किल्ला: आहे मनोहर तरी........

Submitted by ए ए वाघमारे on 1 July, 2015 - 22:59

killa2.jpg

तर मराठीत सध्या ' वयात येता ' नाच्या गोष्टी सांगणार्‍या सिनेमांची लाट आली आहे. किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला '. सिनेमाची तपशीलवार कथा सांगून समीक्षेने रसिकांच्या रसभंगाचं पाप करू नये असं मला वाटतं. म्हणून सरधोपटपणे कथा सांगणं इथे टाळलं आहे .

वडिलांचा इतक्यातच मृत्यू झालेला. त्यातच आईच्या(अमृता सुभाष) झालेल्या बदलीमुळे सातव्या वर्गात शिकणार्‍या आपल्या नायकाला म्हणजे , चिन्मय काळेला (अर्चित देवधर) पुण्यासारख्या मोठ्या शहरातून गुहागरसारख्या ग्रामीण भागात यावं लागतं. तो तिथल्या नव्या निसर्गाशी , नव्या वातावरणाशी , नव्या मित्रांशी जुळवून घेऊ शकतो का ; त्याच्यात या काळात काय बदल होतात ; तो सभोवतालशी कसा ' रिअ‍ॅक्ट ' करतो अशी या चित्रपटाची साधारण कथा आहे.

हल्ली मराठी सिनेमात ' महोत्सवी चित्रपट ' म्हणून सिनेमाची एक नवी जात फोफावलेली आहे. ' किल्ला ' ही त्याच सदरात मोडणारा आहे. त्यात वावगं काहीही नाही पण त्यामुळे रूढ अर्थाच्या मनोरंजनाची अपेक्षा असल्या सिनेमाकडून करू नये. बर्लिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये वाखाणल्या गेल्यानंतरच ' एस्सेल व्हीजन ' सारख्या व्यावसायिक कंपनीने तो वितरणासाठी घेतला हे नमूद करायला हवं. जागतिक सिनेमात चलनात असलेले सर्व घटक जसे उत्तम छायालेखन , कल्पक प्रकाशयोजना , संवादांपेक्षा मुद्राभिनयावरील भर , जवळपास सर्वच कलावंतांचा चोख अभिनय , आवश्यक तेथे क्लोज अप , लॉंग शॉट्स , जिम्मी जिब इत्यादी आधुनिक तंत्राचा वापर , ऋतुरंगांचं नैसर्गिक चित्रिकरण , आपण सिनेमात बनवतोय या पदोपदी असणार्‍या जाणीवेतून आलेल्या दृष्यचौकटी इ.इ. घटक या सिनेमात आहेतच . त्यामुळे तो नक्कीच एकदातरी ' प्रेक्षणीय ' झाला आहे. आई- मुलाच्या संबंधातली तरलता व सखोलता , अडनिड्या वयातला मनोव्यापार , दुनियादारीची हळुहळू होणारी ओळख हे तसे फार कठीण विषय हाताळण्याचा प्रयत्न पहिल्याच आणि एकाच चित्रपटात करणं खरोखरच कौतुकाचं आहे. असा थोडासा जड विषय सुसह्य करण्यात बालकलाकार पार्थ भालेरावचा सहजसुंदर , नैसर्गिक अभिनय आणि इतर बालकलाकारांची जोरदार साथ यांचा मोठा वाटा आहे. सिनेमाच्या एकंदर विषयवस्तूवर , मांडणीवर आणि सादरीकरणावर जी.ए. कुलकर्णी , मोकाशी स्कूलचा प्रभाव वाटतो. सिनेमा बघताना मला क्रांती कानडेने दिग्दर्शित केलेल्या जीएंच्या कथेवर आधारित ' चैत्र ' या अप्रतिम लघुपटाची आठवण येत राहिली.

दै. लोकसत्तामध्ये आलेल्या दिग्दर्शक अविनाश अरूण ह्याच्या [बहुधा सदिच्छाभेट-वृत्तांतरूपी-प्रायोजित] मुलाखतीत त्यानेच सांगितल्याप्रमाणे सिनेमाची कथा ही त्याच्याच बालपणीच्या अनुभवांवर आधारित आहे. अशा काही अनुभवांचीच मोट बांधून चित्रपटीय कथा-पटकथा बांधण्याचा प्रयत्न सिनेमाकारांनी केलेला आहे. परंतु या कथेचं सिनेमात रूपांतर किंवा माध्यमांतर करताना मात्र काही दुवे निसटल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे एक परिपूर्ण व एकसंध अनुभव देण्यात ' किल्ला ' कमी पडतो.

