मायबोली वर प्रकाशित होणार्‍या लेख व प्रतिसादांची लांबी किती असावी?

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 30 May, 2015 - 01:02

मायबोलीवर कुणी किती लांबीचा लेख अथवा प्रतिसाद प्रकाशित करावा असा काही नियम आहे का? प्रत्येकच बाबीत मर्यादा ही असावी लागते. भ्रमणध्वनी (मोबाईल) वापरून केल्या जाणार्‍या लघु संदेशात (स्मॉल मेसेज) ही मर्यादा १६० अक्षरांची असते. साधारण एवढीच मर्यादा ट्विटरसारख्या संकेतस्थळावर एका वेळी व्यक्त होण्याकरिता मिळते.

वर्तमानपत्रासारख्या माध्यमांत मुद्रणखर्चामुळे पानांच्या संख्येवर मर्यादा येतात. त्यामुळे साहजिकच त्यात प्रकाशित होणार्‍या लेखांकरिताही शब्दमर्यादा बंधनकारक असते. डिसेंबर २००४ मध्ये लोकसत्ताने "नव्या सरकारकडून अपेक्षा" या विषयावर वाचकांकरिता स्पर्धा आयोजित केली होती. शब्दमर्यादा ३०० शब्द होती. मी उत्स्फुर्तपणे एका बैठकीतच लेख टंकला आणि शेवटी पाहिले तर माझा लेख १००० शब्दांहून थोडासा अधिक मोठा होता. माझा लेख बाद होऊ नये म्हणून तो लोकसत्तासोबतच तत्कालीन माननीय मुख्यमंत्री कै. श्री. विलासराव देशमुख यांच्या कार्यालयात देखील पाठविला. लेख विहीत मर्यादेपेक्षा लांब असुनही स्पर्धेकरिता निवडला गेला व मी त्यात विजेता ठरून त्याच्या पारितोषिकादाखल मला मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा" निवासस्थानी त्यांच्यासोबत एक तास चर्चेची संधीदेखील मिळाली.

कथा लिहीत असताना अशी काही मर्यादा नसावी. लघुकथा, शतशब्दकथा असे प्रकार असले तरीही दीर्घकथा, प्रदीर्घकथा असेही प्रकार असतातच. त्याशिवाय फारच मोठे कथानक असेल तर त्याची कादंबरी देखील होऊ शकते. मायबोलीवरही अशा दीर्घकथा, कादंबर्‍या प्रकाशित झाल्या आहेत. काही तर क्रमशः रूपाने २० अथवा अधिक भागातही प्रकाशित झाल्या आहेत.

कवितेत मात्र चारोळी सारखे प्रकार असले तरी कविता फार मोठी नसावी असा हल्लीचा प्रघात दिसतो. हल्लीचा अशाकरिता म्हंटले कारण रामायण व महाभारत ही महाकाव्ये आहेत. म्हणजे एकप्रकारे कविताच. त्यांची लांबी तर प्रचंड मोठी आहे. परंतु आता मात्र इतकी मोठी कविता कुणी करणे संभवत नाही.

उरला प्रश्न लेखांचा. त्यांच्या लांबीविषयी लोकांच्या काय अपेक्षा आहेत? संकेतस्थळाच्या काही तांत्रिक मर्यादा आहेत काय? असल्यास त्यांचा उल्लेख कुठे केला गेला आहे काय?

तसे काही नसल्यास मोठा लेख लिहील्यास त्यावर आक्षेप घेणार्‍या प्रतिक्रिया मान्यवर सदस्यांकडून दिल्या जातात त्या का?

long reply.jpglong reply 2.jpg

त्याचबरोबर लेखावरील प्रतिक्रिया देखील मोठी आहे असे आक्षेपही अनेकदा घेतले जातात.

long comment.jpg

अपवादानेच एखादा सदस्य मोठ्या प्रतिक्रियेचे स्वागत करतो.

मोठे लेख मायबोलीवर प्रकाशित केल्यास संकेतस्थळाला काही तांत्रिक अडचणी (जसे की सर्वरवर ताण इत्यादी) उद्भवतात का? तसे असेल तर लेख गुगल मॅप्स अथवा ब्लॉग अशा ठिकाणी प्रकाशित करून त्याची लिंक इथे दिल्यास चालते का? एकीकडे मोठे लेख व प्रतिक्रिया यांच्यावर आक्षेप घेणारी मंडळी लेख कमी लांबीचा असेल तरी एकोळी, दोनोळी धागे, अपुरा लेख, त्रोटक लेख असे आक्षेप घेणार्‍या प्रतिक्रिया नोंदवितात. त्याचप्रमाणे इथे केवळ लिंक दिली तर प्रशासन देखील त्यावर हरकत घेते असा अनुभव आहे.

