'जुलै'चा विजयी चौकार (Movie Review - Drishyam)

Submitted by रसप on 3 August, 2015 - 00:33

सध्या हिंदी चित्रपटाच्या सागरात दोन प्रकारच्या लाटाच जास्त उफाळून येत आहेत. रिमेक आणि चरित्रपट. कारण स्पष्ट आहे. अशीच एक लाट म्हणजे 'दृश्यम'. इथला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ह्यापूर्वीच्या दृश्यमांत (मल्याळम - द्रिश्यम आणि तमिळ - 'पापनाशम') काम केलं होतं मोहनलाल (मल्याळम) आणि कमल हसन (तमिळ) ह्यांनी. त्यांच्यासमोर हिंदीने उभं केलं आहे 'अजय देवगण'ला. ही तिघांची तुलना अजय देवगणसाठी दुर्दैवी आणि अन्यायकारक होते.

प्रसिद्ध पटकथा-संवाद लेखक जोडी 'सलीम-जावेद' (सलीम खान आणि जावेद अख्तर) ह्यांनी एकदा एका मुलाखतीत म्हटलं होतं की, 'आमच्या स्क्रिप्ट्स इतक्या बारकाव्यांसकट लिहिलेल्या असतात की दिग्दर्शकाने फक्त जसं लिहिलंय तसं केलं तरी पुरेसं आहे.' हा खरं तर यशाचा उन्माद होता. पण एका अर्थी खरंसुद्धा होतं. शोले, दीवार, जंजीर, शान, डॉन, मजबूर आणि असे सलीम-जावेदचे अजूनही काही चित्रपट पाहताना ती कथानकं गच्च आवळलेली असल्याचं जाणवतंच. मात्र म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिग्दर्शक दुय्यम ठरत नाही. उत्कृष्ट कथानकांची अनेकदा माती होत असते आणि उत्कृष्ट दिग्दर्शक सामान्य कथानकातूनही असामान्य चित्रपट बनवू शकतोच.

मूळ मल्याळम भाषेतल्या 'द्रिश्यम' चा हिंदी रिमेक 'दृश्यम' बघताना मला सलीम-जावेदचं वरील वक्तव्य आठवलं. गच्च बांधलेलं, वेगवान कथानक ज्यात बारीक-सारीक तपशिलांची बऱ्यापैकी काळजी घेतलेली आहे, हे 'दृश्यम'चं वैशिष्ट्य. पण चित्रपट हे तर दिग्दर्शकाचं माध्यम मानलं जातं. मग ह्यात निशिकांत कामतांचं योगदान काय ? कदाचित हेच की त्यांनी त्या कथानकाची माती होऊ दिली नाही. मात्र त्याच वेळी, ते वेगळ्या उंचीवर नेलं का ? ह्या प्रश्नाचं उत्तर अप्रिय असू शकतं.

गोव्यात एका 'पोंदोलिम' नावाच्या लहानश्या गावात विजय साळगांवकर (अजय देवगण) पत्नी नंदिनी (श्रिया सरन) आणि दोन मुलींसोबत राहत असतो. त्याचा केबल टीव्हीचा व्यवसाय असतो. सुस्वभावी विजयचे गावांतल्या सगळ्याच लोकांशी चांगले संबंध असतात, अपवाद भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टर गायतोंडे. विजयची एकच वाईट सवय असते. आपल्या केबल टीव्हीच्या ऑफिसात बसून रात्र रात्रभर चित्रपट पाहत बसणे. ह्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो एके रात्री ऑफिसमध्ये टीव्ही पाहत बसलेला असताना, घरी त्याची मोठी मुलगी व पत्नी ह्यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडते. साळगावकर कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं. ह्या घटनेतून स्वत:च्या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यासाठी विजय एक 'प्लान' बनवतो. तो एक कहाणी बनवतो, जगतो आणि इतरांनाही जगवतो. मात्र तरी पोलीस सहजासहजी पिच्छा सोडणार नसतातच. चुघांचीही चौकश्या, दबाव, मारहाण अशी सगळी ससेहोलपट सुरु होते. विजयचा प्लान आणि त्याने त्याच्या बायको-मुलींना केलेल्या सूचना हे सगळं कुठवर यशस्वी ठरतं ?
विजय कुटुंबाला वाचवतो का ? अश्या सगळ्या उत्कांठांनी नटलेलं नाट्य रंगतदार आहे.
घटना खूप वेगाने घडत जातात आणि लहान-मोठे धक्के देत राहतात. पण तरी काही तरी कमतरता जाणवत राहते. ती म्हणजे प्रमुख कलाकार जरा कमीच पडल्यासारखे वाटतात.

