संवाद - श्री. अच्युत गोडबोले

Submitted by जाई. on 30 June, 2015 - 10:27

श्री. अच्युत गोडबोले हे मूळचे संगणकतज्ज्ञ. अनेक बड्या कंपन्यांचे सीईओ आणि संगणकशास्त्रावरील पुस्तकांचे लेखक. पण ही काही त्यांची संपूर्ण ओळख नाही. किंबहुना त्यांची संपूर्ण ओळख करून देणं शक्यही नाही. संगीत, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, गणित या विषयांचा त्यांचा अभ्यास चकित करणारा आहे. ‘संगणकयुग’, ‘नादवेध’, 'बोर्डरूम’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, ‘गुलाम’, ‘नॅनोदय’, ‘मनात’, 'चंगळवादाचे थैमान’, ‘गणिती’, 'झपुर्झा', 'कॅनव्हास' आणि सहा दशकांच्या सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींचा धांडोळा घेणारं त्यांचं आत्मचरित्र ‘मुसाफिर’ या त्यांच्या पुस्तकांचं प्रत्येक मराठी वाचकानं दिलखुलास स्वागत केलं आहे.

श्री. अच्युत गोडबोले यंदाच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद -

Achyut photo.JPG

सोलापूरसारख्या शहरातला एक मुलगा ते बड्या कॉर्पोरेट कंपनीचा सीईओ या एकंदरीत प्रवासाबद्दल तुम्हांला काय वाटतं?

अलीकडे मुलांची ध्येयं वगैरे ठरलेली असतात. आपण पुढे नक्की काय करायचं, हे त्यांना माहीत असतं. आपण अमुकच व्हायचं वगैरे त्यांचं स्वप्न असतं. माझं असं काही स्वप्न वगैरे नव्हतं. चांगलं काहीतरी करायचं एवढं मनाशी पक्कं होतं. विज्ञान-तंत्रज्ञानाइतकंच संगीत-साहित्य-कला महत्त्वाचे आहेत, हे घरातल्या वातावरणामुळे मनावर पक्कं ठसलं होतं. आमच्या घरी साहित्यविषयक चर्चा व्हायच्या. पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. जसराज यांच्यासारखे मोठे गायक घरी यायचे. पाडगावकर, बापट , करंदीकर यांच्या कवितांची वाचनं व्हायची. कलेला अतिशय पोषक असं वातावरण घरी होतं. त्यामुळे जरी गणितात आयआयटीपर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये सर्वोच्च गुण आणि पारितोषिकं मिळाली असली, तरीही फक्त विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करायचं, असं कधीच वाटलं नव्हतं. म्हणून आजवरचा प्रवास ठरवून असा झालेला नाही. पण आज एकंदरीतच या प्रवासाबद्दल खूप छान वाटतं.


तुम्ही तुमच्या कारकिर्दित अत्युच्च पदांवर विराजमान असतानाही अधिकारश्रेणीचा (हायरार्कीचा) बाऊ केला नाही, 'शिकण्याच्या बाबतीत मी निर्लज्ज आहे' हे तुम्ही सांगता. याचं मूळ चळवळीशी जोडलेलं असण्यात आहे की घरच्या वातावरणात?

खरंतर दोन्ही. आमच्या घरी समानतेचं वातावरण आहे. भेदाभेद वगैरे कधीच पाळले गेले नाहीत. मुळातच मला माणसं एकमेकांना कमी का लेखतात, हेच समजत नाही. समानता ही मुळातच आपल्यात असायला हवी. ती मारूनमुटकून मनाविरुद्ध शिकण्याची गोष्ट नव्हे. ती अंगभूत असेल तरच ती प्रत्यक्ष आयुष्यात अवलंबता येते. त्यामुळे एखादा सीईओ असो वा चपराशी, माझ्या वागण्याबोलण्यात कधीच फरक पडला नाही. दुसर्‍यांना कमी लेखणं हा प्रकार माझ्या हातून झाला नाही, कारण मुळातच मला ते जमत नाही. हे सारं काही घरच्या समानतेच्या वातावरणामुळे शक्य झालं. चळवळीमुळे समानता ही कल्पना मनात ठाम रुजली गेली. वर्ण, वर्ग, रंग, जात, स्त्री-पुरुष यांतले कुठलेच भेद मी पाळणं शक्य नाही. कित्येकांना आडनावावरून जात ओळखायची सवय असते, तसं काही माझ्या बाबतीत होत नाही. मुळात माझ्या ते लक्षातच येत नाही. अर्थातच यामागे घरचं वातावरण आणि चळवळ या दोहोंचे संस्कार आहेत.

