संवाद : अतुल कुलकर्णी

Submitted by योग on 20 January, 2009 - 01:46

संवाद: अतुल कुलकर्णी
दुबई, २ जानेवारी, २००९.
atulsnap1.jpg

अतुल कुलकर्णी या कलावंताबद्दल वेगळ लिहायची गरज नाही. दोन राष्ट्रीय पुरस्कार ("हे राम", "चांदनी बार"), आठ नाट्य पुरस्कार (गांधी विरुद्ध गांधी), आणि इतर अनेक पुरस्कार यांनी सन्मानित केल्या गेलेल्या या कलावंताने मराठी अन हिंदी चित्रपटसृष्टीत निश्चीत स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आहे. या संवादातून अतुल कुलकर्णी हे अत्यंत सक्षम, अभ्यासू, चौकस, अन् एक स्वतःचा स्पष्ट अन ठोस दृष्टीकोन असलेले कलावंत आहेत हे प्रकर्षाने जाणवतं (मला तरी). त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर अगदी मनमोकळेपणाने त्यांचे विचार मांडले आहेत- स्वतःची व्यावसायिक वाटचाल, एकंदर चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शनाचे पैलू, तांत्रिक भाग, अभिनय, चित्रपटांचे बदललेले स्वरूप, अन् चित्रपट व्यवसाय अन कला यांतील संबंध, नाटक, इत्यादी. त्याचबरोबर (२६ नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर) भारतातील सद्य राजकीय, सामाजिक परिस्थिती, प्रश्न, कारणमीमांसा, अन् नागरीक म्हणून आपले कर्तव्य याही बाबतीत त्यांनी रोखठोख मते मांडली आहेत.

अतुल कुलकर्णी यांच्याशी झालेला संवाद लिहिण्याआधी थोडीशी पार्श्वभूमी स्पष्ट करणे उचीत ठरेल.

दुबईमध्ये मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रकाश व मंदाताई आमटे यांच्या सत्कार समारंभानिमीत्त अतुल दुबईमध्ये आले होते. प्रथम भेट झाली तेव्हा त्यांची मुलाखत घ्यायची अस काही ठरल नव्हत. पण दुसरे दिवशी पुन्हा आयोजकांनी ठरवलेल्या सदिच्छा भेट-डीनरच्या निमित्ताने आम्ही भेटणार होतो तेव्हा मायबोलीसाठी मुलाखत घ्यावी असा विचार आला. आयत्या वेळी घ्यावी लागली तर तयारी हवी म्हणून अतुलबद्दल थोडासा रिसर्च करून व व्हॉईस रेकॉर्डर बरोबर घेवून गेलो होतो. आणि नेमके तसेच झाले. दुसरे दिवशी त्यांचा दुबईतील कार्यक्रम, भेटीगाठी ठरलेल्या असल्याने "आताच जेवताना बोलुया" असे त्यांनी सुचवले. पण "मला सद्य राजकीय, सामाजिक (२६ नोव्हेंबर च्या पार्श्वभूमीवर) परिस्थितीवर बोलायचे आहे" अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

खर तर मी फक्त चित्रपट अन् त्यांची कारकीर्द या दृष्टीकोनातून मुलाखत घ्यायची ठरवले होते पण सद्य परिस्थितीवर नेमके काय विचारता येईल याची अजिबात तयारी नव्हती. तरिही मुलाखत दोन भागात घेऊ, पहिला चित्रपटाच्या अंगाने अन दुसरा सद्य परिस्थीतीवरून असे मी सुचवले ते त्यांनी कबूल केले.

तर आयत्या वेळी अन् अचानक मिळालेली ही संधी वाया जाऊ नये म्हणून शक्य तितक्या विविध प्रश्नांतून मी मुलाखत घ्यायचा प्रयत्न केला आहे. ही मुलाखत एक "संवाद" कसा करता येईल असा एक जाणीवपूर्वक प्रयत्न मी केला आहे. तो तुम्हाला रुचेल अशी आशा करतो.

सादर आहे अतुल कुलकर्णी या कलावंताबरोबर एक रोखठो़ख संवाद.

योग: थोडसं नाही म्हटल तरी तुमच्या चित्रपट आणि नाटक करीयरपासूनच सुरुवात करावी लागेल. सोलापूरच्या कॉलेज दिवसांतल्या ड्रामा थियेटरपासून रंग दे बसंतीमध्ये आमिरबरोबर काम या प्रवासाचं दोन वाक्यात काय वर्णन करता येईल, looking back..?

अतुल: (दोन वाक्यात) satisfy नाही करता येणार.. परंतु, ज्या क्षेत्रामधे काम, प्रोफेशन करावंसं वाटल, त्याच्यामध्ये मी प्रोफेशन करू शकलो आतापर्यंत तरी, ही सर्वांत मोठी समाधानाची गोष्ट आहे. असं वाटलं नव्हतं आधी, कॉलेजमध्ये असतानासुद्धा, की या क्षेत्रात मी व्यवसाय म्हणून कधी उतरेन कारण मी हौशी रंगभूमीवरच काम करत होतो.

योग: म्हणजे अस काही ध्येय नव्हत की आपल्याला सिनेमातच काम करायचं आहे वगैरे..

अतुल: अजिबातच नव्हतं. नंतर म्हणजे खूप नंतर नंतर म्हणजे मी (सोलापुरात) काम सुरू केल्यानंतर एक सहा वर्षानी असं वाटायला लागल की आपण प्रोफेशनली काम करूया आणि मराठी व्यावसायिक नाटक हेच खरं तर त्यावेळी ध्येय होत पण अर्थातच कालांतराने नंतर या व्यवसायामध्ये आल्यानंतर जसजशी संधी मिळाली तसं चित्रपटात काम करायला लागलो आणि मग आता अर्थातच चित्रपटामध्येच जास्त व्यस्त आहे कारण चित्रपटाबद्दलच जास्त विचारल जात..

योग: पहिलं नाटक आठवत का..? पहिलं व्यावसायिक नाटक, स्टेजवरचं ?

अतुल: गांधी विरुद्ध गांधी. कारण मी व्यावसायिक नाटकं फक्त दोनच केली आहेत, आणि एक सेमी कमर्शियल नाटक. व्यावसायिक नट म्हणून मी नाटकं/नाटक खूप केल नाहीये. गांधी विरुद्ध गांधी हेच पहिल व्यावसायिक नाट़क होत.

योग: आणि पहिला चित्रपट आठवतोय का ("हे राम")?
अतुलः हे राम.

योग: मराठी चित्रपट..? पहिला नाही पण मग जो तुमच्या करीयरच्या दृष्टीकोनातून मराठी चित्रपटसृष्टीत तुमचा लँड्मार्क ठरला..?
अतुल: दहावी फ माझा पहिला मराठी चित्रपट होता अस मला वाटत.
योग: दहावी फ हा बराच अलिकडचा आहे..?
अतुल: नाही फार अलिकडचा नाही, त्याला सहा सात वर्ष होऊन गेली. मला मुळात काम करायला लागल्यापासून फार नाही वर्ष झाली. चित्रपटात काम करायला लागल्यापासून आठ(च) वर्ष झाली.
योग: "कैरी" चित्रपट २००० मधला तो पहिला नाही का..?
अतुल: नाही पहिला "हे राम".
योग: बरं. कदाचित प्रदर्शनामध्ये पुढे मागे काहितरी झाल असेल..
अतुल: हो शक्य आहे. बेसिकली "हे राम" पहिला.

योग: हे राम वरून पुढचा प्रश्न विचारतो, काल तुम्ही कार्यक्रमात असं म्हणालात की कमल हासन हे तुमचे गुरु...

अतुल: नाही हे गुरू बिरू (हसत), या सगळ्या शब्दांना भयंकर घाबरतो मी (हसत). गुरू वगैरे अशा अर्थाने म्हणणार नाही. पण पहिल्यांदी त्यांनी मला सिनेमाबद्दल सांगितल, शिकवल, पण तेसुद्धा अत्यंत informal होत, फार काही formal अस त्याच स्वरूप नव्हत.

योग: पण म्हणजे सिनेमातील सॉफ्ट व इतर तांत्रिक गोष्टींच विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी (NSD खेरीज)आपण कुणाकडे जावं अस काही कधी तुमच्या मनात आलं होतं का?

अतुल: एक तर मी NSD (National School of Drama, Delhi), मध्ये गेलो तेव्हाच सत्तवीस वर्षांचा होतो, ज्यावेळी व्यवसाय म्हणून मी हे सुरू केलं त्यावेळी आधीच तीस वर्षांचा होतो. तर त्याच्यापुढे परत चित्रपटासाठी शिक्षण घेण्याची स्थिती नव्हती, ना वयाची स्थिती होती, ना अर्थि़क स्थिती होती आणि तस काही डोळ्यासमोर नव्हत की चित्रपटातच जायचं आहे. व्यावसायिक मराठी नाटक मी मघाशी म्हणालो तेच एक प्राथमिक ध्येय होत, पण things, films happened.

योग: मग "हे राम" चित्रपट नेमका कसा काय झाला?

