त्या झोपडीला कुलूप लावलेलं दिसलं. कुलूप पाहून आम्ही जरा घुटमळलो. तेवढ्यात अंगणाच्या एका कोपर्यानत, गडद सावलीत एकजण तरटावर पहुडलेला होता. घरमालकच असावा. दिनेश गायकर त्याचं नाव. आम्हाला पाहून तो उठून बसला. मग आम्हीही तिथे त्याच्या अवतीभोवती बसलो. आसपासचं रूक्ष, रखरखीत जंगल आणि ही झोपडी-अंगण म्हणजे एकदम ‘काँट्रास्ट सीन’ होता.

Copy of anubhav-may-yeoor-dinesh-gaaykar-home-3.jpg

सुरुवातीचे आमचे प्रश्न तेच- वीज, पाणी, पिकं वगैरे. दळ्यात २०-२५ घरं आहेत पण खूप विखुरलेली. एकत्र असलीच तर जास्तीत जास्त पाचेकच. इथली सगळी घरं झापाची. पक्कं बांधकाम एकही नाही. लांबवरच्या एका छोट्या टेकडीवर तुरळक कौलारू छपरं दिसत होती.

Copy of anubhav-may-yeoor-jungle-2.jpg

टेकडीच्या विरुद्ध दिशेला जरा खालच्या अंगाला काही घरं होती. त्या घरांना समांतर शेताचे तुकडे दिसत होते. दळ्यात वीज नाही. आकडे टाकूनही नाही! कारण ‘ते कृष्णाचं घर’ इथून खूपच लांब पडतं. दुपारच्या उन्हात मला जाणवलेला घर आणि परिसराचा ‘काँट्रास्ट सीन’ रात्रीच्या अंधारात तेवढा ‘काँट्रास्ट’ राहत नसणार हे उघडच होतं. इथेही बिबट्याचा धोका असल्याचं समजलं.
पाड्यात प्रामुख्याने तांदुळाची शेती होते. जेमतेम घरच्यांना पुरेल इतपत तांदूळ पिकतो. शिवाय थोडीफार जांभळं, आंबे निघतात. ते खाली शास्त्रीनगरात विकले जातात. मात्र, पाड्यात टाकी, नळ, हातपंप काहीच नाही. कुठे कुठे जमिनीत मोठे खड्डे खणून त्यात पावसाचं पाणी साठवलं जातं. मूलतः ही कल्पना शेततळ्यासारखीच. पण खड्डा खणणं यापलीकडे तिथे काहीच केलं जात नाही. परिणामी, पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरेसं पडत नाही.
आदल्या रविवारी पाटोणपाड्याच्या मागच्या बाजूला असणार्‍या जांभूळपाड्यात फिरतानाही असा एक खड्डा मी पाहिला होता. पुरुषभर खोल खड्ड्यात खाली ओंजळभर पाणी होतं. त्यात शेवाळं माजलेलं होतं. त्या खड्ड्याचा, त्यातल्या पाण्याचा आता तिथे फारसा वापर होत नसावा असं दिसलं. कारण खड्ड्यालगतच एक अर्धा इंची पाइपलाइन होती. वर जांभूळपाड्यापर्यंत चढत होती. पाड्यात ५००० लिटरची मोठी टाकी होती. त्यामुळे खड्ड्याचा उपयोग संपला असणार.
पाटोणपाड्यातून या जांभूळपाड्याच्या दिशेने जाताना वाटेत कचरा माजलेला दिसतो. (पाटोणपाडा, रोणाचा पाडा आणि भेंडीपाडा इथे कचर्‍याचं साम्राज्य आहेच. त्या तुलनेत वणीच्या पाड्यात, नारळी पाड्यात आणि दळ्यात विशेष कचरा दिसला नाही.) येऊर हा महापालिकेचाच एक भाग असल्यामुळे इथे कचरा उचलण्यासाठी दररोज घंटागाड्या येणं अपेक्षित आहे; पण त्या इथे येतात आठ-दहा दिवसांतून एकदा. एका बैठकीत इथल्या काही बायकांनी त्याविरोधात जोरदार तक्रार केली. त्यांच्या घराभोवतीच्याच परिसरात हा कचरा साठत असल्यामुळे ‘पार्ट्या करणारे कचरा करून निघून जातात आणि दुसर्‍या दिवशी आम्हाला तो साफ करावा लागतो’ अशी कैफियत त्यांनी मांडली. त्यांच्यापैकीच एकीने असा उपायही सुचवून पाहिला, की किमान मोठ्या कचराकुंड्या तरी बसवल्या जाव्यात, म्हणजे गोळा केलेला कचरा त्यात टाकता येईल; मग आठवड्यातून एकदा महापालिकेने तो उचलला तरी चालेल.
