देशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास

Submitted by निकीत on 7 May, 2015 - 06:12
indians on komagata maru

अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे. सध्या तरी मी याच कालखंडासंदर्भातील मांडणी करणार आहे.

अमेरिकेतील पहिल्या भारतीय माणसाचा उल्लेख १६२० सालात आढळतो - कोणी "टोनी" नावाचा हा भारतीय इसम व्हर्जिनियामध्ये जॉर्ज मेनेफी नावाच्या एक बड्या जमीनदाराकडे कामाला होता (बहुतेक गुलामच). त्यानंतर १७६८ मध्ये व्हर्जिनिया मधील पेपरात एका मालकाने दिलेली "इस्ट इंडीयन" गुलाम पळून गेल्याची जाहिरात सापडते. १७८० मध्ये "मद्रास मॅन" नावाचा व्यापारी (खरे नाव माहित नाही) मॅसेच्युस्सेट्स मध्ये आला होता असाही उल्लेख आढळतो. पण असे १-२ उल्लेख वगळता १८२० पर्यंत अमेरिकेच्या इतिहासात भारतीय स्थलांतरित फारसे दिसत नाही.

१८५७ मधील एका पुस्तकातील कॅलिफोर्निया मधील सोन्याच्या खाणीत काम केलेल्या "हिंदू" माणसाचे चित्र (बहुधा कॅलिफोर्नियामधील भारतीयांचा सर्वात जुना दस्तावेज):
Hindoo.jpeg
स्त्रोत: हचिंग्ज कॅलिफोर्निया मॅगझिन १८९९.

१८८६ मध्ये मीर खान नावाच्या भारतीय हकीमाला लायसन्स नसताना काम केले म्हणून अटक करण्यात आली असाही उल्लेख आहे.
mier khan.jpg
स्त्रोतः अल्टा डेली कॅलिफोर्निया, १८ ऑक्टोबर १८८६.

स्थलांतर - १८२० पासून पुढे (मुख्यतः कॅलिफोर्निया)
अमेरिकेत भारतीय स्थलांतराला सुरुवात झाली पश्चिम किनाऱ्यापासून. १८२० च्या आसपास भारतातून काही शीख लोक पहिल्यांदा कामाच्या शोधात उत्तर अमेरिकेत - कॅनडा मधील व्हानकुवर येथे आले आणि तेथे मुख्यतः शेती आणि लाकूड उद्योगात काम करू लागले. साधारण १८९० पर्यंत त्यांची संख्या अगदीच कमी होती पण त्यानंतर मात्र ती हळूहळू वाढू लागली. लवकरच त्यांचाविरुद्ध स्थानिक गोऱ्या लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि तो इतका शिगेला पोहोचला की भारतातून येणारी जहाजे स्थानिक लोक व्हानकुवर बंदरामध्ये येऊच द्यायचे नाहीत. याची सर्वात (कु)प्रसिद्ध केस म्हणजे मे १९१४ मध्ये कॅनडात येऊ पाहणारे "कोमागाटा मारू" जहाज. सुमारे ३७६ भारतीय असणारे हे जहाज स्थानिकांनी सुमारे तीन महिने बंदराबाहेरच ताटकळत ठेवले आणि अखेरीस जुलै महिन्यात ते जपानकडे (आणि नंतर भारताकडे) माघारी फिरले.

कोमागाटा मारू जहाज आणि त्यावरील भारतीय:
komagata maru.jpgस्त्रोत.

कॅनडा मधून पिटाळले गेलेले भारतीय कामाच्या शोधात मग अमेरिकेचा पश्चिम किनार्यावर आले. सुरुवातीला त्यांनी ओरेगन आणि वाशिंग्टनच्या लाकूड, शेती आणि रेल्वे उद्योगात काम केलं आणि त्यानंतर १८९० च्या दशकापासून ते मोठ्या संख्येने कॅलिफोर्निया मध्ये येऊ लागले आणि इकडे हळूहळू आपला जम बसवायला सुरुवात केली.

१८९९ साली सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल मध्ये आलेली एक बातमी:
0_2.jpg स्त्रोत.