अतुल: मी "गांधी विरुद्ध गांधी" नाटक करत होतो त्याच्याबद्दल कमल हासन यांनी ऐकलेलं होतं. त्यांच्याबरोबर जे लोक काम करत होते त्यांनी ते नाटक पाहिलेलं होतं, त्याच लोकांनी माझं नाव कमलजींना सुचवलं आणि मग त्यांनी मला बोलावून घेतलं, फारच सहज.. त्याच्यासाठी फार अस मी काहीच केलं नाही.

योग: बर! मग असं म्हणता येईल का की गांधी विरुद्ध गांधीचा उपयोग श्रीराम अभ्यंकरचं पात्र (हे राम चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कार) रंगवण्यात झाला?

अतुल: नक्कीच झाला. कारण श्रीराम अभ्यंकर कुठल्या फिलॉसॉफिला विरोध करतो आहे याचा मी आधीच अभ्यास केलेला होता, आणि गांधींचाच रोल मी करत होतो त्यामुळे गांधी विरोध का आहे (श्रीराम अभ्यंकर या पात्राचा) त्याचा उपयोग निश्चित १००% टक्के झाला.

योग: "हे राम" हा तुमच्या हिन्दी चित्रपटातील कारकीर्दीतला एक turning point आहे का तुमच्या दृष्टीकोनातून? का "चांदनी बार" हा चित्रपट turning point आहे?

अतुल: असं आहे की तुम्ही कशाला टर्निंग पॉईंट म्हणता, त्याची व्याख्या काय करायची, यावर ते अवलंबून आहे. हे राम हा माझा पहिलाच चित्रपट होता त्यामूळे चित्रपटात माझी एंट्री त्यामुळे झाली त्याअर्थी "हे राम हा" टर्निंग पॉईंट आहे. आणि हे राममुळे मला चांदनी बार मिळाला आणि चांदनी बार हा कमर्शियली खूप यशस्वी झाला, आणि त्यामुळे आणखी एक ओळख, मान्यता मिळाली . त्यामुळे त्या अर्थाने तो एक टर्निंग पॉईंट झाला.

योग: पण "हे राम" साठीही तुम्हाला national award मिळालेलं आहे..
अतुल: त्यानी काही होत नाही.. ऍवार्ड वगैरेनी काही होत नसतं..
योग: पण मग कमल हासन यांच्याबरोबर काम केलं म्हणून एक वजन येत का, एक ग्राऊंड तयार होत का?

अतुल: असं काही नाही वाटत मला. शेवटी तुमचं काम लोकांना कसं वाटत. याच्यावर सगळं अवलंबून आहे. स्केलचा निश्चित परीणाम होतो कारण तुम्ही एका मोठ्या चित्रपटामध्ये असता अन जास्तीत जास्त लोक तो पाहतात हा त्याचा फायदा नक्कीच होतो. पण शेवटी तुमचं काम लोकांना कसं वाटतं आहे यावर सगळं अवलंबून आहे.

योग: बरं! मग त्या (काम) या मुद्द्यावरून असा प्रश्न येतो की चित्रपटातलं आपलं (नटाचं) काम हे जवळजवळ ९०% हे दिग्दर्शक अन पटकथाकार यांच्यावर अवलंबून असत. आपण (नट) केवळ त्यांचे बाहुले असतो. नाटकामध्ये आपल्याला पूर्ण वाव असतो, वैयक्तिक सुधारणा किंवा आयत्या वेळी रंगमाचावर काही नवीन भर घालणं अशाप्रकारे. चित्रपटात मात्र त्या बाबतीत थोडीफार आपल्यावर (नट म्हणून) बंधनं येतात असा समज आहे.

अतुल: पूर्ण चूकीची समजूत आहे.. अस अजिबात नाहीये.. अशी म्हणायची एक पद्धत आहे, उगाचच रंगभूमीला मोठं करायची एक पद्धत आहे.. असं काही नाही. सिनेमामध्ये काम करणं हे तितकच चॅलेंजिंग आहे. अर्थात सिनेमा हे (जास्त) तांत्रिक माध्यम आहे पण त्याला अभिनयाच्या दृष्टीकोनातून कमी लेखण्याचं अजिबात कारण नाही. कारण सिनेमामध्ये उलट नाटकापेक्षा अभिनय करणे जास्त अवघड आहे माझ्या मते. कारण सिनेमामध्ये तुम्हाला काम करताना गोष्टी खूप इमॅजीन कराव्या लागतात, तुम्ही तुकड्यातुकड्यात काम करत असता. सगळं इमॅजिन करणं, डोळ्यासमोर आणणं, तांत्रिक गोष्टी माहीत करून घेणं जसे की- कॅमेरा काय आहे, अँगल काय आहे, लेन्सेस काय आहेत, फोकस काय आहे, लाईटींग काय आहे, एडिटिंग काय आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. शिवाय पोस्ट प्रॉड्क्शनमध्ये काय काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून काम करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. आणि हे एक मुख्यत्वेकरून मराठी मध्यमवर्गीय समाजात फार आहे, बघा आमच नाटक(च) कसं ग्रेट आहे आणि सिनेमा कसा इन्फिरीयर.. हे अत्यंत चुकीचं आहे. अस अजिबात नाहीये. नाटकाचा अनुभव हा एक वेगळा अनुभव आहे. कारण मला वाटतं नाटकात तुम्ही गोष्टी रिपीट करता, प्रत्येक प्रयोगाला तेच तेच करता, ही नाटकाची एक गोष्ट मला खूप आवडते, जी सिनेमात शक्य होत नाही. कारण एकदा तो टेक दिल्यानंतर पुन्हा तो टेक तुम्ही देत नाही चित्रपटात (चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर). त्यामुळे दोन्ही माध्यमांची वेगवेगळी शक्तिस्थानं आहेत. परंतु सिनेमा हे टेक्निकल माध्यम असल्याने दिग्दर्शकाच्या हातात निश्चितच खूप गोष्टी असतात. एडीट काय काय होऊ शकतं, कस होऊ शकतं वगैरे, याच्यावर खूप काही अवलंबून आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की नट म्हणून तुम्हाला सिनेमात स्वातंत्र्य नाही किंवा नट म्हणून स्कोप नाही किंवा काम करणं चॅलेंजिंग नाही.

योग: बरं! त्या अनुषंगाने एक प्रश्न मनात येतो की "हे राम"मध्ये कमल हासनबरोबर, "चांदनी बार"मध्ये मधुरबरोबर आणि "रंग दे बसंती"मध्ये आमिरबरोबर काम करताना, या तिघांच्या स्टाईलमध्ये कुठला दिग्दर्शक असा वाटला की जो तुमच्या आतल्या कलाकाराला संपूर्ण वाव द्यायला तयार होता? म्हणजे त्याने तुम्हाला सांगितलं, अतुल हे असं पात्र आहे, हा रोल आहे, हवा तसा फुलवा.. का तिघांच्या स्टाईल इतक्या वेगळ्या आहेत की त्यांची तुलना करता येत नाही आणि they have their own unique qualities?

अतुलः "रंग दे बसंती" हा आमिर खानने दिग्दर्शित केला नव्हता, राकेश मेहराने केला होता.

योग: पण मी off the record अस विचारेन की असं ऐकीवात आहे की आमिर खान हा प्रत्येक बाबतीत लक्ष घालतो.

अतुल: कसं आहे की ज्याला, ज्या माणसाला बुद्धी आहे त्या माणसाची जगाला नेहमी भीती वाटते. तेच आमिर खानच्या बाबतीत आहे. आमिर खान हा अत्यंत बुद्धीमान नट आहे, त्याला सिनेमाच्या तंत्रातलं खूप कळतं, आणि तो अचूक असतो, त्याला माहिती आहे. त्यामुळे कुठलाही बुद्धीमान माणूस काही सांगत असेल आणि समोरचा माणूस शहाणा असेल, तर तो ऐकतो, त्याला कळतं की तो काय बोलतो आहे. आणि आमिर खानला सिनेमात घेऊन जर तुम्ही आमिर खानचा या बाबतीत उपयोग करून घेत नसाल तर तुम्ही मूर्ख आहात.. असं मी म्हणत नाही, असं त्याचे दिग्दर्शकही म्हणतात. नुकताच "जाने तू या जाने ना" हा चित्रपट ज्याने दिग्दर्शीत केला तो अब्बास टायरवालाही हेच म्हणाला. त्यामुळे या सगळ्या (आमिर बद्दल) glossy magazines मधून आलेल्या गोष्टी आहेत त्यावर लोकांनी फार विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही.

योग: बर! पण मग परत मूळ प्रश्नाकडे वळूया.. राकेश मेहरा, मधुर भंडारकर, आणि कमल हासन यांच्यातील स्टाईल्सबद्दल..

अतुल: प्रत्येक दिग्दर्शक हा त्याचा दृढ विश्वास, संकल्पना, शैक्षणिक पार्श्वभूमी, आणि त्याचा अनुभव घेऊन येतो. त्यामुळे या तिघांमध्ये (त्या अर्थाने) तुलना होऊच शकत नाही. कमलजींनी पहिला चित्रपट ते चार वर्षांचा असताना केला. त्यांचा चित्रपटाचा अनुभव जवळजवळ त्यांच्या वयाएवढा आहे. मधुरची एक वेगळीच सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, एका वेगळ्याच पद्धतीने तो सिनेमा शिकला. राकेश मेहरानी जवळजवळ अडीचशे ते तीनशे जाहिरातपट केले आहेत, त्यामुळे त्यांचा अनुभव वेगळा आहे. त्यामुळे दिग्दर्शकांची तुलना करणं तितकं सोपं नाही. प्रत्येकजण काय दृढ संकल्पनेबरोबर त्याचा विषय घेऊन येतो यावर ते अवलंबून आहे.

