मालवणी विषारी दारूकांडानंतर आमच्या ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत घडलेली एक छोटीशी चर्चा..

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 June, 2015 - 16:28

मालवणी विषारी दारूकांडानंतर आमच्या ऑफिसमध्ये जेवणाच्या सुट्टीत घडलेली एक छोटीशी चर्चा.
___________________________________________________________________

:- दारू पिऊन मेले त्यांना सरकार काय म्हणून नुकसान भरपाई देते? कोण त्यांना प्यायला सांगते? मेले आपल्या कर्माने. नाहीतरी दारू कुठे जगवते. उद्या मरणार होते ते आज मेले.

:- त्यांना नाही त्यांच्या अनाथ झालेल्या बायकापोरांना ते पैसे मिळतात. घरच्यांचा आधार जातो, यात त्यांची काय चूक?

:- काही आधार बिधार नाही जात. उलट दारूड्या नवर्याच्या छळातून सुटतात. वर पैसेही मिळतात. त्यांना एकप्रकारची लॉटरीच लागते. कोणता बेवडा आपल्या बायकोला पोसत असतो, उलट तिच्याच पैश्यांवर थेरं करत असतो. पगार झाल्यावर अर्धा पैसा पहिल्याच दिवशी गुत्त्यात उडवतात, नाहीतर कुठेतरी रस्त्यावर पडतात. त्यांच्या खिशातून कोणी अख्खा पगार काढून नेला तरी त्यांना त्याचे भान नसते.

:- पण दिली नुकसान भरपाई तर तुमचे काय जातेय? जरा माणुसकीनेही विचार करा रे.

:- काय जातेय म्हणजे? आणि कसली माणुसकी घेऊन बसला आहेस. सरकारचा पैसा म्हणजे आपलाच पैसा. आपल्याच टॅक्समधून जमा झालेला पैसा. कोणी अपघातात वा अतिरेकी हल्ल्यात गेले, भूकंप वा पुरात दगावले, त्या अभागी लोकांना करा ना मदत. कोणी हरकत घेतली आहे का? पण जे लोक दारू पिऊन मरतात त्यांच्याबद्दल मला जराही सहानुभूती नाही.

:- तुला कोणाबद्दल सहानुभूती वाटते का नाही हा मुद्दाच नाही. तो तुझा वैयक्तिक प्रश्न झाला. कायद्यानुसार नुकसान भरपाई मिळणे योग्यच आहे. ते दारू नाही तर "विषारी दारू" पिऊन मेले आहेत आणि दारू पिणे हे बेकायदेशीर नाही.
विषारी दारूला रोखता न येणे हे सरकारी यंत्रणेचे अपयश आहे, म्हणून त्यांना नुकसान भरपाई मिळणे योग्यच आहे.

:- विषारी असो वा नसो, तो पुढचा मुद्दा झाला. मुळात दारू पिऊन मेल्यावरही मायबाप सरकार पैसे देते ही जाणीव आणखी कित्येक पावले दारूच्या गुत्त्यावर वळवतील हा विचार का नाही कोण करत,? की हे पैसे केवळ मेलेल्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश दाबायला वाटले जातात..

सरतेशेवटी न राहवल्याने मी ऋन्मेष देखील चर्चेत उतरलो,
:- पण सरकार दारूबंदीच का नाही करत? मॅगीवर बंदी आणणार्‍या सरकारला दारूवर बंदी आणायला जमू नये हेच सरकारचे सर्वात मोठे अपयश नाही का? लोकांना स्वस्तात रेशनचे गहू-तांदूळ पुरवण्याऐवजी स्वस्तातली हातभट्टीची वा सरकारमान्य देशी दारू पुरवायचा हट्ट का? .... वगैरे वगैरे..

----

आणि तत्क्षणीच ठरवून केल्यासारखे सारे डब्बा धुवायला उठले. अश्या अविर्भावात जणू काही मी विषय एका डेड एंडला आणून सोडला. ‘विषारी दारू प्रकरणात मृतांना नुकसान भरपाई मिळायला हवी का नको’ यावर तावातावाने चर्चा करणार्यांना संपूर्ण दारूबंदी हा विषय मात्र अतर्क्य, अशक्य आणि अनाकलनीय कसा काय वाटू शकतो याचे नवल करत मी देखील उठलो.

