“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

Submitted by अभय आर्वीकर on 31 May, 2015 - 01:19

“शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा!

शेतकरी नेते मा. शरद जोशींचा उदय होण्यापूर्वी म्हणजे १९८० पूर्वी शेतकर्‍यांची संघटनाच अस्तित्वात नव्हती. "कुत्र्याची शेपटी सरळ होईल पण शेतकर्‍यांची संघटना होणार नाही" असे त्या काळी म्हटले जायचे. पण शरद जोशी नावाच्या एका ज्ञानेश्वराने शेतकर्‍यांच्या पाठीवर हात ठेवला आणि चमत्कार झाला. हजारो वर्षापासूनचा मुका असलेला शेतकरी समाज ज्ञानेश्वराच्या रेड्याप्रमाणे बोलायला लागला. नुसताच बोलायला लागला नाही तर साध्या पोलिसाला भिणारा शेतकरी चक्क मूठ आवळून रस्त्यावर उतरला. सरकारशी दोन हात करायला सज्ज झाला. शेतकरी संघटनेने शेतकर्‍याला त्याच्या गरिबीचे आणि दारिद्र्याचे मूळ कारण सांगितले. शेतीत गरिबी आहे याचे कारण शेतीतला माल स्वस्तात स्वस्त भावाने लुटून नेला जातो, हेही शिकविले.

जोपर्यंत शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळत नाही तोपर्यंत शेती व्यवसायाला बरकत येऊच शकत नाही. मग तुम्ही निसर्ग शेती करा, सेंद्रिय शेती करा, कमी खर्चाची शेती करा, जास्त खर्चाची शेती करा, पारंपरिक शेती करा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा. शेती कशीही करा; जोपर्यंत शासनाचे शेतकरीविरोधी धोरण बदलत नाही तो पर्यंत शेतकर्‍याचे मरण अटळ आहे. कोरडवाहू शेती केली तर बिनपाण्याने हजामत होते आणि ओलिताची शेती केली तर पाणी लावून हजामत होते, या पलीकडे फारसा काहीही फरक पडत नाही.

शेतीमालाचा उत्पादन खर्च भरून निघेल एवढे भाव मिळायला पाहिजे, हे सर्वांनाच मान्य आहे. तसे कोणीच नाकारतही नाही पण; कृती मात्र हमखास उलटी करतात. कुणी अज्ञानापोटी करतो तर कुणी जाणूनबुजून करतो. कुणी स्वत:ला शेतीतज्ज्ञ म्हणवून घेत असले तरी शेतीच्या अर्थशास्त्राच्या बाबतीत बहुतांशी तज्ज्ञ निव्वळ अज्ञानीच असतात, असे थेट विधान केले तरी ते फारसे चुकीचे ठरणार नाही.

शिवाय या स्वनामधन्य शेतीतज्ज्ञामध्ये आपसात एकजिनसीपणा नाही. प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेला आहे. उठसूठ ज्याला जसे वाटते तसे सांगत सुटतो. कुणालाच खोलवर जाऊन विषयाचा पडताळा घ्यावासा वाटत नाही. कुणी म्हणतो निसर्गशेती करा, कुणी म्हणतो झिरो बजेट शेती करा, कुणी म्हणतो मार्केटिंग करायला शिका तर कुणी म्हणतो प्रक्रिया उद्योग उभारा. आता तर काही लोकं मानवी मूत्र वापरायचा सल्ला द्यायला लागलेत. ज्याला जसे वाटते तसेतसे बोलत राहतात. बोलायला माझी हरकत नाही. तोंड त्यांचे आहे व जीभही त्यांचीच आहे पण शेतमालाचे भाव म्हटलं तर यांची दातखिळी का बसते? हा प्रश्न शिल्लक राहतोच आणि इथेच खरी ग्यानबाची मेख आहे.

निसर्गशेती म्हणजे काय? आमचे बाप-आजे निसर्गशेतीच तर करत होते. रासायनिक खते वापरत नव्हते, कीटकनाशके फवारत नव्हते, संकरित बियाणे लावत नव्हते आणि घरी संडास नसल्याने संडासला शेतातच जात होते आणि तरीही देशाची लोकसंख्या कमी असूनही जनतेला जाऊ द्या; त्या शेतकर्‍यालाच पोटभर खायला अन्न मिळत नव्हते. धान्याच्या वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या, ओलिताची व्यवस्था निर्माण झाली, फ़वारणीसाठी किडीनुरूप कीटकनाशके निर्माण झाली आणि चमत्कार झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याचे उत्पादन वाढण्यामागे रासायनिक खतांनी मोलाची भूमिका बजावली. आजही जर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर थांबवला तर देशाचे शेतीतील उत्पादन ७० ते ८० टक्क्यांनी घटेल, अशी परिस्थिती आहे. निसर्गशेतीचा सल्ला देणार्‍यांनो, मुंह खोलनेसे पहले कुछ तो शर्म करो!

