जिथे रस्ता तिथे एस् टी

Submitted by स्वीट टॉकर on 5 May, 2015 - 05:59

मी पांचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. घर मुंबईला. त्यामुळे वर्षात चार मुंबई-पांचगणी चकरा एस्टीने व्हायच्या. तेव्हां एशियाड देखील नव्हत्या त्यामुळे वोल्वो वगैरे कौतुकांचा प्रश्नच नाही. बॉम्बे सेन्ट्रल डेपो ते महाड मार्गे पाचगणी सात तासांचा प्रवास.

रस्त्यांची अवस्था बिकट. त्या रस्त्यांवर धावून धावून गाड्याही खिळखिळ्या. ड्रायव्हरनी इंजिन सुरू केलं की सतारीच्या तरफेच्या तारांप्रमाणे बसचा प्रत्येक भाग स्वतंत्रपणे थरथरायचा. (ह्यात आजही फरक नाही.) सीटवर बसल्यावर आपलं डोकं जिथे टेकतं तिथे हल्ली कुशन असतं. ते लाड तेव्हां नव्हते. एक लोखंडी आडवा बार असायचा. शाळकरी वयात झोप अनावर होतेच. त्यामुळे पाचगणी (किंवा मुंबईला) पोहोचेपर्यंत डोक्याला मागे एक तीन इंची आडवं टेंगूळ यायचं. मुंबईला आईकडून टेंगळाचे लाड व्हायचे. मात्र पाचगणीला मित्रमंडळी त्याच्यावरच टपल्या मारून वेदनांची नवनवीन शिखरं दाखवायचे.

भरपूर गर्दी, प्रचंड उकाडा, अविरत थरथराट, गरम इंजिनमधून येणारा डीझेलचा वास आणि वळणावळणाचे रस्ते. या कॉकटेलमुळे बस लागणं खूपच कॉमन. खिडकीपर्यंत पोचायला देखील वेळ मिळाला नाही तर बसमध्येच उलटी होणार. मग त्याचा दर्प. त्या ट्रिगरमुळे आणखी एखाद्याला बस लागणार. पुढच्या स्टॉपला एस्टीचा कामगार पाणी टाकून ते धुवून काढणार. प्रवास पुढे चालू.

वाचून असं वाटतं की असला प्रवास म्हणजे कसले हाल! पण तसं नव्हतं. माओ-त्से-तुंगने लिहिलं आहे, “गरिबी भयावह केव्हां वाटते? जेव्हां तुलना करायला समोर श्रीमंती असते तेव्हांच.” एस्टीचा प्रवास हा असाच असतो हे पटलं असल्यामुळे त्याचा त्रास व्हायचा नाही. (मामाच्च्या गावाला जाऊया वगैरे गाण्यात ट्रेन प्रवास आहे. एस्टीचा नाही.)

असाच एकदा मी पाचगणीला चाललो होतो. बहुदा सातवीत होतो. तिघांच्या सीटवर माझी aisle सीट. माझ्या शेजारी मधुचंद्राला निघालेलं जोडपं. माझ्या शेजारी बायको, खिडकीशेजारी नवरा. नवरा ‘आ’ वासून डाराडूर ! बायको मात्र अस्वस्थ. मळमळण्याची सर्व लक्षणं दिसत होती. सबंद चेहरा पुन्हा पुन्हा चोळायचा, अस्थिर नजर – बाहेर बघायचं, लगेच आत, खाली, वर, पुन्हा बाहेर, मधूनच दीर्घ सुस्कारा, पुन्हा पुन्हा आवंढा गिळायचा, मला सर्व classic symptoms पाठ.

शेवटी तिच्या पोटानी बंड पुकारलंच. तिनी घाईघाईनी पिशवीतून पंचा काढला, एका उमाळ्यात पोट पंचात रिकामं केलं आणि सांडू नये म्हणून वरून पंचाच्या मुसक्या बांधल्या. आपण चक्का बांधतो तसा ! मी टुणकन उडी मारून सुरक्षित अंतरावर उभा. तिनी चक्का तसाच हातात धरून उजव्या कोपरानी ढोसून नवर्‍याला उठवलं. “अहो, अहो. मला बस लागली.”