तुम्ही एकाच वेळी सदरलेखन करता आणि पाचशे-सातशे पानी पुस्तकंही लिहिता. शिवाय त्यात कमालीचं वैविध्य तर आहेच, पण सातत्यही आहे. एकीकडे शब्दमर्यादेचं आणि वेळेचं बंधन, तर दुसरीकडे प्रचंड आवाका असलेले विषय, त्यासंबंधीचं संशोधन. संगीत, साहित्य, चित्रकला, विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, गणित, व्यवस्थापन अशा अनेक विषयांत होणारी दर्जेदार साहित्यनिर्मिती विस्मयकारक आहे. पण तुम्ही सहजगत्या हे साध्य करता. हे कसं शक्य होतं?

माझ लिखाण सर्वंकष असण्यावर माझा भर असतो. त्याचबरोबर लेखनाची भाषा ही रसाळ, सहज समजणारी असायला हवी यांवरही माझा कटाक्ष असतो. या बाबतीत माझ्यावर या बाबतीत माझ्यावर बिल ब्रायसन, कार्ल सगान, स्टिफन हॉकिंग अशा अमेरिकन आणि ब्रिटिश लेखकांचा पगडा आहे.लोकांना एखादा विषय गोष्टीरूपात सांगायला मला आवडतं. अर्थात त्यात विषयाचा गाभा आणि त्यातली तत्त्वं महत्त्वाची. त्यात कुठेही तडजोड नको. मुळात या सार्‍याकडे मी एका वेगळ्या दृष्टीने पाहतो. आपण जे काही शिकलोय, पाहिलंय ते लोकांनाही सांगावं ही भावना त्यामागे असते. आपण जे लिहिलंय त्यातून लोकांना त्या विषयात रुची निर्माण होणं, मला महत्त्वाचं वाटतं. त्या विषयाचा मी तज्ज्ञ आहे, असा दावा मी कुठेही करत नाही. जे काही पाहिलंय, शिकलोय ते इतरांबरोबर लेखनरूपात शेयर करावं, असं मात्र आवर्जून वाटतं. मला वाटतं, त्यामुळेच हे सहज शक्य होत असावं.

तुमच्या पुस्तकांच्या विषयांमधल्या वैविध्यामुळे तुम्ही समाजातल्या हरतर्‍हेच्या वाचकापर्यंत पोहोचला आहात. हे सर्व विषय ठरवून हाताळले की एकातून दुसर्‍यात आपोआप असं घडत गेलं?

पहिली गोष्ट म्हणजे मी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून लिहीत नाही. उदाहरणार्थ, 'सीईओ कसे व्हाल' , 'यशस्वी मॅनेजर कसे व्हाल' वगैरे लेखन मी करत नाही. ही पुस्तक लिहिली तर त्यांचा खप प्रचंड होईल, हे मला माहीत आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे लेखनामागचा माझा उद्देश एखाद्या विषयाबद्दल लोकांच्या मनात आवड निर्माण करणं हा असतो, मग तो विषय कोणताही असो. या सार्‍या लिखाणात लहानपणीच्या आणि आयआयटीतल्या चर्चा, वाचन, लिखाण यांचा मोठा वाटा आहे. आताही अनेक विषयांवर मनन, चिंतन, वाचन सतत चालूच असतं. या सगळ्या विषयांबद्दल मला प्रचंड कुतुहल आहे आणि त्यांच्यावर माझं प्रेम आहे. पुस्तक लिहीत असताना 'हे पुस्तक खपेल का', हा विचार मी करत नाही. मला नवनवीन शिकायला, प्रश्न विचारायला आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला आवडतं. उदाहरणार्थ, मानवी मन. मानवी मन ही कधीही कोणाला न दिसणारी, पण प्रचंड गुंतागुंतीची गोष्ट आहे. या गुंतागुतीच्या विषयानं मला आर्कषित केलं. या कुतुहलातून, त्याच्या अभ्यासातून मनोव्यापाराचा वेध घेणारं 'मनात' हे पुस्तक जन्मास आलं.

