स्वदेशी स्थलांतर - Reverse Migration

Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2015 - 12:48

खरे तर ही एखादी चालू घडामोड नाही, ही बहुधा एक मोठी व्याप्ती असलेली प्रक्रिया असावी. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर मला देशांतर्गत स्थलांतराबाबत लिहावेसे वाटत होते कारण परवाच एकांशी चर्चा करताना असे आढळले की मोठ्या शहरातून लोक आता पुन्हा स्वगृही परतू लागले आहेत. अश्या परतण्याची कारणे आहेत त्यांच्या मूळ गावीही बर्‍यापैकी विकास झालेला असणे, तेथे राहण्याचा खर्च कमी असणे, तेथे मोठ्या शहरांसारख्या संधी उपलब्ध झालेल्या असणे, तेथे त्यांचे स्वतःचे घर असणे आणि कुटुंबास आवश्यक असतात त्या बाबी आता तेथेही उपलब्ध असणे, जसे चांगल्या शाळा, रुग्णालये वगैरे! ह्या गोष्टीबद्दल लिहावेसे वाटले कारण त्यातून काही बकाल झालेल्या मोठ्या शहरांना कदाचित पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होण्याची चाहुल ऐकू येत होती. सर्वत्र जवळपास समान विकास झाला तर यंत्रणा, संसाधने ह्यावरील ताण अर्थातच विभागला जाईल हा फायदा जाणवत होता. पुण्या-मुंबईहून महाराष्ट्रातील इतर प्रगत शहरे जसे नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर येथे मंडळी परतणे ही बाब कितपत प्रमाणावर घडत आहे, कोणाचे अनुभव काय आहेत अशी चर्चा होईल असे मनात आले.

मात्र त्याआधी सहज 'रिव्हर्स मायग्रेशन' गूगलवर सर्च केले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर (विशेषतः प्रगत देशांमधून भारतात परतणारे) लोक मोठ्या प्रमाणावर आहेत असे एक चित्र दिसले. अनिवासी भारतीयांनी भारतात पाठवलेला पैसा हा भारतीय संसाधने व यंत्रणांचा वापर न करता निर्माण झालेला पैसा असल्याने तो भारतासाठी बहुमोल ठरतो हे माहीत होते. कदाचित कालांतराने हा ओघ प्रभावित होईल वगैरेही! पण ह्या आंतरराष्ट्रीय पुनर्स्थलांतराचे इतर काय काय परिणाम होऊ शकतील ह्या विचाराने व्यापलो.

मुळात भारताला हे समजून घ्यावे लागेल की असे उलटे स्थलांतर फायदेशीर ठरू शकते. जेव्हा येथून लोक नव्वदच्या दशकात मोठ्या प्रमाणावर तिकडे जाऊ लागले तेव्हा भारताला वाईट वाटत होते असे एका ठिकाणी लिहिलेले आढळले. आता ते लोक किंवा त्यांच्यापैकी काही परत येत आहेत तेही चांगले ठरू शकेल हे मान्य करायला हवे. प्रत्येकजण जे काही करतो ते स्वतःच्या फायद्यासाठी करतो. येणारे लोक त्यांना अधिक सुखासीन आयुष्य जगता येईल ह्या आशेने आलेले असणार, येत असणार आणि येतील. अशा लोकांकडून आपला काय फायदा होईल ह्यावर भारतातील तज्ञ मंडळी नक्कीच विचार करत असतील. असे वाटते की अश्या लोकांकडून खालील गोष्टी येथे येतील.

१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रगत संस्कृतीत असलेले माणसाचे महत्त्व! माणसेच कमी असल्यामुळे म्हणा किंवा सुबत्ता असल्यामुळे म्हणा किंवा संस्कृतीच तशी असल्यामुळे म्हणा, ऐकीव व वाचीव माहितीनुसार विकसित राष्ट्रांमध्ये सामान्य माणसाला भारतातील सामान्य माणसापेक्षा खूप अधिक आदर व किंमत मिळते. त्याच्या प्रश्नांना प्राधान्य मिळते. ह्यामुळे भ्रष्टाचार, सुरक्षितता, जीवनमानाचा दर्जा, स्वच्छता ह्या निकषांवर तो माणूस इथल्या माणसापेक्षा नकळतपणे अधिक सुखी असतो / असावा. अश्या संस्कृतीत वीस, तीस वर्षे काढलेली पण मुळात आपलीच असलेली माणसे येथे परतली तर येथे अशी संस्कृती निर्माण करत राहण्याचा ते त्यांच्यापरीने आटोकाट प्रयत्न करत राहतील. सेवाक्षेत्र, उत्पादनक्षेत्र, शासन-प्रशासन, पायाभूत सुविधा व इतर अगणित यंत्रणांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा इथल्यांच्या अपेक्षांच्या तुलनेत अधिक तीव्र असतील व त्या तीव्रपणे मांडल्याही जातील. अतिशय कमी वेगाने का होईनात पण ह्या अपेक्षा योग्य आहेत हे सर्वत्र पटायला लागेल व एकुणच जीवनमान सुधारू शकेल. सच्चाई, सुरक्षा, शब्दाचे / वेळेचे महत्त्व, सेवा ह्या शब्दांना काहीतरी विश्वसनीय अर्थ प्राप्त होऊ शकेल. ह्या प्रक्रियेत खूप माणसे असंतुष्ट होतील, काही गारदही होतील पण बहुतांशी हालचालींची दिशा सुधारणेकडेच असेल.

२. हे लोक प्रदीर्घ काळ विकसित राष्ट्रांमध्ये राहिलेले असल्यामुळे त्यांच्याशी व्यवसाय करणे हे विकसित राष्ट्रांना अधिक विश्वासार्ह वाटू शकेल. त्यातून व्यवसायाला कदाचित आणखी वरचा गिअर टाकता येईल. शिवाय त्यातून पर्यटन वाढू शकेल. समाजात सधन माणसांची संख्या वाढली तरी गरीब-श्रीमंतांमधील दरी लहान होईल की नाही हे समजत नाही आहे. पण अधिक पैसा फिरू लागेल.

