एक झोका...चुके काळजाचा ठोका

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 22 May, 2015 - 06:12

एक झोका...चुके काळजाचा ठोका

"मुझे भी बैठना है झुले पे" ती ५ -६ वर्षाची चिमुरडी प्रत्येक आई आणि बापाला विनंती करत होती.
मुंबईतल्या सुखवस्तू क्षेत्रातील गार्डन होत ते. पण प्रत्येक मुला बरोबर त्याचे पालक होते, त्यांच्यासमोर तीच कोणी ऐकत नव्हत. एकजण उतरायचा तर दुसर्याची आई लगेच स्वतःच्या मुलाला बसवायची. ती चिमुरडी हिरमुसली. अर्धा तास झाला त्या झोपाळ्याच्या आजूबाजूला ती फिरकत होती. तिथे इतर अनेक खेळाचे प्रकार होते घसरगुंडी, सी-सॉ आणि बरच काही... सार गार्डन ती फिरून आली होती पण उंच आकाशी पोहोचणार्या त्या झोपाळ्यावरच तीच मन आल होत. रात्रीचे आठ साडे आठ होत आले होते. लोक आता पांगायला लागली होती. झोपाळ्या जवळची गर्दीही कमी होत आली. तिला वाटल आता नक्कीच आपल्याला बसायला मिळेल. तिच्या आशा पल्लवित झाल्या आणि ती फिरून परत तिथेच आली. तिच्या सुदैवाने म्हणा पण एक झोपाळा रिकामा झाला होता. आता तिला अडवणार किंवा गर्दीत मागे लोटणार, मध्येच घुसणार कोणीही नव्हत. ती लगबगीने त्यावर बसली. तिघांपैकी मधलाच झोपाळा. बाजूच्या दोन वर बसलेल्या मुलांना त्यांचे आई वडील झोका देत होते. ती मात्र एकटीच होती. नवीन आशेने तिने त्या मुलांच्या पालकांकडे पाहिलं. एकाने तर चक्क तिच्याकडे दुर्लक्ष केल. दुसरी थोड हसू आणत म्हणाली, "कीस के साथ आये हो आप, बुलाइये उन्हे?" "आंटी, मेरी माँ हे साथ मे, सामान लाने गई हे.. आप सिर्फ ५ मिनट मुझे झुला झुलाओगे?" पोरगी चुणचुणीत दिसत होती. शिवाय कपडेही नीट नेटके थोडे जास्तच चांगले होते घातलेले. "चांगल्या घरातील असेल पण हिची आई अशी काय? बेधडक पोरीला एकटीला सोडून गेली?" ती स्त्री विचारात असतानाच परत मुलगी म्हणाली, "झुला?" त्या आईने दोघींना झोका द्यायला सुरुवात केली.

तिची लेक थोड्याच वेळात कंटाळली आणि झुलणारा झुला थांबला. "बेटा रात हुई हे, कहा हे आपकी माँ? हम भी जा रहे हे" ती मुलगी आता कुठे भानावर आली. तिच्याकडे न पाहताच सुसाट इथे तिथे आईला शोधत धावायला लागली. तिला आठवल दोन तीन दिवसानपूर्वीही तिची आई तिला असच सोडून जात होती, धावत पळत पकडलं होत तिने तिला. पण आज खरच गेली कि काय टाकून? ती बिथरली. तरीही तिला तिचे शब्द आठवत होते, "अरे तुझे छोड के कैसे जाऊ? तू तो मेरी रानी हे, यहाँ पे हि रुकना अगर मे कभी देर से आयी तोह" माँ चे शब्द आठवले आणि ती थोडी सावरली. गार्डन मध्येच गेट जवळच्या एका बाकावर, आजहि झोपाळ्यावर बसायला मिळाल या आनंदात आईच्या वाटेकडे डोळे लाऊन बसली. आता तिला ते गार्डन खायला उठत होत. बाहेर पडणारे लोक तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. पण, "बाळ एकटीच का बसलीस?" अस आपुलकीने विचारायला कोणी पुढे नाही आल. रात्र वाढत होती आणि गार्डन बंद करायचं म्हणून त्याचा चौकीदार सगळीकडे फिरून शिट्टी मारून आला. तरीही उशिरा आलेले काही लोक होते, काही लोक हलत नव्हते, शेवटी नाईलाजाने गार्डनची मेन लाईट बंद करण्यात आली. आता मात्र त्या काळोखात कोणी थांबत नव्हत. गेट बाहेर निघताना आता त्या मुलीकडे पाहून लोकांना आश्चर्य वाटत होत. ४-५ लोक तिच्याभोवती गोळा झाले, "का ग एकटीच बसलीस?" एका आज्जीने विचारलं शेवटी. ती प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. मराठी मुलगी नसावी असा अंदाज बांधून दुसर्याने विचारलं, "अरे आप के साथ कौन हे?" "मेरी मां, बाहर गयी, नही आयी अभी तक" लोक तिला न्याहाळत होते. नीटनेटके कपडे, पायात चांगल्या कंपनीचे बूट. मुलगी अगदी स्वच्छ दिसत होती. तिला कोणी मुद्दाम इथे सोडून गेल असेल अस कोणाच्या मनातही आल नाही. हिच्या आईला काही अपघात तर झाला नसेल? कुठे राहत असेल हि? कोणी ओळखीच आहे का? अशा ना ना प्रश्नांवर चर्चा सुरु झाली आणि शेवटी एकाने विचारलं, "कहाँ रहते हो आप..? यहाँ आजु बाजु की कोई टावर में रहते हो? कुछ बता सकते हो? हम घर छोड़ आते है आपको..."

