देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास

Submitted by निकीत on 18 June, 2015 - 06:23
anandibai

देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास

**********
आधीचा भाग:
देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास: http://www.maayboli.com/node/53820
**********

उच्च शिक्षणासाठी, नोकरी / व्यवसायासाठी, किंवा कुटुंबासमवेत भारतीय स्त्रियांनी अमेरिकेला जाणे ही आता काही नावीन्यपूर्ण गोष्ट राहिलेली नाही. परंतू, भारतातून गेली सुमारे १५० वर्षे स्त्रिया अमेरिकेत जात आहेत. पैकी सुरुवातीला गेलेल्या स्त्रिया मोजक्याच असल्या तरी त्यांच्या कथा अतिशय संघर्षपूर्ण आणि रोमांचकारक आहेत. देशांतराच्या कथा या मालिकेतील मागच्या भागात (http://www.maayboli.com/node/53820) आपण अमेरिकेतील भारतीयांच्या स्थलांतराच्या थोडक्यात इतिहास बघितला. या भागात मी अमेरिकेत गेलेल्या भारतीय स्त्रियांचा इतिहास मांडणार आहे.

अमेरिकेतील भारतीय स्थलांतराच्या सुरुवातीच्या काळात (१८८० च्या आधी) स्त्रियांची संख्या अगदीच नगण्य होती. त्यानंतर ती हळूहळू वाढत गेली; पण सुरुवातीला आलेल्या बहुतांश भारतीय स्त्रिया या त्यांच्या कुटुंबासोबत आल्या. अर्थात भारतातील आणि अमेरिकेतीलही तत्कालीन सामाजिक परिस्थिती त्याला कारणीभूत होती. १८८० नंतर मात्र हे चित्र हळूहळू पालटू लागले; भारतीय स्त्रिया शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाऊ लागल्या. पण अमेरिकेतही स्त्रियांना सगळीकडेच शिक्षण मिळत होते असे नाही; मोजकीच विद्यापीठे स्त्रियांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश देत असत. आव्हानात्मक काम करायला मिळणे तर दुरापास्तच. त्याचबरोबर, १८६५ साली कायदेशीर दृष्ट्या अमेरिकेतील गुलामी संपलेली असली, तरिही वंशभेद होताच. अनेक राज्यात तर कायदेशीर वंशभेद अगदी आता आता म्हणजे १९६५ पर्यंत होता. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या नेत्रुत्वाखालील सिव्हिल राईट्स चळवळीने तो मोडून काढला. ह्या पार्श्वभूमीवर परक्या मुलखात भारतासारख्या देशातून रुढार्थाने "काळ्या" स्त्रियांनी स्वतंत्रपणे येणं हे आपल्याला कल्पनाही करता येणार नाही इतकं अवघड होतं.

अमेरिकेला स्वतंत्रपणे येणारी पहिली भारतीय स्त्री म्हणजे आनंदीबाई जोशी. १८८३ साली वयाच्या अवघ्या १८-१९ व्या वर्षी आनंदीबाई वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एकट्याच अमेरिकेमध्ये आल्या आणि विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्वेनियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण मुळातच नाजूक प्रकृती, त्याउपर थंड हवा आणि खाण्यापिण्याची आबाळ यामुळे त्यांची तब्येत काही ठीक राहत नसे. अशातच त्यांना टीबी झाला. पण या सर्वांवर मात करून १८८६ साली त्यांनी एम. डी. मिळवली आणि आनंदीबाई डॉक्टर होणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री ठरल्या. पण त्यांचं हे यश फक्त भारतापुरतच मर्यादित नाही. अमेरिकेतही उच्च शिक्षणाची दारे स्त्रियांना नुकतीच खुली झाली होती; तेथील पहिली महिला डॉक्टर (एलिझाबेथ ब्लॅकवेल) १८४९ साली ग्रॅज्युएट झाली होती. त्यामुळे खुद्द अमेरिकेतही १८८६ साली मोजक्याच महिला डॉक्टर होत्या. म्हणूनच आनंदीबाईंच्या यशाचे त्यांच्या विद्यापीठानेही विशेष कौतुक केले. त्यांच्या कौतुक समारंभाला त्यांचे पती गोपाळ जोशी हजर राहिलेच पण इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीनेही त्यांना खास कौतुकाचे पत्र पाठवले; स्थानिक वर्तमानपत्रांतही या घटनेला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. आनंदीबाई शिक्षण आटोपून लगेचच भारतात परतल्या आणि लगोलग शाहू महाराजांनी त्यांची कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये महिला वॉर्डाच्या प्रमुखपदी नेमणूकही करून टाकली. तब्येतीने मात्र नंतर त्यांची साथ दिली नाही आणि १८८७ साली २२ व्या वर्षी डॉ. आनंदीबाई मृत्यू पावल्या.