३. भारतात कदाचित अजूनही स्वप्नवत वाटणार्‍या काही सेवा, काही व्यवसाय हे नव्याने सुरू होऊ शकतील. त्याशिवाय अंतर्गत स्पर्धा वाढून एकंदरीत ग्राहकाचाच फायदा होईल.

४. पायाभूत सुविधांमधील चांगले बदल कानाकोपर्‍यात पोहोचू लागतील.

अर्थात हे सर्व फायदे म्हणजे 'थेंबे थेंबे' स्वरुपाचे आहेत. ह्याचे कारण भारतात असलेल्या एकशे तीस कोटींमध्ये बाहेरून येऊन येऊन येणार किती लोक? फार तर एक कोटी! तेही एकदम नाहीतच!

पण मग ही प्रक्रिया वेगवान व्हावी ह्यासाठी भारताने प्रयत्न करावेत का? मुळात आपला देश आपल्या परदेशी राहणार्‍या नागरिकांना सर्व दृष्टींनी राहण्यालायक वाटावा ह्यासाठी प्रयत्न करावेत का?

हे प्रयत्न केवळ त्याच नागरिकांसाठी करावेत असे म्हणणेही वेडेपणाचे आहे. हे प्रयत्न मुळातच होणे देशासाठी आवश्यक आहे. जसे रस्ते, वीज, शिक्षण, पाणी, अन्न, सुरक्षितता, पारदर्शकता इत्यादी!

आणि मग हे तर पाचवीला पूजलेलेच प्रश्न आहेत की? त्यात काय नवे? ह्या मुद्यांची आश्वासने देऊनच तर सरकारे येत आहेत आणि सरकारे जातही आहेत.

पण तरीही आत्ता उलटे स्थलांतर सुरू आहे. ह्याचे एक मुख्य कारण म्हंटले जाते येथे असलेल्या अमाप संधी! ह्या विषयावर वाचायला मिळालेल्या ह्या लेखात असे आढळले की भारतात इतर अनेक गोष्टी नकारात्मक असूनसुद्धा येथे व्यवसाय निर्माण करणे, तो चालवणे व फायद्यात आणणे मोठ्या प्रमाणावर शक्य आहे. येथे प्रचंड संधी आहेत. हा लेख पत्थर की लकीर मानावा असे म्हणणे नाही. उलट मायबोलीवर असलेल्या अनेक अनिवासींनी आपले प्रांजळ मत लिहावे. पण उलटे स्थलांतर तर होत आहे असे विकिवरही म्हंटलेले दिसत आहे. (निव्वळ स्थलांतर व ब्रेन ड्रेन ह्यातील फरक विचारात घेऊनही लेखातील विषयाच्या व्याप्तीपुरते दोहोंना मी एका पातळीवर गृहीत धरत आहे).

१. भारतात परत येणारे अनिवासी अधिक सुखदायी संधींमुळे परत येत आहेत का?

२. आपल्या पुढच्या पिढीचे संगोपन आपल्या संगोपनाशी मिळतेजुळते असावे म्हणून परत येणारे काही आहेत का?

३. परदेशात दीर्घकाळ राहण्याने काही इतर प्रश्न उद्भवल्यामुळे परत येत आहेत का, जसे स्व-संस्कृतीत परतण्याची तीव्र इच्छा होणे किंवा सातत्याने परकेपणा जाणवत राहणे, एकलकोंडेपणा वाटणे किंवा तत्सम!

४. भारतात परतणारे नगण्य आहेत का? की नाहीच आहेत?

भारताबाहेर राहण्याचा काडीचा अनुभव नसूनही ह्या शंका विचाराव्याश्या वाटल्या.

धन्यवाद!

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<खरे सांगायचे तर 'ज्या विषयातले आपल्याला समजत नाही त्या विषयावर मी काढलेला माणसांमार्फत अ‍ॅडिशनल परदेशी कंपन्यांशी व्यवहार करण्याची शक्यता पडताळून पाहिली जावी का?>>>

असं कसं नि का म्हणता? तुमचे मुद्दे विचारात घेण्याजोगेच आहेत. माझ्यासारखे करणे काही नाही, फुक्कट मतांची पिंक टाकणारे लोक सगळीकडेच असतात.
पण कुणि शहाणा, कर्तुत्ववान माणूस असेल तर तो यातून कल्पना घेऊन काहीतरी करेलच. माझा भारतीयांवर, विशेषतः माझ्या नंतरच्या पिढीच्या लोकांवर दुर्दम्य विश्वास आहे, त्यांना अशक्य काही नाही.

आता काही माणसे परत येत असली तर त्या माणसांमार्फत अ‍ॅडिशनल परदेशी कंपन्यांशी व्यवहार करण्याची शक्यता पडताळून पाहिली जावी का?
श्री. नरसिंह मूर्तीं इथे येऊन शिकून परत गेले नि त्यांनी भारतात एक प्रचंड मोठा उद्योग चालू केला,
तितके मोठे नाही, पण लहानसहान प्रमाणात असे करणारे, जाऊन येऊन धंदा करणारे बरेच लोक माझ्या माहितीत आहेत. त्यांनी बर्‍याच भारतीय धंद्यांना जास्तीचा धंदा दिला आहे. काही जणांनी अनेक भारतीयांना इथे येऊन काम करण्याची संधि दिली. यात भारताचाहि फायदा आहे, कारण भारतीयांना कामाची संधि देणे हे जे भारत सरकारचे काम होते, त्याला हातभार लावला.

काही राजकारणातील लोकहि इथे येऊन शिकून गेलेले आहेत. माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री इथे शिकून गेले होते. त्यांनी नक्की त्याचा फायदा कुणाला नि किती करून दिला या बद्दल काही ऐकले नाही.