' किल्ला ' ला जागतिक सिनेमाचे परिमाण देत असताना पटकथेत मात्र सुसूत्रतेचा , सुस्पष्टतेचा अभाव जाणवतो. सिनेमाकर्त्याला नेमकं काय सांगायचं आहे याबाबत खुद्द सिनेमाकर्त्याच्या कल्पना स्पष्ट आहेत का अशी शंका घ्यायला वाव आहे. कारण चित्रपट हे काही एखाद्या चित्रकाराने मूड असेल त्याप्रमाणे अ‍ॅबस्ट्रॅक्ट फटकारे मारून चित्र रंगवावं असा कलाप्रकार नाही , नेत्रसुखद , चित्ताकर्षक देखाव्यांचा पोर्टफोलिओ नाही तर सिनेमा हा अनेक कलांचा , तंत्रांचा एक बांधेसूद समुच्चय असतो. निदान व्यावसायिक सिनेमाबाबत तरी ही अपेक्षा असते. महोत्सवी आणि हौशी सिनेमाची गोष्ट वेगळी. ' किल्ला ' च्या बाबतीत नायकाच्या भावविश्वावर फोकस करायचं की प्रेक्षकांच्या ' नॉस्टाल्जिया ' ला चाळवायचं यामध्ये दिग्दर्शकाच्या मनात संभ्रम होता असं वाटतं. नसता तर सिनेमाच्या जाहिरातीत ' रिविजिट युअरसेल्फ ' असं आवाहन असतं ना. आता हे आवाहन मूळ संहितेतच होतं की नंतर व्यावसायिक वितरणावेळी कोणा ' बिजनेस हेड ' च्या हेडमधून निघालं हे समजण्यास वाव नाही. पण दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत . सध्या ह्या ' नॉस्टल्जिया ' ची फार चलती आहे , हे आपण वर उल्लेखलेल्या सिनेमांच्या यशावरून किंवा आपल्या व्हॉटस अ‍ॅप ग्रूपवर फिरणार्‍या मेसेजेसचा अभ्यास करून सहज सांगू शकतो. तशीही एकंदरीतच मराठी कलाविश्वात (नाट्य-सिनेमा-साहित्य सगळीकडेच) या नॉस्टल्जिया प्रकाराने उबग आणला आहे. मराठी अभिव्यक्तिचं यश आणि आवका सीमित राहण्यास या घटकाचा प्रादुर्भाव अधिक कारणीभूत आहे . हा एक स्वतंत्र विषय आहे.

सिनेमाची चित्रभाषा , लोकेशन्स वगैरे आधी ठरवून त्याभोवती प्रसंगांची , दृष्यांची गुंफण केली आहे असं वाटतं. किल्ला किंवा लाईटहाउस इत्यादी दाखावायचेच म्हणून प्रसंग आणि त्या अनुरूप संवाद रचले आहेत असं वाटतं. मुळात या कथेचा जीव एखाद्या लघुपटाचा असून त्याला ओढूनताणून पूर्ण लांबीचं केलं आहे की काय अशी शंका येते. उदा. नायक आणि एक दारूडा मच्छीमार यांच्यातले प्रसंग आता काही वेगळे घडेल का अशी उगाच आपली उत्सुकता चाळवतात. त्यामध्ये काही नाट्यमय होईल याची अपेक्षा सिनेमाचा एकंदर बाज पाहता तशीही नसतेच तरी त्यांच्या एका दृष्यात आपल्याला ' द ओल्ड मॅन अ‍ॅंड द सी ' चं काही तत्वज्ञान ऐकायला मिळेल का अशी सुखद शंका येते पण नंतर विरते. असे काही प्रसंग डिसकनेक्टेड वाटतात. संवादलेखनात , विशेषत: चिन्मयच्या आईच्या ऑफिसच्या उपकथानकात थोड्या अधिक ऑथेंटिसिटीची , अभ्यासाची गरज होती. ती नसल्याने तो कथाभाग कन्व्हिंसिंग वाटत नाही तर एखाद्या फिलरसारखा किंवा क्लायमॅक्सची सोय केल्यासारखा , टेकू दिल्यासारखा ओळखू येतो. त्यातल्या सरकारी बाबूंची भाषा ऐकून मला उगाच मराठी मालिकांमधल्या शुद्ध , प्रमाण भाषेत बोलणार्‍या गुंडांची आणि पोलिसांची आठवण आली. अशा गोष्टी मुख्य कथाविषयाचा प्रभाव नाहकच कमी करण्यास कारण होतात. संकलकाने या गोष्टी जरा गंभीरपणे घ्यायला हव्या होत्या. पण त्यामुळे सिनेमा काही टाकाऊ होत नाही. जाताजाता , नायकाच्या गळ्यातलं जानवं सिनेमाभर उगाच हायलाईट केल्यासारखं का दाखवलंय अशी एक ' पुरोगामी ' शंकाही मध्येच येऊन गेली पण आम्ही तिची लगेच ' घरवापसी ' केली. असो.

