ज्ञानयात्रा २

Submitted by मंजूताई on 21 June, 2015 - 04:46

कार्यशाळेचा आज पहिला दिवस. ही कार्यशाळा इस्सोमी फाऊंडेशन पेरेंट बॉडी ऑफ इनतया पब्लिक स्कूल व इन्जालुमेंडा विमेन एमपॉवरमेंट फोरम ह्यांनी आयोजित केली होती. साडेआठवाजल्यापासून मुलं यायला सुरुवात झाली. पन्नास मुलांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती कदाचित वूमन एमपॉवरमेंट सह आयोजक असल्यामुळे तर नाही ना Happy कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात दीपप्रज्वलन व उदघाटक रिवॉचचे डायरेक्टर विजयस्वामीसर व राखी लिंगी ह्यांच्या आटोपशीर भाषणाने झाली अन लाजरी बुजरी (?)मुलं आमच्या ताब्यात आली. सोयीसाठी म्हणून मुलांना आपआपली नावं त्यांच्या बॅचवर लिहायला सांगितली तर होती खरं पण उच्चारायला जरा जिभेला कसरतच करावी लागत होती. विविध खेळ व जोषपूर्ण गाण्यांमुळे आमचं मैत्र्य जुळायला वेळ लागला नाही. मुले मोकळी होऊ लागली. जसजशी मुले मोकळी होऊ लागली तसतसा त्यांचा सहभाग अन आमचा उत्साह वाढला. मुलं उत्साही होती. प्रयोग करायला, खेळणी बनवायला तत्परते व तन्मयतेने भाग घेत होती की वेळेच भान नव्हतं ते काम पोटातल्या कावळ्यांनी करून दिलं.


दुपारची कार्यशाळा ही त्यांच्या आवडीच्या विषयावर क्रियाशीलता व सृजनशीलतेवर आधारित असल्यामुळे मुलांनी खूपच धमाल अन मस्ती केली. ड्रम सर्कलमध्ये तर वेगवेगळ्या वस्तूंवर, वेगवेगळे ताल इतके सुंदर धरले की, एक मस्त बँड तयार झाला. तसेच ट्रायबल क्वीन/किंग ह्या खेळाचाही मनसोक्त आनंद लुटला. विशेष म्हणजे हे सगळं करत होते ते मोठ्यांच्या मार्गदर्शनाशिवाय. त्यांची कल्पनाशक्ती बघून चाटच पडलो. शाळांमध्ये अश्या सगळ्या गोष्टी करायला वावच नसतो ना.

एकंदरीत पहिला दिवस मजेत पार पडला. आज मुक्कामाला असणार्‍यांची संख्या वाढली. मुलं आजूबाजूच्या गावातूनही आली होती. किती मुक्कामाला येणार त्यांची मोजदाद नव्हती. ज्याला वाटलं तो राहिला..अमक्याचा तमका बेडींग पोचवेल.. तमका त्याच्या घरी कळवेल.. सगळं कसं निवांत ! 'नो टेन्शन' त्यांच्या अंथरूण पांघरुणाची, जेवणाची अशी काही चोख व्यवस्था दिसत नव्हती तरी सुद्धा पालकांचा कुठे गोंधळ, तक्रार ऐकायला आली नाही. आश्चर्य! महाआश्चर्य! मुलांजवळ ना कुठली चिप्सची पाकिटं होती ना चॉकलेट ना पॉकेटमनी! मुलं तिन्ही त्रिकाळ विनातक्रार भात खाताना बघून तर माझी बोटं कमी पडली अन तोंड लहान!

पाऊसही दिवसभर पडून दमला होता स्वच्छ निरभ्र वातावरणात जवळच असलेल्या पहाडावरच्या रिसॉर्टकडे निघालो. केळी, सुपारी, लिंबू, केळी व संत्र्याच्या बागा दुतर्फा पण आंब्याची झाडं मात्र अगदीच तुरळक. कुठेही नजर टाका हिरवागार चहूकडे!

