काल संध्याकाळी धो-धो पाऊस पडत असताना मला इस्त्रीला दिलेले कपडे आणायला दुकानात जावं लागलं, तेव्हा अचानकच त्याची आठवण आली.
'तो' रोज संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान यायचा. कॉलनीतल्या आसपासच्या पन्नास एक बिल्डींग्सपैकी किमान पंचवीस बिल्डींग्समध्ये तरी तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन इस्त्रीचे कपडे घ्यायचा किंवा परत द्यायचा. सोबत एक सायकल तिला एक कपड्यांचं मोठं बोचकं. येताना एकच असायचं. जाताना ते बोचकं जितकं कमी होईल तितकंच एक अजून तयार होत असे. घेउन आलेलं बोचकं अर्थातच इस्त्री केलेल्या कपड्यांचं आणि वाढलेलं, नव्याने इस्त्रीसाठी घेतलेल्या कपड्यांचं. आज नेलेले कपडे उद्या परत, घरपोच.
साधारण विशीच्या आसपास असेल तो. आमच्यापेक्षा ४-५ वर्षं मोठाच. पण आम्ही खूप खेचायचो त्याची.
त्याला 'अॅक्टिंग'चा जाम कीडा होता. तो कपडे घेउन येताना दिसला की आमचा प्लान शिजायचा. मग कधी त्याच्या हेअरकटची, कधी कपड्यांची, कधी 'स्टाईल'ची तारीफ करायची, कधी त्याला अजून काही तरी किल्ली मारायची की तो लगेच एखादा अमिताभ, शाहरुख, संजय दत्त, अनिल कपूर दाखवायचा. पंधरा-वीस मिनिटं, अर्धा तास आमच्यात वेळ घालवल्यावर त्याला धंद्याची आठवण व्हायची, की तो लगबगीने समोरच्या बिल्डींगमध्ये जायचा. लॉबीतल्या खिडकीतून आमच्याकडे बघून तिथूनही केसांतून हात फिरवून, हवेत हातवारे करून अदाकारी दाखवायचा. तो मनापासून करत असलेल्या सादरीकरणाची तितक्याच मनापासून खिल्ली उडवण्याइतपत नालायकपणा आमच्यात होताच, पण तो त्याला समजूही न देण्याचा लबाडपणाही आम्ही अंगी बाणवला होता.
नितीश भारद्वाजसारखा दिसायचा जरासा. चेहऱ्यावर तसंच 'कृष्णा'सारखं स्मितही हसायचं. फरक एकच होता. नितीश भारद्वाजच्या कृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मित सर्वज्ञाची झळाळी दाखवायचं, तर ह्याच्या चेहऱ्यावरचं स्मित अज्ञानातील आनंदाची. त्याची खेचुन झाल्यावर आम्ही त्याला 'बिचारा' म्हणायचो, पण त्या अपराधी भावनेचा फोलपणा आमच्या तेव्हा लक्षात येत नव्हताच. एकट्या अभ्याला येत असावा बहुतेक. कारण तो कधीच त्याची मस्करी करायचा नाही. अभ्या स्वत:सुद्धा चांगला नक्कलाकार असल्याने असेल कदाचित. कित्येकदा तो त्याला आमच्यातून ओढून बाहेरही काढायचा आणि त्याच्या कामावर जायला लावायचा.
अभ्याला त्याने त्याची कहाणीसुद्धा सांगितली होती.
उत्तर प्रदेशातून आला होता तो. घरची परिस्थिती विशेष काही नव्हती. घरची परिस्थिती चांगली नसलेले उत्तर प्रदेशातील बहुतांश लोक जे करतात, तेच त्याच्या आई-वडिलांनी केलं. त्याला शहरात पाठवायचं ठरवलं. 'कानपूर, अलाहाबाद, लखनऊ, दिल्ली, कोलकाता कुठेही जाणार नाही, गेलो तर मुंबलाच जाईन', असं त्याने ठणकावून सांगितलं. कारण ? 'अॅक्टिंग'चा चसका ! 'मुंबईला आलो की पिक्चरमध्ये गेलोच' ह्या फिल्मी विचाराने पछाडलेला तो कुठल्या तरी दूरच्या नातेवाईकाकडे मुंबईला आला आणि त्या नातेवाईकाने त्याला स्वत:च्या कामावर जुंपला.
