टोकियो स्टोरी....!

Submitted by पद्मावति on 21 June, 2015 - 09:39

मागे कधीतरी अमृता सुभाष नि केलेलं टोकियो स्टोरी ह्या चित्रपटाचं परीक्षण वाचलं होतं. बहुतेक लोकसत्ता मधे. ते वाचल्यावर वाटायला लागले की बघावा हा चित्रपट कधीतरी.
साधारणपणे समीक्षकांनी फार कौतुक केलेले पिक्चर्स बघायला मला जरा भीतीच वाटते. एखादे उदास, अंधारलेले घर, कुठेतरी भिंतीवरच्या पालीवर कॅमरा झूम केलेला, मागे घड्याळ तरी टिक टिक करणार नाहीतर आगगाडीची धडधड तरी... आणि दर दोन डायलॉग्स मधील अगदी असह्य वाटणारा तो लांबलचक आकवर्ड पॉज़. काहीच्या काहिच......

असो, पण अमृताच्या लेखावरून तरी वाटत होते की हा चित्रपट तसा नसावा. आणि खरंच, हा चित्रपट बघितल्यावर काहीतरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.

कथा अगदी साधी. दूसरे महायुद्ध नुकतेच संपले आहे, तो काळ. एक वयस्कर आजी आजोबा आपल्या तरुण मुलीबरोबर छोट्याशा गावात राहात असतात. त्या जोडप्याला पाच अपत्ये. त्यापैकी दोन टोकियो मधे असतात, एक क्योतो मधे. एक मुलगा लढाईमधे मेलेला... त्याची तरुण विधवा सुद्द्धा टोकियोमधेच. आजी आजोबा आपल्या मुलांना भेटायला म्हणून चार दिवस टोकियोला निघाले आहेत. मुलांना भेटायला जाणार म्हणून दोघेही आनंदात. त्यांच्यासाठी तिकडे इतक्या दूर शहरात जाणे म्हणजे परदेशात जाण्यासारखेच.

शहरात पोहोचल्यावर डॉक्टर मुलगा, सून अगदी मनापासून स्वागत करतात. नातवंडं मात्र जरा दूरदुरच कारण आजी-आजोबांचा सहवास त्यांना फारसा कधी मिळालेला नाही आहे. एक दोन दिवस मजेत जातात. डॉक्टर मुलगा इच्छा असूनही आई वडिलांबरोबर वेळ घालवू शकत नाहिये.

नंतर मुलीच्या घरी जातात. मुलगी मात्र किंचित स्वार्थी आहे. आता आई वडील आले आहेत, त्यांना टोकियो फिरवावं लागेल. आपण कशाला सुट्टी घ्या, असा विचार करते आणि नोरिको म्हणजे तिची वाहिनी. तिला फोन करते. ही नोरिको आजी आजोबांच्या गेलेल्या मुलाची बायको.

नोरिको मात्र ह्या आपल्या प्रेमळ सासू-सासर्‍यांची खूप छान काळजी घेते. त्यांना टोकियो फिरवते. एका चाळीत तिची एक खोली असते. त्या इतक्याश्या खोलीत सासू-सासर्‍यांना ती घेऊन जाते. प्रेमाने जेउ-खाउ घालते. त्यांच्याबरोबर वेळ घालवते.

आर्थिक दृष्ट्या ती बाकीच्यांच्या तुलनेत काहीच नसते पण मनाची श्रीमंती तिच्याकडे आहे. छोटीशी नोकरी करून ही मुलगी नवर्‍याच्या मागे काटकसरीने जगत असते पण सासू- सासर्‍यांची सेवा करतांना आपला काही खर्च होतोय किंवा आपल्या एव्हढ्याशा घरात आता अजुन यांना कशाला ठेवून घ्या किंवा आपला दिवसाचा पगार गेलाय याचा ही विचारही करत नाही. जी आपुलकी, जो वेळ आजी आजोबांना त्यांची मुलं देऊ शकली नाही ते सर्व काही ही सून त्या दोन-चार दिवसात त्यांना देते, रक्ताचं काही एक नातं नसतांना सुद्धा.