'हैदर'मध्ये एका आव्हानात्मक भूमिकेनंतर तब्बू 'दृश्यम'मध्ये 'आय.जी. मीरा देशमुख' च्या भूमिकेत दिसते. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याला साजेशी आक्रमकता आणि कणखरपणा तिच्यात जाणवत नाही. ती पोलीस अधिकारी असली तरी मुलासाठी व्याकुळ झालेली आईसुद्धा आहे, असं म्हणता येईल. पण मग तिच्यातली आईच चित्रपटभर दिसत राहते, 'आय.जी.' दिसत नाही, हेच त्यातून नक्की होतं. तिचा आवाज आणि देहबोली गुळमुळीत वाटते आणि 'तब्बू'साठी चित्रपट पाहत असणाऱ्यांचा तिच्याकडून अपेक्षाभंगच होतो.

तिच्यापेक्षा कमी लांबीची भूमिका असलेल्या रजत कपूरने तिच्या पतीच्या व्यक्तिरेखेला चांगले वठवले आहे. एका दृश्यात जेव्हा तो विजयशी थेट संवाद साधतो तेव्हा एक हळवा बाप आणि खंबीर पती अशी त्याची ओढाताण तो खूप संयतपणे दाखवून देतो. मात्र 'रजत कपूर चांगला अभिनय करतो' ह्यात काही आश्चर्याची गोष्ट नसावीच ! तब्बू आणि तो समोरासमोर असताना काय होतं, हे पाहणं उत्कंठावर्धक होतं आणि लहान-लहान प्रसंगांत तो तिला अगदी सहजपणे पुरून उरला आहे.

आधीच म्हटल्याप्रमाणे 'अजय देवगण'ची तुलना दिग्गजांशी तुलना अपरिहार्यपणे होते. मात्र ते दाक्षिणात्य चित्रपट फार कमी लोकांनी पाहिलेले असावेत, त्यामुळे त्यांच्यासाठी 'विजय साळगावकर' फर्स्ट हॅण्डच आहे. त्याने नावातला एक 'A' कमी केला आहे. भारताचा तेज गोलंदाज उमेश यादवने त्याच्या आडनावात एक 'A' वाढवला आहे. देवगण आणि यादवच्या ह्या 'स्पेल-चेंज'मुळे त्यांच्यात विशेष फरक पडलेला नाही. देवगण आजही 'Director's Actor' आहे.

दिग्दर्शक निशिकांत कामत, जिथे अजय देवगणकडून समाधानकारक कामगिरी करून घेतात तिथे ते इतर पात्रांच्या बाबतीत मात्र थोडेसे कमीच पडतात. दोघी मुली व श्रिया सरनकडूनही काही 'मूल्यवर्धक' कामगिरी करवून घेता आली असती, पण तसं काही होत नाही. वेगवान कथेचा व पटकथेचा तोल ढळणार नाही, इतकीच खबरदारी त्यांनी घेतलेली आहे.

विशाल भारद्वाजच्या संगीताला फारसा वाव नाही. 'कार्बन कॉपी' आणि 'घुटता है दम' ही दोन गाणी लक्षात राहतात. गुलजार साहेबांचे शब्द एरव्हीप्रमाणे काही विशेष जादूभरे वाटत नाहीत, हा अजून एक अपेक्षा भंग.

