पानिपत

Submitted by बिपिन कार्यकर्ते on 20 May, 2015 - 14:16

प्रिय अमोल,

काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे.

पानिपतच्या युद्धस्मारकाचे दर्शन घेणे, हा असाच त्या लांबलचक यादीतला एक क्षण.

पानिपतात १७६१ सालच्या संक्रांतीच्या दिवशी जे काही घडून गेले, तो आता, म्हणलं तर, इतिहास आहे; म्हणलं तर, अजूनही भळभळणारी जखम आहे. त्यावर आजवर बरंच काही लिहिलं गेलंय. याही पुढे लिहिलं जाईल. (जयंत नारळीकरांनीदेखील त्यांच्या एका विज्ञानकथेत, पानपतावर सदाशिवरावभाऊंना बाण न लागता तर पुढे मराठी राज्याची वाटचाल कशी झाली असती अशी कथा रंगवली आहे!) कोणाचं चुकलं, काय चुकलं वगैरे चर्चा होतील. पण एक सत्य मात्र कधीही पुसलं जाणार नाही. आपल्या घरापासून दूर, परक्या अनोळखी मुलखात छातीत एखादा तीर घेऊन अथवा जिव्हारी लागलेला तरवारीचा घाव सहन करत, घरची आठवण डोळ्यात घेऊन असंख्य वीर मृत्यू पावले. चूक कोण होतं, बरोबर कोण होतं, कोण देशभक्त आणि कोण परके हल्लेखोर हे ज्याने त्याने आपापल्या मगदुराप्रमाणे आणि विचरसरणीप्रमाणे ठरवावं. मरणारा कोणी सातार्‍याकडचा असेल तर कोणी जलालाबादचा असेल. पण तो मेला पानपतावर हे त्यांच्यातलं साम्य मात्र कधीच पुसलं जाणार नाही. मरायच्या आधी ते मराठे, गिलचे, रोहिले, बुंदेले, दुर्राणी, गारदी होते. मरताना मात्र ते सगळे केवळ असहाय, तडफडणारे, पाण्याच्या एका घोटाला मोताद झालेले मानव होते.

इतिहासाबद्दल पवित्रे असू शकतील माणसांचे, परंतु जे मेले त्यांच्या ’human story' बद्दल कोणाचंही दुमत असणं शक्य नाही.

जेव्हापासून पानिपतला जायचा विषय सुरू झाला तेव्हापासून ’काहीही झालं तरी यु्द्धस्मारक बघायचंच’, असा निश्चयच केला होता. अवांतर वाचन कायमच चालू असतं, त्यानुसार 'आता पानिपतावर काही आहे का?' यावर फार पूर्वीच नेटवर शोधलं होतं. त्यानुसार तिथे अगदी आत्ता आत्ता पर्यंत एक काळा पडलेला आंब्याचा वृक्ष होता हे समजलं होतं. असं म्हणतात की, युदधाच्या धामधुमीत हा आंबा काळा पडला होता. ही दंतकथाच असावी. पण, हा आंबा जिथे होता तिथेच, त्याच विस्तिर्ण मैदानात लढाई झाली होती हे मात्र सत्य आहे. याच झाडावरून, या स्थळाचे नाव ’काला आंब’ असे पडले. काही वर्षांपूर्वी हा ’काला आंब’ जमीनदोस्त झाला. नंतर सरकारने याच जागी एक विस्तिर्ण स्मारक बांधले. तेच हे युद्ध स्मारक.

हे स्मारक खुद्द पानिपतातच आहे की थोडे लांब आहे वगैरे काहीच माहिती नव्हती. इथे पोचलो तेव्हा हे ही लक्षात आले की, मी पानिपतपासून १८-२० किलोमीटरवर एका गावात असेन. शिवाय, स्वत:चे हक्काचे वाहनही नसणार होते. त्यामुळे, स्मारकाला भेट देता येईल की नाही याबद्दल धाकधुक वाटू लागली. कसे जमते ते बघू, असा विचार करून स्वस्थ बसलो. एक दोन दिवस गेल्यावर चाचपणी सुरू केली. आमची व्यवस्था ज्याच्या जिम्मे होती त्याच्याकडे हळूच विषय काढला.

’अरे, **जी, वो पानिपतमे एक युद्ध स्मारक है ना? काला आंब कहते है उसे. कितना दूर है?’

’अरे, सरजी, क्या करियेगा वहां जा के? कुछ नही है वहां. उससे अच्छा की आप कुरूक्षेत्र चले जाइयेगा. पुण्यभी कमा लेंगे! ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!’

’अरे ऐसा ना कहियेगा साबजी! मै महाराष्ट्रसे हूं और हमारे लिये वो जगह किसी तिरथसे कम नही!’

माझा फट्टकन आलेला जवाब ऐकून **जी चपापले. (माझ्याजागी तू असतास तर बहुधा पानिपतात अजून एक स्मारक बांधावं लागलं असतं... **जींचं! Wink ) त्यांनी त्यानंतर माझं बोलणं हसण्यावारी नेलं नाही. पहिल्याच रविवारी जावं असा बेत होता. पण गाडी उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो बेत बारगळला. मग दुसर्‍या रविवारी जमवलंच. मात्र, तडजोड म्हणून बरोबरच्या सहकार्‍यांच्या मताला मान देवून सकाळी कुरूक्षेत्र आणि दुपारी (भर उन्हात) काला आंब असं नियोजन करावं लागलं.