हा प्रश्न आताच पडण्याचे कारण असे की, नुकताच मी ६,८५७ (अक्षरी सहा हजार आठशे सत्तावन्न) शब्दांचा लेख लिहिला आहे. सध्या हा लेख तपासणी अवस्थेत असून त्यामुळे अप्रकाशित आहे. दोन दिवसांत तो तपासला जाऊन, योग्य त्या ठिकाणी दुरुस्ती होऊन प्रकाशित करण्यालायक होईल. तेव्हा हा लेख मायबोली संकेतस्थळावर प्रकाशित करावा का? प्रशासनाचे धोरण व वाचकांच्या हरकती विचारात घेऊन त्यानुसार पुढील पाऊल उचलले जाईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की नेटवर प्रकाशित होणारे लेख लहान ते मध्यम लांबीचे असावेत अथवा मोठे असल्यास एकापेक्षा अधिक भागात असावेत कारण तिथे वाचणारा अ‍ॅवरेज वाचक घाईत असतो.

इथल्या सदस्यांच्या लांबीबाबतच्या मताबद्दल नो कॉमेन्ट्स.

तथापि, आपल्या लेखाच्या शब्दसंख्येकडे पाहून मला तरी अंदाज येत नाही की किती मोठा असावा. आपल्या हिशेबाने मोठा असल्यास त्याचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक भाग करता येतील. इथला ट्रेन्ड लक्षात घेतला तर क्रमशः प्रकाशित केल्यास लोकांची क्युरिओसिटी मेनटेन करण्यास त्याची मदत होऊ शकेल.

अन्नं वै प्राणा: मालिकेतील लेखांची लांबी किती आहे?
तुम्ही फारच विचार करता.एखादा लेख इतका मोठा लिहिल्यावरच विषयाला न्याय देऊ शकेल असे वाटून तो तुम्ही लिहिला असेल आणि त्याचे तुकडे पाडल्याने न्यून येईल असे वाटल्यास अवश्य प्रकाशित करावा.लॅांग डिस्टन्स रनर कोणी होऊ नये असं काही नाही.अप्पासाहेब बेलवलकराचे नटसम्राटातले स्वगत ऐकण्याची तयारी असणारे बरेच आहेत.

साधा सरळ फंडा आहे,
लेख वाचकाने कंटाळून सोडू नये ईतपत असावा आणि प्रतिसाद कमीत कमी शब्दात मुद्दा स्पष्ट करणारा असावा.

त्यामुळे लेख असो वा प्रतिसाद, प्रकाशित करण्याआधी जसे आपण शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करतो तसेच लांबीचेही संपादन करावे.

लेख किती इंटरेस्टींग आहे यावर अवलंबून आहे.
वरती एस आर डी यांनी 'अन्न वै प्राण:' बद्दल लिहिलंय.
त्या मालिकेतला कुठलाही लेख कितीही मोठा असला तरी एकदा वाचायला सुरूवात केल्यानंतर माझ्यासहित कित्येक वाचकांना पूर्ण झाल्याशिवाय थांबविता आला नाही. Wink

पण काही जण लहानसाच लेख अतिप्रचंड कंटाळवाणा लिहू शकतात.
तेव्हा आपण ज्या संस्थळावर लिहिणार असू तिथल्या वाचकांच्या मनाचा अंदाज घेऊन लेखाची लांबी ठरविल्यास उत्तम.

थोडा ग्राम्य विनोद आहे, पण तरी लिहितोच.. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डेफिनेशन असा प्रश्न आमच्या प्रा, मोहन गुरुस्वामी ( आम्हाला ते इंडस्ट्रीयल सायकॉलॉजी शिकवत असत ) यांना विचारल्यावर त्यांचे उत्तर असे होते.

लाईक अ स्कर्ट ऑफ अ गर्ल.. लाँग इनफ टू कव्हर ऑल व्हायटल पॉइंट्स अँड शॉर्ट इनफ टू रेझ क्यूरिओसिटी...

थोडक्यात सांगायचे तर तांत्रिकदृष्ट्या अडचण नाही.रस्ता मोठा रुंद आहे मोठी गाडी आणू शकता.डबलडेकर बस मला फार आवडते ,आत घर असलेली व्हॅनसुद्धा.

प्रतिसादकांचे आभार.

@ मनमौजी

<< आपल्या हिशेबाने मोठा असल्यास त्याचे दोन अथवा त्यापेक्षा अधिक भाग करता येतील. इथला ट्रेन्ड लक्षात घेतला तर क्रमशः प्रकाशित केल्यास लोकांची क्युरिओसिटी मेनटेन करण्यास त्याची मदत होऊ शकेल. >>

हा लेख (व माझे इतरही काही लेख) उडी मारून एखादी वैचारिक दरी ओलांडण्यासारखा आहे (वैयक्तिक मत) त्यामुळे पाव, अर्धा, पाऊण अशा टप्प्यांत ज्या प्रमाणे उडी मारून दरी ओलांडता येत नाही त्याचप्रमाणे हा लेख अंशतः / टप्प्याटप्प्याने वाचल्यास अपेक्षित परिणाम साधता येणार नाही.

