पराठ्याला चव येण्यासाठी तुम्ही कुठले..कुठले पदार्थ वापरता?

Submitted by हर्ट on 20 July, 2015 - 02:15

मी माझ्याकडे आठवड्यातून एकदा तरी कुठल्या ना कुठल्या भाजीचा पराठा करतो. कधीकधी उरलेल्या भाज्यापासून पराठा करतो. कदाचित तेल कमी वापरत असेल म्हणून पण माझ्या पराठ्याला साध्या मिठा तिखटाचीही चव येत नाही. प्लीज इथे मला व्यवस्थित टिप्स मिळतील का पराठ्याचा उंडा तयार करण्यासाठी? धन्यवाद.

मी पराठ्यात साधारण हे .. हे टाकतो :
१) आले लसूण जिरे ह्याचा पेस्ट
२) लाल तिखट भरड - अर्धा चमचा. नाहीतरी अर्धी हिरवी मिरची ठेचून.
३) कोथींबीर अर्धा वाटी
४) दोन चमचे दही
५) दोन चिमुटभर मीठ.
६) थोडासा गुळ चिरुन
७) तेलाचे मोहन हिंग घालून
८) हे सर्व पिठात एकत्रीत करुन पिठ मळून घेतो आणि ओल्या कापडात १५ मिनिटे ठेवतो.
९) मी तेल ऑलिव्हचेच वापरतो.

इथे एका ताइने पराठा बनवला. असा रंग पोत कधीच येत नाही माझ्या पराठ्यांना: http://the-cooker.blogspot.sg/2007/06/parathas-for-breakfast.html

आणि हो, प्लीज इथे अवांतर विनोद टाळा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कधी चेन्ज म्हणून मी अंबा लोणचे (केप्र)मसाला टाकते बटाटा ,मेथी पराठ्यात.अजुन एक निरिक्षण म्हणजे मीठ किन्चीत जास्त टाकले तर आळणी नाही लागत पराठे.

१) सा र णात कमीत कमी पाणी हवे. कोरडे सारण असावे. लसूण, मिरची, पुदिना, कोथिंबीर, मीठ हे मी वाटून घेते व सारणात घालते( सारण म्हणजे आतले फिलिंग) मग धने जिरे पूड, लिंबू रस थोडासा घालते.
२) मेथी/ पालक परतून घेउन त्यात एक बटाटा किसून घालते व त्यातच कणीक मिसळते. भिजवायला कमी पाणी लागते.

३) बटाटे, पनीर/ चीज किसून घेते. कुस्करत नाही.
४) पोळी लाटल्यावर तेल लावून मग सारण पसरून उंडा बनवते व मग अलगद जमेल ते वढा
पातळ लाट्ते. दोन उं डे तयार झाले की तवा तापवायला लावते

५) तवा तापल्यावर आधी तेल/ तूप एक चमचा घालून मग पराठा ठेवते. व खरपूस भाजल्यावर साइड बदलते. तेल तूप लागते पराठा भाजायला
६) वाफ धरू नये म्हणून टिशू पेपर वर काढते. लगेच सर्व्ह करते. मी करता करताच खाते एक.

BOM and routing done pl proceed

आपण जो फोटो टाकला आहे, तो ठेपला आहे असे वाटते. तुम्ही असेच करता का? की अमांनी दिलेल्या प्रतिसादनुसार स्टफिंग करुन ते लाटलेल्या पोळीत भरुन उंडे बनवून मग करता?
तुमच्या कृतीनुसार प्रतिसाद बदलतील म्हणून विचारले.

आपण जर उरलेल्या भाजीत पीठ मळून मग लाटत असाल, तर पीठाच्या प्रमाणात मीठ, तिखट, जीरे-धणे पावडर इ. परत घालणे अपेक्षित आहे (भाजीत असले तरीही). नाहीतर पराठा फिकाच लागेल. थोडासा ओवा (पाव ते अर्धा टी स्पून) घातला तरी छान चव लागते.

कधी गरम मसाला,कधी पाव भाजी मसाला, छोले मसाला, असे विविध मसाले स्टफिंगमध्ये टाकल्यास वेगळी आणि छान चव येते.

आपण सारणात तर मसाला टाकतोच. उदा..बटाटा असेल तर लसूण, हिंग, मीठ , जिरे, हिरवी मिरची आणि खूप कोथिंबीर. सारण मात्र अगदी कोरडेच पाहिजे. आंबट पणासाठी मी किंचित सिट्रिक आसिड वापरते कारण लिंबाचा रस टाकला तर सारण थोडं सैल होऊ शकतं.