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
नीळासावळा झरा वाहतो, बेटाबेटांतून
चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट जाहली हिरवी गर्दी पुढे
पायवाट पांढरी तयातून आडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे

बालकवींना ही कविता इथल्य दृष्य पाहून तर सूचली नाही ना! अनंत हिरव्या छटा! (फोटो) येss श्याssम मस्तानीsss सरूच नाही असं वाटत होतं. असो!
कार्यशाळेचा आज दुसरा दिवस. मुलांशी छान गट्टी जमल्यामुळे आज जास्त मजा येणार वाटतं होतं ते वाटणं अगदी सार्थ ठरलं. प्रयोग, खेळ मस्त रंगले. नाट्य शिबिरात तर उत्साहाला उधाण आलं होतं. चारही गटाने पंधरा मिनिटात बसवलेल्या नाटुकल्याचं सादरीकरण खूपच छान झाले होते मात्र त्यावर टीव्हीचा व सीआयडी मालिकेचा प्रभाव ठळकपणे दिसून येत होता. 'ग्यानसेतू'नावात असल्याप्रमाणे हा एक दोन संस्कृतीचा सेतू त्यात मूळ घटक ज्ञान आहेच त्याच बरोबर इतरही घटक आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा खाद्यही आहे. तिथल्या लोकांना आपल्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्याची ही एक संधी होती. तिथे मुबलक उपलब्ध असलेला बटाटा वापरून केलेला बटाटेवडा, रसम व लाडू असा फक्कड बेत मुलांना खूप आवडला अन पुणे, मुंबई व चेन्नईत राहिलेल्या ज्योती व लोमीला नॉस्टॅलजिक करून गेला. दोन दिवसात मुलांनी जीव लावला होता. निरोपाचे क्षण हळवे करतात! हातात छोटीशी संध्याकाळ होती. जवळच्याच बाजारात गेलो. इथले चाकू प्रसिद्ध आहेत. पण हे चाकू कल्पनेपेक्षा (स्विस) वेगळेच निघाले अन त्याचा वापरही वेगळ्याच कारणासाठी होतो (शिकार/संरक्षण) फारसे उपयोगी न वाटल्यामुळे घेतले नाही पण निकीता व अर्पिताने 'मेखला' (लुंगी सारखा कमरेला गुंडाळायचा प्रकार) घेतला.

आज दुसरा गट येणार.. नवीन चेहरे.. नवीन नावं Happy जीभ आता जरा सरावली होती तरी अनिन्दिगा व अनिन्दिग्राचा घोळ शेवट पर्यंत कायम होता. मुलग्यांची संख्या वाढलेली बघून छान वाटलं. आम्ही सरावलो होतो म्हणून, की ह्या गटाची मुलं खरंच जास्त मोकळी होती? अर्थात पहिल्या गटाच्या अनुभवातून आम्हीही काही बदल केले होते. ड्रामामध्ये सीआयडी किंवा टीव्हीवरून काही घेतलेलं नसावं असं बजावलं होतं आणि खरोखर त्याचा फायदा असा झाला की नावीन्यपूर्ण कलाकृती बघायला मिळाल्या. बुवाबाजी, अंधश्रद्धावर आधारित नाटुकली खूपच छान झाली जी समारोपाच्या कार्यक्रमात पाहुण्यांसमोरही सादर केली . तिथल्या समाजाचं प्रतिबिंब कुठेतरी दोन्ही गटांच्या नाटकांमधून डोकावत होतं.

पहिल्या बॅचच्या मुलांनीही खरंतर 'पाककला' एन्जॉय केली असती पण काही कारणाने सहभागी करून घेता आले नव्हते. असो! मुलांनी चित्रकला, रंगकला व नाट्यकला इतकीच पाककलाही एन्जॉय केली. त्यांना एक गाणं शिकवलं होतं.. 'पील बनाना, पील, पील बनाना' स्मॅश बनाना, स्मॅश, स्मॅश बनाना' ह्या गाण्याच्या चालीवर 'पील पोटॅटो, पील, पील पोटॅटो' म्हणत बटाटे सोलले अन स्मॅश केले व त्या बटाट्याचे वडे, त्यांनीच वळलेले लाडू व रसम जेव्हा त्यांच्या पानात वाढले तेव्हा त्यांचे चेहरे आनंदाने व आश्चर्याने खुलले होते.

