पहिली फ्लाइट ............ जरा हटके

Submitted by स्वीट टॉकर on 20 July, 2015 - 07:10

माझ्या सौभाग्यवतीला माबोकरीण होण्याची इच्छा होती पण बर्‍याच वेळा मदतपुस्तिकेशी संपर्क साधून देखील Invalid Password चा प्रॉब्लेम सुटू शकला नाही. त्यामुळे तिनी माझ्याच आय डी वर लिहायचं ठरवलं आहे.

पहिली फ्लाइट ............ जरा हटके

माझी मुलगी कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते. त्याप्रमाणे गेले.

आम्ही तिच्या फ्लाईंग क्लबवर पोहोचलो आणि तिथल्या विमानांचा छोटा आकार बघून मी चरकलेच ! वारा नाममात्र होता तरी सगळी विमानं जागच्या जागीच हलत डुलत होती ! विमान हे दळणवळणाचं सगळ्यात सुरक्षित साधन असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं ती विमानंच वेगळी! इतक्या छोट्या विमानात बसण्याची माझी पहिलीच वेळ. पहिली आणि शेवटची. मी तिथल्या तिथे ठरवून टाकलं.

असं म्हणतात सौंदर्य सापेक्ष आहे. खरं तर प्रत्येक गोष्टच सापेक्ष आहे. ज्या विमानांचे पुनवनं पाठवलेले फोटो मी कौतुकानं बघत असे, ती प्रत्यक्षात बघितल्यावर आकारानं मला आपल्या गावातल्या जत्रेच्या स्टुडिओत फोटो काढायला बनवलेली असतात तेवढी छोटी वाटली!

पण चेहर्यावर भीती दाखवून चालणार नव्हतं. मी एक स्मितहास्य चिकटवलं आणि पुनवच्या मागोमाग नाखुषीनीच जायला लागले. विमान नेण्याआधी पायलटला कागदी घोडे नाचवावे लागतात. त्यात काहीतरी अडचण आली. शिवाय भयानक उकडत होतं. पुनवची चिडचिड झाली. मला आशेचा किरण दिसला! “अगं आज जाऊ दे. पुन्हा कधीतरी येऊ.”

“छे छे! मी दोन दिवसांपूर्वीच बुक केलंय. मिळणार कसं नाही बघतेच.”

प्रत्येक स्त्रीला आपले हक्क स्वतःच मिळवावे लागतात. ते सहजासहजी मिळत नाहीत हे मी तिला नेहमीच शिकवत आले होते. ते उगीच शिकवलं असं क्षणभर वाटलं. पण मग स्वतःचीच लाज वाटली. शेवटी एकदाचं विमान मिळालं आणि आम्ही दोघी आत बसलो.

“एखादी चक्कर मारू आणि लगेच लँड करू.” मी. चिकाटी माझ्या स्वभावातच आहे.

“हॅह! दोन तासांकरता घेतलंय प्लेन.” पुनव.

“दोन तास??” माझा आवाज मलाच ओळखला नाही. लगेच खाकरून सावरून घेतलं. खर्जात बोल, खर्जात बोल – स्वतःला बजावलं.

स्त्रीहक्कांचा अतिरेक झालेला होता.

“लांब भटकून येऊ. आणि कसलं हॉरिबल उकडतंय! पाच हजार फुटांवर बघ कसं थंड वाटतं ते.” पुनव.

“ऑ!!!” मी विचार करण्याआधीच तोंडातून बाहेरच पडलं. उद्गारवाचक चिन्हांसकट.

लांब? उंच? पाच हजार फूट? पाच हजार फुटांवर जायचं असेल तेव्हां मी माझी जाईन की महाबळेश्वरला. तो विचार आला आणि आठवलं की घाटात आमची गाडी गरम झाली म्हणून ‘आ’ वासून उभी ठेवायला लागली होती. विमानाचं इंजिन तर गाडीहून लहान वाटत होतं. कसं होणार! वर नवरा फोनवर म्हणणार, “तुला पुनवबरोबर भटकायला मिळतंय ना? यू आर सो लकी!”

डोकं आणि काळीज यांच्यात वाद सुरू.

“कशालाही न घाबरणारी तू, तुझी अशी अवस्था कशी झाली?”

