संपूर्ण दिवस धावपळीत जातो, मग ट्रेनमधल्या गर्दीमुळे किंवा मोठ्ठ्या ट्राफिक जाममुळे उरला-सुरला संयमसुद्धा कापरासारखा उडून जातो. पोटात कावळे कोकलत आणि डोक्यात रातकिडे किरकिरत असताना घरी आल्यावर गरमागरम वरणभात समोर यावा आणि टीव्ही किंवा रेडीओवर आपल्या अत्यंत आवडत्या गायक/गायिकेचं आवडतं जुनं गाणं लागावं की कसं वाटतं ? रणरणत्या उन्हात अचानक एखादी थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटतं. त्या थोड्याश्याच वेळात आपण अजून एक दिवस लढवायची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे निजतो.
तसंच काहीसं, एकामागोमाग एक रद्दड चित्रपट डोक्यावर आदळत असताना, त्याच त्या बातम्या आणि त्याच त्या सिरियल्स उरल्या-सुरल्या संयमाचाही कापूर करत असताना, एखादा असा चित्रपट - जो थोड्या गुदगुल्या करतो, थोडं हळवं करतो आणि बराचसा आपलाच वाटतो - आल्यावर वाटतं. त्या दोन-अडीच तासांत आपण (म्हणजे, मी तरी) अजून काही रोहित शेट्टी, प्रभुदेवा वगैरे सहन करू शकण्याची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे चित्रपटगृहातून बाहेर पडतो.
'पिकू' हे नाव जितकं छोटंसं आहे, तितकीच चित्रपटाची कहाणीसुद्धा. ही कहाणी आहे एक बाप आणि एका मुलीची आणि ह्या दोघांची कहाणी बदलणाऱ्या एका तिऱ्हाईताची.
'पिकू' (दीपिका पदुकोण) एक स्वतंत्र विचारांची तरुण व्यावसायिक. बोलण्यात इतकी फटकळ की तिला कस्टमर्ससमोर नेताना तिच्या पार्टनरला भीती वाटते की ही कुणाला काय सुनावेल ! आणि वागण्यात इतकी खडूस की टॅक्सी ड्रायव्हर तिचं भाडं आल्यावर टाळाटाळ करतात. भास्कर बॅनर्जी (अमिताभ बच्चन), तिचे वडील म्हणजे तिचा हर तऱ्हेने 'बाप'. स्वत:शी सोडून इतर कुणाशीही सरळ न बोलणारा आणि आजारी पडण्याची प्रचंड इच्छा असणारा. असे हे एकापेक्षा एक विक्षिप्त बाप-लेक दिल्लीत एकमेकांवर व कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर डाफरत एक आयुष्य जगत आहेत.
आणि दुसरीकडे राणा चौधरी (इरफान खान) हा एक टॅक्सी एजन्सीचा मालक, व्यावसायिक अपयशाशी झुंजत आणि विक्षिप्त आई व बहिणीमुळे वैतागलेला, स्वत:चं एक आयुष्य जगत आहे.
हे तिघे वैतागलेले एकत्र येतात, जेव्हा भास्कर बॅनर्जी आपल्या माथेफिरू स्वभावानुरूप दिल्लीहून कोलकात्याला टॅक्सीने जायचं ठरवतो. हा तीस-चाळीस तासांचा प्रवास तिघांसाठी गेल्या तीसेक वर्षांचे संस्कार बदलणारा ठरतो. चित्रपटाचा शेवट अनेक उत्तरं, प्रश्न न विचारता देतो.
एक रोड ट्रीप 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये होती, जी तीन मित्रांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते.
एक रोड ट्रीप 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये होती, जी कुणाला कुणापर्यंत घेऊन गेली नाही, पण तरी खूप काही दाखवणारी होती.
आणि एक रोड ट्रीप 'पिकू' ची आहे, जी फक्त दिल्ली ते कोलकाता जात नाही, तर 'पिकू'पासून 'पिकू'पर्यंत 'भास्कर'पासून 'भास्कर'पर्यंत आणि 'राणा'पासून 'राणा'पर्यंत जाते.
