सध्या हिंदी चित्रपटाच्या सागरात दोन प्रकारच्या लाटाच जास्त उफाळून येत आहेत. रिमेक आणि चरित्रपट. कारण स्पष्ट आहे. अशीच एक लाट म्हणजे 'दृश्यम'. इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ह्यापूर्वीच्या दृश्यमांत (मल्याळम - द्रिश्यम आणि तमिळ - 'पापनाशम') काम केलं होतं मोहनलाल (मल्याळम) आणि कमल हसन (तमिळ) ह्यांनी. त्यांच्यासमोर हिंदीने उभं केलं आहे 'अजय देवगण'ला. ही तिघांची तुलना अजय देवगणसाठी दुर्दैवी आणि अन्यायकारक होते.
प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक जोडी 'सलीम-जावेद' (सलीम खान आणि जावेद अख्तर) ह्यांनी एकदा एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'आमच्या स्क्रिप्ट्स इतक्या बारकाव्यांसकट लिहिलेल्या असतात की दिग्दर्शकाने फक्त जसं लिहिलंय तसं केलं तरी पुरेसं आहे.' हा खरं तर यशाचा उन्माद होता. पण एका अर्थी खरंसुद्धा होतं. शोले, दीवार, जंजीर, शान, डॉन, मजबूर आणि असे सलीम-जावेदचे अजूनही काही चित्रपट पाहताना ती कथानकं गच्च आवळलेली असल्याचं जाणवतंच. मात्र म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिग्दर्शक दुय्यम ठरत नाही. उत्कृष्ट कथानकांची अनेकदा माती होत असते आणि उत्कृष्ट दिग्दर्शक सामान्य कथानकातूनही असामान्य चित्रपट बनवू शकतोच.
मूळ मल्याळम भाषेतल्या 'द्रिश्यम' चा हिंदी रिमेक 'दृश्यम' बघताना मला सलीम-जावेदचं वरील वक्तव्य आठवलं. गच्च बांधलेलं, वेगवान कथानक ज्यात बारीक-सारीक तपशिलांची बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे, हे 'दृश्यम'चं वैशिष्ट्य. पण चित्रपट हे तर दिग्दर्शकाचं माध्यम मानलं जातं. मग ह्यात निशिकांत कामतांचं योगदान काय ? कदाचित हेच की त्यांनी त्या कथानकाची माती होऊ दिली नाही. मात्र त्याच वेळी, ते वेगळ्या उंचीवर नेलं का ? ह्या प्रश्नाचं उत्तर अप्रिय असू शकतं.
गोव्यात एका 'पोंदोलिम' नावाच्या लहानश्या गावात विजय साळगांवकर (अजय देवगण) पत्नी नंदिनी (श्रिया सरन) आणि दोन मुलींसोबत राहत असतो. त्याचा केबल टीव्हीचा व्यवसाय असतो. सुस्वभावी विजयचे गावांतल्या सगळ्याच लोकांशी चांगले संबंध असतात, अपवाद भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टर गायतोंडे. विजयची एकच वाईट सवय असते. आपल्या केबल टीव्हीच्या ऑफिसात बसून रात्र रात्रभर चित्रपट पाहत बसणे. ह्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो एके रात्री ऑफिसमध्ये टीव्ही पाहत बसलेला असताना, घरी त्याची मोठी मुलगी व पत्नी ह्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडते. साळगावकर कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. ह्या घटनेतून स्वत:च्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विजय एक 'प्लान' बनवतो. तो एक कहाणी बनवतो, जगतो आणि इतरांनाही जगवतो. मात्र तरी पोलीस सहजासहजी पिच्छा सोडणार नसतातच. चुघांचीही चौकश्या, दबाव, मारहाण अशी सगळी ससेहोलपट सुरु होते. विजयचा प्लान आणि त्याने त्याच्या बायको-मुलींना केलेल्या सूचना हे सगळं कुठवर यशस्वी ठरतं ?
विजय कुटुंबाला वाचवतो का ? अश्या सगळ्या उत्कांठांनी नटलेलं नाट्य रंगतदार आहे.