१९०० सालातील शीख कामगारः
Rrwork5-c.jpgस्त्रोत.

भारतीय येथे येण्याआधीपासूनच कॅलिफोर्नियात चीनी आणि जपानी कामगार मोठ्या प्रमाणावर आले होते. त्यामुळे स्थलांतरितांविरोधात इथे आधीच असंतोष होता. मग कॅनडा मध्ये जे झालं त्याचीच पुनरावृत्ती अमेरिकेतही होऊ लागली. भारतीयांविरोधात विरोधात दंगली झाल्या; जाळ्पोळी आणि मारहाणी झाल्या. त्याचबरोबर त्याना प्रचंड वंशभेदाचा सामना करावा लागला. त्वचेच्या रंगामुळे तर अर्थातच पण त्याच बरोबर त्यांचे कपडे, वास, सवयी यामुळे सुद्धा. त्यामुळे सुरुवातीच्या काळात बरीच भारतीय मंडळी आफ्रिकन अमेरिकन आणि मेक्सिकन लोकांबरोबर राहिली आणि त्यांच्यातच मिसळले. भारतीय स्थलांतरित हे मुख्यतः अविवाहित पुरुष असल्यामुळे अनेकांनी त्यांच्याशी लग्नेही केली. अर्थातच लपून छपुन. कारण इंटररेशियल लग्नांवरहि कायद्यानुसार बंदी होती - पण मेक्सिकन स्थलांतरित अमेरिकेत मोठ्या प्रमाणात आल्यानंतर (साधारण १९२० नंतर) मात्र चित्र थोडे पालटले - कारण भारतीय आणि मेक्सिकन दोघेही ब्राउन! या काळात अनेक भारतीय-मेक्सिकन लग्ने झाली आणि त्यांनी मारिया सीता हर्नांडेझ, होजे अकबर खान वगैरे अत्यंत इंटरेस्टिंग नावे असलेली मुलेही जन्माला घातली !

एंजल आयलंड:
एशियन लोकांच्या स्थलांतरामध्ये सॅन फ्रान्सिस्को बे मध्ये असलेल्या एंजल आयलंडचं एक महत्वाचं स्थान राहिलं आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर येणाऱ्या परदेशी नागरिकांचा एंजल आयलंड वर इमिग्रेशन चेक होत असे. तिथे डिटेन्शन सेंटर सुद्धा होते. गंमत म्हणजे या डिटेन्शन सेण्टर मध्ये डिपोर्टेशन रेट होता जवळजवळ ३० ते ४०%! इतर ठिकाणी (विशेषतः पूर्व किनाऱ्यावरील एलिस आयलंड येथे) हाच रेट १ ते २% च होता. १९१० ते १९४० च्या दशाकात अमेरिकेत येऊ पाहणारी जवळ जवळ सर्वच भारतीय कुटुंबे एंजल आयलंडवर ठेवली गेली. भारतीयांबरोबरच मुख्यतः इथे राहिले ते म्हणजे चायनीज आणि जपानी. अत्यंत वाईट सुविधा असलेल्या या डिटेन्शन सेण्टर्स मध्ये डिटेनीजना अनेक दिवस राहावे लागे. अशा वेळी अनेक डिटेनिज भिंतीवर आपल्या कविता आणि कथा कोरत असत. त्यामधून त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना येते. एंजेल आयलंड वरील बिल्डिंग्ज मध्ये आजही त्या कविता तशाच सापडतात. कितीतरी गोष्टी तर लिहिल्याच गेल्या नसतील.

डिटेन्शन सेंटरची इमारत:
Angel_island_lg.jpg

डॉर्मस:
Angel_Island_Immigration_Station_Dormitory_b.jpg

भिंतींवर कोरलेल्या कविता:
Since-9-months--Punjabi--text-carved-into-the-wall-of-a-main-barrack-at-the-detention-center-at-Angel-Island.jpg

स्त्रोतः विकीपीडीया.