'जिंनामिदो' आणि 'फाफॅ' काहींना खूप आवडले होते, तर काहींना ते सपशेल कंटाळवाणेही वाटले होते. 'पिकू'चं नक्कीच तसं नाही आहे कारण इथली 'रोड ट्रीप' हा सगळ्यात महत्वाचा भाग असला तरी त्याला खूप जास्त वेळ दिलेला नाही आणि दीपिका-अमिताभमधली धुसफूस आपण रोज पाहत, अनुभवत असतो, त्यामुळे एक तार जुळतेच.
'पिकू' असं नाव का आहे, मूळ नाव नक्कीच वेगळं असणार, पण ते सांगणं किंवा ह्या विक्षिप्तांच्या विक्षिप्तपणाची कुठलीही स्पष्ट कारणमीमांसा देत बसणं आणि अश्याच काही कमी किंवा बिन महत्वाच्या गोष्टी पूर्णपणे टाळून, त्यांना समजून घेता येईल इतपत पार्श्वभूमी, तीही ओघातच, मांडणं दिग्दर्शक शूजीत सरकारांनी खुबीने केलं आहे. भास्कर बॅनर्जीचं अपचन व बद्धकोष्ठाने त्रस्त असणं आणि सतत त्याचाच विचार करत राहणं, हा त्याच्या व्यक्तित्वाचा पैलू एकंदर मांडणीला थिल्लर किंवा चावट बनवण्याकडे नेऊ शकला असता. मात्र, ते होण्या न होण्यामधली छोटीशी सीमारेषाही सरकारांनी अचूक हेरली आणि पाळली आहे, हे विशेष. हा चित्रपट कुठल्याही व्यक्तिरेखेचं उदात्तीकरण किंवा खच्चीकरणही करण्याच्या फंदात पडत नाही. खरं तर अशी पात्रं इथे आहेत. जसं की बॅनर्जीचा डॉक्टर मित्र श्रीवास्तव (रघुवीर यादव), जो त्याला त्याच्या अवास्तव आजाराग्रहाबद्दल कधी बोलत नाही आणि ३-४ लग्नं करणारी पिकूची बिनधास्त मावशी (मौशुमी चटर्जी).
दीपिका आणि 'पिकू' इतक्या एकरूप झाल्या आहेत की कुठेही पुसटसासुद्धा उल्लेख न येताही 'पिकू' हा 'दीपिका'चाच शॉर्ट फॉर्म असणार हे आपण नकळतच ठरवून टाकतो. वडिलांच्या विचित्र वागण्याला अतिशय कंटाळलेली, त्यांच्याशी भांडणारी आणि तरीही कुठल्याही मुलीसारखीच आपल्या बापासाठी प्रचंड हळवीही असणारी, 'माझ्याशी लग्न करणाऱ्याला माझ्या ह्या सत्तर वर्षाच्या बाळाचीही जबाबदारी घ्यावी लागेल' असं म्हणणारी 'पिकू' तिने सुंदर साकारली आहे. बिना मेकअपची दीपिकाचं 'गर्ल नेक्स्ट डोअर' दिसणं, हे वेगळंच !
अमिताभने आयुष्यात दुसऱ्यांदा 'भास्कर बॅनर्जी' नावाचं पात्र साकारलं आहे. १९७१ साली आलेल्या, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक 'आनंद' मधला त्याचा भास्कर बॅनर्जी, एक बुजरा, थोडासा निराश डॉक्टर त्याने ज्या सहजतेने उभा केला होता, त्याच सहजतेने ४४ वर्षानंतर हा दुसरा विक्षिप्त भास्कर बॅनर्जी त्याने उभा केला आहे. बोलण्यातली बंगाली ढब त्याने अशी काही राखली आहे की एखादा अस्सल 'बाबू मोशाय'च वाटावा. अमिताभ आता एक चालतं-फिरतं अभिनयाचं गुरुकुल झाला आहे, ह्याबद्दल वादच नाही. त्याच्या सहजतेने बॅनर्जीच्या अत्यंत त्रासदायक विक्षिप्तपणावरही माया करावीशी वाटते.
ही कहाणी, हा चित्रपट पिकू आणि बॅनर्जीचा असला तरी जिथे जिथे इरफान खान पडद्यावर येतो, तिथे तिथे पडदा त्याच्यासाठीच आहे, असं वाटतं. केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगले दिसणारे मोजके अभिनेते आहेत, त्यांत इरफान खान नक्कीच येतो. एरव्ही हे बटबटीत डोळे व ओबडधोबड सुजलेला चेहरा आपण कधीच पाहणार नाही. पण ह्या चेहऱ्यामागे दडलेला एक कलंदर अभिनेता जेव्हा समोर येतो, तेव्हा हाच चेहरा जगातला सगळ्यात सुंदर चेहरा बनत असावा. हे मी अगदी विचारपूर्वक सांगतो की अमिताभसमोरही इरफान आपलं नाणं खणखणीत वाजवतो.