“ही एवढीशी मुलगी, तिची प्रत्येक ऍक्टिव्हिटी – अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, ट्रेकिंग, स्वयंपाक, कपडे खरेदी, ड्रायव्हिंग - सगळ्यांमध्ये माझादेखील सहभाग असायचा. कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. माझा अनुभव तिच्याहून प्रत्येक बाबतीत जास्त होता. ती देखील निर्णय घेताना माझ्या नाहीतर तिच्या बाबाच्या मताचा विचार करायची. आता ‘कॉकपिट’मध्ये तर माझा अजिबात उपयोग नाही. वर बर्‍यापैकी वजनच. आणि इथे तिनं घेतलेल्या निर्णयांवर आमच्या दोघींचे जीव अवलंबून! एकोणीस वर्षाची तर आहे. घेता येतील तिला अचूक निर्णय?”

“तिच्या शिक्षकांनी तिला विमानाची पूर्ण जबाबदारी दिली आहे, ती तिची तयारी बघूनच ना?”

“पाश्चात्त्य देशातल्या शिक्षकांचं काय? सोळा वर्षांपुढील मुलं म्हणजे मोठीच समजतात इकडे!”

“प्रश्न वयाचा नाहीये. जरी विद्यार्थी तीस वर्षांचा असला तरी त्याची व्यवस्थित तयारी झाल्याशिवाय त्याला एकटा कधीच सोडत नाहीत. त्यातून पॅसेंजर घेऊन तर नाहीच नाही.”

उफ्फ !!

मन चिंती ते वैरी न चिंती! नशीब, पुनवचे ‘प्री-फ्लाइट चेक्स’ चालले होते. माझी घालमेल तिला लक्षातच आली नाही. माझी सीट बरीच खाली होती त्यामुळे मला बाहेरचं नीट दिसत नव्हतं. पण मला त्यात अजिबात रस नव्हता. कधी एकदा फ्लाइट सुखरूपपणे संपते याच्याचकडे डोळे लागलेले. उड्डाण करण्याआधीच!

“आई, तू रिलॅक्स हो आणि मजा बघ.”

“हो. हो. अगदी रिलॅक्स्ड आहे.” प्रश्न संपण्याआधीच उत्तर देऊन मोकळी झाले! मग लक्षात आलं, तिनं प्रश्न विचारलाच नव्हता.

माझ्याही डोक्याला हेडफोन लावले होते. कंट्रोल टॉवरमधला ऑस्ट्रेलियन त्याच्या अगम्य इंग्रजीत काहीतरी बोलला. त्यात मला ‘गो, डिपार्ट किंवा बायबाय’ असे माहितीतले शब्द काहीच ऐकू आले नाहीत. पण पुनव म्हणाली, “ओके मॉम, लेट्स गो!” काहीतरी होऊन आमची फ्लाइट रद्द होण्याची उरलीसुरली आशा मावळली.

विमान रनवेवर धावायला लागलं. प्रचंड आवाज आणि थरथराट! आवंढा गिळायचा प्रयत्न केला; पण शक्य नव्हतं. तोंडाला भयंकर कोरड पडली होती. आता उडेल, मग उडेल, टेक ऑफच होई ना! दोघींचं मिळून वजन विमानाला फार तर नसेल झालं? मान न वळवता डोळ्यांच्या कोपर्‍यातून पुनवकडे बघितलं. ती आरामात होती. बहुदा माझाच वेळेचा आणि अंतराचा अंदाज चुकला असावा. शेवटी उडालं एकदाचं.

तशी मी पटकन् सावरते. माझा श्वास चालू झाला, सीटमध्यी रुतलेली नखं बाहेर आली, पोटातला गोळा देखील कमी झाल्यासारखं वाटलं. अचानक विमान माझ्या बाजूला कललं! आता मात्र मी चटकन् मान वळवून पुनवकडे बघितलं. ती शांतच होती. तिनीच वळवलं असावं.

आता मला माझ्या खिडकीतून नको तितकं दिसायला लागलं! माझ्या बाजूचं दार जर उघडलं तर मी सरळ खालीच की! समोर बघितलं तर क्षितिज तिरपं ताकडं. परमेश्वरा!!

“आई, आपलं घर दिसतंय?”

“कुठे आहे?” तोंडातून प्रश्न बाहेर पडला अन् लगेचच मूर्खपणाचा पश्चात्ताप झाला. मला नीट दिसावं म्हणून विमान आणखी तिरपं!

मी खिडकीकडे तोंड करून डोळे घट्ट मिटून घेतले. नखं पुन्हा सीटमध्ये रुतली. “हो! हो! दिसलं दिसलं.”

“केवढंस्सं दिसतंय ना! तरी आपण फक्त हजार फुटांवर आहोत.” पुनव.