कायदेशीर लढाई
१९१७ सालच्या इमिग्रेशन अ‍ॅक्ट मध्ये एशियाटिक देशांमधून आलेल्या स्थलांतरितांवर बंदीच घालण्यात आली. या कायद्यान्वये फक्त कॉकेशियन आणि आफ्रिकन लोकांनाच अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत होते आणि अक्षरशः अक्षांश रेखांश काढून आशियातून होणाऱ्या सर्वच स्थलान्तरांवर बंदी घातली गेली. या कायद्याच्या अटी इतक्या जाचक होत्या की अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय मुलानादेखील अमेरिकेचे नागरिकत्व मिळू शकत नव्हते. ह्या कायद्याविरुद्ध अनेक भारतीयांनी कायदेशीर मार्गाने लढाई देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी उल्लेखनीय केसेस म्हणजे भगतसिंग ठींड आणि दिलीपसिंग सौंद यांच्या.

भगतसिंग ठींड यांनी प्रथमच स्थलांतरासाठी कायदेशीर लढाई देण्याचा प्रयत्न केला. ठींड यांनी पहिल्या महायुद्धात अमेरिकन मिलिटरी मध्येही काम केलं होतं. पण १९२३ साली कोर्तानी त्यांच्या विरोधी निकाल दिला. ठिंड यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की भारतीय लोक हे टेक्निकली कॉकेशियनच आहेत. पण कोर्टाने कॉकेशियनची व्याख्या व्हाइट अशीच मर्यादित ठेवली.

भगतसिंग ठिण्ड (१९१८):
10_1.jpg स्त्रोत.

दिलीपसिंग सौंद हे १९२० मध्ये गणितात पीएचडी करण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठात (बर्कली) आले. उन्हाळ्याच्या सुट्टीत पैसे मिळविण्यासाठी ते आसपासच्या शेतांवर कामे करायचे. १९२४ साली पीएचडी पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरळ शेती करण्यास सुरुवात केली. पण आजूबाजूला राहणाऱ्या देशवासीयांची परिस्थिती बघून त्यांनी त्याविरुद्ध कायदेशीर मार्गाने लढत देण्याचा निर्णय घेतला.
नागरिकत्व नसल्यामुळे अमेरिकेत जन्मलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनादेखील जमिनी विकत घेता येत नसत. जमीन लीज करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे बहुतांश भारतीय आयुष्यभर शेतमजूर म्हणूनच काम करत असत. सुमारे वीस वर्ष सौंदसाहेब वेगवेगळ्या कोर्टात भारतीयांच्या समान नागरिकत्वासाठी लढाई देत राहिले.

याच काळात इतर भागातील भारतीयांनीही (जे संख्येने फ़ारच कमी होते) वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिकन सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. उदा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्यासाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फिलाडेल्फियातील लाला हरदयाळ यांनी हिंदुस्तान गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी भारताच्या स्वातान्त्र्याबरोबरच (लाल लजपत राय याच्या होम रूल चळवळीला मदत) स्थलांतराच्या प्रश्नावर देखील बरेच काम करण्यास सुरुवात केली. मुबारक अली खान (अरिझोना) आणि सरदार जगजीतसिंग (न्यूयॉर्क) यांनी राजकारणी, डिप्लोमॅट, मिडिया वगैरेंबरोबर जोरदार लॉबिंग केलं. शेवटी १९४६ साली ह्या सर्व प्रयत्नांना यश मिळाले आणि १९४६ साली कॉंग्रेसने ल्युस-सेलर कायदा पारित केला. ह्या कायद्याअंतर्गत भारतीय (आणि फिलिपिनो) स्थलांतरितांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना अमेरिकन नागरिकत्वाचा अधिकार सुप्रीम कोर्टाने दिला. त्याचबरोबर दरवर्षी १०० भारतीयाना ग्रीन कार्ड (कायमचे स्थलांतरित असा दर्जा) देण्यासही मान्यता दिली. १९४९ साली नागरिकत्व मिळाल्या मिळाल्या लगेच दिलीपसिंग सौंद कॅलिफोर्नियात जज्ज म्हणून निवडून आले आणि १९५६ साली सेण्ट्रल डेमोक्रटिक पक्षातर्फे कॅलिफोर्निया मधून कोंग्रेसवर निवडूनही गेले. कॉंग्रेसवर निवडून येणारे सौंद हे पहिले एशियन ! सौंद यांची एक जुनी मुलाखत इथे पाहता येईल.