ह्या चित्रपटाला नितांत आवश्यकता होती आणि तशी संधीही होती, श्रवणीय, गोड चालीच्या संगीताची. ती काही म्हणावी तशी पूर्ण झाली नाही. एक तर असलेली गाणी तुकड्या-तुकड्यांत आहेत आणि ती विशेष लक्षातही राहत नाही. 'पिकू'ला २-३ 'सवार लूँ'ची जोड मिळाली असती, तर गालबोट लावायलाही जागा उरली नसती. तरी, माझ्यातल्या चित्रपटत्रस्तासाठी एक अत्यावश्यक 'पिकूटॉनिक' मला नक्कीच मिळालं आहे.
रेटिंग - * * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2015/05/movie-review-piku.html
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०३ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-
इतर कलाकार आणि चित्रपटांची
इतर कलाकार आणि चित्रपटांची चर्चा दुसर्या धाग्यावर करा.>>> ohh Thanks a lot admin.
नाहीतर ऋन्मेषला कंटाळून हा बाफ पण सोडून द्यावा लागला असता....
इथे दिपीका पूर्णपणे मेकपरहीत
इथे दिपीका पूर्णपणे मेकपरहीत आहे का ? फार कमी अभिनेत्रींनी तसे धाडस केलेय पुर्वी.
आठवताहेत त्या अश्या जया भादुरी ( दुसरी सीता ) रेखा ( मुसाफीर ) बिपाशा बासू ( ओमकारा मधला गच्चीवरचा एक शॉट ) माधुरी ( प्रहार ) .. अनेकवेळा अभिनेत्री मेकपशिवाय ओळखूही येत नाहीत.
>> इथे दिपीका पूर्णपणे
>> इथे दिपीका पूर्णपणे मेकपरहीत आहे का ? <<
हो. किंवा अगदीच किरकोळ मेक अप असावा.
'फॅनी' मध्येसुद्धा बिना मेक अपच होती न ?
मग् तिला खरेच सुंदर म्हणायला
मग् तिला खरेच सुंदर म्हणायला हवे
खरच सुंदर चित्रपट पिकु...
खरच सुंदर चित्रपट पिकु...
नक्कि पाहा... अमिताभ तर सॉलिड आहेच...पण काही फ्रेममध्ये ईरफान खातो त्याला.. (अभिनयात)
दिपिका नै आवडतं . अमिताभ
दिपिका नै आवडतं .
अमिताभ प्रेमी पन नैच मी .. प्रोमो बघीतल्यावर इरफान साठी मात्र जाणार हे ठरवलचं होत .. आणि जाणारचं
दिपिका नै आवडतं . अमिताभ
दिपिका नै आवडतं .
अमिताभ प्रेमी पन नैच मी .
>>::अओ:
मी पाहिला. सर्वांचीच कामे छान
मी पाहिला. सर्वांचीच कामे छान झाली आहेत. इर्फान खान तर एकदम मस्त.
रॉबीनहूड >> नै आवडतं ..
रॉबीनहूड >> नै आवडतं .. चांगले आहेत पण आवडायलाचं हवं हे जरुरी थोडी ना आहे
.. आवर्जुन पाहिलं त्यांच काम एवढे आवडीचे नैत ते माझ्या 
Kiti kalkal ahe pn movie
Kiti kalkal ahe pn movie madhe
Nusata arada orada..
Dok dukhayala lagal
Amitabh,irfaan n dipika tighanahi abhinayasathi hats off
Mala toilet humor farasa avadat nhi tyamule mala bore zala movie...
Movie madhun nemak kai sangayachay te kalal nhi
Over all tya tighanche abhinay sodata movie madhe kahi avadal nhi
पण ह्यात टॉयलेट ह्युमर नाहीच
पण ह्यात टॉयलेट ह्युमर नाहीच आहे.