काला आंब खुद्द पानिपत गावापासून पाचेक किलोमीटरवर आहे. शेवटपर्यंत चांगली पक्की सडक आहे. स्मारकाच्या आजूबाजूला विरळ वस्ती आहे. स्मारकाची जमिन सोडल्यास शेती आहे सगळीकडे. स्मारक प्रशस्त आहे. सरकारने खरंच खूप उत्तम स्मारक बांधलं आहे आणि देखभालही उत्तम होत असावी असं जाणवलं. स्मारक म्हणजे खरं तर एक खूप मोठं उद्यान आहे. झाडं आहेत, हिरवळ आहे, पाण्याची कारंजी आणि छोटी तळीही आहेत. कारंजी आणि तळी सध्या कोरडी आहेत. पण अधून मधून वापरात असावीत.

स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत शिरतो. समोरच पानिपतच्या तिन्ही यु्द्धांबद्दल हिंदी व इंग्रजीत संक्षिप्त माहिती देणारे फलक लावले आहेत. जागा प्रशस्त असल्यामुळे गाड्या पार्क करायला काहीच अडचण नाही. ते फलक बघत आपण पुढे निघतो. ऊन भयानक असल्यामुळे त्रास होत होता. हिरवळ असली तरी, झाडं कमी आहेत आणि चालायच्या मार्गाच्या दुतर्फा नाहीत त्यामुळे स्वत:ला ऊन्हात भाजून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. गाईड किंवा पत्रक असे काही तिथे नाही त्यामुळे स्वत:च शोधत निघालो. थोडा वेळ इकडे तिकडे फिरल्यावर दूरवर एक चबुतरा आणि त्यावर एक स्तंभ दिसला. नेटवर हे दृश्य असंख्यवेळा पाहिल्यामुळे आपल्याला तिथेच जायचं आहे हे लगेच लक्षात आले. त्या रोखाने निघालो.

चबुतर्‍यासमोर जाऊन उभा राहिलो. युद्ध याच मैदानात झालं होतं हे नक्की. पण विश्वासराव अगदी याच स्पॉटवर गर्दीत हरवला, याच स्पॉटवर त्याचे पार्थिव मिळाले, या ठिकाणी ’भाऊ’ हत्तीवरून उतरला आणि स्वत: गर्दीत घुसला, नेमक्या याच स्पॉटवर इब्राहिमखान गारदी आपल्या प्राणप्रिय असलेल्या धन्यांचे, विश्वासराव व सदाशिवरावभाऊ यांचे, अंतिम संस्कार विधीपूर्वक स्वतः करत असताना अफगाण सैन्याच्या हाती इथे सापडला (आणि मुस्लिम असूनही मराठ्यांची बाजू घेतली म्हणून आधीच त्याच्यावर राग होता त्यांचा, त्यात परत हे असले धार्मिक कृत्य करत होता काफरांसाठी म्हणून त्याचे अतोनात हाल करून त्याला मारण्यात आले) व या स्पॉटवर त्याला मारण्यात आलं .... असले नेमके तपशील आता फक्त काळाकडेच आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी ते तपशील स्वत:पुरते बघायचे. आणि अमोल, नेमका इथेच तू हवा होतास. ते तपशील केवळ स्वत: बघायचेच नव्हे, तर इतरांनाही दाखवायचं कसब तुझ्याकडे आहे. मी माझ्यापरीने प्रयत्न केला आणि मला ते बरंचसं जमलं देखील.

कडक उन्हाळ्यातली भर माध्याह्नीची वेळ त्यामुळे तिथे आम्ही तिघे (त्यातला मी सोडता बाकीचे दोघे दूर एका झाडाखाली सावली धरून उभे होते), आमचा ड्रायव्हर (जो गाडीतच बसून होता), टाइमपास करत बसलेली गावातली काही चुकार पोरे आणि सावल्या व आडोसा धरून बसलेली दोन जोडपी सोडल्यास देहधारी सृष्टीतील एकही व्यक्ती नव्हती. कानभरून शांतता दाटलेली होती.

मी ही थोडा वेळ शांतपणे तिथे उभा राहिलो. माझ्या मोबाईलवर गोविंदाग्रजांनी लिहिलेला ’पानिपताचा फटका’ मुद्दाम कॉपी केला होता. तो एकदा वाचला. त्या सर्वच अनाम वीरांना श्रद्धांजली वाहिली आणि तिथून बाजूला झालो.

बाजूलाच काही ठिकाणी युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. पण ते एकंदरीतच तिन्ही युद्धांचे असावेत असे वाटले.

