सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

Submitted by मार्गी on 18 July, 2015 - 11:28

मायबोलीवरील लेखनाचा श्रीगणेशा करताना सर्व मान्यवर माबोकरांना सादर अभिवादन!!

सायकलीसंगे जुले लदाख़ भाग ०- प्रस्तावना

लदाख़! भारताचा विलक्षण रमणीय प्रदेश! वस्तुत: ते एक ठिकाण किंवा पर्यटन स्थळ नसून एक अद्भुत जगत् आहे! लदाख़ असे जग आहे ज्यामध्ये बर्फाच्छादित पर्वत, नद्या, धबधबे, जंगल, दंग करणारे सरोवर, वाळवंट हे सर्व आहे! जणू लदाख़ एक युनिव्हर्स आहे ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टी एकत्र बघता येतात. चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा ह्या विश्वाचा थोडा आस्वाद घेतला होता, तेव्हापासून इथे परत येण्याची तीव्र ऊर्मी होती. त्यानंतर जेव्हापासून विलक्षण भारतीय ट्रेकर आणि साहसी प्रवासी नीरज जाटचा लदाख़ सायकल प्रवास वाचला, तेव्हापासून मनाशी ठरवलं की, लदाख़ सायकलवरूनच जायचं. दोन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. त्याचा प्रवास बघून लगेचच एक गेअरची प्राथमिक सायकल विकत घेतली. दहा वर्षांच्या गॅपनंतर जीवनात सायकलचं पुनरागमन झालं. हळु हळु सायकल चालवण्याचं कौशल्य पुनरुज्जीवित होत गेलं. एका दिवसात दहा, पंचवीस, चाळीस, साठ किलोमीटर सायकलिंग असं वाढत गेलं. लवकरच शतकसुद्धा झालं. मध्ये मध्ये सायकलिंग खंडितसुद्धा व्हायचं; आणि नव्याने सुरूही व्हायचं. सायकल हातात घेतल्यानंतर दोन वर्षांच्या आतमध्ये सहा हजार किलोमीटरसुद्धा पूर्ण झाले ज्यामध्ये सात शतक आणि वीसहून अधिक अर्धशतकसुद्धा झाले. गेल्या वर्षी टारगेट फायरफॉक्स ही एडव्हान्स सायकलसुद्धा घेतली.

हाच क्रम पुढे सुरू राहिला आणि हळु हळु विश्वास येत गेला की, लदाख़ला सायकलीवरून जाता येऊ शकेल. योगायोगाने सर्व गोष्टी अनुकूल राहिल्या. हळु हळु लदाख़चा प्लॅन तयार झाला. परंतु जेव्हा जेव्हा सायकलीवर मोठा प्रवास करून यायचो, तेव्हा आतमधून इशारा यायचा- बस, झालं लदाख़ इथेच! जेव्हा उन्हाळ्यातल्या भर दुपारी रस्त्यामध्ये थकलेल्या स्थितीमध्ये पंक्चर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न करायचो, तेव्हा वाटायचं झालं लदाख़ इथेच! सायकलवरून एक मोठा प्रवास करणं शिखर पार केल्यासारखं होतं. शिखर पार केल्यानंतर उतरून दरीमधल्या अंधारातून जावं लागतं. त्यावेळी वाटायचं पुरे झाला वेडेपणा! खूप झालं! पण दुस-या दिवशी परत ऊर्जा यायची. हाच क्रम पुढेही सुरू राहिला. शिखरानंतर दरी आणि परत नवीन शिखर. हळु हळु ग्रेड ५, ग्रेड ४ आणि ग्रेड १ चे घाटसुद्धा चढता येऊ लागले. महाराष्ट्रातल्या तोरणमाळ आणि पुण्याजवळच्या सिंहगडासारखे घाट सायकलीवरून पार केले. वाढणा-या स्टॅमिनाचा अंदाज येत होता. सुरुवातीला अगदी छोटा घाटसुद्धा सायकल चालवत जमायचा नाही. एक तृतीयांश सायकलवरून केल्यानंतर पायी पायी जावं लागायचं. हळु हळु सरावाने तोच चढ सायकलवर पार करता आला; परंतु तीन वेळा मध्ये थांबावं लागलं. नंतर तोच चढ न थांबता पार झाला. पुढे सलग चार वेळेस न थांबता जमू लागला. त्यानंतर तर तो चढ हायर गेअरवरसुद्धा करता आला. स्टॅमिना वाढत असल्याचा अनुभव असा आला.