सुरुवातीला तो अभ्याला विचारायचा, जुहूला कसं जायचं ? बॅण्ड स्टॅण्डला कसं जायचं ? पाली हील कुठे आहे ? ताज महाल, ओबरॉय हॉटेलला जाता येतं का ? (त्याला मुंबईत येतानाच 'ताज महाल हॉटेल' हे नाव माहित होतं आणि तिथे झाडून सगळे फिल्म स्टार्स रोज रात्री येत असतात, असंही वाटत होतं. पण कुठून तरी त्याला असं कळलं होतं की त्याच्या आसपासच्या भागात जाण्यासाठी 'स्पेशल पोलीस परमिशन' घ्यायला लागते !) एकदा अभ्या त्याला 'प्रतीक्षा'ला घेऊन गेला. तिथे गेल्यावर हा पठ्ठ्या परत यायला तयारच होईना ! अमिताभला बघितल्याशिवाय जायचंच नाही म्हणे. कसंबसं परत आल्यावर मात्र अभ्याने कानाला खडा लावला, पुन्हा कुठे घेउन जाणार नाही. फार तर सांगीन कसं जायचं ते, बस् !
मग हळूहळू कामाच्या रगाड्यात आणि बहुतेक नातेवाईकाने टाकलेल्या प्रेशरमुळे त्याची हौस कमी कमी होत संपून गेली. 'अॅक्टिंग'चा कीडा आम्ही फरमायीश करण्याची वाट पाहत वळवळत असायचा. तो आणि त्याचा कीडा दोघेही बिचारेच होते.
त्याच्या घरोघर जाऊन कपडे घेण्या-पोहोचवण्यामुळे कॉलनीतल्या आळशी पिअक्कड इस्त्रीवाल्याचा धंदा मात्र बसला.
एक दिवस संध्याकाळी धो-धो पाऊस पडत असताना, दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. 'तो' होता.
रडवेल्या सुरात तो म्हणाला, 'रणजित भाय, ज़रा देखो ना.. यह मुझे परेशान कर रहें हैं. बोलते हैं इधर वापस आना नहीं. मैं अभिजित भाय के घर पे गया, ताला हैं. मेरी मदद करो. इनको बोलो ना ज़रा..!!'
मी. वय १५-१६. उंची जेमतेम ५ फुट. पडवळासारखे दंड. आणि तो माझ्याकडे मदत मागत होता.
तरी मी बाहेर येऊन पाहिलं. कॉलनीतला इस्त्रीवाला तारवटलेल्या डोळ्यांनी माझ्यावर धावून आला. इतक्यात त्याच्याबरोबरच्या एकाने त्याला थांबवलं. मला खूण केली की 'मी पाहून घेतो.' आणि त्याला गळ्यात हात टाकून घेउन गेला.
पाऊसही पडत होता. मी काही करूही शकत नव्हतोच. मी त्याला टिपिकल मध्यमवर्गीय डरपोक सल्ला दिला.
'अभी वोह गया हैं. तुम्हारा कुछ और काम हो, तो रहने दो उसे. पहले यहाँ से निकलो और अपने मामाजी को जा के बता दो.'
बुडत्याला काडीचा आधार वाटतो. त्याला माझ्या पुचाट सल्ल्यातून आधार मिळाला आणि तो मला हात जोडून thank you म्हणून निघून गेला.
त्या रात्रीच मामाजी आणि ४-५ जण कॉलनीतल्या इस्त्रीवाल्याची 'भेट' घेउन गेले. चार दिवसांनी 'तो' परत आला. पुन्हा आधीसारखा धंदा सुरु झाला होता. पण नंतर आम्ही घर बदललं. गव्हर्न्मेंट क्वार्टर होतं ते. मोठं क्वार्टर अलॉट झालंच होतं. आणखी काही दिवसांनी पुन्हा घर बदललं आणि नंतर शहरच बदललं.