एव्हाना बाकीचे लोक बरेच कावले होते. माझ्या वेडगळपणापायी त्यांनी तरी किती सहन करावे? आणि आमच्या ड्रायव्हर साहेबांना पानिपतमध्ये असलेले ’प्रसिद्ध’ बिगबाझार आम्हाला दखवायचे होते व त्याचीच घाई त्यांना झाली होती. (त्यांच्या मते या बिगबाझारमध्ये असलेली ’अपने आप चलनेवाली सीढी (आप बस खडे रहो, खुद आपको उपर या नीचे ले जाती है)’ बघणे अतिशय महत्त्वाचे होते!!!!) त्यामुळे, परत एकदा चबुतर्‍यासमोर उभा राहिलो आणि परत निघालो.

अमोल, आपण बरोबर तर जाऊ शकलो नाही पानिपत बघायला. पण परत एकदा जाऊ. यावेळी अजून काही गवसते आहे का ते बघू. जमल्यास ’रोड मराठा’ समाजाशी काही संपर्क करता येईल का ते पाहू. (मला खात्री आहे, सह्याद्रीच्या अनेक डोंगर दर्‍यांमध्ये तझी जशी हक्काची घरं आहेत, तशी पानिपत, करनाल परिसरातही तुझी घरं होतील!) जे मराठे तिथेच लपून राहिले आणि तिथलेच बनले त्यांच्या कथा ऐकायला मिळतात का ते पाहू. हे तरी एकत्रपणे अनुभवायला जमतेय का ते पाहुया!

तो पर्यंत हे काही फोटो काढलेत ते बघ.

तुझा,

बिपिनदा.

ता. क. : परतीच्या वाटेत रस्त्यात एक ’रोहिला टायर वर्क्स’ नावाचे दुकान दिसले. त्या ’रोहिल्या’ला या युद्धाबद्दल काय वाटत असेल? एकदा भेटून गप्पा मारल्या पाहिजेत त्याच्याबरोबर.

बिपिनदा.

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मै महाराष्ट्रसे हूं और हमारे लिये वो जगह किसी तिरथसे कम नही!’ >>>>> यापलिकडे अजून काय भावना असणार मराठी माणसाच्या ????

म्हणलं तर, अजूनही भळभळणारी जखम आहे. >>>>>> अग्दी अग्दी ....

श्रीमंत सदाशिवरावभाऊ, विश्वासराव व त्यांच्याबरोबर लढलेल्या सर्व वीरांना साश्रुपूर्ण आदरांजलि .....

अवांतर - गोविंदाग्रजांनी लिहिलेला ’पानिपताचा फटका’ इथे कृपया देणार का ??

पानिपताचा फटका

कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥धृ॥

जासुद आला कधी पुण्याला – “शिंदा दत्ताजी पडला;
कुतुबशहाने शिर चरणाने उडवुनि तो अपमानियला ।”
भारतवीरा वृत्त ऐकता कोप अनावर येत महा
रागे भाऊ बोले, “जाऊ हिंदुस्थाना, नीट पहा.
‘काळा’शी घनयुद्ध करू मग अबदल्लीची काय कथा ?
दत्ताजीचा सूड न घेता जन्म आमुचा खरा वृथा.”
बोले नाना, “ युक्ती नाना करुनी यवना ठार करा;
शिंद्यांचा अपमान नसे हा; असे मराठ्यां बोल खरा.”
उदगीरचा वीर निघाला; घाला हिंदुस्थानाला;
जमाव झाला; तुंबळ भरला सेनासागर त्या काळा.
तीन लक्ष दळ भय कराया यवनाधीशा चालतसे;
वृद्ध बाल ते केवळ उरले तरुण निघाले वीररसे.
होळकराचे भाले साचे, जनकोजीचे वीर गडी,
गायकवाडी वीर आघाडी एकावरती एक कडी.
समशेराची समशेर न ती म्यानामध्ये धीर धरी;
महादजीची बिजली साची बिजलीवरती ताण करी.
निघे भोसले पवार चाले बुंदेल्यांची त्वरा खरी;
धीर गारदी न करी गरदी नीटनेटकी चाल करी.
मेहेंदळे अति जळे अंतरी विंचुकरही त्याचपरी;
नारोशंकर, सखाराम हरि, सूड घ्यावया असी घरी.
अन्य वीर ते किती निघाले गणना त्यांची कशी करा ?
जितका हिंदू तितका जाई धीर उरेना जरा नरां.
भाऊ सेनापती चालती विश्वासाते घेति सवे,
सूड ! सूड !! मनि सूड दिसे त्या सूडासाठी जाति जवे.
वीररसाची दीप्ती साची वीरमुखांवर तदा दिसे;
या राष्ट्राचे स्वातंत्र्याचे दृढस्तंभ ते निघति असे.
वानर राक्षस पूर्वी लढले जसे सुवेलाद्रीवरती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥1॥

जमले यापरि पानपतावरि-राष्ट्रसभा जणु दुसरि दिसे;
वीर वीरमदयुक्त सभासद सेनानायक प्रतिनिधिसे.
अध्यक्ष नेमिले दक्ष भाउ अरि भक्ष कराया तक्षकसे;
प्रतिपक्षखंडना स्वमतमंडना; तंबू ठोकिति मंडपसे.
शस्त्रशब्द ही सुरस भाषणे सभेत करिती आवेशे;
रणभूमीचा कागद पसरुनि ठराव लिहिती रक्तरसे.
एका कार्या जमति सभा या, कृति दोघांची भिन्न किती !
बघता नयनी बाहतीलची पूर अश्रूंचे स्वैरगति.
पूर्ववीरबल करांत राहे, आहे सांप्रत मुखामधी;
हाय ! तयांचे वंशज साचे असुनी झाले असे कधी !
जमले यापरि पानपतावरि भारतसुंदरीपुत्र गुणी
युद्ध कराया, रिपु शिक्षाया, संरक्षाया यशा रणी ॥2॥