उपरोध आवडला.

अज्ञाला माफ करा.

असले काही विचार डोक्यात आणू नका. तुम्हाला अज्ञ कुणि ठरवले?
मुद्दे तर आहेतच ना असे की अनेक लोकांना त्यावर मते प्रगट कराविशी वाटली.
मान्य आहे, बहुतेक सर्व नकारात्मक आहेत, पण बर्‍याच जणांना या बाबतीत अनुभव आहेत म्हणून त्यांनी तसे लिहीले.

त्यातून मायबोलीवरील लोकांकडून तुमच्या काय अपेक्षा? नशीब समजा इतर राजकीय धाग्यांवर लिहिणारे अनेक लोक इथे दिसत नाहीयेत.

शहरातून गावात कमी लोक स्थलांतरित होतात. तितकेच कमी लोक बाहेर देशांमधून भारतात स्थलांतरीत होतात. शहरामधून गावात ये-जा करत रहाणारे खूप आहेत. तेच चित्र देशाबाबतीत दिसणारे!

दोन्ही गोष्टी समान जरी नसल्या तरी शेवटी मानसं तीच असल्यामुळे साधर्म्य आहेच!

<<१. एक देश, एक समाज, एक सरकार म्हणून आपण सगळेजण स्वदेशी स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढणे ह्या गोष्टीला एक संधी मानू शकतो का? त्या दृष्टीने आपण आज त्या स्थलांतराकडे पाहात आहोत का? तसे पाहिल्याने आपल्याकडील कायम येथेच असणार्‍या समाजाचाही फायदाच होईल हे आपण ध्यानी घेऊ शकतो का?
२. आज होत असलेल्या रिव्हर्स मायग्रेशनचे खालीलपैकी प्रमुख कारण कोणते वाटत आहे?
३. रिव्हर्स मायग्रेशन अत्यल्प किंवा नगण्य आहे का? (कोणत्याही किंवा सर्व कारणांनी होणारे).>>

बेफि, हे छान प्रश्न आहेत. मला वाटतं उलट्या क्रमाने विचारले तर अधिक चांगले! कारण जर रिव्हर्स मायग्रेशन अत्यल्प किंवा नगण्य असेल तर त्याचा बरा/वाईट परिणामदेखील नगण्य असेल. आणि रिव्हर्स मायग्रेशन का होते आहे त्यावर त्याकडे संधी म्हणून पाहावे की नाही ते ठरेल.
तुम्हाला जी उत्तरे मिळत आहेत ती हत्ती आणि सहा आंधळे ह्या गोष्टीत मिळणाऱ्या उत्तरांसारखी आहेत. हा प्रश्न हत्तीएवढा मोठा आहे आणि प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार उत्तरे देत आहे. अर्थात कोणत्याच उत्तरावरून तुम्हाला हत्ती नक्की कसा आहे ह्याचा पत्ता लागणार नाही!
ह्या प्रश्नांची खरी आणि वस्तुनिष्ठ उत्तरे तुम्हाला मायबोलीवर मिळणार नाहीत. McKenzie & Company किंवा तत्सम नामांकित संस्थांकडून जर कोणी (उदा. भारत सरकार) पैसे खर्चून असा सर्व्हे केला तर आपल्याला काही आकडेवारी मिळू शकेल जिच्या आधारे (कदाचित) ह्या प्रश्नांवर काही ठोस उत्तरे देता येऊ शकतील.
भारतीय मानसिकता एकूणच अंदाजपंचे दाहोदरसे ह्या विचारसरणीची आहे त्यामुळे हा खटाटोप कोणी करतंय का असा खरा प्रश्न आहे! जर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर तुमचं काम सोपं होईल!
We can always ask many interesting questions. The trouble is finding and applying the right tools to answer them and that is HARD! (स्वगत: that's called research baby!)

पटलं.

हा रिसर्च करण्यात कुणाला इंटरेस्ट आहे? कोण पैसे देईल? का देईल?
त्यातून काय निष्पन्न होईल?
समजा अश्या परत जाणार्‍या लोकांकडून काही फायदा कुणाला होत असेल तेच यात लक्ष घालतील.

तसा आजकाल भारतात पैशाचा प्रश्न नाहीच. बहुतेक सर्वांजवळ दोन तीन कोटी रु. असावेत असे त्यांच्या खर्च करण्यावरून वाटते.

तर प्रश्न फक्त या विषयाकडे कुणि भारतीय संस्था लक्ष घालेल का? परदेशी कंपन्या फक्त आकडेवारी गोळा करतील. यात आकडेवारी पेक्षा ज्यांना भारतात रहाण्याचा बरीच वर्षे अनुभव आहे, त्यांचाच उपयोग होईल, ते आकडेवारी तर करू शकतीलच पण त्यांच्या म्हणण्यात भारतीयांचा दृष्टिकोन असेल व तो महत्वाचा आहे.

जि, विवेक वाधवा बघ. रिव्हर्स ब्रेनड्रेन कमी व्हावा ह्यासाठी प्रयत्न करणारे अमेरिकन रिसर्च स्कॉलर आहेत. त्यांच्या ब्लॉगवर आहे थोडीफार माहिती - स्नॅपडिल साईट भारतात सुरू झाली हे फारच मनावर घेतले त्यांनी ;). (अर्थात पर्स्पेकटीव्ह ह्या धाग्यापेक्षा वेगळा आहे.)

सी, इंटरेस्टिंग आहे वाधवा यांचा अप्रोच. अमेरिका हा immigrants नी उभा केलेला देश आहे त्यामुळे इथे ह्या अशा दोन्ही बाजूंनी मुद्दे मांडणाऱ्या चर्चा होत राहणार. भारतात उलट परिस्थिती आहे. भारतातून ब्रेनड्रेन होतो हे कोणीच अमान्य करू नये. पण तो जबरदस्ती करून थांबवणे हा मूर्खपणा ठरेल. उत्तम संधी मिळत असेल तर भारतात परत यायला अनेक जण तयार होतील ह्यात शंका नाही. पण ती उत्तम परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून जेव्हा लोक स्वतःहून परतोनी येतील तेव्हा खरा बदल घडेल.