चार दिवस मुलांबरोबर होतो. मुलं लोभस व लाघवी होती. एक गोष्ट खूप खटकत होती. मुलं ताटातलं उष्ट अन्न कचर्‍याच्या टोपलीत टाकताना बघून वाईट वाटतं होतं. सांगावं की न सांगावं विचार करत होतो ... ज्योती, लोमीशी बोललो अन पाण्याच्या खेळात सांगायचं असं ठरलं. पाण्याचा खेळ असा: चार गटात मुलं (८-१० जणांचा एक गट)विभागली.एका रांगेत मुलांनी बसायचं. पहिल्या मुलाने त्याच्या जवळच्या बादलीतलं पाणी ओंजळीत घ्यायचं व दुसर्याएच्या ओंजळीत द्यायचं ... असं करत करत शेवटच्या मुलाजवल असलेल्या मग्ग्यात ते पाणी टाकायचं.... ज्या गटाच पाणी जास्त तो गट जिंकणार.


टीम वर्क, एकाग्रता,समन्वय, ध्येय निश्चिती, अश्या अनेक गोष्टी ह्या खेळातून शिकता येतात हे चर्चेतून मुलांना समजावून सांगितलं. आम्हाला जे मुख्य सांगायचं होतं ते म्हणजे अन्न, पाणी व निसर्ग ह्यांचं महत्त्व व त्याचं संवर्धन ही कशी आज काळाची गरज आहे वै. वै .. ही सांगितलं तर खरं, पण नंतर विजयसरांशी बोलताना दुसरी बाजू कळली .... त्याबद्दल पुढच्या भागात..... एकंदरीत मुलांनी सगळ्याच कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला आणि त्यांनी व आम्ही मिळून धमाल मस्ती केली. समारोपाच्या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री नंबुद्री, विजयस्वामीसर व शिक्षणाधिकारी मिजुम लेगो व राखीजी उपस्थित होते. पाहुण्यांनी कौतुक करत मुलांनी बनवलेल्या सगळ्याच पदार्थांचा आस्वाद घेतला. अरुणाचली वेशभूषेतल्या अर्पिता व निकीतामुळे जास्तच रंगलेल्या फोटो सेशनला आवरतं घ्यावं लागलं कारण विजयसरांबरोबर रिवॉचला व त्यानंतर नंबुद्री सरांकडे परदेशात असलेल्या त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचं होतं.

क्रमश:
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथल्या झाडांचे आंबे पिकत नाहीत, ते सडतात, म्हणून झाडे नसतील जास्त . त्यांचे जेवणही नेहमीच साधे असते, अगदी लग्नातले जेवणही असेच साधे असते. मसाले नसतात फारसे आणि गोड पदार्थही नसतात. त्यांना अशा बाहेरच्या पदार्थाची चटक लागली नाही तरच चांगले कारण त्यांचा आहार फार नैसर्गिक आणि आरोग्यपूर्ण असतो. . अशा उपक्रमात मला भाग घ्यायला खुप आवडेल .

मस्तच झालाय हाही भाग..सगळीकडे किती हिरवाई आहे! एक भाप्र मुलांशी संवाद कोणत्या भाषेत साधत होतात? हिंदी की इंग्रजी?