अर्थातच (प्रत्येक) नटांच्याबाबतीत त्यांची पद्धत वेगवेगळी आहे. आता कमल हासन हे सुद्धा स्वतः नट आहेत पण त्यांनी मला कधी काही करून दाखवली नाही कुठलीही गोष्ट. पण नटाला दिग्दर्शित करण्याची एक वेगळी खूबी ते स्वतः नट असल्याने त्यांच्याकडे आहे. त्यांना एक जाणीव आहे की नटाचं काय होऊ शकतं याविषयीची. राकेश मेहरा हा असा दिग्दर्शक आहे जो तुम्हाला खूप देत रहातो. सेटवर जाण्याआधी तो अनेकदा तुमच्याशी बोलतो, स्क्रिप्टची वाचनं होतात, तुम्हाला इतर माहिती पुरवली जाते, त्यामुळे तो तुम्हाला तयार करत असतो, आणि मग तुम्हाला तो करू देतो. आणि जी गोष्ट त्याच्या पडद्यावरील चित्रपटातील गोष्टीच्या बाहेर जाते आहे असं त्याला वाटतं ती गोष्ट तो तुम्हाला सांगतो. जी गोष्ट त्याच्या रेंजमध्ये घडतीये त्या गोष्टी तो तश्याच घडू देतो, त्यात ढवळाढवळ नाही करत. मधुरचा भर हा त्याच्या विषयांवर असतो, संवादांवर असतो, त्याची पात्रं जी आहेत ती खूप सशक्त असतात, आणि त्याची प्रत्येक पात्रं ही दैनंदीन आयुष्यातून घेतलेली असतात. त्यामुळे त्याची काम करण्याची पद्धत ही आणखीनच वेगळी आहे.

योग: एक असा प्रश्न मनात येतो की चित्रपट दुनियेत, हिंदी चित्रपटात, हीरो किंवा नायक या कल्पनेला पडद्यावर, अन् पडद्याबाहेर, ग्लॅमर आणि यॅव त्याव, बरच काही त्याच्या अनुषंगाने येतं. किंवा आपल्याकडे हीरो, सुपर हीरो, हे फार वर्षांपासून चालत आले आहेत.. कधी आपल्याला हीरो(च) व्हायचं आहे असं कधी मनात आलं होतं का?

अतुल: मी ज्या काळात सिनेमामधे आलो तेव्हा सगळ्या संकल्पना खूप वेगळ्या झालेल्या होत्या. हीरो अशा संकल्पना आता सिनेमात फार त्या अर्थानी राहिलेल्या नाहीत. अर्थात कुठल्याही गोष्टीला एक नायक वा नायिका असते, परंतु पूर्वी ज्या पद्धतीने सिनेमा असायचा किंवा होता तसा तो आता राहिलेला नाहीये, विशेषतः गेल्या सहा ते आठ वर्षांमध्ये. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचा सिनेमा आपल्याला बघायला मिळतो आहे. आणि त्यामुळे मी जेव्हा काम करायला लागलो त्यावेळी सिनेमाच बदलेला होता. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा तुम्ही काम सुरू करता, त्यावेळेला अर्थातच तुम्हाला काही वेळ द्यावा लागतो जोपर्यंत दिग्दर्शकाला तुमच्यावरती विश्वास वाटायला लागेल, तुमचं एक मार्केट तयार व्हायला लागेल. कारण सिनेमा हा खूप महाग व्यवसाय आहे, कला आहे, त्यात खूप पैसा लावावा लागतो. त्यामुळे निर्मात्याचा तो पैसा वसूल होण्याची तुमची लोकप्रियता आहे का हासुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे त्यात. त्यामुळे ही गोष्ट व्हायला लागते, तुमच्या इच्छेवर ती पूर्णपणे अवलंबून असते असं मला वाटत नाही.

योग: मग आज अतुल कुलकर्णी हा चरीत्र अभिनेता म्हणून लोकांनी ओळखलं जावं असं वाटतं का एक चांगला अभिनेता म्हणून ओळखलं जावं असं वाटतं का मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी या दोन्हीकडे बहुढंगी (versatile) म्हणून आजचा आघाडीचा अभिनेता अशी तुमची ओळख प्रेक्षकांमध्ये आहे, या तीनपैकी तुम्हाला नेमक काय वाटतं?

अतुल: काय आहे (ओळख) मला माहीत नाही. मला एक निश्चित अस वाटतं, कारण ते माझ्या एका चाहत्याने मला सांगितलं काही दिवसांपूर्वी, की तुमचा चेहेरा पोस्टरवरती असला की आम्हाला खात्री असते की सिनेमात काही ना काहीतरी आहे, हा चांगला सिनेमा असणार. त्यामुळे माझं नाव हे दर्जाशी (quality) जोडलं गेलेलं आहे बर्‍याच अंशी. चांगल्या प्रकारच्या सिनेमामधे मी असतो अशी एक इमेज माझी लोकांमध्ये आहे, आणि I am quite happy about it.

योग: म्हणजे कुठल्याही एका प्रकारच्या साच्यात तुम्ही स्वतःला बघत नाही.. चरीत्र अभिनेता किंवा इतर..

अतुल: अस नाहीये. मी तेच म्हटल की सिनेमा आता इतका बदललेला आहे.. की आता तुम्ही "ओंकारा" सारख्या सिनेमामध्ये सैफ अली खानने जो रोल केलाय त्याला तुम्ही काय म्हणाल? सैफ अली खान हा एक हीरो किंवा नायक म्हणतो तसा आहे पण ओंकारामध्ये त्याने जे पात्रं केलेलं आहे ते पूर्णपणे वेगळं पात्र आहे. अगदी "रंग दे बसंती"चं उदाहरण घेतलं तर त्याच्यात आमिर खान हा काही (एकटा) हीरो नव्हता. त्याच्यामध्ये सगळे आम्ही पाच सहाजण हीरो होतो. हां! आता आमिर खानची म्हणून एक लोकप्रियता आहे, एक इमेज आहे, एक स्टार आहे तो. त्यामूळे त्याचं आकर्षण हे निश्चितच जास्ती आहे आणि ते असायलाच हवं. परंतु नट आम्ही बनतो कारण अभिनय करायला आवडतो आणि शेवटी तेवढंच आहे. Thats about it, nothing before, nothing beyond that.

योग: नविन चित्रपटांविषयी एक प्रश्न विचारतो. "Delhi 6" हा तुमचा नविन चित्रपट येतोय, हा कधी प्रदर्शित होत आहे? आणि यात तुम्ही पहिल्यांदा अभिषेक बच्चनबरोबर काम करता आहात. Excited? कारण अभिषेक बच्चनच्या नावाच्या भोवती एक वलय आहे...

अतुल: (हसत..) मी त्याच्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे त्यामूळे त्याच्याबरोबर काम करण्याचं फार काही वलय असण्याचं कारण नाही. मला वाटतं मी या व्यवसायामध्ये जेव्हा येतो त्यावेळेला कधी ना कधी या सगळ्यांबरोबर मी काम करणारच. त्याच्यामध्ये काही अप्रुप वाटून घेण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही एक नट म्हणून.

योग: मग त्याच्या वडिलांबरोबर म्हणजे अमितजींबरोबर तुम्ही "खाकी"मध्ये काम केल तेव्हा काही विशेष"वाटलं होतं का?

अतुल: नाही! मला हेच नेहेमी वाटलेलं आहे की मी या व्यवसायात येतो त्यावेळेला या सगळ्यांबरोबर कधी ना कधी संवाद, देवाणघेवाण होणारच आहे. मला उत्सुकता होती की ही माणसं काम कशी करतात सेटवर. अमितजींसारखा माणूस हा सेटवर कशा पद्धतीने काम करतो हे बघण्यात जास्त रस होता, मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे या गोष्टीपेक्षा. किंवा आमिरबरोबर काम करताना त्याला माणूस म्हणून जाणून घेण्यात, त्याचे सिनेमाच्या बाबतीत जे विचार आहेत ते जाणून घेण्यात मला जास्त रस आहे. त्यामुळे "Delhi 6"मध्ये मला त्याच्या गोष्टीमुळे जास्त रस आहे. ती गोष्ट लोक कशी स्विकारतात याची उत्सुकता आहे. ती खूप वेगळ्या पद्धतीची गोष्ट आहे, चित्रीकरणाच्या दृष्टीने एका वेगळ्या पद्धतीचा तो सिनेमा आहे. तो राकेश मेहरांचा सिनेमा आहे ज्यात प्रत्येक पात्राची आपली आपली वेगळी गोष्ट आहे. अभिषेक, सोनम जरी असले, आणि अभिषेकच्या दृष्टिकोनातून जरी गोष्ट असली तरी सगळी पात्रं फार सुरेख आहेत. त्यामुळे या सिनेमाला, गोष्टीला लोक कसा प्रतिसाद देतील याबद्दल मी जास्त उत्सुक आहे.