स्टॅमिना वाढवण्यासोबत सायकलच्या मॅकेनिकचं कामसुद्धा शिकत गेलो. सायकल पूर्ण विलग करणे- जोडणे शिकलो. चाकं आणि पूर्णा सांगाडा वेगळा करणे शिकलो. पंक्चर आणि प्राथमिक ब्रेक सेटिंग- गेअर प्रणालीसुद्धा शिकलो. पंक्चर शिकताना मजा आली. अनेक वेळेस पंक्चर काढताना बघितल्यावर वाटायचं की ह्यात काय आहे शिकण्यासारखं? पण जेव्हा अर्धा दिवस सायकल चालवल्यानंतर खरोखर रस्त्याच्या काठाशी भर उन्हात सायकल उभी करून पंक्चर काढण्यासाठी बसलो तेव्हा खरी गत कळाली! पाच सहा वेळेस अयशस्वी प्रयत्नानंतर पंक्चर लावता आलं! परंतु ही गोष्ट चांगली होती की, मी स्वत:ला पाच- सहा वेळेस असफल होण्य़ाची संधी तरी दिली. त्यातूनच शिकत गेलो. लदाख़ जाण्याआधी किमान सलग आठ दिवसाचा एखादा मोठा सायकल प्रवास करण्याचा विचार होता. पण तसं होऊ शकलं नाही. तसं झालं असतं तर अजून मोठा सराव झाला असता. परंतु त्याशिवाय इतर तयारी सुरू ठेवली. डिसेंबर २०१४ मध्ये सलग नऊ दिवसांमध्ये एकूण सुमारे ५५० किलोमीटर सायकल चालवली होती.

ह्या पूर्ण प्रयत्नांमध्ये महाराष्ट्रातील परभणीच्या सायकलिंग ग्रूपचे सदस्य, नीरज जाट आणि नांदेडचे एक सायकलिस्ट ह्यांनी खूप मार्गदर्शन केलं. २०१५ सुरू होईपर्यंत सायकलिंगमध्ये सातत्य वाढलं. वजनही हळु हळु कमी झालं. लदाख़ल जाताना सायकल ट्रेनमध्ये फोल्ड करून नेण्यावर खूप विचार केला. अनेक वेळेस तो जुगाड करून बघितला. सायकल दोन मिनिटात फोल्ड तर व्हायची; पण चाकं राहायची. त्यांना पोत्यात ठेवणं जमलं नाही. खूप विचार विमर्श आणि खटाटोप केल्यानंतर सायकल ट्रेनच्या पार्सलमध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला.

सायकलीमध्ये नवीन चेन आणि मजबूत पण महाग असलेले नवीन टायर्स आणि ट्युब टाकली. चांगली सर्विसिंग करून घेतली. ही योजना सोलो सायकलिंग होती. सर्वांना आश्चर्य वाटलं; अनेक सूचना झेलाव्या लागल्या. निघताना एक्सेसरीज संदर्भातसुद्धा खूप सूचना ऐकाव्या लागल्या. मनातून ज्या गोष्टी आवश्यक वाटल्या; त्याच फक्त केल्या. सर्व तयारी झाल्यानंतर २६ मे ला लदाख़ जाण्यासाठी निघालो.