मूळ कथा जीतू जोसेफ ह्यांची आहे. उपेंद्र शिधये ह्यांनी तिचं पुनर्लेखन केलं आहे. 'दृश्यम' चे खरे स्टार हे दोघं आहेत. जर अख्खा चित्रपट आपण श्वास रोखून पाहिला जाईल, तर तो ह्यांच्यामुळेच. चित्रपट सुरु असताना आपल्याला काही प्रश्न पडतात. थोड्या वेळाने त्या त्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळतात ! 'अमुक एक धागा सुटला', असं वाटत असतानाच अखेरीस सर्व धागे बरोब्बर जुळून येतात. लेखक हा बहुतेक वेळेस 'अनसंग हीरो' ठरत असतो. सलीम-जावेद ह्यांनी चित्रपटांसाठी लेखकाचं महत्व जगाला दाखवून दिलं. पण तरी आजही पडद्यावर दिसणाऱ्या 'दृश्यमा'लाच जास्त महत्व आहे आणि 'अदृश्य' लेखकांची कामगिरी म्हणावी तितकी वाखाणली जात नाही.

एकंदरीत दृश्यम हा 'एकदा पाहावाच' ह्या श्रेणीतला आहे.
जुलै महिना चित्रपट रसिकांसाठी पर्वणी (बाहुबली, बजरंगी, मसान, दृश्यम) ठरला आहे. 'दृश्यम' हा 'जुलै'चा विजयी चौकार म्हणवला जाऊ शकतो.
आता येणारा 'ऑगस्ट' वाढलेल्या अपेक्षांचं ओझं सांभाळतो की त्याची 'तब्बू' होते, ते पाहू !

रेटिंग - * * *
- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/08/movie-review-drishyam.html

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज ०२ ऑगस्ट २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-
103445359.JPG

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायतोंडे बद्दल परिक्षणात एक शब्द नसावा आश्चर्य वाटले. बर्‍याच गोष्टी गंडलेल्या आहे. उदा. जेव्हा साळगावकरावर संशय आहे आणि गायब होऊन एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले अश्यावेळी त्याच्या घराची तपासणी का केली नाही ? घराभोवती इतकी जागा आहे तर त्या जागी श्वानपथकाने शोध का घेतला नाही? पोलिस प्रथम तपासणी करत असताना संशयित व्यक्तीच्या घराची आधी झडती घेतात. या चित्रपटात तसे काही दाखवले नाही. जिथे ती घटना होते तिथे देखील पोलिसांपैकी कोणीच पोहचत नाही? साळगावकराला नुसते टॉर्चर करणे यावरच पोलिसांचा फोकस दाखवला आहे. आणि सर्वात मोठी चुक जेव्हा फोन बदलला आहे हे आयपी अ‍ॅड्रेसवरून कळते तर तो फोन कुठून घेतला गेला वगैरे साधी चौकशी देखील करताना दाखवले नाही? असे कसे शक्य आहे. पोलिस इतके बावळट असतात का? एक वेळ मान्य केले साळगावकर सगळे सापळे बनवत जातो त्यात मीरा सापडत जाते. पण जो गायब झाला त्याच्या सभोवतालच्या गोष्टींचा शोध घेणे हे बेसिक पण पोलिस करत नाही हे काही केल्या पटत नाही.

चित्रपट आवडला पण काही गोष्टी अजिबात पटल्या नाही.

>> पोलिस प्रथम तपासणी करत असताना संशयित व्यक्तीच्या घराची आधी झडती घेतात. <<

प्रथम तपासणी ?
केसच उभी राहत नसते तर प्रथम तपासणी कशी करणार ? म्हणून तर त्यांना उचलून आणल्यावर इतकं पब्लिक गोळा होतं ! कुठलाही प्राथमिक पुरावा हाती नसताना अश्याप्रकारे झडती नाही घेऊ शकत पोलीस. उचलून आणणे किंवा उचलून दुसऱ्या कुठल्या जागी नेणे, हे एक वेळ मॅनेजेबल असू शकते कारण अशी जागा स्वत: पोलिसांनी निवडलेली असते. इतर कुठलीही जागा 'रिग्ड' असल्यास बेक्कार फसण्याची आणि डाव अंगावर उलटण्याची शक्यता नव्हे, गॅरण्टी असते.