योग: चित्रपटाबद्दल अजूनही एक प्रश्न विचारावासा वाटतो. "दम" या चित्रपटातील "एन्काऊंटर शंकर" हे जे पात्र आहे त्याबद्दल. ते पात्रं मला स्वतःला इतकं आवडलं की त्याला पडद्यावर बघितल्यावर डोक्यात तिडीक जायची की "अरे याला उचला रे!" ते पात्र इतक भन्नाट रंगवलं गेलं होतं, ते एक विकृत हसणं, वगैरे जे एक संपूर्ण पॅकेज होतं... अशी पात्रं वास्तवात नसतात, लिहिलीदेखील कमी जातात. तर ते पात्र (किंवा तस पात्रं, भूमिका) रंगवताना, करताना तुम्हाला काही abstract thinking विशेष करावं लागलं का?

अतुल: अशी पात्रं करताना, you have to play the moment! त्याच्यामध्ये बाकी काहिही जसं, इतर पात्रं करताना त्यांच्या इतिहासाबद्दल, एकूण पार्श्वभूमीबद्दल, किंवा असं का, तो असं का बोलतोय, असं का करतोय, असा तुम्ही विचार करता, त्याला (त्या विचाराला) इथे वाव नसतो.
योग: म्हणजे थोडक्यात, there is no reference.
अतुल: Correct! There is no reference at all. आणि त्यामुळे तुम्हाला you have to play that moment. आत्ता तो (पात्र) असा बोलतो आहे आणि तो आत्ता कसा बोलेल किंवा कसा वागतो आहे याचाच फक्त विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्ही फक्त त्या सेकंदाचा विचार करता. त्याच्याआधी, मागे, त्याचं लॉजिक वगैरेचा फारसा विचार करत नाही, करू नये.
योग: That is risky..
अतुल: It is the way you approach that character. It is not risky at all. ते काय फक्तं पात्रच तसं नसतं, तो सिनेमा, त्या सिनेमाची पद्धतच तशी असते. "दम" हा सिनेमा जर बघितला तर एक सूडकथा आहे. अशा सिनेमाची पद्धत, धाटणीच (genre) मुळात तशी आहे. त्यामुळे त्यातली पात्रं ही तशीच असतात. आणि असं काही नाही की बाकी सगळी पात्रं फार खरी आहेत अन् हे एकच पात्र अतर्क्य आहे. त्यामुळे रिस्की नाही पण you have to just play the moment and convincingly!

योग: मग "देवराई" (2004) चित्रपटामध्ये तुमचं जे सिजोफ्रेनिक पात्रं आहे, सिजोफ्रेनिया संबंधित जे काही मानसिक द्वंद्व त्यात दाखवलं आहे, किंवा त्याच्याबद्दल दाखवलं आहे, त्यासाठी साधारण त्याच काळात अमेरिकेमध्ये Beautiful Mind (2001) हा चित्रपट गाजत होता. तो रेफरन्स तुम्ही समोर ठेवला होता का? का तुम्ही फक्त त्याचा (सिजोफ्रेनियाशी संबंधित गोंष्टींचा) अभ्यास केला होता आणि मग स्वतःचा रेफरन्स त्यातून बनवला?

अतुल: "Beautiful Mind" is more of thriller than a movie about schizophrenia patient. ज्या पद्धतीची त्याची पटकथा आहे अन् ज्या पद्धतीनं ती कथा पडद्यावर मांडली आहे, it is a Thriller. फार सोयिस्कर पटकथा आहे त्याची.
योग: पण पात्र schizophrenicच आहे..
अतुल: पण पात्र तसं असलं तरी गोष्ट कशा पद्धतीन सांगितली जात आहे, त्याचा फोकस काय आहे, यावर खूप गोष्टी अवलंबून असतात आणि त्याचा फोकस हा थ्रिलर हा होता. "देवराई" हा पूर्णपणे एका schizophrenia च्या रुग्णाबद्दलचा, त्या रोगाबद्दलचा सिनेमा होता. त्यामुळे Beautiful Mindचा संदर्भ काही डोक्यात नव्हता कारण मी प्रत्यक्ष schizophrenia पेशंट्सना भेटलो. मानसोपचारतज्ञांना भेटलो. पेशंट्सच्या घरच्या लोकांना भेटलो. त्यामुळे तो जो काही रिसर्च चालू होता, अन् अर्थातच चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक या सगळ्या लोकांनी जे काही सांगितलं होतं त्याचा जास्त त्याच्यामागे सहभाग आहे.

योग: पण मग तुम्हाला अस वाटतं का की अमेरिकेत, किंवा आपण आंतरराष्ट्रीय म्हणूया, तिथे वेगवेगळे प्रायोगिक चित्रपट काढतात, आणि मग आपल्या इथले लोक अरे आपण पण अस काहितरी करुया म्हणतात, असं दिसतं. म्हणजे आपण काहितरी वेगळच, ट्रेंड्सेटींग काढतो आहे असं कमीच दिसतं. अगदी हिंदी चित्रपटाबद्दल बोलायच तर अलिकडचे "क्रीश","कोई मिल गया", असे जे काही Sci-Fi किंवा special effects चित्रपट काढले गेले ते तिकडे Spielberg च्या कारखान्यातून निघाल्यावर मग ते इकडे आपल्याकडे झाले. Bollywood मधले तंत्रज्ञही त्यां चित्रपट निर्मात्यांनी बोलावून घेतले होते. तर असं एक दिसतं की आपण "ते काहितरी भन्नाट आहे", अस त्याचं अनुकरण करायला जाऊन चित्रपट काढतो. तुम्ही त्या क्षेत्रात आहात तर तुम्हाला असं वाटतं का की आपल्याकडे originality आहे पण चित्रपटाचा व्यावसायिक विचार करून ती पडद्यावर दाखवली जात नाही, म्हणजे त्याला एक व्यावसायिक दृष्टीकोन जास्त असतो, originalityपेक्षा?

अतुल: चित्रपट हा व्यवसाय आहे, महाग व्यवसाय आहे, रिस्की व्यवसाय आहे. बाहेरुन हे बोलणं नेहमीच सोपं असतं की असा चित्रपट करायला पाहिजे, तसा करायला पाहिजे. पण त्याच्यात कोट्यवधी रुपये गुंतवायचे असतात तेव्हा ते इतकं सोपं नसतं. आणि प्रत्येक देशाची स्वतःची एक आर्थिक स्थिती असते, सांस्कृतिक स्थिती असते, वेगवेगळी परिस्थिती असते. कुठल्याही कलेचा विचार करताना आपण त्या देशाच्या socio-economical-political परिस्थितीचा विचार करायला पाहि़जे. अमेरिकेची तशी एकंदर स्थिती अन् भारतातील सामाजिक स्थिती यांत प्रचंड तफावत आहे. त्याच्याबाबतीत तुलना होऊच शकत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक वाक्य बोललं तर ते जसंच्या तसं त्याच्या प्रत्येक (बहुसंख्य) नागरीकाला कळतं, ती भाषा प्रत्येकाला येते. भारतातल्या पंतप्रधानांनी एक वाक्य बोललं तर ते कमीत कमी २६ भाषांमध्ये अनुवादीत झाल्याशिवाय भारताच्या प्रत्येक नागरिकाला कळत नाही.
त्यामुळे नुसतं सिनेमा किंवा कुठलीही कला असा विचार करणं चुकीचं आहे. कला म्हणून तुम्ही विचार करता तेव्हा त्या संपूर्ण देशाचा विचार करायला पाहिजे. कला हा खूप छोटा भाग आहे एखाद्या देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीतला. त्यामुळे ही गोष्ट अत्यंत स्वाभाविक आहे की जिथे हे चित्रपट- विज्ञान, तंत्र, अन् कला विकसित झाली ती पाश्चात्य देशांमध्ये विकसित झाली. त्यामुळे जे तंत्रज्ञान आहे ते तिथे जास्त विकसित होत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा तिथल्या सिनेमावर होणारच. तिथे जी शैक्षणिक किंवा आर्थिक सुबत्ता आहे त्याचा परिणाम तिथल्या प्रेक्षकावर होतो. आणि त्याउलट आपल्याकडे असलेली आर्थिक व्यवस्था, शैक्षणिक पात्रता, सांस्कृतिक प्रसरण, यांत खूप तफावत आहे. त्यामुळे काही गोष्टी तिथे करून बघणं हे सोपं असतं कारण चित्रपट ही कला म्हणून तिकडे पुढे गेलेली आहे, ते साहजिक आहे.

योग: आणि तिथला समाज जास्त receptive आहे?

अतुल: त्यापेक्षा तिथल्या समाजात एकसंधता (coherence) आहे तशी आपल्या सामजात नाहीये (चित्रपट या कलेसंबंधात). त्यामुळे त्याच्यात फार काही गुन्हा घडलाय असं काही मला वाटत नाही.

योग: बरं! त्या (समाजिक, राजकीय परिस्थिती) अनुषंगाने थोडा राजकीय प्रश्न विचारतो, कारण तुम्ही आधी इच्छा व्यक्त केलीत की तुम्हाला त्याही विषयावर बोलायचे आहे, बोलायला आवडेल. पण त्याआधी अतुल कुलकर्णी यांचे एक अभिनेता म्हणून या क्षेत्रातील कुणी आदर्श? किंवा ज्यांना तुम्ही या क्षेत्रात एखाद्या ठराविक दर्जावर किंवा त्यापेक्षा अधिक वरच्या पातळीवर पोहोचलेले तुम्ही मानता?

