निरोपाची आठवण ..

Submitted by प्रकु on 21 May, 2015 - 16:58

फायनल इयर हा कॉलेजलाईफ मधला एक वेगळाच काळ असतो. सीनियर्सना फेयरवेल देऊन झाली कि, आपलाही शेवट जवळ आल्याची जाणीव होऊ लागते. आयुष्यभर पुरतील अशा आठवणी पटापट जमा करण्याचा असा का काळ. सगळ्यांना मैत्रीचचं भरत येत असत. गेल्या तीन वर्षांमध्ये निर्माण झालेल्या ऋणानुबंधांची खास काळजी घेतली जाते. लांब गेलं तरी तुटू नये म्हणून त्यांना अगदी घट्ट करण्याचा प्रयत्न नकळतपणे चालू असतो. वर्गात अभूतपूर्व एकी निर्माण होऊ लागते. सगळे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येऊन, एकच मोठ्ठा ग्रुप तयार होतो. कॉलेजच्या पार्किंगमध्ये रेंगाळण वाढत. दर चार दिवसाआड कुठेना कुठे जायचे प्लॅन्स ठरत असतात. फोटोसेशन करून ते क्षण पकडण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करत असतो. घड्याळाला मात्र कधीच कीव येत नाही. ते आपल्याकडे मिश्किलपणे पाहून हसत, टिक टिक टिक करत आपल चालूच राहत. असे कितीतरी फायनल क्षण ते रोजच्या रोज कुणाच्यातरी आयुष्यातून घेऊन जात असत.

फायनल इयरमध्ये प्रोफेसर्सपण खूप चांगले वागू लागतात. वर्गात दिवसभर गप्पा रंगत असतात तरी ते मुलांना ओरडत नाहीत. ‘चालुद्या चालुद्या’ म्हणून निघून जातात. कधीकधी तर ते हि गप्पांमध्ये सामील होतात. त्यांचे अनुभव सांगतात. कदाचित ते त्यांचे तसे गेलेले क्षण शोधत असावेत.

असा सगळा हा आनंदमेळा शेवटाकडे चाललेला असतो.

आमचाही असाच पार्किंगमध्ये एक दिवस आनंदमेळा चालू होता. कॉलेज संपायला शेवटचा एक-दीड महिना बाकी होता. दहा बारा जणांचा आमचा ग्रुप आता पंचवीस तीस जणांचा झाला होता. आमचा पिक्चरला जाण्याचा प्लॅन चालू होता. कोणीतरी हॉरर पिक्चरला जाण्याची कल्पना मांडली. भलामोठा ग्रुप घेऊन हॉरर पिक्चरला जाणे आणि भूतांची खिल्ली उडवणे या एक भलताच धमाल अनुभव असतो. बऱ्याच जणांना ती कल्पना आवडली. काही मैत्रिणी मात्र येण्याबद्दल जरा साशंक दिसत होत्या. सगळेजण त्यांना काहीतरी इमोशनल डायलॉग मारून पटवण्याच्या मागे लागले.

काहीच्या काही डायलॉग असतात खर त्या वेळचे. आता आठवून हसू येत.

‘बास का आता. लास्ट टाईम मुव्हीला चाललोय ना आपण. असे नखरे करणार आहेस का तू.?’ ‘काही होत नाही ग. चल तू. डोळ्याला पट्टी बांधून बस हव तर’ ‘येतेय कि नाही.? आता फायनल विचारतोय एकदम.’ ‘बघ हं. तुला सोडून जाऊ आम्ही’ ‘आतातर एकदमच फायनल. लास्ट टाईम. येतेयss किss नाही.?’ समोरच्याने हो म्हणेपर्यंत हे असच.

त्यांना येण्यासाठी तयार करत असताना मध्येच आमचा विषय कुठेतरी भलतीकडेच गेला. कोणीतरी म्हणालं, ‘नुसत पिक्चरला जाण्यात काय मजा.? काहीतरी तुफानी केली पाहिजे.’ मग ‘काय तुफानी करायची’ यावर थोडावेळ काथ्याकुट झाली. वेगवेगळ्या चित्रविचित्र कल्पनांचा विचार करून झाला. शेवटी आम्ही वर्गातल्या प्रोजेक्टरवर हॉरर पिक्चर पहायचे ठरवले.