चव येण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे पराठा करतांना त्याच्या आवरणात सुद्धा मसाला असणे जरूरी आहे. त्यासाठी कणकेत मीठ, लाल तिखट, हळद, हिंग, थोडे जिरे, ओवा--थोडसं क्रश करून. त्या कणकेत तेल जरा सढळ हाताने टाका. पराठा लाटतांना तांदळाची पीठी वापरा म्हणजे लाटतांना चिटकणार नाही.

वा! फार छान टिपा मिळत आहेत. धन्यवाद अमा, आशिका, धनश्री, पद्मावती.

आशिका मी कधीच सारण भरत नाही. जे काही करतो ते पिठात मिसळवूनच करतो.

दही, गूळ गरज नाही. दही बरोबर खायला मस्त लागते. ऑलिव्ह ऑइल पण घेउ नका. आपले सन ड्रॉप किंवा सफोला तसेच शुद्ध घी. तूप पाहिजे ऑथेंटिक पराठ्याला. तव्याचे तापमान पण खूप गरम
नाही पाहिजे पण अगदी कमी तापलेला पण नाही पाहिजे. तेल तूप टाकले तर जळून काळा धूर नाही यावा. म्हणूनच उंडे सेमी तयार करून ठेवायचे. लाटायला घेतले की ग्यास सिम व फुल ऑन ह्यांच्या मध्यभागी असायला हवा. तवा फार पातळ नसावा. साधारण खोलगट पोळी करता वापरतो तोच तवा हवा. भरून दोन उंडे तयार असले कि गॅस मोठा करून तेल टाकून पराठा टाकायचा मग एकदा खालून उलथणे फिरवून तो उलटा करून मंद आचेवर होउ द्यायचा. मग फिनिशिंग अजून एक
छोटा चमचा तूप घालून क्रिस्प बन वून सर्व्ह करायचा.पराठा कच्चा नसावा व अती गरम तव्यावर
भाजल्याने काळा पण नाही झाला पाहिजे एक क्रिस्प ब्राउन ठिपके असलेला हवा.

बरोबर सर्व्ह करताना केचप, अमूल बटर, साधे किंवा सायीचे गार दही व लोणचे हे पाहिजे. प्रत्येका बरोबर वेगळा स्वाद आहे. माझे फेवरिट आहे साधे दही. लहान दंगे खोर मुलांना अमुल बटर,
तरुण व डाएट कॉन्शस लोकां ना केचप ( मॅगी केचप) व वयस्कर लोकांना लोणचे आवडते.

Routing update

बी मी नुसते लसूण कच्चे किसून कोबी आणि मेथी साठी घालते. आले लसूण एकत्रित पेस्ट पेक्षा नुसते किसलेले लसूण जरासे उग्र पण मेथी, कोबी या पराठ्यांना जास्त चांगले लागते

आलं, गूळ पराठ्यात नको. तेलाचं मोहनही नको. त्या पुर्‍या नाहीत, पराठे आहेत.
भाजी (कोबी, मेथी जे असेल ते) आणि कणीक यांचं प्रमाणही महत्त्वाचं आहे. (कणकेच्या निम्मी तरी भाजी हवी.)
त्या लिंकवरच्या पराठ्याप्रमाणे रंग-पोत येत नाही, कारण तुझ्या पराठ्यात कुठलीच भाजी नाही.
पराठ्याचा गोळा पोळ्यांच्या कणकेपेक्षा घट्ट भिजवावा लागतो.

आर्मीच्या घरात असेही पाहिले आहे कि साहेब व मुले जेवायच्या टेबलावर आले कि कुक पराठे बनवायला लागतो. दुरडीत एक स्वच्छ नेपकिन वर तयार भाजलेला पराठा ठेवून सहायक किचन मधून
डायनिग टेबल कडे धाव घेतो. परत येइस्तो नवा पराठा तयार अस्तो. शेवटी नुसत्या कणिकेत
ओवा जिरे व मीठ तेलावर घालून अजवैनके पराठे एक दोन बनतात.

गरम पराठ्याचे दोन तुकडे करायची वेळ येउ नये पण जास्त मेंबर असतील तर अर्धा करायला पिझा कटर रेडी असू द्यावा.

कांदा अति बारीक चिरून, कॉलिफ्लावर मिक्सर मधून काढून त्यात धने जिरे पूड, मीठ बारीक चिरलेली मिरची व कोथिंबीर हे सारण असल्यास मैद्याच्या पारीत मस्त पराठे होतात. थोडासा ओवा पन घालायचा ;पौश्टिक नसेल पण बाय गॉड जीभ एकदम ड्यानस करायला लागेल बरोबर लोणचे.