घटना खूप वेगाने घडत जातात आणि लहान-मोठे धक्के देत राहतात. पण तरी काही तरी कमतरता जाणवत राहते. ती म्हणजे प्रमुख कलाकार जरा कमीच पडल्यासारखे वाटतात.
'हैदर'मध्ये एका आव्हानात्मक भूमिकेनंतर तब्बू 'दृश्यम'मध्ये 'आय.जी. मीरा देशमुख' च्या भूमिकेत दिसते. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला साजेशी आक्रमकता आणि कणखरपणा तिच्यात जाणवत नाही. ती पोलीस अधिकारी असली तरी मुलासाठी व्याकुळ झालेली आईसुद्धा आहे, असं म्हणता येईल. पण मग तिच्यातली आईच चित्रपटभर दिसत राहते, 'आय.जी.' दिसत नाही, हेच त्यातून नक्की होतं. तिचा आवाज आणि देहबोली गुळमुळीत वाटते आणि 'तब्बू'साठी चित्रपट पाहत असणाऱ्यांचा तिच्याकडून अपेक्षाभंगच होतो.
तिच्यापेक्षा कमी लांबीची भूमिका असलेल्या रजत कपूरने तिच्या पतीच्या व्यक्तिरेखेला चांगले वठवले आहे. एका दृश्यात जेव्हा तो विजयशी थेट संवाद साधतो तेव्हा एक हळवा बाप आणि खंबीर पती अशी त्याची ओढाताण तो खूप संयतपणे दाखवून देतो. मात्र 'रजत कपूर चांगला अभिनय करतो' ह्यात काही आश्चर्याची गोष्ट नसावीच ! तब्बू आणि तो समोरासमोर असताना काय होतं, हे पाहणं उत्कंठावर्धक होतं आणि लहान-लहान प्रसंगांत तो तिला अगदी सहजपणे पुरून उरला आहे.
आधीच म्हटल्याप्रमाणे 'अजय देवगण'ची तुलना दिग्गजांशी तुलना अपरिहार्यपणे होते. मात्र ते दाक्षिणात्य चित्रपट फार कमी लोकांनी पाहिलेले असावेत, त्यामुळे त्यांच्यासाठी 'विजय साळगावकर' फर्स्ट हॅण्डच आहे. त्याने नावातला एक 'A' कमी केला आहे. भारताचा तेज गोलंदाज उमेश यादवने त्याच्या आडनावात एक 'A' वाढवला आहे. देवगण आणि यादवच्या ह्या 'स्पेल-चेंज'मुळे त्यांच्यात विशेष फरक पडलेला नाही. देवगण आजही 'Director's Actor' आहे.
दिग्दर्शक निशिकांत कामत, जिथे अजय देवगणकडून समाधानकारक कामगिरी करून घेतात तिथे ते इतर पात्रांच्या बाबतीत मात्र थोडेसे कमीच पडतात. दोघी मुली व श्रिया सरनकडूनही काही 'मूल्यवर्धक' कामगिरी करवून घेता आली असती, पण तसं काही होत नाही. वेगवान कथेचा व पटकथेचा तोल ढळणार नाही, इतकीच खबरदारी त्यांनी घेतलेली आहे.
विशाल भारद्वाजच्या संगीताला फारसा वाव नाही. 'कार्बन कॉपी' आणि 'घुटता है दम' ही दोन गाणी लक्षात राहतात. गुलजार साहेबांचे शब्द एरव्हीप्रमाणे काही विशेष जादूभरे वाटत नाहीत, हा अजून एक अपेक्षा भंग.
