सत्यकथा .. अध्याय १ आणि २

Submitted by अत्रुप्त आत्मा on 30 April, 2015 - 12:00

..................................................अध्याय पहिला......................................................................
नैमिष नावाचं एक अरण्य होतं. इथे शौनक आणि इतर अनेक ऋषी महर्षी जगत्कारण आणि जगत कल्याणाविषयी चिंतन, अभ्यास, साधना करत असत. एक दिवस त्यांच्यात वाद घडला. आणि सत्य या गोष्टीबद्दल बरीच मतमतांरे झाली. शेवटी खरा निर्णय करण्यासाठी ते सर्व सूत महर्षींकडे गेले. तेंव्हा त्यांच्यात व सूतात झालेला संवाद म्हणजेच हि सत्याची- सत्य कथा होय. ती आपणा सर्वांनी आता ऐकूया.

शौनकादी ऋषी सूतांना म्हणतात, "हे सूत महर्षी..मानवी जीवनातल्या दु:ख्ख दारिद्र्य वेदना विवंचना या सर्व गोष्टींवर सोपा असा काहि उपाय आहे का? आंम्हाला तो उपाय म्हणजे, 'सत्य' या गोष्टीला प्रमाण मानून मानवानी जगावं,म्हणजे ही दु:ख्ख दारिद्र्य दूर होतील असं वाटतं. परंतू सत्याच्या व्याख्येबद्दल तीन प्रकारची वेगवेगळी मतं पडत आहेत. आणि आंम्ही त्यातल्या खर्‍या सत्याचा शोध बोध घेण्यास असमर्थ झालो आहोत. तेंव्हा या संबंधी काही मार्गदर्शन करावे.

सूत महर्षी म्हणतात, "हे ऋषिजनंहो, प्रथम आपण मला सत्य म्हणजे तुम्हास काय वाटते? याचा उलगडा द्या."

शौनक म्हणतात, " जे मानवाचे अंतिमतः कल्याण करते ते सत्य " असे माझे मत..तर या उलट " जे सत्य असते,ते अंतिमतः मानवाचे कल्याणा करतेच. " असे या आदिंचे मत. आणि अजुन एकांचे मत तर विपरीत म्हणावे असे,परंतू चिंतनास पात्र असे ही आहे ,ते म्हणजे. "सत्य हे सत्यच असते,ते सत्य असतेच आणि तेच सत्य असते,कारण ते भगवंतानी ,देवानी सांगितलेले असते" हे तिसरे मत. आता यावरुनच सगळा झगडा होतो आहे,तेंव्हा यातील खरे सत्य सांगा.

सूत म्हणतात, "ऋषिजनहो, तिनंही व्याख्या वेगवेगळे विचार दर्शविणार्‍या आहेत. परंतू जोपर्यंत या नुसत्या व्याख्याच आहेत्,तोपर्यंत त्यांच्यात केवळ शोधबोध करून काय कामाचा?"

शौनक म्हणतात, "म्हणजे? हे सर्व असच सोडून द्यावं..असं का आपलं मत आहे?

सूत म्हणतात, "नाही...हे शौनकादि ऋषिहो..,आपण सर्वजणं नीट लक्ष ठेऊन ऐका. जोपर्यंत एखादी व्याख्या, समज, कल्पना, एखाद्या ठिकाणी वापरली जात नाही,तोपर्यंत तिची योग्यता ही फक्त धर्म किंवा सदाचार नितीच्या ग्रंथातच निर्जीव पडून असते. "

शौनक म्हणतात, "आपण म्हणता हे सहज समजण्या सारखे नाही. तेंव्हा हे जरा साध्या भाषेत आणि सोपे करुन सांगा"

सूत म्हणतात, "ऐका तर मग. आपली प्रथम व्याख्या घ्या. " जे मानवाचे अंतिमतः कल्याण करते ते सत्य " असे तुम्ही म्हणता. आता याच्या मधे आपण आपलं कल्याण करवून घेण्याच्या हेतुनी सर्व जीवन जगणं..हे प्रथम गृहीत धरलेलं आहे..आणि त्या नंतर..म्हणजे असं जगल्यानंतर जे फळ मिळेल,त्याला आपण अंतिमतः मिळालेलं सत्य म्हणत आहोत. तर असं सत्य.., मानवी जीवन या भूतलावर सुरु झालं तेंव्हापासून सर्वच मानवजात जगत आलेली आहे. तेंव्हा यात नविन काय? आणि आजपर्यंतचा इतिहास व अनुभव पाहाता,हे पहिलं सत्य दु:ख्ख दारिद्र्य विवंचना दूर करायला उपयोगी पडणारं सत्य नाही. असं आपल्याला दिसून येत आहे. कारण त्यामधे तशी सोयच नाही. "

शौनक म्हणतात, "मग दुसरं सत्य तरी उपयोगी पडेल काय?"

