मीच मला पाहतो

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

आजही अॉफिसमधून निघायला उशीरच झाला. आता घरी गेल्यावर आधी अोजसची आणि मग नलिनीची समजूत काढायला लागणार. एरवी नलिनी बायको म्हणून खूपच समजूतदार आहे पण अोजसच्या स्कूल प्रॉजेक्टमध्ये घरी गेल्यावर मदत करायचं मीच कबूल करुन बसलो होतो आणि अोजसच्या बाबतीत माझ्या हातून असं काही झालं की मग मात्र नलिनीचा समजूतदारपणा कुठे नाहीसा होतो कोणास ठाऊक! मग ती ‘अनंतकाळची माता’ असल्याचं सिद्धच करते. याच विचारांच्या नादात मी गाडी चालवत होतो. खरं तर जगजित सिंगच्या गजल ऐकत गाडी चालवली की घरी पोहोचेपर्यंत अॉफिसचा ताण मागे पडतो. पण आज का कोणास ठाऊक, तिकडे लक्ष नव्हतं. घराजवळ पोहोचलो आणि गराज उघडलं तर माझी गाडी आत! माझा विश्वासच बसेना; कसा बसणार? मी आत्ता तर घरी पोहोचलो होतो, अजून गाडीतच बसलेलो होतो आणि समोर माझीच गाडी? मी डोळे चोळून पुन्हा बघितलं - नाही, ती खरंच माझी गाडी होती! तेवढ्यात गराजमधून घरात जायच्या दरवाज्याशी बोलण्याचे आवाज यायला लागले. तशी मी पटकन् गराजचा दरवाजा बंद केला आणि गाडी रिव्हर्समध्ये टाकून तसाच मागे जात-जात शेजारच्या बंगल्याच्या समोर गाडी लावली आणि लगेच बंद केली. फक्त माझ्याबाजूची खिडकी तेव्हढी उघडली. तोवर आमच्या गराजचं दार उघडून तिघं जण बाहेर आले - अोजस, नलिनी आणि मी? कसं शक्य आहे? मी तर अजून गाडीत बसलेलो होतो मग नलिनी आणि अोजसबरोबर मी कसा असेन? पण तो मीच होतो…

‘चला, आत जाऊ. इथे तर कोणीच दिसत नाहिये.’ मी नलिनीला म्हणालो.

‘अहो पण गराजचं दार उघडल्याचा आवाज तुम्हीही ऐकलात आणि हा काय गराजचा दिवाही लागलेला आहे! नक्की कोणीतरी आपलं गराज उघडलं होतं.’ नलिनी मला म्हणाली.

‘अग, होतं असं कधी-कधी! दोन गराजचा कोड एकच असू शकतो. ते गराज उघडायच्याऐवजी चुकून आपलं गराज उघडलं गेलं असेल.’

‘आजवर कधी झालं नाही ते?’

‘नवीन कोणी रहायला आलं असेल जवळपास. जाऊ दे ना, इथे कोणी दिसत नाहिये आणि आपण तिघंही घरी आहोत. चला, अोजस, आपलं प्रॉजेक्टचं काम राहिलंय थोडं, ते करुन घेऊ म्हणजे तुला वेळेवर झोपता येईल.’ बोलता-बोलता तिघंही घराकडे वळले आणि पाहिलं तर सवयीप्रमाणे माझा हात नलिनीच्या खांद्याभोवती होता. ते पाहिलं आणि माझ्या डोक्यात तिडीक गेली! ताबडतोब गाडीतून उतरुन त्याच्या दोन तोंडात द्याव्या असं वाटलं. कसंबसं मी स्वत:ला सावरलं कारण अोजससमोर हा तमाशा मला नको होता.

