ज्ञानयात्रा ४ (शेवट)

Submitted by मंजूताई on 24 June, 2015 - 06:41

मिश्मी पर्वतरांगांमध्ये वसलेल्या लोअर देबांग व्हॅलीत मुख्यत्वे इदु लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काहीसे कट्टर ! आजही आपल्या रुढी परंपरांना घट्ट चिकटून आहेत. अनेक भाषांप्रमाणे बोलीभाषा इदु लुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण त्याची लिपी नाहीये. शेती व पशुपालन हे मुख्य व्यवसाय. मिथुन,डुक्कर, कोंबड्या सारखे प्राणी पाळतात. भात, सरसो ही मुख्य पिकांबरोबर संत्री, केळी, अननस इ. फळांचं मुबलक प्रमाणावर उत्पादन होतं. निर्यातीसाठी दळणवळणाची पुरेशी सोय नाही. साठवणूक करायला फळ प्रक्रिया उद्योग नाहीत म्हणून पशू खाद्य विकत आणण्या ऐवजी उरलेलं अन्न व अतिरिक्त फळांचा उपयोग करतात. इथे पूर ही एक समस्या आहे. अन्न वा पाणी वाया घालवणं वाईट आहे, असे आपल्यावर संस्कार झाले आहेत पण इथे अभाव, कमतरता, उणीवच नाहीये तर त्यांना त्याचं महत्त्व कसं पटवून देणार अन त्यांना ते कसं पटणार? मुख्य अन्न भात, मत्स्याहार व मांसाहार! खास पाहुणचार करायचा असेल तर आपले जसे शाकाहारी पुरणपोळी, श्रीखंड किंवा मांसाहारी लोकांसाठी चिकन, मासे तसे इथे पक्वान्न म्हणजे पक्षी! पक्षी, उंदीर व मासे वाळवून त्याची साठवणूक करतात.

सूर्य हाच देव, नव्हे देवता, मातेसमान म्हणून स्त्रीलिंगी.

मिश्मी लोकांचा मुख्य सण 'रे'. आयुष्यात एकदा तरी हज यात्रा, चारधाम यात्रा करावी अशी काही लोकांची इच्छा असते तशी मिश्मी लोकांची इच्छा असते 'रे' करण्याची. एक व दोन फेब्रुवारीला हा सण साजरा होतो. सगळं गावं एकत्र येतं नाच, गाणी, 'मिथुन'चा बळी देऊन व 'ह्यु' (rice beer/वाइन) पिऊन साजरा केला जातो. प्रथेनुसार मर्यादित प्रमाणात (एक पेग) ह्यु पितात पण कालौघात ह्या प्रथेला विकृत रूप येऊ पाहत होतं. सक्षम व सजग स्त्री संघटनेने त्याला वेळीच अटकाव घातला. ईशान्य भागात मातृसत्ताक पद्धत आहे असं ऐकलं होतं ते इथे आढळलं नाही. मुलगी सासरी नांदायला जाते. पत्रिका जुळवणं, गोत्र बघणं अशी काही पद्धत नाही पण कमीत कमी अगोदरच्या दहा पिढ्या नात्यात नसाव्या हे मात्र आवर्जून बघितल्या जातं आणि समजा लग्नानंतर केव्हाही असं काही नातं आहे, हे कळलं तर घटस्फोट घ्यावा लागतो. लग्नाची पद्धत अगदी साधी! मिथुनाचा बळी दिला, जेवायला घातलं, झालं लग्न! अजून तरी विवाह सोहळा 'इव्हेंट' नाही झालाय.

मी, माझा मुलगा, नातू असा आपल्यासारखं सात पिढ्यांचा विचार इथली लोकं करत नाही. पण मृत्यूनंतर पुरायच्या जागेची व स्वतःला आवडणार्‍या वस्तू ज्या त्याच्याबरोबर पुराव्या अशी इच्छा असते त्याची तजवीज तो स्वतःच करून ठेवतो. एकाने बाइक, एकाने कार पुरल्याची उदाहरणं आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की त्याला दुसरं शरीर मिळेपर्यंत तो जिवंत असतो तेव्हा त्याच्या दैनंदिन गरजा भागवल्या गेल्या पाहिजे म्हणून वस्तू कपडे, धान्य इ. पुरलं जातं. लोमी, ज्योती व विजयसरांशी झालेल्या गप्पांमधून एका वेगळ्याच संस्कृतीची ओळख झाली.