----

काय चीझ आहे ही दारू ..
सरकार याच्या खरेदी विक्रीवर आक्षेप घेत नाही. दारू पिणे हा गुन्हा ठरत नाही.
जर कोणी दारूच्या नशेत कोणाचा बळी घेतला तर तो दारू पिणारा गुन्हेगार ठरतो. विकणारा मोकाट सुटतो. बळी जाणारा मात्र नाहकच मरतो.
जर दारूने पिणार्‍याचाच बळी घेतला तर त्याला मदत आणि सहानुभूती मिळते. विकणार्‍याला शिक्षा होते. कारण पिणार्‍याने ते अमृत(!) समजून घेतले असते, पण देणार्‍याने फसवून विष दिले असते.

रोज थोडे थोडे आतडे जाळत मरणाच्या दारी फरफटत नेणारी दारू विकणे हा गुन्हा नाही.
पण एकाच फटक्यात यमसदनी पोहोचवणारी दारू बनवली तर तो मात्र गुन्हा आहे.

कमाल आहे !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निगरगट्टपणाला कौतुकाची सहानुभूती मिळाली की काय होते हे मायबोलीवरच नाही तर भारतातल्या गल्लोगल्ली बघायला मिळेल.
फ्लेक्स लावले गल्लोगल्ली? कश्याला रडता, तुम्हाला कोणी ते बघायची सक्ती केली आहे का? रस्त्यावर खड्डे आहेत अरे तुम्हाला कोणी खड्ड्यातून जायची सक्ती केली आहे का? चॅनलवर काहीबाही 'ब्रेकिंग न्यूज' ऊकरून कर्कश्य आवाजात ओरडून, चारदोन तज्ञ म्हणवणार्‍या टाळ्क्यांना बोलावून पत्र्कारितेचा टेंभा मिरवणार्‍या चॅनल ची तक्रार करतांना, अरे तुम्हाला कोणी सक्ती केली आहे का ते चॅनल बघायची, डोकेखाऊ सिरियलीच्या बाबतीतही तेच अर्ग्युमेंट 'अरे तुम्हाला ऑप्शन आहे ना न बघण्याचा'.
चार दोन समंजस शब्दाचे फव्वारे सोडले की बॅलन्स्ड पोस्ट, समजून-ऊमजून लिहिलेला प्रतिसाद असे मोदक मिळतात, ते ही हवेच असतात बर्‍याच जणांना. जे दर्जाहीन, अनावश्यक, रद्दी, टाकाऊ आहे ते आहेच, आणि ते थांबलेच पाहिजे नव्हे नष्टं झाले पाहिजे, ह्या असल्या शिळ्या खरकट्यापायी पंचपक्वान्नासारखं लिहिणार्‍या अनेकांनी लिहिणे थांबवले आहे. त्यांना कोणी थांबवा असे म्हणाले नाही पण असल्या कचर्‍यात आपलं नाणं कितीही खणखणीत असलं तरी वाजवण्याचा सोस आता त्यांना ऊरला नाही. शेवटी मॅगी खाणारीच जमात मायबोलीवर नांदत असेल तर आपण पुढयात पक्वान्न वाढूनही हे त्यात माती शोधत राहणार हे कदाचित त्यांना ऊमगले आहे.
मराठी साहित्याशी दूरदूरपर्यंत संबंध ऊरला नाहीये मायबोलीचा फालतूच्या हेतूशून्य चर्चा, प्र्तिसाद देणारेही ईगोईस्टिक- आपलाच अजेंडा रेटणारे(काही संजस शब्दांमध्ये तर काही मुलखाच्या वाह्यात शब्दांत), सांडपाण्यासारखे सदोदित वाहणारे तडके, राजकारणाला वाहिलेल्या नाल्यांमध्ये हात धुऊन घेणारे तर नेहमीचेच.
मायबोलीवर ऊद्या काय ऊगवणार आहे आणि तुमच्या पुढ्यात वाढले जाणर आहे हे तुम्ही आज कश्याला खतपाणी घालता त्यावरच ठरणार आहे. मायबोलीवर आपण नेमके कश्यासाठी येतो आणि मला ईथून कसला आनंद पाहिजे आहे हे आपले आपल्यालाच कळले तर खरे.
तुम्ही म्हणाल एवढा त्रास होत असेल तर जा की मायबोली सोडून. ते दोनदा करून झाले. मायबोलीने पूर्वी जो काही आनंद दिला आहे त्याचे ऋण फिटेस्तोवर कदाचित हे त्रासदायक (देणे आणि घेणे) दोन्ही काम करावंच लागेल. जर कुठलाही सोम्यागोम्या ऊठून लेखक,पत्रकार,विचारवंत, कवी, गझलकार, तडकाकार होणार असेल आणि माध्यम 'त्याला हवे ते लिहिण्याचा अधिकार आहे हो, तुम्ही तुमचे काय ते बघा' असे कायम म्हणणार असेल तर हा गीतकार, कथाकार, पटकथा लेखक, पत्रकार मायबोलीकर आहे हे ईतिहासजमा होणार. नुसती लोकसंख्या वाढल्याने देशाचे राहणीमान ऊंचावत नाही.

