गट्टू भाग -४

Submitted by संतोष वाटपाडे on 7 June, 2015 - 11:14

" गट्टु भाग-४"
"अं अं बाss अंs ब्बाss" अशी हाक कानावर येताच माझे लक्ष गट्टुकडे गेले. मी तोवर काही अबोलीची फ़ुलं ओंजळीत जमा करत होतो. चिकुच्या झाडाच्या पलिकडे उंच जास्वंद आहे. तीन वेगवेगळ्या रंगांच्या जास्वंदांचे कलम केलेले आहेत एकाच झाडावर. लालभडक पुणेरी पगडीतून बाहेर आलेल्या झुपक्यासारख्या शेंड्या डोकावत होत्या लाल जास्वंदाच्या फ़ुलामधून. ही टपोरी टपोरी फ़ुलं दुरुनही दिसायची हलताना. एक इवलासा काळा भुंगा पिवळ्या जास्वंदाच्या फ़ुलावर आपल्याच नादात टोचा मारत होता पण गट्टुला वाटले तो तिच्याकडे येईल आता. त्यामुळे तिला आधीच घाम फ़ुटला होता...हातातली परडी खाली ठेवून पायाखालची फ़ुलझाडं तुडवत माझ्याकडे धावत आली आणि गुडघ्यांना बिलगली...

ओंजळीतली फ़ुलं कोरड्या जागेवर ठेवत मी गट्टुला उचलून घेतले. ती तर जास्वंदाकडे बघायलाही तयार नव्हती. घराकडे ओढत होती जणू मला. खांद्याला घट्ट बिलगलेल्या गट्टुला मी जास्वंदाच्या झाडाजवळ नेले. भुंगा पिवळ्या फ़ुलात शांतपणे बसला होता. फ़ुलाच्या आतला गारवा त्याला सुखावत होता म्हणूनच अगदी पंख दुमडून पाय गोळा करुन डोळे मिटून शांत बसला होता तो. गट्टुच्या केसात हात फ़िरवत मी म्हणालो " ए गट्टु हे बघ गंमत आहे इकले...बघ बघ कोण आहे"... माझ्या टी-शर्टला घट्ट पकडून भोळेपणाने तिनेही मान वळवली...समोरंच तिला अगदी जवळून जास्वंदाचं भलं मोठं फ़ुल आणि त्यात चिडीचुप बसलेला भुंगा दिसला. अगोदर थोडी दचकली होती मात्र नंतर खुदकन हसली. एखाद्या भिंतीवर चिकटवलेल्या चित्राप्रमाणे जिवंत तरीही निर्जिव भासणार्‍या त्या भुंग्याकडे बघत राहिली. माझ्या गालाला हात लावून" बाss भुऊऊ....बाssबाss भुऊऊ" असे इवल्याशा बोटाने खुणावून सांगत होती. फ़ुलाला हात न लावता आम्ही पुन्हा अबोलीकडे वळलो. कडेवरुन खाली उरतल्याबरोबर नव्या जोमाने गट्टु अबोलीची फ़ुलं तोडून परडीत टाकत होती. म्हातार्‍या आज्जीबाईसारखी एक हात गुडघ्यावर ठेवून वाकून उभी असलेली गट्टु खरोखर खुप गोड दिसत होती.परडी गच्च भरली होती. तरी गट्टु वरुन फ़ुले टाकतंच होती. शेवटी तिला सांगावे लागले"गट्टुबाळा पुरे आता...ज्याऊ या का घली.." मान हलवून मुक संमती....हसू आले मला तिच्या होकाराचे... खरंच अगदी गोडंबी माझी गट्टू!!

एका हातात परडी...दुसरा हात माझ्या हातात देऊन ती माझ्यासोबत फ़ाटकाकडे चालत आली. शेवंतीची दोनचार ताजी फ़ुलं मी तोडून परडीत खोचली. ही पांढरीशुभ्र पिवळसर छटा असलेली फ़ुलं मला खुप आवडतात...फाटक बंद करुन आम्ही घराच्या वर्‍हांड्यात आलो. आई मेथीची भाजी निवडत बसली होती. नाना खाली जमिनीवर बसून सार्थ भजनमालिका वाचत होते. आमची "मोहीम गजरा" सुरु करायला सुई आणि दोरा लागणार होता म्हणून गट्टुला आईच्या शेजारी बसवून मी देवघरातल्या ड्रॉवरमधून जाड दोरा आणि मोठी सुई घेऊन आलो. तोवर परडी खाली ओतून काही फ़ुलांशी गट्टु खेळत होती. खुप लवकर चुरगळली जातात अबोलीची फ़ुलं. मी सर्व फ़ुलं माझ्यापुढे घेऊन दोर्‍यात ओवत होतो. अर्धाअधिक गजरा बनतो न बनतो तोच लाडुबाईचे इशारे सुरु झाले. डोक्याकडे हात दाखवून ती सांगत होती मलाही गजरा हवाय. शेवटच्या टोकाला शेवंतीचे एक फ़ुल अडकवून तो छोटा गजरा मी दोरा तोडून तिच्या इवल्याशा केसात बांधला.