अमा ने सुचविल्याप्रमाणे मी पण हेच सुचवीन की ऑलिव ओइल नकोच. इटॅलियन पदार्थामधे ते बरोबर आहे कारण ते एकतर गरम करत नाही आणि केले तरी स्मोकिंग पॉइण्ट ला ते तेल कधीच येत नाही. हे तेल स्मोकिंग पॉइण्ट ला कधीच आणू नये कारण ते शरीराला हानीकारक असते आणि पराठा तव्यावर भाजतांना तेलाचा थोडा धूर येणारच.

आणि येस शुद्ध घी मस्ट आहे. अगदी तेला ऐवजी पूर्णपणे तूप वापरायचे नसेल तरीही शेवटी तव्यावर पराठा ऑलमोस्ट तयार असेल तेव्हा तूप टाकून एकदा उलट पालट करून घ्या.

तुमच्यापैकी कुणी मला पराठ्याला तेल लावायची स्टेप सांगाल का? मी खूप जाड बुडाचा तवा वापरतो आणि मी कधीच तेल तव्यावर सोडत नाही. म्हणजे एकदा पोळी पराठा भाजून झाला की वरतुन तेलाचे चार बोटे फिरवतो. आणि तेल तसेही कणीक मळताना असतेच तेंव्हा परत परत तेल वापरत नाही.

उत्तर भारतात पराठे अ‍ॅक्चुअली तळतात, त्याशिवाय त्याला मजा येत नाही Wink
इथे तुम्ही ४ बोटे टेकवायचे म्हणताहात, मग पराठ्याला चव येणार कशी??

माहिती आहे मला ... माझ्या एका पंजू मित्राची बायको एका पराठ्याला चार चमचे तेल सोडायची. पण पराठे भारी लागत. पण इतके तेल वापरायचा माझा तरी धीर होत नाही. म्हणून चार बोट Happy

तवा गरम् व्हायच्या आधी एक चमचा तेल घालून ठेवायचे. ते आपसूक गरम होत राहते. पराठा तव्यावर टाकायच्या आधी गॅस मोठा करायचा व तो अलगद तव्यात सोडायचा. हे मी खास लिहीत आहे कारण ते गरम तेल हातावर उडून भाजते. मग लक्ष तव्यावर हवे. पराठा उलटून कडेने तेल सोडून मग गॅस बारीक करयचा. व दुसरा लाटून तयार ठेवायचा.

माझे स्काइप करायचे दिवस संपले कधीच. आता अकाउंटच नाही हो.

अहो खाते हवे तर मी उघडून देईन. एक जनरल माबो खाते उघडायचे. कुणाची रेसेपी आवडली तर स्काईप वर वर्ग घ्यायचे. त्यानिमित्ताने इथले आपले ऋणानुबंध आणखी दृढ होतील. आम्ही मराठी भाषा दिवसासाठी स्काईपच वापरला होता.

मुळात स्काईप इतके नवीन आहे की आपण त्याच्यापुढे कधीच जुने होऊ नाही. तंत्रज्ञानामधली स्काईप मी मला सर्वाधिक प्रिय सोय आहे. व्हाटसअप सारखा अपव्यय नाही होत.

फेरविचार करा ह्यावर Happy आणि इतरांनी मला ह्या मतावर १०० गुण मिळवून द्या म्हणजे अमा पराठे शिकवतील Happy लवकर लवकर प्लस वर टिचकी मारा Happy आगावू आभार Happy

१०० गुण मिळाल्यावर अमांनी पराठे शिकवण्याचं कबुल केलंय का?
मुळात स्काईप इतके नवीन आहे की आपण त्याच्यापुढे कधीच जुने होऊ नाही.>>>>>>>>> म्हणजे कस्काय?
आणि व्हाटसअपवर कशाचा अपव्यय होतो म्हणे?

सस्मित, मी माझ्या फोनमधले व्हाटसअप कंटाळून वीट येऊन काढून टाकले. कारण, जो तो फक्त जोक्सच फॉरवर्ड करतो आणि दुसर्‍या दिवशी साचलेल्या इमेजेस डीलीट करण्याचे आगावू काम देतो. शिवाय आलेल्या जोक्सवर सुद्धा काही जण अभिप्राय अपेक्षित करतात. म्हणून मी (वेळेचा) अपव्यय हा शब्द वापरला.

