गाव

Submitted by चाऊ on 5 May, 2015 - 11:06

चिंब घामेजलेल्या अंगावर
वैशाख वा-याचा सुखद स्पर्श
ढगांच्या संगतीने चाललेला
उन सावलीचा खेळ
कुठे तापलेल्या कातळाची धग
वाडीत, झावळ्यांनी चाळलेलं ठिबक उन
नारळी पोफळीच्या उंच चव-या
फळांनी भरलेल्या आंब्याच्या बागेचा गंध
खारी पाखरांनी फोडलेल्या
पिकल्या फणसाचा सुवास
मन पुन्हा पाच पन्नास वर्ष मागे
गबाळी चड्डी, मळकट आंगडं
अनवाणी पाय, तापलेला फुफाटा
शिंपण्याच्या आळ्यात पाय थंडावून
रहाटाची एकसूरी रे रे ऐकत
कधी वीटी दांडू, गाडा, लगोरी
रात्री उशीरापर्यंत, लॅडीज, झब्बू
वीज जाळल्याने आजीची तगमग
आज ही तीच आस, तीच उन्हाळ्याची हाक
झाड झाडो-यानं लपेटलेलं शांत गाव
आली वीज, गेली वीज, लपंडाव
पुन्हा भीजल्या अंगाने, झुळुकीची आळवणी
असं सुखावणारं गाव, सुखावणारा उन्हाळा
सुखावणारं गाव, सुखावणारा उन्हाळा

Group content visibility: 
Public - accessible to all site users