मूळ योजना मनाली- लेह जाण्याची होती. मेच्या शेवटी उघडणारा मनाली- लेह रस्ता ह्या वर्षी उघडलाच नव्हता. किंबहुना तिथे मोठा बर्फ अजूनही होता. लवकर उघडण्याची लक्षणं नव्हती. म्हणून श्रीनगर रस्त्यानेच जावं लागलं. करगिलपासून सायकलिंग सुरू करावसं वाटलं. अंबालापर्यंत ट्रेन, मग जम्मूपर्यंत बस, जम्मू ते श्रीनगर जीप आणि श्रीनगर ते करगिल जीप असा प्रवास झाला. जम्मू- श्रीनगरमध्ये ट्रॅफिक किंवा 'स्थानिक' कारणांमुळे अडकून राहण्याची वेळ आली नाही आणि सरळ पुढे जाऊ शकलो. अर्थात् सायकल ट्रेनमधून नेताना असंख्य अडचणी आल्या. दर वेळी काही जुगाड करावा लागला. शेवटी अंबाला कँटपासून करगिल न थांबता पोहचलो.

श्रीनगरच्या पुढे सोनामार्ग आणि झोजिलामध्ये मोठा बर्फ होता. उन्हाळ्याच्या ह्या दिवसांमध्ये इतका बर्फ थोडा अनपेक्षित होता. सलग तीन दिवस प्रवास करून २९ मेला संध्याकाळी करगिलला पोहचलो. करगिलमध्ये एक साधं हॉटेल शोधलं आणि आराम घेतला. खाण्यासाठी बरं हॉटेल काही मिळालं नाही. कसेबसे बिस्किट- चिप्स खाल्ले. गमतीची एक गोष्ट अशी आहे की, करगिल २७०० मीटर्स उंचीवर आहे आणि इथे हवा थोडी विरळ आहे. हवेचा दाब कमी असतो. त्यामुळे चिप्सचं पॅकेट आतून एअर टाईट असल्यासारखं दिसत आहे! करगिलमध्ये सुरू नदीचा निनाद खरोखर रोमांचकारी आहे. करगिल! एलओसीवर आजचा मुक्काम!

परंतु त्याव्यतिरिक्त मनात अजिबात उत्साह नव्हता. जम्मूपासून पुढे पहाडी रस्ता होता; उलटीच्या शक्यतेमुळे काहीच खाल्लं नाही. प्रवासातही कमीच खाल्लं होतं. म्हणून ऊर्जा स्तर अगदी खाली होता. मनामध्ये भिती प्रचंड होती. आजपर्यंत कधीच २५०० मीटर्सपेक्षा अधिक उंचीवर ट्रेक किंवा सायकलिंग केलेलं नाही. लदाख़ आधीही गेलो आहे, पण तेही जीपमध्ये. हिमालयामध्ये काही ट्रेक केले आहेत; पण ते सर्व छोटे किंवा मध्यम श्रेणीचे होते आणि २५०० मीटर्सच्या खालचेच होते. ह्या सगळ्यामुळे मना शंका कुशंका वाढत गेल्या. सपाट जमिनीवर कितीही सायकल चालवली असली, तरी आता "इथे" सायकल चालवणे ही एकदम वेगळी गोष्ट आहे. अनेकदा वाटून गेलं की, चला, इथूनच परत फिरा; पुढे जाणं अशक्यप्राय आहे. इथून कमीत कमी श्रीनगरला तरी लगेच पोहचता येईल. मनामध्ये सतत सी-सॉ सुरू राहिला. रात्री झोपही आली नाही आणि अस्वस्थतेच रात्र गेली. रात्री उशीरा कधी तरी झोप लागली. . . .


सोनामार्ग आणि बर्फ


झोजिलाजवळील बर्फ


करगिल, सायकल आणि सुरू नदी!

पुढील भाग: सायकलीसंगे जुले लदाख़ भाग १- करगिल ते बुधखारबू (७१ किमी)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टींग. झोझिलावर बसने प्रवास करतानाही जीव मुठीत धरलेला. सायकल्ने प्रवास आणि तेही बर्फ असताना???????? सलाम तुम्हाला.

पुढचे अपडेट्स टाका लवकर.

खूप मस्त

लवकर लवकर टाका भाग
आशु च्या सायकल प्रवासानन्तर काय वाचावे हा प्रश्न सुटला Wink

अफलातून कल्पना आणि त्याहून अफलातून प्रवास .....

यातले काही एक मला सुरुवातीला झेपलेही नाही आणि तुम्ही चक्क एकटे लडाखला आणि तेही सायकलप्रवास !!!

_________________________/\________________________