Mala watala
Mala watala
रसप, अतिशय नेटके परिक्षण
रसप, अतिशय नेटके परिक्षण लिहिले आहे.. मुव्ही पाहिला आणि दीपिकाच्या प्रेमातच पडले आहे. त्या तिघांची केमिस्ट्री कमाल आहे. बघताना असे वाटते की हे वर्षानुवष सोबतच आहेत. काही ठिकाणी लाउड वाटते पण दीपिकामधली प्रेमळ मुलगी अधिक लक्षात रहाते.
कित्येक वेळेला फ़ारसे डिटेल्स न दाखवताही आपसूक कळतात ही विशेष बाब आहे.
तीनही कलाकारांना अभिनयासाठी मानाचा मुजरा.
काल बघितला !! मस्त
काल बघितला !!
मस्त
मौसमीला का विसरले आहेत इथे
मौसमीला का विसरले आहेत इथे सगळे जण. तिचा रोल हलकाफुलका होता आणि माझ्या मनात ठ्सला अगदी.
इरफान खानचे फार कौतुक होते आहे पण नाना पाटेकर जसा सगळ्या सिनेमात सारखाच दिसतो, वापरतो, अभिनय साकरतो तसाच मला इरफान वाटतो. मी त्याच्या मुलाखती पाहिल्यात .. मला तो तिथेही तसाच दिसतो.
दिपिकाचा अभिनय खूप महान नव्ह्ता पण एक आवडले की तिने भडक अभिनय नाही केला. तिचे कपडे, वेगवेगळ्या रंगाच्या टिकल्या फार आवडल्या.
अमिताभ चे पोट खटकले. बद्धकोष्ठता दाखवण्यासाठी जे पोट पुढे केले आहे ते नॅचरल नाही वाटत. अगदी एखादी उशी घालून फिरतो आहे असे जाणवत होते.
मला का कोण जाणे दिपिका वयाने
मला का कोण जाणे दिपिका वयाने फार लहान वाटली त्या व्यक्तिरेखेसाठी. थोडी आणखी मॅच्युअर दिसायला हवी होती. अमिताभची व्यक्तिरेखा ७० च्या आसपास वयाची असावी. मग त्याची मुलगी निदान ३५ च्या वर दाखवायला हवी होती. दुसरं म्हणजे ती कुठल्यातरी कंपनीत पार्टनर आहे असा उल्लेख आहे. पण बॉस असण्याची जाणिव, कामाची जबाबदारी, करीयर बद्दल प्लॅन्स इ. गोश्टी नीट हायलाईट झाल्या नाहीत. ती बॉस असते म्हणून टॅक्सी वाल्यांवर बॉसिंग करते बस.
<< इरफान खानचे फार कौतुक होते
<< इरफान खानचे फार कौतुक होते आहे पण नाना पाटेकर जसा सगळ्या सिनेमात सारखाच दिसतो, वापरतो, अभिनय साकरतो तसाच मला इरफान वाटतो. मी त्याच्या मुलाखती पाहिल्यात .. मला तो तिथेही तसाच दिसतो. >>
बी,
इरफानला तशा भूमिका चित्रपटकर्त्यांनी सातत्याने दिल्यात त्यात त्याचा काही दोष नाही. पण तरीही त्याने जेव्हा त्याला वेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळाल्यात तेव्हा त्या देखील उत्कृष्ट रीतीने साकारल्यात.
हे त्याच्या विविध भूमिका असणारे चित्रपट नक्की पाहा:-
रोग:- यात तुम्ही म्हणता तसा नेहमीचा इरफान दिसेल, तरीही नक्की आवडेल.
https://www.youtube.com/watch?v=i1oQ9kTfxFs
राईट या राँग - नायक, नायिका, सहाय्यक कलाकार या सर्वांच्या विरुद्ध एकटा उभा राहणारा सहनायक अर्थात वन अगेन्स्ट ऑल अशा प्रकारची हिंदी चित्रपटात अतिशय अपवादानेच दिसणारी भूमिका (बहुदा यापूर्वी गणशत्रू या सत्यजित रे यांच्या बंगाली चित्रपटातच असा एक विरुद्ध इतर सर्व असा सामना होता)
https://www.youtube.com/watch?v=I_5qFxPZPPI
बिल्लू - ज्याच्यावर कुणीच विश्वास ठेवत नाही असा सच्चा नायक
https://www.youtube.com/watch?v=IhxM2t3-2iA
https://www.youtube.com/watch?v=yxwatN1SPNo
राष्ट्रीय पारितोषिक विजेता - द गोल - द्विधा मनस्थितीत अडकलेला क्रीडा प्रशिक्षक
https://www.youtube.com/watch?v=SCUjMwWa-xQ
द किलर - उलट्या काळजाचा क्रूर खलनायक
https://www.youtube.com/watch?v=lLe49cjE63k
चेतन, मी इरफान खानचे खूप
चेतन, मी इरफान खानचे खूप सिनेमे नाही पाहिले पण जे काही तीन चार पाहिलेत आणि त्याच्या ज्या काही मुलाखती पाहिल्यात त्या तो जिथे तिथे सारखाच दिसला.
