म्यानमा - ४

Submitted by arjun. on 22 June, 2015 - 23:35

बहादूरशहाच्या कबरी नंतर मला स्कॉट मार्केट मधे जायचे होते. येंगॉनमधले स्कॉट मार्केट म्हणजे बाहेरून थोडेफार क्रॉफर्ड मार्केट सारखे. पण इथली दुकाने दागदागिने, कापडचोपड आणि हस्तकलेच्या वस्तूंनी भरलेली. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ४. सुर्य लवकर मावळत असल्याने आसाम मेघालयात पण बाजाराची अशी वेळ बघितलेली. गेल्यागेल्या समोर खूपसारी खर्याखोट्या दागिन्यांची दुकाने. मला यात काही स्वारस्य नसल्याने गल्ल्या बदलून दुसर्या विभागात गेलो. इथे सगळीकडे कापडच कापड. एका दुकानात बायकांच्या जरीकाठी लुंग्या होत्या.( हे वाचायला किती विचित्र वाटते?) दुकानदार मुलगी रेशमी कापड बघा..बर्मीज स्पेशल वगैरे मार्केटींग करत कापडे समोर टाकू लागली. लुंगीचा साईज बघून हे आपण गणपतीला आसन म्हणून वापरू शकू हे डोक्यात आले. त्यात एक लाल रंगाची अधे मधे जरीने विणलेले हत्ती असलेली लुंगी मिळाली. पर्फेक्ट फॉर बाप्पा!

स्कॉट मार्केटमधे एका विभागात काही चित्रकारांची दुकाने आहेत आणि तिथे अगदी वाजवी किमतीत ऑईलपेंटींग्ज मिळतात हे नेटवर वाचले होते. तो भाग काही मला सापडत नव्हता. पण घाई नसल्याने माझेही निवांत भटकणे सुरू होते. इथल्या हस्तकलेच्या दुकानांत काही वेगळ्या वस्तू होत्या. म्यानमारचा उत्तरेकडील भाग खनिजरत्नांनी समृद्ध आहे. तिथल्या डोंगर दर्यात रंगिबेरंगी दगड मुबलक. काही दुकानांत तशा रंगिबेरंगी नैसर्गिक दगडांचा चुरा करून त्याला जाड खर्ड्यावर चिकटवून निसर्गचित्रे बनवलेली दिसली. वाटले हे नक्कीच खिशाला 'चाट' देणार. पण इथे सगळीच स्वस्ताई होती. त्यातही घासाघीस होत होती. आणखी पुढे...डावीकडे...उजवीकडे करत एक एक बोळ पार करत होतो पण आता चपलांची...प्लास्टिक वस्तूंची..खाण्याची अशी वाटेल ती दुकाने दिसत होती पण चित्रकार कुठे दडी मारून बसले होते देवजाणे. शेवटी थकून एका रसवंती वाल्याच्या बाकड्यावर बसकण मारली. कलिंगडाचा रस पिऊन थोडावेळ हाशहुश केले. समोरच्या कोपर्यावर एक वाद्यांचे दुकान होते. तिथे एक दोघे तरूण घुटमळत होते. अचानक त्यांनी तिथली एक गिटार काढुन वाजवायला सुरूवात केली. दोन मिनिटांनी त्या दुकानचा मालक पण त्यांना बँजो वाजवत साथ देऊ लागला. पाच मिनिटे जे काय संगीत वाजले ते अनपेक्षित आणि अतुलनिय आनंद देऊन गेले.

आता बाजाराच्या मधला आणि उजवीकडचा बराचसा भाग बघून झाला होता. डावीबाजू थोडी फार शिल्लक होती आणि त्या दिशेनी गेल्यावर एकदाची ती चित्रकार गल्ली सापडली. गल्लीच्या दोन्ही बाजूंना लहान लहान दुकानांचे गाळे होते आणि ती सगळी दुकाने फक्त पेंटींग्जची. सगळी तैलचित्रे. एक दोन दुकानांच्या बाहेर कलाकार प्रत्यक्ष चित्रे काढत होते. बहुतेक सगळी गिर्‍हाइके फिरंगी. काही निसर्गचित्रे होती....काही बौद्ध भिख्खूंचे प्रोफाईल्स असलेली..बहुतांश कंटेंपररी. कुठे आधिच्याचे बघून समोरच्याने पण त्याच पद्धतीने काढलेली. इतकी सारी पेंटींग्ज अशी रस्त्याला खेटून एका लायनीत दुकानात विकायला असणेच मुळात गंमतीचे वाटत होते. बाजारात इतरत्र सुरू होती तशीच घासाघीस इथेही चाललेली पण हळू आवाजात. एक घेतले तर पन्नास डॉलर, दोन घेतली तर.. सारख्या तोंडी ऑफर्स पण कुणी देत होते. एका दुकानाच्या बाहेर एका जीर्ण जुनाट लाकडी मंदिरात शिरणार्या तीन बौद्ध भिख्खूंचे तैलचित्र त्याच्या जीर्णशीर्ण फील मुळे मला आवडले. थोडाफार डिस्काऊंट मागत खरेदी तर पूर्ण केली पण ही चार फुटी कॅनव्हासची सुरनळी आता पुढचे दहा दिवस वागवायची होती.