अतुल: या सगळ्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आदर्श वगैरे आहेत असं मला वाटत नाही. या क्षेत्रात तसं असू नये अस माझं मत आहे. कारण प्रत्येक नटाची प्रत्येक भूमिका उत्तम असते असं नसतंच, त्यामुळे तसा काही आदर्श कुणी माझा नाहीये.
योग: बरं मग आवडता नट..?
अतुल: नट म्हणून मला नासिरुद्दीन शाह हे भारतातले सर्वश्रेष्ठ नट वाटतात. त्यांना जर १० पैकी ९ मार्क असतील तर त्यांच्यानंतर भारतातला जो कोणी सर्वोत्तम नट असेल त्याला ५ मार्क आहेत, इतकी तफावत आहे असं मला वाटतं.
योग: आणि नटीबद्दल..? स्मिता पाटील हे नाव लगेच माझ्या मनात आलं, तुम्ही नसिरुद्दीन शाह म्हणालात त्या अनुषंगाने.
अतुल: निश्चितच! त्या इतर अनेक उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहेत. पण भारतात, दुर्दैवाने स्त्रियांसाठी, नायिकांसाठी त्या पद्धतीचे रोल्स लिहीले जात नाहीत, त्यामुळे सांगणं अवघड आहे.

योग: मघाशी तुम्ही जे म्हणलात की अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ज्या भाषेत बोलतात ती लोकांना तशीच समजते. हा एकच भाषा असण्याचा फायदा आहेच कारण तिथे २६ भाषांत अनुवाद करावा लागत नाही. तरीही असं दिसून येतं की अमेरिकेतली जनता ही साधारणपणे (राष्ट्राध्यक्षांच्या) एका वक्तव्यावर विश्वास ठेवून पुढे जाणारी आहे, चूक का बरोबर हा भाग वेगळा. इराक आणि अफगाणिस्तान युद्ध आपण बघितलेलं आहेच. भारतात मात्र विशेषतः २६ नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर आपल्या पंतप्रधानांनी जी काही दोन वाक्यं दूरदर्शनवर म्हटली त्या दोन वाक्यांतूनही राष्ट्राला काही फार सरळ स्पष्ट संदेश मिळाला अशातला भाग नाही, मग ते शब्द कुठल्याही भाषेत अनुवादीत केले असते तरी, तो भागही वेगळाच आहे.
पण २६ नोव्हेंबरच्या पार्श्वभूमीवर तुम्हालाही असं वाटतं का, की आपला भारतीय समाज अजूनही त्या दृष्टीकोनातून मागासलेलाच आहे, आपण राजकीय अन् सामाजिकदृष्ट्या एवढे उन्नत नाहीच की आपल्याला अजूनही आपल ध्येय, भलं, कशात आहे हे कळतच नाही. हा समाजाचा दोष आहे का नेत्यांचा दोष आहे का हा संपूर्ण सिस्टीमचा दोष आहे..? "पेज ३" या चित्रपटात तुमचं (पात्राचं) शेवटचं वाक्य आहे की "तुम्हाला जर सिस्टीम साफ करायची तर त्यात उतरून काम करायला पाहीजे". याच्यावर नेमका पर्याय काय आहे?

अतुल: आपल्याकडे स्वातंतत्र्योत्तर काळात पिढ्यानपिढ्या हेच सांगितल गेलं आहे की राजकारण हे वाईट आहे, त्यापासून दूर रहा, हीच शिकवण फार काळापासून मुलांना दिली गेली आहे मुख्यत्वे करून मध्यमवर्गीय अन् उच्चवर्गीय घरांमध्ये. आणि ते चालतंच होतं, की तू नोकरी कर, शीक, तू डॉक्टर, इंजिनीयर हो, तू पैसे कमाव, तुझं कुटूंब संभाळ, राजकारणामध्ये कोण पंतप्रधान होतंय कोण नाही याने तुला काहीच फरक पडत नाही, तिकडे लक्ष द्यायची गरजही नाही. या सर्वामूळे एक राजकीय उदासीनता आणि राजकीय अप्रगल्भता आपल्या समाजामध्ये गेले चारपाच पिढ्या शिरलेली आहे. आणीबाणीच्या काळात तर त्याला (राजकीय उदासीनतेला) फारच प्रतिष्ठा मिळाली. त्या काळात खूप मोठ मोठे लेखक अन् अनेक प्रसिद्ध व्यक्ती उतरल्या होत्या (राजकारणात) आणीबाणीच्या विरुद्ध. आणि निवडणुकांनंतर त्यांनी अंग काढून घेतलं. अन् आमचा आता राजकारणाशी संबंध नाही असं सांगितलं त्यामुळे राजकीय उदासीनतेला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली.
मग जे काम तुम्ही वाईट म्हणून टाकून दिलेलं आहे ते कुणीतरी उचलून करतंच. मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहत नाही की राजकारणी वाईट आहेत. ते वाईट आहेत कारण तुम्ही वाईट आहात. ते भ्रष्टाचारी आहेत कारण आपण भ्रष्टाचारी आहोत. जर मी सिग्नल तोडत असेन, वाहतुक नियम पाळत नसेन, पकडलं तर २० रुपये लाच देऊन सुटत असेन, किंवा लाच घेत असेन, तर मी ते २० रुपये लाच घेतो किंवा देतो कारण माझी तेवढीच पॉवर आहे. जर मला जास्त पॉवर दिली तर मी १०० कोटींचा भ्रष्टाचार करेन पण प्रवृत्ती तीच आहे. मला अस वाटतं की समाज म्हणून आपण, आपला देश, राजकारण, समाजकारण कस हाताळावं, याचं शिक्षण आपल्याला मिळालेलं नाही, आपल्याला त्यापासून दूर ठेवलं गेलं आहे, याचा हा सगळा परिणाम आहे. त्यामुळे अस वाटतं की हे चित्र जर आता बदलायचं असेल तर राजकारण्यांना शिव्या देऊन, सेक्यूरिटी फोर्सेस किंवा पोलिसांना शिव्या देवूऊन काही होणार नाही. कारण हे सर्वजण कुठून आले? किंवा सरकारी कार्यालयातील लोक हे कोण आहेत? शेवटी तुमच्याआमच्यातील सामान्य लोकच आहेत.
त्यामुळे जितक्या गोळ्या २६ ते २८ नोव्हेंबरच्या दरम्यान मारल्या गेल्या, आपल्या देशावर जेवढे वार झाले, त्यातला निदान एक वार तरी मी केलेला आहे हे प्रत्येकाने डोक्यात ठेवलं पाहिजे, मी कारणीभूत आहे या गोष्टीला- हे जोपर्यंत आपण मनात धरत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की आपण सुधारू शकू आणि ही खूप मोठी प्रक्रिया आहे. या स्थितीला यायला चारपाच पिढ्या गेल्या तर यातून बाहेर पडायला कदाचित पुढच्या सहा पिढ्या लागणार आहेत. त्यामुळे सुरुवात आत्ता केली पाहिजे, आज केली पाहीजे.
राजकारण वाईट आहे हे सांगणं थांबवलं पाहीजे. आपण राजकारणाबद्दल जास्त माहिती करून घेतली पाहिजे, त्याच्यात रस घेतला पाहीजे. त्यामुळे मग मुर्खासारखी विधानं आपण करणार नाही की पाकीस्तानवर हल्ला करा म्हणजे प्रश्न सुटतील. इतक सोपं आंतरराष्ट्रीय राजकारण नाही. अशी घटना करायला गेला एखादा देश उदा. भारत, तर आपल्या देशावर त्याचे काय परिणाम होतील याचा विचारच जर आपण करणार नसू, तितकी राजकीय प्रगल्भता आपल्यात नसेल तरच आपण अशी वेड्यासारखी विधानं करू की पाकीस्तानवर हल्ला करा, बाँब टाका, मग सगळ सरळ होईल. अस साठ सत्तर वय वर्षे असलेल्या सुशिक्षित लोकांचं मत आहे.
त्यामुळे मला असं फार वाटतं की It is high time we start taking interest in the happenings of our country.

योग: .... हे सर्व तात्विकदृष्ट्या पटतं. पण गंमत अशी आहे की जेव्हा सीमेपलीकडून पाठीवर रॉकेट लाँचर्स वगैरे जे काही बांधता येईल ते बांधून, तुमच्या थेट घरादारात घुसून तुमच्यावर गोळ्या मारल्या जातात, रॉकेट्स टाकली जातात, त्याला तुम्ही वैचारीकदृष्ट्या कसं उत्तर देणार? अन अजून आपल्याकडे राजकीय, सामजिक बदल, जी उदासीनता तुम्ही म्हणता, ते बदल घडवून आणायला अजून साधारण दोन तीन पिढ्या जातील... एवढा आपल्याकडे आज वेळ आहे का..? आज आपल्यासमोर दारात उभे राहून आपल्याला मारलं जातंय.

अतुल: मग काय करायचं?
योग: हाच प्रश्न आहे, मग काय करायचं?