अडदांड यवन रणमंडपि जमले; युद्धकांड येथोनि सुरू.
करिती निश्चय उभयवीर रणधीर “मारु वा रणी मरू.”
पुढे पडे दुष्काळ चमूंमधि अन्न न खाया वीरांना;
म्हणती, “अन्नावांचुनि मरण्यापेक्षा जाऊ चला रणा.”
मग सेनेने एक दिलाने निश्चय केला लढण्याचा;
स्वस्थ होळकर मात्र नीचतर पगडभाई तो यवनांचा.
परधान्यहरणमिष करुनि रणांगणि पढले आधी बुंदेले;
श्रीशिवराया युद्ध पहाया हाक द्यावया की गेले ?
धन्य मराठे! धन्य यवन ते रणांगणामधि लढणारे !
आम्ही त्यांचे वंशज केवळ हक्कांसाठी रडणारे
आवेश प्रवेशे दोन्ही सैन्यामधे कराया युद्धखळी;
परि स्वार्थ अनिवार मार दे, आर्यजनांमधि करि दुफळी.
आर्यजनांचे दैवहि नाचे अभिमानाचे रूप धरी;
करि वसति मनि सदाशिवाच्या; होय अमुच्या उरा सुरी.
सुरासुरी जणु डाव मांडिला बुद्धिबळाचा भूमिवरी;
परि दुर्दैवे वेळ साधिली आली अम्हावरी !
कलह माजला, झालि यादवी, नविन संकट ओढवले;
कारस्थानी हिंदुस्थाना व्यापुनि पूर्णचि नागविले.
कुणि यवनांचा बाप जाहला, ताप तयाचा हरावया,
नया सोडुनी जया दवडुनी कुणी लाविला डाग वया.
कुणि दिल्लीची वाहि काळजी, कोणी तख्तासाठि झुरे;
कुणा लागला ध्यास प्रीतिाचा विचार सारासारि नुरे.
“लालन लालन !” करि कुणि, साधी मर्जीनेची कुणि मरजी;
असे घसरले, साफ विसरले युद्धरीति अति खडतर जी.
गारदीच मज फार रुचे जरि यवन न सोडी विश्वासा;
निजबंधूंची करणी ऐकुनि सोडि, वाचका, नि:श्वासा !
कलहा करिती काय विसरती क्षुद्र वस्तुच्या अभिमाने,
जसे हल्लिचे लोक तोकसम कलहा करिती नेमाने.
नेमानेमाच्या या गोष्टी कष्टी होते मन श्रवणी
असो; बुडाली एकी, बेकी राज्य चालवी वीरगणी.
सरदारांच्या बुद्धिमंदिरा आग लागली कलहाची
शिपाइभाई परि नच चळले; रीति सडिलि न मर्दाची.
नाही लढले, लढणारहि नच कुणी पुनरपि या जगती;
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥3॥

एके दिवशी रवि अस्ताशी जाता झाला विचार हा –
“प्रात:काली स्मरुनी काली युद्ध करू घनदाट महा. ”
निरोप गेला बादशहाला, “ युद्ध कराया उद्या चला;
समरात मरा वा कीर्ति वरा जय मिळवुनि आम्हावरि अचला.”
सकल यामिनी आर्यवाहिनी करी तयारी लढण्याची;
वीरश्रीचा कळस जाहला परवा न कुणा मरणाची.
परस्परांते धीर मराठे गोष्टि सांगती युद्धाच्या,
वीरश्रीच्या शस्त्रकलेच्या जयाजयांच्या अश्वांच्या.
बोले कोणी, “ माझा न गणी वंशचि मृत्यूभयासि कधी;
आजा, पणजा, बापहि माझा पडला मेला रणामधी.
बापसवाई बेटा होई खोटा होइल नेम कसा ?
पोटासाठी लढाइ नच परि मान मिळविण्या हवा तसा !”
कुणी धरी तलवार करी तिस पाहुनि आनंदे डोले,
फिरवी गरगर करि खाली वर वीर मराठा मग बोले –
“ अफाट वाढीची ही बेटी मोठी झाली लग्नाला
प्राणधनाचे द्याज घउनी उद्याच देइन यवनाला.”
अशी चालली गडबड सगळी निद्रा कोणा नच आली;
कोठे गेली कशी पळाली रात्र न कोणाला कळली.
प्रभातरूपे ईर्षा आली; भीति पळाली निशामिषे;
भय मरणाचे कैंचे त्यांना ? काय करावे हरा विषे ?
शिंग वाजले संगरसूचक कूच कराया निघे मुभा;
धावति नरवर समरभूमिवर; राहे धनगर दूर उभा.
हटवायाते देशदरिद्रा मुखा हरिद्रा लावुनिया,
कीर्तिवधूते जाति वराया समरमंडपी धावुनिया.
शहावलीचा हलीसारखा अताइ नामा पुत्र बली
यवनदली मुख्यत्व घेत की पापावलिमधि जसा कली.
प्रणव जसा वेदांस, सदाशिव तसा आर्यबलसेनानी;
विश्वासाते पाहुनि वदनी अंगुलि घातलि यवनांनी.
आले यापरि रणभूमीवरि; जसे गात कवि यापुढती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥4॥