साती, सुंदर पोस्ट.
+७८६

दारुबंदी हि सरकारने करायची गोष्ट नसून, तो समाजशिक्षणाचा विषय आहे असे मला वाटते.
>>>
दिनेशदा, सहमत आहे. हे समाजशिक्षण अगदी उच्च सुशिक्षित वर्गातही गरजेचे आहे.

मृतांच्या घरच्यांचाही दोष नाही आणि त्यांना थोडीफार मदत केली तर फार चुकलेय असेही मला वाटत नाही.
>>>>
हो, मी देखील ठामपणे कुठल्याही एका मतावर आलो नाहीये. बाकी आज काही व्हॉटसपग्रूपवर देखील या मदतीच्या विरोधात मेसेज फिरताना पाहिले. सोबत तुलना आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांशी होती. सरकारला त्यांचे काही पडले नाहीये आणि या बेवड्यांना मदत देतेय वगैरे वगैरे.

हुप्पाहुय्या
>>>
आपल्या भावनेशी सहमत. हेडरमध्ये मी खरडलेल्या चार टुक्कार ओळी नजरेआड करा. चांगले प्रतिसाद आले तरीही धागा तुम्हाला अपेक्षित दर्जा गाठू शकेल. बाकी मी माझ्यापरीने संयमित भाषेतच विषय मांडायचा प्रयत्न केलाय. अन्यथा शीर्षकात ऑफिसच्या जागी एमएनसी लिहिले असते तरी चार अवांतर टीआरपी प्रतिसाद त्यावर आले असते.. आणि हि चर्चा माझ्या आणि माझ्या ग’फ्रेंडमध्ये झाली असे लिहिले असते तर चाराचे चाळीस झाले असते Happy

अवांतर - मिथेनॉल ईथेनॉल.. ही दारू आहे की रसायने.. आशूचॅंप, तो फिर अच्छा ही हुआ कम्बख्त जो मैने पी ही नही Happy

समाजशिक्षणावरून आठवले, जर दारूमध्ये असे काही घटक असतील जे तुम्हाला दारूची चटक लावतील, पुन्हा पुन्हा घ्यायची इच्छा होईल, तर मग समाजशिक्षणाचाही तितकासा फायदा होणार नाही.

अत्यंत निरर्थक चर्चा आहे. परिस्थितीचा सारासार विचार न केल्यासारखी.
मरणारे महाराष्ट्राचे नागरिक होते त्याबद्दल सरकारने मदत जाहिर केली तर पोट दुखायचे काहीच कारण नाही. किमान त्यांच्या कुटूंबियांना थोडा दिलासा तरी मिळेल. हजारो कोटींचा भ्रष्टाचार इथे खपला जातो पण लाखभराच्या मदतीची चर्चा होते याचा खेद वाटतो.
वरच्या काही प्रतिसादामध्ये दारु पिणारे त्यांचे कुटूंब पोसत नाहीत उलट बायकांच्या कमाईवर दारु पितात वगैरे अशी शून्य अभ्यासातून आलेल्या विधानांचा निषेध. अशा प्रकारची ( हातभट्टी वगैरे) पिणारा वर्ग हा बहुतांशी काबाडकष्ट करणारा आणि मजूर वर्ग किंवा अत्यल्प उत्पन्न असणारा घटक आहे. तो दारुडा असला तरीही कुटूंब चालविणारा आहे. दारु पिण्यापुर्वी त्यात विष आहे याची कल्पना कोणालाही नव्हती केवळ म्हणूनच ही घटना एक अपघाताच्या नजरेतून पाहणे गरजेचे आहे. आपण घेतली तर ड्रिंक आणि त्यांनी घेतली तर दारु हाच काय तो फरक .