आनंदीबाई त्यांच्या सहकारी विद्यार्थिनिंसमवेत:
anandibai 1.jpg
स्त्रोत: http://xdl.drexelmed.edu/print_image.php?object_id=2373&selected_segment...

आनंदीबाईंनी त्यांच्या मैत्रिणीला दिलेले कार्ड:
anandibai 2.jpg
स्त्रोत: http://s3.amazonaws.com/saada-online/objects/2014-07/item-a266-1886joshi...

आनंदीबाईंनन्तर अमेरिकेत आलेली एक अवलिया आणि काळाच्या पुढचा विचार करणारी स्त्री म्हणजे पंडिता रमाबाई. त्यांच्या संस्कृतवरील पांडित्यामुळे प्रभावित होऊन कलकत्ता विद्यापीठाने त्यांना वयाच्या विसाव्या वर्षीच (१८७८) पंडिता ही पदवी बहाल केली. आधी कलकत्ता येथे आणि पतीच्या मृत्युनंतर पुण्यात येउन त्यानी महिलांच्या प्रश्नावर (शिक्षण, सती, बालविवाह, बालविधवा पुनर्विवाह ई) काम करायला सुरुवात केली. भारतामध्ये त्या काळात त्यांना किंडरगार्डन शिक्षण पद्धती सुरु करायची होती ! १८८६ साली काही अमेरिकन विद्यापिठांनी त्यांना व्याखान देण्याकरिता बोलावले. १८८६ ते १८८९ ही तीन वर्ष त्यांनी अमेरिका अक्षरशः पिंजून काढली आणि सर्व कानाकोपऱ्यात जाउन भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल व्याख्याने दिली. त्यांची व्याख्याने इतकी गाजली की त्यांच्या "High Cast Hindu Women" या पुस्तकाच्या त्या काळात १०,००० प्रति खपल्या ! त्यातून उभ्या राहिलेल्या सुमारे ३०,००० डॉलर मधून त्यांनी भारतात अनेक महिलाश्रम उभारले. त्यांच्या अमेरिकेतील अनुभवांवरदेखील त्यानी "Status of Society of United States and a travelogue" नावाचे पुस्तक लिहिले आहे.

पंडिता रमाबाई:
ramabai.jpg
स्त्रोत: https://www.mukti.org.au/founder.php

आनंदीबाई आणि रमाबाईंच्या यशानंतर भारतामधून अनेक स्त्रिया शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत येऊ लागल्या. यातल्या बहुतांश वैद्यकीय शिक्षणासाठी आणि विशेषतः पेनसिल्वेनिया मेडिकल स्कूल मध्ये येऊ लागल्या. विशेष रोचक गोष्ट म्हणजे त्यातल्या अनेक मराठी होत्या ! उदा. गुरुबाई करमरकर, प्रेमला शहाणे, चंपा सुंठणकर, मेरीबाई कुकडे, शेवंतीबाई निरांबे इत्यादी. माया दास, दारा चटर्जी वगैरे बंगाली मुलीदेखील होत्या. या भारतीय विद्यार्थिनी अतिशय मेहेनती असत आणि त्यामुळे त्यांच्या प्रोफेसरांच्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी असत.

गुरुबाई करमरकर:
guribai.jpg
स्त्रोत: http://xdl.drexelmed.edu/viewer.php?object_id=2365&t=default#

१९२८ साली प्रेमला शहाणे यांच्याबद्दल पेपरात आलेली बातमी (प्रेमलाचा इंग्रजी अपभ्रंश पॅमेला !):
premala.jpg
स्त्रोत: http://s3.amazonaws.com/saada-online/objects/2014-07/item-p2192-001.jpg

१९१७ साली मिशिगन विद्यापीठाने (अ‍ॅन-आर्बर) आशियाई मुलींच्या शिक्षणासाठी बार्बर (Barbour) स्कॉलरशिप सुरु केली (तत्कालीन रीजंट बार्बर यांनी सुरु केली म्हणुन त्यांचे नाव). अनेक भारतीय विद्यार्थिनी या स्कॉलरशिप अंतर्गत मिशिगन विद्यापीठात शिकून गेल्या. किंबहुना ही स्कॉलरशिप मिळविण्यासाठी भारतात चांगलीच चुरस असे. उदा. १९२८-२९ साली भारतातून ७५ अर्ज आले होते. पण त्यातील सर्वात उल्लेखनीय अर्ज होता तो शकेश्वरी आगा नावाच्या काश्मिरी पंडितेचा; अर्थात त्या वर्षी त्यांनाच ती स्कॉलरशिप मिळाली. दोन वर्षे शिक्षण (एम ए इन एज्युकेशन) पूर्ण करून आगा भारतात परतल्या आणि स्त्री-शिक्षण आणि सामाजिक सुधारणांवर भरघोस काम केलं. आणि फक्त आगाच नाही तर असे भरीव काम करणाऱ्या कितीतरी बार्बर स्कॉलर आहेत उदा. अ‍ॅन-आर्बर हिंदुस्तान असोसिएशनच्या अध्यक्षा लीला देसाई, बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पहिल्या अध्यक्षा डॉ. जानकी अम्मल इत्यादी. मिशिगन विद्यापीठात ही स्कॉलरशिप आजही सुरु आहे. http://www.rackham.umich.edu/prospective-students/funding/nomination-all....

