जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १

Submitted by मार्गी on 30 July, 2015 - 09:54

२०१४ च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन!

आपत्तीग्रस्त भागामध्ये आगमन

जम्मू- कश्मीरमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये भीषण पूर येऊन मोठी हानी झाली. तिथे मिलिटरी, एनडीआरएफ, अन्य दळे आणि सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं. त्यामध्ये स्वयंसेवी संस्था अर्थात् एनजीओजसुद्धा मागे नाही राहिल्या. जम्मू- कश्मीरच्या २४० पेक्षा अधिक गावांमध्ये काम करणा-या सेवा भारती जम्मू- कश्मीर संस्थेसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि काही दिवस मदत कार्यामध्ये सहभाग घेतला. त्याच्याशी संबंधित अनुभव इथे शेअर करत आहे.

...जम्मू- कश्मीरमधील विनाशाचं अजूनही पूर्ण आकलन केलं जात आहे. आता महिना होऊन गेला आहे; पण तरी नुकसान फार मोठं झालेलं आहे. घर नव्याने उभे करणे, उपजीविका पुन: सुरू करणे; आरोग्य सेवा रुळावर आणणे अशी अनेक आव्हानं इथल्या लोकांसमोर आहेत. विशेषत: डॉक्टर आणि फार्मसिस्टची जास्त आवश्यकता आहे. हे अनुभव लिहिताना आज २६ ऑक्टोबर २०१४ आहे. अर्थात् आज जम्मू- कश्मीरच्या देशातील औपचारिक विलिनीकरणाला ६७ वर्ष पूर्ण झाले आहेत. एका अर्थाने कश्मीरशी संबंधित बाबींना समजून घेण्याची ही वेळ आहे. म्हणून मदत कार्याच्या पार्श्वभूमीवर ह्या पूर्ण विषयावरही काही चर्चा करू.

५ ऑक्टोबर पहाटे २ वाजता जम्मूला पोहचलो. ट्रेनमधून लुधियानापर्यंत आणि मग बसने जलंधर- पठानकोट मार्गे जम्मू. वाटेतला हिरवेगार पंजाब अगदी प्रसन्न करणारा आहे. जर उंच पर्वत हिमालयाचं शिखर असेल, तर पंजाबसारखे समृद्ध प्रदेश त्याच हिमालयाची खोली दर्शवतात.. जम्मूमध्ये थोडा वेळ विश्रांती करून श्रीनगरसाठी जीप शोधली. खरं तर १६ सप्टेंबर पर्यंत जम्मू- श्रीनगर महामार्ग सीमा सडक संगठन अर्थात् बीआरओने दुरुस्त केला होता; परंतु श्रीनगरला जाताना लक्षात आलं की, अजूनही हा मार्ग काही ठिकाणी बंद आहे आणि मोठा जाम सुरू आहे आणि म्हणून जीप आणि अन्य छोटी वाहनं राजौरीवरून दुस-या एका रस्त्याने जात आहेत. बस तर बंदच आहेत आणि जीपही थोड्याच जात आहेत. म्हणून भाडंही वाढलं आहे असं कानावर आलं. समोरच्या सीटचे आठशे आणि मागच्या सीटचे सातशे. आधी हे बहुतेक कमी असावं.