पण ती उत्तम परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून जेव्हा लोक स्वतःहून परतोनी येतील तेव्हा खरा बदल घडेल.
आणि समजा ते नाही आले तर भारतात उत्तम परिस्थिती निर्माणच होणार नाही?

माझ्या मते परदेशी गेलेल्या लोकांचे फार स्तोम माजवले आहे भारतीयांनी. काही गरज नाही.
जगातले लोक भारतीयांना स्वतःच्या देशात घेतात नि त्यांचे प्रमाण वाढतेच आहे. याचा अर्थच भारतीय लोक हुषार व कामसू आहेत, जिथे काम करतात त्या जागेचे भले होते.

मग मुळात भारतात राहूनच तसे का वागत नाहीत? बाहेरच कशाला जायला पाहिजे? किंवा बाहेरचे लोक कशाला हवे?

म्हणजे माझा विरोध परतोनी जाण्याला नाही, पण ही जी वृत्ति आहे की ते येऊन भारताचे भले करतील ती काही खरी नाही. त्याची इच्छा फार तर वैयक्तिक कारणांसाठी करावी. देशा चे काय व्हायचे ते तिथले लोकच करतील.

<<आणि समजा ते नाही आले तर भारतात उत्तम परिस्थिती निर्माणच होणार नाही?>>असे आजिबातच नाही!

<<म्हणजे माझा विरोध परतोनी जाण्याला नाही, पण ही जी वृत्ति आहे की ते येऊन भारताचे भले करतील ती काही खरी नाही. त्याची इच्छा फार तर वैयक्तिक कारणांसाठी करावी. देशा चे काय व्हायचे ते तिथले लोकच करतील.>> Ditto! माझ्या मते परतोनी येणारे काही बाहेरचे होत नाहीत. मात्र तुम्ही म्हणता तशी ही वैयक्तिक इच्छा असली पाहिजे.
ही माझी जी मतं आहेत ती स्वतःची आहेत. ही मते मी कोणाला पटावी म्हणून मांडत नाहीये त्यामुळे तो आग्रह नाही पण आता इथे विषय निघाला आहे म्हणून माझे दोन पैसे!
गेली कित्येक वर्षे भारतातून अनेक हुशार, कामसू इ. भारतीय परदेशी जाऊन स्थायिक होत आहेत. त्यांच्या शिक्षणावर, कौशल्यांवर भारताने जो पैसा खर्च केला त्याचे काय? The returns on that investment can not be just monitory! The returns are skilled human resource which is ultimately being tapped by another country. अर्थात ह्यात त्या व्यक्तीचे भले झाले आणि त्याचा आनंद आहे. पण देशाचे नुकसान झाले ते झालेच! जर बुद्धिमान, कुशल भारतीय लोकांचे जगभरात कौतुक होते तर त्यांचा देश अजूनही विकसनशील कसा आणि का? IIT सारख्या नामांकित संस्थेतून cream of the cream मुले बाहेर पडतात त्यातली ९०% मुले बाहेर शिकायला जातात आणि तिकडची होतात. त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गाताना केवळ Indian origin चा उल्लेख एवढेच का भारताचे returns on investment? (शिवाय ही गोष्ट खाजगीत जोडून द्यायची की अमेरिकेत राहिला म्हणून त्याच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. इथे भारतात सगळी बुद्धिमत्ता वाया गेली असती खर्डेघाशी करण्यात!)
I hate this.

भारताबाहेर जरूर जा. माझ्यामते प्रत्येकाने देशाबाहेर जाऊन राहून शिकले पाहिजे. जग पाहिले पाहिजे. Get best of the degree, get best of the job experience, do your thing! But you must not forget your country. जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा! आणि ज्ञानाचे, कौशल्यांचे मोल हे पैशात होऊ शकत नाही. भारताला तुमच्या पैशांपेक्षा तुमच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा फायदा मिळू दे!

मला असे मुळीच म्हणायचे नाही की प्रत्येक परदेशस्थ भारतीयाने परतून यावे. कारण हा निर्णय खूप व्यक्तिगत आहे आणि हे निर्णयस्वातंत्र्य कायम राहिले पाहिजे. मात्र त्याच वेळी प्रत्येकाने हा विचार जरूर करावा की माझ्या ज्ञानाचा माझ्या देशाला काही फायदा कसा होईल?

असं मुळीच नाही की परदेशातले भारतीय परतून येत नाहीत तोवर भारताची प्रगती होणारच नाही. ती होते आहे आणि होत राहील पण जर परदेशस्थ भारतीयांचाही ह्या प्रगतीत हातभार लागला तर तो हवाच आहे! ब्रेनड्रेन असा शब्द आहे ना! त्यात शरीराला महत्व नाहीये! reverse brain drain होऊ दे की मग! Find ways to contribute. तुमच्या शाळेत/कॉलेजमध्ये जाऊन व्याख्याने द्या, तिथल्या मुलांचे प्रोजेक्ट गाईड व्हा. कोणत्या तरी गरजू संस्थेला कमी पैशात चांगली वेबसाईट बनवून द्या. Collaborative research करा. (ह्यात मी काही नवीन सांगत नाहीये अनेकजण असं करत आहेत) More power to reverse brain drain!

स्वतःच्या प्रगतीसाठी परदेशात जाणार्‍यांकडून देशाला काहीतरी मिळायला पाहिजे ह्या अपेक्षेशी सहमत आहे जिज्ञासा! म्हणजे फक्त परकीय चलनाशिवाय इतरही काहीतरी! पण मला असे वाटते की त्या स्थलांतरीत नागरिकांपेक्षाही त्यांना (स्वस्त पण कुशल असल्यामुळे) स्वीकारणार्‍या देशांकडून मिळायला हवे.