कोणत्याच विषयाबद्दल साचेबद्धता किंवा झापडबंद दृष्टिकोन तुमच्या लेखनात दिसत नाही.

जगभरात कामानिमित्त माझा भरपूर प्रवास झाला. या प्रवासात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे दृष्टी व्यापक होत गेली. नोबेल लॉरेट्सना भेटताना आणि पाहताना बोर्डात सोळावे वगैरे असण्याचा अहंभाव गळून पडला. पाय जमिनीवर आले. झापडबंद दृष्टिकोनापासून दूर राहता आलं. सतत नवनवीन शिकायची मूळची वृत्ती होतीच. त्यामुळे कोणत्याही विषयाबद्दल साचेबद्धता कधी जाणवली नाही.

तुम्ही स्वतःला 'एक उत्तम इंटिग्रेटर' म्हणता, तुमच्या सर्व पुस्तकांमधून हे ठळकपणे जाणवतंही.

मी स्वतःला 'इंट्रिग्रेटर' म्हणवतो कारण मुळात मी क्रियेटिव्ह लिखाण करत नाही. मी कोणी कवी, कथाकार, कादंबरीकार नाही. मी अनेक पुस्तकं वाचतो. मुख्यत: इंग्रजी भाषेतली पुस्तकं वाचतो. हे सारं मराठीत नाही म्हणून ते ज्ञान मराठीत आणण्यावर माझा भर असतो. मराठीत ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी ही सारी धडपड आहे. हे काम अवघड आहे, कारण ही पुस्तकं अनुवादित नाहीत. त्यांतल्या प्रत्येक पुस्तकासाठी ८० - १०० पुस्तकं वाचणं, त्यांची योग्य ती संगती लावणं, नंतर ते सारं रंजक, रसाळ आणि लालित्यपूर्ण भाषेत मांडणं हे खरं इंटिग्रेशन आहे. अर्थात हेही मला पूर्णपणे जमलं आहे, अशातला भाग नाही. याही बाबतीत मी विद्यार्थीच आहे. माझे सहलेखक आणि सहलेखिका यांच्यामुळे हे मला जास्त चटकन आणि चांगल्या तर्‍हेने जमू शकतं, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं.

मराठीचा विषय निघाला आहे, तर मराठीचं जतन, संवर्धन यांबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल.

मला असं वाटतं की, मुलांना मराठी माध्यमातून शिकवावं, मात्र त्याच वेळी त्यांना इंग्रजी भाषाही चांगली अवगत होईल, याची काळजी घेतली जावी. एक लक्षात घ्यायला हवं की, इंग्रजी माध्यमात शिकलेले सर्वच उत्तम इंग्रजी बोलू शकतीलच असं नाही. जसं मराठी माध्यमात शिकलेल्या प्रत्येकाला कुसुमाग्रजांच्या कविता पाठ नसतात, तसंच हे. पण भाषेशी एक संस्कृती निगडीत असते. मराठी भाषेशी निगडीत असलेलीही संस्कृती आहे. मराठी माध्यमात शिकल्यानं या संस्कृतीशी जवळीक वाढते, असं माझं मत आहे. पण इंग्रजी ही आजच्या युगाची ज्ञानभाषा आहे, त्यामुळे ती चांगली बोलता येणं महत्त्वाचं आहे. मला मान्य आहे की हे थोडं अवघड आहे, पण अशक्य नक्की नाही. माझं सगळं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं असल्यामुळे आयआयटीत गेल्यावर मला इंग्रजीवर मेहनत घ्यावी लागली होती. माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण शिक्षणाच्या बाबतीत मराठी माध्यमाला मी प्राधान्य देईन. आज माझ्या पाहण्यातले बरेचसे पालकही मराठीला प्राधान्य देत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.

