निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- सात

Submitted by किंकर on 22 July, 2015 - 12:05

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग तीन- http://www.maayboli.com/node/54583

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग चार - http://www.maayboli.com/node/54599

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- पाच- http://www.maayboli.com/node/54630

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग सहा - http://www.maayboli.com/node/54629

पालखी जशी जशी पुढे पुढे जाते ,तशी तशी भक्तीची नदी दुथडी भरून वाहू लागते . पावसाळ्यातील नदीचे रौद्र रूप जसे मन दडपून टाकते, तसे ह्या भक्ती रुपी प्रवाहाने आपले मन अचंबित होते.

पावसाळ्यातील नदी जशी वेगाने जाताना, एखाद्या वळणावर थोडी उसंत घेत लयबद्ध पणे पुढे जाते, तशी कधी विसावा ,कधी गोल रिंगण, कधी उभे रिंगण, अशी भक्तीची विविध रूपे उलगडत पालखी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पण लयबद्ध पुढे जात आहे .

यात सहभागी झालेला प्रत्येक वारकरी हा इतर सर्व विठ्ठल भक्तांच्या साठी 'माउली ' पदी केंव्हाच पोहचला आहे . असे असले तरी ज्यांना या वारीत येता आले नाही त्यांचे काय ? त्यांच्या मनी भक्ती नाही का ? संसारी जबाबदारीतून मुक्त होत इकडे येता येत नसेल तर त्यांच्या भाव भक्तीचे काय ? असे प्रश्न या अभागी जीवांना नेहमीच सतावतात . पण पूर्वीच्या संतांनी या परिस्थिती कडे खूप डोळस पणे पहिले आहे .

जे भक्त या वारीला ,पंढरीला मुकतात त्यांच्या साठी संत मदतीला धावून येतात. ते सांगतात ,वारी ,पालखी ,दिंडी यांचे महत्व अनन्य साधारण आहे . त्यात सहभाग महत्वपूर्ण नक्कीच आहे . पण जर कसल्याही कारणाने आपला सहभाग राहिला, तर त्यामुळे नाराज होण्याची गरज नाही . आपण जर मनापासून देवाचा धावा करत राहिलो, तर त्यातून मिळणारे आत्मिक समाधानदेखील मनः शांती मिळवून देते .

या मनोवृतीतून संसार आणि भक्ती यांचा सुवर्णमध्य , वेद शास्त्र , षोडोपचार, आणि निखळ भक्ती यातील संभ्रम, या संदर्भातील संतांचे भाष्य, निसिम्म भक्तीचे अनेक पदर आपल्या समोर सहज उलगडताना दिसतात . इतके करून हे संत थांबत नाहीत , तर भक्तीचा बाजार मांडणाऱ्या दांभिक गटावर ते थेट टीका करतात . संसारात राहून आपल्या नित्य कर्माच्या जबाबदाऱ्या पार पाडत, भजन, नाम स्मरण यातून विठूराया कसा लाभतो हे हि सांगतात .

संत रचना म्हटले कि विषय कोणताही असो ' ज्ञानराज माउली तुकाराम ' यांचा लोकजागर वादातीत आहे . संत ज्ञानेश्वर म्हणतात,मी प्रथम माझी संसारिक जबाबदारी यासह माझ्या नित्यकर्माकडे असे लक्ष देत राहीन कि ज्यामुळे माझे घरदार सुखी राहील, मी माझ्या पुण्याई तून जे लाभ मिळवीन तेच माझ्या माउलीच्या चरणी ठेवून , त्याच्याशी एकरूप होईन ,किती सहज भक्ती उतरलीय या रचनेत -

अवघा चि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥

जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥

सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥

बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥

यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधि. हि आठ अंगे जपत पूजा विधी करावेत , जप, तप , ध्यान, योग या आणखी पुढील पायऱ्या असे शास्त्र सांगते. असे म्हणत जेंव्हा पंडित, उच्च वर्णीय लोक सामन्य भक्तांना भक्ती मार्ग कसा खडतर आहे आणि आम्ही तो कसा नियमावलीत बसवला आहे हे सांगून , त्यांच्यावर मानसिक दडपण आणीत होते.

