डाळ कांदा

Submitted by टीना on 4 July, 2015 - 04:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. तासभर भिजवलेली १/२ वाटी तुरडाळ
२. पोह्यांसाठी चिरतो तसा लांब चिरलेला १ मोठा कांदा
३. ३ हिरव्या मिरच्या
४. ४ लसुण पाकळ्या बारिक चिरलेल्या
५. थोडसं किसलेल अद्रक
६. मोहरी, जिरं, तेल, तिखट, मिठ, हळद, एव्हरेस्ट चिकन मसाला
७. सांभार / कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

* तेल तापल्यावर त्यात मोहरी जिर्‍याची फोड्णी द्यावी. मग त्यात कांदा + मिरची + लसुण + अद्रक टाकावे.

* कांदा लालसर झाल्यावर त्यात पाऊण चमचा तिखट + मिठ + हळद टाकावे.

* सर्व परतवल्यावर त्यात डाळ टाकावी.. पाऊण वाटी पाणी टाकुन त्यावर झा़कण ठेवावे.

* शेवटी गॅस बंद करुन पाव चमचा चिकन मसाला आणि सांभार टाकून जरा वेळ भाजी झाकुन ठेवावी.

Dal kanda (1).JPGDal kanda (2).JPG

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी पुरेसं
अधिक टिपा: 

१. यात गोडलिंबाची पान टाकू शकतो.. टाकताना जराशी चुरगाळून टाकावी म्हणजे त्याचा फ्लेवर संपुर्ण भाजीला लागण्यासाठी मदत होते.

२. टोमॅटो सुद्धा टाकु शकतो पण अख्खा टाकु नये..

३. साखर टाकायची आवश्यकता नाही. गोडाची आवश्यकता कांदा पुर्ण करतो. तरिही राहवल नाहीच कुणाला तर अगदी थोडी टाकावी.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अगं मला आपल्याकडेच दिसली ही भाजी करताना म्हणुन वैदर्भीयच म्हणुया .. कामचलाऊ भाजी.. ज्यावेळी घरात काही नसते त्यावेळी करायचा प्रकार पण तरी मला खुप जास्त आवडतो Happy

छानच रेसिपी.
खुपसे संदर्भ विदर्भातले आहेत म्ह्णून वाचताना मजा येतेय. ( अद्रक, गोडलिंबाची पाने, पोह्यासाठी लांब कापलेला कांदा वगैरे )

दिनेशदा धन्यवाद.. नेहमीचे शब्द टाळता नाही ना येत Happy

मंजुताई, आम्ही तर नाही करत..
फोडणी दिलेल्या हरभर्‍याच्या डाळीचा नैवैद्य असतो पण आमच्याकडे अनंतचतुर्दशी ला Happy आणखी एक आवडता प्रकार माझा नैवेद्यातला पुरणच्या मोदकांखालोखाल Happy

मंजुताई, आम्ही तर नाही करत..फोडणी दिलेल्या हरभर्‍याच्या डाळीचा नैवैद्य असतो पण आमच्याकडे अनंतचतुर्दशी ला स्मित आणखी एक आवडता प्रकार माझा नैवेद्यातला पुरणच्या मोदकांखालोखाल स्मित ++१
मी एरवी सुद्धा करते हि डाळ! खुप आवडते मला..
महालक्श्मी च्या नैवेद्यात मोकळी डाळ करतात..मिक्सर मधुन एकदा काढायची ..फोडणी देण्याआधी!! Happy

हडाची पण करतात का? >> काय रे ते शॉर्टफॉर्म. ह.घ्या.
मी आपले हडाची की हाडाची मधे कन्फ्युज. हाडाची कशी होईल डाळकांदा की हाडकांदा Lol
मृदुलचा प्रतिसाद वाचला आणि क्लिक झाले.

आवडती भाजी
मी हरभरा, मुग , मसूर ची पण करते.
डाळी प्रमाणे इतर जिन्नस , त्यांचे प्रमाण, भिजवणे , शिजवणे यांचे प्रमाण बदलते

सांभार म्हणजे कोथिंबीर लिहिलय कि मी वर..

निल्सन हडाची वाचुन दोन मिनीटांसाठी मी पन सटपटलेच होते Lol

मृणाल १ , हरभरा नै पण इतर मी पण करते.

ओह..चिकन मसाल्यालाच गरम मसाला लिहिलय वाटते मी ... करते बदल.. मला वाटल कळून जाईल Wink

चनस, आता तु निदर्शनास आणलच आहे तर सांगते.. माझा अभ्यास, माझ वर्कशॉप, माझा डाईनिंग सगळ काही तो टेबल आहे .. बेडवर बसुन या गोष्टी होत नाही अग माझ्यानं.. दोन चार आनखी रेसिपी टाकल्यावर कळेल की ताटवाटी पण तिच असते Lol .. बघ मागं स्पिकर पन आहे Wink

मस्त << कामचलाऊ भाजी.. >>> बर्‍याचदा डब्यात न्यायचो शाळेला , आता कधीतरी होते घरी पण आवडती आहे माझी Happy

मला पण अशी डाळ खुप आवडते. मी टॉमॅटो टाकते. नुसत्या लाल तिखटात केलेल्याची चव मला आवडते. बाकी मसाले टाकलेत तर चव बदलते.

मस्त आहे. चिकन मसाल्याला पर्याय काय? तुरडाळ खात नाही. चणाडाळ घालून बघेन. माझ्या कोल्हापूरच्या मैत्रिणी बहुतेक कांदा लसूण मसाला टाकतात. तो घालून बघेन.

फोटोपण मस्त. डिशच्या बाजूची सजावटीची फुलं पण तूच केलेली दिसतायेत टीना. ऑलराउंडर आहेस.

अन्जू,
कुठलाही गरम मसाला इन आहे.. त्यातल्या त्यात चिकन मसाला टेस्टी लागतो म्हणुन मी तो टाकते..
हि भाजी कांद्यामुळे जरा गोडसर होते म्हणुन स्पाईसेस..नाहीतर तर ती ही आवश्यकता नसती.. निव्वळ गोड गोड लागु नये करिता मसाला Happy

सजावटीची फुलं >> हो. तरी त्यांना फिनीशिंग टच दिलाच नाही.. बस करुन ठेवलीत.

Pages