त्या पर्टिक्युलर वेळेसाठी ती गोष्ट ‘तुफानी’च होती. कारण कॉलेजमध्ये त्या वेळी कोणालातरी, कॉलेज कॉम्प्युटरवर फेसबुक वापरताना पकडण्यात आलं होतं. हि काही खूप मोठी गोष्ट नव्हती. तिथल्या तिथे संपवण्यासारख होत प्रकरण. तरी त्याच खूप अवडंबर माजवून त्या मुलावर कडक कारवाई करण्यात आली होती. तसेच कॉलेज संसाधनाचा गैरवापर करू नये अशी नोटीसही फिरवण्यात आली होती. आमचे प्रिन्सि काही बाबतीत अगदीच कडक होते. आम्हाला जर कोणी पकडलं तर ते अडचणीच ठरणार होतं. त्यामुळे आम्हाला अधिकच उत्साह आला. काही जणांनी मात्र यातून माघार घेतली. तरी आम्ही वीसएकजण उरलो होतो. आम्ही तो नियम मोडून पिक्चर पाहयच ठरवलं.

नियमांच हे अस असत. काही नियम खरच खूप गरजेचे असतात. ते मनाला पटतात आणि पाळलेसुद्धा जातात. काही नियम छोटेसे असतात. तेही गरजेचे असतात पण ते योग्य वेळी वापरले तर गांभीर्य राहते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत नियम दाखवले, छोटे नियम उगाच मोठे करून सांगितले कि हसू येत. मग ते नियम मोडावेसे वाटू लागतात. तसे करण्यात एक वेगळाच असुरी आनंद मिळतो. आम्हाला तो आनंद घ्यायचा होता. अशा प्रकारे आमचा आधीपेक्षा डबल थ्रील असलेला कार्यक्रम ठरला. एक नियम मोडण्याच थ्रील आणि एक हॉरर पिक्चरच थ्रील.

आता वाटतय खरतर आम्हाला कुठल्याही थ्रीलशी फारस घेणदेण नव्हत. आम्हाला त्या वेळी फक्त मित्रांच्या सहवासातले राहिलेले क्षण अविस्मरणीय करायचे होते. नाहीतर हे अस करायचं अगोदरच सुचलं असत. असो.

शनिवारी दुपारनंतर आम्ही पिक्चर पाह्ण्याच ठरवलं. त्यादिवशी अर्धवेळ कॉलेज असे. आजूबाजूच सगळ पाहून विचार करून, जिकडे कोणी फारसे येणार नाही असा एक वर्ग निवडला. तिथे जाऊन लॅपटॉप प्रोजेक्टरला जोडून, स्पीकर्स वगेरे लाऊन सगळ नीट चालू असल्याची खात्री करून घेतली. ‘नॅनो-टेक्नॉलॉजी’वरचा एक स्लाईड शो आणि एक व्हिडीओ लाऊन ठेवला. मध्येच कोणीतरी आल तर एकाने पटकन Alt+F4 आणि Enter मारायचं आणि मी स्टेजवर जाऊन स्लाईड्स एक्स्प्लेन करायला उभ राहायचं अस ठरलं होतं. त्यात मुलींनी सुगरणपणा दाखवून खिडक्यांना लावायला म्हणून घरून गडद रंगाच्या बेडशिट्स आणल्या होत्या. त्या त्यांनी मुलांकडून नीट लाऊन घेतल्या. ‘अरे इकडे नीट कर ना. इकडून प्रकाश येतोय, तिकडून प्रकाश येतोय’ अस करून आत पार मिट्ट अंधार झाला.

आम्ही कॉन्जुरींग हा हॉरर पिक्चर पाहणार होतो. सुरुवातीला राष्ट्रगीत पण लावणार होतो थिएटरमध्ये लावतात तस. पण तस करण्याची परवानगी असते कि नाही अशी आम्हाला शंका आली म्हणून ते कॅन्सल केले. मग मोठ्याने हसायचे नाही, मोठ्याने ओरडायचे नाही अशी सगळी चर्चा झाल्यावर पिक्चर चालू केला. बाहेर कितपत आवाज येतो काय ते तपासून पहिले आणि त्याप्रमाणे आवाज अॅडजस्ट केला. तरी आतमध्ये बऱ्यापैकी आवाज ठेवता आला होता.

सगळेजण बेंचेसवर बसून पिक्चर पाहू लागले. सुरुवातीला बारीक बारीक आवाजात विनोद चालू होते. नंतर मात्र सगळे गंभीर झाले. काहीजणांना मागून इंग्लिश समजेचना. म्हणून ते पुढे येऊन चक्क खाली बसले. शांतपणे पिक्चर चालू होता. मधेच एखादा बाष्कळ विनोद होई पण कोणी फारसा प्रतिसाद देत नव्हते. तेवढ्यात पिक्चरमध्ये धाड्कन काहीतरी झाले. भूत आले कि काय झाले आठवत नाही. पण मुली जोsरात किंचाळल्या. त्या पण तीन जणी. एकाच वेळी. मित्राने खटाखट Alt+F4, Enter मारले. मी क्षणार्धात स्टेजवर जाऊन उभा. दाराकडे बघत. कोणी आले तर मी लगेच स्लाईड वाचणार होतो. मिनिटभर पूर्ण शांतता पसरली. सुदैवाने कोणीही आले नाही.