हट्ट पुर्ण झाल्याचे एक वेगळेच समाधान तिच्या चेहर्‍यावर दिसत झळकले. आजी-बाबांना डोक्याचा गजरा दाखवून ती माधवीकडे चालली होती. नानांनी तिच्या पायातले सॅंडल्स काढून घेतले. अगदी डुलत डुलत ती घरात गेली. माधवी आईनानांच्या खोलीत बसून कसलंसं पुस्तक वाचत होती. आईने तिला काही वेळ आराम करायला सांगितलेला होता त्यामुळे मेथीची जुडी निवडून होईपर्यंत ती निवांत होती. गट्टु अगोदर माधवीला शोधत किचनमधे गेली. स्टुलवर ठेवलेल्या खोबर्‍याचा किस मुठीत पकडून जेवढा शक्य होईल तेवढा तोंडात भरुन घेतला नंतर स्वारी पुढे सरकली. बांगड्याचा आवाज ऐकू आल्याबरोबर ती खोलीकडे वळली. "म्मा..अं अं..." तिच्या गोडुल्या भाषेत खुणावून ती डोक्यावरचा गजरा माधवीला दाखवत होती. हातातले पुस्तक बाजूला ठेवून पदर खांद्यावर घेत माधवी उठली आणि तिने गट्टुला दोन्ही हातांनी उचलून मांडीवर घेतले. गालांवर दोन्ही बाजुंनी नाजुकशी बक्षिसे मिळाली होती तिला. मिशन लाडुबाई फ़त्ते झाले!! गाल पुसले नाहीत शहाणीने... इतर कुणी गालावर पप्पी दिली कि लगेच पुसायची घाई होते गट्टुला. पण खुद्द मातोश्रींनी दिलेली पप्पी पुसली नाही तिने. माधवीचा हात सोडवून घेत ती पटकन बाहेर पळाली. माधवीच्या हाका बराच वेळ कानावर येत होत्या.

गुडघ्यावर हात ठेवत पायर्‍या उतरून गट्टु वर्‍हांड्यात आली. माझा दुसरा गजरा तोवर पुर्ण झाला होता. दोन्ही बाजुला एक एक आणि मध्यभागी एक शेवंतीचे फ़ुल असलेला गजरा खुप छान दिसत होता. गट्टुच्या हातात खेळायला काही अबोलीची फ़ुलं देऊन मी उठलो आणि घरात गेलो. वळून पाहिले तर गट्टु माझ्या मागे मागे येत नव्हती. मला एकांतात माधवीच्या वेणीवर गजरा माळायचा होता. दिवाणावर माधवी पाय हलवत पुस्तक वाचत होती. तिच्या पायातली सोनेरी साखळ्यांकडे बघत पायांचा आवाज न करता मी जवळ गेलो. दोन बोटांच्या चिमटीत गजरा पकडून खांद्यावरुन खाली गेलेल्या वेणीला गजरा बांधणार तोच मागून दुडुक दुडुक धावत आलेली गट्टु कॉटवर उडी मारुन माधवीच्या पाठीवर घोडा करुन बसली....भामटु खरंच खुप बदमाश !! गट्टुला तसेच पकडून माधवीने कुस बदलली आणि तिला पोटावर घेतले. माझ्या हातातला गजरा पाहून सुखावली ती...पाठीखाली अडकलेली वेणी माझ्याकडे देत तिने नजरेनेच मला खुणावले...मी मुकाटपणे गजरा वेणीला बांधून कॉटवर उरलेल्या जागेत माझे बस्ताण टेकवले...."माधवीईईई आज भाकरी करतेस कि पोळ्या टाकते गं.....?" आईची हाक माधवीसाठी. विजेचा झटका बसावा तशी खाडकन उठली माधवी. गट्टुला खाली ठेवून पदर सारखा करुन खोलीतून बाहेर पळाली.....स्वयंपाकाची तयारी करायची होती तिला....(क्रमशः)

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पप्पी चा किस्सा Lol
माझी भाची फक्त तिची आई, मी आणि माझा मोठा दादा म्हणजे तिचा मामा यांच्याच पप्प्या कधी पुसत नै आणि म्हणेल तेव्हा घेऊ पण देते.. बाकी तिचे पप्पा असो कि कोणीही .. गाल तर आम्ही पुसतोच पुसतो Proud

छान लिहिलय हा भाग पन Happy

gattuchi khup wat pahat aste ho mi.... plz patapata tumche sagle part taka na.... an sobt gattu ch cute pix... plz