झिरो बजेटशेती हा शब्द ऐकला की मला ओकार्‍या व्हायला लागतात. झिरो बजेट शेती हा शब्द मला काही केल्या पचवून घेताच आला नाही. शून्य खर्चाची शेती करायची म्हणजे नेमके काय करायचे? शेतीला बियाणे लागले ते चोरून आणायचे का? गोड गोड बोलून खतं उधारीत आणायची मग त्याचे पैसे बुडवायचे का? खर्च शून्य करायचा म्हटलं तर शेतकर्‍यांनी वस्त्र परिधान करणे सोडून झाडाच्या वल्कली अंगाभवती गुंडाळाव्यात का? मजुरांकडून फुकटात काम करून घ्यायचे म्हटले तर मग या देशात वेठबिगारी व गुलामगिरीची पद्धत नव्याने सुरुवात करायची का? कसली आली बोडक्याची शून्य खर्चाची शेती?

अनेकदा शेतकर्‍यांनी मार्केटिंग करायला शिकावे, असा सल्ला घाऊकपणे दिला जातो. आता या उपटसुंभांना कोणी सांगावे की, कोणत्याही व्यवसायाचे उत्पादन आणि विपणन हे दोन स्वतंत्र भाग असतात. शेतीमध्ये सुद्धा जो शेती कसून उत्पादन करतो तोच शेतकरी असतो. शेती उत्पादन हा पूर्णपणे पूर्णवेळ करायचा व्यवसाय आहे. शेती करताना वेळेची इतकी बचत होत नाही की त्याने जोडीला मार्केटिंगसदृश अन्य व्यवसाय करावा. आजवर अनेकांनी असे चिक्कार प्रयोग केले आहे पण “तेलही गेले, तूपही गेले; हाती धुपाटणे आले” अशीच त्यांची गत झाली, असे इतिहासच सांगतो. याउलट जो शेती सोडून केवळ मार्केटिंगमध्ये गेला त्याने चांगल्यापैकी बस्तान बसवले, असेही इतिहासच सांगतो. जो शेतकरी नोकरी, पुढारीपणा किंवा व्यापार करायला लागतो तो अल्पावधीतच नोकरदार, पुढारी किंवा व्यापारी होतो; शेतकरी म्हणून त्याचे अस्तित्व संपुष्टात येते. सातबारा नावाने असला तर त्याला शेतमालक म्हणता येईल, शेतकरी म्हणता येत नाही. अर्थात शेतकरी फक्त तोच जो शेती कसून उत्पादनाचा विभाग हाताळतो. एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” भलेही मग सातबारा त्याच्या नावाने असो किंवा नसो. तो भूधारक असो किंवा भूमिहीन असो! आपण जेव्हा शेतकरी असा शब्द वापरतो तेव्हा शेती कसून उत्पादन करणार्‍याविषयी बोलत असतो; व्यापारी, उद्योजक, दलाल यांच्या विषयी बोलत नसतो. शेती कसणे सोडून सार्‍यांनीच व्यापार सुरू करणे अशी कल्पनाच करणे शक्य नाही. इतके साधे गृहितक आमच्या शेतीतज्ज्ञांना कळत नाही, ही अद्भूतआश्चर्याच्या तोडीची बाब आहे.

तरीही शेतकामातून अतिरिक्त वेळ मिळाला तर किरकोळ मार्केटिंग करणे, शेतकर्‍याला वावगे नाही. अनादिकाळापासून शेतकरी शक्य होईल तसे किरकोळ मार्केटिंग करतच आला आहे. पूर्वी दहा-वीस गावाच्या परिघात एका मुख्य गावी गुजरी भरायची. आठवडी बाजार भरायचा. तिथे शेतकरी आपला शेतमाल स्वत: दुकान मांडून विकायचे. ही शेतमालाची मार्केटिंगच होती ना? आपल्या जवळचा शेतमाल विकून येणार्‍या पैशात अन्य गरजेच्या वस्तू खरेदी करणे, शेतकर्‍यांच्या अंगवळणीच पडले आहे. अगदी पौराणिक काळातला जरी विचार केला तरी गौळणी मथुरेच्या बाजारी दही-दूध-लोणी विकायला घेऊन जायच्याच ना? कुठे मध्यस्थ होता? कुठे दलाल होता? मग मार्केटिंग म्हणजे यापेक्षा वेगळं काय असते? आणि तरीही बरेचशे उपटसुंभ तज्ज्ञ शेतकर्‍यांना जणू काही फार मोलाचा आणि क्रांतीकारी मूलमंत्र सांगतो आहोत, अशा थाटामाटात मार्केटिंगसारखा बोजड शब्द वापरून शेतकर्‍याला सल्ले द्यायला उतावीळ असतात.