दुपारी जेवण करून एक झोप काढली आणि पाच वाजता पुन्हा ताज्या दमाने बाहेर पडलो. हॉटेलपासून जेमतेम अर्ध्या किलोमिटरवर सुले पाया होता. बाहेर कबुतरांचे थवेच्या थवे. त्यांना खायला घालून पुण्य कमावणार्यांची ही गर्दी. प्रवेश फी भरून तिकीट घेतले. जोडे ठेवायच्या ठिकाणी जोडे ठेवले. आत मधे एक सोनेरी स्तूप होते. लहान लहान बुद्धाच्या मुर्ती होत्या. स्थानिक लोक येत जात होते. खरे म्हणजे बघण्या सारखे काहीही नव्हते. एक प्रदक्षिणा मारून बाहेर जाणार तर पलिकडे एक लहानशी खिडकी उघडली. त्यातून एक दोर मधल्या मुख्य स्तुपाच्या कळसाला आधीपासूनच जोडला होता. त्या खिडकीतून एक लहानसा सोनेरी नक्षिदार रथ निघाला आणि उंचावर त्या स्तूपाच्या माथ्याशी जाऊन पुन्हा परत आला. हा काय मजेदार प्रकार आहे हे विचारणार तर एक म्हातारे आजोबा मला खाणाखुणा करत पुन्हा या रथाला वर चढवायचे का म्हणून विचारू लागले. शिवाय तसे केल्यानी मला बहुतेक भरपूर सारे पुण्य पण लाभणार होते पण रथ चालवायची दक्षिणा टिकवली तरच. त्यांना मी हसून नम्रपणे नकार दिला आणि बाहेर पडलो. जोडे घ्यायला गेलो तिथे दानपेटी ठेवली होती बहुतेक सगळ्या शंभर दोनशे पाचशे चाटच्या नोटा लोकांनी टाकलेल्या. मी पण पाचशेची नोट काढून टाकणार तर तिथल्या दोन मुली अत्यंत गुर्मीत वन थाऊजंड म्हणून ओरडल्या. हाईट म्हणजे तिथे भिंतीवर पाटी लावली होती की परदेशी प्रवाशांनी आपल्या मर्जीने योग्य वाटेल तितके पैसे दानपेटीत टाकावे. तिला ती पाटी दाखवली तरी त्यांचा वन थाऊजंडचा कर्कश धोशा थांबेना. वैतागून एक हजार टाकले. सगळ्या सफरीतला हा एकमेव दुधात मिठाचा खडा टाकणारा अनुभव.

सुले पाया हून जवळच्या अनाव्रथा रोड वर भारतीय वस्ती आहे. त्यामुळे पावले तिकडे वळवली. इतर रस्त्यांच्या तुलनेत हा रस्ता बर्यापैकी गजबजलेला होता. मोहम्मद अली रोड वर आल्या सारखे वाटत होते. हार्ड्वेअर, इलेक्ट्रीकची दुकाने. मधेच एखादे गर्दीत लपलेले दक्षिण भारतीय शैलीचे देऊळ. भारतीय मिठाया विकणारी एक दोन दुकाने लागली. पुढच्या प्रवासासाठी घ्यावी का म्हणून बघितले तर वरती माश्या सुखेनैव घोंगावतायत. थोडे समोर फुटपाथवर मोठाल्या कढया घेऊन त्यात समोशाचे, भज्यांचे घाणे निघत होते. पण एकूण बकाल वातावरण बघता घ्यायची इच्छा झाली नाही. इथे असलेले भारतीय वंशाचे लोक हे बहुतांश समाजाच्या खालच्या स्तरात आहेत. बर्मीज लोकां इतके अधिकार त्यांना तिथल्या शासनाने दिलेले नाहीत आणि त्यामुळे त्यातून वर यायच्या संधींवर देखील मर्यादा येत असणार.

या भागात आणखी वेळ फिरावेसे वाटेना. समोर आलेल्या एका टॅक्सीला हात केला. ती पण तितकीच बकाल होती. फाटक्या विटक्या सीटांच्या टॅक्सी काय मुंबईत नाहीत? पण हिच्या सिटा फाटलेल्या..खिडक्या पण फुटलेल्या आणि हे कमी होते म्हणून बसल्यावर ड्रायव्हरने खाणाखुणा करत दरवाजा धरून ठेवायला सांगितले कारण तो मधेच उघडतो म्हणे. अशा या (फॉर्म्युला) एक नंबरी गाडीने आमची सवारी येंगॉनच्या एकुलत्या एक पंचतारांकित हॉटेल स्ट्रँड मधे चालली होती. स्ट्रॅन्ड हॉटेलच्या आजुबाजूच्या परिसरात फोर्टातल्या सारख्या कलोनिअल ईमारती आहेत. स्ट्रँड हॉटेलाच्या एका भागात एक आर्ट गॅलरी आहे. तसेच सगळ्या देशभरातल्या कलाकारांनी बनवलेल्या उत्तमोत्तम कलाकारीच्या वस्तू इथल्या दुकानांत बघता येतात. दुर्दैवाने आर्ट गॅलरीत नुतनीकरण सुरू होतं.