आमचे तर धाबेच दणाणले होते. मुलींचा ओरडण्याचा आवाज ऐकून काय वाटेल लोकांना. आम्ही आपल पिक्चर बंदच करायचे ठरवले. काही न बोलता नकारार्थी माना हलवत स्पीकर्स वगेरे डिस्कनेक्ट करायला लागलो. मुलींच लगेच चालू झाल, ‘ए काय करताय.? बघू ना आपण मुव्ही. आता नाही ओरडणार कोणी.’ वगेरे वगेरे. दोन-पाच मिनिट हो नाही झालं. आम्हालाही पिक्चर पाहायचाच होता. मग उपाय म्हणून ओरडण्याची शक्यता असलेल्या मुलींसमोर बेंचवर त्यांचे मोठ्ठाले रुमाल ठेवले. कधीही आत्यंतिक ओरडावेसे वाटले तर पटकन रुमालात तोंड खुपसायचे नाहीतर रुमाल उचलून तोंडाला लावायचा अस त्यांना बजाऊन सांगितलं आणि पिक्चर पुन्हा सुरु केला.

आमचा उपाय बऱ्यापैकी प्रमाणात यशस्वी झाला. काही जणींनी रुमाल अगोदरच तोंडाजवळ नेऊन ठेवले. कारण भूत अचानकच येत असे. नंतरही एकदोन ठिकाणी वेगवेगळ्याजणी ओरडल्याच पण रुमालामुळे जोरदार आवाज झाला नाही. पिक्चर सुरळीतपणे चालू राहू शकला.

पिक्चरचा शेवटचा आर्धा तास चालू होता. तेव्हा अचानक दार वाजले. आता मात्र आम्ही सगळेच घाबरलो. हे अनपेक्षित होतं. नसते साहस अंगाशी येते का काय असे वाटून गेले. पुन्हा Alt+F4, Enter. मी स्टेजवर. अस सगळ झालं. एक मित्र दार उघडायला गेला. मागून कोणीतरी डोक चालवून पटकन त्याला थांबवल. अंधार घालवणं गरजेच होतं. आम्ही अगोदर याचा विचारच केला नव्हता. बेडशिट्स एकदम पक्के लावलेले होते. ते खेचून काही निघेनात. इकडे पुन्हा एकदा दार वाजलं होत. आता लगेच दार उघडण गरजेच होतं. मग बेड्शीट तिथल्या तिथे वर बाजूला वगेरे करून अंधार घालवला आणि दार उघडल.

समोर आमचे HOD उभे होते. ते आत आले. कोणाला गुड आफ्टरनून म्हणायचे पण सुचले नाही. सगळे नुसतेच उभे राहिले. त्यांनी ‘सीट सीट’ म्हणून सगळ्यांना बसायला लावले. वर्गावर एकवार नजर फिरवली आणि स्क्रीनकडे पाहीले,

‘नॅनो-टेक्नॉलॉजी...... बर.. काय सेमिनार देतोय का तू प्रतिक.?’

‘होय सर. ते... इलेक्टिव्ह आहे ना आमचा.. नॅनो-टेक्नॉलॉजी... त्यामुळे जरा ग्रुपस्टडी करत होतो.’

मी जरा घाबरत घाबरतच थाप मारली. त्यावर काही प्रतिक्रिया न देता ते स्लाईड वाचू लागले,

‘अप्लीकेश्न्स ऑफ नॅनो-टेक्नॉलॉजी....बर’ पुढे ते मनातल्या मनात वाचत होते.

वर्गात तणावयुक्त शांतता पसरली.

मी मनात म्हणलं ‘ग्रुपस्टडी.? आवरा.. थाप तरी व्यवस्थित द्यायची.’ मलाच त्या थापेच हसू यायला लागलं. मी मित्रांकडे पहाण्याच कटाक्षाने टाळत होतो. त्यांच्याकडे पाहिलं असत तर हसू आवरलच नसत मला.

‘ग्रुप स्टडी.?’ त्यांनी परत विचारलं.

‘हो सर.’ मी.

‘सगळ्यांनी एक एक टॉपीक तयार केलाय का.?’