भारतीय विद्यार्थिनी जरी येऊ लागल्या होत्या तरी पुरुषांच्या मानाने त्यांची संख्या बरीच कमी होती. आणि त्यातून अनेकदा गंमतशीर प्रसंगही घडत असत. कॉर्नेल विद्यापीठात १९१८ च्या सुमारास तेथील भारतीय विद्यार्थ्यांनी "हिंदुस्थान नाईट" साजरी करण्यासाठी भारतातील लग्नाचा देखावा करण्याचे ठरविले. पण त्यांना भारतीय मुलगीच सापडेना आणि भारतीय मुले मुलीचं काम करायला तयार होईनात. मग काय. एका चायनीज मुलाला केले नवरी, एक फिलिपिनो मुलगा झाला नवऱ्याची आई आणि एक ब्राझिलियन झाला नवरीची आई.

हिंदुस्थान नाईट:
Marriage.jpg
स्त्रोत: http://s3.amazonaws.com/saada-online/objects/2012-00/item-de-majumdar-d-...

नथ किंवा नाकात टोचलेला खडा ("नोज डायमंड") हा नवीनच अलंकार भारतीय बायका घालतात याबद्दल सॅन फ्रान्सिस्को कॉल मध्ये १९१५ साली आलेली बातमी:
nose diamond copy.jpg
स्त्रोत: https://www.saadigitalarchive.org/item/20130508-2734

दिल्लीहून कांता चंद्र गुप्ता (डावीकडील) १९१० साली सॅन फ्रान्सिस्को मध्ये आल्या. अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अर्ज करणार्या त्या पहिल्या महिला. त्यांची मागणी मान्य व्हायला मात्र १९६९ साल उजाडावे लागले !
kanta chandra gupta.png
स्त्रोत: https://www.google.com/culturalinstitute/asset-viewer/kanta-chandra-gupt...

हा इतिहास भारतीय स्त्रियांचा जरी असला तरी अ‍ॅग्नेस स्मेडली या अमेरिकन महिलेचा उल्लेख लेखात आवश्यक आहे. अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना करून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मदत करणाऱ्या क्रांतिकारकांसाठी अ‍ॅग्नेस एक लेखिका आणि त्यांची क्रांतिकारी साथीदार आहे; तर अमेरिकन आणि ब्रिटिश सरकारांसाठी ती एक रशियन, चायनीज आणि भारतीय कम्युनिस्ट हेर आहे. १९१२-१३ च्या आसपास न्यूयॉर्क विद्यापीठात आणि त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) शिकत असताना ती लाला लजपत राय, मानवेंद्रनाथ रॉय, भगवान सिंग, तारकानाथ दास अशा हिंदुस्थान गदर पार्टीच्या क्रांतिकारकांच्या संपर्कात आली. आणि भारताच्या प्रेमातच पडली आणि गदर पार्टीचे काम करू लागली. पहिल्या महायुद्धाचा फायदा घेऊन जर्मनीच्या मदतीने अमेरिकेहून भारतात शस्त्र पाठवायची आणी सशस्त्र क्रांती घडवून ब्रिटिशांना हुसकून लावायचे अशी गदर पार्टीची योजना त्यावेळी चालू होती. हे सर्व कसे घडवून आणायचे, त्याचे संदेश कसे पोचवायचे, क्रांतिकारकांना कसे लपवायचे याची जबाबदारी अ‍ॅग्नेस कडे होती. दरम्यान आयरिश रिपब्लिकन आर्मीचा ही ब्रिटन विरुद्ध जोर होताच. ते लोकही गदर पार्टीला सामील झाले. अखेरीस एक जहाज अमेरिकेहून शस्त्रे घेऊन आधी आयर्लंड आणि मग भारतात जाणार असे ठरले. पण ही योजना पूर्णत्वास जाण्याअगोदरच सर्व क्रांतिकारक पकडले गेले, ज्यात काही जर्मन गुप्तहेरही होते. सॅन फ्रान्सिस्कोत त्यांच्यावर खटला चालला, ज्याला जर्मन-हिन्दू कॉन्स्पिरसी ट्रायल म्हणुनही ओळखले जाते. अ‍ॅग्नेस खटल्यातून सुटली आणि नंतर ती रशिया आणि त्यानंतर चीन मध्ये तेथील कम्युनिस्ट सरकारांना मदत करण्यासाठी गेली. तिच्या आयुष्यावर तिनेच "डॉटर ऑफ अर्थ" ही कादंबरी देखील लिहिली आहे.