अतुल: Exactly! चोरी होते घरी म्हणून तुम्ही पहिल्यांदा घराला कुलुप लावायचं का चोर कुठे राहतो आहे ते शोधून त्याला मारायचं? आपल्या घरात चोरी होऊ नये म्हणून काय करायच ती जबाबदारी पहिली आपली आहे मग बघू चोराचं काय करायचं. फार सोपी उत्तरं आहेत की- सीमेपलीकडून वगैरे.. सीमेपलीकडून म्हणजे काय? म्हणजे कोण? पाकीस्तान म्हणजे काय? पाकीस्तान नावाची एक entitiy आहे का? पाकीस्तानचं निवडून आलेलं सरकार ही एक गोष्ट आहे, त्यांचं लष्कर ही दुसरी गोष्ट आहे, अन् ISI ही संपूर्णपणे तिसरी गोष्ट आहे. आणि या तिघांच्यावर अमेरिका आणि रशिया यांनी शीतयुद्धाच्या (cold war) दरम्यान जो काही एक आतंकवाद फैलावला, सगळ्या मध्य पूर्व आशियामध्ये या देशांनी जे करून ठेवलं(य), त्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे आपल्या देशातलं हे जर लगेच थांबवायच असेल तर पहिल्यांदा आपण आपली दारं नीट घट्ट लावली पाहिजेत.

योग: म्हणजे नेमकं काय?

अतुल: आपली सेक्युरीटी, अंतर्गत सुरक्षा! आपल्याला मॉल वा विमानतळावर जाताना चार चार वेळा चेक केलं तर राग येतो. ही जर आमच्या देशातल्या लोकांची मानसिकता असेल, जर आमचे (सुरक्षासंबंधी) लोक भ्रष्ट असतील तर तुम्ही त्यांच्यावर (दुसर्‍या राष्ट्रावर) हल्ला करून तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न वाढवणार आहात, एक कारण मिळेल (त्या दुसर्‍या राष्ट्राला) लोकांना. आणि जे आत येऊ शकत आहेत (घुसखोरी करून) त्यांची येण्याची इच्छा आहेच, पण तुम्ही येऊ देता, तुमची दारं तुम्ही नीट घट्ट बंद केलेली नाहीत, तुमच्यात भ्रष्टाचार आहे, तुमचा समाज दुभंगलेला आहे हे आधी बघायला पाहिजे. अन्यथा तुम्ही हल्ले करून जर समस्या सुटणार असती, फक्त युद्धानेच गोष्टी सुटणार असत्या, तर इस्राईलचा प्रश्न कधीच मिटला असता, इतर अनेक प्रश्न कधीच सुटले असते. तसं झालेलं नाही. त्यामुळे हे टिपिकल चुकीचे हिंदुत्ववादी विचार लोकांमध्ये आहेत, त्याकडे नीट लक्ष दिले पाहिजे, ते बरोबर आहे का नाही, त्यालाच मी राजकीय प्रगल्भता म्हणतो.
आपल्या देशाची एक आर्थिक, सामाजिक परिस्थिती, अन् त्यात हे जे जवळजवळ एका धर्माविरुद्धचं युद्ध आहे फक्त देशाविरुद्ध नाही. ते सहन करण्याची ताकद आपल्या समाजात, आपल्या आर्थिक स्थितीत आहे का हा विचार केला पाहिजे. त्यामुळे पहिला उपाय हा बाँब टाकणे नाही, तर पहिला उपाय हा आपल्यापर्यंत ते पोचू नये, आपल्या दारांमधून ते आत येऊ नयेत ही काळजी पहिल्यांदा घेणे हा आहे.

योग: ते ठीक आहे अतुल, पण १९९३च्या बाँबस्फोटांपासून आजपर्यंतचे स्फोट. आपण अजूनही दाराला कुलूपच लावतो आहोत.. Isn't it little too late for that..?
अतुल: (उपहासाने) If it is too late असच जर कुणाला म्हणायचं असेल तर मग भारत सोडून अमेरिकेत किंवा दुबईत राहायच..
योग: शेवटी कुठेही सुरक्षित नाहीच...
अतुल: आहे ना दुबई सुरक्षित आहे.
योग: पण दुबईत राजेशाही आहे..
अतुल: म्हणजे, कुठेतरी तुम्हाला काहीतरी करायलाच पाहीजे ना? असं म्हटलच जातं की Democracy and Development don't go together.
योग: दुबईतल्या राजाला निर्णय (कायदा) लादायचा तर तेरा पक्षांना विचारावं लागत नाही हेही सत्य आहे.
अतुल: मग तसं आपल्याकडे आणायचं. म्हणजे मग आपल्यालाही छान सुरक्षित राहता येतं. It is too late असंच जर म्हणायचं असेल तर मग एकच उपाय, देश सोडायचा. जिथे तुम्हाला छान, सुरक्षित, राहता येईल अस वाटतं तिथे जाऊन रहायच.

योग: पण आजकाल सद्ध्या जे सर्वत्र वातावरण आहे, त्यात एक ठोस कृती झालीच पाहीजे असा एक आग्रही सूर आहे.

अतुल: त्यालाच मी आपली राजकीय अप्रगल्भता म्हणतो. धडक कृती जर असेल तर ती आपली व्हायला पाहिजे, आपल्या देशात व्हायला पाहिजे. दुसर्‍या देशात जाऊन धडक कृती करणार असाल तर जगात अनेक उदाहरणे आहेत की त्याने काहीही प्रश्न सुटलेले नाहीत. ठोस कृती ही स्वतःमध्ये बदल करणं ही आहे. तुमच्या देशातल्या व्यवस्थेमध्ये काय चुका आहेत, त्या कशा सुधारायच्या ही ठोस कृती आहे.

योग: या सर्व परिस्थितीत आपण अशी अपेक्षा करावी का की चित्रपट माध्यम ज्याचे लोकांच्या मनावर खोलवर परिणाम होतात, बरे वाईट दोन्ही अर्थाने, त्याच चित्रपटसृष्टीने असा एखादा संदेश एकत्र येऊन आपल्यासाठी, स्वतःसाठी, देशासाठी द्यावा, या सर्व पार्श्वभूमीवर, असं तुम्हाला वाटत का?

अतुल: कुठल्याही (एका) कलेमध्ये, समाजामध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणण्याची ताकद नाही. हेच जर कुणी करायचं ठरवलं समजा तसं झालंच तर त्याला एक स्टंट म्हणून बघितलं जाईल. उदा: आमिर जेव्हा गेला होता नर्मदा आंदोलनाच्या वेळी तेव्हा त्याला एक स्टंट म्हणून बघितलं गेलं. कुणीतरी समोर येऊन काहीतरी करायला पाहीजे यापेक्षा मी काय करायला पाहीजे हा विचार करण्याची ही वेळ आहे. जोपर्यंत मी बदलायचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत मी एकांगी विचार करतो, जोपर्यंत मी एका धर्माला चिकटून विचार करत राहतो, माझा देश म्हणून मी विचार करत नाही, त्यावेळेला या समस्या उद्भवतात. त्यामुळे सर्व चित्रपटसृष्टीने एकत्र येऊन काहीतरी बोललं म्हणजे मग ते खरे अन्यथा त्यांच्यातही धर्मांचे तट आहेत हे मानणं हेच राजकीय अप्रगल्भतेच मोठं उदाहरण आहे.
योग: मान्य आहे! पण शेवटी आपण जे बघतो, वाचतो, ऐकतो याचा आपल्यावर कुठेतरी परिणाम होत असतोच..

अतुल: असं आहे की परिणाम आपण काय विचार करतो त्यावर अवलंबून असतो. घटना समोर घडतच असते. जी घटना तुम्ही पाहिलीत तीच मी पाहिली. पण त्यात मला असं कधी वाटलं नाही की काहीतरी ठोस कृती म्हणजे कुठेतरी जाऊन बाँब टाकायचा. त्यामुळे आपण आपल्या सोयीचं वाचत असतो, सोयीचं त्यातून घेत असतो. त्यामुळे त्याचा परिणाम हा आपण करून घेतो. आणि तो कसा करून घ्यायचा हे आपल्यावर आहे. त्यामुळे एक तर्कशुद्ध विचार असणं, एक समन्वय (harmony) असावा असा विचार असणं, आणि एक तर्कबुद्धी, विवेकबुद्धी डोक्यात अन् स्वभावात असणं हे जास्त महत्त्वाच आहे. ती तर्कबुद्धी, सारासार विवेकबुद्धी असेल तर त्याप्रकारे तुम्ही या सर्व समस्यांकडे बघाल आणि आपली समजूत करून घ्याल.

योग: शेवटचे दोन प्रश्न. जे लोक, पोलिस अधिकारी शहीद झाले, किंवा जे नागरीक हकनाक बळी गेले, त्यांचं सांत्वन हे कुणालाच कुठल्याही शब्दात करता येणार नाही. तरी अतुल कुलकर्णी यांना त्याबद्दल काही व्यक्त करायच आहे? त्या लोकांसाठी?

अतुल: मृत्यू हा काही लोकांचा झाला हे खरे पण ही समस्या खूप मोठी आहे. त्यामुळे सांत्वन हे सगळ्या देशाचं आहे. आणि याला मुळात आपणच जबाबदार आहोत. याचं कारण शोधणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल, त्या लोकांना अस मला वाटतं.