पूर्वीच्या काळी , आपण एखाद्या पर्यटनस्थळी फिरून आलो की तिथे काढलेले फोटो प्रत्येक आल्यागेल्याला दाखवण्याची पद्धत होती. तशी ती आताही आहे. फक्त अल्बमची जागा फेसबुक , पिकासा , इन्स्टाग्राम वगैरेंनी घेतली आहे. पण त्यातल्या त्यात सोय म्हणजे UNFOLLOW चे सेटींग़ करून आपण आपल्या फोटोपोस्ट्या मित्रांचा समावेश आपल्या ' शत्रुपक्षां ' मध्ये होण्यापासून टाळू शकतो. आपल्या या नेटमित्रांनी पोस्ट केलेले फोटो अनेकदा खरंच छान असतात , आपल्याला मनस्वी आवडतात. आपण नकळत (आणि मित्राला राग येऊ नये म्हणून) त्या फोटोंना लाईक करत , एखादी कमेंट करत पुढे जात असतो. आपला मित्रही तिकडे आपल्या लाईक्सची आणि कमेंट्सची आतुरतेने वाट पाहत असतो. कारण त्या प्रत्येक फोटोमागे त्याची स्वत:ची अशी एक कहाणी असते , प्रत्येक लाईकगणिक तो सुखावत असतो. आपण मात्र काही काळाने ते फोटो विसरूनही जातो. कारण त्या फोटोंची ती कहाणी आपल्याला माहीत नसते. क्वचित माहीत असली तरी आपण तिच्याशी ' रिलेट ' करू शकत नाही. आणि का कोण जाणे पण ' किल्ला ' बघताना माझंही असंच झालं. सिनेमागृहातून परतताना कोकणातली नयनरम्य दृष्यांची मनोहर ' पोस्टकार्ड्स ' तर लक्षात राहिली पण मायना हातात पूर्णपणे न लागल्याची हुरहूरही लागून राहिली.

माझं हे आणि इतर लिखाण वाचण्यासाठी:aawaghmare.blogspot.in

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी किल्ला पाहिला नाही. चांगलं लिहीलं आहे, आवडलं. प्रत्येक गोष्टीचा विविध बाजू्ंनी केलेला विचार आवडला.
मलाही हल्ली वाटतं की हिंदी सिनेमांची जशी अकारण हवा केली जाते, प्रमोशन केलं जातं तसंच मराठीतही होतंय. का होऊ नये? चांगलंच आहे. पण कधी कधी जे कलाकार अशा गोष्टींची तोंडभरून अथक स्तुती करताना दाखवतात, तुम्ही पाहाच असा आग्रह करतात ते तितकंसं खरं नसतं हे प्रेक्षकांनी समजायला हवं. ही व्यावसायिक गणितं असतात. माझ्यासारख्या मठ्ठ प्रेक्षकाला जेव्हा 'द' अतुल कुलकर्णी अमूक सिनेमाबद्दल चार वाक्यं प्रशंसेची बोलतोय तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असणारच वाटून सिनेमा बघितला जातो. कधीकधी तो अपील होत पण नाही, मात्र अरे! एवढे थोर लोक त्याबद्दल स्तुती करतायत तर आपल्यालाच तो कळला नसेल असं समजून गप बसतात. तिकडे त्यांचा कार्यभाग साधलेला असतो, गल्ला भरलेला असतो. त्यामुळे कुणीही भलावण केली तरी शेवटी तो बिझनेस आहे, आणि कलाकृती आवडणं हे व्यक्तीसापेक्ष आहे ही खूणगाठ मनाशी बांधली आहे.