मूळ कथा जीतू जोसेफ ह्यांची आहे. उपेंद्र शिधये ह्यांनी तिचं पुनर्लेखन केलं आहे. 'दृश्यम' चे खरे स्टार हे दोघं आहेत. जर अख्खा चित्रपट आपण श्वास रोखून पाहिला जाईल, तर तो ह्यांच्यामुळेच. चित्रपट सुरु असताना आपल्याला काही प्रश्न पडतात. थोड्या वेळाने त्या त्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळतात ! 'अमुक एक धागा सुटला', असं वाटत असतानाच अखेरीस सर्व धागे बरोब्बर जुळून येतात. लेखक हा बहुतेक वेळेस 'अनसंग हीरो' ठरत असतो. सलीम-जावेद ह्यांनी चित्रपटांसाठी लेखकाचं महत्व जगाला दाखवून दिलं. पण तरी आजही पडद्यावर दिसणाऱ्या 'दृश्यमा'लाच जास्त महत्व आहे आणि 'अदृश्य' लेखकांची कामगिरी म्हणावी तितकी वाखाणली जात नाही.
एकंदरीत दृश्यम हा 'एकदा पाहावाच' ह्या श्रेणीतला आहे.
जुलै महिना चित्रपट रसिकांसाठी पर्वणी (बाहुबली, बजरंगी, मसान, दृश्यम) ठरला आहे. 'दृश्यम' हा 'जुलै'चा विजयी चौकार म्हणवला जाऊ शकतो.
आता येणारा 'ऑगस्ट' वाढलेल्या अपेक्षांचं ओझं सांभाळतो की त्याची 'तब्बू' होते, ते पाहू !
रेटिंग - * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-drishyam.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०२ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
अनु चे काम केलेली बालकलाकार
अनु चे काम केलेली बालकलाकार >>> लय भारी ची रूक्मिणी
मंजूडी, थँक्स
ramabai ranade madhe pan
ramabai ranade madhe pan hoti...
दृश्यम ची कथा द डिवोशन ओफ
दृश्यम ची कथा द डिवोशन ओफ सस्पेक्ट एक्स ह्या जपानी कादंबरीवर आधारित आहे असे म्हणतात. काही साम्यस्थळे आहेत पण दोन्ही कलाकृती (पुस्तक आणी मूळ मल्याळी चित्रपट) अतिशय उत्तम आहेत.
मी पण पाहिला. आवडला आणि काही
मी पण पाहिला. आवडला आणि काही भाग पटला पण नाही.

अजय आवडतोच त्यामुळे चित्रपट आवडणं हे साहजिक होतं.
वर कुणीतरी लिहिल्याप्रमाणं गायब मुलाचा शोध घेणं या पेक्षा अजय ला त्रास देणं हाच मुख्य उद्देश जाणवतो.
रजत कपूर इतका संयमित दाखवला आहे, आई इतकी सॉलिड(?) पोलिस असून सुद्धा मुलगा असा?
श्रेया सरन अज्जिबात म्हणजे अज्जिबात आवडली नाही. शून्य मार्क तिला
बाकी इतर अनेक प्रश्न पडले मला पण इथे विचारले तर सिनेमाचं भांडं फुटेल.
अवांतर- तब्बू आणि अजय समोरासमोर कोणत्याही दृष्यात दिसले की मला उगिचच ती आत्ता लगेच 'रूक रूक रूक' वर नाच सुरू करेल की काय अशी भिती वाटत होती.
तब्बू आणि अजय समोरासमोर
तब्बू आणि अजय समोरासमोर कोणत्याही दृष्यात दिसले की मला उगिचच ती आत्ता लगेच 'रूक रूक रूक' वर नाच
विजयपथ साळगावकर.
>>>
इतकेच काय, पण 'विजयपथ' मधल्या प्रेमाला जागून दोघांनी मिळून खुनाचा प्लॉट रचल्याचं शेवटी कळतं की काय, असंही वाटत होतं.
मस्त चित्रपट, आवडला. अजय
मस्त चित्रपट, आवडला.
अजय बरोबरच सर्वांनी छान काम केलेय, त्या दगडु परबची भुमिका छोटी असली तरी छान आहे.
तब्बुबाबत वर सर्वांशी सहमत!
इतकेच काय, पण 'विजयपथ' मधल्या
इतकेच काय, पण 'विजयपथ' मधल्या प्रेमाला जागून दोघांनी मिळून खुनाचा प्लॉट
क्या बात !