पूर्वी गावागावात बाराबलुतेदारांचे व्यवसाय चालायचे, गावागावात तेलघाण्या होत्या. गुळाची गुर्‍हाळं होती, हातमाग होते, कवेलू बनविण्याच्या भट्ट्या होत्या, कुंभारांचा कुंभारवाडा होता. तेलबियांपासून तेल, तूर-चण्यापासून डाळ, धानापासून तांदूळ, ज्वारी-बाजरी-गव्हापासून पीठ गावातच तयार होत होते. ही तेव्हाची शेतमाल प्रक्रियाच होती ना? आता शासकीय धोरणांच्या कृपेने गावात पिठाची चक्की हा एकमेव कुटीरोद्योग उरला आहे. बाकी सारंच शहरात-महानगरात पळालं आहे. हा बदल आपोआप घडलेला नाही. याला शासनाची इंडियाला पूरक आणि भारताला मारक शेतकरीविरोधी धोरणेच जबाबदार आहेत. इस्रायली शेती, शेतकरी व त्यांचं तंत्रज्ञान या विषयी बोलणारे चिक्कार आहेत. रस्त्याने चालायला लागलं की जागोजागी ठेचा लागतात इतके मार्गदर्शक गल्लोगल्ली झाले आहेत पण; इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणाविषयी कुणीच “माईचा लाल” बोलायला तयार नाही. शेतीविषयात भरारी घेण्यात इस्रायली सरकारच्या शेतीविषयक धोरणांचा सिंहाचा वाटा आहे. तिथले शेतीधोरण शेतीला पूरक आहेत भारतासारखे मारक नाहीत, हे मात्र जाणीवपूर्वक मांजरीच्या शेणासारखे या तज्ज्ञाकरवी झाकून ठेवले जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात शहरातील औद्योगिकीकरण वाढवण्यासाठी शेतमाल स्वस्तात लुटून नेणारी धोरणे राबविली गेली त्यामुळे गावात बचत निर्माण होणे थांबले आणि खेडी भकास होत गेली. शेतमाल स्वस्तात मिळाल्याने आणि पक्का माल महाग विकण्याची मुभा मिळाल्याने शहरात-महानगरात बचत निर्माण झाली. बचत निर्माण झाली म्हणून शहरात कारखानदारी वाढली आणि शहरे फुगत गेली. जेथे बचत निर्माण होत नाही तेथे प्रक्रिया उद्योग उभे राहू शकत नाही. गाव ओसाड झाले आणि गावात प्रक्रियाउद्योग निर्माण होत नाही याचे कारण येथे दडले आहे. आमचे शेतकी तज्ज्ञ वैचारिक पातळीवर खुजे असल्याने त्यांना हे कळत नाही. त्यामुळे ते शेतकर्‍यांना दोष देत फ़िरत असतात. शासकीय योजनांचा लाभ शेतकर्‍यांना घेता येत नाही असा “वड्याचे तेल वांग्यावर काढणारा” राग आळवत बसतात. धोरणे आखताना चक्क शेतकरी विरोधी आखायची आणि वरून पुन्हा शेतकर्‍यांनी प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत असे सल्ले देत फिरायचे हा चक्क वाह्यातपणा आहे.

मी निसर्गशेती, कमी खर्चाची शेती, पारंपरिक शेती, सेंद्रीयशेती वगैरे कोणत्याही शेतीपद्धतीच्या विरोधात अजिबात नाही, याउलट शेतकर्‍यांसमोर शेती पद्धतीचे अनेक पर्याय उपलब्ध असले पाहिजे, या मताचा आहे. शेतकर्‍याला जे सोयीचे वाटेल, त्याच्या खिशाला परवडणारे असेल तसे तो स्वीकारेल. हा त्याच्या व्यवसाय स्वातंत्र्याचा भाग म्हणून मान्य केले पाहिजे. पण होते असे काही मंडळी स्वत:ला ब्रम्हदेवाचा अवतार समजून किंवा ऋषी-महाऋषी भासवून आम्ही सांगतो तसे केले तर तुझ्या शेतीत करोडो रुपयाचे उत्पन्न येईल आणि तू मालामाल होशील, अशी बतावणी करून फीच्या माध्यमातून पुन्हा शेतकर्‍यांची लूटच करून जातात. शेतकरी देशोधडीला लागतो आणि यांची दुकानदारी मात्र “दिवसा दुप्पट आणि रात्रीची तिप्पट” या वेगाने बहरत जाते. त्यालाही माझा आक्षेप नाही मात्र शेतमाल लुटीच्या व्यवस्थेबद्दल ही मंडळी तोंडामध्ये चक्क बोळे कोंबून असतात, यावर माझा आक्षेप आहे.

पगारी शेतीतज्ज्ञांचे तर बरे असते. काही वर्ष रासायनिक खतांचा वापर करा म्हणून सांगत सुटतात, त्याचाही ते पगार घेतात. मग रासायनिक खतांचा वापर टाळा म्हणून सांगत सुटतात. त्याचाही पगार घेतात. यातच त्यांच्या नोकरीचे आयुष्य निघून जाते. पण पुन्हा मरेपर्यंत पेन्शन आहेच. कर्तृत्व काय तर एकदा ’करा’ म्हणून सांगीतले आणि एकदा ’टाळा’ म्हणून सांगितले. मला असे वाटते की शेतकर्‍यांना आता सल्ले वगैरे देण्याची अजिबात गरज उरलेली नाही. शेतमालाच्या भावाचा मुद्दा बाजूला ठेवून अन्य उपचार करण्याची तर अजिबातच आवश्यकता नाही. जर तुम्हाला शेतीच्या भल्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असा आव आणायचा असेल तर निदान शेतमालाच्या भावाचा प्रश्न निकाली निघेपर्यंततरी सर्वांनी मिळून आपले लक्ष्य शेतमालाच्या भावाच्या प्रश्नावरच केंद्रित केले पाहिजे.