“तरीच मला दरदरून घाम फुटला आहे. नाही का? थंड तर पाच हजार फुटांवर वाटणार आहे!” असा विचार माझ्या डोक्यात आला आणि माझ्या विनोदाचं मलाच हसू आलं.

मी डोळे उघडून पुनवकडे बघितलं. शांतपणे विमान चालवत होती. व्हील हलक्या हातात धरून बारीक बारीक अडजस्टमेंट्स सहजपणे करत होती, मला अजिबात न कळणार्‍या इंग्रजीत कंट्रोल टॉवरबरोबर संभाषण करंत होती अन् दिव्याचं बटण दाबावं आणि अंधार खाडकन् नाहिसा व्हावा तशी माझी भीती गायब झाली.

माझं मन क्षणात सोळा वर्षं मागे गेलं. पुनवच्या शाळेचा पहिला दिवस संपला होता. तिला घरी नेत होते. मी उजवीकडे होते. व्हीलवर. ती छोटुकली डावीकडे. काही बोलत नव्हती. तिच्या बालमनात काय चाललं असेल असा विचार मी करंत होते. आईनं एकदम अनोळखी लोकांत सोडलं म्हणून रागावली असेल का? का घाबरली असेल? मी तिच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर माझ्याकडे बघून खुदकन् हसली होती.

आजही आम्ही तशाच बसलो होतो. पण आज व्हील डावीकडे होतं. तिच्या हातात. मात्र हे व्हील माझ्यापेक्षा खूपच जास्त जबाबदारीचं होतं. हे हाताळायला जास्त कौशल्याची तर जरूर होतीच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे, जर का चूक झाली तर त्याचे परिणाम जबरी असणार होते. पण त्याला तिची तयारी होती.

माझ्या पाखराच्या पंखात बळ आलं होतं आणि हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मी थांबवण्याआधीच दोन अश्रू खळकन् निखळलेच! ओठ घट्ट मिटून आवंढा गिळला. तिला दिसू नये म्हणून मी खिडकीतून बाहेर बघायला लागले.

आता पाच हजार फुटांवरच काय, जर ती व्हीलवर असेल तर पाचही खंडांवर जायला मी तयार होते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे एकदम मस्त! खूपच छान अनूभव वाटला. तुमच्या लेकीचे व सौन्चे अभिनन्दन. लेकीला पदार्पणासाठी आणी सौना त्यान्च्या अनूभवासाठी. आगे बढो! ( हे लेकीसाठी ) खूप वेगळे आणी धाडसाचे पाऊल. छान वाटले मराठी कन्येचे धाडस बघुन.

पुनवच्या आई, खूप छान वाटलं वाचून. सुरुवातीचा नर्मविनोदी सूर अगदी सहज हळवा होत गेलाय. आईला मुलीबद्दल वाटणारं प्रेम, काळजी, अभिमान हे सगळं पोचलं Happy

स्वीट टॉकर, तो आधीचा आयडी काही कारणाने चालत नसेल तर दुसरे सदस्यनाव निवडून परत नव्याने अकाऊंट उघडायचा प्रयत्न केला का ? अ‍ॅडमिन आणि वेब मास्तरांना विपुतून ही बाब विचारली आहे का ?

काय गोड लिहिलय. लेकीबद्दलची काळजी, कौतुक, अभिमान सगळं काही थेट पोहोचलं इथे आमच्यापर्यंत.
लिहिण्याची शैली मस्तं आहे. विश यू मेनी मेनी हॅपी फ्लाइट्स विथ युवर डॉटर.

खुप छान Happy

लेखनाची स्टाईलही आवडली.

काय गोड लिहिलय. लेकीबद्दलची काळजी, कौतुक, अभिमान सगळं काही थेट पोहोचलं इथे आमच्यापर्यंत. >> +१

फार गोड लिहिलय.
अगो +१
मला माझा पण पहिला आणी शेवटचा छोट्या विमानातला उणापुर्‍या पाउण तासाचा प्रवास आठवला.

ऐन डिसेंबरतल्या थंडीत घाम फुटला होता मला. अ‍ॅनिवर्सरी सरप्राइज म्हणून नवर्‍याला घेउन मी बुक करून ठेवली होती खिसमस लाइट्स बघायला छोटीशी विमानाची राइड. नवर्‍याला सॉलिड मजा आली आणि मला मरो ते लाइट्स, कधी जमिनीवर येतोय असं झालं होतं पोटात ढवळून ...

वाह!

Pages