आधी चळवळी आणि नंतर नफा कमावणारी संस्था या दोहोंशी तुमचा खूप जवळचा संबंध आला. भलेही हे दोन्ही कालखंड वेगळे असतील, पण तुम्ही दोन्हीत कार्यरत होता. त्याबद्दल काही सांगाल का?

चळवळीत मी फार यशस्वी झालो नाही. हे मला जमणार नाही, असं एका क्षणानंतर मला वाटलं. ती माझी माघार होती, हे कटू असलं तरीही सत्य आहे आणि यात नाकबूल करण्यासारखं काहीच नाही. मात्र चळवळीमुळे मला विविध अनुभव मिळाले. आदिवासींचं जीवन पाहायला मिळालं. मात्र आताच्या चळवळीची अवस्था पाहिली तर माझा तो निर्णय योग्य होता असंच वाटत. चळवळीची विफलता मला पेलवली नसती.

मार्क्स मला पूर्णपणे पटत नाही. क्लासिकल साम्यवादालाही माझा विरोध आहे. पण मार्क्स पूर्णपणे टाकाऊ आहे, असंही मला वाटत नाही. मार्क्स हा एक महत्त्वाचा विचारवंत होता. बरं, कॉर्पोरेट क्षेत्रात आल्यावरही भांडवलशाही ही फार ग्रेट आहे, असं काही मला वाटत नाही. केन्स आणि मार्क्स यांच्या विचारांचा मध्यममार्ग साधण्यावर माझा भर आहे आणि यामुळेच लोकशाही व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. टोकाचा भांडवलवाद वा टोकाचा साम्यवाद कधीही यशस्वी होणार नाही. श्रीमंत होण्याला, असण्याला माझा विरोध नाही. मात्र ती श्रीमंती फक्त वीस टक्के घरांत दिसावी, ऐंशी टक्के घरं गरिबीत जगावी, याला माझा विरोध आहे. भांडवलशाही वाईट आहे, असं माझं म्हणणं नाही. भांडवलशाहीमुळे उद्योजकतेला, विकासाला वाव मिळतो हे खरं आहे. पण त्याचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजेत.

तुम्ही अनेकदा भीतिदायक वाटावं अशा चक्रात काम केलंय. व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर क्लिष्ट जबाबदार्‍या, शिक्षण, अखंड प्रवास हे सगळं एकाच वेळी सुरू असायचं. त्यावेळी वेळेचं व्यवस्थापन कसं करायचात?

कौटुंबिक ताण म्हणजे मुख्यत: निहार, माझा मुलगा. तो ऑटिस्टिक आहे. पण शोभामुळे मला हा ताण बराचसा हलका करता आला. घरची आघाडी तिने यशस्वीरीत्या सांभाळली. सीईओ म्हणून काम करत असताना वाचन, मनन, हजारो लोक काम करत असणार्‍या कंपन्या सांभाळणं हे सुरू असायचं. आता मागे वळून पाहताना या कामाची व्याप्ती प्रकर्षाने जाणवते. हे करत असताना वेळेचं व्यवस्थापन अवघड होतं हे खरंच, मात्र त्यावेळी हे जमलं हेही खरं.

तुम्ही या काळात मानसिक, शारीरिक स्वास्थ्य कसं जपलं?

सुदैवाने माझ्यात थोडीफार असणारी विनोदबुद्धी ही माझ्या स्ट्रेस मेनेजमेन्टचं मुख्य साधन आहे. खाणं, चित्रपट, संगीत, कला या सार्‍याची मला मनस्वी आवड आहे. यांमुळे कदाचित मला असंख्य ताणांना तोंड देणं जमलं असावं.