योग: शेवटचा प्रश्न. पुढे कुठल्या प्रकारचे चित्रपट करायचे अस काही ठरवलेलं आहे का? मघाशी तुम्ही म्हणालात की अतुल कुलकर्णी म्हणजे चांगला चित्रपट या समीकरणाबद्दल तुम्ही समाधानी आहात. तेच समीकरण पुढे जाऊन बघणार का आता काही वेगवेगळ्या प्रायोगिक अंगाने चित्रपट करणार आहात?

अतुल: प्रायोगिक असं काही नसतं माझ्या मते. अन सिनेमा हा ८०% व्यवसाय आहे अन् २०% कला आहे अस खुद्द व्ही. शांताराम यांनी म्हटलं आहे. त्यामुळे माझा उद्देश एवढाच आहे की चांगल्या कथा ज्या येतील, ज्या मला निवडायला मिळतील, आणि चांगले रोल्स जे मी आत्तापर्यंत करत आलोय तेच मी याही पुढे करत राहीन असा माझा प्रयत्न राहील. तो प्रयत्न प्रत्येक वेळेला यशस्वी होतोच किंवा होइलच असं नाही.

योग: कधी काळी आपण निर्माता किंवा दिग्दर्शक होऊ अस कुठे वाटतंय?
अतुल: माहिती नाही आत्ता, सद्ध्या तरी नट!
योग: And You are satisfied with that..
अतुल: आत्ता तरी नक्कीच!

योग: मायबोलीकरांसाठी काही खास संदेश..? नविन वर्षानिमित्त काही विशेष संदेश?
अतुल: (हसत) इतका वेळ बोललो तेच! तोच संदेश आहे माझा, त्याच शुभेच्छा आहेत. Happy

योग: जे मराठी लोकं अमेरीकेत, दुबईत, किव्वा भारताबाहेर आहेत त्यांच्यासाठी काही विशेष संदेश? कारण तुम्ही म्हणता तसे ते स्वत:मध्ये बदल घडवून आणू शकले तरी ते भारताच्या राजकीय व्यवस्थेमध्ये थेट योगदान करणं हा जरा दूरचा भाग आहे.
अतुल: मग तो भाग जवळचा करा...
योग: कसा करता येईल?
अतुल: तुम्ही सगळी मंडळी तंत्रज्ञान क्षेत्रात आहात, जास्त कुशल आहात. त्यामुळे आपण आपल्या देशात बदल कसा करू शकू हे शोधून काढणं तुमच्याच हातात आहे.
योग: शेवटी आपले भविष्य आपल्या हातात? Happy
अतुल: ... हां.... जवळजवळ....
योग: तुमचा विश्वास आहे का भविष्य वगैरेंवर? ज्योतिष्य वगैरेंवर?
अतुल: हे शास्त्र आहे निश्चित. पण त्याचा देवाशी काही संबंध नाही जो जोडला जातो. ते शास्त्र इतर शास्त्रांसारखंच आहे. जसं विज्ञानशास्त्र हे पूर्णपणे विकसित झालेलं नाही, चालूच आहे, तसच ज्योतिष्य शास्त्र हे कुठेतरी येऊन थांबलेलं आहे..पण ते शास्त्र आहे हे नक्की!

योग: मायबोलीकरांतर्फे तुमचे खूप धन्यवाद! जवळजवळ पन्नास मिनीटे वेळ दिलात तुम्ही, २५ मिनिटांच्या करारावर त्याबद्दल आभारी.
अतुल: आभारी!

योग: मायबोलीच्या वेबसाईटवर तुमचा संवाद प्रकाशित केला जाईल, त्याची लिंक तुम्हाला पाठवली जाईल. वाचकांनी त्यावर, विशेषतः तुमच्या राजकीय संवादाविषयी काहीही प्रतिक्रीया दिल्या, तर त्या तुमच्यापर्यंत पोचवलेल्या तुम्हाला चालतील का आणि पोचवल्यावर त्यावर अतुल कुलकर्णी काही प्रतिक्रीया देतील का?

अतुल: मी प्रतिक्रीया देईन की नाही हे मला माहीत नाही, ते माझ्या वेळेवर अन् अर्थातच इच्छेवर अवलंबून आहे. पण मी प्रतिक्रीया जरूर वाचेन. atul@atulkulkrani.com हा माझा ईमेल संपर्क पत्ता आहे अन् atulkulkarni.com ही माझी वेबसाईट आहे.

धन्यवाद!
------------------------------------------------------------------------------------
त.टी.: रोजच्या वापरातले आणि काही सोयिस्कर इंग्रजी शब्द इथे तसेच राहू दिले आहेत पण त्याने रसभंग होणार नाही अशी आशा करतो.
शुद्धलेखन तपासण्याबद्दल चिनुक्स याचे आभार.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Content मस्तच आहेत.. पण मुलाखतीचं स्वरूप सहज किंवा गप्पांसारखं नाही वाटलं.. Sad
उगिच probing केल्यासारखं वाटलं.. ! may be मांडणीमधे किंवा माझ्या वाचण्यामधे दोष असू शकेल.. Happy

आवडली मुलाखत.

योग, सुंदर!

अतुलचं कविता वाचन खूपच सुंदर आहे. त्याला तू त्याबद्दल काहीतरी विचारायला हवं होतं.

चांगली झाली आहे मुलाखत. राजकीय पार्श्वभूमीबाबत अतुलचे विचार खरंच विचार करण्याजोगे आहेत.
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

Adm,
मी probing नाही म्हणणार पण फक्त निव्वळ प्रश्ण आणि उत्तर असा फॉर्म नाहीये.. आधी प्रस्तावनेत लिहीण्याप्रमाणे उपलब्ध कमी वेळ (अतुलचा), आणि unplanned मुलाखत असल्याने मी अतुल जशी उत्तरे देत होते केवळ त्याला धरून मी पुढचे प्रश्ण शक्यतो विचारत होतो. २६ नोव्हेंबरच्या विषयावर झालेला संवाद "फॉर्मल मुलाखत" या फॉर्म मधे बसत नाही असे म्हणता येईल. Happy
मला स्वता:ला वैयक्तिक दृष्ट्या त्यांन्ना एकूण सिनेमाबद्दल, अभिनयाबद्दल, त्याशी संबंधीत इतर गोष्टी, थोड वैयक्तीक वगैरे जास्त विचारायचे होते कारण ते एक प्रचंड अभ्यासू, सक्षम अन भरपूर माहिती असलेले कलावंत आहेत. let us hope some other time....... may be part 2 Happy

अतुल यांची सर्वच उत्तरं मस्त! परखड आणि स्पष्ट. आवडली.

पण, प्रश्नांचं शब्दांकन मलाही खटकलं. मुलाखत घेताना पुष्कळदा ज्यांची मुलाखत घेतोय त्यांना बोलतं करण्यासाठी एकातून एक विषय निघून मुलाखत पुढे सरकते. 'हा प्रश्न, हे उत्तर' असं होत नाहीच. पण ती लिहून काढताना व्यवस्थित शब्दांकन करू शकतो, असं मला वाटतं. योग, nothing personal here! Happy

ज्यासाठी मुलाखत घेतली- त्यांचे विचार समजण्यासाठी- ते उत्तमच जमलेत!
------------------------------------------
हौले हौले हो जाता है प्यार... Happy

अनौपचारिक गप्पा असतील, तर त्या लिहून काढण्यात ’फ्लो’चा प्रॊब्लेम येत असावा बहूतेक.. Happy
पण मला आवडला संवाद. अतूल हा माझाही आवडता कलाकार. त्याचं बोलणं ऐकणं हा खरोखर सुंदर अनूभव असतो.

त्याचा देवराई तर केवळच!

’नाटक’ माध्यमाला कुणी काही म्हटले, तरी ते एक शक्तीमान माध्यम आहे. तिथे पैसे कमी मिळत असल्यामूळे अतूल, अशोक सराफ, नाना पाटेकर सारखे सिनेमात व्यस्त असलेले पण प्रचंड पोटेन्शियल असलेले लोक नाटकात कमी दिसतात. पण इथे आपली प्रतिभा अन अभिनय सिध्द कराण्यासाठी हे लोक अधूनमधून त्यात प्रयोगही करत असतात. मध्यंतरी अतूलने असेच ’समूद्र’ चे २-३ प्रयोग पुण्यात केले होते. (इतरत्र माहिती नाही). अतिशय इंटेंस असा रोल होता तो. कुणाही सामर्थ्यवान नटाला अपील होईल असा. त्यातलं अतूलचं काम हे केवळ न विसरण्यासारखं होतं.

नानाने असेच ’पुरूष’चे प्रयोग केलेले आठवतात.

मस्त रे योग.. Happy

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

’नाटक’ माध्यमाला कुणी काही म्हटले, तरी ते एक शक्तीमान माध्यम आहे. तिथे पैसे कमी मिळत असल्यामूळे अतूल, अशोक सराफ, नाना पाटेकर सारखे सिनेमात व्यस्त असलेले पण प्रचंड पोटेन्शियल असलेले लोक नाटकात कमी दिसतात. >> १००% सहमत .

मुलाखत छानच !

>योग, nothing personal here!
psg,
नो प्रॉब्लेम.. काही हरकत नाही. शेवटी यातूनच (मला) शिकायची संधी मिळते. तेव्हा सर्वच प्रतिक्रीयांचे स्वागत आहे. पुढील खेपेस शब्दांकनाकडेही लक्ष राहील..