तर, वाटेतला तो कचरा ओलांडत आम्ही पुढे झालो. चार-पाच पायर्‍या नेतील इतका चढ लागला. आणि पुढे एकदम माळरानच दिसलं. मनुष्यवस्तीचा मागमूस नाही. कसला आवाजही नाही. एकदम शांत. एखाद्या गडावर भटकंतीला आल्यासारखं वाटलं. माळरानावर एका ठिकाणी डावीकडे वळलं की जांभूळपाड्याची वाट दिसते. त्या वाटेवर काही पावलं चालत गेलो, तर डावीकडे थोड्या अंतरावर एका झाडाखाली चार माणसं बसलेली दिसली. दुपारी दोन वाजता हे लोक इथे काय करत असतील, हा विचार मनात येईपर्यंत त्यांच्या पुढ्यातल्या बाटल्या दिसल्या. निवांत चाललेलं होतं त्यांचं. त्यांच्यामागे दाट जंगल. पंकजने सांगितलं, “या माळरानावर बिबट्या येणं नेहमीचंच. कदाचित त्यामुळेच त्यांना आपल्या ओल्या पार्टीची वेळ काही तासांनी अलीकडे आणावी लागत असावी!”
जांभूळपाडाही दहा-पाच घरांचाच. पाड्यात वीज, घराघरांवर डिश अँटेना वगैरे सगळं होतं. बहुतेक घरांबाहेर कपडे वाळताना दिसत होते- लहान मुलांचे, मोठ्यांचे; सगळेच आधुनिक, शहरी फॅशनशी जवळीक दाखवणारे. पण आपल्या मनात काही ठोकताळे पक्के असतात, की जंगलात राहणारे आदिवासी म्हणजे ते असे असे दिसणार, त्यांचा पेहराव अमुक असणार, त्यांच्या गरजा किमान असणार, शहरी वातावरणापासून फारकत घेऊनच ते आयुष्य कंठत असणार... येऊरच्या बाबतीत हे ठोकताळे धडाधड कोसळतात. इथल्या आदिवासींना शहरी जीवनाची चांगली ओळख आहे; पण शहरात ते पूर्णतया मिसळून जाऊ शकत नाहीत, कारण आपल्या मुळांपासून विलग होणं त्यांना शक्य नाही... त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला तर कदाचित ते थोडे हातपाय मारू शकतील. त्यासाठी इथे ‘कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट’ (सीसीडीटी), ‘मॅजिक बस’, ‘सेव्ह द चिल्ड्रेन’, ‘क्रायसिस फाउंडेशन’ यांसारख्या काही संस्था कार्यरत आहेत. कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात या संस्थांचा भर आहे तो इथल्या लोकांचं समुपदेशन करणं आणि त्यांच्या मूलभूत गरजा भागवणं यांवर. पर्यावरणपूरक शौचालयं उभारणं, अंतर्भागातल्या पायवाटांवर सोलर दिवे बसवणं, रहिवाशांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिरं आयोजित करणं यांसारखे उपक्रम इथे हाती घेण्यात आले आहेत. या प्रयत्नांचं प्रमाण पुरेसं आहे असा दावा कुणीच करणार नाही, पण प्रयत्न सुरू आहेत ही नोंदण्यासारखी बाब आहे.