मी एक उदाहरण सांगतो. ४ वर्षापूर्वी माझा एक जवळचा नातेवाईक आजारी पडला होता. आजार तसा साधा होता. पण त्याला सतत ताप यायचा. ताप आला की १०५ डिग्री सेल्सियसच्याही पुढे जायचा. ताप चढला की पॅरसिटॉमालसहित कुठल्याही औषधाने उतरतच नव्हता. फक्त गार पाण्याच्या कापडीबोळ्याने अंग पुसून काढले की ताप उतरायचा पण तोही तात्पुरताच. काही मिनिटातच पुन्हा चढायचा. सर्व उपचार केलेत पण यश येत नव्हते. १५ दिवस लोटले पण काहीच सुधारणा होत नव्हती. हिंगणघाटचे डॉक्टर झाले, वर्ध्याचे शासकीय रुग्णालय झाले, सेवाग्राम इस्पितळात उपचार करून झाले पण ताप उतरायचे नावच घेईना उलट आजार आणखी गंभीर होत गेला. शेवटी पेशंट घेऊन आम्ही नागपूरला एक्स्पर्ट डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने तपासल्यानंतर आजवर केलेल्या औषधोपराची माहिती घेतली आणि म्हणाले की जितका औषधोपचार करायला तेवढा करून झाला आहे. आता मी आणखी कुठले औषध देऊ? काहीही द्यायचं बाकी राहिलेलं नाही. हे ऐकून आम्ही अक्षरश: हादरलोच. मग थोडा विचार करून डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे. आम्ही म्हणालो, काय खर्च येईल तो येऊ द्या साहेब चिंता करू नका पण उपचार कराच. त्यावर डॉक्टर म्हणाले की आता एकच मार्ग शिल्लक आहे आणि तो म्हणजे “उपचारच न करणे.” पुढील ७२ तास रुग्णाला अजिबात औषधच द्यायचे नाही. मला खात्री आहे की पेशंटवर तोच एकमेव उपचार आहे. आम्ही होकार दिला. औषधोपचार बंद केल्याने कदाचित जर काही अघटित घडले तरी आम्ही डॉक्टरला दोष देणार नाही, असेही लेखी स्वरूपात लिहून दिले.

रुग्णाला औषध देणे बंद केले आणि पाच-सहा तासातच ताप उतरायला लागला. १५ दिवसापासून न उतरलेला ताप सातव्या तासाला ताप पूर्णपणे उतरला. पुन्हा फिरून ताप आलाच नाही. रुग्ण पूर्णपणे बरा झाला तो सुद्धा औषधी देणे थांबवल्याने. शेतीचेही तर असेच होत नाही ना? गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. शेती नावाचा पेशंट एकच आहे आणि त्यावर औषधोपचार करणारे तज्ज्ञ आहेत लक्षावधी. संपूर्ण भारतवर्षात शेतीचे मुख्य दुखणे एकच आहे आणि तेही सार्वत्रिक समान आहे मात्र सुचविण्यात येणारे इलाज नाना तर्‍हेचे आहेत. जो येतो तो शेतकर्‍याला वाटेल तसा डोज पाजूनच जातो. शेतीची मुख्य बिमारी एकच; शेतमालास योग्य भाव न मिळणे. पण इलाज मात्र भलतेच चालले. कदाचित नको त्या उपचारानेच तर शेती व्यवसाय आणखी दुर्दशेकडे ढकलला जात नाही ना? याचाही प्रामुख्याने विचार करायची वेळ आली आहे.

शेतकरी हा मुळातच उत्पादक आहे. उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करणे त्याच्या रक्तामांसातच भिनले आहे. सोबत पिढोनपिढ्यांकडून चालत आलेला वारसा आहे आणि बालपणापासूनच शेती कशी करायची याचा त्याला अनुभव आहे. तरीही त्याला पावलोपावली सल्ले देण्याची आवश्यकता आहे का, हेही तपासणे आवश्यक आहे. बीटी आली तेव्हा संशोधकांचे म्हणणे असे होते की, देशभरात बीटी वाण लागवडीखाली यायला वीस-पंचेविस वर्षे लागतील. प्रत्यक्षात दोन ते तीन वर्षातच देशभर बीटीवाणाचा प्रसार झाला. त्यासाठी शासकीय पातळीवरून काहीच प्रयत्न करायची गरज पडली नाही. चांगलं असेल ते ते अंगिकारण्याची क्षमता शेतकर्‍यांना निसर्गानेच दिलेली आहे.