Interesting. When everyone is praising a movie, it takes guts to write something so honestly.

<नायक आणि एक दारूडा मच्छीमार यांच्यातले प्रसंग आता काही वेगळे घडेल का अशी उगाच आपली उत्सुकता चाळवतात. त्यामध्ये काही नाट्यमय होईल याची अपेक्षा सिनेमाचा एकंदर बाज पाहता तशीही नसतेच तरी त्यांच्या एका दृष्यात आपल्याला ' द ओल्ड मॅन अ‍ॅंड द सी ' चं काही तत्वज्ञान ऐकायला मिळेल का अशी सुखद शंका येते पण नंतर विरते. >

'घडणं' म्हणजे नक्की काय? तत्त्वज्ञान 'ऐकू यायलाच' पाहिजे का?
आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक प्रसंग बघून ते समजून घेतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तत्त्वज्ञान ऐकत नाही. तसंच चित्रपटांचंही. Happy

या चित्रपटात केला आहे, तसा दृश्यात्मकतेचा सुरेख वापर गेल्या अनेक वर्षांत पाहिलेला नाही.
विस्थापन आणि एकटेपण या दोन्हींचा त्या समुद्रातल्या प्रसंगाशी संबंध आहे. अतिशय महत्त्वाचा असा बदल या एका प्रसंगामुळे घडून येतो.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !

श्री.चिनूक्स ...१००% सहमत. मलाही तेच म्हणायचं आहे. या प्रसंगाकडून माझ्या जास्त अपेक्षा होत्या. Not necessarily by way of dialogues. पण त्याचा रिझल्टंट मला अपेक्षेइतक्या परिमाणात जाणवला नाही. हे परीक्षण काही परिपूर्ण नाही आणि मला जसं पाहिजे होतं तसं उतरलंही नाही. ती माझी मर्यादा.

'किल्ला' बाबतच्या अनेक गोष्टी तार्किक-भावनिक इ. शब्दात पकडणं सोपं नाही. हेच सिनेमा या माध्यमाचं वेगळेपण आणि चांगल्या कलाकृतीचं एक लक्षण आहे.

लिहिलंय चांगलं. पण काही गोष्टींबाबत असहमत.
१. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला ' <<
विहीर आणि फॅण्ड्री ठिके पण बालक-पालक आणि टाइमपास हे या यादीत असायची अजिबातच गरज नाही. असो.

२. फिल्म फेस्टिव्हल्स मधे लागणार्‍या फिल्म्सबद्दल एक निगेटिव्ह सूर लावून बोलायची फॅशन आलेली आहे. हा सूर लिखाणात स्पष्ट जाणवतो. जे काही तंत्रातले चांगले वगैरे आहे ते सगळे चलाखी म्हणून केलेले आहे असे म्हणणे जाणवले. आणि म्हणून ते खटकले.

३. चिन्मयच्या आईच्या ऑफिसचा कथाभाग हा उगाच तपशीलवार केला नाहीये. त्यात येऊ शकेल असा मेलोड्रामा टाळलाय हे मला तरी अतिशय योग्य वाटले. कथा चिन्मयची आहे. त्याच्या आईच्या नोकरीची नाही. नोकरीमुळे बदल्या होतात हा कथा घडण्यासाठी महत्वाचा असला तरी एक तपशील आहे. बाकी काही नाही. तिथे अजून कशाला रेंगाळायचे?

मला स्वतःलाही संदेह आहे की हा चित्रपट नक्की कसा आहे. आवडला का? हो तरीही काही कमी राहते नक्की.

काही प्रसंग चक्क अनावश्यक वाटले. म्हणजे ते दिसत असताना एन्जॉय केले पण चित्रपट संपताना ह्याची गरज नव्हती असे वाटले. एक प्रसंग, दीपगृहाचा तुम्ही वर लिहिला आहे.