***

ठाणेकरांकडून इथल्या आदिवासींची खूप काही अपेक्षा नाही. येऊरला आपलं ‘लाडकं हिलस्टेशन’ मानणार्‍यांनी तिथे भटकताना तिथल्या सुंदर निसर्गापल्याड एक नांदतं, मानवी जग आहे याचं भान ठेवणं अपेक्षित आहे. तिथे पार्ट्या करताना, जोरजोरात गाणीबजावणी करताना आसपासच्या निमूट वस्त्यांमध्ये कुणी तरी आजारी असेल, त्याला त्याचा त्रासही होत असेल इतकं ध्यानात ठेवायचं आहे. ‘येऊर म्हणजे धमाल’ हे समीकरण मनात पक्कं करताना येऊर म्हणजे अजूनही बरंच काही, याचीदेखील नोंद घ्यायची आहे. मीही त्यांच्यातलीच एक! इथून पुढेही ‘येऊर’ म्हटलं की तिथे केलेले नेचर ट्रेल्स आठवून माझे डोळे चमकतीलच, पण त्या भटकंतीदरम्यान दृष्टीआडच्या सृष्टीत राहिलेला आदिवासीही आता मला हटकून आठवेल. तिथल्या ‘फ्लोरा अँड फॉना’ इतकंच तिथे राहणार्‍या आदिवासींमुळेही त्या जंगलाचं वेगळेपण, महत्त्व आहे हे आता माझ्या कायम लक्षात राहील.

**********

(या लेखासाठी ठाण्याच्या समता विचार प्रसारक संस्थेकडून अमूल्य सहकार्य मिळालं.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे लले. तिकडे फिरुन आल्यासारखं वाटलं Happy

मी नेचर ट्रेलला तुझ्याबरोबर एकदा, नुसतीच भटकायला एकदा आणि घोडबंदर रोड साईडने आदिवासी पाड्यांवर सर्वेसाठी एकदा अशी येऊरला गेले आहे. आपल्याला त्या दिवशी जो बाटल्यांचा खच दिसला तसा खच तर नाहीच पण कागद, प्लॅस्टिकचा कचराही आदिवासी पाड्यांवर दिसला नव्हता. झाडांची सुकलेली पानंच काय पडलेली असतील तीच. तू टाकलेल्या फोटोत जे बांबूच्या कामट्यांचं मातीने लिंपलेलं घर आहे ना तशीच किंवा मातीने न लिंपलेलीही घरं होती. पाड्यांची नावं आठवत नाहीत आता. पण त्या पाड्यांवरची मुलं मेन रोडवर भाईंदरपाडा TMC शाळेत येत असत.

जबरी लिहिलं आहे हे सर्व ! मस्त लेख.

येऊरला मी ही जाऊन आलो आहे, पण सावली म्हणते तसं येऊरचं वेगळं रूप दिसलं.

पोखरन नं १ आणि २. लोल. आणि ते पुढं असणारं तळं मग तिथ व्होल्टाज कंपनी. अन अजून पुढे गेले की जंगल सुरू होणार. पाठीमागे जंगलंच जंगल. आताही तसंच आहे का?

पूर्वी आमचे पेट्स होटेल येउरला होते तेव्हा तिथे फार जाणे व्हायचे. एकदा सोडायला एकदा आणायला. एअर फोर्स स्टेशन च्या पुढे एक खेडेगाव लागते. तिथून पुढे श्रद्धा होटेल. व मग एक टेनिस कोर्ट आहे. तिथे श्रीमंती गाड्या व लोक दिसतात. पुढे एक आश्रम आहे व पेट होटेल. एक गौशाला पण आहे. कुत्रे सोडून उदास डोक्याने परत येताना मी नेहमी तिथ्ली वासरे वगैरे बघून आनंदित होत असे. एक हॉटेल व आवाज आल्यामुळे पेट्स होटेल आता तिथून हटले व घोड बंदर रोडला गेले आहे.