भारतातील सद्य राजकीय, सामाजिक परिस्थिती बद्दल "भविष्यातिल निर्णया॑पेक्षा निर्णया॑च्या भविष्यावर विचार करा" अस कहिस॑ अतुल ला म्हणायच॑ असाव बहुतेक....!!!

आणि त्याच॑ "सखोल वाचन" त्याच्या अभिनयातुन दिसत॑ हे आज कळल॑.

अभिनन्दन योग. Happy जेन्व्हा समोरचा रोखठोक बोलतो तेन्व्हा स्वतःवर स॑यम ठेवन॑ खुप अवघड असत॑.
आणि तो तुम्ही ठेवलात.

अभिमन्यु

अतुल कुलकर्णी ची मोठ्ठी पंखी आहे मी पण Happy त्याचं सगळंच बोलणं खूप आवडलं! मला अगदी डोळ्यासमोर येत होतं तो कसा बोलला असेल कसा हसला असेल Happy

पण प्रश्नांच्या बाबतीत अडम सारखं वाटलं. अन अजून एक शंका. एके ठिकाणी हे "off the record" विचारत आहे असे म्हटले आहे, (याचा अर्थ हे प्रसिद्धीसाठी/ छापण्यासाठी नाही असा होतो ना?) पण जे उत्तर आहे ते इथे छापले आहे. यात काही औचित्य भंग नाही का होत?

अतुल कुलकर्णी हा माझा पण आवडता नट आहे.
उत्तरं खरंच एकदम रोखठोक आहेत रे....!! वेळेवर असं त्याला बोलतं करणं कठीण झालं असेल ना ? की तो मोकळा बोलतोच...? कसा वाटला अतुल....? मला तर प्रचंड उत्सुकता आहे.

अतुलचे विचार वाचायला मिळाले हे फारच छान... त्याबद्दल धन्यवाद. विचारी माणूस व अभिनेता अशा त्याच्या प्रतिमेला पुष्टी मिळाली.
मलाही वाचताना off the record वाला प्रश्न खटकला. एकदा ते ऑफ द रेकॉर्ड आहे असे सांगितल्यावर जरी त्यात काहीही वादग्रस्त विधान नसले तरी ते प्रकाशित करायला नको असे वाटते. शिवाय काही काही प्रश्न जरा विचित्र वाटले उदा. पहिला चित्रपट, नाटक आठवते का, शहीदांबद्दल काही व्यक्त करायचे आहे का इ. असो.

  ***
  भँवर पास है चल पहन ले उसे, किनारे का फंदा बहुत दूर है... है लौ जिंदगी... हेलो जिंदगी

  ऍडम आणि स्लार्तीला अनुमोदन. अतुलचे परखड विचार वाचायला आवडले, आणि तो योग जुळवून आणल्याबद्दल योगचे आभार, पण 'संवाद' साधला गेला असं नाही वाटलं वाचताना.

  स्वातीला अनुमोदन.

  तरिही योगचे नकीच आभार (may be त्याला अपेक्षित नसलेल्या भागावर प्रश्न विचारायला लागल्यामूळे विस्कळीत पणा आला असेल)

  बर्‍याच प्रश्नांची उत्तरे "हो/नाही" स्वरूपाची होती. ओपन एंडेड प्रश्न विचारले असते तर मुलाखत अजुन रंगली असती असे वाटते. तपशीलाच्या चुका टाळता आल्या असत्या का?

  अतिशय गुणी अभिनेता! अतुलच्या पुढील कारकीर्दीसाठी अनेक शुभेच्छा.
  संवादाबद्दल धन्यवाद.

  २००७ च्या साधना दिवाळी अंकात 'मी असा घडलो' हे विनोद शिरसाठ यांनी शब्दांकन केलेलं अतुल कुलकर्णी यांचं ललितही वाचण्यासारखं आहे.

  नट म्हणून मला अतुल कुलकर्णी आवडतो. विचारी माणूस आहे.

  योग धन्यवाद.

  मुलाखत आवडली.. वर अभिमन्युने म्हटलंय तसं, समोरचा माणूस एकदम रोखठोक बोलत असेल तेव्हा संयम साधून संवाद साधावा लागेल असं मलाही वाटलं..
  पण, पहीला चित्रपट, नाटक आठवते का हा प्रश्न मात्र चांगलाच ऑड वाटला..

  >उत्तरं खरंच एकदम रोखठोक आहेत रे....!! वेळेवर असं त्याला बोलतं करणं कठीण झालं असेल ना ?
  जया,
  अगदी अचूक पकडलस..:)
  शिवाय अतुल जेव्हा असं म्हणला की "मला वैयक्तीक विषयावर बोलायचं नाहीये अन चित्रपटापेक्षाही सद्द्य परिस्थितीवर बोलायला आवडेल" तेव्हाच अनेक मर्यादा आल्या. मग अशा वेळी दोनच पर्याय उरतात की मुलाखतीला तुम्ही पूर्ण न्याय देवू शकणार नाही (कारण तुम्हाला चित्रपटाविषयीच जास्तं विचारायचं असतं) त्यामूळे परत कधितरी त्यांच्या सवडीने अन जेव्हा ते सर्व विषयावर बोलायला उत्सुक असतील तेव्हा मुलाखत घेणे, किंव्वा दोन्ही विषयावर थोडं थोडं बोलुया असं निगोशियेट करून मुलाखत घेणे.. मी दुसरा पर्याय स्विकारला. अशा वेळी माझ्या अनुभवानुसार सुरुवात थोडी चाचपडतच करावी लागते..(चित्रपट, नाटक आठवतात का वगैरे असे प्रश्ण..sort of breaking the ice) आणि आपल्या उत्साहाला आवर घालावा लागतो, थोडा आपल्या मर्जीविरुद्ध!
  >की तो मोकळा बोलतोच...? कसा वाटला अतुल....? मला तर प्रचंड उत्सुकता आहे.
  माझी तितकी जवळून किंव्वा तितकी वैयक्तीक ओळख नसल्याने अतुल कसा वाटला याचं उत्तर इथे सार्वजनिक फोरम वर द्यायचं टाळतोय..:) कारण अस म्हणतात "Perception is Reality".
  पण तरिही तुला त्यांच्या "स्पष्टवक्तेपणाची" कल्पना यावी म्हणूनः
  सुरुवातीला जेव्हा अतुल म्हणला की फक्त सद्द्य (राजकीय) परिस्थितीवरच बोलतो..तेव्हा मी चक्क धाडस करून तितक्याच स्पष्ट शब्दात त्याना म्हटलं "पण अतुल कुलकर्णी उगाच राजकीय विषयावर वगैरे का बोलतायत असं कुणी म्हणू शकेल.. वाचकांन्ना अतुल कुलकर्णी या कलावंताने चित्रपट अन त्या अनुशंगाने बोललेले अधिक आवडेल.." त्यावर ते म्हणले " मग काय झालं? आपण वाचकांन्ना सरप्राईज देवू! फक्त त्याच विषयावर बोलू"..त्यावर मी पुन्हा म्हटलं "पण मग त्या विषयावर काही कमी अधिक बोललं जाईल तर नंतर मुलाखत एडीट करून छापू का..?" त्यावर त्यांचं उत्तर होतं " छे! अक्खी मुलाखत (चित्रपटावरील संवादासकट) जस बोलू तस छापा.. काहीही एडीट करायची गरज नाही".. Happy त्यामूळे वरचा off the record भागही छापला आहे..
  असो. एक निश्चित की चित्रपट या विषयावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे प्रचंड भंडार आणि अभ्यास आहे यात शंका नाही..त्यामूळे पुन्हा कधी तशी संधी मिळाली तर बहार येईल. तूर्तास "जे हाती गवसलं ते इथे ठेवलं आहे".. (ही झाली मुलाखतीची डीटेल प्रस्तावना):)

  मुलाखत आवडली,,,,अतुला चा रोखठोक पणा आवडला...त्यामुळे आता अतुल कुलकर्णी जास्तच आवडु लागला, १ माणुस म्हणून....
  योग, आभारी आहोत तुमचे...वेळ खर्च करुन मुलाखत घेतली नि आम्हां मायबोलींकरांपर्यंत पोचवलीत त्याबद्दल....धन्यवाद...

  सहीय! माझा आवडता कलाकार आहे हा.

  मुलाखत वाचून अतुल कुलकर्णी अजूनच जास्त आवडला .. Happy

  योग
  मुलाखत आवडली. मुलाखतीची सुरुवात थोडी चाचपडत झाल्यासारखी वाटली पण नंतर मात्र मस्तच रंगलीये मुलाखत. अतुलचे विचार आणि स्पष्टवक्तेपणा आवडले. Happy मुलाखत आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद.
  मला अतुल कुलकर्णी खूप आवडतो. त्याला पहिल्यांदा बघितले ते कॉलेजमध्ये असतांना गांधी विरुद्ध गांधी बघितले तेव्हा. मला त्याची दहावी फ मधली भुमिकापण खूप आवडली होती.

  छान झाली आहे मुलाखत... मलाही अतुल कुलकर्णी खूप आवडतो... आणि माझ्यासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे सोलापूरला तो ज्या शाळेत शिकलाय, मी पण त्याच शाळेत शिकलोय... Happy

  मुलखत खरच खुप छान झाली आहे. एक्दम मस्त!!!!!!

  Roops..........

  Pages