पैसा दारुड्यांना नव्हे,त्याच्या कुटुंबियानि दिला जाणार आहे.अवैध दारूची विक्री व उत्पादन रोखू न शकलेल्या सरकारी ,पोलिस अधिकार्यांकडून दंड वसूल करायची पद्धत अजून तरी नाही>>>>

मालवणी परिसरातले पोलीस अधिकारी सस्पेंड झाल्याची बातमी वाचली.

पोलीसांचा रोल मोठा विचीत्र असतो. चंद्रपुरमधे दारुबंदी झाल्यावर दारु विक्रेता महासंघाने एक पत्रकार परिषद बोलावली आणि आता अवैध दारु चंद्रपुरात बनु लागेल आणि त्यामुळे मालवणीसारखी घटना होऊ शकते असा इशारा सरकारला दिला. थोडक्यात दारु बंदी उठवा.

ह्या वैध धंद्यातले लोक जर स्वतः अवैध दारु बनवुन दारुड्यांना फुकट पाजुन हत्याकांड करवतील तर यावर पोलीसांनी कुठे आणि कसा चाप लावायचा ?

या शिवाय किमान मागील सरकारला अवैध धंद्यामधुन हप्ता पोचवला जायचा अशी चर्चा आहे. रोजचा एक कोटी हप्ता जमा करणारा उद्योग किती कोटींचा असेल असेल याची कल्पनाच करवत नाही.

हे पैसे जमा करुन संबधीत खात्यापर्यंत पोचवायचे काम पोलीसांचेच आणि मालवणी घडले की बळी सुध्दा त्यांचाच. पैसे सगळेच खातात पण मंत्री मात्र हात झटकुन मोकळे होतात.

नवसागर आणि काळा गुळ सहजपणे उपलब्ध होतो आहे तर कंजारभाट वस्तीत घराघरात भट्या लागतात. कुठे आणि कसे नियंत्रण आणणार ?

माझ्या वडीलांच्या ऑफीस सहकार्‍याची आई सकाळी दारु प्यायची कारण ती आयुष्यभर ( त्या विशिष्ठ जातीत ) भट्या लावणे आणि दारु गाळणे ही कामे स्त्रीया करतात. पुरुष फक्त दारुची वहातुक करतात. अश्या संस्कृतीत नियंत्रण कोण आणि कसे करणार ?

मी विषारी दारु बनवणार्‍यांची आणि ती पिणार्‍यांची फार समर्थक आहे असं नाहीये. पण नुसती दारुबंदी करुन भागेल का? ती अशी अवैध मागाने विकली जाणारच जोवर मागणी आहे तोवर.

आणि पिणारे तरी काय करणार? गलिच्छ वस्ती, गलिच्छ काम , गरीबी , शिक्ष्णाचा अभाव, गळक्या कोंदट झोपड्या मनोरंजनाची इतर साधन नाहीत. मनाला बरं वाटेल अशी एक ही गोष्ट नाही जीवनात !! मग अशा स्वस्त अवैध जीव घेण्या गोष्टींना ते बळी पडणारच.

त्यांचा जीवनस्तर सुधारणे आणि त्यांनी ह्या पासुन आपण हुन दूर रहाणे हे आपले उद्दिष्ट हवे खरे तर.

साती , आपला प्रतिसाद आवडला.

पनवेल जवळ इरशाळ गडावर भटकंती निमित्त गेलो होतो, तिकडे तर जंगलाच्या अंतस्थ भागात सुद्धा 'मोहा' च्या फुलांची दारू बनवण्याचं काम चालू होत.

शेवटी काय

'पहिल्या धारेच्या प्रेमाने सालं काळीज केलं बाद ……. '

-तोफखाना

जी माणसे मेली ती दारू पिऊन मेली नसून दारूत विष असल्याने मेली आहेत. म्हणून दारू बंदी करा हा विषय असूच शकत नाही, उद्या सार्वजनिक ठिकाणी तयार होणार्या वडा पाव खाल्याने विषबाधा होऊन कुणी मेले असते तर तुम्ही वडापाव वर बंदी आणनार का ?