एकदा मी परत जाताना शाळेच्या टीचर व त्यांचे सामान ह्यांना लिफ्ट दिली होती. शाळा ची जागा परत घेतली म्हणे कार्पोरेशन ने म्हणून कुठल्या तरी बंगल्यात शाळा भरत होती. त्याम्चे प्रयत्न बघून भरून आले. रस्त्यात माकडे पण दिसतात.

एक चांगला नोंद करणारा लेख इथे मायबोलीवर आणलात.तुम्हाला आणि अनुभव/समता यांना धन्यवाद.असे लेख प्रथम इथे लिहून नंतर इतर ठिकाणी लिहावेत म्हणजे अनुमतीची आवशक्यता राहणार नाही शिवाय ते वाचनासाठी प्रतिक्रिया आणि नवीन माश्रितीसह कायम उपलब्ध राहतात.वर्तमानपत्रे/नियतकालिकांतले लेख रद्दीत जातात तसेच अद्ययावत करण्याची सोय नसते.
मी ट्रेकिंग निमित्ताने फिरतो तेव्हा आदिवासींची गाठ पडते.त्यांचा प्रामाणिकपणा ,स्वच्छतेची आवड ,कष्टाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आदरातिथ्य आपल्याला विचार करायला लावते.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर हाकेच्या अंतरावरचे हे वास्तव मला तरी अज्ञात होते. येऊरची टेकडी म्हणजे एक पिकनिक स्पॉट किंवा श्रीमंत लोकांचे बंगले एवढेच समीकरण डोक्यात होते... ! पुर्वी किल्ल्याचे बुरुज बांधत असताना कुणाचा तरी बळी देत असत, ते वाचताना जसे वाटत असे, तसे काहीसे अपराधी वाटले.

हो, केदार, अजूनही तसंच आहे. फक्त तळ्याच्या भोवताली काँक्रीटची जंगलंही दिसतील आता.

दिनेश, बहुतेकांची हीच गत असते.

Srd, 'अनुभव'साठीच हे आर्टिकल करायचं ठरलं. त्यामुळे तिथेच ते आधी प्रकाशित होणं साहजिक आहे. (नाहीतर मी सुद्धा असं इतकं खोदकाम करायला कधी गेले असते की नाही कोण जाणे!)

सावली, लेखासाठी म्हणून थोडेफार फोटो काढले, तेव्हा तुझी फार आठवण झाली.

खूप सुरेख आढावा घेतला आहेस ललिता. एकदोनदा गेले आहे येऊरला. येऊरचं गोल्डन स्वॉन आणि बाहेरचे हे पाडे ...किती तफावत आहे दोन्हीं जगात ! गाडीने वर जाताना गावकरी लोकं दिसतात चालताना त्यावरुन वस्ती असणार हे माहीत होतं पण इतकं तपशीलात नव्हतं माहीत. तेव्हा कलत्या संध्याकाळी गाडीत सुद्धा वाघाची किंचित धास्ती वाटत असताना बिनधास्त एकट्यादुकट्याने चालत टेकडी चढणारी ही माणसं लक्षात राहिली.
सकाळी सहज उघडला लेख आणि पूर्ण वाचल्याशिवाय राहवलंच नाही. प्रतिक्रिया मात्र द्यायची राहून गेली होती.

ललितादेवी,

येऊरास अनेक वेळा जाणं झालंय, पण हे वेगळंच जग आहे. यथोचित ओळख करून दिल्याबद्दल आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

छान लेख.
नॅशनल पार्क अर्थातच बोरीवलीकडून हे माझे आवडीचे फिरायचे ठिकाण मात्र तेथील वर्दळीपासून चार हात लांब राहत .
त्याच्याच या भागाबद्दल मात्र फक्त ऐकूनच वा गूगल मॅपमध्ये बघूनच माहीत होते, प्रत्यक्ष फोटोही आजच पाहिले.. धन्यवाद

>> इथून पुढेही ‘येऊर’ म्हटलं की तिथे केलेले नेचर ट्रेल्स आठवून माझे डोळे चमकतीलच, पण त्या भटकंतीदरम्यान दृष्टीआडच्या सृष्टीत राहिलेला आदिवासीही आता मला हटकून आठवेल.