वाढे जैसा दिवस, वाढले युद्ध तसे अतिनिकराने
हातघाइला लढाइ आली; अंबर भरले नादाने.
उभय वीरवर गर्जति ‘हरहर’, ‘अल्ला अकबर’ उल्हासे;
भासे आला प्रळय; यमाला दिली मोकळिक जगदिशे.
अश्ववीरगज भक्तमंडळी गोंधळ भारतदेवीचा;
तलवारीच्या दिवठ्या केल्या; सडा घातला रक्ताचा.
धूळ उडाली गुलाल झाली; “उदे” गर्जती भक्तबळी,
परस्परांचे बळी अर्पिती भूमि तर्पिती शिरकमळी.
रणवाद्य भयंकर भराड वाजे शुद्ध न कोणा देहाची;
रणमदमदिरामत्त जाहले, हले फणाही शेषाची.
मनुजेंद्रबला जणु अंत न उरला देवेंद्राची नच परवा
म्हणुनि धूलिकण नभी धाडुनी मेघसंघ की रचिति नवा ?
रक्तपाट अतिदाट वाहती घाट बांधिले अस्थींचे;
मृतगजतुरंग मकर खेळती कृत्य अगाधचि वीरांचे.
घोर कर्म हे बघुनी वाटे रविहि धरी निजसदनपथा;
कांपे थरथर स्थीर न क्षणभर; इतरांची मग काय कथा !
यापरि चाले लढाइ; भ्याले दाढीवाले, मग हटले;
पळती, धावति सैरावैरा; आर्यवीर त्यावरी उठले.
आर्यजनां आवेश नावरे; भरे कांपरे यवनांला;
म्हणति “मिळाला जय हिंदूंला लढाइ आली अंताला !”
तोच अताई दूरदृष्टिचा धीर देत निजसैन्याला,
स्वये धावला, पुढे जाहला, स्फूर्ति पुन्हा ये यवनाला.
त्वरित पूर्ववत् समर चालले, हले भरवसा विजयाचा;
दाढी शेंडी एक जाहली खेळ शहाच्या दैवाचा.
करी अताई जबर लढाई नाही उपमा शौर्याला;
त्यावरि ये विश्वास, भासले की खानाचा यम आला !
विश्वासाने अतिअवसाने खान पाडिला भूमिवरी
करिवरचरणी मरणा तया ये, शरश एक मग यमनगरी.
धीर सोडिती वीर शहाचे पळती आवरती न कुणा;
शहावलीची कमाल झाली यत्न तयाचा पडे उणा.
पहात होता शहा खेळ हा दुरुनी, तोही घाबरला,
म्हणे, “करावे काय ? न ठावे !” दैव हात दे परि त्याला.
दक्ष वीर लक्षैकधीर तनुरक्षक सेनेसह धावे;
म्हणे चमूला, “पळति यवन जे कंठ तयांचे छेदावे.”
पुन्हा उलटले यवन लढाया हुकुम ऐकता हा त्याचा;
शहा तयांचे सहाय होता मारा करितो जोराचा.
जसे लढावे वीर संगरी कविजन इच्छा मनि करिती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥5॥