उद्या सार्वजनिक ठिकाणी तयार होणार्या वडा पाव खाल्याने विषबाधा होऊन कुणी मेले असते तर तुम्ही वडापाव वर बंदी आणनार का ?
>
आपला मुद्दा योग्य आहे पण तरीही तोडावासा वाटतोय, कारण वडापाव आणि दारूची तुलना नाही होऊ शकत.
कारण वडापावनिर्मिती मागचा हेतू आणि दारूनिर्मिती मागचा हेतू भिन्न आहेत.

जय@

आपल्या परवानगीने थोडीशी दुरुस्ती. वडा /पाव बनवण्याच्या प्रक्रियेत केमिकल्स टेस्टीग करावे लागत नाही. कोणतीही दारु फर्मेंटेशन प्रक्रियेतुन बनते आणि बनणारे रसायन हे घातक नाहीना हे बघणे गरजेचे असते. गावठी दारु बनविणारे ही प्रक्रिया वेगाने व्हावी म्हणुन त्यात काही रसायने मिसळत असतात. त्यांच्याकडे प्रयोगशाळा नसते त्या ऐवजी दारु पिऊन मेला तरी कोणी रडणार नाही असे अट्टल दारुबाज " टेस्टर " म्हणुन फुकट दारु पितात. त्यांना काही फरक पडला नाही तर दारु बाजारात आणली जाते.

कधी कधी टेस्टर नसतो आणि बाजारात दारु पोचवायची असते अश्या वेळेला मालवणी घडते.

वडा-पाव बनवायला सुध्दा लायसन्स लागते पण गावठी दारु लायसन्स शिवाय चोरुन बनते ती कशी थांबवणार ?

पुण्यात दारुबंदीच्या काळात एका वकीलाचे काही वर्षांपुर्वी " उखळ पांढरे " झाले. ( हा शब्द प्रयोग खुद्द त्या वकीलाने दुरदर्शनवरील मुलाखतीत वापरला. इतकच काय या धंद्यात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी मिळालेल्या पैशातुन बांधलेल्या बंगल्याला ते म्हणे मोरारजी कृपा नाव देणार होते. )

अडाणी लोक अवैध दारु बनवतात आणि शिकलेले त्यांना या गुन्ह्यातुन सोडवतात. या पुढचा भाग म्हणजे पुण्यातले लोक अश्या माणसाला दोन वेळा महापौर म्हणुन निवडुन देतात.

महाराष्ट्रात काही विचारी लोकांनी दारुबंदी केली आणि अती हुशार मंडळींनी ती हाणुन पाडली यात दररोज दारु पिणारी ती गरीब मंडळी कुठेच नव्हती,

त्यांच्याकडे प्रयोगशाळा नसते त्या ऐवजी दारु पिऊन मेला तरी कोणी रडणार नाही असे अट्टल दारुबाज " टेस्टर " म्हणुन फुकट दारु पितात.
>>
शॉकिंग.
बेकायदेशीर तर अर्थातच

साती,
राहिला मुद्दा मॅगी आणि दारूच्या कंपॅरिझनचा.
तर सरकारने मॅगी नावाचा ब्रँड विकण्याला बंदी घातलीय. ती सुद्धा तिच्यात काही हानीकारक गोष्टी सापडल्याने.

>>>

लेट रिप्लाय देतोय, पण एक प्रश्न - मॅगी मध्ये जे हानीकारक घटक होते ते तुलना करता देशी वा हातभट्टीच्या दारूपेक्षा घातक होते का?

झूठों ने झूठों से कहा है सच बोलो
सरकारी ऐलान हुआ है सच बोलो
घर के अंदर झूठों की एक मण्डी है
दरवाजे पर लिख रखा है सच बोलो
गंगा मइया डूबने वाले अपने थे
नाव में किसने छेद किया है सच बोलो
---राहत इन्दौरी

आपण भरत असलेल्या प्रत्यक्ष करावर देश चालतो असा मध्यमवर्गाचा गोड गैरसमज असतो . खरेतर अप्रत्यक्ष कर जवळपास सगळेच भरतात आणि इतरही अन्य मार्गाने देशाची तिजोरी भारत असते ज्याच्यावर सगळ्या लोकांचा हक्क असतो. शंभर एक लोक मेले तरी मध्यमवर्गाला त्याबद्दल काही वाटत नाही त्यांना त्यांच्या कुटुंबियांना लाखभर रुपये जाहीर झाल्याच दुःख जास्त असतं.