आजकाल सुट्यांमध्ये हिमालयच काय कुठेही जायचं म्हणजे गर्दीमुळे नकोसं वाटतं. इतका सुंदर इथला निसर्ग असूनसुध्दा पर्यटकांची गर्दी नव्हती, खूप आनंद झाला आणि होऊही नाही अशी मनोमन प्रार्थना केली इथला निसर्ग अस्पर्शित राहावा.आम्ही त्या सुंदरश्या रिसोर्ट गेलो होतो तिथेही पर्यटक दिसले नाही. ज्यांना निवांतपणा पाहिजे असे कलाकार, लेखक, निसर्ग, पर्यावरणाचा अभ्यास करणारे असे सुसंस्कृत पर्यटक मात्र येत असतात. पण एकदा का ब्रम्हपुत्रेवरचा सेतू झाला की त्यावरून येणारी विकासगंगा मानव, निसर्ग, पर्यावरणाला पूरक ठरेल की मारक? साशंकता आहे.

खूप उशीर झाला होता, नंबुद्रीसर आमची वाट पाहत होते.

मृदुभाषी नंबुद्रीसर राहणार केरळातले पण गेल्या तीस वर्षापासून ईशान्य भारतात फिरलेले असल्याने इथल्या संस्कृतीशी समरस झालेले. 'इनतया' (शाळा) हे त्यांचं अपत्यच. शिक्षणाच्या निमीत्त्याने त्यांची खरी अपत्ये त्यांच्यापासून एक दूर व दुसरा दूरदेशी गेलाय. नुकतेच ते केरळहून परतले होते. शुद्ध शाकाहारी असल्याने इकडे खायला काय व कसं मिळेल जरा शंका होती. उदरभरणाला वरणभात मिळाला की बास,अजून काय हवं, असं जरी वाटलं होतं तरी स्ट्यु, पुर्‍या, केळ्याचे वेफर्स, मिठाया पाहून जीव सुखावला. नंबुद्रीसरांकडून ऐकायला खूप काही होतं पण उशीर झाल्याने गप्पांची मैफल आवरती घ्यावी लागली.

उद्या ज्योती, लोमीच्या घरी नाश्ता करून परतीची वाट धरणार. आधुनिक व परंपरागत अशी दोन जुळी घरं! सुंदर बाग! विविध फळ फुलांनी बहरलेली! मोठी मोकळी जागा,बगीचा, अंगण, बंगला इ. एखाद्या सिनेमात शोभून दिसेल असं घर! पण खरं घर सुशोभित झालं होतं ते तिथे राहणार्‍या लोकांनी! ज्या घरात आजी आजोबा, मुलं नातवंड एकत्र राहतात अशी आपल्याकडची एकत्र कुटुंबाची व्याख्या तर मग ह्या कुटुंबाला काय म्हणावे कळेना .. इतकी कझिन्स होती ... नक्की कोणाचं कोण? डोक्याला ताण देत बसलो नाही पण समोर सजवलेल्या स्वादिष्ट पदार्थांवर इतका ताव मारला की पोटावर ताण आला.


भरलेल्या पोटाने व गोड आठवणीच्या अक्षय शिदोरीसह परतीची वाट धरली.

वाटेवर असलेल्या त्यांच्या दोन कझिन्सच्या घरी गेलो होतो तिथले काही प्रचि

तारीख, वार, वर्तमानपत्र, टीव्ही, वैशाख वणव्याचं विस्मरण करायला लावणारी ही अविस्मरणीय ज्ञानयात्रा सफळ संपूर्ण झाली.

ज्यांच्यामुळे ही यात्रा सफळ संपूर्ण झाली पण सहयात्रींविषयी लिहिल्याशिवाय लेखमाला पूर्ण होणार नाही. निकीता व अर्पिता दोघीजणी मेळघाटात मैत्री संस्थेतर्फे शिकवायला जातात. त्यांचा निकाल नुकताच लागलाय त्या लॉ ग्रज्युएट झाल्या आहेत. निकीता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतेय. अर्पिताला यंदाच्या पुरुषोत्तम करंडक तर्फे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय व ती नाट्यप्रशिक्षण घ्यायला परदेशात जाणार आहे. अनन्या व रुक्मिणी दोघीजणी मानसशास्त्र पदवीधर व दोन वर्ष टीच फॉर इंडियासाठी काम केलंय. अनन्या पुढच्या शिक्षणासाठी टाटा इ.सोशल सायन्समध्ये दाखल झालीये व रुक्मिणी एम ए एज्युकेशन करायला अजीम प्रेमजी इ. ला गेलीये. पाककलेची विशेष आवड नसताना दोघींनी घरी रसम बनवायचे धडे घेऊन ते इथे बनवलं, हे विशेष. ह्या चौघीजणींचं भरभरून कौतुक व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
आभारः ज्ञानसेतू व मायबोली

ज्ञानयात्रा भाग १: http://www.maayboli.com/node/54297
ज्ञानयत्रा भाग २: http://www.maayboli.com/node/54363
ज्ञानयात्रा भाग ३: http://www.maayboli.com/node/54390

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूषा....