चित्रपट "दिसायला" खूप चांगला आहे ह्यात दुमत नाही. लाँग शॉट्स, क्लोजप, पॉजेस सर्व आवडले. ऑल इन ऑल आवडला पण खूप नाही. कसा ते आत्ता मांडता येत नाही. ( इनफॅक्ट पूर्ण चित्रपट शब्दात पकडणे शक्य नाही हे ही तुम्ही ऑलरेडी लिहिले आहे. )

प्रामाणिक परीक्षण.

परीक्षण आवडले.

मला तर कोकण पाहण्यात मजा आली… आणी कथानक मात्र काहीतरी अपूर्ण असल्या सारखे वाटले.

आणी या चित्रपटाची माझ्या एका मित्राने एवढी प्रशंसा केली की नंतर मलाच वाटायला लागले की मला चित्रपट कळला नाही का?

गोष्ट अशी नाहीये, सगळं रूपकात मांडलयं अशी माझी पहीली प्रतिक्रिया होती चित्रपट संपल्यावर. अर्चित देवधरचा आवाज आवडला, संवाद छान म्हणतो तो.

छान लिहिलंय.

म्हातारा आणि समुद्राशी रिलेट करायचं की नाही, हे ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवायचं. आणि त्यातल्या तत्त्वज्ञानाबद्दलही. तत्वज्ञान किंवा करमणुक याच दोन गोष्टी आपल्याला मोहवून जातात किंवा आकर्षुन घेतात असंच काही नाही. माझ्याबद्दल सांगायचं, तर 'गोष्ट सांगण्याची पद्धत' मला जास्त चकित करून जाते. अशी एखादी नवी पद्धत पडद्यावर किंवा पुस्तकाच्या पानांवर दिसली, की मला ते पुन्हापुन्हा पाहावंसं वाटतं, वाचावंसं वाटतं. त्यानंतर त्यातल्या तत्वज्ञानाचा / झालेल्या करमणुकीचा / रिलेट करू शकलेल्या गोष्टींचा / अनुभवलेल्या नॉस्टेल्जियाचा नंबर लागतो..

प्रेक्षक अधिक 'ओपन टू ऑल अँड एव्हरीथिंग' (समजूतदार / प्रगल्भ - हे शब्द वापरले तर गैरसमज होतील)- होतील आणि होत आहेत हे दिग्दर्शक लोक गृहित धरू लागले आहेत- इज अ गुड साईन.

'किल्ला' सारखा दृश्यात्मकतेचा इतका सुंदर वापर क्वचित आढळतो. मला कुंडलकरच्या 'गंध' ने असंच अस्वस्थ केलेलं. कित्येक दिवस त्या तीनही गोष्टींतले विविध गंध सतत पाठलाग करताहेत असं वाटलेलं. 'विहिर' हे आणखी एक उदाहरण...

प्रेक्षक अधिक 'ओपन टू ऑल अँड एव्हरीथिंग' होतील आणि होत आहेत हे दिग्दर्शक लोक गृहित धरू लागले आहेत- इज अ गुड साईन. <<< +१००००००००००००००००००००००००

निरिक्षण छान मांडलेय... पण एक थोडासा निगेटीव्ह सूर लावलाय तो तितकासा नाही पटला.

उलट किल्ला पाहताना कुठेही आपण काहीतरी वेगळे दाखवतोय असा अभिनिवेष किंवा आविर्भाव दिसला नाही. अत्यंत प्रामाणिक प्रयत्न वाटला कथा पटकथाकार आणि दिग्दर्शकाचा.

कुठेही फाफटपसारा न लावता, अनावश्यक गोष्टींचे पाल्हाळ न लावता चिन्मयचं भावविश्व आणि भोवतालच्या घडामोडी सुस्पष्ट मांडल्यात.
संवादातून त्याचे एकाकीपण न मांडता ते काही प्रसंगातून दाखवलं हे विशेष वाटलं.... आणि सुखद अनुभव म्हणजे बहुतांशी प्रेक्षकांपर्यंत ते पोचलेय हे त्यावर बोलताना चर्चा करताना जाणवतेय....
वर साजिराने म्हटलेल्याचा प्रत्यय आला. दिग्दर्शकाचं गृहितक प्रत्यक्षात दिसतेय हेच कलाकृतीचं यश आहे नक्कीच.