किरण कुमार
अत्यंत निरर्थक चर्चा आहे. परिस्थितीचा सारासार विचार न केल्यासारखी.
मरणारे महाराष्ट्राचे नागरिक होते त्याबद्दल सरकारने मदत जाहिर केली तर पोट दुखायचे काहीच कारण नाही. किमान त्यांच्या कुटूंबियांना थोडा दिलासा तरी मिळेल. हजारो कोटींचा भ्रष्टाचार इथे खपला जातो पण लाखभराच्या मदतीची चर्चा होते याचा खेद वाटतो.
वरच्या काही प्रतिसादामध्ये दारु पिणारे त्यांचे कुटूंब पोसत नाहीत उलट बायकांच्या कमाईवर दारु पितात वगैरे अशी शून्य अभ्यासातून आलेल्या विधानांचा निषेध. अशा प्रकारची ( हातभट्टी वगैरे) पिणारा वर्ग हा बहुतांशी काबाडकष्ट करणारा आणि मजूर वर्ग किंवा अत्यल्प उत्पन्न असणारा घटक आहे. तो दारुडा असला तरीही कुटूंब चालविणारा आहे. दारु पिण्यापुर्वी त्यात विष आहे याची कल्पना कोणालाही नव्हती केवळ म्हणूनच ही घटना एक अपघाताच्या नजरेतून पाहणे गरजेचे आहे. आपण घेतली तर ड्रिंक आणि त्यांनी घेतली तर दारु हाच काय तो फरक .
+१

ऋन्मेष, तुझ्या मॅगीवाल्या प्रश्नाचा अर्थच मला कळला नाही.
मॅगीवर नेमकी बंदी का आहे यावर एक मोठा सविस्तर रिप्लाय मी मागेच मॅगीच्या कुठल्यातरी धाग्यावर लिहिलाय.
मॅगी आपण विकत घेऊन शक्यतो लहान मुलांना खाऊ घालतो (काही मोठेही खातात ते सोडा). देशी दारूचं मार्केटींग अजूनतरी लहान मुलांचं टार्गेट कन्ज्यूमरशिप डोळ्यासमोर ठेवून होत नाही.
मॅगीची चार पाकिटे खाऊन कुणी लगेच मरेल असे होणार नाही(जरी दो मिनट में स्युसाईड वाले व्हीडिओ वॉटस अ‍ॅप्वर व्हायरल झालेत तरी)
पण मिथेनॉलयुक्त दारू दोन ग्लास प्यायलात तर लगेच मरायची शक्यता अगदी जास्त आहे. शुद्धं मिथनॉल प्यायल्यास उपचाराअभावी १०० टक्के !)

(आम्ही सायनला असताना ठणे जिल्ह्यातल्या आदीवासी एरियात झालेलं हे असलं मिथेनॉल कांड. कितीतरी पेशंट मेले होते. यावेळीही मालवणीतले रूग्ण बहुतांशी आमच्या सायनलाच आले. आमच्या वेळी उपचारांकरिता तातडीने इथेनॉल उपलब्ध केले होते. यावेळी पेशंट्स इतके प्रचंड होते की चक्कं बाजारातून ब्रँडेड व्हिस्की मागवून)पाजण्यात आली.
काल आमच्या शिक्षकांचेच टिव्हीवर इंटरव्यू आणि प्रत्येक इंटर्व्यूत मागे आमचं हॉस्पिटल बघून अगदी देजा वू फिलींग येत होतं.
Wink

मायबोलीवर आताशा काही सकस वाचण्यासारखं राहिलं नाहिये...आता काय लोकांच्या लंच टेबलावरच्या फालतू गप्पा पण डिस्कशन ला घ्यायच्या? Uhoh

साती,
मी मॅगीतील हानीकारक घटकांची तुलना विषारी दारूबाबत करत नसून उच्च(!) प्रतीच्या हातभट्टीच्या वा देशी दारू सोबत करत आहे. त्या मूळ बिनविषारी दारूत जे अपायकारक घटक असतात ते मॅगीत सापडलेल्या घटकांपेक्षा घातक असू शकतात का?
बाकी मॅगी लहान मुलांना खाऊ घालतात त्यामुळे त्यावरचे निर्बंध कडक हवेत हे मान्यच, मॅगीला फेव्हर करायचे नाहीयेच मुळात, पण दारू देखील कोवळ्या वयातले पित नाहीत असेही नाहीच.