नवरा साखरझोपेतून जागा होऊन परिस्थिती त्याच्या लक्षात येईपर्यंत काही क्षण गेले. तोपर्यंत चक्का पंचातून बाहेर झिरपून थेंब पडण्याच्या बेतात होता. ते बघून तो बिथरला. त्यानी तिच्या हातातून चक्क्याचं पार्सल खसकन् ओढून घेतलं आणि खिडकीच्या बाहेर टाकून दिलं!

ती बिचारी “अहो आपला पंचा – आपला पंचा” म्हणेपर्यंत पंचाचं विसर्जन झालं देखील.

त्यानी पंचा बाहेर टाकला मात्र, इरसाल शिव्या बाहेरून ऐकू आल्या आणि अर्ध्या मिनिटातच कचकन् ब्रेक लावून बस थांबली. नवर्‍याच्या दुर्दैवानी चार रावण दोन राजदूत मोटारसायकलवर बसून कुठूनतरी कुठेतरी चालले होते त्यातल्या दोघांना पंचाचा प्रसाद मिळाला होता ! त्यांनी मोटारसायकली आडव्या घालून बस थांबवली होती.

दोन रावण मागच्या दरवाज्यापाशी येऊन उघडण्यासाठी धडपडू लागले. बहुतेक शिव्या मी पूर्वी न ऐकलेल्या होत्या. कंडक्टर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करंत होता. “बस लागती तेला कोन काय करनार? धोयाला पानी देतो.” मात्र दरवाजा काही उघडू देत नव्हता. इथे डाळ शिजत नाही असं पाहिल्यावर दुसर्‍या दोन रावणांनी ड्रायव्हरचा दरवाजा खुशाल उघडला आणि चढायचा प्रयत्न करू लागले. कंडक्टरसकट आम्हा सगळ्यांचं लक्षं पुढे गेलं त्याचा फायदा घेऊन मागच्या रावणांनी आत हात घालून मागचा दरवाजा उघडला आणि आत आले. कोणी पंचा टाकला होता ते त्यांनी बघितलेलं असावं. सरळ आमच्या सीटकडे येऊन “बाजू हो रे पोरा” असं म्हणत मला खसकन् उचलूनच बाजूला काढलं. नवर्‍याला कॉलरला धरून ओढलं आणि ठोकायला लागले. कंडक्टरसकट बाकी प्रवासी मधे पडले आणि लवकरच शांतता प्रस्थापित झाली. पण तोपर्यंत चार सहा तरी full blooded बुक्के बिचार्या नवर्‍याला खायला लागले होते.

फिरकीचे तांबे असलेल्यां प्रवाशांनी पाणी देऊ केलं. मांडलिक राजाप्रमाणे नवर्‍यानी रावणांचा शर्ट धुतला. हळुहळु शिव्यांचा पूर आटला. राजदूतवर बसून ते चौघे रवाना झाले आणि आमचा प्रवास पूर्ववत सुरू झाला.

पूर्ववत म्हणजे खरोखरच पूर्ववत. दहा मिनिटे जेमतेम गेली असतील नसतील. बायकोचा रडवेला सूर मला ऐकू आला. “अहो, मला पुन्हा उलटीसारखं वाटतंय्. तुम्ही पंचा पण टाकून दिलात”

“मग कर ना ! माझ्या अंगावरच कर आता !”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगागा

साफ मेलो

=))

@@शेवटी तिच्या पोटानी बंड पुकारलंच. तिनी घाईघाईनी पिशवीतून पंचा काढला, एका उमाळ्यात पोट पंचात रिकामं केलं आणि सांडू नये म्हणून वरून पंचाच्या मुसक्या बांधल्या. आपण चक्का बांधतो तसा !>>>