‘यस सर.’

‘या स्लाईड्स त्यासाठीच तयार केल्या का तुम्ही.?’

‘अं....नो सर. ते इंटरनेट वरून डाउनलोड केल्या डायरेक्ट.’ ओव्हर भप्पाऱ्या देण्यात काही अर्थ नव्हता. जरा खर वाटेल अस बोलण गरजेच होत म्हणून मी सरळ नाही म्हणलो.

‘ओके. गुड.’ अस म्हणून ते लॅपटॉप ठेवलेला होता त्या बेंचकडे जाऊ लागले. लॅपटॉप शेवटच्या ओळीतल्या पहिल्याच बेंचवर होता. ते सेमिनार ऐकायला बसण्याच्या विचारात होते बहुतेक. तेवढ्यात त्यांना बेंचच्या खालच्या फळीवर काहीतरी दिसलं. ते पिक्चरच्या सीडीच कव्हर होतं. त्याच बेंचवर आमचा Alt+F4 मित्र बसलेला होता. पण सर कव्हरवरची नजर न हटवता तिथपर्येंत पोहोचले. त्याला काहीच करता आल नाही. सरांनी ते कव्हर उचलून हातात घेतलं आणि मोठ्याने नाव वाचलं,

‘कॉन्जुरींग... द कॉन्जुरींग’

त्या क्षणाला पूर्ण वर्ग फ्रीज झालेला होता.

त्यांनी लॅपटॉपच सीडीच बटन दाबलं. सीडीपण बाहेर आली.

ते शांतपणे सीडीच्या कव्हरवरच्या डीटेल्स वाचत होते,

मी स्टेजवर मान खाली घालून पण सरांकडे नजर ठेऊन उभा होतो. त्यांची माझ्याकडे पाठ होती. मला अक्षरशः पळून जावस वाटत होत. पण पळून गेल्यावर अजूनच मोठी भानगड झाली असती.

सरांनी हळुवारपणे वर्गावरून नजर फिरवली. माझ्याकडेही पाहिलं. मी पटकन खाली बघितल. सर पुन्हा सीडीच्या कव्हर वरच्या डीटेल्स वाचू लागले. सर्वजण खाली मान घालून बसलेले होते. आणि चोरून सरांकडे पाहत होते.

माझ्या मनात परिणामांचे विचार सुरु झाले. ‘आता बोलणे बसणार ..... मानहानी ..... घरी फोन ..... प्रचंड बोलणे ..... आत्यंतिक मानहानी ...... रेस्टीकेट ......’ विचार कुठल्या कुठे जाऊन पोहोचले.

तोपार्येंत सरांचे कव्हर वरचे सर्व डीटेल्स वाचून झाले असावेत. ते त्यांनी बेंचवर ठेऊन दिले. पुन्हा वर्गावरून हळूवार नजर फिरवली. वर्गात स्मशान शांतता पसरली होती. त्यांनी मागे खिडक्यांना लावलेल्या पडद्यांकडे पाहिलं,

‘हे काय.? स्लाईड्स नीट दिसाव्या म्हणून का.?’

‘............’ कोणीच काही बोलल नाही.सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.

‘कुलकर्णीsss. काsय.?’

मी जागच्या जागी गारठलो होतो.. काही बोलायची हिम्मतच झाली नाही. मी खाली पाहत डोळे मिटून घेतले. माझा रडायचा विचार होता पण वय इतक वाढल होत कि रडूच येईना.
पुन्हा शांतता पसरली. मी जरा डोळे किलकिले करून सर कुठेत त्याचा अंदाज घ्यायला लागलो. कानफडात बसली तर पुर्वसुचनेशिवाय बसू नये अशी माझी इच्छा होती.

खरतर काही गोष्टी झटकन घडून गेल्या तर बर असत. जास्त त्रास होत नाही. मनाला मात्र उगाच भविष्य जाणून घेऊन त्याची चिंता वाहवत बसण्याची खोड असते. डॉक्टर सुई टोचत असताना इतरस्त्र मन रमवून टचकन टोचली तर जास्त त्रास होत नाही. त्रास त्यांनाच होतो जे चोरून सुईच्या टोकाकडे बघत असतात.

मी डोळे किलकिले करून पहिले तर सर आधी होते तिथेच उभे होते. आणि माझ्याकडेच पाहत होते. मी परत मान खाली घालून उभा राहिलो. मला अचानक सर थोडेसे हसल्या सारखा आवाज ऐकू आला. मी परत त्यांच्याकडे पहिले. ते माझ्याकडे रागाने पाहत होते बहुतेक. मला वाटल माझ्या मनावरचा ताबा सुटून मीच हसलो कि काय. ते म्हणाले,

‘अरे काय पोरं तुम्ही. मागच्याच आठवड्यात नोटीस आली होती ना तुम्हाला.? जायचं का प्रिन्सिपॉल ऑफिसमध्ये.?’