"हम तोह कुछ दिनोंसे स्टेशन के ब्रिज के नीचे रहने आये हैं l" तिच्या या उत्तराने त्या घोळक्यात एकच शांतता पसरली. ना कुठले उत्तर, ना कुठला प्रश्न, ना कुठली मदत, ना कुठली चौकशी. प्रत्येक जण आता तिथून काढता पाय घेऊ लागला. कोणाकडेही तिच्यासाठी आता वेळ नव्हता. मुलगी तशीच शांत; आईची वाट बघत बसली होती. आता तिथे फक्त ती मुलगी आणि नोकरीवर असलेला चौकीदार हे दोघेच होते. चौकीदारही त्याआधी गर्दीतच उभा होता त्याला सगळ समजल होत पण कोणीतरी स्वतःहून पुढे येउन मुलीला मदत करेल, 'सुशिक्षित लोक'; ते जास्त योग्य निर्णय घेतील या विचाराने आपल्यावर त्या मुलीची जबाबदारी यॆइल हा विचार त्याच्या मनाला शिवलाही नव्हता. ड्युटी संपून एक तास झाला होता. मुलीच्या डोळ्यात पाणी आल होत. आता कोणी हिला घ्यायला येणार नाही हे कळून चुकल्याने चौकीदाराने काहीतरी विचार करून मुलीला म्हटलं, "बेटा चलो आपके घर चलते हैं l " अर्ध्या तासाच्या अंतरावर स्टेशन होत. तिथे जाऊन मुलीला सोडून याव असा विचार त्याने केला आणि गार्डन बंद करून रिक्षाला हात दाखवला.

इकडे तिची माँ ब्रिजखाली केव्हाच पोहोचली होती. तिला पाहून मोठी मुलगी पुढे आली , "माँ रानी थी तुम्हारे साथ में.. वोह कहाँ है?" डोळ्यातले अश्रू लपवत ती माँ म्हणाली, "वोह… उसे कोई भला इंसान लेना चाहता था, अच्छा घर, बड़े लोग संभालेंगे उसे अब. सोने के थाली में खाना खायेगी वोह ..यहाँ पे तोह खानाभी उसके नसीब में ना था, तोह उसको दे दिया उन लोगोंको l चल अभी जल्दी कर हमें यहाँ से दूसरे शहर जाना है l" मुलीच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न होते, ज्यांची उत्तर त्या आईकडेही नव्हती. दारुड्या नवर्याला, त्याच्या बाजूला झोपलेल्या पोराला तिने हाक मारून उठवल. पोटातल्या गोळ्याला सांभाळत तिने दोन-तीन गाठोडी उचलली आणि ते सगळे स्टेशनच्या दिशेने चालू लागले. कुठलीतरी गाडी लागली होती स्टेशनाला त्यात ते चढले, थोड्या वेळात ती ट्रेन सुरु झाली आणि ती माउली हुंदके देत रडू लागली. तिला वाटत होत, एक पोर भले माझ्यापासून दूर असेल तरी सुखात राहील आता. गेल्या १० - १२ दिवसात तिने केलेलं सगळ नियोजन तिला आठवत होत.