पराठे चविष्ट होण्याकरता साजूक तूप आणि मंद आचेवर पराठा शेकणे अनिवार्य आहे. सारण किंवा अंगभूत ईतर घटक पदार्थ न घतलेल्या कणकेच्या पराठ्यांची चव देखिल तोंपासू होते

तिखट मीठाची चव, तेल कमी जास्त घालण्याशी निगडीत असते का?

बी तुझाच असला म्हणून काय झालं धागा भरकटवू नकोस. Wink

ठेपल्यामधे सारण असते का? माझ्यामते नाही पण किती चवदार लागतात ना? !!! मला सारण भरुन केलेल्या पराठ्यापेक्षा कणकेत मिसळून केलेले पराठे जास्त आवडतात. अपवाद: मुलीपराठा आणि गोबीपराठा.

बी,

तुमच्या पराठ्यात साखर दिसली नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यात मात्र आहे : http://the-cooker.blogspot.sg/2007/06/parathas-for-breakfast.html

मी पदार्थ शिजवण्याच्या बाबतीत अगदी ढ आहे. केवळ चटकन नजरेस पडलं ते लिहिलं आहे.

आणि हां, ते ऑलिव्हचं तेल देशी जेवणासाठी अजिबात वापरू नका. पार निरुपयोगी आहे.

आ.न.,
-गा.पै.

ठेपले करताना मी त्यात थोडे दही, शक्यतो साईचे दही अन थोडे बेसन घालते..
त्यामुळे ठेपले खुसखुशीत होतात आणि कमी तेलावर भाजले तरी चालतात...

गुजराथी पोळीवाली मावशीची युक्ती...

थेपले करताना मी भाजी (ज्या भाज्यांना पाणी सुटतं ) थोडीशी वाफवुन घेते. माझी क्रुती अशी:
१. कढईत थोडं तेल गरम करायचं.
२. त्या तेलात थोडे तीळ घालुन चिरलेली भाजी ( कोबी (मी किसुन घेते), पालक आणि मेथी असेल तर फक्त पानं घ्यायची) घालुन थोडं पाणी सुतेल इतपतच परतयचं
३. आता यात चविपुरतं मीठ, तिखट, आलं लसुन पेस्ट आणि ओवा घालायचा.
४. या मिश्रणात कणिक आणि बेसन ३:१ या प्रमाणात घालावे.
५. शक्यतो पाणी घलु नका.
६. गोळे करुन, लाटुन, मंद आचेवर खरपुस भाजुन घ्या.

असा केलेला ठेपला कमी तुपचा हि बरा लगतो.

मी घालते पराठ्यांना मोहन आणि दही.
इथे एका देवळाच्या कॅफेटेरियात मिळणारे गूळ घातलेले ठेपलेही आवडले होते

तिखटामिठाची चव लागत नसेल तर तिखटमीठ कमी पडत असलं पाहिजे - प्रमाण वाढवून बघा.
वर तुम्ही दिलेलं प्रमाण किती पिठासाठी आहे ते कळत नाहीये.
आवडत असेल तर लाल तिखटाच्या जोडीला चिली फ्लेक्सही घालता येतात (मी घालते, मला आवडतो फ्लेवर ब्लास्ट!) तसंच ओवाही घालते.

लसणाची चटणी / हिरवी मिरची ठेचा / वऱ्हाडी ठेचा / उरलेली पावभाजी / उकडून केलेली बटाट्याची भाजी / लोणच्याचा खार वगैरे पदार्थ वापरूनही पराठ्यांचा स्वाद अधिक खुलवता येऊ शकतो. कांदापात, लसूण पात थोड्या प्रमाणात कणकेत मिसळूनही वेगळा स्वाद येतो. पराठ्यांची खरी लज्जत देसी घी, लोणी यांमुळे वाढते. सोबत दही किंवा लस्सी असेल तर वाह वाह! आणि अचार / लोणचे असेल तर मस्तच! शिवाय उभा चिरलेला कांदा, लाल मुळा, काकडीच्या चकत्या असा ऐवजही हवाच! पराठा ही तबियतीने खायची चीज आहे.

नाहीतर मग पोळीवर्गातला किंचितसा तेलातुपाचा व तिखटाचा हात लावलेला पराठा - असा पराठा गरमच चांगला लागतो हेमावैम.