कुठलाही प्राथमिक पुरावा हाती नसताना अश्याप्रकारे झडती नाही घेऊ शकत पोलीस. उचलून आणणे किंवा उचलून दुसऱ्या कुठल्या जागी नेणे, हे एक वेळ मॅनेजेबल असू शकते कारण अशी जागा स्वत: पोलिसांनी निवडलेली असते. इतर कुठलीही जागा 'रिग्ड' असल्यास बेक्कार फसण्याची आणि डाव अंगावर उलटण्याची शक्यता नव्हे, गॅरण्टी असते>>
एकतर इन्स्पेक्टरने स्वतः गाडी घेउन जाता पाहिलेले असते, दुसरे आदल्या रात्री मुलाचा मोबाईल घराजवळचे लोकेशन दाखवतो, या दोन गोष्टी तपासणी घेण्यास पुरेश्या ठरतात. सर्च वॉरंट या दोन गोष्टींवर सहज मिळते.
दुसरे म्हणजे जेव्हा त्याचा डाव लक्षात येतो तेव्हा देखील घराची तपासणी करत नाही उलट टॉर्चर करणे यावर भर दिला जातो.

केसच उभी राहत नसते तर प्रथम तपासणी कशी करणार ? >> मुलगा गायब आहे हे कळायला १ आठवडा उलटून जातो अर्थात केस उभी केलीच असणार. फक्त त्या केसचा सुगावा प्रसारमाध्यमांना लागू नये इतकी काळजी घ्या असे स्वतः मीरा सांगते

मला आवडला सिनेमा. तब्बु, पोलिसापेक्षा आईच जास्त वाटते. श्रिया मिसेस 'साळागावकर' म्हणून शोभत नाही, पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर कथा वेगवान ! इन्स्पेक्टर गाय्तोंडे छान.

कालच बघितला .
शेवटी शेवटी उत्सुक्ता वाढत जाते पण काहीतरी जबरदस्त शह-काटशह बघायला मिळणार असं वाटत असताना निराशा होते .
आपल्या घराकडे सुरुवातीला लक्श न देता सिनेमात गुन्तलेला ,मुलींच्या छोट्या छोट्या मागण्या पूर्ण करताना आढेवेढे घेणारा विजय अचानक मेरी फॅमिली , मेरी फॅमिली करू लागतो ते तितकस पटलं नाही.संकटात कुटुम्ब एकत्र येत हे खर असलं तरीही पटत नाही.

आपल्या घराकडे सुरुवातीला लक्श न देता सिनेमात गुन्तलेला > +१ घरी बायको मुलगी रात्री एकट्या असून सुध्दा हा ऑफिस मधे सरळ फोन बाजुला काढून सिनेमा बघत बसतो. घरी कधी एमर्जन्सी आली तर? इतके बेजवाबदार कोणीही नसते.

बघितला . अतिशयच आवडला.
कमल हसननी काम केले होते तो पापनाशम बघायची इच्छा झाली.
कुठे मिळेल का लिंक ?

घरी बायको मुलगी रात्री एकट्या असून सुध्दा हा ऑफिस मधे सरळ फोन बाजुला काढून सिनेमा बघत बसतो. घरी कधी एमर्जन्सी आली तर? >> +1

गायतोन्डे बद्दल एकही शब्द नाही हे खटकले, त्याचा वावर प्र्चन्ड सहज आहे, सन्वाद फेकही उत्तम,गोव्याच्या आसपास च चित्रिकरण आहे हे नुसत सन्वादावर चाललय तस एखाद चित्रिकरण कुठेही नाही...
कथा शेवटापर्यत खिळवुन ठेवते पण वाव मोमेन्ट कमी पडलेत..

तब्बुची आतापर्यत मी बघतलेली सगळ्यात वाईट भुमिका... पोलिस इन्सेप्टर म्हणून सुधा ती शोभत नाही, आय-जी वैगरे तर राहुच द्या....
तिच्या जागी राणी सुट झाली असती कदाचित.. माधुरीने ही आपल्या एज आणी कॅलिबर नुसार भुमिका निवडल्यास या भुमिका तिला सुट होतिल पण ती डान्सिन्ग दिवा होण्यातच मश्गुल दिसतेय.