साधा सरळ हा सिनेमा. काहीही मेलोड्रामा नसलेला हा अत्यंत सुरेख चित्रपट यासूजरो ओझु या महान दिग्दर्शकाने बनविला आहे. एखादा दिग्दर्शक जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती गोष्ट पहिल्या प्रथम त्या दिग्दर्शकाला स्वतःलाच भावली पाहिजे, पटली पाहिजे, तरच तो चित्रपट सच्चा वाटतो. हा चित्रपट असा अगदी खरा वाटतो.

कधी कधी दिग्दर्शक स्वता:च्या कलाकृतीच्या किंवा त्यातल्या काही पात्रांच्या इतक्या प्रेमात पडतो की तो कथेला योग्य न्याय देऊ शकत नाही. पण इथे मात्र फार तटस्थपणे चित्रपटाचं कथानक आपल्यासमोर मांडल्या जातं. कोणाला फार काही खलनायक बनवून मुख्य पात्रांना सहानुभूती मिळवण्याचा अजिबात प्रयत्न नाही. अगदी सहजपणे सांगितलेली ही कथा आहे.

कलाकार- यांच्याबदद्ल काय बोलणार. आजी आजोबांच्या भूमिकेत मधे चिशु रियू आणि चीएको हिगाशीयामा या जेष्ठ कलाकारांनी जीव ओतला आहे. खरं म्हणजे फार सुंदर अभिनय केला आहे असहि म्हणवत नाही कारण इथे अभिनय मुळी नाहीच आहे. हे दोघं फक्त हिरायामा आजी आजोबाच वाटू शकतात दुसरे कोणीही नाही. चेहृयावरचे अगदी गोड, प्रेमळ भाव. स्वभावानी साधे, शांत. बरं साधे गरीब पण त्यांना उगाच केविलवाणं वगैरे नाही दाखविलेले. छान आहेत हे दोघं. अतिशय अलिप्त तरीही आनंदी जोडपं आहे. मुलाला वेळ नाही आपल्यासाठी तर हे म्हणतील अरे बिझी डॉक्टर आहे आपला मुलगा, बिझी आहे याचा अर्थ उत्तम डॉक्टर आहे.... असा समाधानी स्वभाव.
आपण भगवदगीता वाचतो. ही मंडळी गीता जगणारी!

कशाचा मोह नाही, अपेक्षा नाही. अपेक्षा नाही म्हणून राग नाही कोणाचा. मुलांविषयी काहीही तक्रार नाही- त्यांच्या तोंडावर तर नाहीच पण अगदी एकमेकांशी बोलतांना पण नाही. उलट बाकीच्या कित्येक मुलांहून आपली मुलं कितीतरी छान निघाली याचंच कौतुक.

tokyo story 1.JPG
जालावरुन साभार.

डॉक्टर मुलाचा रोल करणारा अभिनेता ही चांगला आहे. याने आपल्या भूमिकेला व्यवस्थित न्याय दिला आहे. हा मुलगा एक सरळमार्गी संसारी गृहस्थ आहे. कर्तव्य निष्ठ डॉक्टर आहे. पण आई वडिलांसाठी वेळ काढू शकत नाहीये. हा मुलगा स्वार्थी नाही आहे. पण प्रेम, भावना वगैरे न दाखविता येणारा टिपिकल जपानी पुरूष आहे.

मुलगी मात्र मी आधी म्हटलं तशी थोडी स्वार्थी असते. मी, माझा नवरा आणि माझा व्यवसाय याच्यामधे तिला कोणीही नको आहे मग ते आई वडील का होईना. आपली जबबदारी दुसर्या कोणावर कशी ढकलावी याची उत्तम जाण या बाईला आहे. मनाची संकुचित मनोवृत्ती तिच्या चेहर्यावरही स्पष्ट दिसते आहे. सुगीमारा हारुको ही अभिनेत्री तर या भूमिकेसाठी अगदी फिट बसली आहे.

tokyo story 2.jpg
जालावरुन साभार.

आणि नोरिको--सेटसुको हारा या अभिनेत्री ने नोरिकोच्या भूमिकेला ला शंभर टक्के न्याय दिला आहे. अतिशय गोड दिसणारी ही अभिनेत्री या नोरिको च्या भूमिकेत छान शोभून दिसते. हसरे डोळे, अतिशय सोज्वळ, हसतमुख चेहरा. कायम आनंदी. बरं, या हसण्यामधेही कुठे खोटेपणा नाही. एखाद्याचा चेहरा किंवा डोळे त्या माणसाचा स्वभाव सांगतात. ह्या मुलीकडे बघितलं की असे वाटावे की इतका नितळपणा, समजूतदारपणा या जगात खरंच आहे?

tokyo story 3.jpg
जालावरुन साभार.
tokyo story 4.jpg
जालावरुन साभार.