उत्पादन कसे घ्यावे, हे शेतकर्‍यांना सांगायची गरजच नाही. फक्त शेतमालाचे भाव ठरवणे त्याच्या हातात नाही म्हणून शेती तोट्यात जात आहे. शेतीत सुबत्ता येऊन बचत निर्माण करायची असेल तर सर्व शेतकरी हितचिंतकांनी “शेतमालास उत्पादन खर्चावर रास्त भाव” मिळण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत वारंवार शासकीय पातळीवरून जो अडथळा निर्माण करण्यात येतो त्याला थोपवून धरणे गरजेचे आहे. शेतीसाठी अनुकूल आणि पूरक धोरणे जर सरकार राबवू शकत नसेल तर शेतीमध्ये निष्कारण होणारी शासकीय लुडबुड थांबविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

                                                                                                                            - गंगाधर मुटे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दि.३१/०५/२०१५ च्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित माझा लेख

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या सर्व दुखण्यावर उपाय अमेरिका सारखं डायरेक्ट शेतीवर अवलंबून लोकसंख्या तीन चार टक्क्यांवर आणावा लागेल.
>>

हे पण खरे नाहीच. मी काही वर्षे आयोवा अमेरिकेतील या शेतीप्रधान राज्यात काढली. तिथल्या शेतकऱयांना भेटलो, त्यांचं गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची अवस्था फार वेगळी नाही. बियाणांच्या दोनच कंपन्या, माल विकत घेणाऱ्या चार. मका आणि सोयाबीन सोडल्यास दुसरं काही घेताच येत नाही ही परिस्थिती. अमेरिका आहे म्हणून राहणीमान आपल्याकडच्या शेतकर्यापेक्षा बरे इतकेच!

पण टवणे सर अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दोनशे ते तीनशे टक्के सबसिडी देत असल्याचे गॅट कराराच्या वेळेस वाचले होते. तिकडे नियोजन अत्यंत करेक्ट करतात. कुठल्या मालाला भाव मिळेल याचा अभ्यास करून सक्ती करत असतील.

America - condition is horrible. U cant really grow ur own food.. U cant have ur own seeds, u r supposed to use what those companies provide, loans and mounting expenses is story there too..
Ecological impact, human health - natural seeds - dont even talk abt it!

सबसिडी आहे. नियोजन सरकारी पातळीवर फार काही असावे असे वाटत नाही. धंदा काही कंपन्यांच्या हातात आहे. दरडोई जमीन 300/400 एकर आहे. यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर आहे. तरीदेखील सबसिडीशिवाय ते तगतील असे वाटत नाही.

आपण मध्यमवर्गीय लोक रॅट रेसमध्ये नाईलाजाने का होईना सामील आहोत. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, हॉटेल, कपडे यांवर पाहिजे तेवढा खर्च करतो. पण शेतमालाला योग्य दर मिळावा म्हणून काय करतो. एखादी वस्तू महाग होताच बोंबाबोंब चालू होते.

जो व्यक्ती रासायनिक खत,कीटक नाशक, संकरित बियाणे हे उत्पादन वाढविण्यासाठी कारणीभूत आहे हे समजतो त्याला मूर्ख व्यक्ती हा aikmev शब्द आहे

>>आणि कसलीच शेती विषयी माहिती नसणारे पण ह्या पोस्ट वर response देणारे महामूर्ख आहेत

अनेक पिढ्या शेती करूनही शेतीच्या धंद्याचे गणित न जमलेले शेतकरी सतत रडगाणी गातात म्हणून लोक सल्ले देतात. रडगाणी गायली गेली नाहीत तर अननुभवी लोक सल्लेही देणार नाहीत.