मी ही पाहिला. मस्त आहे. गायतोंडे चे काम जबरी. अजय देवगण चे ही. पूर्णपणे रोल मधे राहिला आहे. तो प्रभू चे काम केलेला अभिनेताही मस्त.

तबू च्या रोल मधे एक सतत जाणवले म्हणजे ती हे सगळे इव्हेस्टिगेशन तिसर्‍याच कोणाबद्दल करत आहे असे वाटते. स्वतःच्या मुलाबद्दल चालू आहे हे फक्त एक दोनदाच जाणवले. तिची एण्ट्री ही चित्रपटाच्या टोन ला विसंगत आहे. भिंतीपलिकडून स्लो मोशन मधे चालत येणे, मागे ढॅण ढॅण म्युझिक वगैरे Happy

तबू च्या रोल मधे एक सतत जाणवले म्हणजे ती हे सगळे इव्हेस्टिगेशन तिसर्‍याच कोणाबद्दल करत आहे असे वाटते. >>> +1

घरी बायको मुलगी रात्री एकट्या असून सुध्दा हा ऑफिस मधे सरळ फोन बाजुला काढून सिनेमा बघत बसतो. घरी कधी एमर्जन्सी आली तर? >> gharee tyaa tighee asataat mag ekaTyaa kashaa Wink

फा +१. प्राजक्ता म्हणते तशी राणी चालली असती कदाचित आय.जी. च्या रोलकरता. स्पेसिफिकली तब्बू ला घेण्यामागचं लॉजिक कळलं नाही.

प्रभू चे काम केलेला अभिनेताही मस्त >>> प्रसन्न केतकर. त्याने असंभव मधे रमाकांत खोताचं काम केलं होतं तेव्हापासून उगाचच लक्षात राहिलाय तो Happy

मला अजून एक प्रश्न आहे. तो मागच्या पोस्ट मधे विचारायचा राहिला. शेवटच्या शॉटमधे अजय हजेरी कशाकरता लावून जात असतो? तो तर निर्दोष सुटलेला असतो ना?

दृश्यम पाहिला. आवडला.

आवडलेल्या गोष्टी -

१) चित्रपट वेगवान आहे. त्यामुळे अंदाज येत असूनही कंटाळवाणा होत नाही. याच श्रेय पटकथा लिहिण्यार्याना
२) गायतोंडेच काम केलेल्या कमलेश सावंतांना पैकीच्या पै़की मार्क्स .
३) अजय देवगणनेही छान काम केलेय.
४) गोव्याच चित्रिकरण सुंदर झालेय.

खटकलेल्या गोष्टी -

१) अनेकांनी लिहिल्याप्रमाणेच तब्बू आयजीच्या रोल मध्ये फिट वाटत नाही. थकलेली वाटते.
२) चित्रपटात फ्लॉज आहेत. म्हणजे पोलीस इतक्या सहजा सहजी हार मानतिल अस वाटत नाही. संशयित आरोपी असूनही त्याच्या घराची झडती का घेतली जात नाही ?
३) चित्रपट बघण्यासाठी रात्र रात्र घराबाहेर असणही खटकल .

विजय साळगावकर साधारण चाळीशीच्या आतबाहेर असावा. मिड-लाईफ क्रायसिस म्हणजे अगदी टोकाचा कंटाळा येऊन संसारात अजिबात मन न रमणं- इतकं आणि इतकंच नसावं. त्याच्या अनेक शेड्स असतील. संसार बर्‍यापैकी सेटल अवस्थेत आहे, आवडतोय आणि बायको मुलांवर प्रेमही आहे, पण आता इतक्या वर्षाचं रूटीन नको वाटतं. थोडी वेगळी जागा, वेगळी अ‍ॅक्टिव्हिटी हवी- असंही असू शकतं. रात्र रात्र सिनेमे बघणे- याचं हे जस्टिफिकेशन असू शकेल.