काही दिवसांपूर्वी ते कुटुंब त्या शहरात आल, ब्रिजच्या खाली बस्तानही बांधल. आणि दोन/तीन दिवसातच एक अलिशान गाडी तिच्यासमोर येउन थांबली, एक बाई कपड्यांची एक मोठी पिशवी आणि बूट, चपला अस काही सामान असलेली एक ब्याग तिच्या हाती थोपवून निघूनही गेली. उच्चभ्रू घराच्या शोभेला न शोभणार, ३-४ महिनेच वापरलेलं ते सामान होत. मध्यम - सामान्य वर्गासाठी अजूनही नवीनच असणार. पुढे पोटासाठी भटकत असताना ती त्या गार्डन जवळ येउन पोहोचली. गार्डन च्या बाहेरच्या मोठ्या गाड्या, आत खेळणारी मुल, त्यांचे पालक आणि त्यांनी अंगावर घातलेले कपडे आणि इतर बर्याच गोष्टीच निरीक्षण तिने केल. घरी आल्यावर तिच्या धाकल्या मुलीला तिने ते ब्यागेतले नवीन कपडे चढवले, तीच तोंड नीट धुवून तिला स्वच्छ केल. तिच्याकडे एकदा बघितलं आणि ती तिचीच मुलगी आहे का हे न्याहाळत राहिली. त्या श्रीमंत कपड्यांमध्ये तीही त्या गार्डन मध्ये खेळणाऱ्या मुलांपैकी एक वाटायला लागली होती. पुढचे चार पाच दिवस ती आणि तिची मुलगी तेच ब्यागेतले कपडे घालून त्या गार्डन मध्ये जाऊ लागल्या. त्या दोघी देखील त्या सुखवस्तू घरातील लोकांप्रमाणेच सगळ्यांना भासू लागल्या. मुलगी जायची सगळ्या मुलांबरोबर खेळायची, झोके घ्यायची आणि खुश होऊन परतायची. आई मात्र आजूबाजूचे लोकच न्याहाळत राहायची. “एवढे मोट्ठे लोक, माझी एक मुलगी सांभाळायला यांना नक्कीच जड जाणार नाही, कोणीतरी एक नक्कीच तिला आपलस करेल.” ह्या भोळ्या आशेवर ती एक दिवस मुलीला तसच एकटीला टाकून निघू पाहत होती पण पोरगी मागून आली आणि तिला बिलगली. तिने तिची समजूत काढली पण आज, आज तिची पोर मागे नाही आली. झोपाळ्याभोवती रमत असतानाच तीच शेवटच हसू पाहत तिची आई तिला तिथेच सोडून निघून गेली. कायमची.

इथे चौकीदार मुलीला घेऊन ब्रिजखाली पोहोचला. ४-५ गर्दुल्यान्शिवाय कोणाचाही तिथे पत्ता नव्हता. "किधर गये सब?" मुलीच्या प्रश्नाच उत्तर माहित असूनही त्याला ते तिला द्यावस वाटल नाही. "तुम रुको, में धूंड के आता हुं" अस म्हणत तो तिला तिथे एका दगडावर बसवून पुढे चालत आला. तिला ठेऊन तो पुढे आला तर खरा, पण त्याला पुढे चालवेना. एवढी रात्र.. कोणी पोरीला उचलल तर ? पण घरी आपलेच खायचे वांधे त्यात तिला कस पोसायच? पण असच सोडलं तर आपल्यात आणि इतरात काय फरक ? प्रश्न होते पण उत्तरे नव्हती त्याच्याकडे. तरी तो मागे फिरला, मुलीकडे गेला. तीच बोट पकडलं, मुलगी पेंगुळली होती. त्याने तिला उचलल आणि एका सुज्ञ नागरिकाने जे करायला हव होत ते त्याने केल, सरळ पोलिस स्टेशन गाठल.. अर्थात तिथे बर्याच प्रश्नांची सरबत्ती याच्यावर झाली. अशा केसेस त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या; खर काय आणि कस झाल याची त्यांना देखील कल्पना होती. थोड्या वेळातच पोलिस स्टेशनच्या बाकावर त्या पोरीला सोपवून तो चौकीदारही तिथून निघून गेला. पोरगी त्याच बाकावर झोपून गेली. झोपेत माँ सोबतची स्वप्न बघत होती आणि इथे पोलिस तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत अनाथालय आणि बाल सुधारगृहाला फोन लावत होते.

मयुरी चवाथे-शिंदे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Varacya post la anumodan so sad.mala tar vatata devane muli fakt changala gharatach janmu dyaavyaat.......

कॉलेजच्या दिवसांत असाच प्रसंग प्रत्यक्षात घडताना पाहिलेला आणि अनुभवलेला आहे.

दादर (सेंट्रल) स्टेशनवर चार नंबर प्लॅटफॉर्मला पाच जणांचं एक कुटुंब गाडीची वाट पाहत होतं. आईवडील, दोन मुली आणि एक मुलगा. विदर्भ एक्सप्रेस ४ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आली. गाडीला फारशी गर्दी नव्हती.

आई आणि मुलगा गाडीत चढले.
गाडी सुटण्याची शिटी झाल्यावर बाप मुलींना म्हणाला, "तुम्हारे लिए जगह पकडता हूं! यहीं पे रुकना!"
गाडी सुटली तरी त्या बापाची जागा पकडून झाली नव्हती!

प्लॅटफॉर्मवरच्या आम्ही तीन-चार जणांनी मुलींना गाडीत चढवण्याची सूचना केली, पण त्या ऐकेनात!
"पप्पा ने यहीं पे रुकने बोला था!"

दोघी मुलींना मागे ठेवून गाडी निघून गेली!
स्टेशनवरच्या पोलिसांनी मुलींचा ताबा घेतला. आम्हाला म्हणाले,

"आई-बापाला नकोशा झालेल्या मुली नेहमी अशाच मागे सोडून जातात लोक! सांभाळता येत नसेल तर पैदा कशाला करतात देव जाणे!"

पुढे त्या मुलींचं काय झालं कोणास ठाऊक!