लेख उत्तम आहे, मी मध्यंतरी वाचल होता कि अमेरिकेत सुद्धा अल्पभूधारक शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे , आणि आपल्याकडे तर अश्या शेतकऱ्यांची अवस्था अजूनच वाईट आहे कारण अश्या शेतकऱ्यांचे मुळातच उत्पन्न खूप कमी असते, कर्ज हे सावकाराकडून जास्त इंटरेस्ट ने घेतलेले असते , यांत्रिक शेती परवडत नाही , पाण्याची आणि पावसाची शाश्वती नाही , मार्केट उपलब्ध असते पण तिथेही दलाल ह्यांना भाव मिळून देत नाही मग अश्या शेतकऱ्यांनी काही तरी वेगळी वाट चोखळली पाहिजे असे मला वाटते ..मला असे वाटते कि ३ पर्याय असू शकतात
१) को-ऑपरेटिव्ह शेती - म्हंजे गावातल्या सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करणे ज्या प्रमाणे हिवरेबाजार येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करताना आपले उत्पन्न वाढवले
२) कमर्सियल फार्मिंग - म्हणजे गावातल्या सर्व शेतकऱ्याची एकत्र येउन एखाद्या कंपनी शी कॉन्ट्रॅक्ट करून शेती करणे , ह्या मध्ये शेतकरी हा एखाद्या पगारदार व्यक्ती प्रमाणे काम करणार , कारण कंपनी पैसे, खत, अवजारे , काढणी आणि विक्री बघेल , आणि शेतकऱ्याला त्याचा शेत हे कंपनी ला भाडे तत्वावर देऊ करणार , ह्या मध्ये जो काही लॉस होईल तो कंपनी चा असेल जी शक्यता कमी आहे पण शेतकऱ्याला निदान वार्षिक उत्पनाची हमी मिळेल अश्या उत्पनाचा आधार घेऊन जोडधंदे विकसित करू शकतील,
३) कम्युनिटी फार्मिंग - ह्या मध्ये शेती साठी लागणारी सगळ्या गोष्टी ह्या एकत्रित घेऊन वापरने, एकत्रित शेती करणे आणि एकत्रित ती जाऊन विकणे आणि आलेला नफा तोटा वाटून घेणे , उत्पनाच्या हमी साठी शहरातल्या काही दुकानदारांशी कॉट्रॅक्ट करून त्यांना मालपुरवठा करणे हे साधारण भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना शक्य आहे . आणि मी हे आमच्या सोसायटी मधल्या एका दुकानदाराने केलेले बघितले आहे .
मी कुठलाही शेती तज्ञ नाही आहे , पण एक आवड म्हणून मी हा विषय थोडा अभ्यास केला आहे , त्यामुळे मला वरील ऑपशन्स वर प्रतिक्रिया आवडेल , मला माहित आहे कि प्रत्येक गोष्टी मध्ये फायदा तोटा असतो पण उत्पन्नाची हमी हे खूप मोठी गोष्ट आहे , नुसता बाजारभाव मिळाला हे जर अल्पभाधारक शेतकऱ्यांना पुरेसे असते तर अमेरिकेतल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नसती असे वाटते .
https://www.theguardian.com/us-news/2017/dec/06/why-are-americas-farmers...
माझ्या एका मित्राने अगदी कोरडवाहू शेती कशी डेव्हलप केली हे मी बघितले आहे , त्यासाठी त्याचा स्वतःचं इनकम सपोर्ट होता , त्याने पूर्ण अभ्यासपूर्वक शेती केली आहे , शाश्वत ऍग्रो हा ब्रँड विकसीत केला आहे .
http://www.shashwatagro.com/
पण मुळातच हा एक बिझनेस आहे त्याकडे त्या हिशेबाने बघितले पाहिजे असे मला वाटते . आणि त्यासाठी एक मेका साह्य करू हीच भूमिका महत्वाची ठरेल असे वाटते .

आपण साधं ऐक उदाहरण डोळ्या समोर घेतले तरी लक्षात येईल आधुनिक बियाणे , किटकनाशक , आणी रासायनिक खतं हे नुकसान च करतात . कीटक नाशक उपयोगी जिवाणू सुध्दा मारतात .जमिनीचा कस कमी होतो .पिकांचा दर्जा खूप खाली येतो .बियाणे परत परत वापरता येत नाही प्रतेक वर्षी नवीन घ्यावे लागते .ऐक उदाहरण घेवू आंब्याच झाड जे प्रचंड मोठ होते आणी ऐक झाड 5000 ते 10000 पर्यंत फळे देत होते आणी आयुष्य 100 वर्षा पेक्षा जास्त होते तेच कलमी झाडाचे आयुष 20 वर्ष पण नसते आणी फळांची संख्या 1000 parantch aste आणी कलमी झाडे rogala लगेच बळी पडतात

या सर्व दुखण्यावर उपाय अमेरिका सारखं डायरेक्ट शेतीवर अवलंबून लोकसंख्या तीन चार टक्क्यांवर आणावा लागेल. पण मग या महान देशाची कृषि संस्कृती शिल्लक राहणार नाही..अमेरिका आणी भारत ह्यांची बरोबरी कारणे चुकीच आहे अमेरिका भारता पेक्षा 7 पट मोठा देश आहे आणी लोकसंख्या खूप कमी आहे शेतकऱ्याला 400 / 500 aikar पर्यंत जमिनी असतात .आणी असे पण ग्रामीण अमेरिका कशी आहे हे गूगल बाबा पण सांगणार नाही .फूट path वरती पण आक्रमण करणाऱ्या लोकानी शेतकऱ्याला जमिनी वरचा हक्क सोडायला सांगणें ह्यल फक्त लबाडी म्हणता येईल

धागा वर काढल्याबद्दल आभार हेला.

लेख आवडला. चर्चा वाचतेय.

> एका वाक्यात असेही म्हणता येईल की “ज्याची उपजीविका फक्त आणि फक्त शेती उत्पादनावर अवलंबून असते, तोच खराखुरा शेतकरी” > माबोवर आहे का कोणी शेतकरी?

शेतकरी आहोत पण जोडधंदा म्हणून नोकरी करीत आहे. शेती असणे हे ग्रामीण भागात इगो शी जोडलेले असते. एकर दोन एकर शेती असणाऱ्या लोकांना फार पत नसते गावात.
त्याला मजूर, बैल ट्रॅक्टर लवकर उपलब्ध होत नाही.

वर कलमांविषयी काही विधाने आहेत. माझे मत असे की कलम करण्याने फळांफुलांची गुणवत्ता सुधारते. उत्पादनही वाढते. कलम करणे म्हणजे रासायनिक शेती नव्हे. कलम करणे म्हणजे जीनपूल वाढवणे. अशा भिन्न संयोगामुळे पुढची सुगी जोमदार निपजते वगैरे .

