उपवासाची कढी

Submitted by सावली on 21 July, 2015 - 07:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

साहित्य:
दोन तीन वाट्या ताक / एक वाटी घट्ट दही.
राजगिरा पिठ - २/३ मोठे चमचे ( मी एकदा राजगिरा पिठ वापरलं तर मस्त दाट झाली, एकदा ते नसल्याने वरी पिठ वापरुन पाहिले तर त्यामुळे दाटपणा आला नाही. शिंगाडा पिठही चालेल बहुधा)
बटाटे मध्यम - ३ ते ४
हिरवी मिरची - २/३ किंवा जास्त ( थोडी तिखट कढी जास्त छान लागते )
जिरं
फोडणीला तेल / तुप
मिठ
ऑप्शनल - उपवासाला चालत असेल तर
कडीपत्ता
थोडं आलं किसुन
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

एकादशी आणि दुप्पट खाशी असे म्हणायची वेळ आता अगदी जवळ आलीच आहे. त्या दुप्पट खाशीची सोय करायला ही रेसिपी.

खरं सांगायचं तर एका वाक्यातही रेसिपी सांगु शकते म्हणजे उपवासाची बटाटा भाजी करुन त्यात पिठ लावुन ताक फोडणी देणे. पण मग त्याला काय मजा त्यापेक्षा जरा डिटेल रेसिपी लिहिली की मोठ्ठं काम केल्यासारखं तरी वाटेल. तरी पाककृती लिहीताना वर मेसेज आलाय की गणेशोत्सवासाठी पा.कृ राखुन ठेवा. पण या पाकृ. ला स्पर्धेत यश मिळण्यासारखं काही नसल्याने लिहून टाकते इथे.

कृती :
बटाटे उकडुन फोर्क ने छोटे तुकडे करुन घ्यायचे. ( अगदी लगदा नको आणि खुप मोठे तुकडे नकोत)
कढईत तेल तापत ठेवुन त्यात जिरं, मिरची, कडीपत्ता , आलं ( वापरत असल्यास ) फोडणी करायची.
त्यात बटाटे टाकायचे, मिठ टाकायचे आणि तळाला खरपुस होईपर्यंत ठेवायचे. मधे मधे थोडे परतत रहायचे.
तोपर्यंत ताकात/ दह्यात पाणी घालुन घुसळुन त्यात थोडे थोडे राजगिरा पिठ टाकुन चांगले घुसळुन घ्यायचे. एकजीव झाले पाहीजे.
आता गॅस कमी करुन खरपुस बटाट्यांवर ते ताक ओतायचं. आणि ढवळत ढवळ्त छान उकळी येऊ द्यायची.
वापरत असल्यास कोथिंबीर घालायची की मस्त दिसते.

आता ही गरमागरम कढी वर्याच्या भाताबरोबर किंवा साध्या भाताबरोबर फस्त करायला मोकळे.

अधिक टिपा: 

टिपा :
कढी थोडी तिखटच छान लागते.

सोर्स :
एका मैत्रिणीने नेहेमीच्या कढीत बेसन ऐवजी राजगिरा पिठ टाकलं तर उपवासाला चालेल असे सांगितले. मग त्यात जरा प्रयोग ( घरात कसलीच भाजी नसल्याने ) म्हणुन उकडलेले बटाटे घालुन पाहिले. घरात सगळ्यांना प्रयोग आवडला.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं..
छान दिसतोय प्रकार..तिखटही आहे Wink
आता नवरात्रीच्या उपवासात कामी पडेल..तसपन ९ दिवस निरंकाळ उपवासात वेगवेगळ काय खायच हा प्रश्नच असतो.. एक प्रकार त्यात समाविष्ट झालाय..
पाकृ बद्दल धन्यवाद सावली Happy

सावली धन्यवाद. उपासालाच काय इतर वेळी पण चालायला हरकत नाही. पण उपासाच्या कढीत आम्ही कढीपत्ता टाळतो. ( खरे तर बटाटे हेच फिरन्गी आहेत, पण कसे चालतात देव जाणे) शिन्गाड्याने सुद्धा दाटपणा येईल. त्याची खीर पटकन घट्ट होते.

सस्मित Lol
जेवायच नाही म्हटल तर पोटाला कसलातरी टेकु हवा असतो.. त्यातही मला आलु आवडत नाही.. साबुदाणा नेहमी खाववत नाही..म्हणुन कैतरी भेटत का ते बघाव लागत..तसही पहिले ३ दिवस जड जातात मग अपनेआपच खाण्यावरची वासना उडून जाते हा स्वानुभव.. Happy

यात उपासाचा कुठलाही चिवडा घातला की झाली फराळी मिसळ Wink

आज सुरणाचे भाजी साधारण अशीच केली होती. फक्त कुठलंही पीठ नव्हतं घातलं. सुरणाचे तुकडे, भिजवून उकडलेले शेंगदाणे, जिरं-मिरचीचं वाटण, आंबट ताक आणि दाण्याचं कूट, कोथिंबीर. मस्त रस्साभाजी झाली होती... दुपारी डबा खाताना त्यावर तिखट्ट बटाटा सळी वेफर्स घातले (जरास्से (दोन-तीन चमचे)).... मस्त तोंपासु!