अगदी!
आपल्यापासून इतक्या जवळ हे एक निराळंच जग आहे आणि आपल्याला त्याची काहीही माहिती नाही हे जाणवलं! या लेखासाठी अनेक धन्यवाद.

मस्त लेख ललिता !!

इथून पुढेही ‘येऊर’ म्हटलं की तिथे केलेले नेचर ट्रेल्स आठवून माझे डोळे चमकतीलच, पण त्या भटकंतीदरम्यान दृष्टीआडच्या सृष्टीत राहिलेला आदिवासीही आता मला हटकून आठवेल. >>>> Happy

ललिता, अत्यंत हृदयस्पर्शी लेख!! ठाण्या शी माझी काहीच ओळख नाही पण शहराच्या इतक्या जवळ असूनही येऊर च्या पाड्यांमधे राहणार्‍या रहिवाश्यांची परिस्थिती वाचून स्तंभित व्हायला झालंय!!!
घराबाहेर बिबट्यांचं भय तर घरात डिश टीवी.. किती असावा तो विरोधाभास.. तुम्हाला रस्ते,पाणी,वीज ,शिक्षण, मेडिकल सुविधा मिळणार नाहीत , म्हणून मनोरंजनालाच विकास समजा.. किती क्रुवेल जोक आहे हा !!!

दृष्टीआड सृष्टीचं खरोखर हे ज्वलंत उदाहरण आहे!!!
तुझ्याबरोबर यायला आवडेल मला..
,'
आकडे टाकून वीज घेतलेली' म्हंजे काय??? ते यू पी च्या कटिया बाज लोकांसारखे का?? वीज चोरी??

समस्तांस धन्यवाद. Happy

हो, वर्षू, आकडे टाकून घेतलेली वीज म्हणजे विजेची चोरी.

हो, अगो, जंगलात फिरताना धास्ती वाटतेच. 'समता'चे कार्यकर्ते सोबत होते म्हणूनच मी अंतर्गत भागात जाऊ शकले. या लेखाची पूर्वतयारी म्हणून येऊरच्या शाळेतल्या एका बैठकीला गेले होते. बैठक संपेपर्यंत अंधार पडला. त्यादिवशीची ती अंधारातल्या जंगल-रस्त्यावरून खाली येतानाची ५-७ मिनिटं मी कधीही विसरणार नाही. खरंतर साडेसात-आठचीच वेळ होती, पण इतकं मोठं शहर तिथून इतक्या जवळ आहे हे सांगूनही कुणाला खरं वाटू नये असा किर्र काळोख, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अंगावर येणार्‍या झाडांच्या काळ्या आकृत्या!

मस्त लेख.. अंकही वाचला होताच.

तू लेखात लिहिलंयस तसं आपल्या अंगणातलं जंगल. आम्ही सध्या महिन्यातून दोन तीन रविवार तरी सकाळी जातोय येऊरला...पावसामुळे हवा छान आहे त्यामुळे मस्तपैकी ७-८ किमी तरी चालणं होतं. खरंच अगदी वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं. छान हिरवाई पसरलेली आहे सगळीकडे. पण त्या रस्त्याने मोठ्यामोठ्याने गाड्यांचे हॉर्न वाजवत जाणारे जथ्थे पाहिले की राग येतो. माजखोर माणसं... संवर्धन या शब्दाच अर्थ कधी कळणार यांना?

वाह!!! ही नुसती येऊर च्या जंगलांची ओळख किंवा तिथल्या आदिवासी लोकांची कैफियत नाही तर ह्यात तुमचा वैयक्तिक कळवळा अन कमिटमेंट वाक्यवाक्याला दिसते!! तुम्हाला अन ह्या संघटनेला खुप खुप शुभेच्छा त्या पंकज अन शहनाज च सुद्धा कौतुक !!

Pages