मात्र, हा विषयच पूर्ण वेगळा झाला.

प्रत्येकाला पूर्ण निर्णय स्वातंत्र्य असायला हवे का? - होय

ज्याला तिकडे जायचे आहे त्याने शक्य असल्यास जावे का? - होय

ज्याला तिकडचेच व्हायचे आहे त्याने शक्य असल्यास व्हावे का? - होय

ज्याला परतायचे आहे त्याने शक्य असल्यास परतावे का? - होय

जो परतला आहे त्याने तिकडच्या शिक्षणाचा इकडे स्वतःच्या विकासासाठी उपयोग करावा काय? - होय

इकडे परतणारे तिकडचेही नागरीक असले किंवा त्यांना तिकडे झालेले अपत्य असले तर चालेल काय? - होय

तिकडे असलेल्या किंवा परतलेल्यांनी 'खास देशासाठी' असे काहीही केले नाही तरी चालेल काय? - होय

पणः

आता तिकडून लोक परत येत आहेत तर त्यांच्यामार्फत सरकारने अधिक परदेशी कंत्राटे, संधी मिळवू पाहाव्यात ह्यात काही न पटण्यासारखे आहे का? रिव्हर्स मायग्रेशनमध्ये सरकारने देशाचा काहीतरी फायदा होऊ शकेल का हे तपासावे ह्यात काही गैर वाटते का? - तर माझे उत्तर 'नाही' असे आहे.

आता तर मला असे वाटू लागले आहे की अत्यल्प प्रमाणात असे स्वदेशी स्थलांतर होत असले तरीही सरकारने काहीतरी वसूल करावेच. विशेषतः जो मुद्दा तुम्ही मांडलात तो ध्यानात घेता! (तुमचा तो मुद्दा = येथील संसाधने वापरून शिकून वैयक्तीक उन्नतीसाठी परदेशी गेलेल्यांनी देशासाठी काहीतरी करावे). (हा मुद्दा माझ्याकडून प्रथमच ह्या चर्चेत येत आहे. मला आधीपासून असेच काहीतरी म्हणायचे होते, आत्ता खरे समजले वगैरे प्रतिवाद होणार नाहीत अशी आशा आहे. जिज्ञासांच्या त्या मुद्यानंतर मला हे सुचलेले आहे). Happy

(जर परत येणारे भारतीय नागरिक असतील तर) सरकारने वसूल करावेशी पूर्णपणे असहमत. वसूल हा शब्दही नाही आवडला.
लोकशाहीच्या बेसिक राइटस प्रमाणे नागरिक देशाच्या पासपोर्टवर देश सोडून कुठेही कितीही वेळ राहू शकतो आणि कधीही परत येऊ शकतो. नॉन रेसिडंट देशात ६ महिनेपेक्षा जास्त राहिला/ली की रेसिडंट बनतात. त्यांना भावनिक/ मोरल आवाहन जरूर करू शकतो पण असा काही कायदा कोर्टात टिकणार नाही.
लोक परतले की जर देशाला फायदा होणार असं गृहीत धरलं तर जास्तीत जास्त लोकांना बोलवायला त्याना सवलती/ सुविधा (करमुक्त रक्कम आणू शकतात इ.) दिल्या की ती आवर्जून येतील का त्याच्याकडून 'फायदा कसा वसूल करू' ही भावना ठेवून पॉलिसी ठरवून येतील?

कदाचित माझे म्हणणे मी चुकीच्या शब्दांत मांडले असेल.

पण हे कसे वाटते?

जाणारा जाताना त्याच्या इच्छेने जाणार. येताना त्याच्या इच्छेने येणार. जाणे आणि येणे ह्या दोन्ही गोष्टी तो फक्त वैयक्तीक कारणांसाठी करणार. पण त्याला त्याच्या वैयक्तीक विकासासाठी इतरत्र जाण्यासाठी लायक बनवणार येथील सुविधा, यंत्रणा वगैरे! हे आपल्या देशाने मान्य करायचे म्हणता (व केलेही जात आहेच). नंतर तो वैयक्तीक विकासासाठी किंवा इतर वैयक्तीक कारणांसाठी परत येणार तेव्हा येथील यंत्रणांवर त्याचा बोजा येणार. तो बोजा स्वीकारायचा कारण तो आपलाच आहे. पण तरीही त्याने 'खास देशासाठी' काहीही करू नये, हेही मान्य करायचे म्हणता.

जिज्ञासा म्हणत आहेत की 'आपण देशासाठी काय केले' ह्याचा विचार ह्या वर दिलेल्या साखळीतील प्रत्येकाने करावा. त्यावर तुमचे काय मत आहे?

अर्थात, हा मूळ विषय नाही. मूळ विषय रिव्हर्स मायग्रेशनकडे देशाला संधी म्हणून पाहणे शक्य आहे का असा आहे. पण जिज्ञासांच्या व इतर काहींच्या प्रतिसादामधून निघालेला हा एक उपविषय आहे फार तर!

लायक बनवलेले ०.१% समजा गेले तरी उरलेले लायक आहेतच की आणि फक्त आयआयटीत लायक नक्कीच बनवत नाहीत.
देशासाठी काय केलं हा विचार प्रत्येकाने करावा का? नक्कीच करावा. पण कोणी केला नाही तर मारून मुटकून करवून घेतला तर लूप होल्स शोधली जातील आणि जुलमाचा रामराम होईल ही भीती. त्यापेक्षा आकर्षक वातावरण केलं की आपलीच कशाला बाकीचे लोकही येतील आणि तो शाश्वत विकास होईल असं मला वाटतं.
डॉक्टर झाल्यावर पुढे स्पेशलायझेशन करायचं असेल तर देशात काही वर्षे सेवा देईन असं लिहून द्यायला लागतं/ लागणार असा कायदा करणार असं ऐकलेलं. काय झालं कल्पना नाही. जर बरोबर आठवत असेल तर त्यातही इतके इतके पैसे भरले की सूट मिळणार का मंत्याने सही केली की सूट मिळणार असा एक उपमुद्दा होताच.
वेळ मिळाला की लिहितो.