सूत म्हणतात, "दुसरं सत्य म्हणजे "जे सत्य असते,ते अंतिमतः मानवाचे कल्याणा करतेच." तर हे ही खरे नाही. कारण नको तिथे खरे बोलल्यानी मानवाचा अनेकदा घात झाला आहे,आणि हवे तिथेही ते बोलल्यानी अनेकदा त्याला दु:ख निराशा आणि वैफल्याला सामोरे जावे लागलेले आहे. तेंव्हा या दुसर्‍यातील सत्य, हे मुळी बोलायलाच अत्यंत जड आहे. तेंव्हा याचाही उपयोग नाही."

शौनक म्हणतात,"मग आपण असे म्हणताय का की तिसरीच व्याख्या अचूक आणि उपयुक्त आहे,कारण ती प्रत्यक्ष भगवंतानी,देवानी सांगितलेली आहे!?"

सूत म्हणतात, "तिसरी व्याख्या म्हणजे-'सत्य हे सत्यच असते,ते सत्य असतेच आणि तेच सत्य असते,कारण ते भगवंतानी ,देवानी सांगितलेले असते' ही आहे.हिला तर अजिबात सत्य मानता येत नाही. कारण भगवंतानी ती कुणा मानवाद्वारे बोलूनच आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे ती संपूर्णतः त्या भगवंताची देवाची कशी म्हणावी? ती त्याची तेंव्हाच म्हणवता येइल,जेंव्हा तो भगवंत मानवी कल्याणासाठी कोणत्याही अवतार,प्रेषित,संत,महात्म्या शिवाय ..म्हणजेच मानवी देह आणि इहलोकातल्या कोणत्याही जीवीताचा देह धारण केल्याशिवाय स्वतःच येऊन सांगेल! या शिवाय ,त्याने त्याची स्वार्थबुद्धी त्यात चकार रूपानी लावलेली स्पष्ट दिसते आहे,तेंव्हा ती व्याख्या भगवंताची त्याच्यासाठिचीच व्याख्या झाली ना? देवलोकातली..! मग ती मानवाची कशी होऊ शकेल? सांगा बरे? त्यामुळे ही सत्याची सर्वात बेदरकार आणि बेजबाबदार व्याख्या म्हणवली पाहिजे. कारण तिचे पालन करण्यासाठी मानवाला स्वतःची बुद्धीच वापरता येणार नाही. भगवंतानी तशी सोयच त्या व्याख्येत घातलेली नाही.आणि बुद्धीशिवाय वापरलेलं सत्य,मानवाचं जीवन यंत्रवत करुन टाकेल,यात काय संशय? तेंव्हा ही व्याख्या देखिल उपयुक्त नाही.इतकेच नव्हे तर ही व्याख्या सत्याची सर्वात अनुपयुक्त व्याख्या आहे.

शौनक म्हणतात, "हे महर्षी, मग आता या मानवी दु:ख,वेदना,विवंचना मिटून..त्यांच्या जीवनात खरेखुरे मंगलमय सुख येण्यासाठी त्यानी करायचे तरी काय? हे सांगा.

सूत म्हणतात, " या विषयी एक कथा पूर्वीपासून प्रसिद्ध आहे...
=================================================
इति श्री सत्यकथायां प्रथमोध्यायः .. श्री सत्यार्पणमस्तु. सत्यजगत् ,जगत् सत्य की जय.. !

.........................................................अध्याय दुसरा...........................................................
काशी नावाच्या नगरात शतानंद नावाचा एक विद्वान ब्राम्हण रहात होता. तो वेदाध्यायी आणि विवेकी होता. धर्मामध्ये जे काहि सत्य म्हणून सांगितले आहे..त्याला तो इतरांप्रमाणे प्रमाण न मानता,त्यात आपल्या बुद्धीविवेकानुसार फरक करत असे. आणि तसा तो उघडपणे सांगतंही असे. स्वाभाविकच त्यामुळे तो पाखंडी गणला गेला होता.शिवाय, त्याला धर्म आचारानी सांगितलेली नित्य भिक्षा मागणे चूक वाटत असल्यामुळे तो गावात संस्कृत भाषा शिकवूनच स्वतःचे आणि कुटुंबीयांचे पोट भरत असे. परंतू ते ही त्याला अपुरे पडणारे झालेले होते. अश्यातच एक दिवस तो चिडला ,आणि स्वतःच्या मनाशी बोलू लागला "मी लोकांना धर्ममतातले खरोखरीचे असत्य सांगू पहातो,तर लोक माझाच द्वेष का करतात? हे धर्मातले असत्य सांगताना मी मूळ धर्माविषयी मनात कोणताही आकस अथवा द्वेष धरला नाही..भाषाही नम्र आणि आदबशीर वापरली तरी देखिल हे असे का घडावे? लोकांनी माझा तिरस्कार का करावा?"