नभोमध्यगत सूर्य होत मग युद्धहि आले मध्याला;
हाय ! हाय ! या आर्यभूमिचा भाग्यसूर्य तो शेवटला !
सदा अम्हाला विजय मिळाला, प्रताप गावा जगताने;
परि त्या काळी फुटक्या भाळी तसे न लिहिले दैवाने !
सदाशिवाचा उजवा बाहू राहु रिपुस्त्रीमुखविधुचा,
बाऊ केवळ म्लेंच्छजनांचा, भाऊ माधवरायाचा,
बेटा ब्राह्मण बादशहाचा, पेटा साचा वाघाचा,
वीरफुलातील गुलाबगोटा, वाली मोठ्या धर्माचा,
ताण जयाची द्रौणीवर उद्राण अणिता आर्याला,
विजयाचा विश्वास असा विश्वास – लागला शर त्याला !
मर्म हाणि तो वर्मी लागे कर्म आमुचे ओढवले;
धर्म – सभेला आत्मा गेला, धर्मवधूकरि शव पडले.
अश्रू नयनी आणी लक्ष्मी प्रिय भार्या त्या आर्याची;
उत्तरे चर्या, अघा न मर्या, परि ये स्मृति तिस कार्याची.
करी विचारा वीराचारा दारा वीराची स्वमनी –
“नाथघात सैन्यात समजता धीर उरेल न आर्यजनी. “
छातीचा करि कोट, लोटिला दु:खलोट अनिवार जरी,
नीट बैसवी प्रेता देवी धनुष्य त्याच्या दिले करी.
धन्य सती ती ! धन्य तिचा पती ! धन्यचि जननीजनकाला !
धन्य कवीचे भाग्य असे या म्हणुनि मिळे हे गायाला !
परि जे घडले लपेल कुठले ? वेग फार दुर्वार्तेला;
अल्पचि काळे भाउस कळले – “गिळले काळाने बाळा !”
“ हाय लाडक्या ! काय कृत्य हे ? घाय काय हा भान करी
गोंडस बाळा, तोंड पुण्याला दावु कैसे ? कथि तोड तरी,”
असा करी तो शोक ऐकुनी दु:ख जाहले सकळांला
अश्वावरती स्वार जाहला भाऊराया मरण्याला.
व्यंग समजता भंग कराया आर्यांच्या चतुरंग बळा
सिद्ध जाहला शहा; तयाला देवाने आधार दिला.
फिरती मराठे आला वाटे अंत शिवाजीराज्याला;
भाऊराया योजि उपाया – तोही वाया परि गेला.
मान सोडिला, साम जोडिला; दूत धाडिला होळकरा;
प्रसंग येता मत्त किंकरा धनी जोडिती असे करां.
दूत निघाला, सत्वर आला, होळकराला नमन करी;
म्हणे, “ भाउचा निरोप ऐका – ‘साह्य करा या समयि तरी.
उणे बोललो, प्रमत्त झालो, बहु अपराधी मी काका;
माफ करा, मन साफ करा, या आफतीत मज नच टाका.
मत्प्राणाची नाही परवा बरवा समरी मृत्यु हवा;
परी लागतो डाग यशाला शिवरायाच्या तो दुरवा.
देशकार्य हे व्यक्तीचे नच; सक्ति नको; भक्तीच हवी;
आसक्ती सर्वांची असता मिळवू आता कीर्ति नवी.
राग नका धरु, आग लागते यशा; भाग हा सर्वांचा;
शब्द मुलाचा धरिता कैचा ? हाच मान का काकाचा ?
साह्य कराया यवन वधाया धीर द्यावया या काका ! ’ ”
असे विनविले, हात जोडिले, दया न आली परि काका.
रट्टा दे भूमातेला; शरि कट्टा वैरी मान तिची
बट्टा लवी वयास; केली थट्टा ऐशा विनतीची;
दु:खावरती डाग द्यायला करी होळकर हुकूम दळा –
“ पळा, मिळाला जय यवनाला !” काय म्हणावे अशा खळा ?
फिरले भाले-भाले कैंचे ? दैवचि फिरले आर्चांचे;
पाहे भाऊ, वाहे नयनी नीर; करपले मन त्याचे.
निरोप धाडी पुन्हा तयाला- “पळा वाचवा प्राण तरी
पळताना परि कुटुंबकबिला न्यावा अमुचा सवे घरी;
देशहिताची करुनी होळी नाम होळकर सार्थ करी !
करी दुजा विश्वासघात हा; निजबंधुंच्या दे साची
परवशतेची माथी मोळी, हाती झोळी भिक्षेची !
काय कथावी युद्ध-कथा ? मग वृथा भाउचा श्रम झाला;
धीर सोडुनी पळति मराठे, पूर्ण पराभव त्यां आला.
कोणी वेणीमाधव धावे, वार तयाच्या शिरी जडे;
भारतरमणीकंठतन्मणी धरणीवरती झणी पडे.
भूदेवीची तुटे गळसरी ! फुटे दैव की आर्यांचे
आकाशाची कु-हाड पडली; कडे लोटले दु:खाचे !
सैरावैरा आर्य धावती; हरहर ! कोणी नच त्राता !
यवन करिति ज्या मग प्रळय भयंकर; वदा कशाला तो आता ?
वर्णन करिता ज्या रीतीने कुंठित होइल सुकविमति,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥6॥