मां का प्यार Happy

सिरीअसली!
पराठा हा असला प्रकार आहे ना की एखादी आई आपल्या मुलाला कसे पौष्टीक पण चवदार मिळेल आणि महत्वाचे म्हणजे त्याचे पोट भरेल हा विचार करून बनवते आणि त्याला आपसूकच एक चव येते.
स्वत:च पराठी तयार करायचे आणि स्वतःच खायचे यात कधीही अपेक्षित चव येणार नाही, त्यासाठी मॅगी असते. Happy

पराठे करताना मी तव्यावर तेल,तूप टाकत नाही, पराठा जर गरम झाला कि वरच्या बाजूवर थोडस तूप किंवा लोणी चमच्याने झटकन फिरवते आणि पराठा उलटते, तो चांगला भाजून होईपर्यंत वरच्या पाराठ्यावर तसेच तूप किंवा लोणी लावायचे आणि ती बाजू नंतर भाजून घ्यायची. म्हणजे पोळी सारखाच ३ वेळा पराठा परतते, पण ४ बोटे तुपातही पराठा छान होतो.

मी देखील उरलेल्या डाळीचे,भाजीचे पराठे करते, परंतु त्यात मीठ, मसाला, तिखट थोड जास्तच घालाव लागतं, भिजवलेल्या कणकेची चव घेऊन पहा पराठा करण्यापूर्वी, तुम्ही लिहिलेलं दोन चिमुट मीठ फारच कमी वाटत आहे, तसेच रंग येण्यासाठी हळद घालते अर्धा ते १ चमचा, तुमच्या साहित्यात ती दिसत नाही, त्यामुळे लिंक सारखा रंग येत नसेल.

फक्त नवर्‍याने त्याचे प्रेम टाकले की झालं. अगदी मीठाची सुद्धा गरज नाही. Wink

बायको मायबोलीवर आवडीचे काम करताना, कुरबुर न करता, मंद हास्य चेहर्‍यावर ठेवून अगदी आवडीने नवर्‍याने पराठा बनवला आणि वाढला तर नक्कीच चव असते.

Proud

बी,
पराठ्याला चव आणण्यापेक्षा तो जर एखाद्या चविष्ठ (उदा. लोणचे, दही चटणी, स्प्रेड, इ.इ.) पदार्थाबरोबर खाल्ला तर कसे?

स्वरुप, बरोबर. मी तसेच करतो.. रादर करावे लागते चवीसाठी. पण मी जिथेजिथे ज्यांच्याकडे पराठे खाल्ले आहेत ते नुसतेही छान लागलेत.

निसर्ग चक्र, उत्तम निरिक्षण.

चव वाढवण्यासाठी मी जे पदार्थ वापरते ते सगळे वरच्या पोस्टींत आलेले आहेत त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यासारखं काही नाही.
पण काल धागा बघितल्यापासून 'पराठ्यात काय टाकता' हा शब्दप्रयोग खूप खटकतो आहे. 'पराठ्याला चव येण्यासाठी काय घालता / कुठले पदार्थ वापरता ?' असा काहीतरी बदल करता येईल का ? आजकाल फार रुळला आहे हा चुकीचा शब्दप्रयोग Sad

अगो मी बदल केला आहे पण बोलीभाषेतून असेच बोलतात. निदान आमच्यात तरी. मला स्वतःला बोलीभाषेच्या जवळ जाऊन लिहायला आवडतं.

धन्यवाद बी.
मला प्रमाण मराठीइतक्याच प्रादेशिक बोलीही वाचायला, ऐकायला आवडतात. पण तरी हा शब्दप्रयोग खटकतो एवढं खरं. ते खटकणं बरोबर आहे की चूक हे इथले जाणकार सांगू शकतील.

अगो चे मला ही पटले. मलाही धागा वाचताना तसे जाणवले पण लिहिले नाही. कारण चांगल्या टिप्स शेअर होत आहेत.
'टाकणे' हा शब्द्प्रयोग हल्ली खूप वेळा केला जातो आणि तो खटकतो ही. जसे 'भाजीत कोथींबीर टाक' , 'आमटी संपवून टाक' वैगरे. मी कटाक्षाने हे टाळते. 'टाक' चा शब्दशः अर्थ 'फेक' (throw away) असा मला तरी वाटतो.
त्या ऐवजी 'भाजीत कोथींबीर घाल, 'आमटी संपव' असे बोलणे जास्त बरोबर वाटते.
माझ्याकडे चपात्या करणार्या ताई ही ' दिदी आधी पीठ मळून टाकते' असे म्हणायच्या. त्यांना मी नेहेमी सांगायचे 'अहो मळून ठेवा, टाकता कशाला?'

Pages