दिलीपसिंग सौंद तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी आणि उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांच्यासमवेत:
dec07_saund1.jpgस्त्रोत.

सॅनफ्रान्सिस्को मध्ये अजूनही हिंदुस्थान गदर पार्टीचे ऑफिस जतन करून ठेवले आहे (5, Wood Street). या म्युझियमचे उद्घाटन १९७६ साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते.
PAGE-MEMORIAL-THE-GADAR-MEMORIAL-2.jpgस्त्रोत.

१९६५ आणि नंतर
ह्या कायदेशीर लढाईनंतरही १०० ग्रीन कार्ड कोट्यामुळे भारतीय स्थलांतरितांची संख्या फार काही वाढली नाही; १९६५ पर्यंत ही संख्या सुमारे १० ते १२,००० च होती. पण १९६० च्या आसपासच्या सिव्हिल राइट्स चळवळीचे पडसाद इमिग्रेशन पॉलिसीमध्येही पडले नसते तरच नवल होतं. १९६५ साली अमेरिकन सरकारने एक कॉंप्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन कायदा पास केला. सर्व देशांमधून आलेल्या आलेल्या स्थलांतरितांना दर वर्षी समान कोटा पद्धत तेव्हा सुरु झाली जी आजतागायत चालू आहे. १९६५ नंतर मात्र भारतीय स्थलांतरित मोठ्या संख्येनं अमेरिकेत आले. १९८० पर्यंत त्यांची लोकसंख्या २ लाख झाली आणि त्यानंतर दर दशकाला ती दुप्पट ते अडीचपट होत आता ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. हा सगळा पुढचा इतिहास सर्वश्रुत आहेच.
१८८० ते २०१५, we have indeed come a long long way.

वॉशिंग्टन डीसी मधील स्मिथसोनियन म्युझियममध्ये ह्या विषयावरील प्रदर्शन ऑगस्ट २०१५ पर्यंत चालू आहे (Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation). शक्य असेल तर आवर्जून भेट द्या आणि कसे वाटले किंवा नवीन काय माहिती मिळाली हे इथे जरूर लिहा.

*****
देशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास : http://www.maayboli.com/node/54325
*****

अजून एक कल्पना:
मायबोलीवर अनेक देशांतील सदस्य आहेत. जर त्या प्रत्येक देशामधील भारतीय स्थलांतराचा इतिहास आपण संकलित करू शकलो तर तो एक अतिशय उपयुक्त दस्तावेज ठरेल. मराठीमध्ये माझ्या मते अशी माहिती संकलित केलेली नाही.

अधिक संदर्भ:
बर्कली साउथ एशिया लायब्ररी: http://www.lib.berkeley.edu/SSEAL/
Berkeley South Asian History Archive: http://www.berkeleysouthasian.org/
Smithsonian: Beyond Bollywood - Indian Americans Shape the Nation: http://smithsonianapa.org/beyondbollywood/
एंजल आयलंड इमिग्रेशन स्टेशन: http://www.aiisf.org/pdf/aiisf_sfChron_seAsian.pdf
मायग्रेशन पॉलिसी इंस्टिट्यूट: http://www.migrationpolicy.org/article/indian-immigrants-united-states

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे!

खरं तर अजून पूर्ण लेख वाचायचा आहे. पण एकूण स्वरूप बघता बराच अभ्यास केला असावा असे दिसते. वरील प्रतिक्रिया ह्या चिकाटी करता आहे. आणि त्या बद्दल करावे तेवढे कौतुक थोडेच.

खूप छान आणि अभ्यासपूर्ण लेख!!