शोभाताईंबद्दल सांगाल का? तुम्हांला पाठिंबा, निहारकडे लक्ष, स्वत:चं स्वतंत्र काम... त्यांच्याबद्दल प्रचंड कौतुक आणि उत्सुकता आहे.

ऑटिझम, म्हणजे स्वमग्नता, हा प्रकार खूपच गुंतागुतीचा आहे. स्वमग्न मुलांकडे सतत, म्हणजे अगदी चोवीस तास, लक्ष द्यावं लागतं. आम्ही दोघंही निहारसाठी झटतोच. आर्थिक बाजू पूर्णपणे मी सांभाळली असली तरी आमच्या घराची सपोर्ट सिस्टिम शोभा आहे. निहारला डॉक्टरकडे घेऊन जाणं, त्याचं वेळापत्रक सांभाळणं, त्याच्या विविध उपचारपद्धती (ज्याबद्दल 'मुसाफीर'मध्ये मी सविस्तररीत्या लिहिलं आहे) हे सारं शोभानं काटेकोरपणे सांभाळलं. पण निहारला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणं, विविध कामांत सहभागी करून घेणं, त्याचं गाणं या सगळ्याकडे आम्ही दोघंही जातीनं लक्ष ठेवतो.

स्वमग्नतेच्या विविध पातळ्या आहेत. अजूनही स्वमग्नतेबद्दल आपल्याला असलेलं ज्ञान अपूर्ण आहे. निहारच्या वेळी डॉक्टरांनाही हा प्रकार नक्की काय, हे माहीत नव्हतं. आता परिस्थिती थोडी सुधारली आहे. विज्ञान ज्या वेगानं प्रगती करतंय ते पाहता वीस ते तीस वर्षांत याच्यावर उपचार अधिक प्रगत होतील, अशी आशा आहे.

स्वमग्न व मतिमंद मुलांसाठी असलेल्या 'आशियाना' या शाळेशी तुमचा संबंध आहे. 'आशियाना'बद्दल आणि तुमच्या निवासी-शाळेच्या कल्पनेबद्दल थोडं सांगाल का?

'आशियाना'मध्ये आता मी नाही. या शाळेच्या स्थापनेत आणि नंतरची दहा वर्षं मी भाग घेतला होता. माझे मित्र रवी आणि सुहासिनी या दाम्पत्याचा त्यात सहभाग होता. आधी म्हटलं तसं, जेव्हा निहारबद्दल आम्हांला कळलं, तेव्हा भारतात हे सर्वच नवीन होतं. अमेरिकेतसुद्धा ऑटिझमबद्दल ठिकठाकच प्रगती झाली होती. निहारला ऑटिझम आहे हे कळलं, त्या दिवशी ब्रिटिश कौन्सिलच्या लायब्ररीत बसून मी बावीस पुस्तकं वाचून काढली. त्या काळच्या डॉक्टरांनाही, विशेषत: बालरोगतज्ज्ञांनाही याबाबतीत माहीत नव्हतं, मग सर्वसामान्यांना कुठून माहीत असणार? त्यावेळचे बरेचसे पालकही 'अजून लहान आहे, मोठा झाल्यावर होईल ठीक' असा विचार करत. अशावेळी अशा मुलांना एका शाळेद्वारे सपोर्ट सिस्टिम मिळवून देणं, हा विचार 'आशियाना'च्या उभारणीमागे होता. पालकांच्या आयुष्यातले ताण या शाळेद्वारे कमी करता येतील का, हाही विचार होताच. पण पहिल्या फटक्यात हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. अनेक अडचणी उभ्या राहिल्या. कधी जागेचा प्रश्न, कधी पालकांचं असहकार्याचं धोरण, तर कधी आर्थिक प्रश्न. पण अशा अनेक अडचणींवर मात करून स्वतःच्या गुणदोषांसकट 'आशियाना' सुरू झालं.