रचल्याचं शेवटी कळतं की काय,
असंही वाटल >>>
मला उगिचच ती आत्ता लगेच 'रूक
मला उगिचच ती आत्ता लगेच 'रूक रूक रूक' वर नाच सुरू करेल की काय अशी भिती वाटत होती. >>
:हीही:
काहीही हा दक्षिणा .
काहीही हा दक्षिणा .
>> बाकी इतर अनेक प्रश्न पडले
>> बाकी इतर अनेक प्रश्न पडले मला पण इथे विचारले तर सिनेमाचं भांडं फुटेल. <<
तसं आता फुटायचं काही बाकी राहिलेलंच नाही आणि राहिलं असलं, तरी काय फरक पडतो ? झाला की त्याचा धंदा करून! दुसरा आठवडा आहे..
तेव्हा फोडा भांडी, हरकत नसावी आता.
बाय द वे, तब्बु इतकी
बाय द वे, तब्बु इतकी कर्तव्यदक्ष ऑफिसर असते, तर मग शेवटी आपला मुलगा इतका दिवटा आहे हे कळूनही नोकरी ला राम राम करून फॉरेन मध्ये सेटल व्हायाला जाण्यात काय हशील!
उलट इतर मुलींच्या बाबतीत असा किस्सा परत घडू नये म्हणून काही उपाययोजना कराव्यात की. समाजाप्रती काही कर्तव्य नाही का एक पोलिस ऑफिसर म्हणून? :रागः
असल्या हलकट मुलाला झाले ते शासन योग्यच असा स्टॅन्ड घेता आला असता की!
तब्बु इतकी कर्तव्यदक्ष ऑफिसर
तब्बु इतकी कर्तव्यदक्ष ऑफिसर असते
>>>
असं कुठं दाखवलं आहे? कुठंच नाही!
असं कुठं दाखवलं आहे?
असं कुठं दाखवलं आहे? कुठंच
नाही!>>> काय हे साजिरा ?? त्या विजयपथच्या नादात तब्बूचा एंट्रीवाला प्रसंग विसरलास का ?
असल्या हलकट मुलाला झाले ते
असल्या हलकट मुलाला झाले ते शासन योग्यच असा स्टॅन्ड घेता आला असता की! >> मदर इंडिया बघून बघून बिघडलीस बरं
अवघड आहे असा स्टँड घेणे.
मूळ सिनेमा पाहिला त्यात आईचे मुलाबद्दलचे धोरण लक्षात येत नाही i.e. माझा मुलगा मी घडवला असा अहंकार असेल तर हे स्वतःचे अपयश!! पचवणे, शासन योग्यच असे विचार होणे कठीण आहे. मुलगा लाडावला एवढेच ती नटी दाखवते. मुलाबद्द्ल इतके अतीव प्रेम असेल तरीही असा स्टँड घेणे अवघड. माझा मुलगा आता प्रौढ व्यक्ती (अॅडल्ट) होणार आहे व त्याच्या जडण घडणीतील मी एक भाग होते असा समतोल विचार असेल तर तू म्हणतेस तसा स्टँड घेता आला असता. पण इतके समतोल विचार असते तर कदाचित मूल बिघडले ही नसते.
एखाद्याच्या सुंदर कामाकरता
एखाद्याच्या सुंदर कामाकरता एखादा चित्रपट पहावा वाटतो, त्याच्या बरोबर उलटं माझं आता तब्बूबद्दल होतंय. जवळपास सगळ्यांनीच तब्बूचं काम कसं आणि किती वाईट झालंय हे लिहिलंय. एवढं काय वाईट झालंय हे पाहण्याकरता आता पिक्चरच पहावा की काय असं वाटतंय.
मो, सगळ्यांनी नाही म्हंटलय.