आजच्या दिवसात ठरवलेले सगळे काही बघून झाले होते. सुर्य मावळत होता. आता जेवायचं कुठे हा प्रश्न होता. मघाच्या भारतीय भागाच्या पुढे चायनीज भाग होता तिथे १९ नंबर रस्त्यावर चविष्ट बार्बेक्यु मिळते हे वाचले होते. त्यामुळे तिकडे कूच केली. पण टॅक्सीवाल्याला नक्की कुठे थांबायचं माहित नव्हतं आणि माझ्या फाजिल आत्मविश्वासाने मी तो रस्ता चुकवला. मग आता समोर दिसेल तिथे खाऊन घेऊ म्हणत एक लोकल बर्गर किंग छाप फास्ट्फूड सेंटर दिसले तिथे गेलो. शेजारच्या टेबलावर एक सात आठ जणांचे कुटुंब बसले होते. पाच मिनिटांनी तिथे एक बौद्ध भिख्खू आले आणि या मंडळींनी त्यांचे आगत स्वागत करून त्यांच्या साठी पण एक बर्गर आणि आईसक्रीम सोडा ऑर्डर केला. जेवणासोबत त्यांच्या आपापसात आरामात गप्पा सुरू होत्या पण ते बौद्धसन्याशी बर्गर खात सोडा सीप करत होते हे दृश्य मला पचवायला जड जात होते. दोन दिवसांनी भेटलेल्या एका गाईड कडे याचा उलगडा झाला की बौद्धसन्याशांना असे स्वत:बरोबर जेवायला घरी अथवा बाहेर बोलावणे अनेक बर्मीज लोकांना दानधर्म करण्या इतकेच महत्वाचे वाटते आणि यजमान जे खात असेल तेच जेवण अशा वेळी ते सन्यासी देखील ग्रहण करतात.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग ही खूप छान झालाय.. पण फोटोंशिवाय मजा नाही.. Happy
खूप खूप फोटो टाका..

टूरिस्ट्स खूप येतात का तिकडे?? कोण कोणत्या देशांतून?? जस्ट क्यूरिअस!!

फॉरिनर्स / टूरिस्ट ओरिएंटेड वाटत नाहीये हा देश, तितकासा.. कितपत सेफ आहे??

मस्त भाग....पण फोटो हवेच हवे Happy
>>दोन दिवसांनी भेटलेल्या एका गाईड कडे याचा उलगडा झाला की बौद्धसन्याशांना असे स्वत:बरोबर जेवायला घरी अथवा बाहेर बोलावणे अनेक बर्मीज लोकांना दानधर्म करण्या इतकेच महत्वाचे वाटते आणि यजमान जे खात असेल तेच जेवण अशा वेळी ते सन्यासी देखील ग्रहण करतात.<< हे मात्र आवरा आहे एकदम Lol

वर्षूनील टूरिस्ट खूप येत नाहीत हे खरय. ऑस्ट्रेलियातून येणार्‍यांचे प्रमाण जास्त होते. अमेरिकन आणि जपानी लोक जास्त दिसले नाहीत. सेफ्टी कशा संदर्भात विचारताय? चोर्‍यामार्‍यांबाबतीत असल्यास ती काळजी प्रगत देशांत सुद्धा घ्यावी लागते की. स्त्रियांच्या संदर्भात असल्यास काही कल्पना नाही.

फोटो अपलोड करण्यात खूप वेळ जातो हो. तरी जास्तीत जास्त द्यायचा प्रयत्न पुढच्या भागात नक्की.

हुश्श.. चारही भाग एकसाथ वाचुन काढले.. इंटरेस्टींग.
आता पुढील भागाची प्रतिक्षा राहाणार.. मस्त लिहिताहात .. प्रचि मात्र हवेच हवे Happy
तुम्ही एकटेच गेले होते ? उगाच .. नाही सांगितल तरी चालेल Happy

धन्यवाद.

टीना हो एकटाच गेलो होतो. नं सांगण्यासारखे काय त्यात. Happy
ललिता मार्केटमधे फोटो काढणे माझ्या डोक्यात आले नाही...काढायला हवे होते.

फोटोंची उणीव भासू नये एवढे सुंदर वर्णन केलेय. आताआताच लष्करशाहीतून मुक्त झालाय. पर्यटकांची चटक लागली कि सर्व व्यवहार सुरळीत होतील. सध्या नव्याची नवलाई आहे, पुढे थायलंड, व्हीएटनाम आदी देशांशी स्पर्धा करावीच लागेल.

आपल्याकडच्या पेक्षा बाहेरच्या देशातले बौद्ध भिक्षू वेगळे अन्न खातात. त्यांना मांसाहार वर्ज्य नाही. भिक्षेत मिळालेले काहीही ते खातात. वाढलेली भिक्षा नाकारायची नाही, हा नियम.