कलम करणे म्हणजे जीनपूल वाढवणे. अशा भिन्न संयोगामुळे पुढची सुगी जोमदार निपजते वगैरे . >> माझ्या माहितीत तरी कलम करणे म्हणजे क्लोनिंग आहे एक प्रकारचे. डिसीझ रेझिस्टंट, लवकर फळे देणार्‍या जातींची झाडे रुट स्टॉकवर कलम केली जातात. यू आर क्लोनिंग द
सिलेक्टेड प्लांट. यात ग्राफ्ट केलेला भाग हा ट्रू टू पेरेंट असतो. असे ग्राफ्ट करण्याकरता काही प्रजाती मुद्दाम कल्टिव्हेट केलेल्या असतात. कलम करण्याच्या प्रोसेसमधे जेनेटिक मटेरियल एक्सचेंज होत नाही.

कमी शेती मह्णजे कमी फायदा, जास्त शेती म्हनजे जास्त फायदा हे ग्रुहितक चुकीचे आहे. कित्येक वेला फक्त ६ ७ एकर शेतीमध्य जास्त फादा मिल्वणारे अनेक शेतकरी आहेत, आणि जास्त शेती असुन देखील तोट्यात जाणारे खुप जण आहेत.
पिक कुठले आहे,पाणी आहे का माल कुठल्या बाजारपेठे मधे जातोय यावर नफा की तोटा हे ठरते. सतत व्यपार्‍यांना नावे ठेवणे हेही चुकीचे आहे.
कित्येक व्यावारी शेतकर्‍यांच्या बागा ( जमीन नाही)कितीतरी लाखात विकत घेउन माल निर्यात करुन देतात. कुथलीही कटकट न करता पैसे देतात.
सर्कारी धोरणांउळे भाव पडतात हे खरे असले तरी प्रत्येक शेतकरी दर वेळेस तोट्यातच असतो हा प्रचार चुकीचा आहे.
सरकारी धोरणे सुधारणांना वाव आहे. आयत निर्यात विष्यक मंत्री आणि शेती संब्धित मंत्री याम्च्यात ताळमेळ असेल तर गोष्टी सोप्या होतात.
बर्‍याचदा commodity market big ticket traders fixing करुन भाव पाडतात. त्यांना आवरणारे सर्कार पाहिजे.

कलम करणे -
खुंट खालचा भाग, रानटी असतो. Root stalk/ stock मुळे लांबवर जातात, रोग प्रतिकारक शक्ती जास्त असते.
Scian कलमकाडी ही खुंटावर बसवली जाते. जास्त उत्पन्न देणाऱ्या रसदार चवदार झाडाची असते.
उदाहरण--- चिकूचे कलम खिरणीवर केले जाते.
लिंबाचे रंगपूर लाईमवर करतात.
आंब्याचे रायवळ खुंटावर करतात.
अशी कलमे केल्याने कलमकाडी ला जास्त अन्नद्रव्ये, पाणी उपलब्ध होतात. उत्पादन लवकर व जास्त प्रमाणात मिळते.

शेती नसणारांनी शेती करून सल्ले द्यावेत.>>> सल्ले देनार प्रत्येक व्यक्ती शेती नसनाराच असतो हे कुथले ग्रुहितक?

प्रगत देशात वापरून फेकून दिलेली वाहने भारतात इम्पोर्ट करता येत नाहीत कारण ती खूप स्वस्त असतील त्या मुळे भारतात वाहन उद्योग dubel .प्रत्येक उद्योगाला सरकार संरक्षण देत आहे फक्त शेतकऱ्यांनी स्पर्धा करावी ही इच्या .
भरमसाठ शेतमाल आयात करून शेतकरी नडला जात आहे कारण एकाच जमिनी हडपने

मेधा , चूक दाखवून दिल्याबद्दल आभार . कलमांमध्ये जीन्सची सरमिसळ होत नाही. आणि मला वाटते ते क्लोनिंगही नव्हे.
पण Rajesh188 यांच्या 01-04-19(1-46)या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे तोटे फारसे होत नाहीत. कलम करण्याचे तंत्र आधुनिक नाही आणि रासायनिकही नाही. आयत्या मजबूत रूट्सिस्टिमचा फायदा मिळाल्यामुळे कमी कालावधीत फल/पुष्पधारणा होते.

शेतीवर अवलंबून असलेले शेतकऱ्या च प्रमाण कमी करायचे म्हणजे नक्की काय करायचे
सरकारी नोकऱ्या आणि pvt firm मधील उच्य नोकऱ्या सोडल्या तर कामगारांचं शोषण चालू आहे पगार 10 पेक्षा कमी आहे

जो नेता अमेरिका चे उदाहरण देतो त्यला chaplin मारला पहिजे .
कांदा महाग झाला कर आयत , साखर , डाळ महाग झाली कर आयत शेतकरी बुडला तरी चालेल .
माज्या कडे अफाट पैसा आहे आणी मी ठरवल मुम्बई पुणे exp way वरून दूसरा हाइवे मी काढतो आणी toll मध्ये स्पर्धा निर्माण करतो देईल का sarkar परवानगी नाही देणार कारण पहिले ज्यानी भांडवल गुंतवले आहे त्यला नफा होण्याची हमी सरकारनी दिली आहे मग शेतकऱ्याला नफा होण्या ची हमी का नाही

मला वाटते झाडाच्या फांद्या छाटून अथवा गुलाबाप्रमाणे पेरावर तासून मुळे वाढवून जमिनीत रुजवल्या तर ते एकाच झाडापासून प्रॉपगेशन होते. पण खुंटी किंवा डोळा भरणे यात दुसऱ्या झाडाची मदत घेतली जाते. हे थोडेसे सरोगसीसारखे किंवा फलित बीजांड भाड्याच्या गर्भाशयात वाढवण्यासारखे झाले. मला वाटते हे क्लोनिंग नव्हे.