@Srd

<< तुम्ही फारच विचार करता.एखादा लेख इतका मोठा लिहिल्यावरच विषयाला न्याय देऊ शकेल असे वाटून तो तुम्ही लिहिला असेल आणि त्याचे तुकडे पाडल्याने न्यून येईल असे वाटल्यास अवश्य प्रकाशित करावा. >>

हा विचार महत्त्वाचा आणि सकारात्मक पाठिंबा देणारा वाटला.

<< थोडक्यात सांगायचे तर तांत्रिकदृष्ट्या अडचण नाही.रस्ता मोठा रुंद आहे मोठी गाडी आणू शकता.डबलडेकर बस मला फार आवडते ,आत घर असलेली व्हॅनसुद्धा. >>

तांत्रिकदृष्ट्या अडचण नसेल तर मायबोलीची बॅन्डविड्थ खाल्ली अशी तक्रार अनेक वाचकांकडून होते ती का?

@ ऋन्मेऽऽष

<< लेख वाचकाने कंटाळून सोडू नये ईतपत असावा आणि प्रतिसाद कमीत कमी शब्दात मुद्दा स्पष्ट करणारा असावा. >>

प्रत्येक वाचकाची वैचारिक पातळी एकसारखी नसल्याने काहींना जे एका वाक्यात समजते ते इतरांना समजण्याकरिता दहा वाक्ये लिहावी लागतात. त्यामुळे अर्थातच चाणाक्ष वाचकांना लेखाची लांबी अनावश्यक जास्त वाटते.

@ साती

<< काही जण लहानसाच लेख अतिप्रचंड कंटाळवाणा लिहू शकतात. >>
होय असा अनुभव आहे आणि वाचकांचे त्यावरील ताशेरेही वाचलेत.

<<तेव्हा आपण ज्या संस्थळावर लिहिणार असू तिथल्या वाचकांच्या मनाचा अंदाज घेऊन लेखाची लांबी ठरविल्यास उत्तम. >>
इथे मायबोलीवरच प्रकाशित करायचा आहे. वाचकांच्या वैचारिक पातळीची रेंज मोठी आहे.

@ दिनेश.

<< लाईक अ स्कर्ट ऑफ अ गर्ल.. लाँग इनफ टू कव्हर ऑल व्हायटल पॉइंट्स अँड शॉर्ट इनफ टू रेझ क्यूरिओसिटी... >>

तर मग माझा लेख कमालीचा सोज्वळ असावा. सार्‍याच बाबी कव्हर करायला मी धडपडत असतो. त्यामुळेच बहुदा वाचकांची उत्सुकता संपत असावी.

प्रत्येक वाचकाची वैचारिक पातळी एकसारखी नसल्याने काहींना जे एका वाक्यात समजते ते इतरांना समजण्याकरिता दहा वाक्ये लिहावी लागतात. त्यामुळे अर्थातच चाणाक्ष वाचकांना लेखाची लांबी अनावश्यक जास्त वाटते.

>>>>>

तरीही लेख छोटाच लिहायचा...

आणि ती जास्तीची वाक्ये प्रतिसादांत वा लेखाच्या शेवटी स्पष्टीकरणात ज्यांना समजले नाही त्यांच्यासाठी लिहायची. चाणाक्ष लोकांचा ज्यादा वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही.

चेतन सुभाष गुगळे,

>> हा लेख (व माझे इतरही काही लेख) उडी मारून एखादी वैचारिक दरी ओलांडण्यासारखा आहे (वैयक्तिक मत)
>> त्यामुळे पाव, अर्धा, पाऊण अशा टप्प्यांत ज्या प्रमाणे उडी मारून दरी ओलांडता येत नाही त्याचप्रमाणे हा लेख
>> अंशतः / टप्प्याटप्प्याने वाचल्यास अपेक्षित परिणाम साधता येणार नाही.

वैचारिक लेख असल्यास एक गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे तुम्ही दरीवर पूल बंधू शकता. Happy

मला म्हणायचंय की मध्येमध्ये स्तंभ बांधावे लागतील. ते बांधायचे दोन निकष आहेत :

१. दोन वा अधिक संकल्पना/विचारधारा/मतप्रवाह यांच्या मध्ये तेढ (conflict) उत्पन्न होणे.

२. लेख सुरू झाल्यापासून आत्तापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेणे (summing up the discussion).