रात्रभर मी तळमळत गाडीत बसून काढली. अोजसपेक्षा आत्ता माझ्या डोक्यात नलिनीचा विचार घोळत होता. माझी नलू आणि तो रात्रभर…. तिला बिचारीला कल्पनाही नाहिये की मी हा असा तिच्यापासून पंधरा-वीस फुटांवर तिचा विचार करत बसलोय. तिच्या दृष्टीने मी केव्हाच घरी आलो होतो. विचार करुन माझं डोकं फुटेल असं वाटत होतं. खरं तर सोसायटीच्या बाहेर पडून काहीतरी खाऊन घ्यायला हवं होतं कारण मला भूक नाही सहन होत. पण तेवढा वेळही माझ्या घरापासून, नलूपासून मला लांब जायचं नव्हतं! विशेषतः ‘तो’ घरात असताना. तेवढ्यात मला आठवण झाली - अॉफिसमधून निघाल्यावर घरी पोहोचायला ट्रॅफिकमध्ये किती वेळ लागेल याची कधीच खात्री नसते, त्यामुळे नलिनी कायम माझ्या डब्याबरोबर काहीतरी तोंडात टाकायला देत असे. शिवाय गाडीत तिच्या भाषेत एक ‘इमर्जन्सी बॅग’ कायम असते - छोटं फर्स्ट एड किट, बिस्किटाचे एक-दोन पुडे, पाण्याची बाटली, एखादी छत्री. त्या बॅगवरुन मी नेहमी चिडवायचो तिला. पण आत्ता या क्षणी माझ्या नलूची ही खबरदारी किती उपयोगी पडतेय! थोडं पोटात गेल्यावर डोकं दुखणंही किंचीत कमी झालं; पण ‘त्याचा’ विचार आला की परत डोक्यात सणक जायची. ‘हरामखोरा, माझ्या बायकोच्या अंगाला हात लावलास तर बघ!’ मी त्याला मधून-मधून आठवण करुन देत होतो.

पण मुळात ‘तो’ आहे कोण हेच कुठे मला माहीत होतं? दिसायला हुबेहुब माझ्यासारखा, वागणं-बोलणं कशातच फरक नाही. सदाशिवरावांचा तोतया इतिहासात अजरामर झाला, पण या माझ्या तोतयाचं काय? दोन माणसं इतकी कशी सारखी असू शकतात? आणि त्याला माझी, घरची सगळी माहिती आहे म्हणजे बरेच दिवस पाळत ठेऊन असला पाहिजे. मग मला कधी जाणवलं कसं नाही? आणि गाडी? मॉडेल, रंग वगैरे समजू शकतं पण गाडीचा नंबर कसा तोच असेल? एखादी टोळी वगैरे तर नसेल? गाडीची लायसन्स प्लेट काय नकली बनवून घेता येते! पण एवढे कष्ट करायला मी कोण असा वेगळा किंवा महत्त्वाचा आहे? कबूल आहे की एका मल्टीनॅशनल कंपनीचा मी कंपनी सेक्रेटरी आहे. चांगल्यापैकी पगार आहे, नाही म्हटलं तरी सगळ्या गरजा-हौसा भागवून चार पैसे सेव्हिंगमध्ये टाकू शकतो. पण तरी मी काही एकटाच नाही असा. शिवाय नलू किंवा अोजसला पळवलं असतं तर पैशासाठी हे सगळं चाललंय असं समजता येईल. हा पठ्ठ्या तर माझ्याच घरात मी म्हणून मुक्कामाला आलाय, ते ही मी गावात असताना. म्हणजे त्याचं हे बिंग कायम टिकणार नाही हे त्यालाही माहीत असायला हवं. आज तो आधी घरी आला - उद्याही तसंच होईल याची काय खात्री? छे! डोक्याचा भुगा व्हायला लागला होता एव्हाना. पण मी काही करुही शकत नव्हतो. विचार करता-करता दमुन कधीतरी डोळा लागला असावा माझा.

हॉर्नच्या आवाजाने जाग आली तर स्कूल-बस आमच्या घरासमोर उभी होती आणि अोजस बसमध्ये चढत होता. आणि ‘तो’ माझ्या जॉगिंग सुटमध्ये अोजसचं स्कूल प्रॉजेक्ट हातात धरुन आणि नलिनी अोजसचा डबा आणि पाण्याची बाटली घेऊन उभे होते. अोजस त्याच्या बसायच्या जागेवर त्याची सॅक ठेऊन आला असावा. येऊन त्यानी ‘बाबांकडून’ त्याचं प्रॉजेक्ट आणि आईकडून डबा आणि पाण्याची बाटली घेतली. तो परत वळून बसमध्ये चढणार तेवढ्यात ‘त्यानी’ प्रेमाने अोजसचे केस विस्कटले - अगदी माझ्यासारखे. आणि नलूनी त्याचा पापा घेतला. अोजस नेहमीप्रमाणे दोन्ही गोष्टींवर वैतागला.