पहाटेच्या अंधुक उजेडामध्ये जीप निघाली. ह्या दुस-या मार्गाविषयी कधी ऐकलं नाहीय. सोबत जे कश्मिरी सहप्रवासी आहेत, ते काहीच बोलत नाही आहेत. जसा पुढे प्रवास होत गेला, तसा रस्ता लक्षात आला. रस्ता कुठून कुठून जाणार आहे, हे विचारलं तर सोबतचे लोक म्हणाले की, त्यांनाही माहिती नाहीय. जम्मूमधून निघाल्यानंतर पहिले अखनूर आणि नौशेरा आलं. नौशेरा तेच स्थान आहे जिथे १९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानी टोळीवाल्यांना समोर करून पाकिस्तानी सेनेने आक्रमण केलं होतं आणि स्थानिक जनतेवर प्रचंड अत्याचार केले होते. हा प्रवास त्या हल्लेखोरांच्या रस्त्यानेच होतोय! राजौरी मार्गे थाना मंडी, बाफ्लियाज़, पीर की गली, शोपियाँ, पुलवामा आणि मग श्रीनगर असा रस्ता आहे! राजौरीपर्यंत सीमा सडक संगठन (बीआरओ) आणि सेनेची मोठी उपस्थिती होती. आजवर ज्या गावांबद्दल फक्त ऐकलं होतं, तिथे पहिल्याच दिवशी जाणं झालं! रस्ता चांगला आहे. राजौरीनंतर बाफ्लियाज़पर्यंत थोडा अरुंद आहे, पण चांगलाच आहे. बाफ्लियाज़नंतर मुघल रोड सुरू झाला जो अगदी मोठा आणि दोन लेनचा आहे. नजारा बदलतोय. आता पीर पंजालचे पर्वत ओलांडून जायचं आहे. सकाळी ६ वाजता जम्मूवरून निघालो आहे; मध्याह्न होईपर्यंत फक्त अर्धा रस्ताच पार झाला आहे. कश्मिरी सहप्रवासी काहीच बोलायला उस्तुक नाहीत. काही विचारलं‌ तर एका शब्दात उत्तर देऊन गप्प होतात. आणि नजरेला नजरसुद्धा देऊ इच्छित नाहीत... उंची वाढत गेली आणि मग ह्या मुघल रोडचा सर्वोच्च बिंदु आला- पीर की गली जो ३४९० मीटर उंच आहे! इथून श्रीनगर सुमारे शंभर किलोमीटर आहे आणि पुढे उतार आहे. सफरचंदांसाठी प्रसिद्ध असलेल्या शोपियाँ आणि पुलवामा गावामधून पुढे गेलो आणि श्रीनगरच्या हायवेवर जीपने सोडलं. खरं तर ड्रायव्हर आणखी जवळ सोडणार होता, पण ईदचा जश्न चालू असल्यामुळे गर्दीच्या वस्त्यांमध्ये यायला त्याने नकार दिला.

श्रीनगरमध्ये पोहचल्यावर पुरामुळे झालेलं नुकसान विशेष दिसत नाहीय. काही घरांची पडझड झालेली दिसतेय; पण तरी नुकसान इतकं वाटत नाहीय. असं वाटतंय की, लोक सावरले आहेत. साफ- सफाईसुद्धा ब-याच प्रमाणात झालेली आहे. संस्थेचा पत्ता श्रीनगरच्या मध्य भागात आहे. आता ऑटोने जावं लागेल. ऑटोवाल्याला विचारलं तर सगळ्यात पहिले त्याने विचारलं- तू मुसलमान आहेस का हिंदु? मग संस्थेमध्ये फोन लावून त्याला पत्ता सांगितला. त्याने व्यवस्थित योग्य जागी सोडलं. पन्नास रूपये घेतले, जे ह्या अंतराच्या मानाने अगदी कमी आहेत, असं संस्थेतल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. वाटेमध्ये काही ठिकाणी चिखल आणि पाणीही तुंबलेलं दिसत आहे. श्रीनगरमध्ये ईदचा माहौल आहे. मगरमल बाग़! संस्थेच्या दोन अॅब्युलन्सेस इथे उभ्या आहेत. इथे पन्नासपेक्षा जास्त व्हॉलंटिअर्स कार्यरत आहेत असं कानावर आलं. आता हळु हळु सगळं कळेलच.


मुघल रोडने जाणारी वाहने

सेवा भारतीचं मदत कार्य दर्शवणारा व्हिडिओ

पुढील भाग: जम्मू कश्मीर मदकार्याच्या आठवणी- २

मूळ हिंदी ब्लॉग:
जन्नत को बचाना है: जम्मू कश्मीर राहत कार्य के अनुभव १

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलणारे, चर्चा करणारे, सूचना करणारे वगैरे प्रचंड असतात...
मात्र प्रत्यक्ष काम करणारे तुमच्यासारखे फार विरळा असतात - त्या सर्वांनाच ______/\_______

वाचायला सुरूवात केलीये.

बोलणारे, चर्चा करणारे, सूचना करणारे वगैरे प्रचंड असतात...
मात्र प्रत्यक्ष काम करणारे तुमच्यासारखे फार विरळा असतात - त्या सर्वांनाच ______/\_______
>>>> पुरंदरे शशांक + १