अभ्यानेही खरं तर कॉलनी सोडली. पण त्याला बरीच 'खबरबात' असते म्हणून मध्यंतरी एकदा त्याला विचारलं होतं की, 'तो' काय करतो ?
फिल्म सिटीत कुठल्या तरी स्टुडीओत हेल्परचं काम करतो म्हणाला.
आधी वाईट वाटलं. पण मी 'तो' जितका ओळखला, त्यावरून तरी हे चांगलंच झालं होतं. कधी तरी अमिताभ त्याला नक्की दिसेल किंवा आत्तापर्यंत दिसलाही असेल !
त्याचं नाव ? काय करायचंय नाव ?
त्याच्यासारखे किती तरी जण ह्या मुंबईने ओढून घेतले आहेत. कोळ्याच्या जाळ्यात कीडा अडकतो, तसे हे 'अॅक्टिंग'चे कीडे मुंबईत अडकतात. कोळी कीडा गिळतो, मुंबई असे अनेक 'तो'.
इस्त्रीच्या दुकानात पोहोचलो. कपडे घेईपर्यंत पाऊस थांबला होता. थांबणारच ! तो मुंबईचा थोडीच होता ?
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/06/blog-post.html
मस्त लिहिलयं.. का कोण जाणे पण
मस्त लिहिलयं..
म्हणूनच..
का कोण जाणे पण समोर अशी एखादी कहानी आली तरच काय ते हळहळायला होत.. आजकाल कुणाच्या अध्यात मध्यात पडायलापन कोणी धजावत नाही.. स्वतःच रडगाणं आणि भरीस सगळीकडे चाललेला कोलाहल बघुन कदाचित मन सुद्धा निब्बर होउन गेल असणारं
छान मांडलीय व्यक्तिरेखा .
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
मस्तच लिहीलंय!!!
मस्तच लिहीलंय!!!
मस्त लिहिलंय.. खरंच
मस्त लिहिलंय.. खरंच मुंबईबाहेरच्या लोकांना विलक्षण आकर्षण असते या दुनियेचे. किती तरी जण त्या दुनियेच्या आसपासही पोहोचत नाहीत.
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
पूर्वार्ध अधिक सविस्तर वाचायला आवडला असता.
मायानगरी नाव उगीच नाही पडलेलं मुंबईचं...
मस्त लिहलयं !
मस्त लिहलयं !
छान लिहिलय. आवडलं. " नितीश
छान लिहिलय. आवडलं.
" नितीश भारद्वाजच्या कृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मित सर्वज्ञाची झळाळी दाखवायचं, तर ह्याच्या चेहऱ्यावरचं स्मित अज्ञानातील आनंदाची "....... हे अल्टिमेट!!
मस्त .....पण आज हे असं
मस्त .....पण आज हे असं .........तुमची स्टाईल नाही वाटत.
चांगलं लिहिलं आहे. आवडलं.
चांगलं लिहिलं आहे. आवडलं.
छान लिहीलंय, रसप.
छान लिहीलंय, रसप.
इंडस्ट्रीतल्या कितीतरी परडे
इंडस्ट्रीतल्या कितीतरी परडे वर काम करणार्या लोकांची ही कहाणी आहे.
पण चुकीच्या घटकांच्या हातात सापडून आर्थिक, मानसिक शोषण आणि नुसतीच आशा लागून राहणे यापेक्षा इंडस्ट्रीत ते रोजीरोटी कमावतायत हे बरंय.
जेम ड्रेसवाल्याकडे एक मास्टर टेलर होता. त्याला मी सगळ्या इंस्ट्रक्शनच आकृतीसकट समजावून लिहून द्यायचे. दोन तीन वेळा लिहून दिलेले वेगळेच आणि केलेले वेगळेच झाल्यावर मी वैतागले. तेव्हा तो म्हणाला हमे ना पढना लिखना नही आता. बस नंबर्स समझते है. ७ सालका था तब घरसे बंबई भाग आया हिरो बननेके लिये तो पढाई रह गयी.