तसे नाही हे दत्तक दिल्यासारखे आहे. सयाजीराव गायकवाड राजघराण्यात दत्तक गेले तर त्यांनी राज्य नावारूपाला आणले. सेम उदाहरण शाहू महाराज.

1980 च्या दरम्यान मी गावी होतो आणी बालपण गवीच गेले आहे .
त्या वेळी शेती ही पूर्ण पावसावर अव्लम्बुन होती सिंचनाच् सोयी कमी होत्या .vihri च्या पाण्यावर लोक अवलम्बूण असायची .
तेव्हा मुळ पीक ही ज्वारी , बाजरी , भुईमूग , kardai , तूर , तीळ , मूग , उडीद , चवळी हीच असायची .
प्रतेक शेतकऱ्या कडे गाई , म्हैस , बैल , शेळी ही जनावरे असायची .
शेतीची सर्व कामे ही बैलाचा वापर करून केली जायची .
ह्या सर्व पाळीव प्राण्याचे शेण हे खत म्हणून वापरले जायचे may मध्ये बैल गाडीने शेतात शेणखत टकले जायचे आणी ते मातीत मिसळले जायचे .
रासायनिक खते आणी कीटक नाशक खूप कमी प्रमाणत वापरली जात .
तेव्हा ज्या पिकांच्या जाती होत्या त्या आता जवळ जवळ नष्ट झाल्या आहेत .आणी त्या जाती अत्यंत कसदार आणी rogala कमी बळी पडायच्या उत्पादन पन चांगल्या द्यायचा .फक्त pavus लांबला तरच पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असायची .
नंतर हायब्रिड बियाणे मार्केट मध्ये आले आणी सरकारांनी जाहिरात पण खूप केली सुरवातीला उत्पादन वाढली पण दर्जा घसरला ..
त्या कालची भेंडी gavari आणी सर्वच भाज्या आणी कड धान्ये अप्रतिम चवीची होती .
हायब्रिड बियाणे परत वापरता येत नाही ते प्रतेक वर्षी नवीन ghave लागते नाहीतर पिकांचे उत्पादन घटत हे समजे पर्यंत सर paramparik बियाण्या च्या जाती नष्ट झाल्या होत्या आणी शेतकरी पूर्ण पणे बियाणे उत्पादन करणाऱ्या kampanicha गुलाम बनला .
मधुमेह झालेला रोगी जसा औषधे उत्पादन करणाऱ्या कम्पनी चा लाइफ टाइम गिऱ्हाईक बनतो तसा भारतीय शेतकरी बियाणे उत्पादन करणाऱ्या कम्पनी चा लाइफ टाइम गिऱ्हाईक बनला .कम्पनी ठरवेल त्याच किमतीत बियाणे खरेदी करण्या शिवाय दूसरा पर्याय पूर्ण बंद झाला .

जी पहिली पाळीव जनावरे होती ती दूध कमी द्यायची पण अत्यंत काटक होती .डोंगरात , माळरान मध्ये फिरून पोट भरणारी आणी उन्ह , pavus ह्या क्रूतूत सुध्दा निरोगी असायची .संकरित गायी आल्या ह्या दूध जास्त देत पण शरीराने अत्यंत नाजूक ऊन वारा पावसा मधे तग ना धरणाऱ्या .
गोट्या त जागेवर वैरण हव्या असणाऱ्या आणी rogala सुधा बळी पडणाऱ्या आहेत त्यामूळे त्यांच्या वर डाक्टर चा खर्च भरमसाठ येतो आणी दुधा चा दर्जा सुधा अत्यंत कमी .
हायब्रिड बियाण्या बरोबर रासायनिक खते सुध्दा आली आणी शेतकरी उत्पादन वाढते म्हणून ते वापरायला लागले शेणखत कमी वापरले जावू लागले आणी जे घडायला नको होते तेच घडले जमिनीचा कस कमी झाला .पिकांना उपयुक्त असणारे माती मधील जिवाणू सुधा मारले जावू लागले .
रासायनिक खत वापरले तरच उत्पादन ह्या चक्रात परत शेतकरी अडकला .
भाजी palyat , कड धान्ये मधे रासायनिक अंश येवून मानवी शरीर वर विपरीत परिणाम होत आहे .
आणी पूर्ण देश जो स्वलम्बी होता तो कायमचा रासायनिक खते , आणी हायब्रिड बियाणी निर्माण करणाऱ्या कम्पनी चा गिऱ्हाईक झाला

Pages