आता घंटा खातोय मी श्रीखंड कधी
काय राव तुम्ही

अग आई ग !!!
त्या कॉकटेलच्या वासाला , बसची थरथर, सगळ्याला +++१
त्या वासात तापलेल्या सीटचा (रबरी ?) वास आणि टेकायला असलेल्या दांड्यांचा लोखंडी वास पण अ‍ॅड करा.
माझ्या प्रवासाच्या नॉशियाला हा कॉकटेल वासच कारणीभूत आहे. आजही कुठे बसने जायचे मला प्रचंड जीवावर येते. तो वास आठवूनच पोटात ढवळायला होत Sad

बाकी लेख नेहमीसारखाच मस्त.. एकदम खतरनाक अनुभव आहे. त्या बाईकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या नव्ह्त्या का?

छान लिहिलेय, नेहमीप्रमाणे..

लहानपणी मलाही लागायची बस फार्र, काही उलट्याही काढल्यात..
नंतर उलटीवरची गोळी घेऊन प्रवास करायला लागलो, तोंडात आवळा सुपारी ठेवायला लागलो, तेव्हा मात्र थांबू लागल्या.. बस्स थोडीशी मळमळ काय ती व्हायची, पण बाहेर नाही यायची..
कालांतराने ती देखील कमी होत होत थांबली आणि गोळी न घेताही सुखरूप प्रवास करू लागलो.. तब्येतीत काहीतरी सुधारले बहुधा.. पण तरीही रिस्क नको म्हणून सोबत आवळा सुपारी बाळगायचो..
पुढे ते आवळा सुपारीचे पाकीट मिळायचे बंद झाले.. पण एव्हाना माझी उलटीप्रतिकारशक्ती पुरती सुधारली होती..
हल्ली शेवटची उलटी वा मळमळ केव्हा झालेली हे देखील आठवत नाहीये..
पण आयुष्यात एक ग'फ्रेंड आलीये, जी यात प्रावीण्य राखून आहे..
प्रवास दीड-दोन तासांच्या वर गेला की रस्ता कितीही चांगला असो वा गाडी कितीही अत्याधुनिक असो..

बाकी काही नाही, पण तुमच्या अनुभवातील नवर्‍याची स्थिती बघून जरा टेंशन आलेय..

पण आयुष्यात एक ग'फ्रेंड आलीये, जी यात प्रावीण्य राखून आहे..

बाकी काही नाही, पण तुमच्या अनुभवातील नवर्‍याची स्थिती बघून जरा टेंशन आलेय..>>>>>खिडकीजवळची सीट देत जा बायडीला.:फिदी:

मला कधीतरी मळमळते, तसे बाकी होत नाही. पोहे, ब्रेड वगैरे खाऊन प्रवास करुच नये अशा लोकानी.

अरारा!!!
लेख भारी लिहिलात पण. Happy

आमची शाळेतील महाबळेश्वर , प्रतापगड, रायगड सहल आठवली.
आम्हा ५-७ जणांना सर्वात मागची सीट मिळालेली. तीच जिथुन इमर्जन्सी एक्जिट असायची.
सकाळीच मास्तर लोकांनी कुणाकुणाला उलटी होते त्याने उलटीच्या गोळ्या घ्या, आवळा सुपारी घ्या ची टेप लावलेली. ज्यांना त्रास होतो त्यांनी सर्वोतपरी काळजी घेतलेली होतीच. आमच्या ५-७ जणापैकी कोणालाही बस लागली नाही.
पण..... पुढे बसलेल्या कोणालाही बस लागली की मास्तर त्यांना आमच्या सीट वर आणायचे आणि तो अथवा ती इमर्जन्सी एक्जिट मधुन रस्त्यावर मळमळ बाहेर काढत.
त्यात सगळ्यात आघाडीवर आमचाच हट्टाकट्टा दिसणारा एक दोस्त. Sad
त्याला तर आम्ही दोघांनी पकडला होता बाहेर पडु नये एसटीतुन म्हणुन.
पहिल्या तासातच सगळीकडे तोच वास. Sad