खरंतर अशा शाळांची अनेक पटीनं गरज आहे. कारण पालक तरुण असतात तेव्हा कसंही करून निभावता येतं. पण म्हातारे झालयावर काय करायचं? तर अशा मुलांसाठी ट्रस्ट असावेत, काळजी घेणारी माणसं असावीत असं वाटतं. आणि यात सरकारचा सहभाग असा्यलाच हवा, कारण ही शेवटी आपली माणसं आहेत, आपल्या समाजाचा हिस्सा आहेत. ऑटिझमचा प्रश्न मोठा आहे. सगळंच खाजगीकरणावर सोडलं तर काय करायचं? सरकारने यासाठी सपोर्ट सिस्टिम म्हणून काम करावं, असं वाटतं. अशा शाळांना अनुदान देणं, कमी दरात जागा देणं ही कामं सरकारनं प्राधान्याने करावी.

तुमच्या सध्या सुरू असलेल्या लेखनाबद्दल आणि नजरेला खुणावणा-या पुढच्या विषयांबद्दल, प्रकल्पांबद्दल उत्सुकता आहे.

विदेशी साहित्यिक आणि साहित्य यांवरचा मी ’झपूर्झा - भाग १’ लिहिला. ’झपूर्झा - भाग २’ आणि भाग ३ हे मी नीलांबरी जोशी हिला सहलेखक म्हणून बरोबर घेऊन लिहिले. तसंच 'कॅनव्हास' हे विदेशी चित्रकार / शिल्पकार यांची आयुष्यं, कलाकृती आणि इतिहास यांच्याविषयी सांगणारं पुस्तक मी आणि दीपा देशमुख यांनी मिळून लिहिलं. माझे पुढचे अनेक प्रकल्प आहेत. त्यात पाश्चात्त्य संगीत, चित्रपट, भारतीय संगीत, तत्त्वज्ञान, स्थापत्य आणि देवधर्म असे अनेक विषय आहेत.

मला आजवर रसिकांचा, वाचकांचा मिळालेला प्रतिसाद हा खरोखर सुखावणारा ठरला आहे. पुण्या-मुंबईबरोबरच बाकीच्या लहानमोठ्या शहरांतले लोक आपली पुस्तकं वाचतात, प्रतिसाद देतात हे सारं सुखावणारं असतं. 'तुमच्या पुस्तकानं प्रेरणा मिळाली', असं सांगणारे हजारो ईमेल, पत्रं जेव्हा मला येतात, तसंच ’आमचं नैराश्य गेलं’, ’आत्महत्येपासून प्रवृत्त केलं’, ’व्यसनं सुटली’, ’काय वाचावं ते कळलं’ अशा तर्‍हेचे शेकडो ईमेल, फोन आणि एसएमएस येतात, तेव्हा खरोखर भारावून जायला होतं. या सार्‍याबद्दल मी रसिकांचा आणि वाचकांचा मनापासूनण आभारी आहे.

***

विशेष आभार - सई.


***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीवनातल्या सर्वच क्षेत्रात अगदी लीलया मुसाफिरी करणार्‍या अच्युत गोडबोलेंची तेवढीच मस्त मुलाखत, जाई.

सध्या झपुर्झा -३ चं वाचन चालू आहे. मुसाफिर ही आवडतं पुस्तक आहे. प्रतिकुलते वर मात करण्याची ह्या माणसाची क्षमता अफाटच आहे ह्यात वाद नाही. मुलाखत आवडली..

जाई....

खूप सुंदर झाला आहे हा संवाद. वास्तविक "संगणकतज्ज्ञ" नावाने ओळखले जाणारे अच्युत गोडबोले यांची मुलाखत आहे म्हटल्यावर मनी येते की यातील बरेचसे आपल्याला नाही कळणार कारण आम्ही कलाशाखेकडील लोक. प्रत्यक्षात श्री.गोडबोले विविधतेने पुरेपूर भरून गेलेल्या क्षेत्रात अगदी सहजरित्या संचार करतात आणि शिवाय शब्दबद्ध करण्याची त्यांची हातोटी लुभावणारीच आहे. मराठी भाषेविषयी असणार्‍या प्रेमाची प्रचिती त्यांच्या लेखनातून तसेच विचारातून प्रतीत होत असतेच. "..लेखनाची भाषा ही रसाळ, सहज समजणारी असायला हवी यांवरही माझा कटाक्ष असतो...." हे वाक्य त्याची साक्ष आहेच.

