माझे वडील : रिकामपण घालवण्यासाठी काम हवे आहे.

Submitted by मधुरा मकरंद on 27 July, 2015 - 02:21

माझे वडील, श्री. केशव देव. वय ७९. तब्येत घरातल्या घरात एकट्याने हिंडा-फिरण्यापर्यंत नीट. वयोमानाप्रमाणे थोडे विसर होण्याचा किंवा एकसंध न बोलण्याचा त्रास. औषधे चालू आहेत.
नोकरीच्या सुरवातीला १७ वर्षे आर्मीत होते. चीन आणि पाक च्या युद्धात सक्रीय होते. नंतर RBI मध्ये ड्रायव्हरची नोकरी केली. बढती मिळत गेली. वरच्या पदावर निवृत्त झाले.
शिक्षण फक्त दहावी. कष्टाच्या कामाची आवड. सुतारकाम, बागकाम यात चांगले रमत असत. घराला रंगही स्वतः काढायचे. वाचनाची आवड तशी कमी. स्वभाव तसा एकलकोंडा आणि भिडस्त.

आता असे झाले कि, हातात काम नाही... रिकामा वेळ भरपूर... बाहेर फिरण्यावर मर्यादा.... कॉम्प्युटर / मोबाईल वापरायला आवडत नाही / समजत नाही. काय करावे? "आपला आता काही उपयोग नाही.. आपल्याच्याने काही होत नाही... माझ्याच्याने कुणाचे काही अडत नाही"...अशा विचाराने त्यांची चिड-चिड होते. शिस्तीचा माणूस गहीवरून येतो. प्रसंगी रडतोही.

त्यांनी कशात तरी गुंतावे असे मला वाटते. एकूण त्यांची पार्श्वभूमी पहाता त्यांना घरबसल्या काही काम देता येईल का? कामाचा हेतु फक्त त्यांनी गुंतून रहाणे असा आहे. काम सहज करता येण्यासारखे असावे. आम्ही कांदिवली, मुंबई येथे रहातो.

ईथे काही मदत मिळेल. ईतर काही उपाय सुचवले जातील म्हणून हा प्रपंच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादे मंदीरात प्रसाद वाटप किंवा इतर काम मिळाल्यास वेळ सत्कारणी लागुन मित्र्मंडळीही वाढतील व दिवसही मजेत जाईल.

मी सांगतोय त्याचा कृपया चुकीचा अर्थ घेऊ नका. ते रडतात देखिल असे तुम्ही लिहिले आहे.

त्यांना डिप्रेशन आले आहे का ते तपासावे असे मला वाटते. कदाचित समुपदेशनाने फायदा होईल. त्यानंतर ते स्वतःच काहीतरी शोधुन काढतील ज्यात त्यांना आनंद वाटेल.

मधु मकरंद

तुम्ही तुमच्या बाबांची स्वभाववैशिष्ट्ये मोघम दिलेली असल्याने काही सुचवणे अवघड आहे. तरी आजवरच्या आजूबाजूच्या अनुभवांवरून थोडेफार लिहीण्याचं धाडस करतो. तुमच्या केसमधे कितपत कितपत उपयोगी पडेल हे माहीत नाही

तुमच्या बाबांनी आयुष्याची बरीच वर्ष कुटुंबासाठी बाहेर काढलदिसतंय, बरेच कष्ट उपसलेले आहेत असं दिसतंय. काही ठिकाणी म्हातारपणी सर्वांनी त्यांचं ऐकावं, लक्ष द्यावं अशी अपेक्षा दिसून येते . तसं झालं नाही तर मग कुणाकडे बोलण्यासारखं नसल्यास कुढत बसणे, सेल्फ पिटी अशी लक्षणं दिसतात. त्यांना त्यांच्यासाठी खास म्हणून आग्रहाने फिरायला न्या. तसं दाखवू नका. गावाकडे कुणी असतील तर काही दिवस वेळ काढून मुद्दाम जा. त्यांच्या पिढीतले ज्यांच्याशी त्यांचं जमतं, अशा नातेवाईकांना मुद्दाम अधून मधून घरी रहायला बोलवा. बाबांना त्यांच्याकडे जाऊ द्या, किंवा घेऊन जा. धार्मिक कारणामुळे सुद्धा त्यांना बाहेर काढता येईल. तुम्ही त्यांच्यासाठी वेळ खर्च करत आहात हे दिसून आलं तर फरक दिसून येईल.

न बोलता त्यांना तसं वाटावं असं सहज सुचलेलं एक उदाहरण दिलय इतकंच. तुम्ही त्यांना वेळ देतच असणार. ते लागू नसल्यास अनुल्लेख करावा.

मी तुमच्या वडीलांपेक्षा थोडा लहान असलो तरी बरीच वर्षे सेवानिवृत्त होऊन घरी बसलो आहे. पण या वेळात काय करायचे असे दुसर्‍याला विचारायची वेळ आली नाही.
त्यांच्याबद्दल काळजी वाटते तुम्हाला हे स्तुत्य आहे. पण त्यांनी विचारले आहे का तुम्हाला? माझ्या मुलांनी व इतरांनी सांगायचा प्रयत्न केला की असे करा, तसे करा. मी म्हंटले मला कळते माझा वेळ मझ्या करमणुकीसाठी कसा घालवावा.

बाबांना काम सांगतांना वा खेळ सुचवतांना वा इतर कुठलाही विरंगुळ्याचा पर्याय सुचवतांना थोडे दमाने घ्या.. अचानक कुठलाही पर्याय सुचवू नका तर आधी घरात तशी पार्श्वभुमी तयार करा. तुम्ही त्यांना मदत करताय असे न दिसता, बाबा स्वतः तुमच्या मदतीला आलेत त्यातुन त्यांना अमुक एक करण्याचा छंद जडला असे काहीतरी चित्र असायला हवे (हे माझे वैयक्तीक मत).
या वयात माणुस तापट होऊ शकतो, उगीच थोड्याश्या गैरसमजातून त्यांना आवडणार्‍या गोष्टीही त्यांनी झिडकारल्या तर अवघड होऊ शकते, असे वाटल्याने लिहितोय.

तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल कळकळ वाटते आणि तुम्ही त्यांचा वेळ चांगल्या रीतीने जावा यासाठी प्रयत्नशील आहात हे चांगलेच आहे. पण मला वाटत की प्रत्येकाने आपला टाइमपास आपणच शोधायचा असतो.

Pages