‘बाबा, रोज तुम्ही माझा भांग बिघडवता आणि आई, पापा घ्यायला मी काय आता के.जी.त जातो का? माझे सगळे मित्र चिडवतात मला.’

त्यावर रोजच्यासारखेच नलू आणि ‘मी’ हसलो. स्कूल बस निघाली. नलिनी आणि त्याने अोजसला बाय केलं. गाडीत बसल्या-बसल्या मीही माझ्या अोजसला हळूच बाय केलं. परत घराकडे पाहिलं तर नलिनी घराकडे वळत होती आणि तो जॉगिंगला निघाला होता. माझ्या गाडीशेजारुन जाताना त्याने माझ्याकडे पाहिलं आणि चक्क हसून हात केला. असा संतापलो मी! ही सगळी काय चेष्टा समजत होता तो? मी तावातावाने गाडीचा दरवाजा उघडला पण एव्हाना तो बराच लांब गेला होता. उगीच त्याच्यामागे पळत जाऊन लोकांचं लक्ष वेधून घ्यायच्या ऐवजी मी पुन्हा गाडीत बसलो आणि हळू-हळू माझ्या रोजच्या जॉगिंगच्या रस्त्याने जायला लागलो. थोड्याच वेळात तो पुढे दिसू लागला. मी गाडी आणखी स्लो केली. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तो टेकडी चढू लागला. नशीबाने टेकडीवर एक देवीचं देऊळ असल्यामुळे रस्ता होता. त्यामुळे मीही टेकडीवर गाडी घेतली. तो खरंच जर माझ्या सगळ्या सवयींप्रमाणे वागत असला तर त्याला कुठे गाठता येईल याचा मला अंदाज होता. टेकडीच्या अगदी वर पोहोचल्यावर तिथल्या ठराविक दगडावर बसून सकाळच्या शांत वातावरणात कोवळं ऊन खात बसायचा माझा रोजचा पायंडा होता. त्या वेळी मला कोणाशी गप्पा मारायला आवडत नसे. एकटं, स्वतःत, आजूबाजूच्या शांततेत हरवून जायला मला आवडायचं. एव्हाना गाडीखालचा रस्ता संपला होता कारण दगड, गवत याशिवाय अवती-भवती काही दिसेना. म्हणजे देऊळही मागे पडलं असावं. एका झाडाखाली मी गाडी पार्क केली आणि उतरलो. दोन जरा मोठे दगड उचलले आणि गाडीच्या मागच्या चाकांच्या मागे लावले. गाडी घसरणार नाही याची खात्री करुन घेतली आणि मी तरा-तरा माझ्या दगडाकडे निघालो.

तिथे पोहोचतो तर काय! हा पठ्ठ्या आधीच माझ्या जागी जाऊन बसला होता. पण कसं शक्य आहे? मी गाडीने आलो होतो आणि तो पळत - तो आधी कसा पोहोचला? तिरिमिरीत मी त्याच्याजवळ गेलो आणि मागचा-पुढचा काही विचार न करता मागून त्याची मानगूट धरुन त्याला दगडावरुन उठवलं.

‘तू समजतोस कोण स्वतःला? असं माझं रूप घेऊन माझ्या घरात राहतो आहेस. अोजसला फसवलंसच आणि रात्री माझ्या नलूला…’

‘अरे, आलास तू? माझ्या अपेक्षेपेक्षा लवकर आलास…’

‘म्हणजे? तुला अजुन मी म्हणून वावरु द्यायला हवं होतं? काय हवंय काय तुला?’

‘हवंय? काही नाही!’

‘हे बघ, मी अजिबात चेष्टा करण्याच्या मूडमध्ये नाहिये. कोण आहेस तू? आणि माझ्या का मागे लागला आहेस?’

‘मी तुझ्यामागे? मी तर तुझ्याआधी या दगडावर पोहोचलो होतो. तूच माझ्या मागे आला आहेस.’ गालात हसत तो म्हणाला.

‘हसू नकोस’ खूप संतापलो की माझा आवाज चिरकतो तश्या चिरकत्या आवाजात मी म्हणालो.