मांडणी खूप ठिकाणी प्रतिकात्मक आहे आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोचतेय.

"रत्नागिरीच्या साहेबांशी बोलून परत येताना एकटी हॉटेलात तंद्री लागलेली असताना, मागच्या बाकड्यावरचा माणूस उठतो तेंव्हा टेबलाला लागलेल्या धक्याने अमृता सुभाषची तंद्री भंग होणे" इतकं तपशीलात बारिक्सारिक दाखवलेय......

केदार, 'आयसोलेशन' आणि त्यातूनही परत कशाशी नव्याने जोडलं जाणं- असं त्या दीपगृहाच्या प्रसंगाचं काम असल्यागत मला वाटलं. (अख्ख्या सिनेम्याची थीमच त्या लाईटहाऊसने हायलाईट केलेली- असंही). पण आणखी कुणाला दुसरं वाटू शकेल, कुणाला तो प्रसंगच अनावश्यक वाटेल. चूक-बरोबर असे कोण कुणाला म्हणणार..

मी त्या दीपगृहावर गेलेलो आहे. कुठच्याही दीपगृहावर नेणीवांतलं, आपण आठव्णींतून पार पुसून टाकलं आहे असं काहीतरी पुन्हा नव्याने उसळवून वर आणायला लावणारं जबरदस्त वातावरण असतं खरं तर. पण त्याचवेळी क्षणभराचा विचार करायलाही उसंत देणार नाही असा प्रचंड आवाजातला आणि वेगातला वाराही..

मला तो दिपगृहाचा प्रसंग चिन्मयचं आणि आईचं नातं स्पष्ट करणारा वाटला....
संवादातून लहान वयात चिन्मयला आलेली मॅच्युरिटी आणि त्याचं आईबरोबरचं असलेलं नातं हायलाईट झालं.
प्रसंगी तिला धीर देण्याइतkee विचारातlee paripakvataa (pan vayaalaa saajesheec) चिन्मयकडे परिस्थितीमुळे आलय असं जाणवलं.

एकीकडे लहान वयातच आई बाप गेल्यावर आपल्या आपणच मोठा झालेला बिनधास्त बंड्या आणि एकिकडे एका शहरी वातावरणातून आलेला आणि वडिल गेल्यावर अधिक जबाबदारीने वागणारा चिन्मय, मग ते आईला धीर देणं असो किंवा मग दरवेळी बदली झाली की घराची आवराआवर करणं असो. एक एक गोष्ट उलगडत जाते आपोआप.

आता ती जगप्रसिध्द कॉमेंट येणार - जिथे एवढं सोलून सांगावं लागतं तिथं दिग्दर्शक कसा काय यशस्वी म्हणता येईल? मग कुणी म्हणेल, प्रत्येकाची समजण्याची लेव्हल वेगवेगळी असते. तुम्हाला समजत नसेल तर तो तुमच्या बुध्दीचा दोष वगैरे वगैरे.
मग hence proved by contradiction that our assumption was wrong. थोर लोक म्हणतात सिनेमा बेस्ट आहे, तर तो बेश्टंच आहे. (आपल्याला समजला नाही.)

साजिरा मी पण त्या दीपगृहापाशी गेलो आहे. ( अगदी वर नाही.) आणि इतर दीपगृहांवर गेल्यामुळे ते वातावरण मलाही परिचित आहे.

पण आणखी कुणाला दुसरं वाटू शकेल, कुणाला तो प्रसंगच अनावश्यक वाटेल. चूक-बरोबर असे कोण कुणाला म्हणणार. >> करेक्ट मी तेच म्हणतोय की मला तो प्रसंग अनावश्यक वाटला. त्यात अमृताचा एकटेपणाही जाणवतो ( बाबा असले असते तर हे वाक्य वगैरे, आणि ते आधीही आलेले आहे. ) केवळ तेच चित्रण घेतले तर अगदी मस्त आहे. पण पूर्ण पिक्चरशी तो प्रसंग सुटा सुटा वाटतो असे मला वाटते.