हे दोन प्रकारचे स्तंभ उभारून लांबलचक लेख छोट्या तुकड्यांत विभागता येईल. तुम्हाला हवे असल्यास दोनहून जास्त प्रकारचे स्तंभ उभारता येऊ शकतात (उदा. : वस्तुस्थितीशी निगडीत मार्मिक टिपणी). या तुकड्यांचे स्वतंत्र उपलेख करायचे की मूळ लेख सलग ठेवायचा हा निर्णय तुमच्यावर सोडतो. असे तुकडे पाडण्यामागे वाचकांना आकलनास सुलभ जावे हा हेतू आहे.

आ.न.,
-गा.पै.

लेख किती मोठा असावा? निदान वाचताना कंटाळा येऊ नये एव्हढा तरी मोठा नसावा.
प्रतिसादांचे असे आहे की, मूळ विषय कुठलाहि असला तरी त्याला फाटे फोडून त्यात काँग्रेस वि. भाजप, गांधी वि. सावरकर असले विषय आणून मग त्याच्यावर प्रतिसाद, नि त्याच्यावर प्रतिसाद असे करता करता मूळ विषय रहातो बाजूला, नि धागा उगीचच लांबत रहातो.
तर त्याला काय करणार?

गामा पैलवान,
आपला प्रतिसाद नवा विचार मांडणारा आहे. धन्यवाद.

झक्की,
<< मूळ विषय कुठलाहि असला तरी त्याला फाटे फोडून त्यात काँग्रेस वि. भाजप, गांधी वि. सावरकर असले विषय आणून मग त्याच्यावर प्रतिसाद, नि त्याच्यावर प्रतिसाद असे करता करता मूळ विषय रहातो बाजूला, नि धागा उगीचच लांबत रहातो. >>

हे माझ्या लेखांवर सहसा होत नाही. यापुढेही होणार नाही याची काळजी घेईन.

आमच्यावेळी अस नव्हत, हो ना हो झक्की?
माझ्या हातहातभर लाम्बीचे प्रतिसादही लोक वाचायचे, नै वाचले तर "उडी मारुन" पुढे गेलोय हे तरी नक्की सांगायचेच.
शेवटी काये? श्रद्धांजलीच्या सभेत सनई वाजवू नये, अन शुभकार्यात विव्हळू नये हेच खरे. या न्यायाने जमलेली वाचकगर्दी त्या त्या दिवशी काय मूड मधे आहे त्यावरही तुमच्या लेख/प्रतिसादांचे स्वागत कसे होईल हे ठरते.
माझ्या मते, आपण लिहीत रहावे, चांगले उपयुक्त लिहावे, वाचायचे असेल ते वाचतील, नै ते वाचणार नाहीत, काही चिकित्सक उगाचच लेखातील मजकुरा ऐवजी त्याची "स्टॅटिस्टीकल" अन इंचाफुटात लांबीरुंदीची मोजमापे घेत बसतील. त्याला इलाज नाही.
सौ सुनारकी ठोकत बसायचे, की एक(च) लोहाराची हाणायची हे ज्याच्या त्याच्या लेखनकौशल्यावर अवलंबुन आहे.
आता काहींन्ना शंभर चापट्यांऐवजी एकच कानफटीत खाऊन सुधारणे आवडते, तर ते चापट्यांनी वैतागतील, तर काही नाजुकांना एकच खणखणीत कानफटात खाण्या ऐवजी शंभर हलक्या चापट्या आवडतील... शब्दांचेही असेच आहे.... !
तुम्ही नका जास्त विचार करू यावर.
तुमच्या लिखाणाने किती आयड्यांच्या डोक्यावर ताण येतो यापेक्षाही जास्त लिखाणाने जर सर्व्हरवर ताण येत असेल, तर अ‍ॅडमिन स्वतःच तुम्हांस सूचना देतिल की लांबी कमी करा.
(ही माझी मते आहेत).

अपवादानेच एखादा सदस्य मोठ्या प्रतिक्रियेचे स्वागत करतो. >>>>>

@चेसुगु : हा एकमेव सदस्य बाळ रुंमेश आहे, ह्या वरुन तुम्ही काय ते ठरवा.
'बी' , 'ऋन्मेश' आणि तुम्ही माबोवर सॉलिड हीट आहात हे मात्र खरे.

@ limbutimbu,

धन्यवाद.

आपणा सर्वांच्या प्रतिसादानंतर सारासार विचार करून सदर प्रदीर्घ लेख लवकरच प्रकाशित करीत आहे.

लोक काय प्रतिसाद देतात यावरुन लांबी ठरऊ नका.ज्यांना आवडेल ते वाचतिल नाही तर सोडुन देतिल.

माला पर्यटन विषयी वाचायला आवडते मी ते न कंटाळता कितिही वाचू शकते.पण क्रिकेट्,चित्रपट या विषया कंटाळा येतो.