मायबोलीवर अनेक देशांतील सदस्य आहेत. जर त्या प्रत्येक देशामधील भारतीय स्थलांतराचा इतिहास आपण संकलित करू शकलो तर तो एक अतिशय उपयुक्त दस्तावेज ठरेल. >>> +१

१९२० च्या आसपास लिहीलेली परिस्थिती मेनलँड बाबतीत बरोबर आहे. हवाई मध्ये मात्र जरा वेगळी परिस्थिती होती. तिथे बर्‍यापैकी समान हक्क होते. इंटर-रेशियल विवाह असणे ही ओके होते. भारतीय वंशाचे जमनादास वाटुमल यांनी तिथे 'अलोहा अ‍ॅपरेल्स' व्यवसाय सुरू केला. आता हा व्यवसाय नाही (नातवंडे इतर व्यवसायात आहेत). फिलँथ्रोपिक फाऊंडेशन आहे. हवाईचा इतिहास सांगताना त्यांचा उल्लेख आदराने निश्चित होतो.

अरे वा, छान माहिती आणि संकलन.

http://www.amazon.com/Leaving-India-Familys-Villages-Continents/dp/06182...
हे एक पुस्तक वाचले होते. यात लेखिकेने तिच्या कुटुंबाच्या स्थलांतराचा तिन-चार पिढ्यांचा इतिहास नोंदवलेला आहे. तो १९व्या शतकात फिजीमध्ये सुरू होवून अनेक देश व सर्व खंड पालथे घालत अमेरिकेपर्यंत आला आहे. अमेरिकेतील इमिग्रेशन कायदे, सुरुवातीच्या अडचणी वगैरेबद्दल सविस्तर लिखाण आहे. तुम्हाला नक्की आवडेल.

छान लेख. Happy

१८८० सालानंतरच्या मराठी वृत्तपत्रांमधून परदेशी गेलेल्या भारतीयांच्या बातम्या नेमाने दिसतात. अमेरिका, इंग्लंड, जपान, युरोपीय देश किंवा इंग्रजांनी ज्या ज्या देशांमध्ये भारतीय नागरिक गुलाम म्हणून नेले, तिथल्या भारतीयांच्या व विशेषकरून मराठीजनांबद्दलच्या बातम्या तर वाचायला मिळतातच, पण अगदी आफ्रिकेतल्या देशांमध्येही स्थायिक झालेल्यांबद्दल आवर्जून लिहून येत असे. १९१०नंतर या मंडळींचे, त्यांच्या घरांचे, त्यांनी बांधलेल्या मंदिरांचे फोटो छापून यायला लागले. युरप व अमेरिकेत फिरायला जाऊन आलेल्या मराठीजनांची त्या काळातली प्रवासवर्णनंही मस्त आहेत. हे सगळं एकत्र करायला हवं.

उदाहरणार्थ, हा फोटो. साधारण १९१५च्या सुमारास छापून आला होता. नक्की तारीख बघायला हवी.

Cali_Temple.jpg

लै भारी.
आता फुरसत काढून वाचला पाहिजे अजून.
जगभरात भारतीय कसे पसरले, याचाही एक इतिहास तपासला पाहिजे कधीतरी. बौद्ध भिख्खूंपासून उसतोड कामगार व जुन्या व्यापार्‍यांपर्यंत... किती जुना इतिहास होईल हा?

खूप छान.

मधे आम्ही पण सिंगापुरमधे भारतिय कधी आलेत आणि त्यातल्या त्यात मराठी माणसे इथे कधी आलेत ह्यावर रिसर्च करण्याचा प्रयत्न केला पण तो मधे थांबला. तुमचा हा लेख वाचून तो शोध पुन्हा सुरु करायची ईच्छा होत आहे.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सीमंतिनी, टण्या आणि चिनूक्स, नवीन माहितीबद्दल धन्यवाद.
नंतर धाग्याच्या हेडर मध्ये तुम्ही दिलेली माहिती टाकली तर चालेल का (अर्थात श्रेय देऊन)?

चिनूक्सः तुझ्याकडे जर अशी प्रवासवर्णने किंवा इतर दस्तावेज असेल तर संकलित करण्यासाठी मी मदत करू शकतो. मराठीत याचं काहीच डॉक्युमेंटेशन सापडत नाही. इंग्रजीतही फार कमी आहे.