‘बरं, आधी थोडा शांत तर हो! आणि बस इथे. सांगतो तुला सगळं.’ तो.

‘आधी मला सांग तू माझ्या घरात काय करतो आहेस? आणि नलू?’ माझ्या डोक्यातून नलूचा विचार काही जात नव्हता.

‘अरे सांगतो म्हटलं ना सगळं! बस तर…’ तो शांतच होता.

नाईलाजाने मी खाली बसलो. त्यानी माझा दगड बळकावला होता ना! मी आतुन अजुन धुमसतच होतो. ह्या सगळ्या प्रकाराचं काही पटण्यासारखं स्पष्टीकरण असूच शकत नाही!

‘तू कोण आहेस? काय हवंय तुला? हे असं माझ्या घरात माझी जागा घेऊन वागणं बरोबर नाही. माझ्या नलूला आणि अोजसला तू फसवतो आहेस. तुला पैसे हवेत का?’

‘बाप रे! किती प्रश्न विचारतोस तू?’

‘हे बघ, बऱ्या बोलाने माझ्या प्रश्नांची उत्तरं दे!’ माझा आवाज परत चिरकला.

‘इतका का चिडतो आहेस तू? खरं तर तू अगदी शांत माणूस आहेस.’

‘तुला कसं माहीत? म्हणजे बरेच दिवस माझ्यावर पाळत ठेऊन आहेस तर…’

‘तुझ्यावरंच असं नाही; पण साधारण तसंच, आमचं असतं लक्ष.’

‘हां, म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. तुमची टोळी आहे ना?’

‘तसंच काहीसं’

‘हे बघ - माझं काहीही करा तुम्ही पण माझ्या नलूला आणि अोजसला काही केलंत तर बघा…’

‘तू खरं तर जास्त सिनेमे बघत नाहीस, तुझं वाचनही यापेक्षा खूप चांगल्या दर्जाचं आहे - हे इतकं काही-बाही तुला कसं सुचलं? आणि तुझ्या नलूचं आणि अोजसचं म्हणशील तर त्यांना एक क्षणही शंका आली नाही की मी म्हणजे तू नाहीस.’ तो एकाच वेळी मला चिडवतही होता आणि भडकवतही होता. मी पुन्हा त्याच्या अंगावर झेप घेतली त्याचा गळा धरायला म्हणून आणि अचानक माझ्या दगडावर आपटलो; तो तिथे नव्हताच! माझं डोकं भिरभिरायला लागलं - आपटल्यामुळे की तो असा इतक्या झटकन् तिथून उठेल याची कल्पना नसल्यामुळे?

‘अरे हळू! लागलं का?’ माझ्या शेजारुन आलेल्या आवाजात काळजी होती. मी कसाबसा परत बसता झालो आणि आवाजाच्या रोखानी पाहिलं तर तो आता माझ्या उजव्या बाजूला शांतपणे जमिनीवर बसला होता. बहुधा त्यानेच मला दगडावर आपटल्यावर परत बसायला मदत केली असावी कारण कोणीतरी मला धरुन बसायला मदत केली असावी असं आता वाटतंय.

‘मला लागल्याची तुला का चिंता? नाहीतरी माझा काटाच काढणार आहात ना?’ माझं डोकं आधीच तापलेलं होतं, त्यात आपटल्यामुळे दुखायला लागलं होतं.

‘हे असं काही करणार नाही आम्ही. तुला त्रास देण्यात आमचा काय हेतू असणार?’

‘मग काल संध्याकाळपासून तू काय मला मदत करतो आहेस का माझ्या घरात घुसून?’ मी आता पूर्ण वैतागलो होतो. तो बोलत होता पण सांगत काहीच नव्हता.

‘आत्ता पहिल्यांदा तू बरोबर अंदाज केलास!’

‘ही तुझी मदत? माझ्याच घरातून मला बेघर करायचं आणि म्हणायचं मदत करतोय…’ आख्खी रात्र गाडीत बसून काढल्यामुळे अंग आखडल्याची पुन्हा जाणीव झाली. ‘तुझ्यामुळे मला रात्रभर गाडीत बसून रहावं लागलं आणि भुकेनी आता पोटात आग पेटल्यासारखं झालंय. नशीब नलू गाडीत खायला ठेवते काहीतरी कायम.’