दृश्यम मधला ट्रॅप दहावी पासही न झालेल्या विजय ने रचणे याला तसंच जबरदस्त पाया आणि मोटिव्ह हवं होतं ना. कुटुंबावर गाढ प्रेम असणं- एवढंच त्या फ्लॉलेस ट्रॅपसाठी पुरेसं नाही. त्याच्या चित्रपट बघण्याच्या जबरदस्त वेडापायी ते तो करू शकला. चित्रपट बघण्याचं एवढं जबरी वेड असलेले लोक गर्दीमध्ये किंवा घरी इतरांसोबत किंवा ब्रेक्स खपवून घेत टीव्हीवर सिनेमे बघू शकत नाहीत. तसे बघितलेले सिनेमे त्यांना चक्क 'समजत नाहीत'!

इतकं सोपं जस्टिफाय करून टाकलं मी ते..

हे सगळे इव्हेस्टिगेशन तिसर्‍याच कोणाबद्दल करत आहे असे वाटते. स्वतःच्या मुलाबद्दल चालू आहे हे फक्त एक दोनदाच
>>
याच्या एक्झॅक्टली उलट अनेक लोक म्हणत आहेत. (की ती सतत फक्त एक 'माँ' वाटते आहे.. आयजी नव्हे)

'देखनेका नजरिया'ला देखील अनेक हैसियती असाव्यात बहुतेक. Proud

चित्रपट बघण्याचं एवढं जबरी वेड असलेले लोक गर्दीमध्ये किंवा घरी इतरांसोबत किंवा
ब्रेक्स खपवून घेत टीव्हीवर सिनेमे बघू शकत नाहीत. तसे बघितलेले सिनेमे त्यांना चक्क 'समजत नाहीत'!>> अरे आपल्याच घरी डीवीडी लावून बघता आला असता की सिनेमा. घर तर मोठ दाखवल आहे त्याच . Wink

साजिरा + १.
मलाही असले प्रश्न पडलेच नाहीत.
तब्बूबद्दलही फारेंडाला +१. ती कधीच काळजीत पडलेली वगैरे दिसली नाहीये.

अरे तो केबल ऑपरेटर दाखवलाय ना? मग तो रात्रभर स्वतःच्या केबलवर चित्रपट लावुन स्वतःही ते बघत बसत असेल.

मी ह्या चित्रपटाबद्दल विकीवर वाचत असताना एक गंमतीशीर बातमी त्यात वाचली. ह्याची कथा मुळ जपानी आहे. तिचे हक्क एकता कपुरने विकत घेतले आणि साऊथ इंडियन चित्रपटाच्या निर्मात्याला कथाचोरीबद्दल नोटिस पाठवुन दिली . त्यानेही लगोलग आपल्या कथेचा जपानी कथेशी काहीही संबंध नाही हे उत्तर दिले. मुळ जपानी कथेतरी पात्ररचना वेगळी आहे आणि त्यात हे प्लॉटींग करणे ज्याच्या डोक्यातुन आले तो माणुस जिनीयस असल्याचे दाखवलेय. बाकी कथा सेम टू सेम. त्या कथेचे भारतीयकरण करताना एकता आणि जितुने अगदी सेम टू सेम फॅमिली आणि इतर पात्रे रंगवली. त्या जिनियसच्या जागी यांनी केबल ऑपरेटर उभा केला आणि तो चित्रपटांमधुन आपले प्लॉट्स घेतो हे दाखवले. आणि तरीही ते दोघे आमच्या कथा अगदी वेगळ्या आहेत हे म्हणताहेत. आता हे वेगळेपण फक्त काय प्लॉटींग केले यात असावे आणि शेवट काय दाखवलाय यात असावे बहुतेक. मी चित्रपट अजुन पाहिला नाही. मुळ कथा इंग्रजीत मिळाली तर पाहते. ती सगळ्यात जास्त थ्रिलिंग असेल असे वाट्तेय.

शेवटच्या शॉटमधे अजय हजेरी कशाकरता लावून जात असतो? तो तर निर्दोष सुटलेला असतो ना?>>
करेक्ट. मला ही हा प्रश्न पडलेला.

