अपराध

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

अंगणात उभे राहून
रात्रीचं आकाश नजरेत भरुन घेताना
लक्षातच येत नाही
की तळपायी चाफ्याची फुल आली आहेत
नकळत ती चेंदामेंदा होत आहेत!!!

रस्त्यावर फाटकी चादर अंथरुन
शेपू चाकवत मेथी विकणार्‍या बाईकडून
दहा रुपये कमी करुन भाज्या घेताना
काहीच कसे जाणवत नाही
की तिच्या पोराच्या शाळेची फी
हजार रुपये आहे आणि
तिच्या अंगावरचे नऊवार जीर्णशीर्ण झाले आहे!

लहान मुलांशी उंच आवाजात बोलताना
जिभेवरुन सरकन वाहून गेलेले शब्द
डोळ्यातून उतरलेला आगीचा डोंब
हळुहळु त्याच्याही नसात भिनतो
कुणी दिली ही शिकवण हे उमगलेच नाही!!!!

वर्तमान पत्रात छापून येतील
इतके मोठे नसले तरी
रोज छोटे छोटे वाटणारे
अनेक अपराध आपल्याकडून घडतच असतात!!!!!

नोटः ह्यावेळी आमच्या काव्यवाचनाला अपराध हा विषय आहे. काय लिहावे म्हणून ही एक सुचली. मन मारुन लिहिली.

- बी

विषय: 
प्रकार: 

छान बी

लहान मुलांशी उंच आवाजात बोलताना
जिभेवरुन सरकन वाहून गेलेले शब्द
डोळ्यातून उतरलेला आगीचा डोंब
हळुहळु त्याच्याही नसात भिनतो
कुणी दिली ही शिकवण हे उमगलेच नाही!!!!

हे कडवं सगळ्यात आवडलं. आपल्या नकळत पणे आपण खु काही निर्दयी पणे चुरगाळत, ओरबाडत असतो...... अपराधच तो......

छान जाणीव करुन दिलित. त्या अपराधांची भुतं आपण खुप काळ मनात ठेवत असतो.

Pages