फारुख शेख हा हिरो सुद्धा इरफान सारखा दिसायला फार हॅन्डसम वगैरे नव्हता पण त्याला ज्या भुमिका मिळाल्यात त्याच्यात त्यानी वेगळेपणा आणला.
<< मी इरफान खानचे खूप सिनेमे
<< मी इरफान खानचे खूप सिनेमे नाही पाहिले पण जे काही तीन चार पाहिलेत आणि त्याच्या ज्या काही मुलाखती पाहिल्यात त्या तो जिथे तिथे सारखाच दिसला. >>
द लंचबॉक्स मध्ये पण तसाच वाटला?
अमिताभने किमान पंचवीसेक चित्रपटात एकसारखाच अभिनय केला आहे. हीच बाब शाहरूख खान व दिलीपकुमार यांच्या बाबतीत देखील म्हंटली जाऊ शकते. देव आनंद यांच्यावर तर एकसूरी अभिनय केल्याचा अगदी ठराव मांडून बहुमताने मंजूर केल्यासारखा आरोप केला जातो. तरीही गाईड, तेरे मेरे सपने, मनपसंद, गँगस्टर, सेन्सॉर, मै सोलह बरस की आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर या चित्रपटांत अगदी वेगळा देव आनंद बघायला हे मिळतो हे कसे नाकारता येईल?
तुम्ही इरफान यांचे तीन चारच चित्रपट पाहिले आहेत तर निदान माझ्या शिफारशीवरून अजून चार चित्रपट पाहा आणि मग कदाचित तुमचे मत बदलेल.
संधी मिळाली तर नक्कीच बघेन.
संधी मिळाली तर नक्कीच बघेन. लंच बॉक्समधेही मला तो तसाच वाटला. फक्त त्याची वेषभुषा मेकअप ह्यामुळे तो प्रौढ जाणवला बाकी अभिनयातील फरक जाणवला नाही.
बी, काही अंशी सहमत
बी, काही अंशी सहमत आपल्याशी.
इर्ररफान खान हा जाहीरातीतही तसाच दिसतो जसे आपण म्हणत आहात.
मुख्यत्वे संवादफेकीची शैली. त्याचे डायलॉग बरेचदा कान देऊन ऐकावे लागतात.
बी, ॠन्मेष ला अनुमोदन, एकसुरी
बी, ॠन्मेष ला अनुमोदन, एकसुरी वाटतो इरफान (आहे म्हटलं नाहीये, वाटतो म्हटलंय.... आता वाटतो तर वाटतोच)
दीपिका आवडते पण 'मी अमि' ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्यात तब्बू असायला हवी होती असे वाटते.
ओके मला दिपिकाच जास्त बरी
ओके
मला दिपिकाच जास्त बरी वाटली ह्यात. कारण तिच्या त्वचेचा रंग, तिचे लुक्स मला अमितजींच्या मुलीला शोभेल असे वाटले. आणि खास म्हणजे ह्या सिनेमात जी बोलण्याची पट्टी होती ती फार उंच होती. तब्बू ला इतक्या उंच पट्टीतले संवाद जमले नसते. तिच्या चेहर्यावर शांतता झळकत असते नेहमी ती तिला पुसुन टाकता आली असती की नाही ह्यात माझे मत सांशक आहे
दिपिका फिट बसली आहे लेकीच्या भुमिकेत.
बी, दिपीका आणि तब्बू
बी, दिपीका आणि तब्बू बद्दलच्या मताबद्दल सहमत ..
मी अमि आणि बी दोघांशी
मी अमि आणि बी दोघांशी दिपिकाबाबत सहमत.
मीही बघितला. आवडला.