सन सतराशे एकसष्ट अतिनष्ट वर्ष या देशाला
हर्ष मरे, उत्कर्ष उरेना; सकळा आली प्रेतकळा.
फुटे बांगडी दीड लाख ती; राख जहाली तरुणांची
आग पाखडी दैव अम्हांवर; मूर्ति अवतरे करुणेची.
घरोघरी आकांत परोपरि; खरोखरीचा प्रळय दिसे;
भरोभरी रक्ताच्या अश्रू अबला गाळिति शोकरसे.
‘ दोन हरवली मोति, मोहरा गेल्या सत्तवीस तशा;
रुपये खुर्दा न ये मोजिता ’ – वचना वदती वृद्ध अशा;
घोर वृत्त हे दूतमुखाने कानी पडले नानाच्या;
‘भाऊ भाऊ ’ करिता जाई भेटिस भाऊरायाच्या.
उघडा पडला देश तयाते हे नव संकट का यावे !
दु:ख एकटे कधि न येत परि दु:खामागुनि दु:ख नवे !
धक्का बसला आर्ययशाला; तेथुनि जाई राज्य लया,
रघुनाथाचे धैर्य हरपले, जोड उरेना हिमालया.
“नाथ ! चालला सोडूनि अबला ! पाहू कुणाच्या मुखाकडे ? ”
“ बाळा ! कैसा जासि लोटुनि दु:खाचे मजवरति कडे ? ”
जिकडे तिकडे हंबरडे यापरी परिसती जन फिरता;
कोणिकडेही तरुण दिसेना; सेनासागर होय रिता.
उडे दरारा, पडे पसारा राज्याचा; बळ घेत रजा;
उघडे पडले मढे हत्तिचे कोल्हे त्यावरि करिति मजा !
भलते सलते पुढे सरकले, खरे बुडाले नीच-करी.
मालक पडता नीट बैसले पाटावरती वारकरी.
नडे आमुची करणी आम्हा; खडे चारले यवनांनी;
पडे पडोनी यशपात्राला रडे सदोदित भूरमणी.
गंजीफांचा डाव संपला दिली अखेरी यवनांते
स्वातंत्र्यासह सर्वस्वाते दूर लोटिले निज हाते.
रूमशामला धूम ठोकिता पुणे हातिचे घालविले;
दुग्धासाठी जाता मार्गी पात्र ठेवुनी घरि आले !
करि माधव नव उपाय पुढती परि ते पडती सर्व फशी;
परिटघडी उघडल्या एकदा बसेल कैशी पुन्हा तशी ?
जसा नदीचा ओघ फिरावा पात्री पडता गिरिशिखरे
पानपताच्या पर्वतपाते इतिहासाचा ओघ फिरे.
इतिहासाचे पान येथचे काळे झाले दैवबळे,
या देशावर अपमानाची स्वारी दु:खासहित वळे.
सर्वस्वाचा नाश जयाने वर्णु तयाते अता किती ?
व्यास वर्णिता थकेल याते मग मी कोठे अल्पमति ?
जसे झगडता त्वरित फिरावी सकल जगाची सरल गति
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥7॥

जे झाले ते होउनि गेले फळ नच रडुनी लेशभरी;
मिळे ठेच पुढल्यास मागले होऊ शहाणे अजुनि तरी.
पुरे पुरे हे राष्ट्रविघातक परस्परांतिल वैर अहो !
पानपताची कथा ऐकुनी बोध एवढा तरि घ्या हो !
भारतबांधव ! पहा केवढा नाश दुहीने हा झाला !
परस्परांशी कलहा करिता मरण मराठी राज्याला.
हा हिंदू, हा यवन, पारशी हा, यहुदी हा भेद असा
नको नको हो ! एकी राहो ! सांगु आपणां किती कसा ?
एक आइची बाळे साची आपण सारे हे स्मरुनी,
एकदिलाने एकमताने यत्न करू तद्धितकरणी.
कथी रडकथा निजदेशाची वाचुनि ऐसा हा फटका
लटका जाउनि कलह परस्पर लागो एकीचा चटका !
कौरव-पांडव-संगर-तांडव द्वापर-काली होय अती
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती ॥8॥

- गोविंदाग्रज

_/\_

पानिपत तर अजुनही वाहणारी जखम आहेच.....

पण माझे डोळे भरुन आले ते - भारतात (असुन सुद्धा ) असे स्वछ आणि निगा राखलेले स्मारक बघून....

बाकी तुमच्या लेखाला अन "वेडगळपणाला" _/\_ _/\_.............

श्रीमंत सदाशिवरावभाऊ, विश्वासराव व त्यांच्याबरोबर लढलेल्या सर्व वीरांना साश्रुपूर्ण आदरांजलि .....

पानिपताच्या बाबतीत आपण सगळे वेडे,
आपल्या सगळ्यांच्याच पुर्वजांनी देह ठेवलाय तिथे....

काकासाहेब गाडगीळ हे पंजाबचे राज्यपाल असतानाच्या काळात, ते त्यांना थोडी फुरसत मिळताच असेच अतीवशा अनामिक ओढीने काला आमपाशी जायचे. रेंगाळायचे. रडायचे देखिल

त्यांच्यामुळेच हे स्मारक बनवण्याला चालना मिळाली असे वाचल्याचे स्मरते.

श्री. बिपिन कार्यकर्ते - हा अप्रतिम फटका इथे लगोलग दिल्याबद्दल शतशः आभारी आहे. यातील शब्द न शब्द काळजाला भिडणारा आहे.

तुमचा हा लेखही अप्रतिम आणि केवळ ह्रदयस्पर्शी आहे.

हृदयातील एक सल परत जागृत झाला....
हा सल मराठी मनांमधे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पिढ्या दर पिढ्या जपला जाईल याची खात्री आहे.

बिपिनजी....

अतिशय भावपूर्ण असे पत्र लिहिले आहे तुम्ही एका मित्राला जे तितकेच अभ्यासपूर्णही आहे. जयाची चिन्हे आपण मिरवित असतोच.... त्यात काहीच गैर नाही. पण काहीवेळी अपयशाची ठिकाणेही आपल्या डोळ्यातून अश्रू काढताना दिसावी लागतातच. पानिपत (लेखातील फोटोत सर्वत्र 'पानीपत' असेच दिसत्ये...नेमके कोणते रुप योग्य मानावे या नावाचे ?) ही एक अशी भळभळत राहाणारी जखम आहे. त्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न करत राहणे हा इतिहासाचा छंद असणारी नित्यनेमाने करत राहतात. त्यामुळेच असेल कदाचित हे गाव कायमचे आपल्या रक्ताशी जोडले गेले आहे.