~ तुमच्या चेहर्‍यावरील प्रसन्न हास्य सारे काही सांगून जात आहे....फलश्रुतीची महती आहेच आहे. एका विशिष्ट उद्देश्याने आखलेली ही ज्ञानयात्रा यशस्वी त्यावेळी मानली जाईल ज्यावेळी सहल समाप्तीनंतर भाग घेतलेल्यांचे चेहरे असे कृतार्थतेने फुलून येतील. चारही भागातून वाचकांना जो खजिना मिळाला आहे...माहिती तसेच छायाचित्रे...तो अन्यत्र मिळाला असता असे नाही. ही फार मोठी जमेची बाब होय.

घरांची स्वच्छता, देखणेपण नजरेत भरण्यासारखे आहेच, शिवाय तरीही घर सुशोभित झालं होतं ते तिथे राहणार्‍या लोकांमुळे हे जे लिहिले गेले आहे त्याचा मतितार्थ फार मोठा आणि महत्त्वाचा आहे....एकत्र कुटुंबामुळे त्या घराला जे घरपण लाभले आहे ते आधुनिक अवजारांनी भरलेल्या देशावरील घरांना लाभेल असे नाही. असो, तो विषय अलग आहे. परतताना तुम्ही अगदी अक्षय आनंदाला घेऊन तिथून निघाला हेच ज्ञानयात्रेचे फलित.

सहयात्रींच्या शैक्षणिक जीवनाची लख्ख वाट आणि भावी प्रगतीविषयक वाचून मन अगदी प्रसन्न होऊन गेले. तुम्हा सर्वांना उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

खुप छान झाली मालिका. खरं तर आणखी काही दिवस तिथे राहिला असतात तर आम्हालाही जास्त काही वाचायला मिळाले असते.
असुरक्षिततेचे / फुटीरवादाचे / अतिरेक्यांचे जे ग्रहण या भागाला लागलेय ते एकदाचे सुटो.

अत्यंत सुरेख लेखमाला. एका नव्या जगाची प्रसन्न ओळख करून दिलीत. निसर्गाचे, माणसांचे आणि वास्तूंचे निखळ देखणेपन डोळ्यांत भरते.
असे काही वाचले की प्रत्यक्ष संबंध नसतानाही उत्साही व्हायला होते, ही तुमच्या लेखनाची कार्याची किमयाच.
पुढील उपक्रमांना शुभेच्छा !

तुमच्या बरोबरच्या सहयात्री माझ्या परिचयाच्या आहेत त्यामुळे अजून छान वाटले.

तसेच निकीता, मायबोलीच्या संयुक्ता सुपंथ परिवारातर्फे चालवल्या गेलेल्या स्पोकन इंग्लिश वर्गासाठी देखिल स्वयंसेवक म्हणून होती.

हर्पेन - हो . ती सांगत होती.
दिनेश - जास्त दिवस राहिले असते तरी ह्या विषयात लिहीता आले नसते. निसर्ग, संस्क्रुती, माणसं हे जिव्हाळ्याचे विषय.
जि - सेवन सिस्टर्स बघायचे असतील तर ब्रम्हपुत्रा सातदा ओलांडावीच लागेल Happy
दुसर्या भागात टाकलेल्या मिरची बद्दल ती इतकी जहाल आहे की विचारुच नका कोल्हापूरी मिरचिच्या दसपट....

लोमी, ज्योती व विजयसरांशी झालेल्या गप्पांमधून एका वेगळ्याच संस्कृतीची ओळख झाली. >>>> आम्हालाही ...

मोठी मोकळी जागा,बगीचा, अंगण, बंगला इ. एखाद्या सिनेमात शोभून दिसेल असं घर! पण खरं घर सुशोभित झालं होतं ते तिथे राहणार्‍या लोकांनी! >>>> या वाक्याच्या उत्तरार्धात तुमच्या मनातील विश्वबंधुत्वाचे दर्शन होते आहे ..
____/\____

तारीख, वार, वर्तमानपत्र, टीव्ही, वैशाख वणव्याचं विस्मरण करायला लावणारी ही अविस्मरणीय ज्ञानयात्रा सफळ संपूर्ण झाली. >>>> आम्हा सार्‍यांनाही ही ज्ञानयात्रा घडवल्याबद्दल शतशः आभार ....

अतिशय आवडले हे सारे लेखन... तुम्हा सार्‍यांचा सहभाग केवळ प्रेरणादायी, भारावून टाकणारा ...

सहयात्रींच्या शैक्षणिक जीवनाची लख्ख वाट आणि भावी प्रगतीविषयक वाचून मन अगदी प्रसन्न होऊन गेले. >>+१००