‘............’

‘बाहेर इतर डिपार्टमेंटला वगेरे कळाल तर किती बदनामी होईल आपली. भान ठेवा जरा. मागच्या वेळी आपल्याच डिपार्टमेंटच्या मुलाला पकडल होत ना.?’

‘...........’

‘काय.? कळतय का मी काय म्हणतोय ते.?’

‘...........’

‘यस ऑर नो.?’

‘यस सर.’ सर्वजण शक्य तितक्या बारीक आवाजात म्हणाले.

‘गुड.’ अस म्हणून ते बाहेर निघून गेले. प्रिन्सिपॉल सरांना सांगताएत कि काय.? आम्ही संभ्रमात होतो.

एक सेकंदात ते पुन्हा आले. वर्गात डोकावून अंगठा उंचावून म्हणाले,

‘ एन्जॉय ! ’

आम्ही बघतच राहिलो. ‘थँक्यू सर’ म्हणेपर्यंत ते निघूनही गेले होते. आम्हाला आमच्या कानांवर विश्वासच बसेना. सरांच हे रूप आम्ही कधी पहिलच नव्हत. आमच्या आठवणी जमवण्याच्या मोहिमेला त्यांनी गालबोट लागू दिलं नाही. पुढे कायम स्मरणात राहील अशी एक छान आठवण ते आम्हाला देऊन गेले होते.

.............................

.............................
नंतर फेयरवेल पार्टीच्या दिवशी आम्ही HOD सरांसोबत फोटो काढायला गेलो. फोटो काढून झाल्यावर त्यांनी आम्हाला विचारलं,

‘काय कसा होता मग तुमचा कॉन्जुरींग.?’ सगळे मोकळेपणाने हसले.

‘छान होता सर. थँक्यू’ या थँक्यूला बराच अर्थ होता. तो त्यांना कळाला आणि ते हि मनापासून हसले.

‘गुड गुड. कितव्यांदा होतं ते.?’

‘फर्स्ट अँड लास्ट होतं सर.’

‘ओह! रियली.? शॅल आय बिलीव्ह इट.?’

‘ऑफकोर्स सर. व्युई आर नॉट लाइंग.’

‘वेल! होप सो! बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर.’ अस म्हणून एका सुंदर नोटवर सरांनी आमचा निरोप घेतला.

………………………………

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

धन्यवाद .. Happy

मला वाटलं खरोखरंच भूत येतंय की काय!! >>>> नाही हो गामाभौ. भूत कसल येतय. आल असत तर मात्र आमच्या मैत्रिणी कॉलेजची इमारत जमीनदोस्त होईल इतक्या जोरात किंचाळल्या असत्या. Biggrin

भारीये Happy
सर कुठेत त्याचा अंदाज घ्यायला लागलो. कानफडात बसली तर पुर्वसुचनेशिवाय बसू नये अशी माझी इच्छा होती.>> Biggrin
ताबा सुटून मीच हसलो कि काय Biggrin

मी जागच्या जागी गारठलो होतो.. काही बोलायची हिम्मतच झाली नाही. मी खाली पाहत डोळे मिटून घेतले. माझा रडायचा विचार होता पण वय इतक वाढल होत कि रडूच येईना.
पुन्हा शांतता पसरली. मी जरा डोळे किलकिले करून सर कुठेत त्याचा अंदाज घ्यायला लागलो. कानफडात बसली तर पुर्वसुचनेशिवाय बसू नये अशी माझी इच्छा होती.

खरतर काही गोष्टी झटकन घडून गेल्या तर बर असत. जास्त त्रास होत नाही. मनाला मात्र उगाच भविष्य जाणून घेऊन त्याची चिंता वाहवत बसण्याची खोड असते. डॉक्टर सुई टोचत असताना इतरस्त्र मन रमवून टचकन टोचली तर जास्त त्रास होत नाही. त्रास त्यांनाच होतो जे चोरून सुईच्या टोकाकडे बघत असतात.

अगदिच छान लिहलय....माझे आवड्ते ओळि..

ध्यन्यवाद मित्रो !!
आज बरोब्बर गरुपौर्णिमेच्या दिवशी हा धागा पुन्हा वर आलेला पाहून सुखद धक्का बसला.. Happy धन्यवाद !!
सूरज Happy