त्या दिवशी याच गोष्टीचे चिंतन करीत तो झोपी गेला. दुसरे दिवशी तो भल्या पहाटे उठून अंघोळी साठी जेंव्हा नदीवर जाऊ लागला..तेंव्हा त्याच्या लक्षात आले..की आपल्या येथे लोकांनी लहानपणापासून धर्म म्हणून असत्यच सत्याच्या भाषेत ऐकलेलं आहे.शिवाय या असत्यापाठीमागे प्राचीन धर्माचा भलामोठ्ठा आशिर्वाद आहे. आपल्या या धर्मातल्या,समाजातल्या अनेक सज्जन विभूतींना तेच असत्य लहानपणापासून आवडेल आणि मनाला आधार वाटेल अश्या भाषेत व घटनांमधुन ऐकवलं गेलेलं असल्यामुळे त्यांचा देखिल त्यावर मायमाऊली इतका विश्वास आणि प्रेम आहे. त्यामुळे या सज्जन आणि सदाचारी धर्मविभूतींना आणि तश्याच आपल्या समाजाच्या इतर लोकांना या धर्माविषयी ,आपल्या कडून काहिही विरोधी ऐकवलं गेलं..की प्रचंड मनस्ताप होतो. ,रागही येतो. मग आता काय बरे करावे? सत्य लोकांच्या गळी कसे उतरवावे?मला स्वतःला धर्मातल्या असत्याचा झालेला त्रास जाणवतो,इतरांनाही होताना दिसतो...मग मी त्याचे कारण सांगु पहातो,तर लोक ते ऐकून कानाबाहेर का बरे फेकून देतात? "

असाच विचार करत तो नदिवर गेला..स्नान करण्यासाठी त्याने नेहमीप्रमाणे पटकन पाण्यात बुडी मारली. पहाटेची वेळ.. आसपास कुणीही नाही.. लवकर येण्याची शक्यताही नाही. म्हणुनच तो त्या दिवशी बराच वेळ स्नान करत राहिला. आजुबाजुनी पहाटवार्‍याची मंजूळ गाणी ,वृक्षवेली लतापल्लवांच्या आडून त्याला ऐकू येऊ लागली. पक्ष्यांचे होणारे आवाज त्याचे मन प्रफुल्लित करु लागले. आणि समोरील डोंगराच्या बाजूने पूर्व दिशेनी तो तेजोनिधी भास्कर सूर्य आपल्या आगमनाची चाहुल देऊ लागला. निसर्गाच्या या विलक्षण प्रतिमादर्शी काव्यानी आणि त्या हळूहळू घडणार्‍या सूर्यदर्शनानी त्याच्या तोंडून सहजतेने त्या सूर्याची स्तुती करणार्‍या काहि रचना बाहेर येऊ लागल्या. आणि नंतर मनात विचार आला. जर का हा सूर्य जसा आहे तसाच आपल्याला दिसतो..त्याची जी भलिबुरी कहाणी असेल, ती काव्यरूपानी ऐकवतो.. तर आपणंही याचं अनुसरण का करू नये?

