दुधी भोपळा व कोलंबीची भाजी

Submitted by रायगड on 25 May, 2015 - 02:35
dudhi kolambichi bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दुधी भोपळा (surprise surprise!) - १ मध्यम आकाराचा,
कोलंबी - १०-१५ मध्यम आकाराच्या
अगदी थोडं आलं,
लसूण - ५-६ छोट्या पाकळ्या
कांदा - १ मध्यम आकाराचा
तेल, हिंग, हळद, तिखट, मीठ
नारळाचं दाट दूध - २ टेबल स्पून
कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

दुधीची भाजी म्हटल्यावर बरेच जण नाक मुरडतात. माझी ही अत्यंत आवडती भाजी. साधी भाजी तर मला आवडतेच पण विशेष आवडती दुधीच्या भाजीची रेसिपी म्हणजे - दुधीची कोलंबी घालून केलेली भाजी! अहाहा! एकदम यम्मी!
आता सुरुवातीलाच दुधीत घालून कोलंबीची चव का बिघडवा? - असा प्रश्न विचारू नका! दुधी आवडणारे, कोलंबी आवडणारे, दुधी आवडणारे पण कोलंबी न आवडणारे (असं कोणी अस्तित्वात असेल का?) कोलंबी आवडणारे पण दुधी न आवडणारे - अश्या सर्व गटातील मंड्ळींनी एकदा नक्की करून खा! असो, नमनालाच घडाभर तेल झालं नाही का?

तर पा कॄ कडे वळूया :

१. दुधीची सालं काढून फोडी करून घ्याव्यात, कांदा चिरून घ्यावा.
२. आलं, लसूण, व हवी असल्यास थोडी कोथिंबीर वाटून घ्यावी.
३. कोलंबीला हे वाटण लावून ठेवावे.
४. तेलावर हिंग, हळद घालून कांदा घालून परतावा.
५. कांदा थोडा ब्राऊन झाला की वाटण लावलेली कोलंबी घालून परतावी. मीठ, तिखट घालावे.
६. पाच मिनीटांनी दुधी घालावी. थोडं परतून, वाटीभर पाणी घालून झाकण ठेवून भाजी शिजत ठेवावी
७. साधारण १० मिनीटांनी भाजी शिजली की त्यात नारळाचे दूध घालावे. एक उकळी आणून गॅस बंद करावा.
८. हवी असल्यास वर कोथिंबीर घालावी.
९. गरमा गरम भाजी चपाती अथवा भाताबरोबर हादडावी.

अधिक टिपा: 

जे शाकाहारी आहेत, कोलंबी खात नाहीत, त्यांनी ......................नुस्ती दुधीची भाजी खावी - अजून काय?

माहितीचा स्रोत: 
आई - ती आजीकडून, तिच्या सासूकडून शिकली.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या रेसिपित,
जांना दुधी आवडत नाही त्यांनी दुधी एवजी कोलंबी टाका.
जांना कोलंबी आवडत नाही त्यांनी कोलंबी एवजी दुधी टाका.
हा.का.ना.का.

"दुध्या आंबट " ह्या नावाने वरील पाककृती कोकणी लोकांत प्रसिद्ध आहे.

खास करुन सकाळच्या पेजेबरोबर किंवा दुपारच्या उकड्या शिताबरोबर सोबत घेतली जाते.

सत्तारभाई, आंबट का म्हणत असतील बरं?
यात काहीच कोकम वगैरे आंबट घातलेलं नाही आहे.

रायगड, मस्तं रेसिपी.
दूध्या, दोडका इ. भाज्या कोळंबी, काढ, सुका कोळिम इ. घालून मस्तं होतात.
मात्रं सत्तारभाई म्हणतात तसं काहितरी आंबट मस्ट आहे.
खास करून कोकम किंवा कैरी.

आंबट का म्हणत असतील बरं?>>>>>>>> आंबट नावाचा सुकट्/सोडे टाइप प्रकार मिळतो.. तो वापरत असतील दुध्या आंबट मधे..

मीं करून पहाणारच !
[ << जांना दुधी आवडत नाही त्यांनी दुधी एवजी कोलंबी टाका.
जांना कोलंबी आवडत नाही त्यांनी कोलंबी एवजी दुधी टाका.>> त्यापेक्षां, वर सांगितल्याप्रमाणे कोलंबी आधीं तळून घ्यावी; नंतर दूधीची भाजी वेगळी करून घ्यावी; ज्याला हवं तसं त्याने मिक्स करून किंवा न करतां घ्यावं ! Wink ]

भाऊ,

कोलंबी तळुन चालणार नाही ! कारण त्या कोळंबीचा रस उतरला पाहीजे दुधीच्या भाजी / आमटीत तरच त्या आमटीला स्वाद येतो.

अश्या आमटी / भाज्यामध्ये कोलंबी घालण्याला कारवारी लोक मध्ये " गाळेण " अस संबोधल जात !
दुध्या शिवाय वांग्याच्या भाजीतही अशी कोलंबी घातली जाते.

"आंबट" म्हणजे " आमटी " कदाचीत अपभ्रंश असावा ! कोकणी लोकांमध्ये आमटी / भाज्यांमध्ये आंबंट पणा आणण्यासाठी बरेच पदार्थ घातले जातात, त्यात आमसुल, कोकम हे प्रमुख्याने असतात !

ईंटरेस्टींग दिसतेय, पण दुधी आवडत नाही, कोणी सांगितलेच नाही तर यात दुधी आहे तर पटापट खाऊन जाईल एवढी आवडते कोलंबी..

वांगे देखील आवडत नाही, पण त्याच्या चटणीत सोडे टाकले तर वाहवा काय कमाल लागते ती चटणी..

मृण्मयी, मैत्रेयी, साती - नक्की करून बघा. मी एकटी एका छोट्या दुधीच्या भाजीचा एका बैठकीत फडशा पाडते...मला प्रचंड आवडते ही भाजी. मैत्रेयी, हं - खरं आहे - थाय करी सारखी लागते थोडीफार!

अरे वा! एस. धन्यवाद. फार लोकं ही भाजी करण्याच्या फंदात पडत नाहीत. कारण दुधी आवडत नसते आणि मग दुधीत कोलंबी घालून कोलंबी "फुकट घालवतोय" असं त्यांचं मत असतं...पण मला कोलंबी नुस्ती जेवढी आवडते तेवढीच ही भाजी देखील आवडते.

वा! वा! मैत्रेयी. खरं आहे, वाफाळता भात आणि ही भाजी अप्रतिम लागते. गेल्याच आठवड्यात मी पण केलेली.