<< मी अमि आणि बी दोघांशी
<< मी अमि आणि बी दोघांशी दिपिकाबाबत सहमत. >>
दोघांची दीपिकाबाबत वेगवेगळी प्रतिक्रिया आहे. तुम्ही नेमक्या कुणाबरोबर सहमत?
मी अमिंच्या प्रतिक्रियेतल्या
मी अमिंच्या प्रतिक्रियेतल्या "ती कुठल्यातरी कंपनीत पार्टनर आहे असा उल्लेख आहे. पण बॉस असण्याची जाणिव, कामाची जबाबदारी, करीयर बद्दल प्लॅन्स इ. गोश्टी नीट हायलाईट झाल्या नाहीत. ती बॉस असते म्हणून टॅक्सी वाल्यांवर बॉसिंग करते बस." याच्याशी सहमत.
बींच्या प्रतिक्रियेतल्या "मला दिपिकाच जास्त बरी वाटली ह्यात. कारण तिच्या त्वचेचा रंग, तिचे लुक्स मला अमितजींच्या मुलीला शोभेल असे वाटले. आणि खास म्हणजे ह्या सिनेमात जी बोलण्याची पट्टी होती ती फार उंच होती. तब्बू ला इतक्या उंच पट्टीतले संवाद जमले नसते. तिच्या चेहर्यावर शांतता झळकत असते नेहमी ती तिला पुसुन टाकता आली असती की नाही ह्यात माझे मत सांशक आहे" याच्याशी सहमत.
थोडक्यात दिपिका मुलगी म्हणुन फिट बसली आहे सिनेमात. पण तिचे वय आणि हुद्दा पाहता त्या अनुषंगाने ज्या गोष्टी येतात.. बॉस असण्याची जाणिव, कामाची जबाबदारी, करीयर बद्दल प्लॅन्स इ इथे ती कमी पडलीये.
पण या रोलसाठी तब्बु? अ बिग नो नो.
मी अमिंच्या प्रतिक्रियेतल्या
मी अमिंच्या प्रतिक्रियेतल्या "ती कुठल्यातरी कंपनीत पार्टनर आहे असा उल्लेख आहे. पण बॉस असण्याची जाणिव, कामाची जबाबदारी, करीयर बद्दल प्लॅन्स इ. गोश्टी नीट हायलाईट झाल्या नाहीत. ती बॉस असते म्हणून टॅक्सी वाल्यांवर बॉसिंग करते बस." याच्याशी सहमत.>>
ह्या ह्याच्याशी सहमत नाही.
कारण सांगतो आणि ते सुद्धा खूप स्वानुभवाने सांगतो.
जेंव्हा आपल्या घरातील परिस्थिती खूप काही चांगली नसते मग घरात कटकटी असो, कुणाचे आजारपण असो, कुणाचा आपल्यावर अन्याय असो अशा वेळी बाहेरच्या जगात वावरताना आपल्या डोक्यात आपले प्रश्न घेऊनच आपण काम करत असतो. आपल्यात भले कितीही सामार्थ्य असेना पण घरातील वातावरण करीअर च्या खूप मधे येते. अशावेळी आपले प्रोफाईल लो ठेवून काम केले तर निदान करीअरमुळे जो स्ट्रेस येतो तो काही प्रमाणात कमी होतो.
आणि ह्या सिनेमात दिपिकाचे करीअर दाखवणे ही गोष्टच नव्हती. फक्त एक दोन वेळाच ती ऑफीसमधे काम करतान दाखवली आणि बर्यापैकी वाटली.
चित्रपटत्रस्तांसाठीचं
चित्रपटत्रस्तांसाठीचं 'पिकूटॉनिक' (Movie Review - Piku)
हा धागा आहे होय .... अछा.... :स्मितः
आज पाहिला, सोनीच्या क्रुपेने.
आज पाहिला, सोनीच्या क्रुपेने. मला नेहेमी वाटत आलंय कि बच्चन अमेरिकेत जन्मला असता तर पाॅल न्युमन, जाॅन वेन, ग्रेगरी पेक, शाॅन काॅनरी इ. प्रभ्रुतींसारखे वर्सटायल रोल्स त्याच्याहि वाट्याला फार पुर्विपासुनच आले असते. सुदैवाने गेल्या काहि वर्षात बाॅलिवुड बर्यापैकि मॅच्युर होतेय आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे पिकु.
लेट्स होप बाॅलिवुड कंटिन्युज अनलिशिंग बच्चन्स टॅलंट...
Pages