मो, सगळ्यांनी नाही म्हंटलय. काहींना ती फक्त आईच दिसली त्या रोल मधे, काहींना फक्त आयजी, काहींना दोन्ही चांगले केले ("एक आई व एक पोलिस ऑफिसर यातील द्वंद्व... " ई.ई.) तर काहींना काहीच केले नाही असे वाटले. तू यात कोठे बसतेस ते चेक करण्याकरता पाहा. मात्र तिची एण्ट्री चुकवू नकोस
तिची एण्ट्री ही चित्रपटाच्या
तिची एण्ट्री ही चित्रपटाच्या टोन ला विसंगत आहे. भिंतीपलिकडून स्लो मोशन मधे चालत येणे, मागे ढॅण ढॅण म्युझिक वगैरे >> ह्याकरता का? जास्त लक्ष देऊन पाहीन आता :).
आता परत लोकांच्या कॉमेंट्स चाळल्या. काम वाईट पेक्षा तिचा रोलच नीट डिफाईन केला गेला नाहीये की काय, का तिने न्याय दिला नाहीये ह्याबद्दल दुमत वाटलं. असो. शिणुमा पाहून माझं मत लिहिते.
मो, मला तब्बूचं काम आवडलं
मो, मला तब्बूचं काम आवडलं होतं. इथे वाचूनच मला समजलं की लोकांना तब्बूचं काम बंडल वाटलंय!
मला कमल हसनचा चित्रपट आता पहायचा आहे. देवगणच्या लिमिटेड एक्स्प्रेशन देणा-या चेह-याचा सिनेमा इतका आवडू शकतो तर कमल ह्सनने काय कमाल केली असेल!
दक्षे, सॉरी हं!
तब्बू सार्यांना आवडण्याच्या
तब्बू सार्यांना आवडण्याच्या कॅटेगरीतली नाही, हे मी बघून ठेवलंय. शिवाय जिच्या करियरमधला पहिला हिरो ऋषीकपूर असतो, ती पुढे सार्यांनाच आवडू शकत नाही, हेही बघून ठेवलंय. असो. द्रूश्यमम्ध्ये तब्बू ने अर्थातच (नेहेमीप्रमाणे) चांगलं काम केलं आहे.
अवांतर- तब्बू आणि अजय
अवांतर- तब्बू आणि अजय समोरासमोर कोणत्याही दृष्यात दिसले की मला उगिचच ती आत्ता लगेच 'रूक रूक रूक' वर नाच सुरू करेल की काय अशी भिती वाटत होती. >> अगदी अगदी..मलाही असच वाटत होते. स्पेशली शेवटच्या सीन मधे
तब्बु मला तर चांगली
तब्बु मला तर चांगली वाटली..
कर्त्व्यदक्ष ऑफिसर असावी पण स्वतःच्याच मुलाबाबत काहितरी झालं असल्याने सगळे नीयम बाजुला ठेउन उद्विग्न आई होते आणि स्वतःच्या पोझिशन चा फायदा घेउन देवगण च्या कुटुंबाला हवा तसा त्रास देते असं वाटल..
आणि त्यामुळेच ती देवगण कडुन माहिती मिळ्वायला काहिही करु शकते अशी भिती वाटत राहते अगदी शेवट्च्या सीन मध्ये देवगण दोघाना खरं सांगतो आणि ती रडते तेव्हाही..
मला कमल हसनचा चित्रपट आता
मला कमल हसनचा चित्रपट आता पहायचा आहे. << नक्की पहा. कमल हासनने जे केलंय त्याला मू़ळ चित्रपटाचं "एन्हान्समेंट" म्हणतात रिमेक नाही असा एक ट्वीटर वाचला होता.
पूनम इट्स ओके अजय ला
पूनम
इट्स ओके
अजय ला लिमिट्स आहेत हे नक्कीच. माझं उगिच त्याच्यावर अवास्तव प्रेम आहे झालं 
पण कमलहासनच्या चित्रपटाची
पण कमलहासनच्या चित्रपटाची भाषा कळत नसेल तर काय करावे? आता भाषा शिका सांगु नका.
आवडला , , एकदा पहायला छान आहे
आवडला , , एकदा पहायला छान आहे :).
कन्स्पेट छान आहे, त्यात गाणी टाकायचा मोह आणि तब्बु नसती तर अजुन आवडला असता !
छोट्या रोल्स मधले अॅक्टर्स मस्तं, त्यात इन्स्पेक्टर गायतोंडे , टीपी मधला दगडु सही !