अ‍ॅग्नेस स्मेडली:
Agnes SMedley.jpg
स्त्रोत: http://spymuseum.com/agnes-smedley/

१९६५ च्या इमिग्रेशन अ‍ॅक्ट नंतर मात्र भारतीय स्त्रियांची संख्या झपाट्याने वाढू लागली. बदलणाऱ्या सामाजिक संदर्भांचे आणि जाणिवांचे परिणामही स्थलांतरात दिसायला लागले. त्यानंतरचा इतिहास बऱ्यापैकी सर्वश्रुत आहे. कल्पना चावला, इंद्रा नूयी, रेणू खटोर अशा अनेक स्त्रियांनी अमेरिकेत आपला ठसा उमटवला. पण उदाहरणादाखल फारशा ज्ञात नसणाऱ्या दोन स्त्रियांच्या कथा सांगतो. पहिली म्हणजे आशा पुथली. तीच जिचा गोलमाल (जुना - हृषिकेश मुखर्जी) चित्रपटात उल्लेख आहे ! पुथली मुंबई मध्ये जन्मली आणि वाढली. तेथून आधी इंग्लंड आणि तेथून १९७० च्या दशकात ती न्यूयॉर्क मध्ये आली. तिच्या फ्यूजन जॅझ संगीताने लोकांना वेडं केलं. न्यूयॉर्क टाईम्सने तर "फ्युजन पायोनियर" म्हणून तिला गौरवलं. स्पेस टॉक नावाचं तिचं एक प्रसिद्ध गाणं इथे ऐकता येईल. त्यातले अगदी अस्सल भारतीय इंग्रजी उच्चार रोचक वाटतात. पुढे ८० च्या दशकात पुथली परत इंग्लंडात स्थायिक झाली.

दुसरी कथा आहे भैरवी देसाईची. तिचा जन्म गुजरातचा पण आईवडिलांबरोबर लहानपणीच ती न्यूयॉर्क मध्ये आली.

Bhairavi Desai_080910-153.jpg
स्त्रोत: http://www.ontakingpictures.com/postImages/Bhairavi%20Desai_080910-153.jpg

१९९८ साली तिने एक करामत केली. न्यूयॉर्क मधील टॅक्सीचालकांची तिने चक्क युनियन बांधली. एक बाई या पूर्णपणे पुरुषांच्या प्रोफेशनमध्ये येऊन त्यांना संघटित करते हे विशेष. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच वर्षी तिच्या नेतृत्वाखाली सर्व न्यूयॉर्क टॅक्सीचालकांनी (~ १५०००) त्यांच्यावर लादलेल्या काही जाचक नियमांना विरोध दर्शविण्यासाठी संप केला. शहरात ३० वर्षांनी असा संप घडत होता तो ही एका बाईने घडवून आणला होता ! याचबरोबर भारतीय स्त्रियांनी नारिका, मानवी, मैत्री सारख्या संस्था सुरु केल्या, ज्या कौटुंबिक हिंसाचार, फसवणूक, सेक्शुआलिटी अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आज अमेरिकेत काम करतायत .

आनंदीबाईनी १८८३ साली सुरु केलेल्या ह्या प्रवासाने अडखळत का होईना आता पार लांबचा पल्ला गाठला आहे.

अधिक संदर्भ:
साउथ एशियन डिजिटल आर्काइव्ह: https://www.saadigitalarchive.org/
Drexel University College of Medicine - The Legacy Center Archives and Special Collections:
A patchwork shawl: chronicles of south asian women in america [पुस्तक] : संपा. : शमिता दास दासगुप्ता
बर्कली साउथ एशिया लायब्ररी: http://www.lib.berkeley.edu/SSEAL/
Berkeley South Asian History Archive: http://www.berkeleysouthasian.org/
Smithsonian: Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation: http://smithsonianapa.org/beyondbollywood/
द कर्मा ऑफ ब्राऊन फोक [पुस्तक] - ले. विजय प्रशाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिएटलमधील मायबोलीकरांना क्षमाच्या कामाचा अनुभव आला आहे का ?>>

मी NPR var क्षमाचे नाव बर्याच वेळा एकले आहे. एकदा तिची मुलाखत पण त्याच स्टेशन्वर ऐकली होती. भाषेवर खुप चांगले प्रभुत्व आहे.

लिंकसाठी धन्यवाद, चिनूक्स.
साहिल, एन पी आर च्या प्रोग्रॅम ची लिंक देता येईल का ?
क्षमा यांची एक मुलाखत इथे ऐकता येईल: http://live.huffingtonpost.com/r/segment/socialist-kshama-sawant/528e667...

Pages