इनफॅक्ट किल्लाच्या दृष्यात जिथे युवराज हारतो आणि नंतर ते सर्व निघून जातात, तिथे युवराजवर केवळ काही क्षण फोकस आहे, ( तसा एकुण दोनदा आहे) आणि त्याने त्या हावभावातून त्याला काय वाटते ते दाखवले. पण जेंव्हा ते निघून गेले तेंव्हा प्रेक्षकांना गृहित धरले आहे. तो प्रसंग अजून खुलवता आला असता. शेवटी मुलांचाच पिक्चर ना? ( हे लिहायचे कारण बाकीचे अनेक मुलांचे प्रसंग जिथे चिन्मय नाही, ते खुलून दाखविले आहेत)

समुद्राचा प्रसंग देखील अजून नीट पोचवता आला असता. मुळात तो समुद्रातच एका भावनेने जातो, ती भावना दाखविण्यापेक्षा पुढे तो उडी मारू का? पोहावं वाटता का? अश्या प्रश्नांनी तो सीन ज रा वेगळा झाला आहे. इनफॅक्ट साजिरा, आयसोलेशन आणि नव्याने जोडले जाणे हा सीन समुद्राचा आहे. दीपगृहाचा नाही. कारण तो सीन तिथे संपत नाही तर तो परत आल्यावर ज्या आवेगाने मिठी मारतो तिथे संपतो.

एखादी वास्तू, एखादी जागा, एखादी भव्य पोकळीसुद्धा बरेचदा आपल्याला आपल्या समोर थेट उभं करण्याला निमित्त्य ठरते. कुठल्याही भव्यतेत एक एक आव्हान असतं असं मला वाटतं! आणि स्वतःला स्वतः थेट सामोरं जाणं हे तर फारच मोठं आव्हान! आपण आपल्याला 'रुबरू' होणं!
किल्ल्याचा जुनाट एकाकी बुरूज असो किंवा लाईटहाऊस किंवा अफाट फेसाळणारा समुद्र! ही सगळी एकाच कल्पनेची प्रतिकं वाटली मला हा सिनेमा बघताना. आणि अशी अनेक प्रतिकं सहज सामावलेला आणि त्यांची अफाट गुंफण असलेला हा संपूर्ण सिनेमाच एक असा 'रुबरू' अनुभव वाटतो! अगदी कुणातरी महत्त्वाच्या माणसाच्या आयुष्यातुन जाण्यानं निर्माण झालेलं एकाकी दु:ख असो किंवा आपली इच्छा असो-नसो... दमवणार्‍या, उबग आणणार्‍या, निराश करणार्‍या 'सिस्टीम'शी जुळवून घेत जगत राहण्याची आदिम लाचार हतबलता असो! हे सगळंच सिनेमात अधोरेखित असो वा नसो... लक्षात येतं आणि राहतं ते त्यांच्या प्रतिकत्मतेमुळेच. त्यामुळे मलातरी संपूर्ण सिनेमातला एकही प्रसंग अवांतर किंवा अस्थानी वाटला नाही.

<मलातरी संपूर्ण सिनेमातला एकही प्रसंग अवांतर किंवा अस्थानी वाटला नाही.> अनुमोदन.
पटकथा अतिशय बांधीव आहे.

भाषेच्या लहेजाबद्दल मला तक्रार आहे, पण तो मुद्दा वेगळा.

भाषेच्या लहेजाबद्दल मला तक्रार आहे << मला पण आहे पण त्याबद्दल ज्या त्या व्यक्तीशीच चर्चा करण्याचे ठरवले आहे. सो इथे नो कमेंटस.

चित्रपट निर्मितीच्या तन्त्रात आणी तन्त्रज्ञानात झालेल्या प्रगतीनुळे चित्रपट "देखणे" आणी "चकचकीत" झालेत.
दिग्दर्शन आणी स्क्रीन्प्ले या मधे "प्रशिक्शण" घेतलेले लोक "प्रभावी" सदरीकरण समोर ठेवतात.
पण यातला प्राण असलेले कथानक व लेखन हे कमकुवत असते त्यामुळे हाताला काही लागत नाही.
पाहिलेला चित्रपट आपण २ दिवसात विसरून जातो.
असे माझे वैयक्तिक मत आहे.