१९५३ मधे बनलेला हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट आहे. चित्रपटातील संवाद आपल्या रोजच्या बोलण्यासारखे आहेत. फार काही अलंकारीक भाषा वापरण्याचा अट्टहास नाही. मला थोडी खटकणारी एकच गोष्ट वाटली ती म्हणजे या चित्रपटाची लांबी. कधी कधी चित्रपट थोडाफार रेंगाळल्यासारखा वाटतो, विशेष करून शेवट शेवट.

सिनेमेटॉग्राफी उत्तम आहे. त्यावेळेसच्या जपानचे समाज-जीवन, तिथल्या लोकांची बोलण्याची, वागण्याची पद्धत, त्यांची देहबोली फार छान दाखविली आहे. फक्त या सिनेमाचा मूड थोडासा उदास आहे. त्याला कारणही आहे. दुसरं महायुद्ध संपून काहीच वर्षे झाली आहेत. जवळजवळ प्रत्येक घरातील मुलगा हा युद्धात कामी आला आहे. देश आर्थिकरित्या, मानसिकरित्या पार कोलमडून गेला आहे. त्यावेळच्या जपानचा तो थोडा थकलेला, विझलेला, जरासा वाकलेला असा मूड, टोन दिग्दर्शकाने अचूक पकडला आहे.

शक्य असेल तर हा चित्रपट जरूर पहा. फार काही इंट्रेस्टिंग, एक्साइटिंग बघायला मिळणार आहे अशी अजिबात अपेक्षा न ठेवता पहा.
उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय आणि साधी सरळ पटकथा आणि संवाद. छान अगदी प्रामाणिक चित्रपट बघितल्याचं समाधान मिळेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख लिहिलेय. कधी कधी नाट्यमयता नसलेले साधे सरळ काहीच बरे वाटते मनाला थाऱ्यावर आणायला.

नक्की बघेन मिळवून.

खूप गोड वाटतोय सिनेमा.. परिक्षण सुंदर केलंयस, त्यामुळे पाहिला नाहीये तरीही आवडलाय ..

बघते डाऊनलोड करून पाहता येतोय का..

खूप गोड वाटतोय सिनेमा.. परिक्षण सुंदर केलंयस, त्यामुळे पाहिला नाहीये तरीही आवडलाय .. >>> +१००

चित्रपटाचे हे परीक्षण असेल नसेल पण तो सर्वांनी का पाहावा यासाठी अतिशय सुंदर शब्दात केलेले वर्णन आहे...तसेच उतरले आहे पद्मावती. कथानक दुसर्‍या महायुद्धानंतर जळून खाक झालेल्या जपानातील स्थिती दाखवित आहे...सांगत आहे आणि त्यातूनच मनाने श्रीमंत असलेली नोरिका त्या जोडप्यासमवेत दोनचार दिवस कसे आणि किती आनंदात व्यतीत करते याचे तितकेच हळवे चित्रण. कथा सांगण्याची धाटणी आवडली...

विशेषतः अभिनेत्री सेतसुको हाराचा केलेला रास्त उल्लेख फारच आवडला. "टोकिओ स्टोरी" सोबतीनेच कधीतरी तुम्हाला तिचा "साऊंड ऑफ द माऊंटन" पाह्यला मिळाला तर जरूर पाहा.....आज सेतसुको ९५ वर्षाची झाली आहे हे कुणाला सांगितले तर पटायचे सुद्धा नाही....किती हसर्‍या चेहर्‍याची होती ही मुलगी...नोरिको.

सर्व प्रतिसादांचे अगदि मनापासून आभार. अशोक--साउंड ऑफ द माउंटन मला माहित नव्हता. आता नक्की बाघिन. धन्यवाद.

पद्मावति....

"साऊंड ऑफ द माऊंटन" जरूर पाहा...पण प्लीज इंग्लिश सबटायटल्स असल्या तरच पाहावा असे मुद्दाम अगोदरच सांगतो.