जाणारा जाताना त्याच्या इच्छेने जाणार. येताना त्याच्या इच्छेने येणार. जाणे आणि येणे ह्या दोन्ही गोष्टी तो फक्त वैयक्तीक कारणांसाठी करणार. >>> यात काहीही बेकायदेशीर नाही. मग प्रोब्लेम कसला ?
पण त्याला त्याच्या वैयक्तीक विकासासाठी इतरत्र जाण्यासाठी लायक बनवणार येथील सुविधा, यंत्रणा >>> हेही कळले नाही. लायक बनवणे म्हणजे काय ? कसल्या सुविधा / यंत्रणा? टॅक्सेस, किंमत / फीज भरल्याशिवाय / त्यांचा मोबदला भरल्याशिवाय त्या मिळत नाहीत. त्या वापरल्या तर प्रॉब्लेम कुठे आहे ? शिवाय शिक्षण अथवा अनुभव हे वैयक्तिक अ‍ॅसेट आहेत, त्याचा वापर बाहेरच्या देशात करता येत नाही असा काहीच कायदा किंवा नियम नाही.
नंतर तो वैयक्तीक विकासासाठी किंवा इतर वैयक्तीक कारणांसाठी परत येणार तेव्हा येथील यंत्रणांवर त्याचा बोजा येणार. तो बोजा स्वीकारायचा कारण तो आपलाच आहे. >>> हेही पुन्हा विचित्र इन्टरप्रिटेशन. आपलाच म्हणून बोजा का स्वीकारेल कुणी ? कायद्याने क्ष व्यक्तीला य देशात येण्याचा/ राहण्याचा परवाना असेल तर(च) ती व्यक्ती येऊ शकतेच. बोजा किंवा आपला म्हणून स्विकारणे हा संबंध कुठून आला!!

लायक बनवलेले ०.१% समजा गेले तरी उरलेले लायक आहेतच की आणि फक्त आयआयटीत लायक नक्कीच बनवत नाहीत.<<<

म्हणजे 'आम्हीच मिळालो का फक्त' आणि 'आय (/आय) टी बाहेरच्यांचे काय' हेच प्रश्न ना वेगळ्या भाषेत?

>>>देशासाठी काय केलं हा विचार प्रत्येकाने करावा का? नक्कीच करावा. पण कोणी केला नाही तर मारून मुटकून करवून घेतला तर लूप होल्स शोधली जातील आणि जुलमाचा रामराम होईल ही भीती. <<<

कोणीच विचार करत नाही आहे म्हणून मारून मुटकून विचार करवून घेणे ह्याचा विचार करताना तुम्हाला क्षणार्धात फक्त संभाव्य 'लूप होल्स'चीच भीती तेवढी वाटली? त्या जबरदस्तीने विचार करायला लावण्याने देशाला काहीतरी अधिक नक्कीच मिळेल असे नाही वाटले? म्हणजे उदाहरणार्थ 'दोन रुपये लाचखोरीत जातील म्हणून दोनशे रुपयांचा व्यवहार करू नये'?

>>>त्यापेक्षा आकर्षक वातावरण केलं की आपलीच कशाला बाकीचे लोकही येतील आणि तो शाश्वत विकास होईल असं मला वाटतं.<<<

हे सगळ्यांनाच माहीत आहे. आकर्षक वातावरण नसतानाही वैयक्तीक कारणांसाठी जे परत येत आहेत त्यांच्या तिकडच्या नेटवर्क्सचा, अनुभवाचा, जीवनशैलीबाबतच्या अपेक्षांचा काही भरीव उपयोग करून घेता येईल का असा विषय आहे. (तेही त्या परतणार्‍यांना भुर्दंड न पडू देता! म्हणजे मूळ धाग्यात भूर्दंड हा मुद्दा नाहीच आहे. तो मुद्दा फक्त वरच्या जिज्ञासांच्या प्रतिसादानंतर आलेला आहे).

ओळखीचे टोन ऐकू येऊ लागले. Happy

सर्व काही कायदेशीरच आहे, बेकायदेशीर काहीही चालू नाही आहे हे मुळात मान्यच आहे.

प्रत्येक प्रश्नावर प्रतिसाद द्यायचा तर निबंध लिहावा लागेल.

फिया भरल्या आणि कर भरले की संपले ही वृत्ती फक्त इथेच राहिलेल्यांच्यात असेल असे वाटायचे.

>>>लायक बनवणे म्हणजे काय ? कसल्या सुविधा / यंत्रणा? <<<< रिलॅक्स!

तुम्ही फक्त जिज्ञासांच्या मतावर मतप्रदर्शन केलेत तरी खूप काही साध्य होईल.

>>>बोजा किंवा आपला म्हणून स्विकारणे हा संबंध कुठून आला!!<<<

तेच उत्तर! सगळे कायदेशीर आहे ह्यात काहीही संदेह वगैरे नाही. विषय (खरे तर उपविषय) असा चालला आहे की सगळे फक्त कायदेशीर आहे म्हणून देशाने त्यात काहीच संधी बघायचा प्रयत्नही करायचा नाही का?

