थोड़ा मोठा हो

Submitted by vasant_20 on 12 June, 2015 - 06:42

मला समजत नाही, तू कधी मोठा होणार आहेस आणि शहाण्या सारखा वागणार आहेस? एवढी वर्ष झाली अजूनही तू तसाच आहेस, किंबहुना माझ्यापेक्षा मोठाच असशील. आणि त्यातही जे कुणी तुझ्याबरोबर येत त्यांनाही तू लहान करतोस..! अस नाही चालत. पण लहानपणीचा मित्र तू, म्हणून बोलतोय.
यायची तुझी वेळही काही नक्की नाही, कधी लवकर तर कधी उशीरा, कसलाच ताळमेळ नाही.वेळेवर येत जा ना तू. आम्ही एवढे तुझे प्रेडिक्शन्स करतो, यावेळी 99%, 88%, चांगला, समाधानकारक त्याच्याही पुढे जाऊन प्रिमॉनसून- पोस्टमॉनसून असे तुझे प्रकारही करतो, दोन्ही प्रकारात तू तसाच असतोस, पाणीच आणतोस पण आमची हुशारी नको का समजायला ? असोत पुढे जाऊन आम्ही त्यातही नक्की काहीतरी फरक शोधु.
हल्ली पाहिलय मी, बऱ्याचदा तू ऑफिसला निघताना येतोस, अस कामाला बाहेर पडणाऱ्या माणसांना अडवु नये. आम्हाला वेळेत पोहोचायच असत, लेट मार्क म्हणजे तुला काय माहीत. तू थोड़ा वेळ येतोस आणि प्रॉब्लम करतोस. कपडे भिजतात, सगळी चिकचिक करतोस, चिखल. अस वागता का कुणी? त्यातही तुझ्यामुळे ट्रेन बंद होतात, ट्रैफिक होत वैताग आणतोस तू. काम कशी होणार आमची? मी हल्ली महागातले लेदरचे शूज, घड्याळ, मोबाईल वापरतोय त्यामुळे तू आलास की लगेच पळापळ करावी लागते. तुझ्यामुळे किती नुकसान होऊ शकत माहितीये का तुला? त्यात परत तू खड्डे निर्माण करतोस. आम्ही भ्रष्टाचारी म्हणुन काय झाल? तू का एवढ्या जोरात आणि एकदम येतोस. सवडीने येत जा ना.
लहान होतो तेंव्हा ठीक होत, शाळेला जाताना भिजत जायचो आणि येताना पण. आपली दोस्तीच तशी घट्ट होती. पाण्याच डबक दिसल की त्यात उडी मारायचो आपण. कागदाची नाव सोडायचो, पण आता मला कळायला लागलय, त्या पाण्याने इन्फेक्शन होऊ शकत. म्हणुन नको आता अस वागायला. आता मोठे झालोय, त्याच भान बाळग जरा.
आता गैरसमज करून घेऊ नकोस, पूर्वी आवडायचास तसाच आवडतोस अजुन. तू आल्यावर नाही का मी मस्त गरम चहा पितो, भजी खातो. घरातल्या खिड़कीतून बघत असतो तुला. आता तर फेसबुक वर स्टेटसही लिहितो, 2-4 सेल्फ़ी तुझ्यासाठी..! अजुन काय हव? उगाच भिजल्यावर सर्दी ताप येईल म्हणुन बाहेर येत नाही मी, सुट्या वाया जातात मग.
मीडिया पण भरपूर कवरेज देत तुला. तुलाही तुझ्याबद्दल माहीत नसतील तेवढ्या गोष्टी ते तुझ्याबद्दल सांगतात, ऐकत जा जरा.
आणि हे बघ इकडे जास्त लुड़बुड नको करुस.
ऋतु हिरवा-ऋतु बरवा/ हिरवे हिरवे गार गालीचे हे सगळ आधी ठीक होत. आता आम्हाला ऑफिस, शाळा, काम असतात. थोड़ा पड़त जा, जास्त नको. ते छत्री/रेनकोट विकत घ्यावे लागतात. परत डॉ. चा खर्च पण वाढतो. त्यामुळे तिकडे धरण आहेत ना बांधलेली तिथे पडत जा तू, इथे जास्त पडून काय फायदा? उगाच आम्हाला त्रास.
तिकडे पडलास तर तुझी प्रोडक्टिविटीपण वाढेल.
उगाच इमोशनल नको होऊस, प्रैक्टिकल वाग जरा.
तुझा KRA रिव्यु होतो का दरवर्षी? बहुतेक होत नसावा, नाहीतर असा वागला नसतास तू. आणि मित्र आहेस म्हणुन सांगतोय तुला, वेळेवर येत जा नाहीतर हल्ली आम्ही फार प्रगत झालो आहोत. कृत्रिम पाऊस वगैरे पडता येतो माहीत आहे ना तुला? आम्ही टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घालतो, तर तू काय?. उगाचच अडून राहु नकोस.थोड़ा मोठा हो.
आता मी बदललो वगैरे बोलायची काही गरज नाही. तूच आहे तसाच राहीलास, त्यात माझा काय दोष?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice.....

mastach lihilay, mala adhi kalalach nahi ki pavsala uddeshun boltayat te :G,

pan kharach sundar likhan