त्या निळ्या बोर्डवरील हिंदीतील मजकूर वाचला. मराठा सैन्याच्या पराभवाची जी काही कारणे असतील त्यामध्ये "असैनिक सेवादारो और शाही लोगोंके पत्नीयोंका बडा दल....." याचाही न चुकता उल्लेख केला गेला आहे. तेच प्रमुख कारण असेल वाताहातीचे.

मै महाराष्ट्रसे हूं और हमारे लिये वो जगह किसी तिरथसे कम नही!’ >>>>> यापलिकडे अजून काय भावना असणार मराठी माणसाच्या ????>>>>>>>>+१००

खरंच वाचताना डोळे भरून आले. खुप सुंदर लेख.

गोविंदग्रजांचा फटका सुध्दा मस्त!!!

छान लेख व फटका.
धनवंती यांची भारतात असून सुद्धा ही कमेंट अप्रस्तुत वाटली. देअर आर समथिंग्ज बिगर दॅन द डिफरन्सेस इन कंट्रीज. पीपल हॅव डाइड हिअर.

काही जखमा विसरता न येणार्‍या. पानिपतही त्यातलीच एक जखम. मनातले सल आणि शिकलेले धडे पुढील पिढीकडे सोपवणे एवढे नक्कीच करण्यासारखे.
नेहमी प्रमाणेच सुरेख लेख! गोविंदाग्रजांचा फटका इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

मी २०१३ मध्ये गेलो होतो. खास पानिपतला भेट द्यायची म्हणून.

अंबालाच्या टोल नाक्यावर विचारले तर तो म्हणाला काही नाही, सरळ जयपुरकडे जाऊन पुण्याकडे वळा. पण गेलो. मग कुणीतरी काला आंब कडे जा म्हणाले, मग तो रस्ता विचारत विचारत पानिपतच्या बाहेर पडलो. तिथे हे स्मारक दिसले.

अर्धा तास त्या गार्डन मध्ये बसलो होतो. डोन्ट नो काय वाटले पण त्यातील १०-१२ मिनिटे मी युद्ध कसे झाले, नदी कुठे होती, भाऊ कुठे असतील हे इमॅजिन करत होतो. जस्ट टू मच. भरून आले होते तेंव्हा.

तिथे काहीही नाही, फक्त तो वरचा बोर्ड आहे की इथे तिन युद्ध झाली. खूप वाईट वाटले. ते गार्डनही खूप मोठे वगैरे नाही.

जगाच्या पाठीवर कुठे ही असलो तरी "पानिपत" शब्द ऐकला कि मराठी माणसाच्या मनात काहीतरी हलत.
किती पिढ्या आल्या आणि गेल्या. तरीही ती ओढ काही मरत नाही. यात च काय ते आल.
अजून काय लिहिणार? सुंदर लेख.
राम गणेश गडकरी यांनी लिहिलेला फटका दिल्याबद्दल शतश: आभार.

असामी,

>> पानिपत नेहमीच भळभळती जखम राहणार.

एका अर्थी बरोबर आहे. पण आपण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर जगातला हा एकमेवाद्भुत संग्राम आहे ज्याच्यात जेता पक्ष तह करायचं सोडून आपल्या घरी झपाट्याने परतला. शिवाय हा संग्राम त्या काळी जगात ज्ञात असलेल्या इतिहासातला सर्वात मोठा संग्राम होता.

आ.न.,
-गा.पै.

पानिपत हि येक संतापजनक आणि उद्विग्न करणारी पराभवाची कहाणी आहे.,

संताप येतो तो आपल्याच लोकांचा . एक शिवाजी महाराज होते ज्यांनी अत्यंत अपुर्या साधनसामग्री त ( resources - including human resource) युद्ध कसे जिंकावे याचा वस्तुपाठ घालून दिला , योग्य जागी माघार कशी घ्यावी ते शिकवले.

आणि त्यांचेच वंशज - युद्धावर हजारो बाजार बुणगे , बायका , वेश्या , नाच्या आणि trip मारणारे ब्राह्मण घेवून गेले. खरोखर या युद्धात योद्धे आणि बेकार लोक यांचे गुणोत्तर की होते ?
युधाआधीच आपण हरणार होतो - किंवा तीच आपली लायकी होती.

इथे कोठल्याही जातीवर टीका करायची नाही.... पण युद्ध करताना मुहूर्त कसले बघता ? आणि हे मुहूर्त तर पूर्णपणे फासले तरी लोकांचा मुहूर्तावरच विश्वास बसतो .

आणि नेत्यांना फाजील आत्मविश्वास होता म्हणून मुख्य नेता अंबारीत बसून होता .

आणि महाराजांच्या निर्वाणानंतर नेता नसताना लढणारे इथे नेता मारताच गर्भगळीत झाले !

आधुनिक युद्धात युद्धभूमीवर जवळपास सर्व जण युद्ध करू शकतात . खरेच पानिपात्वर हे प्रमाण काय होते ?

माझ्यामते हे दुखद नवे तर संतापजनक प्रकरण आहे ...

Pages