देवगण बरा वाटलाय पण असे रोल्स पाहीले कि जुना अमिताभ असता तर असं फार वाटतं !
मागे वन्स अपॉन अ टाइम च्या अजय देवगणचं कॅरॅक्टर पाहून फारेन्ड नी आठवण काढली बच्चन ची , लक्की अजय देवगण .. फार कुवत नसताना देखील असे रोल त्याला मिळतात अता !
मी काल पाहिला. मला आवडला
मी काल पाहिला. मला आवडला सिनेमा. अॅक्चुअली सुरुवात फार संथ वाटली, ते गाव, त्याचे कुटूंब इतर कॅरेक्टर "बिल्डिंग" बघून टिपिकल साउथी सिनेमा होतोय की काय अशी भिती वाटत होती पण नंतर मस्त ग्रिप घेतो सिनेमा. आणि लॉजिकल लूपहोल्स फारसे नाहीत. फक्त मला ते तबू अन रजत ची शेवटच्या सीन मधली भेट अनावश्यक वाटली. किंवा काही वेगळ्या प्रकारे घ्यायला हवा होता तो सीन. जसे की त्या दोघांना एक क्लोजर हवे म्हणून अजय अगदी सटल प्रकारे तो क्लू देतो की तुमचा मुलगा मेला आहे त्याची वाट बघू नका. असे काहीतरी.
यात अजय देवगण चक्क चांगला वाटला, रोल मधे पर्फेक्ट शोभलाय. इथे कुणी गुड लुकिंग पॉलिश्ड हिरो नाही घेतलाय तेच बरे. तब्बू एन्ट्रीपासून जे रडक्या आवाजात दुर्मुखलेल्या चेहर्याने डायलॉग बोलते ते शेवटापर्यन्त! आवडली नाही अजिबात. कमालीचा अंडरप्ले म्हणजे बेष्ट अॅक्टिंग असे वाटते की काय हिला ?? असा प्रश्न पडला मला. बाकी सपोर्टिंग अॅक्टर्स छान. ती अजयची बायको सोडून. महा डम्ब आणि अजयच्या मनाने फार लहान वाटते.
पण एकूण आवडला. शेवटपर्यन्त इन्टरेस्ट टिकून रहातो .
अनावश्यक वाटली. किंवा काही
अनावश्यक वाटली. किंवा काही वेगळ्या प्रकारे घ्यायला हवा होता तो सीन. जसे की त्या दोघांना एक क्लोजर हवे म्हणून अजय अगदी सटल प्रकारे तो क्लू देतो की तुमचा मुलगा मेला आहे त्याची वाट बघू नका. असे काहीतरी.
<<
+१ :).
असं कुठं दाखवलं आहे?
असं कुठं दाखवलं आहे? कुठंच
नाही!>>> काय हे साजिरा ?? त्या विजयपथच्या नादात तब्बूचा एंट्रीवाला प्रसंग विसरलास का ? >>
ती कर्तव्यदक्ष असण्यापेक्षा तिच्याकडे पोलिसी खाका असतो. पहिल्या एंट्रिमध्ये एक्सिट घेताना ती काय बोलते ते आठवा...
मला तरी पिक्चरचे लिंन्कस जुळलेले वाटले.
तब्बु मठ्ठ दिसते पण रजत
तब्बु मठ्ठ दिसते पण रजत कपुरनी चांगलं केलय काम, कमी डॉयलॉग्ज असून सुध्दा !
तब्बुची एन्ट्री म्हणजे
तब्बुची एन्ट्री म्हणजे कॅरेक्टर एस्टॅब्लिश करण्यासाठी लावलेल ठिगळ वाटल.
बाकी चित्रपट भारी. सर्वात भारी कथा.
श्रिया चे हिंदी आणी लाडीक टोन खटकत होता.
मुलींनी सुद्धा भारी अॅक्टिन्ग केली आहे.
सपोर्टिन्ग सगळेच भारी.
गायतोन्डे अस्सल पोलिसवाला वाटला.
Pages