मला वाईट वाटलं पण ७ वर्षाचा असताना मुंबईत पळून आलेल्या मुलाचं जे जे काय होऊ शकलं असतं त्यापेक्षा तो दिवसरात्र कपडे बेतून, शिवून पोटाला कमवत होता हे फारच जास्त भलं चित्र होतं.
छान लिहिलेय रसप.. आणि
छान लिहिलेय रसप..
आणि अचूक
पण मोह तरी कसा सुटावा, कारण असाच एक एक्टींगचा किडा घेऊन शाहरूखही मुंबईत आलेला, मित्राकडून गाडीभाड्याचे पैसे घेऊन स्टुडिओच्या फेर्या मारलेल्या, घरभाड्याचे पैसे नसल्याने घराबाहेर पडावे लागलेले.. अजून बरेच काही.. पण पुढे घडले तो ईतिहास आहे.
अश्या हस्तींकडून खरे तर इन्स्पिरेशन घ्यायचे असते मात्र यांच्याच सुरस कथा मग अश्या वेडेपणांना कारणीभूत ठरतात..
सारेच काही सचिन तेंडुलकर होऊ शकत नाहीत हे क्रिकेटचे वेड असलेल्यांना वेळीच समजते.. मात्र एक्टींगचा किडा असलेल्यांना हे दुर्दैवाने नाही समजू शकत..
चांगल लिहिलय. बॉम्बे टॉकीज
चांगल लिहिलय.
बॉम्बे टॉकीज मधली शेवटची स्टोरी आठवली.
अप्रतिम लिहीलंय..
अप्रतिम लिहीलंय..
छान लिहीलय आवडल.
छान लिहीलय आवडल.
छान
छान
छान
छान
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
व्हॉट्सअॅपवर काही मित्रांशी
व्हॉट्सअॅपवर काही मित्रांशी चर्चा सुरु होती. अगदी टिपिकल भुक्कड विषय - 'महागाई' ! कुणी म्हणालं आमच्याकडे इस्त्रीवाला एका शर्टाचे ५ रु. घेतो. कुणी म्हणालं आमच्याकडे ६ रु. घेतो. एक सदासुखी मुंबईकर मित्र म्हणाला, 'आमचा इस्त्रीवालासुद्धा ५ रु. च घेतो. पण घरी येऊन कपडे घेउन जातो आणि इस्त्री करून आणूनही देतो !'
मी मुंबईला असताना माझ्याकडे येणारा इस्त्रीवाला झटक्यात आठवला आणि त्याबद्दल सांगता सांगता पोस्ट वाढत गेली. तिला जरासा आकार वगैरे देऊन अक्षरश: काही मिनिटांत मी वरील लेख लिहिला. जर तो खरोखर चांगला झाला असेल आणि सर्वांच्या पसंतीसही उतरला असेल, तर त्याचे पूर्ण क्रेडीट माझ्या रिकामटेकड्या मित्रांचं आहे. त्यांनीच ह्या पोस्टचा कीडा डोक्यात सोडला आणि मी फक्त त्याला वाट करून दिली.
छान लिहीलंय
छान लिहीलंय
मला आवडले....
मला आवडले....
चान्गल लिहलय!
चान्गल लिहलय!
आवडले!
आवडले!
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
छान लिहिलं आहे. हा नुसता किडा
छान लिहिलं आहे. हा नुसता किडा नसतो. किड्याचा बाप असतो.
माझ्या एका मित्राच्या आईची आठवण झाली. ती एक एक्स्ट्रॉ होती. त्या वेळी त्यांची युनियन नव्हती. काम मिळालं तर दिवसभरचे पंचाहत्तर रुपये. नाहीतर काही नाही.
ती म्हणायची, "ही जी नशा आहे ती दारूपेक्षा वाईट. कळतं पण वळत नाही. मी गेली वीस वर्षं काम करतिये. आणि मला अजूनही रोज वाटतं की माझ्यातला कलाकार कोणालातरी दिसेल! माझ्या मुलांना मी चुकूनही तिकडे फिरकू देणार नाही."
पण जे व्हायचं ते होतंच. तो साऊंड इंजिनियर झाला. व्यवस्थित चाललं आहे.