गट्टु भाग १

Submitted by संतोष वाटपाडे on 26 May, 2015 - 02:44

"गट्टु "
हातातली कपड्याची बाहुली फ़ेकून ती दुडुदुडु पुढे पळाली....मला भिती वाटत होती तिच्या नाजुकशा पायात खडे तर टोचणार नाहीत !! गोबर्‍या गालात हसू मावत नव्हते ...तांबूस भुरकट केस वार्‍याच्या झुळकीवर उडून कपाळावर आलेले पाहून ऊर भरुन आला होता....तीन वर्षाची झाली होती माझी गट्टू... काही दातही चमकायला लागले होते...

तिने पहिल्यांदा जेव्हा हाक मारली म्मा!! अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं मी आणि हिनं....ही म्हणजे माझी लाडुबाई माधवी ...चार वर्षापुर्वी माझ्यासोबत माझ्या घरात आलेली....आमचा प्रेमविवाह नव्हता तसा पण कुणीही भेटल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न विचारते "काय हो...लव्ह मॅरेज का?" ही लाजते...या लाजण्यावरंच तीनं घरात मानाचं स्थान पटकावलं...आई-नानांच पान नाही हलत हिच्याशिवाय. ..

शनिवार होता ..सुटी होती मला म्हणून मी घराशेजारच्या बागेत गट्टुला घेऊन बसलो होतो...जेवणाला उशिर होता अजून...घरातून काहीतरी तळल्याचा खमंग वास येत होता.....एका स्टीलच्या वाटीत हळद लावून पिवळे केलेले मुरमुरे आणले होते मी गट्टुसाठी....पेरूच्या झाडाखाली सोलापुरी चादर अंथरुण मी बागेत धावणार्‍या माझ्या इवल्याशा लेकीला बघत होतो... सोसाट्याचा नव्हता तरी वारा अंगाला लागत हो्ता... मोगर्‍याची काही फ़ुलं अधुनमधून उडत पायाजवळ पडत होती...शेवग्याच्या झाडाचा सुकलेला पिवळा पाला वार्‍याच्या दिशेने उडत होता...
केळीच्या झाडामागे गट्टू गेली म्हणून मी वाकून बघायला गेलो तर गट्टु हातात खुरपं घेऊन काहीतरी उकरत होती...आईला काम करताना तिनं अनेकवेळा पाहिलंय कदाचित.... एवढ्याशा हाताच्या मानाने खुरपं बरंच जड होतं...मी गुपचूप दुरून तिची गंमत बघत होतो... जिथे आईची हिरवीगार कोथिंबीर वीतभर फ़ुलून वर आलेली होती त्या वाफ़्याच्या अगदी कडेला गट्टु छोटा खड्डा करत होती.... मला बघायचं होतं ती काय करतेय त्यामुळे मी "माती माती नकोस खेळू गट्टु" असं नेहमीप्रमाणे ओरडलो नाही... एखादा इंच खोल खड्डा तयार झाल्यावर तिनं तिच्या गुलाबी फ़्रॉकच्या खिशातून काही मुरमुरे काढले आणि खड्ड्यात टाकून वरुन माती लोटली.....डोळे भरुन आले होते ...एवढंसं लेकरु कसं शिकलं असेल हे काम...!! काही दिवसांनी मुरमुर्‍याचे झाड उगवेल ही भाबडी आशा मनात तयार झालीच कशी असेल!! ओल्या मातीनं माखलेले हात फ़्रॉकला पुसत ती उठली....खुरपं पुन्हा पाण्याच्या टाकीजवळ ठेवून दिलं आणि वळली... फ़्रॉकची अवस्था पाहून भितीनं पोटात गोळा आला होता माझ्या.... "अहोssssssss.....हिचा फ़्रॉक इतका खराब झालाय लक्ष कुठे होते तुमचे!! एक तासभरसुद्धा सांभाळू शकत नाही का तुम्ही पोरीला!!" हे सर्व ऐकावं लागणार होतं मला थोडाच वेळात....

गुलाबी ओठाला लागलेला एक मातीचा कण तसाच होता गट्टुच्या चेह्र्‍यावर....मी अनिमिषपणे तिची प्रत्येक हालचाल बघत होतो....पायात इटुकली चप्पल असताना घरासमोरच्या डांबरी रस्त्यावर हेलकावे घेत धावणारी गट्टु आज बागेत विनाचपलेची हिंडत होती...तिच्या गोर्‍यापान टाचा चिखलाने माखल्या होत्या....मी विचारांचं जाळं अंगावर घेऊन गुरफ़टत गेलो काही वेळ अगदी तिच्या जन्मापासूनच्या काळापर्यंत...चादरीवर पाय पसरुन डोक्याखाली घमेलं घेऊन मी पडलो होतो....माझं लग्न झालं...माधवी घरात आली...पहिलं भाड्याचं घर बदललं...नवीन बंगलाही बांधला नानांनी...या तंद्रीत गट्टु माझ्याजवळ किती वेळा येऊन गेली कळलेच नाही...