अनेक व्यवसाय असे आहेत की जे इतर देशात राहून प्रामाणिकपणे, उत्तम रितीने केले तर मानवजातीचे आणि पर्यायाने देशातील जनतेचेही भले होत असते. उदा: एखादा आजार बरा कसा करावा ह्याचा शोध परदेशात लागला तरी कालांतराने देशातील लोकांचाही फायदा होतोच. (तेच सॉफ्ट्वेअर किंवा आय टी बद्द्ल.) त्यामुळे देशासाठी काय केले हा प्रश्न अनेक व्यवसायांसाठी तसा फोल ठरतो.
खूप लोकल इम्पॅक्ट असणारा व्यवसाय असेल तर त्या लोकांनी परदेशात राहून देशासाठी काय केले हा विचार करण्यात वेळ द्यावा.

But you must not forget your country. >>> "बेस्ट" अनुभव घेतले कि समजायला लागते "आपला देश" हि एक कल्पनाच असते.. एक लागलेली सवय... आणि विसरायचा प्रष्ण येतच नाही कारण एकदा देशातुन बाहेर पडल कि पुन्हा त्याच (मेमरीमधील) देशात थोडेच परत जाता येते? ... वायफळ कुटाणा... "परत" जाणर्या माणसाला बदल घडवण्यासाठी सक्रिय व्हायची सवयच नसेल तर तो अल्याड असला काय किंवा पल्याड काहीच फरक पडत नाही. शिवाजी शेजारच्याच्या घरात जन्मो हिच इच्छा असते Happy

सीमंतिनी,

सहमत आहे, पण फक्त अश्या व्यवसायांबद्दल जे मुळात एकुण मानवजातीच्या भल्यासाठी वगैरे असतात. मला वाटते बहुसंख्य लोक असे काही व्यवसाय करत नसावेत तर केवळ स्वतःला सुबत्तायुक्त जगता यावे म्हणून तिकडे एखादी ठीकठाक नोकरी करत असावेत. अर्थात, माझी माहिती तुटपुंजी आहे ह्याची जाणीव आहे. चुकले असल्यास दुरुस्त करावेत.

पेशवा

>>>"बेस्ट" अनुभव घेतले कि समजायला लागते "आपला देश" हि एक कल्पनाच असते.. एक लागलेली सवय.<<<

तुमचा प्रतिसाद 'भारतातून अधिक चांगल्या देशात स्थलांतरीत झालेल्या एका कोणत्याही माणसाने कसा विचार करावा' ह्याबाबत आहे असे वाटत आहे. त्याच्याशी सहमत आहेच. एका माणसाला 'आपला देश' ह्याबद्दल काय वाटते हे तुम्ही लिहिलेत. एका देशाला आपल्या परदेशी असलेल्या नागरिकांच्या परतण्यातून काही मिळवणे शक्य आहे का ह्यावर चर्चा आहे. Happy

बेफिकीर, तुम्ही चर्चा अयोग्य वळणावर घेऊन चालला आहात. मी व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे हे असले कायदे नकोतच.
माझ्यामते (ही माझी फिलोसॉफी आहे you don't have to buy it) मी माझ्या देशासाठी काय केले हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि विचारत राहावा आयुष्यभर! मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा.. आयुष्यात अनेक गोष्टी pay it forward प्रकारे चालतात. तुम्हाला तुमच्या देशाकडून जे मिळालं त्याच्या बळावर आज तुम्ही देशाला काय देऊ शकता? आणि हा विचार फक्त परदेशातल्या भारतीयांनीच करावा असे नाही, भारतातल्या लोकांनीदेखील करावाच!
सी, एखाद्या non profit organization साठी काम करत असाल तर होय कदाचित पण it is not necessary that your job benefits your country. If you are working for a private company then your work is used for the profit of the company. जेव्हा मी म्हणते की तुम्ही देशासाठी काय करता तेव्हा तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचा/कामाचा तुमच्या देशाला कसा फायदा होतो ह्याबद्दल बोलत नाही. I am not talking about the impact of your work that you do for your livelihood. You will have some impact on the society/world directly or indirectly. But my question stretches beyond that. What do you do for your country? त्या जिंनामिदो मध्ये नसरुद्दिन शाह म्हणतो ना, "कुछ अपने लिये भी लिखते हो?" तसं!

<<
आता तर मला असे वाटू लागले आहे की अत्यल्प प्रमाणात असे स्वदेशी स्थलांतर होत असले तरीही सरकारने काहीतरी वसूल करावेच.
>>

बेफिकिर, हे खूप आधी पासून झाले आहे. भारतात outsourcing ची सुरुवात अशीच झाली आहे. सरकारने यापूर्वीही फायदा घेतला आहे आणि यापुढेही फायदा घेत राहील.

>>>जर परदेशस्थ भारतीयांचाही ह्या प्रगतीत हातभार लागला तर तो हवाच आहे! ब्रेनड्रेन असा शब्द आहे ना! त्यात शरीराला महत्व नाहीये! reverse brain drain होऊ दे की मग! Find ways to contribute. तुमच्या शाळेत/कॉलेजमध्ये जाऊन व्याख्याने द्या, तिथल्या मुलांचे प्रोजेक्ट गाईड व्हा. कोणत्या तरी गरजू संस्थेला कमी पैशात चांगली वेबसाईट बनवून द्या. Collaborative research करा. (ह्यात मी काही नवीन सांगत नाहीये अनेकजण असं करत आहेत) More power to reverse brain drain!<<<

जिज्ञासा, वरील पॅरामध्ये तुम्ही (बहुधा नकळतपणे) आग्रही भूमिका मांडत आहात.

>>>बेफिकीर, तुम्ही चर्चा अयोग्य वळणावर घेऊन चालला आहात. मी व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे हे असले कायदे नकोतच.<<<

येथे तुम्ही म्हणत आहात की व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारे कायदे असावेत असे मी म्हणत आहे.

हे सगळेच अजब आहे जिज्ञासा!

पहिली गोष्ट म्हणजे तुमचा तो प्रतिसाद धाग्याशी सुसंगतच नाही आहे. पण तुमचा प्रतिसाद अनेकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर असल्याने मी चर्चा त्यावर सुरू ठेवली. आता तुम्ही मलाच चर्चा अयोग्य वळणावर नेलीत असे म्हणत आहात.