तेंव्हा संत चोखोबा म्हणतात , हे पांडुरंगा,अरे आम्ही खरच अनभिज्ञ आहोत. पुराणात काय आहे, शास्त्र काय सांगते, व्रत वैकल्य करण्याची अष्टांग साधने कोणती याची साधी माहिती पण नाही. मग आम्ही काय करावे ? पण एक सांगतो आमची भक्ती मनापासून आहे ,आम्ही भोळसट आहोत आणि त्याचेच भान ठेवत आम्ही तुझ्या चरणी लीन होत म्हणतोय -

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।
शास्‍त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

पूर्वीची समाज रचना शेती आणि बारा बलुतेदार यांच्या भोवती गुंफलेली होती. सर्व प्राथमिक गरजा या पंचक्रोशीत भागात असत. आणि दैनंदिनी त्याभोवती फिरत राहत असे. त्यामुळे त्याचे पडसाद संत रचनेत उमटताना दिसतात .

शेतकरी, त्याची विविध कामे आणि भक्ती रूप होताना लागणारा सत्संग ,याची सांगड कशी घालू शकतो हे सांगताना संत केशवदास खूप सुंदर दाखले देत भक्तीचे पदर उलगडून दाखवतात. रूपक अलंकार वापरून , नांगरणी , उखळणी पासून ते शेताची राखण या कामांची सांगड ते पांडुरंगाच्या स्मरणात रममाण होताना किती सहजतेने घालतात ते पहा -

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥

उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥

पंचतत्वांची गोफण, क्रोध पाखरें जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥

ज्या प्रमाणे केशवदास रूपात्मक दाखला देत हरिनामाचा झेंडा रोविला असे सांगतात, त्या प्रमाणे संत सावता माळी त्यांच्या भक्तीच्या मळ्यात इतके एकरूप झालेत कि ते त्यांच्या मळ्यातील प्रत्येक वस्तुत जणू जळी स्थळी काष्ठी पाषाणी पांडुरंगास पाहतात , विठूरायास अनुभवतात .

याही ठिकाणी पुन्हा एकदा रूपक अलंकार आहे पण त्यात थोडी देखील किल्ष्ट्ता नाही.त्यांना भाजीत विठाई कोथिंबीरीत हरी , राताळात गोपाळ ,तर विहीर मोट त्याची दोरी यात पंढरी दिसते आणि त्यांच्या ओठी शब्द येतात -

कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी ॥१॥

लसुण-मिरची-कोथिंबिरी ।
अवघा झाला माझा हरीं ॥२॥

ऊस-गाजर-रातळू ।
अवघा झालासें गोपाळू ॥३॥

मोट-नाडा-विहींर-दोरी ।
अवघीं व्यापिली पंढरी ॥४॥

सावता म्हणें केला मळा ।
विठ्ठल पायीं गोविंला गळा ॥५॥

शेतकरी ,माळी , कुंभार यांनी आपले रोजचे कर्म हाच विठ्ठल भक्तीचा अचूक मार्ग आहे असे मानल्यावर मग त्यात इतरेजन तरी कसे मागे राहतील. मग त्यात इतर बलुतेदार पण सहभागी होतात. संत नरहरी हे व्यवसायाने सोनार. आपला व्याप सांभाळताना त्यांनी मी फक्त समाजाचा, लोकांचा सोनार नाही तर हे पांडुरंगा मी तुझा देखील सोनार आहे असे म्हटले आहे .

आपला व्यवसाय त्यातील बारकावे आणि भक्ती यांची सांगड घालताना ते म्हणतात ,मी माझ्या व्यवसायात जसा व्यवहारी आहे तसा तुझ्या भक्तीत पण आहे. तिकडे मी पैसा जपतो, इकडे मी तुझे नाम जपतो . तिकडे मी सोन्यात घस /कट मारतो, इकडे तुझे नामच चोरतो . तिकडे मी भोजनात गुंतलोय ,इकडे मी भजनात गुंतलोय . थोडक्यात काय तिकडे (संसारात ) तुम्ही कसेही वागलात तरी इकडे (भक्ती मार्गात ) तुम्ही तुमच्या वागण्यात खोट आणूच शकत नाही . आणि या माणसाच्या स्वतः ला शोधण्याच्या प्रयत्नांतून ते म्हणतात -