मानेला थोडा घाम आला होता...उन्हाची तिरीप डोळ्यावर येत होती म्हणून मी उठून बसलो...चादरीवर ढीग पडला होता गारगोट्यांचा आणि रांगोळीच्या दगडांचा...गट्टु बागेत फ़िरुन फ़िरुन हे पांढुरके दगड वेचून आणत होती....बांधकामाच्या वेळी आणलेल्या वाळूतले काही चपटे शंखशिंपलेही तिने दगड समजून जमा करुन आणले होते...आईबाबा जवळ नसताना जीवाचा आकांत करुन रडणारी अनेक मुलं मी पाहिलेली होती आजवर पण माझी गट्टु मी झोपलोय हे बघूनही न घाबरता काही न काही उद्योग करत होती. मला बसलेला पाहून ती माझ्या मांडीवर बदकन येऊन बसली...नकळत माझा हात तिच्या केसांमध्ये गेला...आपलं लेकरु या नुसत्या जाणिवेनंही अंगभर माया आणि जिव्हाळ्याच्या लहरी उसळायला लागतात ...माझंही तसंच झालं होतं...तिचे खराब झालेले हात आणि तळपाय मी माझ्या हातानी पुसत होतो....अन ती भामटू पायाला गुदगुल्या होतात म्हणुन खुदुखुदु गालात हसत होती....
तिने जमा केलेले छोटे छोटे पांढरे दगड मी घमेल्यात टाकले...तेवढ्यात माधवीची हाक कानावर आली..."अहोssssss जेवायला वाढलंय...आई नानांना हाक मारा ते वर टेरेसवर आहेत"....मी आपला आज्ञाधारक बाळासारखा गट्टुला कडेवर घेतले आणि बंगल्याच्या मागच्या बाजुला जाऊन आई-नानांना हाक मारली. बागेचे लोखंडी फ़ाटक लावून छोटं कुलुप अडकवलं.
घराच्या वर्‍हांड्यात आल्याबरोबर गट्टुने अंग झोकून दिलं झोक्याच्या दिशेने. तिला झोक्यात बसायला खुप आवडते म्हणून झोक्यात बसवून मी वाड्यातल्या नळाखाली हातपाय धुतले. आई-नाना हॉलमधे आले होते. आईने हातातली पापड्यांची टोपली बाजुला ठेवून गट्टुला उचलून कडेवर घेतले. आम्ही सर्वजण किचनमधे गेलो तेव्हा राखाडी रंगाची साडी नेसलेली माधवी मनगटाने आपल्या कपाळावरची केसांची बट मागे सारत होती. तिचे हात बेसनपीठाने भरलेले होते. हॉटेलमधे मिळतात तशी पिवळ्या रंगाची भजी मला खुप आवडतात हे तिला माहीत होतं म्हणूनच सगळा स्वयंपाक झाल्यावर छोट्या वाटीत पीठ कालवून तिची तयारी चालू होती. खांद्यावर आलेला पदर काहीसा अंबाड्यावर सरकवत ती हसली माझ्याकडे पाहून. तेवढ्यात तिला आईच्या कडेवर बसलेली गट्टु दिसली. फ़्रॉकवर पडलेले चिखलाचे डाग...विस्कटलेले केस...डोळे वटारुन खुणेनेच दाखवत होती. पण नेमके आई-नाना सोबत असल्यामुळे काही बोलताही येत नव्हते. फ़सफ़सून आलेला भज्यांचा घाणा चाळणीत टाकून तिनं आमची ताटं मांडली डायनिंग टेबलवर. आमचा लाडका गणपती बाप्पा टेबलवर बसला होता मध्यभागी.. तिच्या आजीनं तिला वाटीत वरण-भात दिला होता थोडा खायला... खाणं कमी आणि पसरवणं जास्त असायचं गट्टुचं... (क्रमशः)
-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच सुरुवात आहे .. Happy लेखनशैली सुरेख ..

इथे जरा गडबड झाली वाचताना ,

मी विचारांचं जाळं अंगावर घेऊन गुरफ़टत गेलो काही वेळ अगदी तिच्या जन्मापासूनच्या काळापर्यंत...चादरीवर पाय पसरुन डोक्याखाली घमेलं घेऊन मी पडलो होतो....माझं लग्न झालं...माधवी घरात आली...

यात तुमचे मनातले विचार "माझं लग्न झाल ...." या वाक्यापासून सुरु होताएत ना .?
ते चादरीच वाक्यपण विचारात असल्या सारख वाटल मला .. दोन ठळक केलेल्या वाक्यांचा क्रम बदलायला हवाय का.? कदाचित .. कि मला कळाल नाही कुणास ठाऊक ..

मी विचारांचं जाळं अंगावर घेऊन गुरफ़टत गेलो काही वेळ अगदी तिच्या जन्मापासूनच्या काळापर्यंत...
चादरीवर पाय पसरुन डोक्याखाली घमेलं घेऊन मी पडलो होतो....
"माझं लग्न झालं...माधवी घरात आली...पहिलं भाड्याचं घर बदललं...नवीन बंगलाही बांधला नानांनी"...या तंद्रीत गट्टु माझ्याजवळ किती वेळा येऊन गेली कळलेच नाही...>>> असं म्हणायचं होतं मला.... तिथे फोन आलेला एक म्हणून थोडा डिस्टर्ब झालो होतो.....तुम्ही अचूक जागा शोधलीत.....धन्यवाद....