केवळ शेवटच्या कलाटणी चा क्लू दृश्यांमधून देता यावा यासाठी त्या सीन ची योजना वाटते.
पण एकंदरीत चित्रपट बघातानाच अजय असले काहीतरी करणार हा अंदाज आला होताच.

तो तर निर्दोष सुटलेला असतो ना?>> जाता जाता तब्बू-रजत कपूर ला दिलेल्या अनौपचारीक स्पष्टीकरणाच्या आधारावर आणि न सुटलेल्या केसमधला प्रमुख आरोपी असल्यामुळे तर नसेल !

कमलेश सावंत (गायतोंडे) बद्दल लिहायला हवं होतं, हे मान्यच. वेळेच्या बंधनात बसवून लिहावं लागत असल्याने थोडी घाई होतेय माझी आजकाल आणि त्यामुळे काही धागे सुटतातच. अर्थात, हे काही एक्स्क्यूज नाहीच. चूक झालीच ! क्षमस्व..

"तब्बू स्वत:च्या मुलाबद्दल शोधकार्य करवत आहे, असं वाटलं नाही" अश्या अर्थाचं एक विधान वर एका प्रतिसादात आलं आहे. मी तर ह्याच्या अगदीच विरुद्ध म्हणतो आणि लेखातही म्हटलं आहेच. मला तर ती पूर्ण वेळ एक आईच वाटली. 'आय.जी.' सारख्या उच्चपदस्थ पोलीस अधिकारी तर चुकूनही वाटली नाही. अत्यंत बुळबुळीत अभिनयाचा उत्कृष्ट नमुना तिने दाखवला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा करारीपणा तिच्या देहबोलीत, आवाजात, नजरेत एकदाही अगदी चुकूनही येत नाही. तिच्या 'एन्ट्री'च्या वेळी, जेव्हा तिचा मुलगा गायब झाल्याचं कळलेलंही नसतं, तेव्हा ती Interrogation करताना/ करवताना दाखवली आहे, त्या दृश्यातसुद्धा तिने इतका फुसका आवाज लावला आहे की विचकाच होतो ! त्यापेक्षा खमक्या आवाजात आमच्या आईने आम्हाला बमकावलेलं आहे आणि इथल्याही कित्येकांचा हाच अनुभव असेल.
'उत्तम वेशभूषा केली की झालं कॅरेक्टर उभं', इतका उथळ विचार एखादी 'चांगली म्हणवली जाणारी' अभिनेत्री करू शकते, हे पाहून फार वाईट वाटलं.

शेवटच्या शॉटमधे अजय हजेरी कशाकरता लावून जात असतो? तो तर निर्दोष सुटलेला असतो ना?>>

इतपत सिनेमॅटिक लिबर्टी मी देऊ शकतो ! तसं पाहिलं तर जेव्हा तो गायतोंडे आणि इतर जेव्हा विजय, नंदिनी आणि अनुला बदडत असतात, तेव्हा ते ज्या प्रकारे 'दे घुमाके' हाणत असतात, तसली एक जरी पडली ना, तर एक वेळ विजयचं ठीक आहे पण दोघी बायका तर गपगार व्हायला हव्या होत्या !
कसले कुदवतात ते लोक !!

शेवटच्या शॉटमधे अजय हजेरी कशाकरता लावून जात असतो? तो तर निर्दोष सुटलेला असतो ना?>>>> मृतदेह सापडलेला नाही त्यामुळे केस क्लोज झालेली नाही, आणि गुन्हाही सिद्ध होऊ शकलेला नाही. मुख्य आरोपी म्हणून अजय देवगणला पोस्टेत हजेरी लावणं आवश्यक.

निंबुडा, ती मृणाल जाधव. लय भारीमध्ये होती. आणि सचिनच्या एकापेक्षा एक या डान्सशोमध्ये किंवा जितू असलेल्या झीवरच्या एका रीअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून होती, नीटसं आठवत नाहीये.

लय भारीमध्ये होती>>
वाटलंच होतं. ती तीच असावी म्हणून. तिचे लय भारी मधले ठसक्यात संवाद म्हणणे लक्षात राहिले होते

Pages