देवा तुझा मी सोनार ।
तुझे नामाचा व्यवहार ॥१॥

मन बुद्धीची कातरी ।
रामनाम सोने चोरी ॥२॥

नरहरी सोनार हरीचा दास ।
भजन करी रात्रंदिवस ॥३॥

संत तुकोबांनी त्यांचे जीवन म्हणजे पांडुरंग असे मानून सदा सर्व काळ त्यासाठी वाहून घेतले होते . ते इतरांना पंढरीस चला , वारी अनुभवा असे सातत्याने सांगत . पण प्रत्येकास ते पूर्णार्थाने जमेलच असे नाही म्हणून ते तुमचा रोजचा व्यवहार प्रामाणिक ठेवा गरिबांना मदत करा तो देखील विठ्ठल भक्तीचा एक मार्ग आहे असे आवर्जून सांगत. त्यासाठी ते म्हणतात -

जें का रंजलेंगांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥१॥

तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥२॥

मृदु सबाह्य नवनीत ।
तैसें सज्जनांचें चित्त ॥३॥

ज्यासि अपंगिता नाहीं ।
त्यासि धरी जो हृदयीं ॥४॥

दया करणें जें पुत्रासी ।
ते चि दासा आणि दासी ॥५॥

तुका म्हणे सांगू किती ।
तो चि भगवंताच्या मूर्ती ॥६॥

तर मग विविध संतांचे हे सांगणे लक्षात घेत, आपला प्रत्यक्ष वारीत सहभाग नसला, तरी संत नामदेव म्हणतात त्या प्रमाणे जिथे आपण आहोत तेथूनच पांडुरंगास म्हणूया बाबारे जसे जमेल तसे मी तुला स्मरत आहे . तुज वाचून माझी सुटका नाही, तू माझे मोह माया सोडवलेस आणि मी तुला शरण आलोय.

मी तुला माझ्यात पाहिले आणि तू मला जवळ घेतलेस . यात कोणी कोणाला फसवले ? हा एक न सुटणारा प्रश्न आहे तो तसाच राहू दे . कारण प्रश्न असतील तर जगण्यात त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात जगण्याचे मर्म आहे . किती मनास अंतर्मुख करणारी रचना आहे पहा -

माझा भाव तुझे चरणी ।
तुझे रूप माझे नयनी ॥१॥

सापडलो एकामेकां ।
जन्मोजन्मी नोहे सुटका ॥२॥

त्वा मोडिली माझी माया ।
मी तो जडलो तुझिया पाया ॥३॥

त्वा मज मोकलिले विदेही ।
मी तुज घातले हृदयी ॥४॥

नामा म्हणे गा सुजाणा ।
सांग कोणे ठकविले कोणा ? ॥५॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्यांना या वारीत येता आले नाही त्यांचे काय ? त्यांच्या मनी भक्ती नाही का ? संसारी जबाबदारीतून मुक्त होत इकडे येता येत नसेल तर त्यांच्या भाव भक्तीचे काय ? असे प्रश्न या अभागी जीवांना नेहमीच सतावतात . पण पूर्वीच्या संतांनी या परिस्थिती कडे खूप डोळस पणे पहिले आहे . >>>>> यावरील आपले भाष्य खरोखरीच अंतर्मुख करायला भाग पाडते ...

अवांतर - सद्य परिस्थितीत एवढ्या प्रचंड संख्येने जे वारकरी जात असतात त्यामुळे मार्गातील अनेक गाव-शहरे व शेवटी पंढरपूर येथील हायजेनिक कंडीशनवर (पटकन मराठी शब्द आठवत नसल्याने माफ करणे) नक्कीच खूप ताण येत असणार. याचा नीट विचार करुन त्यानुसार काही चांगली योजना आखणे व त्याची कार्यवाही करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. निव्वळ भावनेच्या पोटी वहावत जाणे इथे योग्य होणार नाही असे माझे वै. मत.

लेखमाला खूप सुंदर होत आहे, पु भा प्र ...

पुरंदरे शशांक - आधुनिक संत गाडगे महाराज यांचा विचार स्वच्छता म्हणजे परमेश्वर जेंव्हा आपण लक्षात घेवू तेंव्हा आपण ईश्वराच्या सानिध्यात असू . आपल्या प्रतिक्रिये करिता धन्यवाद!