‘पण मग तू बाहेर जाऊन खाऊन का आला नाहीस?’

‘बरोबर आहे, तू छानपैकी नलूच्या हातचं जेवलास, रात्रीही घरीच होतास. अोजस आणि नलूच्या काळजीने माझा पाय निघत नव्हता तिथून.’

‘मग तुला काळजी करायचं काही कारण नाही. सगळं व्यवस्थित झालं.’ पुन्हा गालातल्या गालात हसत तो म्हणाला.

‘हे बघ, नलूच्या अंगाला हात जरी लावला असलास ना तू तर माझ्याशी गाठ आहे.’ त्याच्या त्या अर्धवट बोलण्याने भलते-सलते विचार माझ्या डोक्यात यायला लागले. म्हणजे यानी रात्री नलूबरोबर… माझ्या छातीत कल्पनेनीच कळ आली.

‘बरं वाटत नाहिये का तुला? तुझा चेहरा असा का झालाय अचानक?’

‘हे बघ, मी आता हात जोडतो तुझ्यापुढे. तुला काय हवं ते देतो, पण मला आता हे नाही सहन होत. तुझ्या अश्या अर्धवट बोलण्याने नको-नको त्या शंका मनात येताहेत आणि आता खरंच सगळं सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. प्लीज, हा खेळ थांबव आता.’ बोलता-बोलता माझे डोळे आता भरून आले होते.

‘अरे-अरे, नको इतका त्रास करुन घेऊस! तू एक चांगला माणूस आहेस म्हणून तुला मदत करावी इतकाच हेतू होता आमचा. थांब - आता मध्ये काही बोलू नकोस. मी सांगतो ते सगळं नीट ऐक आणि मग बोल. नाहीतर मगापासून आपलं बोलणं पुढे सरकतच नाहिये.

तू तुझ्या मुलाला त्याच्या प्रॉजेक्टमध्ये काल मदत करायचं कबूल केलं होतंस, बरोबर?’

मी फक्त मान डोलावली.

‘त्यासाठी तू अॉफिसमधून थोडा लवकर निघणार होतास. तशी परवानगीही घेतली होतीस. पण नेमकं निघायच्या वेळेला एक अत्यंत अर्जंट आणि महत्त्वाचं काम आलं जे अजिबात पुढे ढकलणं शक्य नव्हतं. नाईलाजाने तू काम करायला घेतलंस आणि मग त्यात इतका हरवलास की आपल्याला लवकर घरी जायचं होतं हे ही विसरलास. काम हातावेगळं झाल्यावर उठता-उठता तुझ्या लक्षात आलं की आपण अोजसला लवकर येऊन त्याच्या प्रॉजेक्टमध्ये मदत करायचं कबूल केलं होतं. त्याक्षणी तू उठलास आणि लॅपटॉप बॅगमध्ये टाकून, जेमतेम सगळ्या फाईल्स लॉक करुन जवळ-जवळ धावत लिफ्टकडे गेलास. लिफ्ट तळमजल्यावर पोहोचायला फार वेळ घेतेय असंही मनात आलं ना तुझ्या?’

मी पुन्हा मान डोलावली. तो बोलायला लागल्यापासून मी भारावल्यासारखा ऐकत होतो.

‘गाडी सुरु केलीस, पण तुझं लक्ष सगळं घराकडे लागलेलं होतं. तुझ्या आवडीची गाणीही तू ऐकत नव्हतास.’

‘हे सगळं इतकं बारीक-सारीक तुला कसं माहीत?’

‘सांगतो. आधी काय-काय झालं ते तर ऐक! तर तू घरी पोहोचलास आणि सवयीनी गराजचा दरवाजा उघडलास तर तुझी गाडी आत होती, बरोबर?’