फोटोतील वातावरणामुळे जितके मन प्रसन्न झाले, त्याहीपेक्षा अधिक झाले ते मजकुरातील सहजसुंदर लिखाणामुळे. अगदी समोर बसून कार्यशाळेत केलेल्या कामाचे वर्णन ऐकत आहे अशीच भावना झाली. तुम्हा सार्‍यांनी केलेल्या या कार्याचे मूल्यमापन जे कुणी अधिकारी लोक वा संबंधित संस्था करत असतील तेही अशीच पसंतीची पावती देतील यात संदेह नाही. वातावरण किती देखणे आहे...शिवाय भाग घेतलेल्या सर्वांचे चेहरीही तितक्याच आनंदाने मोहरून गेले आहे. ही मुले तिन्ही त्रिकाळ भातच खातात हे वाचून काहीशी मजाच वाटली. आपल्याकडे असे चित्र कल्पनेनेसुद्धा येऊ शकत नाही. प्रत्येक गावच्या ताशाची तर्‍हा आगळीच म्हणायची. काय खातो याहीपेक्षा किती मनःपूर्वक खातो यावरसुद्धा शरीराची जडणघडण होत असेल यात शंका नाही.

"..विविध खेळ व जोषपूर्ण गाण्यांमुळे ..." मुळे तुमची आणि तेथील स्थानि़क मुलामुलींशी मैत्री जुळायला वेळ लागला नाही...शिक्षकी पेशाला ह्या दोन गोष्टी खूप मदत करतात....इथे भाषेचीही जरूरी नाही. चेहर्‍यावरील हास्य फुलोरा फुलवत जातोच.

छान वाटले सारे काही वाचून. [विशेष म्हणजे शेवटच्या ग्रुप फोटोतील झाडून सारे हसर्‍या चेहर्‍याने पाहाणार्‍याला आगळाच आनंद देत आहेत....मला वाटते ही मोठी मिळकत आहे तुम्हा सर्वांची...]

मुलांजवळ ना कुठली चिप्सची पाकिटं होती ना चॉकलेट ना पॉकेटमनी! मुलं तिन्ही त्रिकाळ विनातक्रार भात खाताना बघून तर माझी बोटं कमी पडली अन तोंड लहान! >>>>> भारीए हे .... प्रचंड आवडलं ....

तुम्ही ज्या सुर्रेख पद्धतीने हे सारे मांडताय यावरुन तुमचे तिथले पूर्णपणे मिसळून, झोकून देऊन काम करणे अगदी जाणवतंय ...... खूपच छान, प्रेरणादायी .... (निष्काम कर्मयोगाचेच हे उत्तम उदाहरण आहे)

छान छान प्रतिसादांसाठी मनापासून धन्यवाद! जि - हिंदी इंग्रजी दोन्ही भाषेतून संवाद साधत होतो पण उच्चारण वेगळं असल्यामुळे लक्श देऊन ऐकावं लागत होतं.
दि-. त्यांना अशा बाहेरच्या पदार्थाची चटक लागली नाही तरच चांगले कारण त्यांचा आहार फार नैसर्गिक आणि आरोग्यपूर्ण असतो.>>>> ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्याच जेवण साधं उकडलेलं असतं बाकी ते काय काय खातात ते पुढच्या भागात .
काय खातो याहीपेक्षा किती मनःपूर्वक खातो यावरसुद्धा शरीराची जडणघडण होत असेल यात शंका नाही>>> + १

मस्त उपक्रम... लेख आवडलाच. पहिल्या भागाचीही लिंक वर देणार का प्लीज ?
>>मात्र त्यावर टीव्हीचा व सीआयडी मालिकेचा प्रभाव ठळकपणे दिसून येत होता.>> हे बघायला आवडेल. Proud

खुपच छान.. शब्दांकन नेहमीप्रमाणेच सुंदर..
लेख आणि प्र.ची वाचुन खुप निखळ आनंदाची अनुभुती येते आहे...
व्वा दिवसाची सुरवात प्रसन्न झाली.:)

शशांक जी उत्तम प्रतिसाद..

आत्ताच तुमच्या ज्ञान यात्रेचे दोन भाग वाचले. वाचून खरोखर थक्क व्हायला झाले. तुमचे ज्ञान, लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ, उत्साह तुमची तारीफ करायला शब्दच नाहीत. लिहिण्याची शैली सुद्धा फारच छान आहे.