ऑटिझमविषयीची मते वाचली....आणि त्या प्रश्नाबाबत त्यानी केलेला अभ्यासही जाणवला. ऑटिझम पाल्याचे आईवडील श्री.अच्युत गोडबोले यांच्याकडे एखाद्या मार्गदर्शकासारखे पाहात असतील असे जाणवत राहील.

सुन्दर ओळख, जाई! प्रश्न अगदी नेमके आहेत.

इंटीग्रेटर ह्या बद्द्ल मला फार उत्सुकता होती. त्याबद्दल त्यांनी अजून सांगायला हवे होते. अशा पध्दतीने लिहीताना येणार्‍या अडचणी, ह्या नवीन कंसेप्ट बद्दल सुरुवातीला आलेल्या प्रतिक्रिया इ.

खुप सुरेख मुलाखत..

या माणसाबद्दल मला खुपच उत्सुकता आहे. त्यांची एकुण एक पूस्तके माझ्याकडे आहेत. परत परत वाचते. मुसाफिर आणि किमयागार विशेष आवडीची......

आयुष्य कसं जगायचे हे डॉ. अच्युत गोडबलेंकडून शिकलं पाहिजे. मुसाफिर हे फक्त पुस्तक नसून स्फुरण देणारे मार्गदर्शक आहे.

नेटकी मुलाखत जाई. १९९०-९१ साली अच्युत गोडबोलेंना प्रथम दूरदर्शनवर पाहिले. तेव्हा ते संगणकाची ओळख सोप्या मराठीतुन करुन देत. नंतर त्यांच्याबाबत वाचत गेलो आणि या माणसामध्ये असलेलं वैविध्य पाहुन थक्क झालो. त्यांची वर्तमानपत्रातील सदरं, पुस्तकं यातुन गोडबोले आवडत गेले. 'मुसाफिर' वाचलं आणि त्यातुन या माणसाची जडणघडण थोडीफार कळली. दहावीला बोर्डात- आयआयटी-चळवळ-तुरुंगवास-सीईओपदं हा प्रवासच थक्क करणारा.

एकंदरीत दिलखुलास मुलाखत ! माणसानं गतिमान कसं रहावं याचं उत्तम उदाहरण. मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दलच प्रेम आणि त्याबद्दल मांडलेल्या विचारांचं कौतूक. ऑटीझम बद्दलच्या माहितीत भर आणी त्यासाठी 'आशियाना' सारख्या शाळेशी असलेला संबंधही तितकाच कौतुकास्पद.

'भांडवलवाद आणी साम्यवाद' या दोहोंमधली अस्पष्ट रेषा अचूक हेरली आणि या मुलाखतीमधे ती मांडली सुद्धा.

सुरेख मुलाखत. यांचे लिखाण अजून वाचलेले नाही - त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया वाचल्या आहेत. त्या डोक्यातून पुसून कोर्‍या पाटीने लिखाण वाचायला हवे एकदा असे मुलाखत वाचून वाटले.

छान मुलाखत जाई Happy

त्यांचे लिखाण वाचलेले नाही पण त्यांची एक मुलाखत (बहुदा माहेर मासिकात आली होती) वाचली होती.

Kharach saranche vivdh vishyavaril abhyas va likhan vakhananya yogya ahe

मुख्यत: इंग्रजी भाषेतली पुस्तकं वाचतो. हे सारं मराठीत नाही म्हणून ते ज्ञान मराठीत आणण्यावर माझा भर असतो. मराठीत ज्ञान उपलब्ध व्हावं यासाठी ही सारी धडपड आहे>>>>>>>>

१०० % अनुमोदन