अगदी सर्वांगसुंदर लिहलं आहे, मनापासून आवडलं.
सिनेमाही असाच मनापासून आवडला. युवराज सायकल रेस हारतो... नंतर त्या किल्ल्याच्या दृश्यात त्याची ती खुन्नस बघून... बाहेर मुसळ्धार पाऊस... खूप काही-बाही होण्यास पूर्ण वाव पण खरचं मनापासून वाटतं होतं काही वाईट होऊ नये... कारण तोपर्यंत सिनेमा असं काही आल्हाददायक वातावरण निर्माण करून ठेवतो की काही-बाही खरंच सहन झालं नसतं तेच बोटीतून त्या दारूड्या माणसासोबत जाताना...
एक छानसा मूड बनवला व तो शेवट पर्यंत टिकवूनही ठेवला... खूपदा ठरवून केलेली पिकनिक नि उगाच माळोरान केलेली भटकंती दोन्ही मनाला आनंदच देतात. हा मात्र दुसर्‍या प्रकारातला. त्यातही तांत्रिक बाजू उत्तम... मज्जा आली.
परिक्षणाचाही असाच मूड संभाळला असता तर हे सर्वात बेस्ट परिक्षण झालं असंत. त्यातून चित्रपटाची उत्तम समज नि प्रेम असताना असं सद्यपरिस्थितीवर भाष्य टाळता आलं नसावं अस दिसतय.

छान लिहिले आहे. विचार पट्ले !
चित्रपट छान आहे. पण अपेक्शेइतका भिडला नाही.

पण कमेन्ट वाचून काही गोष्टीन्वर नक्कीच प्रकाश पड्ला.

नवीन ठिकाणी गेल्यानंतर येणारे भांबावलेपण, नवीन विश्वाशी जुळवून घेण्यात येणारी अडचण / आव्हाने अजून तीव्रतेने यायला हवे होते. इथे पहिल्या २ दिवसातच मैत्री जुळून येताना दाखवली आहे.
कोकणातल्या भाषेचा लहेजा पण मिसिन्ग वाटला.
पण पार्श्वसन्गीत आणि छायाचित्रण मात्र अव्वल ! एकेक फ्रेम डोळ्यात साठवून ठेवावी अशी...

बाय द वे 'किल्ला' ही गोष्ट कशाचे प्रतीक म्हणून आली आहे ?
मला ही चित्रभाषा कळली नाही हे मी इथे कबूल करतो.
या प्रांतातल्या अधिक अनुभवी माबोकराने कृपया प्रकाश टाकावा

ह्या चित्रपटातील कविता आहे का कुणाकडे?
असेल तर लिहा प्लीज इथे. अर्चितने खूपच सुंदर म्हटलीय ती ! आणि वाईट वाटत असूनही, डोळ्यात तरालेले अश्रू पुन्हा डोळ्यातच जिरविण्याच कसब अमृताने सुंदरच दाखवलयं.

निरिक्षण छान मांडलेय... पण एक थोडासा निगेटीव्ह सूर लावलाय तो तितकासा नाही पटला. >>>> अनुमोदन.
मी किल्ला अजून पाहिलेला नाही. कथा सांगणार नाही असे आधीच लिहिल्यामुळे पुढचा लेख वाचला. प्रत्येकाची आवडनिवड वगैरे मान्य आहेच पण सुरुवातीला इतका नकारात्मक सुर का लावला आहे हे कळलं नाही !!
नीरजा म्हणते तसं महोत्सवातल्या फिल्म्सना नावं ठेवायच्या फॅशनीतून ते आलेलं वाटलं.

किशोरवयीन-कुमारवयीन मुलांचे भावविश्व कधी कलात्मकतेने तर कधी तद्द्न व्यावसायिक हेतूने मांडणारे अनेक चित्रपट मधल्या काळात येऊन गेले. उदा. विहीर , शाळा , बालक-पालक , टाईमपास , फॅण्ड्री इ.इ. याच माळेतला एक नवा मणी म्हणजे ' किल्ला '. >>>> इथेही नक्की मुद्दा काय आहे हे कळलं नाही. आली लाट तर येऊ दे की. मागे तमाशेपटांची लाट आली होती. त्यापेक्षा ही बरी असं मला वाटतं.

Pages