‘हो, एक क्षण मला काही समजेचना की मी आत्ता पोहोचतोय आणि माझी गाडी कशी गराजमध्ये? मी गाडी मागे घेऊन शेजारच्या बंगल्याच्या समोर लावून बंद करतोय तोवर तू, नलू आणि अोजस बाहेर आलात. मला गाडीतून बाहेर पडून नलूला अोरडून सांगावंसं वाटत होतं की मी इथे आहे, अोजसला सांगायचं होतं की सॉरी राजा, आयत्या वेळी बाबाला काम आलं म्हणून मी लवकर नाही येऊ शकलो. पण तोवर तुम्ही परत घरात जायला निघाला होतात. आणि तू नलूच्या खांद्याभोवती हात का ठेवला होतास? मला तेव्हाच तुझी गचांडी पकडाविशी वाटत होती!’

‘तुझी सवय आहे तशी म्हणून फक्त हात ठेवला होता.’

‘पण हे सगळं कशासाठी? आणि तू आहेस तरी कोण?’

‘तुम्ही ज्यांना एलियन म्हणता ते… घाबरु नकोस! सगळेच एलियन काही दिसायला विचित्र किंवा वाईट नसतात.’

‘एलियन? काहीही फेकतो आहेस तू आता… आणि आम्ही म्हणजे? तुझ्यासारखे आणखी आहेत? किती? आणि केव्हापासून? मुख्य म्हणजे आत्तापर्यंत कुठे काही ऐकलं नाही ते! आत्ताच का आलास माझ्यासमोर?’

‘ऐकता की तुम्ही आमच्याबद्दल मधुन-मधुन. कधी आमच्यातलं कोणी दिसतं, आत्ता मी तुला दिसतोय तसा किंवा आमचं एखादं यान दिसतं. फक्त या सगळ्याचा प्रत्येक जण आपल्या समजुतीप्रमाणे अर्थ लावतो इतकंच. फक्त आम्ही तुमच्या कारभारात ढवळाढवळ करत नाही.’

‘या सगळ्यांत मी कुठे बसतो? कालपासून हे जे काही तू करतो आहेस ती ढवळाढवळ नाही का?’

‘एका अर्थी आहे. पण त्यामुळे तुमच्या ग्रहाच्या एकूण इतिहासात, भविष्यात काही फरक पडणार नव्हता त्यामुळे मला हे करता आलं.’

‘पण मीच का?’

‘कारण तुम्ही तिघं चांगली माणसं आहात. त्यामुळे काल जेव्हा अचानक तुझ्याकडे महत्त्वाचं काम आलं आणि तुला अॉफिसमधून निघणं अशक्य झालं तेव्हा मला कळवलं गेलं की तुझ्याजागी मी जाऊन तुझ्या मुलाला मदत करावी.’

‘कोणी सांगितलं तुला?’ एव्हाना त्याच्या बोलण्यात मला खरेपणा असल्यासारखं वाटू लागलं होतं. खरं तर तो जे सांगत होता ते माझ्या बुद्धीला अजिबात पटत नव्हतं. पण निदान तो कोणी गुन्हेगार नाही असं कुठेतरी पटत होतं. त्यामुळे माझ्या रागाचा पारा बराच खाली आला होता.

‘मी एलियन आहे एवढं पुरेसं नाही का?’

‘आणखी काय-काय झालं?’ मलाच जाणवलं की नलू आणि तो यांच्यात काय घडलं ते खरं तर मला हवं होतं. माझी नलू…

‘काही विशेष नाही. अोजसनी माझ्या मदतीनी त्याचं प्रॉजेक्ट पूर्ण केलं - खरं तर सगळं त्यानीच केलं, पण त्याला बहुधा बाबाचा मानसिक आधार हवा होता. मध्येच तू आलास तेवढंच काय ते वेगळं, त्यांना न सांगण्यासारखं झालं.’

‘मी आलो आहे समजल्यावर तू निघून का गेला नाहीस मग?’ मी गाडी पुन्हा रात्रीकडे वळवू पहात होतो.

‘तशी संधीच मिळाली नाही.’

‘हे काही पटण्यासारखं नाही. आम्ही जेवण झाल्यावर बहुतेक वेळा सोसायटीत चक्कर मारुन येतो.’

‘पण काल नाही शक्य झालं.’

‘का? आणि मग रात्री?’

तो एकदम हसायला लागला. आधी हळू गालातल्या गालात आणि मग खो-खो हसायला लागला.

‘हसायला काय झालं तुला?’ मी रात्रीचा विषय निघाल्यापासून बेचैन व्हायला लागलो होतो. त्याच्या हसण्याने आता मला राग यायला लागला.