मायबोलीवर हल्ली जास्त सकस चर्चा कमी झाल्यात हे खरं (त्या राजकारणावरील भांडणांमुळे). नशिब ते जरा कमी झालय हल्ली. पण आशु२९, 'मालवणी विषारी दारूकांड' ही फालतु घटना/चर्चा का? कोणाच्याही लंचमधे झाली तरी? Happy

ऋन्मेष, दारुबंदी कधीच होणार नाही. एक मित्र ३५व्या वर्षी अगदी ब्रांड्वाली का काय म्हणतात तसली पिऊन पिऊन liver failure होऊन गेला. त्यामुळे 'सवयीचे व्यसन होऊ देऊ नका' हे दारु घेणार्‍या मित्रमंडळींना त्यांना भोचकपणा नाही वाटला तर सांगावे. पण स्वतःच्या दारु पिण्याचे समर्थन कोणी केले की ऐकवत नाही.

साती, बहुतेक प्रतिसाद पटला, एक सोडुन. 'अवैध दारु बनवणार्‍यांना पण कोणी मरावे वाटत नसते' हे. कारण अवैध भेसळ करताहेत, नशा यायला नको ते घालताहेत म्हणजेच त्यांना माहिती असणार की ते धोकाधायक आहे. तरी ते करतात म्हणजे indirectly 'प्या व कदाचित मरा' असेच म्हणतात की.

हो सुनिधी.
यावेळी असे झालेले दिसतेय खरे.
पण आता त्या वाक्यात 'शक्यतो' हा शब्द घालून वाचा.
लहानपणापासून अवैध दारू मिळण्याच्या ठिकाणाच्या अगदी जवळ राहिले असल्याने सकाळसंध्याकाळ तिथे दारू पिणारे वर्षानुवर्षे जगताना पाहिल्येत.
आमचे आजोबा दुपारी कामावरून आल्यावर दररोज एक ग्लास दारू प्यायचे तिथे जाऊन. ते ९० वर्षांहून अधिक जगले.
आज्जी ते निघाले की म्हणायची 'चालला टावरानावर'
आम्हाला दारूच्या गुत्त्याला मराठीत 'टावरान' म्हणतात असे वाटायचे.
नंतर कळलं ते इंग्रजी 'टॅवर्न' शब्दाचे भ्रष्ट रुप आहे.
Wink

sakalya+1
Discussion about maggi is relevant as it is consumesed mainly by educaited middle-class like us. why bother about those consuming country liquor?

भरत, आम्ही बॉदर करतोय कारण हे लोक मरतात तेव्हा नुकसान भरपाई म्हणून आम्ही टॅक्स पे केलेला पैसा जातो.
जेव्हा असे पेशंटस येतात तेव्हा सरकारी हॉस्पिटलच्या सुविधा यांच्यासाठी वापराव्या लागतात.
यांचे डायलिसीस करण्यासाठी मशीन्स उपलब्ध व्हावेत म्हणून आमच्या रेग्युलर पेशंटसच्या अपॉईंटमेंट दोन तीन दिवस रिशेड्यूल/ पोस्टपोन कराव्या लागतात.

आणि जरी ही एक दुर्दैवी अपघाती घटना समजली तरी असे अपघात होऊ नये म्हणून पोलिस, प्रशासन आणि इतर व्यवस्था चालविण्यासाठी आम्ही टॅक्स भरतो. ते लोक स्वतःचे पगार घेऊनही अश्या धंद्यातून अतिरिक्त पैसा कमावतात.
त्यामुळे आम्हाला या गोष्टीची चर्चा करण्याचा 'पूरा हक है'
Happy

पण आशु२९, 'मालवणी विषारी दारूकांड' ही फालतु घटना/चर्चा का?>>
त्यांना हे वाक्य, आता काय लोकांच्या लंच टेबलावरच्या फालतू गप्पा पण डिस्कशन ला घ्यायच्या? अ ओ, आता काय करायचं
असे लिहायचे होते खरेतर,
आता काय फालतू लोकांच्या लंच टेबलावरच्या गप्पा पण डिस्कशन ला घ्यायच्या? अ ओ, आता काय करायचं

Pages