दुधी भोपळ्याचे थालीपीठ

Submitted by बी.एस. on 24 July, 2015 - 00:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम आकाराचा दूधी भोपळा, १ मध्यम कांदा किसून, १वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने, १वाटी नाचणी चे पीठ(आॅप्शनल), २ वाट्या गव्हाचे पीठ, १ चमचा तिखट, हळद, हिंगं, १/२ चमचा ओवा, १ चमचा धणे पावडर,तेल आणि चवीनुसार मीठ.

क्रमवार पाककृती: 

१.दुधी भोपळा किसून घ्यावा. (पिळून पाणी काढू नये)
२.त्यात किसलेला कांदा,बारीक चिरलेली कोथिंबीर,मेथी, तिखट,धणे पावडर, हळ,हिंग,ओवा, ,मीठ,नाचणी चे पीठ आणि गव्हाचे पीठ घालावे.
३.पाणी न टाकता,छान मळून घ्यावे. किसलेल्या दुधी व कांद्यामुळे पाणी सुटते म्हणून वेगळे पाणी घालावे लागत नाही. तरीही पीठ सैलसर होते. थापायचे असल्याने सैल असले तरी चालते.
४.पोळपाटावर एक स्वच्छ रूमाल, ओला करून पसरवून ठेवावा. त्यावर तयार पीठाचा,मध्यम आकाराचा गोळा घेऊन,थापून घ्यावा.
५.रूमाल (दोन्ही हातांनी) अलगद उचलून, गरमतव्यावर पालथा करावा. थालीपीठ तव्यावर टाकून,रूमाल अलगद काढून घ्यावा.
६.मंद गॅसवर दोन्ही बाजू तेल लावून, छान भाजून घ्याव्या.स्वादिष्ट थालीपीठ तयार.. लोणचे किंवा चटणी सोबत सर्व्ह करावे.

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणे अंदाजे १०-११थालीपीठ होतात.
अधिक टिपा: 

१.नाचणीचे पीठ असेल तर अवश्य घालावे. मी नेहमी पराठयांमध्ये टाकते. कॅल्शियम युक्त तर आहेच शिवाय त्याची एक वेगळीच, खुप छान चव येते.
२.प्रत्येक वेळी नवीन थालीपीठ थापताना,रुमालावर पुन्हा पाण्याचा हात फिरवून ओला करून घ्यावा. थापतानाही हात ओला करून थापावे म्हणजे पीठ चिकटत नाही आणि ओल्या रुमालाने, न चिकटता थालीपीठ अलगद सुटून येते.
३.दुधी भोपळ्याची भाजी मुले खात नाही पण थालीपीठ मात्र आवडीने खातात. मेथी व नाचणी चे पीठ असल्याने पौष्टिक आहे!!

माहितीचा स्रोत: 
स्वतः चे प्रयोग.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users