हा एव्हढा.. आणि एव्हढाच विचार मनात घेऊन.. तो बोलू लागला , "लहानपणापासून मी जातीब्राम्हण असल्यामुळे परंपरेच्या नियमानुसार धर्मशास्त्र शिकलो..देवाचा सांगितलेला मार्ग काटेकोर आचरला. पण तरी देखिल हा देव त्याच्या सांगितलेल्या मार्गांनी प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने उपासना करूनंही का बरे मिळाला नाही? माझी बुद्धी आणि त्याच्याविषयी मनात दाटलेले ममत्व, हे सारेच अनेकदा व्यर्थ का बरे गेले? जेंव्हा जेंव्हा देव दिसला मिळाला असे वाटले..तेंव्हा तेंव्हा तो बुद्धिला आणि मनाला घडलेला आभासच होता, असे नंतर अनेकदा का बरे मला वाटले? कदाचित हेच कारण असावे की मला भगवंत प्राप्तीची दाट ओढ मनाला लागून राहिलेली आहे..जीवन जगण्यामधे वास्तवापेक्षा माझा कल्पनेच्या मनोराज्यावर अधिक भार रहात आलेला आहे.. मग मला देव क्षणिक का होई ना? दीसला! हा माझ्या दुबळ्या मनाला ज्ञानेंद्रीयांच्या मदतीनी झालेला आभासच म्हणायला हवा. कारण आजपर्यंत ज्यांना ज्यांना देव दिसला..त्यांपैकी एकानेही तो दुसर्‍याला दाखवला नाही..दाखवू शकला नाही! मग हे तर सृष्टीनियमाच्या अत्यंत विरुद्ध असे अनुभव शास्त्र झाले की!. जी जी वस्तू ,घटना,ज्ञान...आज किंवा कालांतराने या भूतलावरील एकाहि माणसाला दिसते,कळते,प्राप्त होते..ती ती वस्तू ,घटना,ज्ञान पुढे तो दुसर्‍या प्रत्येकाला वाटू शकतो,देऊ शकतो,देतोही..! मग देवच तेव्हढा नित्य परंतू काहि क्षणांपुरता भेटत असला.. तरी तो मी दुसर्‍याला का बरे दाखवू शकलो नाही? देऊ शकलो नाही? म्हणजे नक्कीच हा माझ्या मनाच्या दुबळेपणाच्या गरजेतून तयार झालेला एक मनोरंजक खेळ आहे.. त्यामुळे प्रथम चिडायचेच असेल,तर मला आता माझ्या या दुबळ्या देवलसी मनावर चिडले पाहिजे..त्याला दररोज हे जाणवून दिले पाहिजे "की बाबा रे! तू दुबळा आहेस...सतत आधारच शोधत रहाण्याइतका मनातूनच अपंग आहेस..त्यामुळे धर्म असो अथवा इतर काही..,त्यानी तुझ्यासमोर ह्या देवासारख्या काल्पनीक आणि तुला आवडणार्‍या गोष्टी दिल्या..की तू त्यापाठी धावत सुटणारच.. ..... .. ठरलं तर मग.. किमान आजचा एक दिवस आणि दिवसाचा प्रत्येक तास, मी या देवाच्या कल्पनेशिवाय जगण्याचा प्रयत्न करीन.. पहिला दिवस अथवा तास सार्थकी लागो अथवा न लागो.. पुढचा दिवस किंवा तास मी पहिल्या नेटानेच सार्थकी लावण्याचा नम्र प्रयत्न करीन,करत राहिन.. आणि मी देवाशिवाय जगण्याची माझ्या मनाला सवय लावीन.. या नविन आचरण मार्गात जगताना मी अजुन एक तत्व पाळेन. मला देवाच्या मार्गात असताना आलेले विफलतेचे अनुभव ,आणि या नव्या मार्गात आता येत असलेले सजगतेचे अनुभव..., मी माझ्यासारख्याच देवाचा शोध घेऊन हरलेल्या,थकलेल्या,वैफल्यग्रस्त झालेल्या माझ्या सारख्याच समदु:ख्खिताला सांगेन,वाटेन...पुढे त्याचे देखिल असेच अनुभव मी ऐकेनच!...कारण एक पांगळा जेंव्हा दुसर्‍या पांगळ्याला हात देतो,तेंव्हा त्यांची दोघांचिही कुबडी'ची गरज संपायला सुरवात होते"

सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले. म्हणूनच हे ऋषिजनहो...सत्य हे या पद्धतिनी जीवनात अवतरीत झाले आणि त्याची दुसरी तुमच्या माझ्यातलिही बाजु दाखवून ते लाभले..तरच ते सत्य तेव्हढ्या कारणापुरते आणि तेव्हढ्या कारणाकरीता सत्य मानावे,आणि त्याला प्राणपणाने पाळावेही!"

शौनक म्हणातत, "हे महर्षी...आज मनाचे अतिशय समाधान झाले.आणि त्याही पेक्षा आंम्हाला सत्य हे असावे कसे?,आणि वापरावे कसे? याचे सम्यक ज्ञान झाले. तेंव्हा येव्हढ्यावरच न थांबता.. आंम्हाला या सत्याचे व्यक्तिगत सोडून सामाजिक आचरणाचे काही मार्ग असले तर ते ही अश्याच एखाद्या कथेच्या द्वारे सांगा...ऐकण्यासाठी आमची मने आता आसुसली आहेत.
===============================================
इति श्री सत्यकथायां द्वितीयोध्यायः .. श्री सत्यार्पणमस्तु. सत्यजगत् ,जगत् सत्य की जय.. !

..........................................
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साती ताई,
ही सत्यनारायणाच्या चमत्कारी आणि देवलसी कथेच्या रोगावर मी शोधून काढलेली लस आहे.
2 अध्याय झाले,अजुन 3 राहिलेत.