खूप गोड वाटतोय सिनेमा.. परिक्षण सुंदर केलंयस, त्यामुळे पाहिला नाहीये तरीही आवडलाय .. >>> +१००

मामांचा प्रतिसाद नेहमीप्रमाणे माहितीत भर घालणारा Happy

नताशा...थॅन्क्स.

~ मी तर ह्या पद्मावति मुलीचेच जादाचे आभार मानतो...कारण तिने जपानी चित्रपटाची आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सेतसुको हारा ह्या अभिनेत्रीचा केलेला उल्लेख...मला अगदी जुन्या आठवणीच्या अंगणात घेऊन गेला. खूप लोकप्रिय होती हारा.... ही सार्‍या जपानी लोकांच्या गळ्यातील ताईतच जणू...आपल्याकडील मीनाकुमारीचा जो मान तोच हारा हिचा. मी पाहिले होते या अभिनेत्रीला अकिरा कुरोसावाच्या एका चित्रपटात. त्यावेळी दहा चित्रपटांचा अकिरा महोत्सव होता. निमित्ताने घडलेल्या चर्चासत्रात कुरोसावाच्या कारकिर्दीचा यथार्थ उल्लेख होत होता (ते साहजिकच होते म्हणा, कारण महोत्सव त्यांच्याच नावाने आयोजित केला होता)...पण मला राहून राहून सेतसुकोचाही कुणीतरी उल्लेख करावा असे वाटत होते. पण तसा झाला नाही, मात्र ही अभिनेत्री मनी ठसली होती अगदी.

आज पद्मावतिच्या "टोकिओ स्टोरी" ने त्या सार्‍या आठवणी जाग्या झाल्या आणि त्याबरोबर आज ९५ वर्षे वयाच्या हारा अभिनेत्रीचीही.

अशोक - या लेखाच्या निमित्ताने मला तुमच्याकडून इतकी छान आणि माझ्यासाठी नवीन असलेली माहिती मिळाली. मला या अभिनेत्रिविषयी काहिही माहीत नव्हते. ती इतकी लोकप्रिय होती, प्रति-मीनाकुमारी होती हे मला काहीच माहीत नव्हतं. तुमचे खूप खूप धन्यवाद.

पद्मावति....

~ किंबहुना उलटपक्षी मीच तुझे आभार मानायला हवेत. तुझ्या या सुंदर लेखामुळे ही जपानी बाहुली इथल्या सदस्यांना आवडली हे मी जाणतो. इंग्रजीशिवाय युरोपातील अन्य भाषातील चित्रपटांकडेही (ऑस्करमुळे) आपले लक्ष जात असते, तरीही तुलनेत आपल्या खंडातील चीन जापान आणि कोरियन चित्रपटांकडे जितके जाणे अपेक्षित आहे तितके जात नाही हे उघड आहे (कारणे अनेक असतील. स्त्री पेक्षाही पुरुष कलाकारांना दिले जाणारे फूटेज, कथानकातील त्यांच्या स्थानाचे महत्व...मला दिसणारे एक कारण म्हणजे तिथे असलेले पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व..). इंग्लिश सबटायटल्सचा अभाव हे आणखीन एक प्रमुख कारण. तरीही हल्ली "दिग्दर्शक चित्रपट महोत्सव" निमित्ताने तसेच इंटरनॅशनल फिल्म्स एक्झिबिशनप्रसंगी गोव्यात असे दोनेक आठवडे चालणारे कार्यक्रम आवर्जून आयोजित केले जातात. पणजी कलाअकादमी या करीता हल्ली खूप प्रसिद्ध झाली आहे....त्या शहरातील रस्तेही कदाचित यामुळेही अतिशय देखणे झाले असावेत...प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष दिले गेले आहे. तर अशा महोत्सवातून जपानी आणि कोरिअन चित्रपट दाखविले जातात....तेव्हा मात्र सबटायटल्सची अट असतेच प्रवेशिका सादर करतेसमयी. त्याचा फायदा आमच्यासारख्यांना निश्चित होत असतो. अडचण इतकीच आहे की सारेच चांगले चित्रपट पणजीत येतीलच असेही नसते, त्यामुळे नेटचा वापर करून काही प्रसंगी त्या आगळ्या कथानकांचा लाभ घेता येतो.