व्यापाराकरिता भारतीय जगभर जात असले तरी स्थलांतराची सुरुवात माझ्या मते ब्रिटिश आल्यानंतरच झाली असावी. (११-१२ व्या शतकात होयसाळांबरोबर काही लोक दक्षिण-पूर्व आशियात गेलेही असतील - पण ते डॉक्युमेंटेड असणं कठीण आहे.) ब्रिटिश कॉलनी असल्याने इतर कॉलनीज् मध्ये जाणं सोपं पडत असाव (म्हणजे युरोप व आशियाचा काही भाग वगळता सर्व जगच!). किंबहुना अमेरिकेत यॆण्यासाठी भारतीय हेच कारण वापरत असत (अमेरिका स्वतंत्र झाली असली तरी).

महात्मा गांधींच्या सत्याचे प्रयोग मध्ये दक्षिण आफ्रिकेतील भारतीय शेतमजुरांचे तपशीलवार वर्णन आहे. आफ्रिका, फिजी, त्रिनिदाद वगैरे ठिकाणी भारतीय शेतमजूरांना गिरमिट्ये (Girmitiyas) म्हणत असत. गिरमिट्ये हा Agreement चा अपभ्रंश. शेतावर काम करण्यासाठी त्यांना जाचक करारात बांधून ठेवलेले असे.

मस्त अभ्यासपूर्ण लेख..अजून वाचायला आवडेल. हा लेख वाचताना एका पुस्तकाची आठवण झाली.

For here or to go - अपर्णा वेलणकर. अर्थात ह्या पुस्तकाचा विषय वेगळा आहे. मराठी माणसाच्या स्थलांतराचा मागोवा घ्यायचा लेखिकेने प्रयत्न केला आहे. त्यांचे सुरुवातीचे अनुभव, संघर्ष ह्याची सविस्तर माहीती वाचायला मिळते.

निकित, नक्की अ‍ॅड करा. श्रेय द्यायची काहीच्च गरज नाही, ते पुस्तक मी थोडे ना लिहिले आहे! Happy

थोडेसे विषयांतर (किंवा वरती इब्लिसने लिहिल्याप्रमाणे): युरोपात ज्यांना जिप्सी वा रोमा म्हणतात (जे प्रामुख्याने हंगेरी-रोमेनिया इथे वसले आहेत व आता सर्व युरोपभर आढळतात) हे लोक मुळचे भारतातील राजस्थान वगैरे भागातील भटक्या लोकांपैकी असे सर्वमान्य आहे. हे साधारण ११-१२-१३व्या शतका त स्थलांतरीत होत होत (मध्य आशिया मार्गे) हंगेरी-ट्रान्ससिल्वेनिया खोर्‍यात स्थायिक झाले असा प्रवाद आहे. काही जेनेटिक अ‍ॅनालिसिसनुसार हे सिद्धदेखील झालेले आहे. दुर्दैवाने या लोकांना युरोपात कोणीच वाली नाही. गेली ५-७ शतके मुख्य समाजापासून दूर ठेवल्यामुळे ना शिक्षण आहे ना नोकर्‍या ना समाजात स्थान. त्यामुळे हे मुख्यतः चोर्‍या, गुन्हे करणारे म्हणुन प्रसिद्ध आहेत. या आरोपात तथ्य आहे मात्र त्यामागची कारणीमिमांसा कोणीच करण्याच्या मनस्थितीत नाही. हंगेरीत तर सध्या फार राइट सरकार असल्याने ते या लोकांना कस्पटासमान वागणूक देतात.
या रोमा भाषांमध्ये पाच, देव असे शब्द आढळतात असे मी एका हंगेरियन प्रवासवर्णनात वाचले होते (१९२५-३५च्या दरम्यानचे हे प्रवासवर्णन आहे).
हंगेरीच्या पूर्व भागात रोमांची संख्या जास्त आहे. अर्थात टोकाची गरिबी, समाजिक अवहेलना खूप आहे. एका लेखात वाचले होते की संपूर्ण हंगेरीत केवळ ७ रोमा विद्यार्थी युनिवर्सिटीत आहेत. इथे रोमांसाठी काम करणार्‍या एन.जी.ओ.च्या शाळा आहेत. त्यापैकी एका शाळेचे नाव आहे भीमराव आंबेडकर तर दुसर्‍या एका शाळेचे नाव आहे महात्मा गांधी!

Pages