मी कोणाच्याही व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालणारे कायदे असावेत असे म्हणत नाही आहे. किंबहुना 'वसुली' हा शब्द लिहितानाही मी तो 'भारताने परतणार्‍यांकडून वसुली करावी' ह्या अर्थाने लिहिलेला नव्हता तर त्यांच्या परतण्याची 'अधिक परदेशी व्यवसाय आणण्यातून वसुली करावी' अश्या अर्थाने लिहिला होता. पण त्या वसुली शब्दाने काही आय डी अचानक चर्चेत सक्रीय झाले व मी एक पाऊल मागे घेतले.

तुमचा तो मोठा (देशभक्तीयुक्त - खोचकपणे म्हणत नाही आहे) प्रतिसाद येण्याअगोदर माझा विषय हा खालील होता:

'परतणार्‍यांचे परतणे ह्याला एक संधी मानता येईल का? ती संधी कसकशी असेल, वगैरे'

तुमच्या प्रतिसादानंतर मी फक्त एकच गोष्ट त्यात अ‍ॅड केली ती म्हणजे:

'परतणार्‍यांनी (तरी) (इफ नॉट जाणार्‍यांनी) देशासाठी काहीतरी खास करावे अश्या अर्थाच्या तरतुदी कराव्यात'

आता व्यक्तीस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून कुठेच काही करायचे नसेल तर भाग वेगळा! पण मी नंतर अ‍ॅड केलेला मुद्दा निव्वळ तुमच्या पॅट्रिअ‍ॅटिक प्रतिसादानंतर अ‍ॅड केलेला होता.

माझाच धागा मीच कशाला अयोग्य वळणावर नेईन? Proud

जि, उदा: युएसबीचा शोध लागला. आता त्यात फक्त परदेशी लोकांचा फायदा झाला का? देशातले लोक युएस्बी वापरत नव्हते का? 'प्रॉफिट कंपनीचा होणे' हे तर लोक देशात परत आले तरी होईलच. अमेरिकेत असताना युएस्बी शोधून इंटेलचा प्रॉफिट करतील; देशात जमलच शोधायला अशी टेक्नॉलॉजी तर तशा दुसर्या कंपनीचा प्रॉफिट करतील. शोध घेणारा एक माणूस क्रेडिट घेतो कारण तो लीडर असतो पण त्याच्या अख्खी टीमचे प्रयत्न असतात. एकही माणूस जर म्हणाला - मी ठीक्ठाक नोकरी करतो तर तो जगन्नाथाचा रथ पुढे सरकणार नाही. म्हणून आपला व्यवसाय खूप निष्ठेने करणे आवश्यक आहे.
ते पुरेसे आहे का म्हणजे तेवढेच करणे देशाच्या उन्नतीस कारणीभूत ठरेल का? नाही. पण त्याला कारण देशातील फॅक्टर्स आहेत. उदा: गंगा शुद्धीकरणासाठी आता एन आर आय लोकांनी दिले पैसे, श्रम इ. तरी दोन- तीन वर्षात गंगा परत जैसे थे अवस्था येईल. धार्मिक, राजकिय इ इ समीकरणे बदलत नाहीत तोवर कितीही परदेशस्थ नागरिक आले तरी फरक पडणार नाही.

हवाच आहे = it is always welcome!
Anyway, I have said enough खूप कामे आहेत तेव्हा आता मी जाते!

'आम्हीच मिळालो का फक्त' >> सॉरी पण अशा भावनेतून लिहिलं न्हवत.
वर मला वाटतं झक्की म्हणलेले की गेलेले लोकं गेल्याने फार नुकसान होत नाही असंच काहीसं म्हणायचं होतं. देशात परतायचा निर्णय वैयक्तिकरीत्या कोणी घेतला तर त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार ती बर वाईट काय ते जगेल, त्याचा बरा वाईट परिणाम सभोवताली होईल. त्याचा देशाने फायदा करून घायचा म्हणजे तिच्या चांगल्या वाईट सवयी उचलायच्या? का ती करेल तसं करायचं. त्याने काय साध्या होणार? अंधानुकरण.. ते कित्येक लोक काहीही न होता करतातच. जे काय इव्होल्व व्हायचं ते नैसर्गिकरीत्या होऊ दे.
एक उदाहरण, भारताने असंच करावं हे सांगायचा उद्देश नक्कीच नाही. कॅनडाचा लोकसंख्यावाढीचा दर २ पेक्षाही कमी आहे, आता बेबी बुमर्स रिटायर होऊ लागलेत आणि तरुण काम करू शकणारे लोक कमी आहेत. सगळी अर्थव्यवस्था सुरळीत चालू ठेवायची तर बाहेरून आलेल्या (इमिग्रनट्स) शिवाय पर्याय नाही. दरवर्षी अनेक प्रोग्र्याम ठरवून करून फेडरल आणि प्रोविन्शियल लेवलला वेगवेगळ्या स्लिक सेट्ससाठी कायमस्वरूपी दीर्घकाळ (पर्मनंट रेसिडंट) राहण्याचा विसा देऊन बोलावतात. अशी आलेली माणसं टिकवून ठेवणे, ती नागरिक बनली की नॉर्थ अमेरिकन नियमानुसार काहीही बंधनाविना अमेरिकेत नोकरी करू शकतात, ते फक्त आणि फक्त देशांतर्गत जास्तीत जास्त सुविधा देऊन रोखण्याचा प्रयत्न करणे. जे जातील त्याच्या वाटेतील धोंड न बनता आणखी लोकाना आमंत्रण धाडणे हा उद्योग अव्याहत कॅनडा करतो. पूर्णपणे बाहेरच्या लोकाना कायम राहण्यासाठी बोलावणे आणि त्याना हार्श हवामानात टिकवून ठेवणे सोपे नाही.

Pages