‘मला माहिती आहे केव्हाचं तुझ्या डोक्यात काय चालू आहे. रात्री काय झालं, मी नलूबरोबर रात्र घालवली का या विचाराने तू काल रात्रीपासून अस्वस्थ आहेस ना?’

मी गप्प बसलो.

‘काळजी करु नकोस… जेवण झाल्यावर मी तुझ्या बायकोला सांगितलं की निघता-निघता एक महत्त्वाचं काम आलं होतं पण अोजसला शब्द दिला होता म्हणून मी लवकर घरी आलो. तेव्हा आता मला ते काम पूर्ण करायला हवं. तशी तिनी मला कॉफी करुन दिली आणि ती तिथेच तिचं विणकाम घेऊन बसली, तुला कंपनी द्यायला. पण थोड्याच वेळात पेंगुळली. तेव्हा मग मी तिला उठवलं आणि आत जाऊन झोपायला सांगितलं. तिला पटत नव्हतंच, पण मी जरा ठामपणे सांगितलं तेव्हा कुठे नाईलाजाने तयार झाली. मी परत आलो, दिवा चालूच ठेवला, तू लावतोस तशी हळू आवाजात गाणी लावली आणि तिथेच सोफ्यावर आडवा झालो.’

मला इतकं हुश्श झालं की मी सोडलेला सुस्कारा त्याला ऐकू गेला असावा. तो पुन्हा गालात हसला.

‘आता?’ मी त्याला विचारलं.

‘आता - दोन पर्याय आहेत; मी परत घरी जातो आणि अॉफिसला जायला म्हणून बाहेर पडतो. तू अॉफिसला जा आणि संध्याकाळी नेहमीसारखा घरी जा. नाहीतर मग आत्ता इथेच तू तुझा जॉगिंग सुट घाल आणि घरी जा आणि मी जिथून आलो तिथे परत जातो.’

‘जिथून आलो तिथे म्हणजे? मुख्य म्हणजे तू किंवा तुझ्यासारखे आणखी कोणी असतील तर ते आम्हांला कोणाला दिसत कसे नाही?’

‘कारण आम्ही इथेच पण वेगळ्या मितीत असतो.’

‘मग आत्ता कसा मला दिसतो आहेस?’

‘कारण या कामापुरता मी तुमच्या जगात आलो आहे. बरं मग काय ठरतंय तुझं?’

‘मला आणखी थांबणं शक्य नाही आता. मी इथेच माझा जॉगिंग सुट चढवतो आणि घरी परत जातो. थांब, थोडं पुढे गेलं की बरीच झाडं आहेत आणि सहसा कोणी तिकडे फिरकत नाही.’

त्याने काढून दिलेला जॉगिंग सुट मी चढवला. पाहिलं तर माझे कालचे कपडे त्याच्या अंगावर होते.

‘पुन्हा आपली भेट…’

‘होण्याची शक्यता कमी आहे.’

‘तुझं नाव काय?’

‘तुमच्या भाषेत माझं नाव सांगणं आणि तुला उच्चारता येणं कठीण आहे - स्पॉकसारखंच. त्यामुळे तू मला मि. स्पॉकच का म्हणत नाहीस? मला माहिती आहे तुला स्पॉक फार आवडतो.’

‘हो, खरंच मला स्पॉक आवडतो. Well, Mr. Spock, it was nice meeting you. आणि हो, माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्याबद्दल खरंच सॉरी!’

‘मी समजू शकतो असं नाही म्हणणार कारण आमची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण तू ज्या परिस्थितीत अडकला होतास ती बघता ते लॉजिकल होतं.’

‘Peace and live long!’

‘Long live and prosper…’ बोलता-बोलता मि. स्पॉकची आकृती धुसर होत-होत दिसेनाशी झाली.

टेकडीवरुन खाली उतरताना माझ्या डोक्यात सहज आलं ‘देव तारी त्याला…’

प्रकार: 
शब्दखुणा: 

इथे ट्रेकीज कोण-कोण आहेत? लेनर्ड निमॉय यांच्या निधनानंतर एलियनचं नाव स्पॉक ठेवणं ही माझ्याकडून त्यांना छोटीशी श्रद्धांजली!